नेमाजी शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत.
शिंदे ह्यांचे घराणे महाराष्ट्राच्या इतिहासांत फार प्रसिद्ध आहे. हें घराणे फार पुरातन असून, ह्यांतील कित्येक पुरुष, भोंसले, शिर्के, घोरपडे, जाधव, घाटगे वगैरे जुन्या मराठे सरदारांप्रमाणे मुसलमानी अमदानींत स्वपराक्रमानें उदय पावले असावेत, असे मानण्यास जागा सांपडते. 'रविराव' हें, 'रुस्तुमराव’ ‘झुंझारराव' ह्यांसारखे बहुमानदर्शक पद शिंद्यांच्या एका घराण्याकडे होते, असा उल्लेख ग्रांटडफ साहेबांच्या इतिहासांत दृष्टीस पडतो. बहामनी राज्यामध्ये शिंदे नांवाचे पुरुष मोठमोठे लष्करी अधिकार उपभोगीत होते, अशीही माहिती मिळते. मुसलमानी अमदानींतील मराठे सरदारांचा इतिहास अगदीं अंधकारांत असल्यामुळे त्याविषयीं अधिक खुलासा करितां येत नाहीं. तथापि महाराष्ट्रराज्यसंस्थापक छत्रपति शिवाजी महाराज ह्यांच्या कारकीर्दीपासून शिंदे घराण्यांतील पुरुषांचा नामनिर्देश जुन्या बखरी व जुने कागदपत्र ह्यांत यथास्थित सांपडतो; व त्यावरून हें घराणे मराठेशाहीच्या अगदी प्रारंभापासून अस्तित्वांत आहे,
शिवाजी महाराजांचे पदरीं नेमाजी शिंदे ह्या नांवाचे एक प्रबल व पराक्रमी सुभेदार होते; व त्यांनी महाराष्ट्रराज्यस्थापनेचे कामीं चांगली मदत केली होती१ . नेमाजी शिंदे ह्या पुरुषांचे नांव थोरले शाहू महाराजांचे कारकीर्दींतील अव्वल राजकारणप्रसंगांत वेळोवेळी दृष्टीस पडते. त्यावरून हा महाराष्ट्रवीर समरभूमीवर बरीच वर्षे चमकत असावा असे वाटतें. थोरले राजाराम महाराज ह्यांचे कारकीर्दींत जे लोकोत्तर स्वदेशभक्त निर्माण झाले, व ज्यांनी जीवादारभ्य श्रमसाहस करून स्वराज्य रक्षण केलें, त्या परम वंदनीय वीरमंडलामध्ये नरसोजी व जिवाजी पाटील शिंदे तोरगलकर पागनीस ह्या दोघांची नावें अंतर्भूत आहेत. ह्यावरून शिंदे घराणे हे पूर्वीपासून विख्यात आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं.
नेमाजी शिंदे ह्यांच्या नांवाचा उल्लेख, कृष्णाजी अनंत सभासदविरचित "शिवछत्रपतीचे चरित्र"-पृष्ठ ८१ ह्यामध्यें, शिलेदार व मुलुखाचे सुभेदार ह्यांच्या यादीमध्ये आलेला आहे, व इतर ग्रंथांतरींही आहे. तथापि ह्या पुरुषाची माहिती फारशी उपलब्ध नसल्यामुळे शिंद्यांचे घराणे मराठी राज्याच्या प्रारंभापासून अस्तित्वात आहे, असे पुष्कळ लोकांस माहीत नाही. परंतु त्याबद्दल आह्मांस मुळींच संशय नाहीं. थोरले बाजीराव ह्यांनी जिवाऊ शिंदे ह्यांस लिहिलेले एक फार जुनें पत्र उपलब्ध झाले आहे. त्यामध्ये नेमाजी शिंदे ह्यांच्या मराठी राज्यांतील पुरातन सेवेचा यथास्थित उल्लेख असून, महिपतराव शिंदे ह्यांनीं तशीच सेवा करावी व नक्ष करावा ह्मणून लिहिले आहे. हे पत्र फार वाचनीय व महत्त्वाचे असल्यामुळे येथे दिल्यावांचून राहवत नाहीं.
"गंगाजलनिर्मल जिवाऊ शिंदी यांसी--
प्रीतिपूर्वक बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुह्मांकडून राजश्री त्रिंबक गोपाळ आले. त्यांनी कितेक अर्थ निवेदन केला. त्याजवरून सविस्तर कळों आलें. व राजश्री महिपतराव शिंदे यांचेविसीं कितेक विदित केलें. ऐशास मशारनिल्हे पुरातन राज्यांतील सेवक; व पूर्वी राजश्री नेमाजी शिंदे यांणी या राज्यांत कोणे रीतीनें सेवा केली आहे व कितेक कामकाजे केली, त्यांचे जागां मशारनिल्हे आहेत. त्यांणीं सर्वप्रकारे जातीने अंगेजणी करून, तोलदार फौज धरून, दुष्टास नतीजा देऊन, आपला नक्ष करावा. हा समय हाच आहे. येविसींचा कितेक अर्थ राजश्री त्रिंबक गोपाळ यांस सांगितला आहे. हे तुह्मांस सांगतील. ती वचनें आमचींच जाणून, तुह्मीं मशारनिल्हेस उत्तेजन देऊन, सांगितल्याप्रमाणे कार्यभाग केलियानें हे घर तुमचेंच आहे. आह्मी सर्वस्वें तुमचे असों. यास संदेह नाहीं. जाणिजे. छ० ६ जिल्हेज.”
ह्या पत्रावरून जिवाऊ शिंदे ही बाई फार वजनदार व राजकारस्थानी असावी असे दिसतें.
No comments:
Post a Comment