दिल्लीचा मोगल बादशाह अझीझुद्दीन उर्फ आलमगीर द्वितीय याने १४ ऑक्टोबर १७५४ रोजी नानासाहेब पेशव्यांचे चुलत बंधू व दिवाण सदाशिवराव भाऊस एका फर्मानाद्वारे मोगली मुलखाची मुखत्यारी दिली.ह्या मुखत्यार पत्रान्वये बादशाहने मराठ्यांकडून संरक्षण,राज्याची वजिरी व मीर बक्शिगीरीसाठी योग्य,विश्वासू माणूस नेमणे व बादशहास योग्य तनखा देणे, ह्या गोष्टी करण्यास सांगितले आहे.हे फर्मान फारशी भाषेतील असून पेशव्यांच्या पारसनीसांकडून पिढी दर पिढी हस्तांतरित होत शेवटी पुणे येथील नारायण गोविंद पारसनीस यांच्याकडे ते आले.गेल्या पिढीतील प्रख्यात इतिहास संशोधक सरदार आबासाहेब मुजुमदार यांना ते मिळाले व त्यांनी त्याचे भारत इतिहास संशोधन मंडळात वाचन पण केले होते.सरदार आबासाहेब मुजुम्दारांच्या विविध ऐतिहासिक लेखांचा संग्रह असलेले पुस्तक सप्टेंबर २०२० मध्ये त्यांच्या कन्या अनुपमा मुजुमदार यांनी प्रकाशित केले असून त्यात उपरोल्लेखित फर्मान विषयी लेख आहे.सदरहू पुस्तकात फर्मानाची नक्कल,फारशी ते मराठी लिप्यंतर व मराठीत अर्थ दिला आहे.’ते’ फर्मान असे आहे:
‘’ राज्यरुपी गादीचे तेज वाढविणारा,वैभवरुपी उशीला शोभा आणणारा तरवार बहाद्दर व कलम बहाद्दर,बाहुटा ( झेंडा )उभारणारा व राज्यरूपी इमारतीचा पाया घालणारा,जगज्जय्स्तेभास बळकटी आणणारा,हिंदुस्थानच्या उच्च उमरावात अग्रणी व आमच्या विशेष कृपेस पात्र झालेल्या अशा सधुराव भाऊजी बहादुराने आपल्यावर झालेल्या बादशाही कृपेमुळे आनंदी व उत्साही होऊन जाणावे कि,याह्याखान याच्या जागी नेमलेला व आमच्या न्याय दरबारास पसंत असलेला आमचा अत्यंत विश्वासू व घरोब्यातील आश्रित कामिसारखान मीर मुनशी यांस बंगाल,अलाहाबाद,महमदाबाद-बनारस या सुभ्यांवर आमचे हुकुम पोहोचविणेस व अत्युच्च अशा आमच्या दरबारच्या गुप्त गोष्टीनी ओतप्रोत भरलेल्या खजिन्यातील रत्नानप्रमाणे असलेली गुप्त व महत्वाची कामे करण्याकरिता पाठविले आहे.खानमज्कुरे,यांजकडे सोपविलेला कामगिरीचा खुलासा येणे प्रमाणे:-
आमच्या शाश्वत राज्यरोह्नाची प्रभात झाल्यापासून आजपावेतो वरील प्रांत रिकामे असल्यामुळे त्याजवर कोणी शास्ता नसल्याने इमादुल मुल्लक याने आमच्या समक्ष व अपराक्ष निंद्य वर्तन केले.हे सर्वाना माहित असल्यामुळे त्याचा तपशील देण्याचे कारण नाही.ज्यांतील संपत्ती खाणीच्या व समुद्राच्या बरोबरीने होती अशा आमच्या बादशाही मुलखाची,मालाची व कारखान्यांची त्याने शक्य तेवढी लूट केली;असले उद्धट वर्तन करून अब्दाली यांस राजधानीत भीती दाखवून त्याच्याशी लढाई न करता आपले स्वामित्व कबुल करविले.त्याने त्या वेळी विशेषतः अतिपवित्र व अतिश्रेष्ठ अशा आम्हांस व आमच्या राजपुत्रांस इतके छळले कि,आम्ही आमच्या जीवितास कंटाळलो.थोडक्यात सांगावयाचे म्हणजे त्याच्या जाचणी चा सुरा आमच्या उरात भोसकला जाऊन तो आम्हांस सर्वथैव असह्य झाला! अशा स्थितीत आमच्या पवित्र राज्यास टेकू देणारे उदारधी बाळाजी बाजीराव यांच्या आश्रयच्छत्राशिवाय आम्हांस व आमच्या परिवारास दुसरे साधन नाही!त्यांनी आमच्या तमाम मुलखाचे मुखत्यार होऊन आपणांस योग्य दिसेल त्या रीतीने आमचा तनखा कायम करावा व आपल्या आप्तांपैकी एकादा विश्वासू नोकर नेमावा.त्याने नेहमी आपल्या खड्या फौजेनिशी आमच्या खास हुजूर जवळ असावे.आपणास योग्य वाटेल त्यास वजिरी व मीरबक्षीगिरी द्यावी.शाहू राजाच्या वंशास हि आपण उत्तम व्यवस्थेने ठेविलेले आहे.आमचे आश्रित जे आपण त्यांनी आमचे जे नोकर आपणांकडे येतील त्यांच्याशी उदार वर्तन ठेवावे व त्यांचा मानमरातब योग्यते प्रमाणे ठेवावा.आम्हांस खात्री आहे कि,राज्याचा महत्वाचा कारभार अमलात आणताना या पूर्वी शपथपूर्वक व राजीखुशीने झालेले आमचे करारनामे पाळण्यात येतील .’’
तारीख २६ जिल्हेज,सन ६,हिजरी सन ११६७, इ.स.१४ ऑक्टोबर १७५४.
यापूर्वी २३ एप्रिल १७५२ रोजी मराठे व दिल्लीकर बादशाह यांच्यात कनोज मुक्कामी बादशाहीचे अंतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण मराठ्यांनी करण्यासंबंधी अहदनामा ( करार ) झाला होताच.तरी पण त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा मुखत्यारपत्र देऊन मराठ्यांना बादशाहने मोगल साम्राज्याचे रक्षण करण्याची गळ घातली.याचा अर्थ पहिला करार होऊन देखील मराठ्यांकडून त्यातील तरतुदींचे योग्य रित्या पालन,अंमलबजावणी करण्यात काही कसूर,कमी राहून गेली असावी वा मुखत्यारपत्रा च्या अभावी मराठ्याना अहदनाम्याची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असाव्यात.
जाणकारांनी, अहदनामा असताना पण बादशाहने त्या नंतर दोन वर्षांनी मुखत्यारपत्र का दिले असावे,यावर प्रकाश टाकावा.
संदर्भ:सरदार आबासाहेब मुजुमदार :
ऐतिहासिक लेखसंग्रह.
संपादन-अनुपमा मुजुमदार.
No comments:
Post a Comment