महमूद गावान : (१४११ ?–५ एप्रिल १४८१). दक्षिण हिंदुस्थानातील बहमनी राज्यातील कार्यक्षम प्रशासक व मुत्सद्दीमुख्यमंत्री. त्याचे पूर्ण नाव निजामुद्दीन महमूद गिलानी ऊर्फ महमूद गावान. त्याचा जन्म इराणमधील गिलान राज्यांतर्गत गावाँ ह्या खेड्यात झाला. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण इ.स.१४५३ मध्ये सुलतान अहमदशाहच्या वेळी (कार. १४३६−५८) खोरासानातून व्यापाराच्या निमित्ताने वयाच्या चाळिसाव्या वर्षी ती बीदर येथे आला आणि आपल्या मुत्सेद्दिगिरीने त्याने बहमनी सत्तेत एक महत्त्वपूर्ण स्थान मिळविले. अहमदशाहच्या कारकीर्दीत प्रारंभी त्यान बहुमनी सत्तेला स्थैर्य मिळविण्यासाठी दख्कनी आणि अराणी (परकीय) यांत समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि हिंदु-मुसलमान यांतील भेदही शमविला. अलाउद्दीन अहमदशाहच्या मृत्युनंतर हुमायूनशाह (कार. १४५८−६१) गादीवर आला. हुमायूनशाह क्रूर होता, असे फिरिश्ता व बुर्ऱ्हान-इ-मासिरचा लेखक यांनी म्हटले असले, तरी गावनच्या पत्रांतून त्याच्याविषयी आदरच दिसतो. सुलतान अहमदशाहनंतर हुमायूनशाह याने त्याची मुख्य वजीर म्हणून नियुक्ती केली. हुमायूनशाहच्या अकाली मृत्युनंतर निजामुद्दीन अहमदशाह (कार. १४६१-६२) आणि शमशुद्दीन मुहंमद (कार. १४६३−८२) हे अल्वयीन मुलगे अनुक्रमे वहमनी तख्तावर आले. त्यांच्या कारकीर्दींत राणी मख्दूमजहान नर्गिस वेगम ही महमूद गावान व ख्वाजाजहाँ तुर्क यांच्या मदतीने (त्रिसद्स्य समिती) राज्यकारभार पाहत असे. तिला ख्वाजाजहाँच्या संशयास्पद वर्तनाचा सुगावा लागताच तिने त्यास ठार मारले आणि राज्याचे सर्वोच्च अधिकार महमूद गावनच्या हाती दिले. त्याला ख्वाजाजहाँ ही उपाधी आणि वकील-ए-सल्तनत हे पद दिले. या पुढील सु. वीस वर्षांचा काळ हा ‘गावान कालखँड’ म्हणून वहमनी सत्तेच्या इतिहासात प्रसिद्ध आहे.
शमशुद्दीन सज्ञान होईपर्यंत राणीने स्वतः राज्यकारभारात लक्ष घालून त्याची सर्व भिस्त गावानवर टाकली. गावाननेही अत्यंत जबाबदारीने चोख कारभार करून बहमनी सत्तेचा विस्तार केला. त्याने तेलंगणच्या सरहद्दीवर सतत तीन वर्षे युद्धे करून यशस्वी चढाई केली. तसेच कोकण, गोवा आदी पश्चिमेकडील अरबी समुद्रापर्यंतचा विस्तृत प्रदेश जिंकून संगमेश्वरच्या राजास मांडलिकत्व पतकरावयास लावले. या युद्धात त्याला अफाट संपत्ती व मूल्यवान वस्तू मिळाल्या. युद्धात मिळालेली लूट त्याने सुलतानाकडे सुपूर्द केली. सुलतानने त्याला श्रेष्ठ अमीर हा किताब दिला आणि मजलिस-इ-करीम, अजिम-इ-अजम, हुमायून मख्दूम अशा पदव्या दिल्या. अखेरीस अमीर-इ-जुम्ला आणि वझीर-इ-अशरफ या दोन्ही या दोन्ही पदांवरही तो काम करीत होता. तसेच दक्षिणेच्या राज्यांची सर्व सत्ता त्याच्या हाती दिली.
बहमनी राज्यातील तिसरा निजामुद्दीन याचा मृत्यु आणि ख्वाजाजहाँ तुर्कचा खून या संधीचा फायदा घेऊन माळव्याच्या महमूद खल्जीने बीदरवर आक्रमण करून माहूर व एलिचपूर परगण्यांवर आपला हक्क सांगितला. दोघात घनघोर युद्ध झाले. त्यावेळी गुजरातच्या सुलतानच्या मदतीने त्याने मलिक युसूफ तुर्क यांच्या साहाय्याने महमूद खल्जीचा बेत हाणून पाडला. शेवटी खल्जीला माघार घ्यावी लागली आणि तह झाला. महमूद गावानने लगतची हिंदू आणि मुसलामान रार्ज्ये यांत समोपचाराने धोरण ठेवून समतोल साधण्याचा यत्न केला. यानंतर त्याने पश्चिम किनारपट्टीवर मोहिम काढूण खेळणा, संगमेश्वर, विशाळगढ इ. ठिकाणी ताब्यात घेतली व गोवा जिंकला (१ फेब्रुवारी १४७२). त्याला गोवा, लोंढा आणि कोल्हापूर हे जिल्हे जहागिरीदाखल देण्यात आले. कोकणातील विजय आणि शेजारच्या हिंदु-मुसलमान राजांशी सीमातंट्याबाबत सलोख्याचे धोरण यांमुळे बहुमनी राज्याला स्थैर्य प्राप्त झाले.
गावानने बहमनू सत्तेच्या राज्यविस्तार केला आणि प्रांताधिकाऱ्यांना वठणीवर आणले. त्यासाठी त्याने पूर्वापार चालत आलेल्या चार सुभ्यांनी आठ सरलष्करांत विभागणी केली. प्रत्येक विभागावर एक सुभेदार (तरफदार) नेमला. तरफदारांची बदली तो एका सुभ्यातून दुसऱ्या सुभ्यात करीत असे. पुढे तरफचेही उपविभाग सरकारात करण्यात आले. तसेच विभागातील काही भाग शाही मुलूख म्हणून स्वतंत्र ठेवला आणि लष्कर व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले. प्रांतातील फक्त एकच किल्ला राज्यपालाच्या ताब्यात ठेवून बाकीचे मध्यवर्ती सत्तेच्या अखत्यारीत ठेवले. मनसबदारांकडे ठेवली जाणारी फौज व तिच्या व्यवस्थेसाठी मुलूख तोडून न देता त्यासाठी ठराविक रक्कम देण्यात येऊ लागली. तसेच त्याने शेतसारा व महसूल यांतील लाचखोरी कमी करण्यासाठी कडक उपाय योजले त्याचप्रमाणे शेतसाऱ्यासंबंधी सुधारणाही केल्या. जमिनीच्या आकारानुसार शेतसारा ठरविण्यात आला. त्यामुळे बहमनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारली आणि नगद उत्पन्नाची साधने निश्चित झाली.
त्याने राज्यकारभारात हिंदु-मुसलमान हा भेदभाव केला नाही. गुणी व योग्य लोकांना संधी देऊन अधिकारपदे बहाल केली. राजकीय विस्तार व प्रशासकीय सुधारणांबरोबरच त्याने सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. बीदर येथे बांधलेल्या बहुविध वास्तूंतून त्याची खास इंडो-इराणी वास्तुशैली दृग्गोचर होते. त्यांपैकी त्याने बांधलेले महाविद्यालय (मद्रसा) आणि त्यातील ग्रंथालय प्रसिद्ध आहे. त्याच्या ग्रंथालयात ३,००० मूळ हस्तलिखित ग्रंथ होते. महमूद गावान समरकंद, खोरासान वगैरे ठिकाणांहून विद्वानांना पाचारण करीत असे. त्यामुळे मध्ययुगीन विद्यापीठातील मुस्लिम विद्येचे माहेरघर म्हणून हे विद्यापीठ तत्कालीन काळात ख्यातनाम झाले. तेथे पारंपारिक शिक्षणाव्यतिरिक्त वेगवेगळ्या कलांचे शिक्षण देण्याची सुविधा होती. विनामूल्य शिक्षण आणि निवासाची सोय, ही या विद्यापीठाची खास वैशिष्ट्ये. बीदर येथील चैर अप्रतिम मनोरे, दुसरा अलाउद्दीनशाह याचे थडगे इ. वास्तू कलात्मक असून विशेष उल्लेखनीय आहेत. या वस्तूंतील कौलांची सजावट आणि नक्षीकाम प्रसिद्ध आहे.
दख्खनी व इराणी मुसलामनांत बहमनी काळात नेहमीच अंतर्वैर असे. गावानने ते शमविण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही अखेर ते त्यालाच भोवले आणि त्याची परिणती १४८१ मध्ये अहमदशाह जिंजीच्या मोहिमेवर असताना महमूद गावानचा मत्सर करणाऱ्या दख्खनी मुसलमानांचा पुढारी मलिक हसन याने जरिफ-उल्-मुल्क दख्खनी व मिफ्ताह हब्शी यांच्याशी संगनमत केले आणि महमूद गावानविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले. ओरिसाच्या पुरुषोत्तम रायला दक्षिणेवर स्वारी करण्यासाठी चेतवाणी देणारे खोटे पत्र लिहून त्यावर विश्वासघाताने महमूद गावनचा शिक्का उठविण्यात आला व ते पत्र दरबारात हजर केले. त्यामुळे अहमदशाहने दारुच्या नशेत गावनला देशद्रोही ठरवून कोंडापल्ली (ओरिसा) येथे मृत्युदंड दिला. त्याच्या मृत्यूनंतर बहमनी सत्तेस उतरती कळा लागली.
महमूद गावान कलाभिज्ञ, विद्वानांचा चाहता व कार्यक्षम प्रशासक होता. त्याने बांधलेल्या अनेक वस्तूंतून त्याची कलाभिज्ञ दृष्टी दिसते, तद्वतच इराण, ईजिप्त, तुर्कस्तान इ. देशांशी त्याने प्रस्थापित केलेल्या राजनैतिक संबंधांतून त्याचा मुत्सद्दीपणा व दूरदर्शित्व दृग्गोचर होते. गावान एक उत्कृष्ट साहित्यिक आणि गणितज्ञ होता. परदेशी विचारवंत, पंडित व विद्वान यांच्याबरोबर त्याचा विपुल पत्रव्यवहार झाला होता. तो पत्रसंग्रह रियाझुल-इन्शा या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांपैकी काही पत्रे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची आणि त्याच्या मुत्सद्दी पणाची ग्वाही देणारी आहेत. विशेषतः गावानचे आश्रयदाते हुमायूनशाह बहामनी याच्यातर्फे त्याने महमूदशाह बेगडा यांना लिहिलेले पत्र उल्लेखनीय आहे. बहमनी सत्तेच्या पडत्या काळात महसूल व जमीन यांत सुधारणा करून त्याने राज्यविस्ताराबरोबरच बहमनी सत्तेला स्थैर्य प्राप्त करून दिले. त्यामुळे त्याच्या काळाविषयी फिरिश्ता व अथानशिअस न्यिकितीन (रशियन प्रवासी) यांनी प्रशंसोद्गार काढले आहेत.
पहा : बहमनी सत्ता
संदर्भ : 1. Sherwani, H. K. y3wuohi, P. M. Early History of the Mediaeval Deccan, Vol. I & II, Hyderabad, 1973 & 1974.
2. Sherwani, H. K. The Great Bahamani Wazir Mahmud Gawan, Bombay, 1942.
३. अहमद, मुहम्मद शफीउद्दीन, यादगार-इ-महमूद गावान, बिदर, १९६४.
शेख, रुक्साना
No comments:
Post a Comment