पराक्रमी वीर भूलोकमल्ल उर्फ सोमेश्वर चाळुक्य तृतीय
--------------
@
सोमेश्वर चाळुक्य उर्फ साळुंखे तृतीय अर्थात भूलोकमल्ल याला त्या काळी चतुरंगमल्ल अशा दुसऱ्या नावाने सुद्धा सम्बोधले जात होते. कारण हा चाळुक्य वीर होताच तेवढा पराक्रमी योद्धा ! सोमेश्वर चाळुक्य हा रथ, हत्ती, अश्व आणि पायदळ,अशा सैन्याच्या चारही प्रकारातील युद्धातला तरबेज आणि निपुण पराक्रमी वीर योद्धा होता. रंगाने सावळ्या म्हणजे मेघवर्णी असलेल्या भूलोकमल्ललाने हातात धनुष्य घेवून रणांगणावर पाय ठेवला, की तो धडकी भरलेल्या शत्रुपक्षातील लोकांना शारंग धनुष्य हातात घेतलेल्या निलवर्णी कॄष्णाप्रमाणे भासायचा.
तृतीय सोमेश्वर हा परमर्ददेव अर्थात विक्रमादित्य चाळुक्य यांचा पराक्रमी पुत्र होता. तृतीय सोमेश्वर अर्थात भूलोकमल्ल हा वडील विक्रमादित्य नंतर कल्याणी चाळुक्याच्या गादीवर बसलेला पराक्रमी वीर होता. खरे तर भूलोकमल्ल ही तृतीय सोमेश्वर याची बिरुदावली होती, मात्र त्याने शिलालेखातून स्वतःच्या नावाऐवजी बिरूदाचाच जास्त वापर केल्याचे दिसून येते. तृतीय सोमेश्वर हा आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी वीर असला, तरी मात्र वडील विक्रमादित्यांच्या सर्वच सामंतांनी चहुबाजूंनी आपापली स्वतंत्र राज्ये जाहीर केल्याने भूलोकमल्लाचा सम्पूर्ण जीवनकाळ युद्धातच गेला.
शिलालेखातून कोरलेल्या माहितीनुसार सोमेश्वर चाळुक्य उर्फ साळुंखे तृतीय हा वीर योद्धा युद्धावर निघाल्यानंतर त्याच्या सैन्यात असलेली चारी सम्पन्न दले ज्या रस्त्यावरून चालायची, ते रस्ते सैन्याच्या उडालेल्या धुळीने सारे आकाश आणि सूर्याला झाकोळून टाकायचे. विक्रमादित्य चाळुक्य (सहावा) यांचे सामंत असलेल्या यादव, होयसाळ, कदम्ब, कल्चुरी, काकतीय, चोळ, पान्ड्ये इत्यादि सामंतांनी चाळुक्य राज्याच्या चहुबाजूंनी असलेली आपापली राज्ये स्वतंत्र जाहीर करण्याला सुरुवात केली. त्यामुळे सोमेश्वर चाळुक्य याचा सम्पूर्ण जीवनकाळ युद्धांनी भरलेला असाच होता.
चाळुक्य नॄपती सोमेश्वर चाळुक्य उर्फ साळुंखे तृतीय याची वडिलांच्या सर्व सामंताबरोबर सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. राज्यातील अशा युद्धजन्य परिस्थिमुळे सर्वसामान्य प्रजा मात्र उदासीन बनत चालली होती. सामंतांच्या आपल्यावर एकजुटिने चालून येणाऱ्या अशाच एका फौजांमुळे चाळुक्य राजा तृतीय सोमेश्वर संतप्त बनला होता. त्याने एकजुटिने चालून येणाऱ्या जगद्देवाच्या आणि इतर शत्रू फौजांना सामोरे जात त्यांचा मार्ग अडवला. घनघोर युद्धाला तोंड फुटले, विलक्षण कापाकापीला सुरुवात झाली. चाळुक्य नरेश सोमेश्वर याने रणांगणात पराक्रमाचे अद्भूत दर्शन घडवत शत्रुंचा पाडाव केला.
युद्धात पराजित झालेल्या जगद्देव आणि त्याच्या इतर शत्रू फौजांनी रणातून काढता पाय घ्यायला सुरुवात केली. पराजित केलेल्या या सैन्याला पिटाळत सोमेश्वर चाळुक्य याने त्यांना सह्यगिरि डोन्गरातिल एका किल्ल्यात नेवून कोंडून टाकले आणि कडक बंधनात ठेवले. जगद्देव या मालवराजाला साहाय्य करून सोमेश्वरच्या कचाट्यातून वाचविण्याच्या उद्देशाने कोणीतरी एका राजाने आपल्याबरोबर मोठे सैन्य घेवून तो धावून आला. मात्र सोमेश्वर चाळुक्य उर्फ साळुंखे तृतीय याने आलेल्या राजाची अवस्था अग्निकडे पतंग धाऊन येतो अगदी तशीच करून त्याचा निप्पात केला.
सोमेश्वर चाळुक्य याने किल्ल्यातील बंदी बनवलेल्या शत्रुंसाठी शेवटची उरली सुरली आशा सुद्धा सम्पली होती. कारण म्हणजे जगद्देवाच्या मदतीसाठी धावून आलेल्या राजाला सुद्धा भूलोकमल्लाने सैन्यासकट सम्पवले होते. यामुळे जगद्देव आणि त्याच्यासोबतचे बंदी असलेले राजे व सैन्य यामुळे हताश बनले होते. त्यांना तिथेच बंदी ठेवून भूलोकमल्ल निष्कंटक झाल्यागत आपले राज्य करू लागला. मात्र राज्यावर आलेले एक मोठे संकट सम्पवले, तरी सुद्धा इतर सामंत राजांनी चहुबाजूंनी युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून सोमेश्वर तृतीय यास खूपच त्रासून सोडलेले होते.
वडील विक्रमादित्य चाळुक्यांच्या जवळपास सर्वच सामंतांनी निर्माण केलेल्या सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोमेश्वर चाळुक्य उर्फ साळुंखे तृतीय यास सतत युद्धातच अडकून पडावे लागले. त्यामुळे वडील विक्रमादित्य चाळुक्य प्रमाणेच पराक्रमी असूनही, सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भूलोकमल्ल उर्फ सोमेश्वर तृतीय यांची राजकीय काराकीर्द तशी वादळीच राहीली. त्याने इ.सन. 1126 ते 1138 असा बारा वर्षाचा राज्यकारभार करून कल्याणीच्या चालुक्य राज्याची बागदौर समर्थपणे साम्भाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यात त्याला यश सुद्धा मिळाले.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
9422241339,
9922241339.
No comments:
Post a Comment