- सुनिल सोरटे, वारणानगर
(७४१०५६४५२४)
महाराजा
सयाजीराव यांच्या कार्याचा आपण जसजसा विचार करू लागतो तसतसा अलीबाबाच्या
गुहेत गेल्याचा अनुभव येतो. एक प्रशासक म्हणून समाजजीवनाच्या सर्व
क्षेत्रात अगदी मुळापर्यंत जावून अगदी मुलभूत काम करण्याचा दृष्टीकोन
भारतात सोडा जगाच्या इतिहासात अपवादात्मक ठरेल असा आहे. ज्या-ज्या
क्षेत्रात त्यांनी काम केले त्या-त्या क्षेत्रात एखादा कर्तव्यदक्ष
कुटुंबप्रमुख ज्याप्रमाणे कुटुंबाच्या सर्व आघाड्यांवर ज्या तळमळीने लक्ष
देतो तीच तळमळ सयाजीरावांच्या सर्व कामात दिसते. एखादा राजा आपल्या
प्रजेपती किती कर्तव्यदक्ष असू शकतो याचा जणू आदर्शच सयाजीरावांनी घालून
दिला होता. प्रजेचे आरोग्य आणि व्यायाम संवर्धन याकडे ते राष्ट्रीय कर्तव्य
म्हणून पाहत होते. याचा पुरावा म्हणून पुढील स्वकथन फारच बोलके आहे.
‘मला
सन १९१३ मध्ये श्री. सयाजीराव महाराज यांनी सरकारी खर्चाने सहा
महिन्यांसाठी युरोपच्या प्रवासास पाठविले, त्यामुळे त्या पाश्चात्य
देशांतील लोकांची व्यायामप्रियता व आरोग्य माझे दृष्टीस पडून मला आपल्या
देशांतील त्या बाबतीत होणाऱ्या अवनतीची जास्त तीव्रतेने जाणीव झाली.
तेव्हां ही वाईट स्थिति सुधारण्याचे एक मुख्य साधन म्हणजे व्यायाम होय असा
ह्याबद्दलचा स्वत:चा अनुभव असल्याने महाराष्ट्रांतील व गुजराथेतील तरुण
पिढीचें लक्ष या विषयाकडे वळवावे म्हणून मी सन १९१५ साली मराठी व गुजराती
भाषेत दोन स्वतंत्र मासिके सुरू केली.’ हे स्वकथन आहे भारतीय भाषेतील बहुधा
पहिल्या दशखंडी व्यायामकोश (५,००० पाने) आणि ‘व्यायाम’ या मराठी, गुजराती,
हिंदी, इंग्रजी अशा चार भाषेतून एकाच वेळी निघणाऱ्या मासिकाचे संपादक
दत्तात्रय चिंतामण मुजुमदार यांचे.
१९३६
मध्ये महाराजांनी प्रत्येक खंडाच्या १०० प्रती विकत घेण्याच्या बदल्यात
एकरकमी ७,००० रु. ची मदत मुजुमदारांना केली. व्यायाम मासिक असो किंवा
व्यायामकोश असो या कामाला फक्त प्रेरणा नव्हे तर भक्कम आर्थिक सहाय्य करून
महाराजांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये ऐतिहासिक भूमिका
पार पाडली होती. आजही या कोशाच्या जवळपासही जाणारे काम मराठीत झालेले नाही.
यातच महाराजांच्या कालातीत कर्तुत्वाचा पुरावा मिळतो. १९३६ चे ७,००० रु.
म्हणजे आजच्या रुपयाच्या मूल्यात ११ कोटी ७९ लाख रुपये होत. विशेष म्हणजे
महाराजांचे नातू प्रतापसिंह यांनी महाराजांचा हा वारसा जपत १९४८ मध्ये ९
व्या खंडासाठी २,००० रुपये व १९४९ मध्ये १० व्या खंडासाठी २,००० रुपये असे
एकूण ४,००० रुपये दिले. म्हणजेच या प्रकल्पाचा पाया महाराजांनी घातला आणि
पुढे १३ वर्षांनी महाराजांचे नातू प्रतापसिंह यांनी या प्रकल्पाच्या
पुर्णत्वाचा कळस चढविला. हा सुद्धा महाराजांच्या कार्याचाच प्रभाव होता.
याच मुजुमदारांनी १९५० मध्ये ७३४ पृष्ठांचा ‘An Encyclopedia of Indian
Physical Culture’ हा ग्रंथ लिहिला.
महाराजा
सयाजीरावांनी ‘श्रीसयाजीसाहित्यमालेत’ अनेक व्यायाम, क्रीडा आणि आहारविषयक
महत्वाचे ग्रंथ प्रकाशित केले. तसेच या ग्रंथमालेमध्ये इंग्रजीतील काही
ग्रंथांची मराठी आणि गुजराती या देशी भाषांमध्ये भाषांतरेदेखील प्रसिद्ध
केली. यामध्ये ‘Child: its Nature and Nurture’ (१९२०), ‘Life's Mechanism’
(१९२१),y ‘Health and Diseases’ (१९२९), ‘Dietetics’ (१९२९) या ग्रंथांचे
गुजराती भाषांतर तर यातील Child: its Nature & Nurture (१९३०) चे मराठी
भाषांतरसुद्धा प्रकाशित केले. तसेच प्राचीन युद्धविद्या (१९३४),
मल्लविद्या (१९२५), मज्जातंतुनुं बळ (१९३४), आहार विज्ञान (१९५४) इ. ग्रंथ
प्रकाशित झाले.
याचबरोबर
‘पदाति व्यायाम अर्थात पायदळ पलाटणीची ‘कवायत’, ‘शस्त्रागार’, ‘मराठी
खेळाचे पुस्तक’ इ. मराठी आणि गुजरातीतील काही पायाभूत ग्रंथदेखील
महाराजांनी तयार करून घेतले. यातील ‘मराठी खेळाचे पुस्तक’ प्रसिद्ध
करण्यासाठी महाराजांनी ४,००० रुपयांची मदत दिली होती. यासोबतच संस्थानच्या
शिक्षण विभागातर्फे सचित्र खेळांचे पुस्तक, बालवीरांचे खेळ, खेळांचा
अभ्यास, लहान मुलांचे खेळ, आट्या-पाट्या, खो-खो, हुतूतू, मैदानी खेळांचे
नियम, विटीदांडू नियम ही पुस्तकेदेखील महाराजांनी प्रकाशित केली. एवढेच
नाही तर इंग्रजीत असणारे कवायतीचे हुकूम हिंदी आणि मराठीमध्ये भाषांतरीत
करण्याचे काम सयाजीरावांनी प्रो. माणिकरावांवर सोपविले होते. पुढे १९०६
मध्ये प्रो. माणिकरावांच्या कार्याचा गौरव म्हणून सयाजीरावांनी त्यांना
‘राजरत्न’ पदवी देवून गौरवले. विशेष बाब म्हणजे महाराजांच्या आज्ञेनुसार
बी. ए. मध्ये शिकणाऱ्या रा. वामनराव चिंतामण तवकर यांनी लिहिलेला ‘शारीरिक
शिक्षणाचा ऱ्हास व तो थांबविण्याचे उपाय’ हा निबंध सयाजीरावांना प्रचंड
आवडला. यावेळी महाराजांनी त्यांना ५०० रु. बक्षीस दिले.
ग्रंथप्रकाशनाबरोबरच
जगभरातील तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांद्वारे जनतेची आरोग्यविषयक
साक्षरता वाढवण्यावर सयाजीरावांनी जाणीवपूर्वक भर दिला. जागतिक व्यायामतज्ञ
युजेन सॅंडो यांच्या १९०४ मधील भारत भेटीवेळी महाराजांनी त्यांना बडोद्यास
बोलावून त्यांचे बडोदा कॉलेजमध्ये ४५ मिनिटांचे व्याख्यान आयोजित केले
होते. या व्याख्यानासाठी सयाजीरावांनी सॅंडो यांना ४,५०० रु. मानधन दिले.
आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १ कोटी २५ लाख रु.हून अधिक भरते. तर
१९१० मध्ये सयाजीरावांनी संस्थानातील मुलामुलींमधील जीवनसत्वांचे प्रमाण
जाणून घेऊन त्यांच्यातील दुर्बलता कमी करण्यासाठी सत्वविचारक समिती नेमली.
यासंबंधीचे शास्त्रीय शिक्षण देण्याकरिता युरोपमधून या विषयातील तत्ज्ञ
आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. परंतु यादरम्यान युरोपात पहिल्या
महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने असा तज्ञ बोलावणे शक्य झाले नाही.
महाराज
स्वत:च्या आरोग्याबाबत अतिशय जागरूक होतेच पण त्याचबरोबर महाराजांचा
दिनक्रम देखील त्याला साजेसा होता. महाराज पहाटे मल्लखांबचा सराव करत तर
कधी दंड बैठका करून ते घोडे सवारी करत असत. महाराज सर्व सवंगड्यांबरोबर
विविध खेळदेखील खेळत. यात मुख्यतः आट्यापाट्या, खोखो, लिगोरच्या सूर इ.
देशी खेळ महाराजांचे आवडते खेळ होते. याशिवाय अधून-मधून ते बॅडमिंटन वगैरे
खेळदेखील खेळत असे. खेळण्याच्या या विशेष आवडीमुळे अभ्यासाकडे कधीही
दुर्लक्ष केले नाही. शिकारीचे तर महाराजांना विशेष आवड होती. त्यांनी स्वतः
११ वाघ, अनेक डुक्कर मारले होते. ते उत्तम नेमबाज म्हणून प्रसिद्ध होते.
सयाजीरावांना
कुस्तीदेखील विशेष आवड होती. पहिलवान जमाल व समदु हे महाराजांना कुस्ती
शिकविण्याचे काम करीत व पहिलवान दुधिया हे महाराजांची जोडीदार म्हणून
प्रत्यक्ष कुस्ती करत. उत्तम कुस्तीसाठी अंग लवचिक होऊन अंगी चपळता यावी
यासाठी हरका जेठी यांच्याकडून महाराज मल्लखांब शिकले. ‘शरीरमाध्य खलु
धर्मसाधनम’ हे तत्त्व महाराजांनी स्वतःच्या आचरणाने तंतोतंत पाळले. महाराणी
चिमणाबाई यांना महाराजांच्या सहवासाने व्यायामाची गोडी लागली. त्या सकाळी
एक तास व्यायाम करत. तासभर फिरायला जात आणि संध्याकाळी टेनिस खेळत.
त्यांच्याबरोबरची सर्व मंडळी त्यांच्यासोबत खेळून थकून जात.
आजवर
स्त्रियांच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचे वास्तव आपण जाणतो.
समाजाच्या विकासात पुरुषांच्या बरोबरीने योगदान देणाऱ्या स्त्रियांच्या
आरोग्य संवर्धनासाठी सयाजीराव आयुष्यभर प्रयत्नरत राहिले. १८८५ मध्ये
सयाजीरावांनी बडोद्यात स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळेची स्थापना केली.
स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरु करणारे बडोदा हे भारतातील पहिले
संस्थान ठरावे. पुढे १९१५ मध्ये कन्या आरोग्य मंदिर संस्थेची सुरुवात
करण्यात आली. बडोद्यात पुरुष संघाप्रमाणे महिलांचेही खेळाचे संघ बनवण्यात
आले. बडोद्यात महिलांना खो-खो, थ्रो बॉल, ॲथलेटिक्स, कबड्डी अशा अनेक
खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते. कन्या आरोग्यमंदिरामध्ये मुलींना लाठी,
लेझीम,जोडी आसने, फरिगदका, भाला, हातापायाचे व्यायाम, जंबिया इ.
आरोग्यवर्धक खेळ शिकविले जात.
१९११-१२
मध्ये सरकारच्यावतीने संस्थानातील सर्व प्राथमिक शाळा, पहिल्या श्रेणीच्या
अँग्लो व्हर्नक्युलर शाळा आणि हायस्कुलमध्ये क्रीडा शिक्षकाची नियुक्ती
करून आवश्यक क्रीडा साहित्य पुरवण्यात आले. १९१५-१६ मध्ये प्रथमच जनतेच्या
वर्गणीतून मर्दानी खेळांचे सार्वजनिक प्रदर्शन भरवण्यात आले. महाराजांनी या
प्रदर्शनासाठी शंभर रुपये देणगी दिली. या प्रदर्शनाला महाराज स्वतः
उपस्थित होते. शारीरिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने
महाराजांनी या प्रदर्शनामध्ये काही बक्षिसे मंजूर केली होती.
१९२०
मध्ये महाराजांनी कोणत्याही व्यायामशाळेत व्यायाम शिकविणारा शिक्षक नियमित
काम करीत असल्यास त्यांना दरमहा २० रुपये मानधन देण्याचा आदेश दिला.
प्रत्येक व्यायामशाळेला व्यायामाच्या उपकरणाच्या खरेदीसाठी निम्मा खर्च
देण्यास सुरुवात केली. परंतु ती रक्कम ५० रु. पेक्षा अधिक असु नये अशी अट
घालण्यात आली. तर व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ५०० रु. पेक्षा कमी असणारा
निम्मा खर्च मदत म्हणून देण्याचा हुकुम सयाजीरावांनी दिला. त्याचबरोबर
पोहण्याचा हौद बांधण्याकरिता ५०० रु. पर्यंत मदत देण्याचा निर्णय
सयाजीरावांनी घेतला. याचबरोबर बडोदा संस्थानातील हायस्कूलमध्ये शारीरिक
शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक करण्यात आली. या शिक्षकांकडून
मल्लखांब, जोडी कुस्ती, कवायत, लांब उडी, उंच उडी, घोडासवारी, सिंगलबार,
डबलबार, डंबेल्स इ. क्रीडाप्रकार विद्यार्थ्यांना शिकविले जात. १८८७ पासून
हायस्कूल स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण शिष्यवृत्ती
महाराजांनी सुरु केली होती. अशा प्रकारची शिष्यवृत्ती सुरु करणारे बडोदा हे
भारतातील पहिले संस्थान होते. अगदी स्वातंत्र्यानंतरही खास शारीरिक
शिक्षणासाठी हायस्कूल स्तरावर शिष्यवृत्तीची योजना केंद्र सरकारबरोबर
कोणत्याही राज्य सरकारने राबवल्याचे उदाहरण आढळत नाही.
१९२३-२४
मध्ये महिला प्रशिक्षण कॉलेजमधील विद्यार्थिनींना शारीरिक शिक्षणाचे
प्रशिक्षण देण्यासाठी शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक मिस. जे. ए.
मॅकडोनाल्ड यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेतलेल्या महिला शिक्षिकेची
नेमणूक करण्यात आली होती. तर मद्रासमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या पदवीधारक
शिक्षकांनी पुरुष प्रशिक्षण कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
१९२३-२४ मध्येच शारीरिक शिक्षण आणि संस्कृतीवरील २ नियतकालिकांचे प्रकाशन
करण्यात आले. तर १९२५–२६ मध्ये बडोद्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना
लष्करी शिक्षण व शारीरिक शिक्षण देण्यासाठी सयाजीरावांनी प्रो. टनेर या
परदेशी तज्ञांना आमंत्रित केले होते.
१९२७-२८
मध्ये शिक्षण विभागाने संस्थानातील ३५ आखाड्यांना एकूण ५,२१९ रु.चे अनुदान
दिले. १९२९-३० मध्ये संस्थानातील ५० आखाड्यांना शिक्षण विभागाने ५,४८८
रुपये अनुदान मंजूर केले होते. १९३०-३१ मध्ये बडोदा सरकारने खाजगी
आखाड्यांना ८,००० रु. मंजूर केले. ऑक्टोबर १९३१ मध्ये बडोदा
विद्यापीठातर्फे पंचनगी येथे तीन आठवड्यांचा शारीरिक प्रशिक्षण कॅम्पचे
आयोजन केले होते. या कँपमध्ये बडोदा कॉलेजच्या प्रो. मुखर्जी यांच्यासह २१
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात
आले. तर एका विद्यार्थ्याचा उत्कृष्ट कामगिरीसाठी पदक देऊन सत्कार करण्यात
आला.
१९३१-३२
मध्ये बडोदा कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण
सक्तीचे करण्यात आले. तर पुढील वर्गातील विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार
त्यांना शारीरिक शिक्षण दिले जाई. मद्रास येथे शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण
घेतलेल्या एम. एम. उपाध्याय यांची शारीरिक शिक्षक म्हणून नियुक्ती केली.
खाजगी आखाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ८,००० रु. अनुदान दिले.
१९३२-३३ मध्ये प्रथम वर्षाबरोबरच मध्यवर्ती कला आणि विज्ञान वर्गांना
शारीरिक प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले. तर ७८ खाजगी आखाड्यांना सरकारकडून
८,००० रुपये अनुदान देण्यात आले. या खाजगी आखाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी
तपासणी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. तर १९३३-३४ मध्ये १०९ खाजगी
आखाड्यांना सरकारने ५,५०० रुपये अनुदान दिले. १९२७-२८ आणि १९२९-३० ते
१९३३-३४ अशा ६ वर्षांच्या काळात सयाजीरावांनी बडोद्यातील आखाड्यांना ४०,२०७
रु. अनुदान दिले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १० कोटी २९ लाख
रु.हून अधिक भरते. आपल्या संस्थानातील प्रजेला आरोग्य संपन्न करण्यासाठी
सयाजीरावांइतके ‘रचनात्मक’ प्रयत्न आधुनिक भारतातील अन्य कोणत्याही
राज्यकर्त्याने केलेले आढळत नाही.
१९३८-३९
मध्ये बडोदा शहर आणि बडोदा महाल क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये शारीरिक
शिक्षण सक्तीचे करण्यात आले. संस्थानातील सर्व शाळांमध्ये शारीरिक शिक्षण
सक्तीचे करण्यासाठी पुरेशा प्रमाणात शारीरिक शिक्षक तयार करणे आवश्यक होते.
या पार्श्वभूमीवर शाळांमधील शिक्षकांना शारीरिक शिक्षण देण्यासाठी श्री.
ए.व्ही. वैद्य यांची बडोदा प्रांताचे शारीरिक शिक्षक म्हणून नियुक्ती
करण्यात आली.
पाश्चिमात्य
खेळांबरोबरच भारतीय खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी
‘हिंद विजय जिमखाना’ या क्रीडा संघटनेची स्थापना केली. हिंदविजय
जिमखान्याला भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने स्वतंत्र मान्यता दिली. हिंद विजय
जिमखान्याच्या माध्यमातून बडोद्यात दरवर्षी अखिल भारतीय मर्दानी खेळांच्या
स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असे. संस्थानातील खेळाडूंच्या शारीरिक
क्षमतांचा पुरेपूर विकास करण्याचा उद्देश या स्पर्धांच्या आयोजनापाठीमागे
होता. १९२७-२८ मध्ये हिंदविजय जिमखान्याला मर्दानी खेळांच्या स्पर्धेच्या
आयोजनासाठी १,००० रु.चे अतिरिक्त अनुदान देण्यात आले. १९२९-३० मध्ये आयोजित
करण्यात आलेल्या ११ व्या अखिल भारतीय मर्दानी खेळांच्या स्पर्धेसाठी १,०००
रु. अनुदान दिले. भारताच्या विविध भागातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले
होते. या स्पर्धेत महिलांची संख्याही उल्लेखनीय होती. यावेळी महिला
खेळांच्या बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान सयाजीरावांच्या पत्नी
महाराणी चिमणाबाई यांनी भूषवले.
१९३०-३१
मध्ये हिंदविजय जिमखान्याने आयोजित केलेल्या अखिल भारतीय मर्दानी
खेळांच्या स्पर्धेसाठी २,००० रु. अनुदान दिले. १९३२-३३ मध्ये हिंदविजय
जिमखान्याला अखिल भारतीय मर्दानी खेळांच्या स्पर्धांसाठी २,००० रुपये
अनुदान दिले. १९३३-३४ मध्ये हिंदविजय जिमखान्याला अखिल भारतीय मर्दानी
खेळांच्या स्पर्धांच्या आयोजनासाठी २००० रु. चे अनुदान देण्यात आले.
१९२७-२८ व १९२९-३० ते १९३३-३४ अशा ५ वर्षांच्या काळात भारतीय मर्दानी
खेळांच्या आयोजनासाठी सयाजीरावांनी एकूण ८,००० रु. चे अनुदान दिले. आजच्या
रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १ कोटी ९६ लाख रु.हून अधिक भरते. भारतीय
खेळांच्या उत्कर्षासाठी झटणारा सयाजीरावांसारखा दुसरा प्रशासक आधुनिक
भारताच्या इतिहासात आढळत नाही.
सयाजीरावांनी
आपल्या कारकिर्दीत केलेल्या या रचनात्मक प्रयत्नांची फळे स्वतंत्र भारताला
चाखायला मिळाली. भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे व
आघाडीचे फलंदाज बडोद्याच्या राजघराण्यातील अंशुमन गायकवाड यांसारखे खेळाडू
बडोदा भूमीत घडले. क्रिकेटमधून भालाफेकीकडे वळलेल्या रजिया शेखने
सुरुवातीला बडोदे, गुजरात, भारत व नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन
अनेक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. आशियाई स्पर्धेत भाग घेणारी ती
बडोद्याची व गुजरातची पहिली महिला ठरली.
सयाजीरावांच्या
पश्चात बडोद्यातील ‘थोरातांचा आखाडा’ या नामांकित व्यायाम शाळेने शंकरराव
थोरातांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी गायकवाड, शाहू गायकवाड यांच्यासारखे
नामवंत कुस्तीगीर तयार केले. सलाटवाडा व्यायाम शाळेने वसंत सुर्वे, कल्याण
घाग, लक्ष्मण वाडकर यासारखे सुप्रसिद्ध खेळाडू तयार केले. या क्रीडा
क्षेत्रात जेतलपुर येथील मुस्लिम व्यायाम शाळेने मम्रज खान पठाण व मुन्वर
खान पठाण यासारखे मुंबई राज्य क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक मिळवणारे
क्रीडापटू दिले.
टेबल
टेनिस हा विदेशी खेळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हळूहळू बडोद्यात रुजला.
भारतात सिंगल्सप्रमाणे डबल्समधील सामन्यांमध्ये या क्षेत्रात पुरुषांच्या
बरोबरीने कलिका जयवंत, ललिता गायकवाड, राणी काळे, रोशन झेनोबिया सेठना,
मीना दामले या महिला विभागात अग्रेसर होत्या. त्यानंतर प्रसाद विप्रदासने
जागतिक स्पर्धेत पंचांचे यशस्वी काम करून बडोद्याचे नाव आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत व जागतिक स्पर्धेत गाजविले.
आपल्या
६४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सयाजीरावांनी जनतेच्या आरोग्य
संवर्धनासाठी खर्च केलेल्या काही प्रमुख रक्कमांचा आपण उल्लेख केला आहे. ही
सर्व रक्कम एकत्रितपणे अंदाजे २५ कोटी ३३ लाख रु. हून अधिक भरते. बलशाली
भारत घडवण्याच्या स्वप्नाचा पाठलाग स्वातंत्र्यानंतर गेली ७० वर्षे आपण करत
आहोत. परंतु स्वातंत्र्यापूर्वी ७० वर्षे महाराजांनी या क्षेत्रात करून
ठेवलेले काम आजही अनुकरणीय आहे. म्हणूनच या कामाचे स्मरण.
No comments:
Post a Comment