आता हे हिंदूराज्य जाहाले :- हडकोळण येथील शिलालेख
(
काही इतिहास अभ्यासक व संशोधक असा दावा करतात कि सदर शिलालेख हा संभाजी
महाराजांनी कोरलेला नसून फोंडायेथील धर्माजी नागनाथ याने सदर शिलालेख
कोरलेला आहे. त्यामुळे त्या शिलालेखाचा संभाजी महाराजांशी कोणताही संबंध
नाही. सदर शिलालेखाचे सत्य मांडण्यासाठी हा लेखन प्रपंच ) .
छत्रपती
संभाजी महाराजांनी २२ मार्च १६८८ रोजी फोंडायेथील मुख्य देशाधिकारी
धर्माजी नागनाथ यांस आज्ञापत्र लिहिले. सदर आज्ञापत्राचे शिलालेखात रुपांतर
धर्माजी नागनाथ यांनी केले. त्यामुळे सदर शिलालेख हा छत्रपती संभाजी
महाराजांच्या आज्ञापत्राचे प्रतिबिंब आहे.
स्वराज्यात
काही कर रयतेकडून आकारले जात. अंगभाडे नावाचा कर हा फोंड्याजवळील अंत्रुज
येथे व्यापाऱ्यानकडून आकारला जाई. सदर कर छत्रपती संभाजी महाराजांनी माफ
केला व सदर आदेशाच्या अंमलबजावणीचे आज्ञापत्र फोंडायेथील मुख्य देशाधिकारी
धर्माजी नागनाथ यांस लिहिले. धर्मकृत्यास नाश करू नये या वाक्यातून
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची स्वधर्मावरील धर्मनिष्ठा दिसून येते.
- छत्रपती संभाजी महाराजांचे आज्ञापत्र :- संदर्भ:- संभाजीकालीन पत्रसारसंग्रह पत्र क्रमांक २५७
विभव संवत्सर श.१६१० , चैत्र शु. १ गु.
इ. १६८८, मार्च २२
शंभू छत्रपती – धर्माजी नागनाथ मुख्यदेशाधिकारी प्रांत मामले फोंडा.
सामनायक
तिमनायक यानी विनंती केली. मुसलमानांच्या राज्यामध्ये तरी अंत्रुजेसी
अंगभाडे घेत न्हवते. तेणेकरून व्यवहारीक लोक सुखे येत. राजगृही हासील होय.
आता हे हिंदू राज्य जाहालेपासोन आंगभाडे घेऊ लागले,
हसिलासी धक्का बसला. तरी मना करावे. तेप्रमाणे जाणून भाणस्तरी, पारगवि,
मांदुस येथील आंगभाडे दुडूवा अर्ध कोसी, चौदा दुडू घेत ते सोडिले. सहसा धर्मकृत्यास नाश करू नये. कर्तील त्यास महापातक आहे.
- हडकोळण येथील शिलालेख :- छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे :- डॉ. सदाशिव शिवदे
श्री गणेशायनमः
श्री लक्ष्मी प्रसन्न ।। स्वस्ति श्री नृपशाळीवाहन शके ।।
१६१० वर्ष ।वर्तमान विभव नाम संवत्सर चैत्र शुद्ध
प्रतिपदा गुरूवासर गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश
क्षत्रीयकुळावतंस राजा शंभुछत्रपती यांचे आज्ञानुव -
र्ती राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य देयाधीकारी प्रां -
त मामले फोंडा याप्रति तिम नायकाचे पुत्र सा-
म नायक याही विनंती केलि जे पूर्वी मुसलमाना
च्या राज्यामध्ये तरि अनंतउर्जेसि लोकास आंगभा-
डे घेत नव्हते. तेणेकरून व्यावहारिक! लोके सुखे
येत. तेणेकरून राजगृही हासील होय. "आता हे
हिंदूराज्य जाहाले पासोन आंगभाडे घेउ लागले तेणेकरू नी राजगृहि
हासिलासी धक्का बैसला. त्यासी ते कृपाळु होउन आगभाडे उरपासि जाव
दुडुवा अर्धकोसी चौदा दुडु घेत आहेति मना करावे पण काही राजा-
गृही आदाय होईल ऐसी विज्ञापना केलि ते प्रमाण जाणुन
भाणस्तरि व पारगावि व मांदुस कुडैची येथिल आंगभाडे सोडि
ले. पुढे या प्रमाणे सकळांहि चालवावें सहसा धर्मकृत्यास नाश क
रू नये करतिल त्यास महापातक आहे ।। श्लोक ।। शव्कृत वा परे
णापी धर्मकृत्यं कृतं नर: ।। यो नाशसती पापात्मा स यति
नरकान बहून ।।१।। लोभान्मत्सरतो वापि धर्मकार्यस्य
दुस्यक: ।। यो नर : स महापापी विष्ठायां जायते कृमि ।।२ ।।
दानपाळनयोर्मध्ये दानात स्त्रेयोनुपाळनं ।। दानात स्वर्गवमा
प्नोति पाळणादच्युतं पदं ।। या धर्मकार्या समस्ति मान देवावे
शिलालेखाविषयी
:- सदर शिलालेख हा ३६ इंच लांब व १० इंच रुंद असून काळ्या दगडात कोरलेला
आहे. शिलालेखाचे वरच्या समासात सूर्य, चंद्र व अष्टदल कमळ कोरण्यात आले
आहे. खालच्या समासात दोन्ही बाजूस गाईंची चित्र कोरले असून मधोमध शुभं भवतु
कोरण्यात आले आहे.
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ:- संभाजीकालीन पत्रसारसंग्रह पत्र क्रमांक २५७
छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे :- डॉ. सदाशिव शिवदे
No comments:
Post a Comment