राजे मोरे म्हटलं की विक्रुतांचे विचित्र कल्पनाविलास सुरू होऊन गद्दार वगैरे शेलके शब्द बाहेर निघायला लागतात. मात्र भारताचे पहिले सम्राट चंद्रगुप्ताच्या काळापासून महाराष्ट्रावर असलेले मौर्यांचे राज्य, त्यांचेच झालेले मोरे . मोर्यांनी आठ पिढ्या जावळीवर केलेले एकछत्री राज्य, सर्वात पराक्रमी व कर्तबगार माणसाला मिळणारी चंद्रराव ही पदवी व विविध चंद्ररावांनी ज्यांना धर्मराजे ही पदवी होती त्यांनी जावळी खोऱ्यात कोकणात केलेली विविध मंदिरांची कामे, दुरुस्त्या व वसवलेल्या सप्तपुऱ्या हे विकृत विचारसरणीचे लोक सोयीस्करपणे विसरतात. याच मोरे घराण्याने त्याकाळी सर्व भारतात वेगाने घोडदौड करणारा इस्लाम कोकणात थोपवला होता हेही मुद्दामहून विसरले जाते.
शेवटच्या चंद्ररावांचे म्हणजे कृष्णाजी मोरे यांचे सुपुत्र मानाजी उर्फ मानसिंग मोरे व त्यांच्या पुढच्या सर्वच पिढ्या स्वराज्य राखणे व वाचवणे या पायी देह झिजवण्यात पुढे होत्या हे सत्य मात्र कोणीही सांगत नाही. शेवटचे चंद्रराव कृष्णाजी मोरे यांचा चाकण येथे शिरच्छेद करण्यात आल्यानंतर पुरंदरावर राजे मोरे यांचे स्त्रिया व मुले कैदेत होती ,त्यांना नंतर सोडण्यात आले. यापैकीच मानसिंग उर्फ मानाजी मोरे यांना शिवछत्रपतींनी आपल्या बाजूने वळवून घेतले व सेना दलामध्ये मानाची जागा दिल्याचे आढळते.
नाशिक मधील साल्हेरचा वेढा , वणीची लढाई, शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय, दक्षिणेतील स्वराज्य सांभाळण्यासाठी केलेली मदत व सुभेदारी, पुरंदर,मलकापूर, फोंडा भागात असलेले मोकाशीपण, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीतील सेवा, दक्षिण दिग्विजयात शिवछत्रपतींसोबत असल्याने व तेथील सुभेदारीचा अनुभव असल्याने छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीला सुखरूप पोहोचवणे यात मानसिंग मोरे यांची इतरांबरोबरच महत्त्वाची भूमिका होती. छत्रपती ताराराणी यांचे कारकीर्दीत मोगलांना हाकलून लावण्याचे महत्त्वाचे काम तसेच छत्रपती शाहूंचे मुख्य सेनापती म्हणून मानसिंग मोरे यांनी केलेली सेवा फारशी कधीही जनतेसमोर आणली गेली नाही. आयुष्याच्या आठव्या दहाव्या वर्षापासून ते जवळपास 87- 88 वर्षे वय होईपर्यंत मानसिंग मोरे यांनी सर्व पाचही छत्रपतींची सेवा केली. असे स्वराज्यातील वीर फारच कमी सापडतात.
शिवछत्रपतींपासून ते पानिपतापर्यंत मोरे यांच्या अनेक गावांमधील अनेक वीरांनी स्वराज्यासाठी देह झिजवले. पानिपतामध्ये मोठ्या मोठ्या सरदारांच्या नावांमध्ये मोरे घराण्यातील कितीतरी पराक्रमी सरदारांची नावे दिसतात. खडकवासला वगैरे भागातील काही गावांमधील प्रत्येक घरातून एक मोरे पानिपतावर मारले गेले होते. दरेकर ,गोळे, धुळप ही मूळतः मोरेच असणारी मंडळी यांचेही स्वराज्य कार्य जबरदस्तच आहे.
आमचे आदरणीय वरिष्ठ मित्र श्री मुकुंद पायगुडे यांनी पायगुडे घराण्याची ऐतिहासिक माहिती जमा करता करता आम्हाला मदत म्हणून मोरे घराण्याबद्दलही माहिती गोळा करण्याचे काम अखंडपणे चालू ठेवले आहे. त्यांच्याच मदतीने आज छत्रपती शाहूंचे प्रमुख सेनापती मानसिंग मोरे यांचा देवनागरी मध्ये अनुवादित शिक्का आपल्या सर्वांसमोर आणत आहोत .काही लोकांनी आधी पाहिलाही असेल, मात्र बहुसंख्य लोकांसमोर या शिक्याद्वारे मोरे यांनी स्वराज्याची केलेली सेवा पोहोचवावी म्हणून येथे टाकत आहे.
मूळ पत्र हे सेनापती मानसिंग मोरे यांनी मताजी सर्जाराऊ जेधे देशमुख लिहिलेले असून त्याची अस्सल प्रत धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळामध्ये उपलब्ध आहे.
धन्यवाद !
अंबरीश मोरे
नाशिक
No comments:
Post a Comment