( संत साहित्याची मौलिकता (प्रा.डॉ. रमाकांत कोलते गौरवग्रंथात प्रकाशित लेख )
- डॉ. राजेंद्र मगर, सोलापूर
(मो. ९४२०३७८८५०)
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या राज्यविस्तार धोरणामुळे गुजरातमध्ये मराठी
साम्राज्याचा पाया रोवला गेला. पुढील सेनापतींनी त्यास अधिक बळ दिले आणि
मुघल साम्राज्य गुजरातमधून नेस्तनाबूद केले. परिणामस्वरूप मराठा
साम्राज्याची एक शाखा गुजरातमधील बडोदा येथे निर्माण झाली. युद्ध, लढाया
आणि तहनाम्यानंतर गुजरातमधील मराठी साम्राज्याला ‘बडोदा’ राजधानी मिळाली.
अनेक नृपतींनी राज्य केल्यावर इ.स. १८७५ मध्ये बडोदा राज्याला ‘महाराजा
सयाजीराव गायकवाड’ नावाचा राजा मिळाला. दत्तकविधानाने त्यांची राजगादीवर
निवड झाली. निवडीपूर्वी त्यांचे औपचारिक शिक्षण झाले नव्हते. एक आदर्श;
परंतु इंग्रजांना वरचढ न होणारा राजा घडवण्याच्या उद्देशाने त्यांच्या
शिक्षणाची सोय केली.
सयाजीराव
महाराजांच्या शिक्षणाची सुरुवात वयाच्या बाराव्या वर्षी झाली. काही
भारतीय आणि इंग्रज शिक्षकांनी त्यांना अध्यापन केले. त्यापैकी आयरिश
शिक्षक एफ.ए.एच. इलियट यांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर राहिला. त्यांनी
दिलेले शिक्षण सर्वांगीण होते. त्याचे प्रतिबिंब महाराजांच्या
व्यक्तिमत्त्वावर आणि पर्यायाने राज्यकारभारावर पडले. ‘देशी भाषेतील
साहित्य आणि कला ही अनमोल देणगी आहे. त्याचे जतन, संवर्धन आणि वृद्धी करणे
हे प्रत्येक भूमीपुत्राचे कर्तव्य आहे.’ हे इलियट सरांनी महाराजांच्या
मनावर बिंबवले. परिणामस्वरूप त्यांनी राज्यात साहित्य आणि कलांच्या
वृद्धीसाठी विशेष प्रयत्न केले. देशी भाषेतील साहित्य प्रकाशित केले.
त्यास प्रोत्साहन दिले. स्वतःही साहित्याचे वाचन केले. प्रारंभी कथा,
कादंबरी आणि कविता यांसारख्या विषयांचे वाचन केले. पुढे त्यांनी
वामनपंडितकृत भरतभाव, रघुनाथपंडितकृत नलोपाख्यान, मोरोपंतकृत संशयरत्नमाला
आणि केकावली, आगरकरांचे सुधाराकांतील निबंधाचे वाचन केले. त्याचबरोबर
त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथेचेही वाचन केले. एवढेच नव्हे तर
धर्म या विचारांवर अधिष्ठित असलेल्या विषयांची माहिती करून घेतली होती.
काही काळातच त्यामध्येही त्यांचा फार मोठा दर्जा निर्माण झाला. इतिहास
विषय त्यांना आरंभापासून अत्यंत प्रिय होता. हिंदुस्थानबरोबर इंग्लंड,
ग्रीस आणि रोम या देशांचा इतिहास त्यांनी वाचला होता. तर गिबन त्यांचा
आवडता इतिहासकार होता. ‘रोमचा अपकर्ष व नाश’ ग्रंथाची त्यांनी स्वतः टिपणे
काढली होती. त्याचे भाषांतर राजारामशास्त्री भागवत यांनी केले. पुढे
तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र विषय त्यांच्या आवडीचे झाले. ‘पाश्चात्य
देशातील तुलनात्मक (comparative) व गुणदोषविवेचकबुद्धी (critical faculty)
स्वीकारून त्यांनी भाषेचे व निरनिराळ्या विषयांचे अध्ययन केले.
तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र या विषयांतील वाचनाने प्राविण्य मिळवले होते.
याचे प्रतिबिंब त्यांच्या ‘Goods and Bads’ ग्रंथात दिसते. त्यांनी
भौतिकशास्त्राचाही अभ्यास केला होता. या शास्त्रातील शोधांमुळे मानवी
जीवनात सुखसोयी निर्माण करता येतात हे महाराज जाणून होते. त्यानंतर
वनस्पतीशास्त्रांची माहिती करून घेण्यासाठी त्यांनी टिस्डल या तज्ज्ञाची
मदत घेतली. महाराज व्यायाम करून परत आल्यावर तत्त्वज्ञानासारखे विषय वाचत
असत. स्वदेशी तत्त्वज्ञान ग्रीस देशातील तत्त्वज्ञान पद्धतीशी तुलना करत
असत. ब्राइसची डिमॉक्रसी (लोकसत्ता), टाकव्हिल, मिल व फॉसेट यांचे ग्रंथ
वाचले होते. हर्बर्ट स्पेन्सरच्या शिक्षण मीमांसेतील विचारसरणी त्यांना
माहित होती. त्यांनी शेक्सपियरचा लक्षपूर्वक अभ्यास केला होता. बेन्थमचे
‘कायदेशास्त्र’ आणि मेनचा ‘प्राचीन कायदा’ हे ग्रंथ त्यांना फार आवडत
होते. अशा देश-परदेशातील ग्रंथ वाचनामुळे त्यांच्या आचार विचारांमध्ये
पाश्चात्य व पौरात्य संस्कृतीचा गोड व सुंदर मिलाफ झाला. महाराजांनी जरी
पाश्चात्य देशातील साहित्याचे वाचन केले असले, तरी त्यांची देशी
साहित्यावर कमालीची श्रद्धा होती; पण ही श्रद्धा डोळस होती. प्रजेच्या
सुधारणा करण्यासाठी वाचन हाच सर्वोत्तम पर्याय आहे यावर त्यांचा दृढ
विश्वास होता. आवश्यक नवीन ग्रंथांची माहिती जाणकार व्यक्तींकडून करून
घेत. महाराज हिंदुस्थानात असोत किंवा परदेशात त्यांचे वाचन कायम चालू असे.
त्यांनी अनेक वेळा जगप्रवास केला. प्रवासात बोटीवरील डेकवर वाचत बसणे हा
त्यांचा सर्वांत आवडता छंद होता. दिनचर्येतील ठराविक वेळ वाचनासाठी राखून
ठेवत असत.
त्यामुळे
त्यांची गणना जगभरातील बौद्धिक लोकांमध्ये होत असे. याबद्दलचा एक पुरावा
म्हणजे इतिहासाचार्य वि.का. राजवाडेंचा एक लेख होय. लोकशिक्षण मासिकाच्या
पहिल्या वर्षाच्या शेवटच्या अंकात (इ.स. १९१३) ‘महाराष्ट्रातील बुद्धिमान,
प्रतिभावान व कर्त्या लोकांची मोजदाद’ शीर्षकाचा एक अभ्यासपूर्ण लेख
लिहिला. यामध्ये इ.स. १८१७ ते इ.स. १९१३ या शंभर वर्षांत महाराष्ट्रात होऊन
गेलेल्या आणि हयात अशा बुद्धिमान, प्रतिभावान व कर्त्या लोकांची निवड
केली. या यादीमध्ये त्यांनी सर्वप्रथम १५० व्यक्तींचा समावेश केला. यामधून
प्रथम फक्त बुद्धिमान आणि प्रतिभावान ४३ व्यक्ती निवडल्या. नंतर
बुद्धिमान, कर्तृत्त्ववान आणि प्रतिभाशाली ७ व्यक्तींची निवड केली. याच
१५० लोकांच्या यादीमधून राजवाडेंनी पुन्हा बुद्धिमान, कर्तृत्त्ववान,
प्रतिभाशाली, मुत्सद्दी व समाजकारणकुशल अशा ५० व्यक्तींची निवड केली. या
चारही याद्यांमध्ये एक नंबरला ‘महाराजा सयाजीराव गायकवाड’ यांचे नाव आहे.
यावरून त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते. त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाची दखल भारतीयांनीच तर घेतलीच, त्याचबरोबर जगभरातील
विद्वांनांनीसुद्धा त्यांच्या सद्गुणांची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
महाराजा सयाजीराव सर्वगुणसंपन्न असलेले राजधुरंधर होते.
अशा
चौफेर वाचन असणाऱ्या विद्वान आणि प्रज्ञावंत वाचकांकडून संत तुकाराम
महाराजांची गाथा कशी काय सुटेल? लवकरच त्यांच्या वाचनात ‘तुकाराम गाथा’ आली
आणि जीवनाचा अविभाज्य भाग बनली. त्यांनी परमार्थिक जीवनात सुख, शांती आणि
भक्तीचा मार्ग अभंगातून शोधला. प्रापंचिक दुःखावर जालीम औषध म्हणून
अभंगाकडे पाहिले. महाराजांचे चित्त उद्विग्न, दुःखी आणि संकटाची चिंता
असेल, त्यावेळी तर हमखास तुकारामगाथा वाचत असत. याबद्दलच्या अनेक आठवणी
महाराजांचे वाचक आणि पुढे रियासतकार म्हणून प्रसिद्ध झालेले गो.स. सरदेसाई
यांनी लिहून ठेवल्या आहेत. प्रजेच्या सुधारणांसाठी धडपड असणाऱ्या राजाला
एकामागून एक संकटाला सामोरे जावे लागले. एकीकडून कुटुंबात छोट्या-मोठ्या
कुरबुरी होत्या, तरी दुसरीकडे इंग्रजांसारख्या महाभयंकर राक्षसाचा त्रास
सुरूच होता. यामुळे त्यांना लवकरच निद्रानाश जडला. रात्र-रात्र झोप लागत
नसे, अशावेळी रात्री-अपरात्री ते सरदेसाई यांना बोलवून घेत. त्यांच्याकडून
तुकाराम गाथा वाचून घेत. अभंगावर चर्चा करत. यामुळे या वास्तववादी
कवीविषयी त्यांच्या मनात आकर्षण, ममत्व आणि कुतूहल निर्माण झाले. संत
तुकाराम महाराज त्यांचे आवडते कवी बनले.
तुकाराम गाथेचे प्रकाशन
सयाजीराव
महाराजांनी तुकाराम गाथेचे वाचन सुरू केले, त्याकाळात अगदी बोटावर
मोजण्याएवढ्या प्रकाशकांनी गाथा प्रकाशित केल्या होत्या. त्यामध्येसुद्धा
दोन गाथा प्रचलित होत्या. एका गाथेत साडेचार हजार अभंग होते, तर दुसऱ्या
गाथेत नऊ-दहा हजार अभंग होते. दोन्ही गाथेचे प्रकाशक आपलीच गाथा प्रमाण
असल्याचा दावा करत असत. महाराजांनी गाथेचे एक-दोन वेळा वाचन केल्यावर
त्यातील गोंधळ त्यांच्या लक्षात आले. साडे चारहजार अभंग असणाऱ्या गाथेत संत
तुकारामांचे काही अभंग वगळले होते, तर नऊ-दहा हजार अभंग असणाऱ्या गाथेत
तुकाराम महाराजांच्या शिष्यांचे आणि त्यांच्या भक्ती परंपरेतील इतर
मंडळींचे अभंग समाविष्ट केलेले होते. थोडक्यात, पाठशुद्ध केलेली गाथा
उपलब्ध नव्हती. महाराजांच्या ही बाब लक्षात येताच नवीन गाथा प्रकाशित
करण्याचा संकल्प केला. हे काम ग्रंथसंपादक आणि प्रसारक मंडळीच्या दामोदर
सावळाराम यंदे यांच्याकडे सोपवले. दामोदर यंदे इ.स. १८८५ पासून बडोद्यात
वृत्तपत्र आणि ग्रंथ प्रकाशित करत होते.
सयाजीराव
महाराजांसारख्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाच्या राजाने गाथा प्रकाशित
करण्याची सूचना केली म्हणजे त्याच श्रेष्ठतेची गाथा प्रकाशित केली पाहिजे
याची कल्पना यंदेंना आली. त्यांनी लागलीच उपलब्ध गाथा जमा केल्या.
त्यामध्ये इंदुप्रकाश वृत्तपत्राचे भूतपूर्व मालक विष्णूशास्त्री पंडित
यांनी इ.स. १८६९ मध्ये सरकारच्या आश्रयाखाली ४,६४६ अभंगाची एक गाथा
प्रकाशित केली होती. त्यामध्ये तळटीपा दिल्या होत्या. प्रस्तावनेत
‘यापेक्षा अधिक अभंग सापडत नाहीत’ अशी विशेष नोंद केली होती. थोडक्यात,
उपलब्ध सर्व गाथांमध्ये अभ्यासकांच्या मते हीच गाथा सर्वोत्तम होती. हीच
गाथा आधारभूत मानून यंदे यांनी तुकाराम गाथा प्रकाशित करण्याचे ठरवले. या
गाथेमध्ये सुद्धा काही दोष होते. ‘कान्होबा देवाशी भांडले ते अभंग ३७’ असे
शीर्षक दिले होते; परंतु त्याखाली १,४३५ अभंग होते. काही अभंगांची
पुनरावृत्ती झाली होती. अनेक अभंगांचा अनुक्रम चुकला होता आणि
वर्णानुक्रमणिकेचा मेळ नव्हता. यामुळे गाथा दुरुस्त्या करून प्रकाशित
करण्याचे ठरवले. नवीन गाथेतील विषयांचा आणि अभंगाचा अनुक्रम लावण्याचे काम
बडोद्यातील कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका काशीबाई हेरलेकर आणि शिक्षक
भास्कर सखाराम शास्त्री यांच्याकडे सोपवले. त्यांनी परिश्रम घेतले. अभंगाची
वर्णानुक्रमणिका तयार केली. त्याचबरोबर शेवटी ‘गाथेतील कठीण शब्दांचा
कोश’ जोडला. हे एक गाथेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वाचकांना
अनोळखी शब्दांचा अर्थ पाहता येत असे. समजत असे. अशा प्रकारे महाराजांना
अपेक्षित असणारी ‘तुकारामाची गाथा’ दोन भागात ग्रंथसंपादक आणि प्रसारक
मंडळीच्या ग्रंथमालेअंतर्गत २६ वा ग्रंथ म्हणून इ.स. १९०३ मध्ये प्रकाशित
केली. एकूण १,१३४ पृष्ठांची ही गाथा आजही आदर्श मानली जाते. तेथून पुढे ही
गाथा महाराज कायम सोबत ठेवत असत. अगदी परदेश प्रवासातसुद्धा त्यांच्यासोबत
हीच गाथा असे.
तुकाराम गाथेचा प्रभाव
सयाजीराव
महाराज तुकाराम महाराजांना ‘शांतीब्रह्म तपस्वी’ समजत होते. त्याचबरोबर
त्यांच्याकडे उच्च प्रतीची विद्वत्ता होती यावर सयाजीराव महाराजांचा
विश्वास होता. ‘उच्च प्रतीची विद्वत्ता असूनही तुकाराम महाराज सर्वसामान्य
जनतेशी समरस होत असत. सामान्य जनतेलाही त्यांच्याविषयी आपलेपणा वाटत असे.
त्यांनी देशवासियांची व्यवहारबुद्धी जागृत केली. सूक्ष्मतेच्या बिकट
जंगलातून व्यवहाराच्या धोपट मार्गावर आणून सोडले. मानवी सामर्थ्याची
शक्यशक्यता व सौंदर्य आम्हाला पटवून दिले.’ अशी महाराजांची धारणा होती.
नियमित
गाथा वाचनामुळे सयाजीराव महाराजांचे काही अभंग मुखोद्गत झाले. भाषण
करताना तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आणि सुधारणांचा आवर्जून उल्लेख करत.
इतिहासातील सुधारणांचे दाखले श्रोत्यांना देताना तुकाराम महाराजांचा
उल्लेख करत. बडोदा येथे चौथी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद इ.स. १९१०
मध्ये आयोजित केली होती. त्यावेळी शिवाजी महाराज आणि संतांच्या सुधारणा
यावर बोलताना म्हणाले, ‘शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून पुष्कळ बोध
घेण्यासारखा आहे. शिवाजी महाराजांपूर्वी या देशाची स्थिती कशी होती,
कोणत्या कारणांनी उदयास आले, त्या कारणांचा विचार केला पाहिजे. युरोपमध्ये
मार्टिन लुथरच्या वेळी धर्मसुधारणा ज्या कारणांनी व ज्या प्रयत्नांनी
झाली, त्याचवेळी आणि त्याच कारणांनी आपल्याकडे तुकाराम महाराजांनी
धर्मसुधारणा केली.’ संतांनी दाखवून दिलेल्या राजमार्गानुसार प्रत्येक
व्यक्तीने नीती, अंतःकरण चांगले ठेवले पाहिजे. यामुळेच प्राप्त केलेल्या
ज्ञानाचा उपयोग होणार आहे आणि हे सर्व संत तुकाराम महाराजांच्या वाङ्मयात
आहे. असे सयाजीराव महाराजांचे प्रांजळ मत होते.
प्रत्येक
व्यक्तीच्या अंगी सेवाभाव असेल कोणतीही सुधारणा होण्यास विलंब लागणार
नाही. याच अनुषंगाने महाराजांनी ‘सेवामहात्म्य’ विषयावर बडोद्यात उपस्थित
जनसमुदायासमोर भाषण केले. यावेळी तुकाराम महाराजांच्या अभंगातील सेवा,
समर्पण वृत्ती आणि त्यातून प्रगती याविषयी दोन अभंगाचे दाखले दिले. कामाशी
एकरूप होण्यानेच म्हणजे कामाची अत्यंत आवड मनात उत्पन्न झाल्यानेच कामाचे
महत्त्व ध्यानात येते. काम चांगले होण्यासाठी प्रत्येकाला त्याचा ध्यास
लागला पाहिजे. त्यानुसारच त्या कार्याचा यशस्वीपणा ठरत असतो. याचे उदाहरण
देताना महाराजांनी ‘उत्कंठीत होणे मन । तेचि खूण सेवकाची ॥’ या अभंगाचा
दाखला दिला. तर सेवाधर्म व्यवस्थित संभाळला तर भक्तीचीदेखील आवश्यकता राहत
नाही याचे उदाहरण देताना ‘तुका म्हणे फळ आहे सेवेपाशी । शरण देवाशी जाणे
नलगे ॥’ हा अभंग उद्धृत केला.
संत
तुकाराम महाराज श्रेष्ठ कवी आहेत, ते जनसामान्यांचे प्रतिनिधी आहेत.
त्यांच्या अभंगात आणि काव्यात समाजातील न्यूनतम पायरीवरील व्यक्तींचा विचार
केला आहे असे त्यांचे मत होते. त्यामुळेच तुकाराम महाराजांच्या
अभंगाविषयी २७ डिसेंबर १९३२ रोजी कोल्हापूर येथील सतराव्या महाराष्ट्र
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘तुकारामबुवांची कविता,
भावनाप्रधान, स्वतंत्र विचार प्रदर्शित करणारी, अनुभवाचे बोल काढणारी,
लोकस्वभावास पक्की निरखणारी व लोकांच्या साध्या प्रचलित भाषेमध्ये
जिव्हाळ्याने लिहिली असल्यामुळे मनास पटणारी अशी आहे. ‘Spontaneous
overflow of powerful feeling.’ प्रबळ भावनांचा सहजोद्रोक, ही वर्डसवर्थची
कवितेची व्याख्या तुकोबांच्या कवितेस तंतोतंत लागू पडते.’ तुकाराम
महाराजांच्या कवितेचे महत्त्व सयाजीराव महाराजांनी अशा प्रकारे प्रथमच
लोकांना विदित केले.
सयाजीराव
महाराजांच्या मते गाथेला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाथेचे
वाचन, मनन केल्यावर आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारता येते. म्हणून
स्वतःचे, देशाचे भवितव्य घडवू पाहणाऱ्या विद्यार्थी, राजकारणी, विविध
क्षेत्रात कार्य करणारांना गाथा प्रेरणादायी आहे. संत तुकाराम महाराज
लोककवी म्हणून, जनसामान्यांना भक्तीचा सुगम मार्ग दाखवणारे, वारकरी
संप्रदायाची अखंड परंपरा निर्माण करणारे आणि सतराव्या शतकामध्ये प्रबोधनाची
मुहूर्तमेढ रोवणारे संत, समाजातील दांभिकतेवर रोखठोक प्रहार करणारे
वास्तववादी कवी म्हणून त्यांना संत तुकाराम महाराज आदर्श तत्त्ववेत्ता वाटत
होते.
No comments:
Post a Comment