कोल्हापूरच्या गायकवाड घराण्याची (मूळ शाखा मुंढवा - पुणे) संक्षिप्त माहिती ...!!!
दौलतराव गायकवाड सरखवास व विश्वासराव गायकवाड नाईक हे
२३ जानेवारी १८०० मध्ये किल्ले पन्हाळ्याजवळ रेडे घाटीच्या येथे झालेल्या पुण्याच्या पंतप्रधानांचा (पेशव्यांचा) सरदार परशुराम पटवर्धन यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या युद्धात करवीर छत्रपती घराण्याच्या वतीने धारातीर्थी पडले. या बद्दलची हकीकत खालील प्रमाणे...
२३ जानेवारी १८०० मध्ये किल्ले पन्हाळ्याजवळ रेडे घाटीच्या येथे झालेल्या पुण्याच्या पंतप्रधानांचा (पेशव्यांचा) सरदार परशुराम पटवर्धन यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या युद्धात करवीर छत्रपती घराण्याच्या वतीने धारातीर्थी पडले. या बद्दलची हकीकत खालील प्रमाणे...
गड उतरून आले खाली, घेतले चाल, रगडली घोडी कंपूवर |
दौलतराव, विश्वासराव रणभेरी भादुर ||
पाठी लागली फौज, मारिली झुंज, गर्दी झाली दोघांवर |
लागल्या जखमा, दौलतराव झाला जेर ||
काय शिरले दलामधी वाघ, हातामधी सांग, विश्वासराव रणनवर |
पडली फौजेची मीठी, तयाला जित धरले हो पर ||
सांग, आमुच्या भाऊला कोण तोडला, पुसे आप्पासाहेब सरदार |
बोले विश्वासराव, आम्ही मारली तलवार |
कापले राव गळा विश्वासराव झाला ठार |
महाराजाला वर्दी लागली पन्हाळगडावर ||
खबर ऐकता प्राण सोडला दौलतराव थोर |
धनी महाराज दुखी झाले, काय वदले हंबीर ||
आला हैबतराव धावून पालखीतन मुडदे न्हेले गडावर |
सायासाने आगीन दिले महाराज मानकरी सारे ||
चढाई गर्दी राजाची तलवार |
परशुरामभाऊ मोडला पट्टणकुडीवर ||
पट्टणकुटीची लढाई हि पटवर्धन व करवीरकर छत्रपती यांच्यात निर्णायक अशी लढाई होती व यात परशुरामभाऊ पटवर्धन हे मारले गेले. यानंतर पुण्यातून शिंद्यांची पाच पलटणी, युरोपियन अधिकाऱ्यांच्या बऱ्याच तोफा तसेच पंतप्रधानचा (पेशवे) तोफखाना व इतर बरेच सरदार हे करवीरच्या स्वारी करता रवाना झाली. हे वर्तमान कळताच करवीर छत्रपती हे आपल्या कुटुंब व इतर महत्वाच्या खाश्या सरदार मंडळींना बरोबर घेऊन पन्हाळा गडावर गेले.
परशुरामभाऊ पटवर्धन यांचा मुलगा रामचंद्रराव हा शिरोली नजीक तळ देऊन असताना त्याला करवीर छत्रपती पन्हाळ्यावर गेल्याची वार्ता समजताच त्यांच्यावर छापा घालण्याच्या उद्देशाने तो रेडेघाटीच्या जवळ आला. त्या दरम्यान करवीर महाराजांची फौज हि आसुरल्याच्या ओढ्या नजीक होती. त्यावेळी दौलतराव व विश्वासराव हे गायकवाड बंधू रात्री शत्रूच्या हालचालीं टिपत राक्षीच्या ओढ्याच्या भागात होते. त्या भागात शत्रूचे सैनिक दबा धरून बसले होते हे काही त्यांच्या लक्षात आले नाही. त्या सैनिकांनी उभय गायकवाड बंधूंवर अचानक हल्ला चढवला पण तेवढ्यात दोन्ही गायकवाड बंधूनी सावध होऊन शत्रूचे काही सैनिक मारले व काही जखमी केले. रात्रीच्या अंधारात व अचानक झालेल्या या हल्ल्याने व गडबडीने गायकवाडांच्या पायातील जोडे हे अंधारात कुठेतरी निसटून पडले तशा परिस्थितीत थोडी सामसूम झाल्यावर अंधारात ते तशेच गडावर आपल्या तळावर जाऊन पोहोचले.
गडावर गेल्यानंतर ते आपल्या मातोश्रींचे दर्शन घेण्यासाठी गेले असता मातोश्रींचे लक्ष त्यांच्या पायाकडे गेले व पायातील जोडे नाहीसे झाले हे दिसून येताच त्या रागाने म्हणाल्य "यश घेऊन आलात खरं; पण तुमच्या चढावा कुठे आहेत" मातोश्रींच्या प्रश्नांचा रोख समजताच उभय बंधू झालेली हकीकत कथन करतात पण यांच्या उत्तराने मातोश्रींचे काही समाधान होत नाही त्या रागानेच उभय बंधूंना सूनवतात कि "आज रणांगणावर जोडे टाकून आलात, उद्या बायका टाकून याला! प्रथम पदरचे जोडे घेऊन येणे व मग दर्शन घडेल" मातोश्रींचे उदगार एकूण दोघे बंधू तसेच माघारी जातात. त्या वेळी त्यांच्या बरोबर असतो तो फक्त त्यांचा हुजऱ्या.
रात्रीच्या अंधारात तीन घोडेस्वार रेडे घाट उतरून रक्षीच्या ओढ्यावर येऊन दाखल होतात. घोड्यांच्या टापांची चाहूल लागताच रामचंद्रपंतांचे सैन्य या तिघांवरही तुटून पडते. या हातघाई मध्ये दोघे गायकवाड बंधू व त्यांचा हुजऱ्या हे धारातीर्थी पडतात.
या गायकवाड बंधूंची स्वामिनिष्ठा हि अप्रतिम होती. विश्वासराव यांच्यावर छत्रपतींचे पुत्रवत प्रेम होते. छत्रपतींना याचे खूप दुःख झाले व महाराजांनी दोन्ही गायकवाड बंधूंचे पन्हाळगडावर (नरसिंहखिंडी जवळ) सतीच्या पारा जवळ इतमामाने त्यांचे स्वतःच्या व सर्व सरदार , मानकरी यांच्या समक्ष अंत्यसंस्कार केले.
त्याच बरोबर या घराण्याच्या शाखेचे वास्तव्य करवीरी झाल्यावर घराण्यातील पूर्वजांनी श्री करवीर निवासिनेच्या आवारात श्रीखंडोबाचे प्रशस्थ देवालय बांधले व श्रींचे रोजच्या नित्य पूजाअर्चा श्री पूजक गोविंद वामन मुनींश्वर यांच्या कडे चालू केली. अलीकडे सदर देवालय हालवून श्रीची स्थापना आवारातील ओरी मध्ये केली आहे.
फोटो- किल्ले पन्हाळ्यावरील तीन दरवाज्या नजीक गायकवाड वाडा येथील दौलतराव गायकवाड व विश्वासराव गायकवाड यांच्या समाधीचा आहे
No comments:
Post a Comment