विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 14 February 2021

#पाटीलकी.....


 #पाटीलकी.....

राजेभोसले घराण्याने सुद्धा छत्रपती झाल्यानंतर देखील अभिमानानं चालवलेलं वतन,यावरूनच आपल्याला पाटील या शब्दाचा आवाका लक्षात येतो आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात देखील महाराष्ट्रात विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा पाटलांचीच ‘दादा’गिरी असल्याचे लक्षात येते.महादजी बाबा शिंदे पाटील अलिजाबहाद्दर यांना 'हिंदुस्थानचे पाटील' म्हणून गौरवण्यात येते. .इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनांमधून पाटील या शब्दाची जादू दाखवून देतात एवढा हा आपल्या समाजातील जिव्हाळयाचा शब्द. समाजमाध्यमांवर आणि लग्नपत्रिकेत पाटील शब्दाचीच रेलचेल दिसून येते . आज देखील प्रत्येक जण स्वतःला पाटील म्हणून घेऊ इच्छितो .कारण पाटील या शब्दाला इतिहासच फार मोठा आहे .सरकार आणि सामान्य रयतेमधील दुआ म्हणजे पाटील .
पाटील म्हणजे गावाचा मुख्य आदमी. म्हणून पाटलाला मुकादम असेही म्हणत. पट्टीलक शब्दावरून पाटील शब्द आला असे म्हणतात.गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणे आणि त्यावर कुळ बसवणे हे पाटलाच मुख्य काम. सर्वांकडून करवसुली हाही त्याचाच भाग, वसुल केलेला कर देशमुखाकडे पोहचवणे त्याच बरोबर मुख्य महसुली अधिकारी व न्यायदानाचे काम देखील पाटील करत असे. गावाच्या मिरासदारांपैकी प्रमुख अथवा वरिष्ठ घराण्याला पाटीलकीचा बहुमान मिळत असे . कारण पाटीलकी विकता येत होती ,खरेदी करता येत होती अगदी गहाण ही ठेवता येत होती.पाटीलकीच्या वाटण्या देखील व्हायच्या पण तरीदेखील काही मान थोरल्या घराकडे राखून असत काही गावात पाटलाच्या भावकीत बांगडी फिरल्यासारखी पाटीलकी फिरत असे. एक पेक्षा अधिक पाटीलकीच्या तक्षिमा असत तेव्हा पाटीलकीच्या मानाच्या वाटण्या होत असत.होळीची पोळी,पोळ्याचा बैल , लग्नाची वाटी ,मांडव टिळा ,दसऱ्याचा मान ,पासोडी ,राबता महार, चांभाराकडून जोडे,तेल्याकडून तेल, देवाकडे बकरे पडतात त्याची मुंढी अशा प्रकारचे मान गावाच्या पाटलांना असत ,प्रत्येक गावानुसार पाटलाचा मानपानात थोडा फार फरक होत असे. मौजे रांजणगाव सांडस तर्फ कर्डे ,येथे रणदिवे पाटील बंधूंमध्ये पाटीलकीच्या वडिलपणावरून वाद होऊन थेट पेशव्याच्या दरबारात गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यात आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी दिव्य करावे लागले होते . अनेक मजहरांमध्ये अनेकदा साक्षीदार म्हणून विविध गावाचे पाटील व कुलकर्णी आपल्याला पाहायला मिळतात. त्यात पाटलाची निशाणी नांगर असल्याचे आपल्याला दिसते. इंग्रजी अंमल सुरु झाल्यापासून पाटीलकीच्या कामात विभागणी होऊन पाटलांचे दोन प्रकार झाल्याचे आपल्याला दिसते १ मुलकी पाटील २ कामगार पाटील .कामगार पाटलालाच पुढे पोलीस पाटील म्हंटले गेले आहे.
अशा वेळी गावच्या थोरल्या पाटलांनी कामगार पाटीलकी स्विकारल्याच पहायला मिळतं.
© हर्षद रमेश हांडे देशमुख
#क्षत्रियबाणा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...