विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label शिवपूर्व काळ. Show all posts
Showing posts with label शिवपूर्व काळ. Show all posts

Monday, 28 November 2022

महाराष्ट्रावर शकांचे राज्य

 

महाराष्ट्रावर शकांचे राज्य

आपण काही गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या म्हणजे प्राचीन भारत हा आज जसा आपल्याला माहित आहे तसा नव्हता. भारत हे नाव, हिंदू तसेच इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शिख हे सगठित धर्म म्हणून अस्तितवात नव्हते. प्राचीन इतिहास समजून घेतांना या गोष्टी लक्षात ठेवल्या की इतिहास समजायला सोपा जातो.
आता तुमचा पहिला प्रश्न की शक कोण होते? कुठुन आले होते?
शक ही मध्य आशियातील (इराण) एक भटकी जमात होती. ते स्वतःला श्कूदत म्हणत, शक भाषेत याचा अर्थ धनुर्धारी असा होतो. शक अतिशय तरबेज असे धनुर्धारी होते. विषारी आणि काटेरी बाणांचा उपयोग सर्वप्रथम यांनी केला. ग्रीक लोकं यांना स्कायताई म्हणायचे, इंग्लिशमध्ये यांना स्किथीयन तर संस्कतमध्ये यांना शक म्हणत. दळणवळणासाठी घोडे हे त्यांचे प्रमुख साधन होते.
भारताचा उत्तर पश्चिम भाग (वायव्य) जेथून भारतात सर्वाधिक आक्रमणं झाली.हा खुष्कीचा मार्ग असल्याने ग्रीस, इराण, तुर्की, अफगाण, मध्यपूर्व या भागातील टोळ्या यामार्गाने वेळोवेळी भारताच्या उत्तर पश्चिम भागात आल्या आणि तिथे स्थिरावल्या. या सर्व टोळ्यांना आपल्या राहत्या भागातून पळ काढावा लागला किंवा युद्धात पराभव झाल्याने आपला राहता भाग सोडावा लागला. कारण या सर्व भागात टोळ्यांचे आपापासात वर्चस्वासाठी युद्ध व्हायचे प्रकार वारंवार होत असत.
मौर्य साम्राज्य लयाला गेल्यानंतर भारताच्या उत्तर पश्चिम भागात मध्य आणि पश्चिम आशियातील लोकांचे राज्य होते. ख्रिस्तपूर्व १८०बीसी ते ५५बीसी या काळात इंडोग्रीक यांचे राज्य या भागात होते. ख्रिस्तपूर्व १ल्या शतकात इंडो स्किथीयन अर्थात शकांनी या भागावर ताबा मिळवला आणि शक साम्राज्याची सुरुवात झाली.
  • मॉइस वा मोगा हा त्यांचा पहिला शासक, तो गांधारचा राजा होता. त्याची राजधानी सिरकप होती (आजचे पंजाब, पाकिस्तान). त्याने आजूबाजुचा इंडोग्रीक परिसर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा यशस्वी झाला नाही. याने पाडलेल्या अनेक नाण्यांवर बौद्ध आणि हिंदू चिन्हं होती. तसेच ग्रीक आणि खरोश्ती भाषेचा वापर केलेला होता.
  • याचाच वंशज चास्तना किंवा चेस्तनने शकांचे राज्य उजैनपर्यंत वाढवले. यालाच पश्चिम क्षत्रप म्हणूनही ओळखले जाते. ख्रिस्ताच्या अंतानंतर ७८व्या शतकापासून शक कालगणना सुरु झाली असावी असा अंदाज आहे. चास्तनाने भद्रमुख म्हणून शक क्षत्रप साम्राज्याची उभारणी केली.
  • शक साम्राज्याची दुसरी शाखा क्षहरता म्हणून ओळखली जाते, जिचा शासक नहापना हा होता. याचाच पुढे सातवाहन राजा गौतमीपुत्र सत्करणीने पराभव केला.
  • रुद्रदमन हा श्रेष्ठ शक शासक म्हणून ओळखला जातो. हा चास्तनाचा नातू होता. याने आपल्या काळात कोकण, नर्मदेचं खोरं, काठियावाड, माळवा आणि गुजरातच्या इतर भागात आपले राज्य वाढवले. काठियावाडमधील सुदर्शन तळ्याची डागडुजी केली. याने हिंदु मुलीशी लग्न केलं आणि तो हिंदु धर्म मानू लागला. संस्कृत भाषेचं संवर्धन करण्यातही याचा सहभाग होता. तो स्वतःला महाक्षत्रप म्हणत असे. आपली मुलगी याने सातवाहन कुळात दिली होती. याच्या काळात ग्रीक लेखक यवनेश्वर भारतात राहिला होता, त्याने यवनजातक या ग्रंथाचे ग्रीकमधून संस्कृतमध्ये भाषांतर केले.
  • कालांतराने सातवाहन राजा गौतमीपुत्र सत्करणी याने शक साम्राज्याचा पराभव केला. ख्रिस्ताच्या अंतानंतर ४थ्या शतकात शक राजा रुद्रसिंह तिसरा याचा चंद्रगुप्त दुसरा याने पराभव केला आणि भारतातील मध्य आणि पश्चिमेतील शक साम्राज्य संपुष्टात आले.
वर सांगितल्याप्रमाणे प्राचीन काळात आजच्यासारखे धर्म संगठित नव्हते. नवीन शासक आपल्या नवीन कल्पना, परंपरा घेऊन यायचे. इथल्या आधीपासून अस्तितवात असलेल्या परंपरा, चालीरीती यात आपल्या चालीरीती परंपरा मिसळून टाकायचे. इथल्या स्थानिक लोकांशी लग्न झाल्याने त्यांची वंशपरपरा नक्कीच सुरु राहिली असेल. पण त्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचं आहे.
पश्चिम आणि मध्य भारतात शकांचे राज्य असल्याने त्यांचा प्रभाव नक्कीच होता. शक कालगणना आपण आजही मानतो. प्राचीन भारतातील ज्योतिष ग्रंथात शक संवतचा उपयोग केलेला आहे. शक संवतलाच शालिवाहन शक म्हणूनही ओळखले जाते.
पोस्त सांभार :वैशाली भिडे


Monday, 25 July 2022

गौतमीपुत्र सातकर्णी

 

गौतमीपुत्र सातकर्णी 
पोस्तसांभार :: - प्राजक्ता देगांवकर

पुराणात सांगितल्या प्रमाणे शिवस्वाती नंतर गौतमीपुत्र सातकर्णी हा बाविसावा नृपती गादीवर आला. हा इ.स. १२४ च्या दरम्यान गादीवर आला असावा. हा सातवाहन घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय. असे असले तरी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सातवाहन राज्य मोडकळीला आले होते. कारण उत्तर भारताचा बव्हंशी भाग हा सम्राट कानिषकाने आपल्या ताब्यात घेतला होता. सोबतच क्षत्रप राजा नहपान याने जुन्नर पर्यंत धडक मारून सातवाहनांना तेथून हुसकावून लावले व तेथे आपले सत्ताकेंद्र निर्माण केले होते. नंतरच्या काळात तर सातवाहनांची राजधानी असणारे प्रतिष्ठान हे सुद्धा क्षत्रपांनी जिंकून घेतलेले दिसते. अश्या परिस्थितीत गौतमीपुत्राने सातवाहनांच्या राज्याचे रूपांतर पुनः साम्राज्यात केले.
त्याने प्रथम विदर्भावर आक्रमण करून वेणातिराच्या क्षत्रपांचा बीमोड केला आणि स्वतःला ' वेणाकटकस्वामी ' असे घोषित केले. क्षत्रपांचा राजा असणाऱ्या नहपानाला नाशिकच्या गोवर्धन परिसरात गाठून गौतमीपुत्राने त्याचा प्रचंड मोठा पराभव केला. आणि नहपानाला सह्याद्रीचा आश्रय घेण्यास भाग पाडले. युद्धानंतरच्या पंधरवड्यातच सह्याद्रीच्या रांगानमध्ये नहपानाचा पाठलाग करून गौतमीपुत्राने त्याचे समूळ उच्चाटन केले, म्हणूनच गौतमीपुत्राला 'क्षहरातवंशनिर्वंशकर ' ( नहपान क्षत्रपाचे क्षहरात कुळ नष्ट करणारा ) म्हणून गौरविले आहे. सोबतच क्षत्रपांकडून सातवाहनांचे असणारे मूळ प्रदेश जिंकून घेतल्याने गौतमीपुत्राचा 'सातवाहनयशप्रतिष्ठाकार ' असा गौरव पूर्वक उल्लेख करण्यात आला आहे. त्या काळी गौतमीपुत्रा एव्हढा बलाढ्य नृपती भारतात अन्य कोणी नव्हता. त्याने मध्यभारतात व दक्षिणापथात मोठा दिग्विजय केला. त्यामुळे त्याला 'त्रीसमुद्रतोयपीतवाहन ' ( ज्याच्या घोड्यांनी तीनही पूर्व, पश्चिम आणि दक्षिण समुद्राचे पाणी प्यायले आहे ) असे बिरूद लावले गेले.
गोतमीपुत्राच्या कारकीर्दीत दक्षिणेकडील बरीचशी राज्ये, अवंती, सुराष्ट्र, महाराष्ट्र, मध्य भारत, राजस्थान असा मोठा प्रदेश सातवाहनांच्या ताब्यात आला. उत्तरेतील मोहिमेत गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव या परकीय राज्यकर्त्याशी युद्ध करून त्यांचा निः पात केला म्हणून ' शक - यवनपल्हवनिदुसन' असा त्याचा गौरव करण्यात आलेला आहे.
जसा तो बलाढ्य योद्धा होता तसाच एक कुशल प्रशासकही होता. प्रजेवर त्याने योग्य तेच कर लावलेले होते. प्रजेत त्याच्या विषयी प्रेम व दरारा होता. त्याच्या काळात वैदिक धर्माला महत्त्व प्राप्त झाले. त्याला ' वेदांचा आश्रयदाता ' आणि ' एक ब्राह्मण ' म्हणजेच वैदिक धर्माचा अभिमानी म्हणले गेले आहे.
नहपानाचा पराभव केल्या नंतर त्याच्या नाण्यांचे साठे गौतमीपुत्राने जप्त केले आणि ते आपल्या नावाने पुनर्मुद्रित करून प्रचारात आणले. अश्या प्रकारची पुनर्मुद्रित नाणी पश्चिम महाराष्ट्रात आणि पैठण, अजमेर, उज्जैन, बाळापूर येथे मिळालेली आहेत. सोबतच गज, अश्व आणि कमानी छापाची अन्य नाणीही प्रचारात होती.
गौतमीपुत्राबद्दलची माहिती त्याची आई असणाऱ्या गौतमी बलश्री हिने नाशिक येथील लेण्यांमध्ये कोरून ठेवलेली आहे. नागनिके नंतरची ही अजून एक महत्त्वाची राणी सातवाहन घराण्यात होऊन गेली.

संदर्भ :-
१) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचिकर
२) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमानपूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
३) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर

रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हाळे गावातील (तालुका दापोली) पन्हाळेकाजी लेणी

 

रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हाळे गावातील (तालुका दापोली) पन्हाळेकाजी लेणी
पोस्तसांभार :: लिखाण आणि छायाचित्रे:- योगेश भोरकर






१९७०-७१ च्या दरम्यान पन्हाळे गावातील ‘केशवराव पांडुरंग जाधव’ नामक शेतकऱ्याला शेत नांगरताना एक दगडी पेटी फाळाला अडकली व त्या पेटीत मजकूर लिहिलेले धातूचे पत्रे आढळले. त्याने ते पत्रे गावातील लोकांना दाखवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने इतिहास संशोधनाची आवड असणाऱ्या दाभोळच्या अण्णा शिरगावकरांशी संपर्क केला.
अण्णांनी हे पत्रे म्हणजे ताम्रपट असावे असे सांगितले. आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तत्कालीन प्राध्यापिका ‘शोभनाताई गोखले’ यांच्या समोर सादर केले. शोभनाताईंनी हे पत्रे ताम्रपट असल्याचे निश्चित केले आणि त्या ताम्रपटांचा अभ्यास केला. अभ्यासातून ताम्रपट शिलाहार कालीन असल्याचे आढळले. १९७२ साली भारतीय पुरातत्व खात्याने ताम्रपट मिळालेल्या जागी उत्खनन केले आणि कोटजाई नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लपून गेलेला २८ लेण्यांचा समूह समोर आला.
ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ म.न.देशपांडे (मधुसूदन नरहर देशपांडे) यांनी या लेण्यांचा अभ्यास करून The caves of Panhale-kaji हा प्रबंध लिहिला. या प्रबंधाकरिता त्यांना १९८६ चे ‘एशियाटिक सोसायटी ऑफ वेस्ट बंगाल’ सर्वोत्कृष्ट कार्यपदक मिळाले. पन्हाळेकाजीचा विषय घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने केली. छापिल माध्यमांमधून त्यांच्या मुलाखती झाल्या. हायडेलबर्ग (प.जर्मनी) येथे झालेल्या ‘महाराष्ट्र संस्कृती व समाज’ या अंतरराष्ट्रीय सम्मेलनात देखील म.न.नी पन्हाळेकाजीचा उल्लेख केला होता.
म.न.देशपांडे पन्हाळेकाजी संदर्भात म्हणतात की….
सातवाहन राजवंशात कोकणामध्ये ‘हीनयान’ बौद्ध पंथाचा प्रसार झाला. कोकणामध्ये अनेक विहार-संघाराम, चैत्यगृहे स्थापली गेली. पन्हाळे येथील संघाराम खेडमधील भिक्षूंच्या मार्गदर्शनाखाली स्थापले गेले असावे आणि याची प्राथमिक सुरुवात लहान प्रमाणात झाली असावी असे वाटते.
कारण खेडमध्ये स्तूपयुक्त विहार व काही पूर्णअपूर्ण लेणी आहेत. आणि खेड या व्यापारी स्थळमार्गापासून पन्हाळेकाजी जवळच्या टप्प्यात येते. कोटजाई आणि दाभोळ बंदरामार्फत येथे व्यापारी मचव्यांची ये-जा असावी. २८ लेण्यांपैकी ४,५,६ व ७,८,९ क्रमांकाच्या लेण्या मिळून जो गट तयार होतो. तो या समूहातील सर्वात जुना गाभा आहे. ७,८,९ हा वेगळा गट असला तरी तो काळाच्या दृष्टीने ४,५,६ च्या जवळचा आहे.
४,५,६ या गटात ४ व ५ क्रमांकाच्या गुहा लहान भिक्षुगृहाप्रमाणे आहेत. ५ क्रमांकाच्या लेणीमध्ये स्तूप संस्थापना दिसते. हा स्तूप अर्धोत्कीर्ण असून पाठीमागचे भिंतीत, तेथे नंतर खोदल्या गेलेल्या गर्भगृहाच्या द्वाराच्या उजव्या बाजूस आहे. अश्याच तऱ्हेचा स्तूप चौल येथील हिंगळाजदेवी लेणीसमूहात आहे.
या दोन्ही स्तूपांचा काळ साधारणतः दुसरे-तिसरे शतक आहे. यावरून असे अनुमान करता येते की पन्हाळेकाजी येथील बौद्ध संघारामाची सुरुवात २–३ शतकात झाली. सहा क्रमांकाचे लेणे विहार असल्याचे दिसते. या लेणीच्या पडवीत पश्चिम बाजूच्या भिंतीवर एक ब्राह्मी लेख होता. पण उत्तर कालात तो छिन्नीने इतका खरडून टाकला आहे की, त्यामधील दोनचार अक्षरेच संदर्भाशिवाय दिसतात. त्या अक्षरांवरून (विशेषतः म च्या अक्षर वाटिकेवरून) हा लेख दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील असावा, असा अंदाज करता येतो.
सहाव्या – सातव्या शतकात महाराष्ट्रात चालुक्यांचा प्रभाव वाढू लागला आणि महाराष्ट्रातील बौद्ध संघारामाचे महत्व कमी होऊ लागले. वेरूळ व कान्हेरी अशा काही स्थानांव्यतिरीक्त नवीन बौद्ध धर्मीय गुहा, स्मारके खोदल्याचे दिसत नाही. चालुक्य हे शैवपंथी होते.
आठव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांचा प्रभाव कमी झाला आणि बौद्ध धर्मातील तांत्रिक वज्रयान पंथीयांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. हे वर्चस्व साधारणतः ११ व्या शतकापर्यंत होते. त्यामुळे हीनयान पंथीय लेण्यांच्या स्थापत्य वैशिष्ट्यात वज्रयान पंथीयांकडून फेरबदल झाले. सहाव्या लेणीतील गर्भगृह वाढून भिक्षुगृहाचे रुपांतर अक्षोभ्य मंदिरात केलेले आढळते.
गट १,२,३ :
या गटातील २ क्रमांकाची लेणी विहार म्हणून खोदली गेली होती व जवळपास तिची योजना क्र. सहाच्या लेण्याप्रमाणेच आहे. या लेणीतील मंडपाचे छतावर मध्यभागी अर्धोत्कीर्ण व एकमेकास काटकोनाने छेदणाऱ्या उन्नत लगींनी १६ चौकोन केले आहेत, अशा तऱ्हेने छतावर लाकडी तुळया व लगी यांचा वापर दाखविण्याची प्रथा ही जुनीच आहे. या स्तंभ विरहीत मंडपात भिंतीलगत कठडा (Rock Bench) आहे.
या सर्व लक्षणांवरून ती लेणी मुळात दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील आहे; पण १० व्या शतकात तिच्यात बदल झाले आहेत, हे कळून येते. १० व्या शतकातील बदलानुसार दर्शनी स्तंभ शिर्षात नागबंध आला. मंडपाच्या मागील भिंतीत गर्भगृहाच्या दक्षिण बाजूस सात उभे मानुषी बुद्ध कोरले गेले. या लेणीच्या मंडपाचे प्रवेशद्वार थोडेफार अलंकृत शाखायुक्त होते. पण नंतर ते अलंकरण खोडून काढून साधे केले. यावरून असे लक्षात येते की, तांत्रिक वज्रयान पंथीयांनी ही लेणी आपलीशी केली होती.
गट ७, ८, ९ :
७,८,९ हा गट ६ क्रमांकाला जोडूनच आहे. व येथेही वज्रयान पंथीयांनी केलेले बदल दिसून येतात. ७,८,९ क्रमांकाची लेणी ही मुळातच भिक्षुगृहे होती. पण पाठीमागच्या भिंतीत कोनाडा व गर्भगृह खोदून त्यामध्ये तांत्रिक मूर्तीची स्थापना झाली. ७ क्रमांकाच्या लेण्याखाली खालच्या थरात एक क्षतिग्रस्त व अपूर्ण लेणे आहे. ७ क्रमांकाच्या उमऱ्यावर मधील पुढे आलेला भाग सोडून दोन्ही बाजूस पुष्पयुक्त हिराकृति आहेत. लेणी क्र. आठ मध्ये गर्भगृहात शिरविरहित अक्षोभ्याची मूर्ती आहे. ५ आणि ६ क्रमांकाच्या लेणीच्या छतावर स्तूप बसविलेला होता. अशा काही खुणा आढळतात. व तेथेच पडलेले काही स्तूप दिसून येतात. त्यावरून ५, ६ बरोबर ७ क्रमांक लेणीवर देखील स्तूप असावा, असे वाटते.
गट १०, ११, १२ व १३ :
या गटातील १२ क्रमांकाच्या लेण्याचे योजनाचित्र जवळपास २ व ६ प्रमाणेच आहे. मुळतः विहार म्हणून खोदल्या गेलेल्या या स्तंभांना चौकोनी अधिष्ठान दिले आहे. पण तरीसुद्धा ते पँरापेट (कठडा) पासून अभिन्न आहेत. मंडपाचे पाठीमागचे भिंतीत मुळात असलेल्या तीन भिक्षूगृहांपैकी मधल्या भिक्षुगृहाचा उपयोग अक्षोभ्याच्या मूर्ती स्थापनेसाठी झाला असावा.
तांत्रिक वज्रयान पंथाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची लेणी म्हणजे क्रमांक दहाची लेणी. कारण या लेणीत हत्ती व सिंह असलेल्या सप्तरत अधिष्ठानावर स्थित असलेली महाचंडरोषणाची मूर्ती आढळते. आणि तिच्या दगडात कोरलेल्या प्रतिमा अगदीच विरळ्या असून १९८१ पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात दोनच मूर्ती आढळल्या. एक पन्हाळेकाजी येथे व दुसरी रत्नागिरी येथे.
रत्नागिरी येथे डॉ. देवला मित्रांना ही मूर्ती एका स्तूपावर कोरलेली आढळली. पन्हाळेकाजी येथील महाचंडरोषणाची प्रतिमा सुमारे दहाव्या शतकातील असावी व ती उत्तरकालीन चालुक्य कलेशी मेळ खाते. अक्षोभ्याच्या मूर्तीही नवव्या-दहाव्या शतकातील असाव्यात असे त्यांच्या शैलीवरून वाटते व अशा चालुक्य उत्तर काळामध्ये वज्रयांनी बौद्ध धर्माच्या शाखा दक्षिण महाराष्ट्रात व कर्नाटकात होत्या याचा थोडाफार पुरावा मिळतो.
गट १५, १६,१७,१८ :
१५ चे लेणे मूळ वज्र यान पंथी होते. पण मागाहून इथे गणपतीची सुटी मूर्ती दर्शनी भागातील कोनाड्यात ठेवून हे लेणे गाणपत्य पूजेसाठी वापरले जावू लागले. लेण्याच्या ललाट बिंबावर देखील गणेशमूर्ती कोरलेली आहे.
१६ क्र. चे लेणेही मूळ वज्रयान पंथी. या लेण्याच्या जवळ एक बांधीव चौथरा दिसतो व शिलाहार काळ निदर्शक एक देवकोष्ठचा भाग सापडतो. यावरून असा अंदाज बांधता येतो की, येथे शिलाहार काळात एक छोटेसे देवालय असावे.
१७ वे व १८ वे लेणे वज्रयान पंथीच आहे.
गट १९, २०, २१, २२ व २३ :
१९ ते २३ हा गट शिलाहारांशी निगडीत आहे. शिलाहार काळात पन्हाळेकाजीत जे विशेष लक्षणीय काम झाले; ते केवळ या गटामधून दिसून येते. यातील १९ क्रमांकाच्या लेण्याची सुरुवात आधी झाली असली तरी ११ व्या शतकात शिलाहारशैलीचे एकाश्म देवालय म्हणून हे लेणे साकारले गेले. या देवळातील स्तंभ शिलाहारकालीन आणि गर्भगृह एकाश्म असून त्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली होती.
गर्भगृहाभोवती प्रदक्षिणापथ आणि त्याच्या पाठीमागच्या भिंतीत दोन्ही बाजूस उत्तरामुख व अंतराळात समोरासमोर देवकोष्ठे आहेत. यावरून हे मंदिर पंचायतन म्हणून योजिले होते, असे दिसते. सभामंडपाच्या अंतराळाच्या व एकाश्म मंदिराच्या छतावर शिल्पे व उलट्या कमळाचे अलंकरण मध्यभागी असून बाजूच्या खणात रामायण व महाभारतातील प्रसंगाचे शिल्पपट कोरलेले आहेत.
पूर्वेकडील खणात रामायण, पश्चिमेकडील खणात बाळकृष्णलीला व मधल्या खणात ( कमळाचे बाहेर ) पुन्हा कृष्णकथा कोरलेल्या आहेत. अंतराळाच्या बाजूस पहिला खण व व अंतराळ यामध्ये अधिष्ठान स्थापलेल्या शिवलिंगाची एक दंपती पूजा करीत असल्याचे एक दृश्य आहे. हे दृश्य मंदिर निर्माण करविणाऱ्या दानी दंपतीचे असावे. अंतराळाच्या पश्चिमेस छतावर आणखी ९ शिल्पे आहेत.
२१ क्रमांकाच्या लेण्यात मुख मंडपाच्या बाजूच्या भिंतीत एक विशाल शिलाहारकालीन गणेशमूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीमुळे या लेण्यास गणेशलेणे म्हणतात. हे लेणे मुळात विहार म्हणून बांधले असावे आणि त्याचा वापर वज्रयान पंथीयांनी केला असावा.
२२ क्रमांकाच्या लेण्यात मुखमंडपात बाजूच्या भिंतीत समोरासमोर गणेश व सरस्वतीच्या प्रतिमा आहेत तर गर्भगृहात सुमारे १४ व्या शतकामध्ये पद्मासनस्थ नाथयोग्याची मूर्ती कोरली आहे.
२३ क्रमांकाचे लेणे मुळात विहार म्हणून खोदले गेले होते. १२ व्या शतकात त्याचे शिलाहार मंदिरात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात मूर्ती संस्थापना करण्याअगोदरच येथील शैवपंथाच्या वर्चस्वास ओहोटी लागली असावी. या लेण्यात विध्वंसाची चिन्हे दिसतात. पण हा विध्वंस बराच नंतर झालेला असावा. कदाचित दाभोळ येथे विजापूरच्या इब्राहिम आदिलखानाच्या कारकिर्दीत मशिदी बांधल्या गेल्या; तेव्हा झाला असावा.
१४ व २९ गट :
१४ वे लेणे मुळात हीनयान बौद्ध धर्मियांनी भिक्षुगृह म्हणून खोदले असावे. पण मागाहून त्याचा वापर वज्रयान प्राबल्य संपल्यावर नाथ पंथीयांनी केला असे स्पष्ट दिसते. नाथ पंथीयांचे पन्हाळेकाजी येथे केंद्र साधारणतः तेराव्या चौदाव्या शतकात तयार झाले असावे. या लेण्याच्या प्रांगणात एका घडीव चौकोनी दगडावर सिद्ध पादुका कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराचे बाजूस सहा-सहा अशी एकूण बारा शिल्पे आहेत. त्यातील पहिल्या चौकोनात योग पट्टसहित अर्धमत्सेंद्रासनात छताचे खाली एक सिद्ध आहेत.
त्यांचा उजवा हाथ समोरील चौकोनातील स्त्री काही वस्तू देत आहे; ती घेण्यासाठी उंच केलेला असून डावा हाथ त्यांनी कुबडीवर ठेवलेला आहे. हा प्रसंग कदलीवनात मत्सेन्द्रनाथांनी काही काळ तंत्रमार्गी योगिनींचे जाळ्यात शाक्त साधनेत घालवला त्यासंबंधीचा असावा, असा अंदाज व्यक्त करता येतो. आणि इतर कुठल्याही सिद्धाचे डोक्यावर छत नसताना फक्त याच सिधाच्या डोक्यावर आहे. याचा अर्थ ते नाथ पंथीयांचे प्रथम सिद्ध असावेत. उजव्या बाजूच्या वरच्या दोन प्रसंगात एकामध्ये एक स्त्री व दुसऱ्यात एक सिद्ध यांच्यातील संवाद चित्रित केला आहे. हा प्रसंग देखील मत्सेंद्रनाथांच्या जीवनावरील असावा, असा अंदाज दर्शवता येतो.
डाव्या बाजूच्या दुसऱ्या पटात (मधल्या चौकोनात) ध्यानस्थ चौरंगी नाथांची मूर्ती असून त्यांचे तुटलेले हाथ पाय खांद्याजवळ आणि पाया जवळ वेगळे दाखवले आहेत. त्याच्या जवळची मूर्ती त्यांचे गुरुबंधू गोरखनाथ यांची असावी.
उजव्या बाजूच्या दुसऱ्या पटात द्वाराजवळील चौकोनात एक योगी चिमट्याने एका तीन पाटाच्या आसावर ठेवलेल्या कुंडामधील वस्तू उचलीत आहे. नाथपंथीय साधू रसविदयेत प्रवीण होते, हे दर्शविण्यासाठी ही प्रतिमा कोरली असावी. तर त्या शेजारच्या चौकोनात कोणी एक व्यक्ती हातामध्ये काही सामग्री घेऊन रसप्रक्रियेत मग्न असलेल्या सिद्धाकडे जात आहे असे दर्शवले आहे.
डाव्या बाजूच्या खालच्या दोन चौकोनात एका बसलेल्या सिद्धाची मूर्ती असून ते एक पेटी उघडीत अथवा बंद करीत आहेत. तर त्याच्या शेजारच्या कोनात डाव्या हातात पात्र व उजव्या हातात दंड किंवा पळी घेतलेला सिद्ध पुरुष धावण्याच्या किंवा चालण्याच्या क्रियेत आहे.तर उजव्या बाजूच्या दोन चौकोनात एक लगुड घेतलेले सिद्ध व दुसरे व्याख्यान मुद्रेतील सिद्ध दाखविले आहेत. या लेण्याच्या द्वारशाखेवर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आणि उंबरठ्याच्या मध्यभागी एक गोलाकार भाग आहे.
२९ वे लेणे :
हे लेणे मुख्य लेणीसमूहापासून दूर आहे. नाथपंथीयांनी खोदलेल्या या लेण्याला परंपरागत ‘गौर लेणे’ असे म्हणतात. या लेण्याची योजना इतर लेण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. मध्यभागी काहीसे खोल प्रांगण असून त्याच्या पश्चिमेस दोन्ही बाजूच्या कठड्यामधून प्रांगणाच्या प्रवेश बाजूसमोर तीन छोटी लेणी आहेत.
यापैकी मधल्या लेण्यात शिवलिंग आहे. लेण्याच्या प्रवेश द्वारशाखेच्या खालच्या बाजूस गंगा-यमुना शिल्पे आहेत. उत्तरेकडील व दक्षिणेकडील म्हणजेच शेजारील दोन्ही लेण्यांवर कोणतीही शिल्पे नाहीत. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीत उत्तरेच्या बाजूस एक चौकोनी कोनाडा आहे व त्याच्याच बाजूस मोठ्या कोनाड्यात लक्ष्मी, गणेश व सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत. लक्ष्मी, गणेश, सरस्वती मूर्ती समोरील भिंतीत या लेण्यातील मुख्य गर्भगृह कोरलेले आहे.
या गर्भगृहाच्या द्वाराच्या द्वारशाखेखाली देवकोष्ठामध्ये गंगा व यमुना पूर्ण घटासह दाखविल्या असून त्यांची दृष्टी द्वाराकडे आहे. दरवाजालगत उजव्या बाजूस एका सवत्स धेनूचे छोटे शिल्प आहे. लेण्यात प्रकाश यावा म्हणून उजव्या बाजूच्या भिंतीत चार छिद्रे केलेली आहेत. पाठीमागच्या भिंतीत जमिनीपासून थोड्या उंचावर एक चौकोनी कोनाडा असून यामध्ये तीन मूर्ती कोरल्या आहेत. या मूर्तीतून आदिनाथाच्या योगोपदेशाने मत्स्याचे मत्स्येद्रनाथात रूपांतर झाले. हा प्रसंग चित्रित केला आहे.
इतर चार भिंतींवर छोट्या छोट्या चौकोनात अनेक सिद्धांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. उजवीकडील व डावीकडून भिंतीत दोन मोठ्या कोनाड्यात दोन प्रमुख देवतांची स्थापना केली आहे. त्यापैकी उजवीकडून भिंतीत शरभ तंत्रामध्ये वर्णिलेल्या त्रिपूरसुंदरीचे ध्यान कोरलेले आहे. तिच्या चार हातांपैकी एका हातात बाण, दुसऱ्यात अंकुश, तिसऱ्यात इक्षुचाप, चौथ्यात पाश आहे. समोरच्या भिंतीत जटाधारी कानफाट्या नाथसिद्धाची व्याख्यान मुद्रेत बसलेली मूर्ती आहे.
या लेण्यात दक्षिणेकडील भिंतीचे मागील बाजूस दरवाजाच्या पूर्वस छोट्या चौकोनात ९, पूर्वेकडील भिंतीत १९ व उत्तरेकडील भिंतीत २९ ,पश्चिमेकडील भिंतीत १९, व पुन्हा व दक्षिणेकडील भिंतीत दरवाजाच्या पश्चिमेस ९ अशी एकूण ८५ शिल्पे आहेत. ही सर्व शिल्पे बहुतेक नाथ योग्यांची आहेत. या शिल्पांतील बहुतेक सर्व सिद्ध व्याख्यान मुद्रेमध्ये, पद्मासनात, अर्धमत्सेंद्रासनात, तर क्वचित चालताना आहेत. लेण्यांच्या बाहेर उघड्या प्रांगणावर लाकडी मंडप घालण्याची योजना होती, असे भिंतीतील खाचांमुळे स्पष्ट होते. दाराबाहेर एक छोटासा कट्टा आहे.
तर थोडे उत्तरेकडे वळल्यावर डाव्या बाजूस भैरव, हनुमान यांची कोनाड्यात कोरलेली शिल्पे आहेत.हे लेणे मुख्य लेणीसमूहापासून दूर आहे. नाथपंथीयांनी खोदलेल्या या लेण्याला परंपरागत ‘गौर लेणे’ असे म्हणतात. या लेण्याची योजना इतर लेण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. मध्यभागी काहीसे खोल प्रांगण असून त्याच्या पश्चिमेस दोन्ही बाजूच्या कठड्यामधून प्रांगणाच्या प्रवेश बाजूसमोर तीन छोटी लेणी आहेत. यापैकी मधल्या लेण्यात शिवलिंग आहे.
लेण्याच्या प्रवेश द्वारशाखेच्या खालच्या बाजूस गंगा-यमुना शिल्पे आहेत. उत्तरेकडील व दक्षिणेकडील म्हणजेच शेजारील दोन्ही लेण्यांवर कोणतीही शिल्पे नाहीत. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीत उत्तरेच्या बाजूस एक चौकोनी कोनाडा आहे व त्याच्याच बाजूस मोठ्या कोनाड्यात लक्ष्मी, गणेश व सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत. लक्ष्मी, गणेश, सरस्वती मूर्ती समोरील भिंतीत या लेण्यातील मुख्य गर्भगृह कोरलेले आहे.
या गर्भगृहाच्या द्वाराच्या द्वारशाखेखाली देवकोष्ठामध्ये गंगा व यमुना पूर्ण घटासह दाखविल्या असून त्यांची दृष्टी द्वाराकडे आहे. दरवाजालगत उजव्या बाजूस एका सवत्स धेनूचे छोटे शिल्प आहे. लेण्यात प्रकाश यावा म्हणून उजव्या बाजूच्या भिंतीत चार छिद्रे केलेली आहेत. पाठीमागच्या भिंतीत जमिनीपासून थोड्या उंचावर एक चौकोनी कोनाडा असून यामध्ये तीन मूर्ती कोरल्या आहेत. या मूर्तीतून आदिनाथाच्या योगोपदेशाने मत्स्याचे मत्स्येद्रनाथात रूपांतर झाले. हा प्रसंग चित्रित केला आहे.
२४ ते २८ गट :
या गटातील लेणी आकाराने लहान असून यात वैशिष्टपूर्ण असे काहीच आढळत नाही. फक्त २५ क्रमांकाच्या लेण्याच्या प्रांगणात एक एकाश्म लिंगयुक्त मंदिर कोरले आहे.
म.न.देशपांडे यांच्या अभ्यासानंतर २००४ साली पन्हाळेकाजीत आणखीन एक ताम्रपट सापडला. हा ताम्रपट त्याच गावातील ग.रा.जाधव यांच्या देवघरात पूजेला लावलेला होता. ठाण्याचे नाणे शास्त्राचे अभ्यासक आणि दक्षिण भारतीय परिषदेचे उपाध्यक्ष श्री. शशिकांत धोपाटे यांनी तो अभ्यासला व त्याचे वाचन करून भारतीय पुराभिलेख संस्थेला सादर केला. हा ताम्रपट शिलाहार राजवंशातील मल्लिकार्जुन राजा पन्हाळेदुर्ग येथे राज्य करीत होता; त्यावेळचा आहे.
या ताम्रपटात शिलाहारांनी जैन मंदिराला ग्रामदान केल्याचा उल्लेख प्रथमच आढळला. त्याआधी सापडलेल्या ताम्रपटातून शिलाहारांनी शिवमंदिरे, देवी मंदिरे आणि बुद्ध विहारांना ग्रामदान केल्याचे उल्लेख आहेत. या ताम्रपटामुळे शिलाहारांच्या इतिहासात नवीन भर पडली. शिलाहार राजवंशातील सोळावा राजा अपरादित्य याचा मल्लिकार्जुन हा चौथा मुलगा होता. ( पहिला केशिदेव, दुसरा विक्रमादित्य, तिसरा हरिपालदेव व चौथा मल्लिकार्जुन ) हे चारही राजे सख्खे भाऊ होते. हे या ताम्रपटाद्वारे प्रथमच ज्ञात झाले.
शिलाहारांची राजवट कोकणात दीर्घकाळ होती व या राजवंशाची राजधानी प्रणालक दुर्ग येथे होती. (प्रणालकदुर्ग-पन्हाळेदुर्ग- पन्हाळेकाजी काळानुसार झालेला अपभ्रंश.) शिलाहार हा महाराष्ट्रात राज्य करणारा एक प्रमुख राजवंश होता.
पन्हाळेकाजीचे लेणे एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, याकरता अनेकांकडून अथक प्रयत्न झाले. पण धार्मिक स्थित्यंतरे पाहणाऱ्या या लेण्यांना आजही म्हणावी तितकी प्रसिद्धी लाभलेली नाही. सध्या पर्यटन संख्या वाढते आहे, पण तरीही ती संख्या सुमार म्हणण्या इतपतच आहे. फक्त एक सुदैवाची बाब म्हणजे भारतीय पुरातत्त्व खात्याकडून या लेण्यांची उचित देखभाल होत आहे.

अजिंठा

 


अजिंठा
अजिंठा हे महाराष्ट्रातील प्राचीन लेणी, शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. ते औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सु. १०३ किमी. अंतरावर आहे. येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) असून यांपैकी क्र. ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे व बाकीचे पंचवीस विहार आहेत. कालखंडाच्या दृष्टीने या लेण्यांपैकी ९ व १० ही चैत्यगृहे आणि ८, १२, १३ व ३० हे विहार हीनयान पंथाचे असून त्यांचा काल इ. स. पू. २ रे शतक ते इ. स. २ रे शतक असा आहे.
बाकीची लेणी महायान पंथाची असून येथील अवशिष्ट शिलालेखांवरून असे दिसून येते की, ती वाकाटक वंशातील शेवटचा ज्ञात सम्राट हरिषेण ह्याच्या कारकिर्दित (सु. ४७५–५००) कोरली गेली असावीत. येथे सातवाहन काळातील लयन स्थापत्याच्या पहिल्या टप्प्यात, सामान्य व्यक्तींनी आपल्या ऐपतीप्रमाणे चैत्य आणि बौद्धविहारांसाठी अनेक घटकांचे दान दिलेले दिसते. दुसऱ्या टप्प्यात, महायान काळात मात्र प्रामुख्याने वाकाटकनृपती यांच्या राजाश्रयातून हे लयन स्थापत्य उभे राहिलेले दिसते.
येथील गुंफा क्र. १६, १७ आणि २० येथील शिलालेख हरिषेण याच्या राज्यकालादरम्यानचे आहेत. हे लेख राजा हरिषेण याचे सामंत आणि मंत्री यांचे आहेत.
गुंफा क्र. १६ : (वराहदेवाचा लेख).
या लेखाचा शोध इ. स. १८६२ मध्ये प्राच्यविद्यापंडित भाऊ दाजी लाड यांनी लावला व त्याचे सर्वप्रथम वाचन केले. त्यानंतर स्कॉटिश पुरातत्त्वज्ञ जेम्स बर्जेस आणि भारतविद्याविशारद भगवानलाल इंद्रजी यांनी १८८१ मध्ये, प्राचीन भारतीय लिपींचे जर्मन अभ्यासक योहान गेओर्ख ब्यूलर (Johann Georg Buhler) यांनी १८८३ मध्ये आणि प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनी १९४१ मध्ये या लेखाचे पुनर्वाचन केले.
प्रस्तुत लेख वत्सगुल्म शाखेतील वाकाटक नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याचा आहे. गुंफेच्या व्हरांड्याच्या एका टोकाला डावीकडील भिंतीवर दक्षिणी पद्धतीच्या पेटिकाशीर्ष ब्राह्मीलिपीत संस्कृत भाषेत हा लेख कोरलेला असून संपूर्ण लेख पद्यात आहे. मात्र यात देवटेक येथील लेखाप्रमाणे डोक्यावरील पेटिका पूर्णपणे खोदल्या आहेत. या लेखाच्या २७ ओळी असून त्यात ३२ पद्ये आहेत. लेख खूपच झिजला आहे. विशेषत: आठव्या ओळीपर्यंतचा मध्यभाग व डाव्या बाजूकडील अक्षरे वाचता येत नाहीत.
या लेखाचे मुख्यत: दोन भाग आहेत. पहिल्या भागात वाकाटक राजा हरिषेण याची त्या वंशाचा मूळ पुरुष राजा विंध्यशक्तीपासूनची वंशावळ दिली आहे. त्याला ‘द्विजʼ (ब्राह्मण) म्हणून गौरविले आहे. देवसेन आणि हरिषेण यांचे मंत्री हस्तिभोज आणि पुत्र वराहदेव यांचे वर्णन केले आहे. हस्तिभोज हा कुशल मंत्री आणि गजदळाचा अधिपती असून देवसेनाने निर्धास्तपणे त्याच्या हाती राज्यकारभाराची धुरा सोपवली होती. हरिषेणाच्या वर्णनादरम्यान कुंतल, अवंती, कलिंग, कोसल, त्रिकुट, लाट आणि आंध्र या प्रांतांची नावे आली आहेत. या ठिकाणी लेख भग्न झाला आहे. बहुधा हरिषेणाने जिंकलेल्या राज्यांची ती यादी असावी.
लेखाच्या दुसऱ्या भागात चैत्यमंदिर, मंडपरत्न, पाण्याची विशाल टाकी आणि नागराजाचे मंदिर (नागेंद्र वेश्मा) इ. बौद्धसंघाला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. या दानाचे पुण्य आपल्या मातापित्यांना मिळावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
अजिंठ्यापासून सु, १५ किमी. अंतरावर पश्चिमेस गुळवाडा येथे घटोत्कच गुंफा आहेत. येथे एक अठरा ओळींचा शिलालेख आहे. अक्षरांची धाटणी अजिंठा येथील १६ आणि १७ क्रमांकांच्या लेखांप्रमाणेच आहे. हा विहारदेखील वराहदेवानेच निर्माण केला होता. विशेष म्हणजे या लेखातून आपल्याला त्याच्या कुळाबद्दल सविस्तर माहिती मिळते. वराहदेव हा वाल्लूर येथील ब्राह्मण होता. यज्ञपति हे त्याच्या मूळ पुरुषाचे नाव होते. लेखात उल्लेख केलेले त्याचे सर्व पूर्वज वाकाटक राजांचे मंत्री असल्याचीही नोंद आहे.
वा. वि. मिराशी यांच्या मते, सन १९३६ मध्ये वाशीम ताम्रपट मिळेपर्यंत या वत्सगुल्म शाखेविषयी मुळीच माहिती नव्हती. या शाखेच्या कित्येक नृपतींची नावे अजिंठा येथील सोळा क्रमांकाच्या लेण्यातील लेखात आली आहेत; तथापि तो लेख अत्यंत खराब झाल्यामुळे त्यातील नावे बरोबर वाचता आली नव्हती. वाशीम ताम्रपटांतील माहितीवरून अजिंठा लेखातील खरी राजनामे उपलब्ध झाली आहेत. त्यावरून इंध्याद्री पर्वतराजीच्या दक्षिणेस वाकाटकांची दुसरी शाखा राज्य करीत होती, हे सिद्ध झाले आहे.
गुंफा क्र. १७ : (हरिषेणाच्या मांडलिकाचा लेख).
प्रस्तुत लेख गुंफेच्या व्हरांड्याच्या भिंतीवर कोरला आहे. हा लेख संस्कृत पद्यात असून त्यात २९ वृत्तबद्ध श्लोक आहेत. लिपी दक्षिणी पद्धतीची पेटीकाशीर्ष ब्राह्मी आहे. हा लेख प्रथम १८६३ मध्ये भाऊ दाजी लाड यांनी वाचला. त्यानंतर भगवानलाल इंद्रजी यांनी १८८३ मध्ये त्याचे पुनर्वाचन प्रसिद्ध केले. हा लेख अनेक ठिकाणी खंडित असल्याने त्याच्या अर्थपूर्ण वाचनात अडचणी येतात. ज्या राजाने हा लेख कोरविला होता, त्याचे नाव आता नष्ट झाले आहे. पण तो वाकाटकनृपती हरिषेणाचा मांडलिक असून बहुधा खानदेशावर राज्य करीत असावा, असे वा.वि. मिराशी यांनी प्रतिपादले आहे.
भगवानलाल इंद्रजी यांनी या लेखात अश्मक देशाच्या धृतराष्ट्र, हरिसांब, शौरिसांब, उपेंद्रगुप्त, प्रथम कच, भिक्षुदास, निलदास, द्वितीय कच, कृष्णदास व त्याचे पुत्र (नाव नाहीसे झाले आहे) आणि रविसांब या राजांच्या नावांचे वाचन केले. हे राजे वाकाटकांचे मांडलिक असावेत.
योहान गेओर्ख ब्यूलर यांच्या मते, ‘रविसांबʼ या आपल्या धाकट्या भावाच्या अकाली मृत्युमुळे त्याला ऐहिक जगाची नश्वरता समजली. मिराशी यांच्या मते, हाच राजा हरिषेण याचा मांडलिक असावा. गुंफा क्र. १७ येथील विहार आणि क्र. १९ येथील गंधकुटी निर्माण करणाऱ्या या राजाचे नाव नष्ट झाले आहे. जेतवनातील गौतम बुद्धाच्या निवासस्थानाला ‘गंधकुटीʼ असे म्हणत असत. प्रस्तुत लेखातही वाकाटक राजा हरिषेण याचा उल्लेख आल्याने हा लेख गुंफा क्र. १६ चा समकालीन असावा.
गुंफा क्र. २० : (उपेंद्रगुप्त याचा लेख).
जेम्स बर्जेस यांनी गुंफा क्र. २० येथील व्हरांड्यातील डाव्या भागाला एका अर्धस्तंभावर असलेल्या खंडित लेखात क्रि (खंडित अक्षरे) याचा पुत्र उपेंद्र (खंडित अक्षरे) याने मंडपाचे दान दिल्याची नोंद केली आहे. गुंफा क्र. १७ मधील लेखाच्या आधारे वॉल्टर एम. स्पिंक यांनी यातील पिता कृष्णदास असून त्याच्या मुलाचे नाव उपेंद्रगुप्त असल्याचे अनुमान केले आहे. कचप्रमाणे उपेंद्रउगुप्त हे नावदेखील या घराण्यात पुन्हा आले असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. यावरून गुंफा क्र. १७ आणि २० यांचा दानकर्ता उपेंद्रगप्त असावा, असे त्यांचे मत आहे.
आभिरांच्या आक्रमणामुळे वाकाटक राजघराणे अस्तंगत झाले. याचा प्रभाव अजिंठा येथे गुंफा क्र. २६ मधील लेखाच्या दाखल्यावरुन दिसून येतो. या लेखात संस्कृत भाषेतील सत्तावीस श्लोक आहेत. बर्जेस आणि इंद्रजी यांच्या मते, लेखातील ब्राह्मी लिपीची अक्षरवाटिका गुंफा क्र. १७ च्या काळानंतरची आहे. या लेण्याची देणगी मुनी स्थविराचल व भिक्षू बुद्धभद्र यांनी दिली आहे. भिक्षू बुद्धभद्र याने ही गुंफा आपला मित्र भव्विराज या अश्मक राजाच्या मंत्र्याच्या सन्मानार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. पाचव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत आभिरांनी अजिंठ्याच्या परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचा हा दाखला आहे.
संदर्भ :
Burgess, James & Bhagwanlal, Indraji, Inscritions From The Cave -Temples Of Western India, Archaeological Survey of Western India, Bombay, 1881.
Fergussion, James & Burgess, James, The Cave Temples Of India, London,1880.
Lad, Bhau Daji, ‘Ajunta Inscriptionsʼ, Journal of Bombay Branch of Royal Asiatic Society, Vol. 7, pp. 53-74, 1863.
मिराशी, वासुदेव विष्णु, वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५७.
- रुपाली मोकाशी

स्मारकशिळा

 


स्मारकशिळा:-
स्मारक उभारण्याची परंपरा भारतामध्ये प्राचीन काळापासून आहे असे आपल्याला पाहायला मिळते आजच्या काळात त्याचे स्वरूप जरी बदलले तरी त्याच्यामागची कल्पना एकच आहे हे आपल्याला समजते मग तो एखादा स्तंभ, देवळी, समाधी, वीरगळ, सतीशिळा किंवा मग छत्री असेल या सगळ्याचा इतिहास फार महत्वाचा आहे.
पराक्रमी पुरुषांच्या विरकथा तसेच सत्पुरुष लोकांच्या समाध्या किंवा त्यांचे महत्वाचे संदेश तसेच सतीने केलेले अग्निदिव्य या सर्वगोष्टी आपल्याकडील जनमानसात वेगवेगळ्या स्वरूपात किंवा लोककथांमधून प्रचलित आहेत. आपल्याकडील वेगवेगळ्या लोककथांमधून या सर्व वीरांचे गुणगान केलेले आपल्याला पहायला मिळते. ज्या वीरांनी पराक्रम गाजवला तसेच आपल्या गावचे रक्षण केले त्या वीरांच्या समरणार्थ लोकांनी वीरगळ बनवले. साधू पुरुषांच्या समाध्या बनवल्या तसेच सती गेल्या स्त्री साठी सतीशिळा आणि तुळशी वृंदावन बनविले गेले हे सर्व उभारण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या आठवणी आणि या आठवणीतून चालू पिढीला त्यापासून स्फूर्ती मिळणे हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश.
गुजरातच्या कच्छमध्ये इ.स. 2 ऱ्या शतकात 'क्षत्रप' राजे राज्य करीत होते. 'क्षत्रप' हे मध्य आशिया मधून भारतात आले होते तेव्हा हे क्षत्रप लोकं मृतांच्या स्मृतिसाठी एक स्तंभ उभारीत असत त्यास 'गोत्रशैलिका' असे म्हणत असत. राजस्थान मध्ये यौधेय नावाची जमात होती. राजस्थान मध्ये लोकांना कायम परचक्रांना तोंड द्यावे लागत असे. त्यामुळे राजस्थान मध्ये वीरांना सतत युद्धाचा प्रसंग येत असे. राजस्थान मधील भिल्ल, मीन या आदिवासी जमातीमध्ये दहन झाले असेल तर त्या ठिकाणी स्तंभ उभारतात आणि त्याच्यावर छत्री उभारतात. छत्री ही राजस्थानची कला आहे ती पुढे माळव्यात आली आणि माळव्यातून महाराष्ट्रात आलेली आपल्याला पाहायला मिळते.
राजस्थान मध्ये पूर्वी छत्रीच्या आधी वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देवळी म्हणजेच देऊळ बांधीत असत. राजस्थान मध्ये 12 व्या ते 13 व्या शतकापासून देवळीचे अवशेष आजही आपल्याला सापडतात. या देवळीवर योध्याचे घोड्यावरचे चित्र तसेच त्याच्यासमोर हात जोडलेले त्याचे अनुयायी दाखवलेले असतात. तसेच त्याच्याखाली दोन पट्टीका असतात त्यामध्ये अप्सरा या जास्त शृंगारिक असतात आणि त्यांच्या हातामध्ये बासरी, मृदुंग अशी वाद्ये दाखवली आहेत तसेच या अप्सरा आपल्याला साडी नेसलेल्या दाखवल्या जातात हा अप्सरांचा पेहेराव महाराष्ट्राशी मिळता जुळता असून आपल्याला यातून संस्कृतीचे लागेबांधे दिसून येतात.
भासाच्या प्रतिमा या नाटकामध्ये प्रतिमामंदिर याअर्थाने 'देवकुल' हा शब्द आलेला आपल्याला दिसतो. नाटकामध्ये भरत देवकुलिकाला भेटतो तेव्हा देवकुलिक भरताला सांगतो की हे पूजस्थान नसून हे प्रतिमामंदिर आहे. त्या प्रतिमा मंदिराच्या शेवटी जो पुतळा असतो तो दशरथाचा असतो. दशरथाच्या पुतळ्यावरून भारतास आपला पिता मृत झाल्याचे समजते. यावरून देखील आपल्याला स्मारकांबद्दल समजायला मदत होते. कुशाण काळामध्ये मथुरेजवळ माट गावामध्ये कुशाण राजांच्या स्मरणार्थ देवकुले उभारली होती तसेच वीरांच्या स्मारकाचा आणखी एक महत्वाचा पुरावा हा गुप्तकाळा मध्ये वीरांच्या स्मरणार्थ, गुरूंच्या स्मरणार्थ शिवलिंगे स्थापन करण्याची प्रथा सुरू झालेली दिसते. गुरूच्या स्मरणार्थ बांधलेल्या किंवा उभारलेल्या शिवमंदिरास 'गुर्वायतन' असे म्हटले आहे.
कर्नाटकमध्ये इ.स. 5 व्या शतकामध्ये बदामी चालुक्य वंश राज्य करीत होता. या कुळामध्ये द्वितीय विक्रमादित्य राजा राज्य करीत होता. या राजाने हैहय कुळातील राजकन्यांशी विवाह केला त्यांची नावे लोकमहादेवी आणि त्रैलोक्यमहादेवी. या लोकमहादेवी राणीने आपल्या पतीच्या निधनानंतर कर्नाटकमध्ये पट्टदकल याठिकाणी पतीच्या स्मृत्यर्थ सुप्रसिद्ध विरुपाक्ष मंदिर बांधले आणि त्याकाळातील सर्वोत्तम कलेचा नमुना उभारला. वीराच्या स्मृत्यर्थ शिवमंदिर किंवा शिवलिंग उभारण्याची कल्पना लोकप्रिय झालेली आपल्याला दिसते.
सातवाहन काळामध्ये नाणेघाट येथे प्रतिमागृहाची निर्मिती झाली येथे एकूण आठ प्रतिमा होत्या ज्या आता संपूर्ण नष्ट झाल्या आहेत त्यामध्ये सिमुक सातवाहन, नागणिका, श्रीसातकर्णी यांची नावे आणि मूर्ती होत्या. वर पाहिल्याप्रमाणे ही स्मारके व्यक्तीच्या निधनानंतर उभारण्याची प्रथा होती हे भासाच्या प्रतिमा नाटकावरून आपल्याला समजते. नागार्जुनकोंडा येथे देखील प्रतिमालेख मिळाले आहे. भंडारा जिल्ह्यात पवनी येथे रुप्पीअम्माचा छायास्तंभ मिळाला असून तो सध्या नागपूर येथील संग्रहालयात आहे. वसिष्ठीपुत्र पुळूमावी याने आपल्या पट्टराणीच्या स्मरणार्थ छायास्तंभ उभारला होता. या छायास्तंभावर संबंधित व्यक्तीची प्रतिकृती देखील कोरली जात असे. या प्रकारच्या स्तंभाना 'यष्टी' असे म्हणतात. यष्टीचा जो कोणी नाश करेल त्याला दंडाची शिक्षा केली जाईल अशी शिक्षा 'मनुस्मृती' मध्ये सांगितली आहे.
पूर्वीच्या बहावलपूर संस्थानात सुईविहार या गावी कनिष्ककाळात (इ.स.139) सापडलेल्या ताम्रलेखात भिक्षु नागदत्त याच्या स्मरणार्थ एक 'यठी' उभारल्याचा देखील उल्लेख मिळतो या शब्दामुळे भिक्षुच्या हातातील दंड सूचित होत असून वरील उल्लेख त्याला भिक्षुपद मिळाल्याचा किंवा त्याच्या मृत्यूनंतर ते संपुष्टात आल्याचा त्या शब्दातून अर्थ कळतो. श्रीधरवर्मन याचा मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात एरण येथे असलेला स्तंभलेख हा स्मृतिलेख असून श्रीधरवर्मन याचा सेनापती सत्यनाग याने एरण येथे धारातीर्थी पडलेल्या सेनेच्या स्मरणार्थ हा स्तंभलेख उभारला.
धारातीर्थी मरण पावलेल्या विराची स्मारकशिळा म्हणजे वीरगळ. हा शब्द सामासिक असून तो वीर आणि कल्लू(शिळा, दगड) यांच्या जोडाने बनला आहे. मराठी भाषेने हा शब्द कन्नड भाषेतून घेतलेला आपल्याला दिसतो. वीरगळ किंवा वीरशिळा कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्या तरी अशा स्मारकशिळा या भारतात सापडतात. महाराष्ट्रात स्मारकशिलांची प्रथा जरी जुनी असली तरी त्या शिलांना मिळालेले वीरगळ हे नाव मूळ कन्नड आहे. गुजरातमध्ये या शिलांना 'पालिया' असे म्हणतात.
पूर्वज किंवा मृत योध्यांच्या स्मारकशिळा उभारण्याची पद्धत भारतात सर्वत्र आढळून येते असे असले तरी पश्चिम भारतात आणि त्यातही मुख्यत्वे राजस्थान, गुजरात, माळवा या भागात ती मोठ्या प्रमाणात रूढ होती. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात या स्मारकशिळा वीरगळ म्हणतात. बऱ्याचदा वीरयोध्याबरोबर सहगमन करणाऱ्या सतीच्या स्मरणार्थ सतीशिळा देखील उभारल्या जात असे. यामध्ये सतीचा हात किंवा काही ठिकाणी तिची प्रतिमा कोरलेली असते. आळंदी येथे एक सती शिळा होती ज्याच्यावर लेख होता. असे लेख फार कमी सापडतात. सतीचा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये येतो तो पुढीलप्रमाणे:-
वोखटे मरणा ऐसे । तेंही आलें अग्निप्रवेशे ।
परि प्राणेश्वरा दोसे । न गणी सती ।।
कां महासतीयेचे भोग । देखे किर आघवे जग ।
परि ते आगी ना आंग । ना लोकू देखे ।।
'स्मृतिस्थळा' मध्ये रामदेवराव यादवाची राणी कामाईसे ही त्याच्या मृत्यूनंतर सती गेल्याचे नव्हे तर 'बळाधिकाराने' तिला सती जाण्यास भाग पाडले ह्याचे स्पष्ट उल्लेख स्मृतिस्थळा या ग्रंथात आहेत यावरून सतीची चाल यादव काळात रूढ दिसते.
विरगळावर कोरीवकाम करायची सर्वसाधारण एक पद्धत ठरलेली पाहायला मिळते. चौकोनी स्तंभाच्या आकाराच्या विरगळावर मृताशी संबंधित देवदेवतांची चित्रे कोरलेली असतात उदाहरणार्थ काही वेळेस गणपती देखील कोरलेला आपल्याला बघायला मिळतो. तसेच सपाट शिळेवर एखादी इष्टदेवता कोरण्याची पद्धत आपल्याला दिसते. वीरगळ शिळेवर कोरलेला प्रसंग अनुक्रमे तीन व चार चौकोनात विभागलेला असतो. तळाच्या चौकोनातील वरण्यविषय (Vanyavishay) म्हणजे वीरांचे युद्ध आणि त्याचा मृत्यू मधल्या चौकटीत वीर स्वर्गारोहण करीत आहे हे दृश्य कोरलेले असते तर वरील चौकटीत वीर स्वर्गात करीत असलेली ईशपूजा याप्रमाणे दृश्य दगडावर चित्रित केलेली असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर वीरगळ म्हणजे वीर पुरुषाचा एक संक्षिप्त चित्रपट असतो. लिखित स्वरूपात म्हणजे ज्याच्यावर लेख कोरलेला आहे असा वीरगळ फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
छत्री, वीरगळ ही सर्व वीरांची स्मारके आहेत. यामधून आपल्याला आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचे
स्मरण होत असते यासाठीच आपल्याला या स्मारकशिळा कायम स्फूर्ती देत असतात. या स्मारक शिलांच्या वेगवेगळ्या आकारामुळे आणि कोरलेल्या शिल्पचित्रणाद्वारे तत्कालीन सामाजिक रूढी, कल्पना, पोशाख, धर्मकल्पना इत्यादी गोष्टी समजण्यास नक्कीच मदत होते.
संदर्भ ग्रंथ:-
1) प्राचीन मराठी कोरीव लेख:- डॉ. शं. गो.तुळपुळे
2) महाराष्ट्रातील वीरगळ:- सदाशिव टेटविलकर
3) वीरगळ, छत्री यांचे महात्म्य:- डॉ. शोभना गोखले
4) विखुरलेल्या ईतिहास खुणा:- सदाशिव टेटविलकर
5) इतिहास खंड- लौकिक स्थापत्य:- डॉ. अरुणचंद्र पाठक पाठक
छायाचित्र:-
Shantanu Paranjape

महाराष्ट्राचा आद्य वंश – सातवाहन घराणे

 




महाराष्ट्राचा आद्य वंश – सातवाहन घराणे
पोस्तसांभार :: © सौ. अश्विनी कुलकर्णी उंब्रजकर
महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जर कोणी विचारले तर क्षणार्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण राहणार नाही. जुलमी मुघलांच्या तावडीतून महाराजांनी महाराष्ट्र भूमीला परकीय दास्यत्वातून मुक्त केले, हि विजय कथा माहित नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात शोधुनही सापडणार नाही. परंतु महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त यापुरताच मर्यादित नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी गौरवशाली इतिहासाची परंपरा महाराष्ट्राला जोडली त्याप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गौरवशाली आणि सामर्थ्यशाली इतिहास यापूर्वी आपल्या माय मराठी भूमीमध्ये शिवकाला पूर्वी घडून गेला आहे. दुर्दैवाने फारच कमी लोकांना याबद्दल माहित आहे. हा दैदिप्यमान इतिहास निर्माण केला तो सातवाहन साम्राज्याने. उत्तरेतील गुप्त मौर्य घराण्यांनी भारताचे नेतृत्व केले हे सर्वज्ञात आहे, परंतु महाराष्ट्रातील आद्य राजवंश सातवाहन घराण्याने देखील अखंड भारताचे नेतृत्व केले. ते ही थोडी थोडकी नाही तर तब्बल चारशे पन्नास वर्षे. हा सुवर्ण इतिहास महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत पोहोचावा हाच या लेखा मागील उद्देश आहे.
प्राचीन कालखंड म्हणजे साधारण इसवी सन पूर्व २३० चा तो कालखंड होता. संपूर्ण भारतामध्ये चंद्रगुप्त स्थापित मौर्य घराण्याचे राज्य होते. त्याचाच वंशज असलेल्या सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय होता. कलिंग युद्धातील प्रचंड नरसंहार पाहून उद्विग्न झालेल्या अशोकाने अहिंसावाद स्वीकारला. या अहिंसा वादामुळे वैदिक धर्मातील यज्ञयागामधील पशुबळींवर त्याने बंदी आणली. इतकेच काय तर अहिंसेचे हे तत्त्व सामान्य नागरिकांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले होते. कोणाच्याही घरामध्ये मांसाहार केला जाणार नाही अशी राजाज्ञा सम्राट अशोकाने काढली होती. त्यामुळे बहुसंख्य असणाऱ्या तत्कालीन वैदिक धर्माभिमान्यांना त्यांच्या धार्मिक आणि खाजगी जीवनातील राजकीय हस्तक्षेपामुळे मौर्य साम्राज्य वरील रोष वाढू लागला. तसेच इतक्या पराकोटीच्या अहिंसेमुळे सैन्यात देखील शैथिल्य निर्माण झाले. क्षात्रतेज, प्रखर देशभक्ती, देशाभिमान या मूल्यांचा ऱ्हास होऊ लागला. भारताची ही निद्रिस्त अवस्था वायव्येकडील शक व कुशाण या मध्य-पूर्व आशियातील परकीय वंशीयांना आक्रमण करण्यास खुणावू लागली आणि भारतावर ग्रीक आणि शकांच्या टोळ्या आक्रमण करू लागल्या. मौर्य सेना हे आक्रमण परतून लावण्यास असमर्थ पडू लागली. त्यामुळे सर्वसामान्य भारतीय जनतेमध्ये मौर्यांबद्दल क्षोभ पसरत गेला. त्यातच शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ याच्या विलासी वृत्तीची भर पडली. अंतर्गत भांडणामुळे हा राजा परकीय आक्रमण थोपवू शकला नाही. परिणामी मौर्य साम्राज्याची शकले होऊन उत्तर भारतामध्ये शृंग व काण्व या वंशांनी आपली सत्ता स्थापन केली. दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रामधील सातवाहन नामक एका शूर योध्याने जनशक्ती संघटित करून आपली सत्ता स्थापन केली. त्याचाच पुत्र सिमुक सातवाहन याने ही सत्ता महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता आंध्र आणि कर्नाटक प्रांतापर्यंत तिचा विस्तार केला. त्यामुळे संपूर्ण दक्षिणापथा मध्ये सातवाहन घराणे भारताचे प्रतिनिधित्व करत होते. भागवत पुराण, वायुपुराण, विष्णुपुराण इत्यादी पुराणांमध्ये या घराण्यातील राजांच्या वंशावळीचा उल्लेख आहे. या वंशामध्ये साधारण तीस राजे होऊन गेले. सातवाहन राजांनी आपला राज्यकारभार चालवण्यासाठी तत्कालीन 'प्रतिष्ठान' म्हणजेच आजचे पैठण शहर ही आपली राजधानी बनवली होती असे उत्कीर्ण लेखांवरून कळते. या काळात त्यांनी निर्माण केलेली सुव्यवस्थित सामाजिक व राजकीय स्थिती साहित्य,स्थापत्य व शिल्पकलेची झालेली भरभराट यामुळे महाराष्ट्राने प्रगतीचा उत्कर्ष बिंदू गाठला होता.
वैदिक धर्मीय असणाऱ्या सातवाहनांनी अश्वमेध, राजसूय, अनारंभनीय इत्यादी यज्ञ करून आपला दरारा संपूर्ण भारत खंडामध्ये निर्माण केला होता. या घराण्याने भारतीय इतिहासाला अनेक वीर राजे दिले आहेत. याच घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने “तीसमुद्दतोयपीतवान” (म्हणजे ज्याच्या वाहनाने घोड्याने तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे) ही बिरुदावली धारण केली होती. गौतमीपुत्राच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र वैभवाच्या उत्तुंग शिखरावर होता. ही संपन्नता पाहून नहपान नावाचा एक शक राज्यकर्ता महाराष्ट्रावर आक्रमण करु लागला. इसवी सन १२५ च्या सुमारास नहपान आणि गौतमिपुत्रामध्ये नाशिक येथील गोवर्धन परिसरात घनघोर युद्ध झाले. यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा दारुण पराभव केला आणि त्याच्या चांदीच्या व सोन्याच्या सर्व नाण्यांवर आपली विजय मुद्रा उमटवली आणि ती चलनात आणली. नाशिक येथील जोंगलटेंभी येथे झालेल्या उत्खननामध्ये अशा १३,२५० नाण्यांचा संचय सापडला आहे. पराभूत नहपान सह्याद्री पर्वतरांगांमध्ये लपून बसला असता, त्याचा पाठलाग करून गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ उच्छेद केला. नहपान शकाच्या नाशामुळे महाराष्ट्रावर आक्रमण करण्याची कोणत्याही परकीय आक्रमकाची छाती झाली नाही. तसेच वायव्येकडील ग्रीक व पह्लवांनी गौतमीपुत्राची चांगलीच धास्ती घेतली होती. गौतमीपुत्राने आपल्या राज्याचा विस्तार मध्यप्रदेशातील विदिषा नगरी पर्यंत वाढवला होता. याच्या कालखंडात दक्षिण व मध्य भारतामध्ये सातवाहनांची प्रबळ सत्ता होती.
सातवाहन राजे कलेचे भोक्ते होते. सतरावा सातवाहन राजा हाल याने अनेक उत्तम कवींना राजाश्रय दिला होता. अशा उत्तम कवींकडून एक कोटी गाथा हाल राजाने संकलित केल्या व त्यातील निवडक सातशे ओव्यांचा महाराष्ट्री प्राकृतात ‘सत्तसई’ किंवा ‘गाथासप्तशती’ नावाचा ग्रंथ तयार केला. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रमाणित आद्यग्रंथ म्हणावा लागेल. शृंगाररस पूर्ण या ग्रंथामध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचे वर्णन पहावयास मिळते. हालाच्या दरबारातील गुणाढ्य या मंत्र्याने पैशाची भाषेत ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ लिहिला तसेच संस्कृत व्याकरणावर आधारित ‘कातंत्र’ हा ग्रंथ लिहिणारा सर्ववर्मा हादेखील हाला च्या दरबारात होता!
सातवाहनांच्या प्रदीर्घ शासन पद्धतीमुळे व्यापाराची भरभराट झाली होती. त्यांनी तगर क्षेत्राला (म्हणजेच आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील तेर) आपली आर्थिक राजधानी बनवली होती. याच वंशातील यज्ञश्री सातकर्णीच्या नाण्यांवर शिडाच्या जहाजाची प्रतिकृती सापडते. यावरून भारताचा इतर देशांची समुद्रमार्गे व्यापार होत होता असे दिसते. तेर येथील उत्खननामध्ये सापडलेले मद्यकुंभ हे रोमन पद्धतीचे आहेत. यावरून रोमन पद्धतीची मातीची भांडी येथे निर्यात केली जात होती, तसेच भारतातील मसाल्याचे पदार्थ, सोने, रेशमी वस्त्रे इत्यादी वस्तूंची रोममध्ये आयात होत होती. तेर येथील उत्खननामध्ये एक हस्तीदंताची बाहुली सापडली आहे आणि विशेष म्हणजे अगदी अशीच बाहुली इटलीच्या एका संग्रहालयामध्ये जतन करून ठेवली आहे. यावरून तेरचा रोमन साम्राज्याशी थेट व्यापार होत होता हे सिद्ध होते. शेती हा तत्कालीन समाजाचा प्रमुख व्यवसाय असला तरी गान्धिक (सुगंधी पदार्थाचे व्यापारी) सुवर्णकार, स्थपती, कोलिक (वस्त्र विणणारे) मालाकार इत्यादी व्यवसायिक देखील सुस्थितीत होते. सातवाहन काळामध्ये झालेल्या व्यापाराच्या भरभराटीमुळे महाराष्ट्राला केवळ भारतीय नाही तर जागतिक अर्थ पटलावर मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
बहुतांश सातवाहन राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावत असत. गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठीपुत्र पुळूमावी इत्यादी मातृपदवाचक नावांवरून समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान होते असे दिसते. इसवी सन पूर्व दोनशेच्या आसपास नागनिका या सातवाहन राणीने राज्यकारभार चालवला होता. इतकेच नव्हे तर तिने आपल्या नावाची नाणी देखील छापली होती. नाण्यांवर आपली प्रतिमा उमटवून ती नाणी चलनात आणणारी नागनिका की प्रथम भारतीय महिला होती. यावरून नागनिका भारतातील पहिली महिला राज्यकर्ती आहे असे म्हणावे लागेल. त्याकाळी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास मान्यता होती. सातवाहन राजांनी वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले. वैदिक धर्माने इतके ऊंच शिखर गाठले होते की त्याची भुरळ परकीय शकांना देखील पडत होती. कार्ले येथील लेण्यातील दोघा ग्रीकांची नावे धर्म आणि सिंहध्वज अशी आहेत. तर शकाच्या एका शासकाचे नाव वृषभदत्त असे आहे. वैदिक धर्माला राजाश्रय असला तरी इतर धर्माचा देखील सन्मान केला जात होता. गौतमीपुत्राने नहपानावर विजय मिळवल्यानंतर लागलीच त्याच्या आईने म्हणजे गौतमी बलश्रीने नाशिक येथे बौद्ध भिक्षूंकरिता चैत्य व विहार खोदले होते. तसेच त्यांना कसायला एक शेत देखील दिल्याची राजाज्ञा नाशिक येथील देवी लेण्यात सापडते. कार्ले-भाजे येथील लेण्यांमध्ये गौतमीपुत्राने बौद्ध श्रमणांच्या धार्मिक कार्यासाठी विहार खोदून दिले होते. बौद्धांच्या उपजीविकेसाठी ठराविक निधी राजकीय खजिन्यातून देण्याची व्यवस्था केली होती. धार्मिक सहिष्णुतेचा पाया सातवाहनांनीच भारतामध्ये घातला असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.
स्थापत्य कलेमध्ये सातवाहनांनी महाराष्ट्राला एका वेगळ्याच उंचीवर नेले होते. कार्ले येथील विहाराच्या प्रवेशद्वारावरील नेत्रदीपक नक्षीकाम पाहिल्यावर याची खात्री पटते. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील ८,९,१०,१२ व १३ क्रमांकाच्या लेण्या याच कालखंडातील आहेत. भारतीय चित्रकलेमधील प्राचीन चित्रकला जी ९ व १० क्रमांकाच्या लेण्यांमध्ये आहे ती याच कालखंडातील आहे. सातवाहन राजांनी अनेक गड किल्ल्यांची निर्मिती आपल्या कालखंडामध्ये केली होती. हेच गड-किल्ले पुढील शिलाहार व राष्ट्रकूट वंशी राज्यांनी वापरले. छत्रपती शिवरायांनी ज्या गड-किल्ल्यांच्या जोरावर हिंदवी साम्राज्य उभे केले त्यातील काही किल्ले हे कदाचित सातवाहन स्थापित असतील !
साहित्य, स्थापत्य, शिल्पकला याबरोबरच व्यापार-उद्योग, धार्मिक समन्वय आणि सुनियोजित शासन व्यवस्था अशा अनेक कसोट्यांवर सातवाहन घराण्याने महाराष्ट्राला जागतिक पटलावर सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले होते. महाराष्ट्र दिन साजरा करताना या सुवर्ण इतिहासाचे स्मरण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे!!

संदर्भ ग्रंथ- १. सातवाहन कालीन महाराष्ट्र (रा. श्री. मोरवंचीकर)
२. प्राचीन भारताचा इतिहास (जी. बी. देगलूरकर)
३. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख (डॉ. वा. वि.मिराशी)

कथा ब्राम्ही लिपीची...!!!

 





कथा ब्राम्ही लिपीची...!!!
महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याचदा डोंगर भटकंती दरम्यान इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत असतो या पाऊल खुणा शोधत असताना आपल्या नजरेला बऱ्याच गोष्टी येत असतात जसे कि वीरगळ, गद्धेगाळ, कोरीव लेण्यांमध्ये असलेले महत्वाचे शिलालेख तसेच किल्यांवर आढळणारे शिलालेख हा सर्व ऐतिहासिक ठेवा इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो.
अश्याच एक ऐतिहासिक ठेवा म्हणजे 'ब्राम्ही लिपी' मधले शिलालेख हे शिलालेख आपल्याला बऱ्याचदा लेण्यांच्या भिंतीवर, लेण्याच्या टाक्यावर, लेण्याच्या विहारात किंवा खाबांवर कोरलेले आपल्याला मिळतात अश्या या ब्राम्ही लिपीच्या शिलालेखांमधून आपल्याला प्राचीन भारताची संस्कृती समजण्यास मदत होते किंवा त्या काळातील एखाद्या व्यक्तीचे नाव समजायला आपल्याला मदत होते अश्या या ब्राम्ही लिपीचा इतिहास देखील मजेशीर आहे. ही ब्राम्ही लिपी वाचण्याचा शोध कसा लागला हे समजणे देखील खूप महत्वाचे आहे.
एखाद्या लेण्यामध्ये तसेच जे कोणतेही आजच्या काळामध्ये ब्राम्ही लिपीमध्ये लिहिलेले लेख सापडतात ते वाचायचे कसे किंवा त्याचा अर्थ काय या गोष्टीचा शोध हा इ.स. १८३४ साली ईस्ट इंडिया कंपनी मध्ये धातू तपासनीस म्हणून काम करणाऱ्या 'जेम्स प्रिन्सेप' या इंग्लिश माणसाने सांगितले आहे. या ब्राम्ही लिपीचा इतिहास हा फार मजेशीर आहे.
इ.स.पू. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या प्रदेशावर ग्रीक राजे राज्य करीत होते या ग्रीक राजांनी स्वतःची स्वतंत्र नाणी पाडली होती. या ग्रीक कोरीव नाण्यांवर या ग्रीक राजांनी आपली नावे ही ग्रीक लिपी आणि ब्राम्ही लिपी मध्ये लिहिली होती 'बॅॅसिलीऑस पॅॅन्टॅॅलिआॅॅन' या नावाबरोबर या राजाने आपले नाव 'रजने पतलवष' असे नाव ब्राम्ही लिपी मध्ये लिहिले होते हे नाण्यावरून आढळून आले आणि ब्राम्ही लिपी वाचता यायला लागली.
या ब्राम्ही लिपीच्या वाचनाची उदाहरणे द्यायची झाली तर शाहबाज गढी येथील पियदसिच्या लेखामध्ये 'अंतियोक' म्हणजे सिरीयाचा 'दुसरा अँँन्टिओकस' आहे असे आढळून येते तसेच तुरमाय म्हणजे इजिप्त या देशाचा राजा 'टॉलेमी' हा असून 'अलीकसुंदर' हा इपिटरचा 'अॅॅलेक्झांडर' होय हे जेम्स प्रिन्सेप याने सांगितले आहे हे सर्व दुसऱ्या देशातील राजे भारतामधील महान 'सम्राट अशोक' याचे समकालीन होते.
या ऐतिहासिक ब्राम्ही लिपीमधून एका अरेबिक लिपिशिवाय भारतामधील सगळ्या लिपी विकसित झाल्या आहेत म्हणूनच ब्राम्ही लिपी ही संपूर्ण लिपींंची जननी आहे असे आपल्याला दिसून येते. ब्राम्ही लिपीचा महत्वाचा जुना पुरावा म्हणजे 'सम्राट अशोकाचे' प्रस्तर लेख मानले जातात. यातला एक महत्वाचा प्रस्तरलेख हा महाराष्ट्रातील मुंबई जवळील सोपारा म्हणजेच आजचे 'नाला सोपारा' येथे आढळून आला हा महत्वाचा पुरावा मुंबई मध्ये राजा शिवछत्रपती संग्रहालय येथे ठेवलेला आहे.
अशोकाने हा लेख सोपारा येथे कोरण्याचे कारण म्हणजे सोपारा हे अशोकाच्या काळापासून महत्वाचे बंदर होते हे दिसून येते. तसेच नाणेघाटाच्या गुहेमध्ये जे नागणिकेचे शिलालेख आहेत ते महाराष्ट्राच्या इतिहासातले ब्राम्ही लिपीच्या प्राचिनतेचा पुरावा देणारे पहिले शिलालेख मानले जातात. अशी ही ब्राम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या संस्कृतीची महती करून देणारी जननी आहे. असा हा ब्राम्ही लिपीचा रंजक इतिहास आपल्याला ही महत्वपूर्ण ब्राम्ही लिपी समजून घेतल्यावर आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्राचीन इतिहासाशी नाळ जोडायला मदत होते.

किल्ले दौलतमंगळ

 


किल्ले दौलतमंगळ
पोस्तसांभार :: प्राजक्ता देगांवकर
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज हे काही काळ आदिलशाहीत तर काही काळ निजामशाहीमध्ये होते. मात्र असे राहणे शहाजी महाराजांना आता मान्य नव्हते. त्यातच त्यांचे सासरे लखुजीराव जाधव व त्यांच्या तीन पुत्रांचा दौलताबादच्या किल्ल्यात निजामशहाने खून केला. त्यामुळे अर्थातच शहाजीराजे संतापले व त्यांनी निजामशाही सोडण्याचे ठरवले. शहाजी महाराजांनी एक धाडसी बेत आखला. शहाजी महाराजांनी या परकीय शाह्यांविरोधात बंड पुकारले. पुण्याची जहागिरी शहाजी महाराजांच्या वडीलांपासून त्यांच्याकडेच होती. तिथे राजांचे वाडेही होते. त्यामुळेच राजे परांड्यावरून पुण्यात आले व पुणे आणि आसपासचा प्रदेश त्यांनी भरभर ताब्यात घेण्यास सूरुवात केली. तब्बल तीनशे वर्षांनी पुण्याची भूमी स्वतंत्र झाली. आदिलशहाला हे समजताच त्याने रायाराव नावाचा मराठी सरदार महाराजांवर पाठवला. आदिलशाहीच्या फौजा पुण्यात घुसल्या. त्यावेळी जिजाबाई गरोदर होत्या. या धामधुमीत त्रास नको म्हणून शहाजी महाराजांनी त्यांना सुरक्षित अशा किल्ले शिवनेरीवर ठेवले.
इकडे आदिलशाहीच्या फौजांनी पुण्यात धुमाकूळ घातला. कत्तली करीत त्यांनी आगी लावण्यास सुरुवात केली. शहाजी राजांचे वाडे पेटले. जीव वाचवण्यासाठी लोक वाट मिळेल तिकडे पळत होते. पुण्याच्या तटबंदी व वेशी सुरुंगांनी उडवल्या गेल्या आणि दहशत बसावी म्हणून पुण्यातून गाढवाचा नांगर फिरवला गेला.
त्यावेळी विजापुरी सरदार मुरार जगदेव याने पुणे प्रांताचा मुलकी आणि लष्करी कारभार बघण्यासाठी पुण्याचे ठाणे सिंहगड रांगेतील भुलेश्वराच्या डोंगरावर नेले. तेथे प्राचीन हेमाडपंथी मंदिराच्या भोवताली तटबंदी उभारून किल्ला बांधला व त्याचे नाव ठेवले दौलतमंगळ. भुलेश्वर मंदिराच्या दक्षिणेस श्रीमंगळाई देवीचे मंदिर आहे त्यावरून या किल्ल्याला दौलतमंगळ असे नाव पडले असावे. अहमदनरच्या बाजूने पुरंदरवर हल्ला करणाऱ्या शत्रूस पायबंद बसावा म्हणूनच मुरार जगदेवाने हा किल्ला बांधला असावा.
मुरार जगदेव हे आदिलशाही दरबाराचे मोठे सरदार होते. त्यांना ' महाराजाधिराज ' अशी पदवी होती. त्यांचे आणि शहाजी महाराजांचे संबंध अतिशय जवळचे होते. पुणे प्रांतावर मुरार जगदेवाचा अंमल १६२९ ते १६३४ पर्यंत होता. याच दरम्यान १६३३ मध्ये आलेल्या सूर्य ग्रहणाच्या वेळी भीमा - इंद्रायणीच्या काठी नागरगाव येथे मूरार जगदेवाची तुला झाली. या वेळी स्वतःहा शहाजी महाराज उपस्थित होते. या ठिकाणी तुळा झाली म्हणून गावाचे नाव तुळापुर पडले.
पुढे आदिलशाहीसाठी झटणाऱ्या मुरार जगदेवाला आदिलशहाने कैद केले आणि ऑक्टोबर १६३५ मध्ये त्याची जीभ छाटून शहरातून धिंड काढली व नंतर तुकडे तुकडे करून ठार मारले. शहाजी महाराजांना मदत करणाऱ्या आणि दौलतमंगळ किल्ल्याची निर्मिती करणाऱ्या मुरार जगदेवाचा दारुण अंत झाला.
मुरार जगदेवाच्या मृत्यू नंतर सुद्धा पुणे प्रांताचा कारभार काही वर्षे दौलतमंगळ वरूनच सुरू होता. मात्र नंतर शिवछत्रपतींनी पुण्यावरून सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे पुन्हा उभे राहू लागले. तेव्हा पुन्हा संपूर्ण कारभार पुण्यातून बघण्यास सुरुवात झाली आणि या किल्ल्याला फारसे महत्त्व राहिले नाही. नंतरच्या काळात काही हल्ल्यांमध्ये किल्ला संपूर्ण नेस्तनाबूत झाला.
दौलतमंगळ हा किल्ला म्हणून जास्त प्रसिद्ध नाही. तो प्रसिद्ध आहे हेमाडपंथी धाटाच्या मंदिरामुळे. महाराष्ट्रातील मंदिरात इतके उत्तम, सौष्ठवपूर्ण आणि प्रमाणबध्द मूर्तिकला असलेले मंदिर क्वचितच बघायला मिळते.
आज दौलतमंगळ किल्ला म्हणून फक्त एक बुरुज अस्तित्वात आहे बाकी किल्ला म्हणून एकही खूण शिल्लक नाही.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
महाराष्ट्रातील किल्ले - डॉ. द. ग. देशपांडे

वासिष्ठीपुत्र पुळुमावी

 



वासिष्ठीपुत्र पुळुमावी

गौतमीपुत्रानंतर इ.स. १३२ मध्ये त्याचा ज्येष्ठ पुत्र पुळूमावी हा राजगादीवर आला. त्याच्या आईचे गोत्र वासिष्ठी असल्याने त्याला वाशिष्ठीपुत्र म्हणले गेले आहे. काही ठिकाणी त्याचा उल्लेख ' शिवश्री पुळूमावी ' असाही येतो. त्याने जवळपास २८ वर्षे राज्य केले. सातवाहनांच्या विशाल साम्राज्यावर एकछत्री अंमल करणारा पुळूमावी हा अखेरचा सम्राट.
टोलेमी च्या भुवर्णनाप्रमाणे त्याची राजधानी होती पैठण. पुळूमावीला नावनरस्वामी, दक्षिणापथेश्वर, दक्षिणापथस्वामी अशी बिरुदे लावलेली दिसतात.
त्याच्या कारकीर्दीत पूर्व आणि पश्चिम माळवा, काठेवाड आणि राजपुतान्याचा प्रदेश पश्चिमीक्षत्रपांनी जिंकून घेऊन क्षत्रपराजा रुद्रदामन याने दक्षिणापथस्वामी पुळूमावी याचा दोनदा पराभव केला. तथापि रुद्रदामान आणि पुळूमावी याचे जवळचे नाते असल्यामुळे रुद्रदामनला समेट करावा लागला. रुद्रदामनची कन्या पुळूमाविची पत्नी होती. गौतमीपुत्र सातकर्णी नंतर काही काळासाठी सातवाहन व क्षत्रप राजांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते, त्याच काळात हा विवाह झाला असावा. क्षत्रप - सातवाहन विवाहाला राजकीय महत्वाबरोबरच संस्कृतिक महत्त्व देखील होते. रुद्रदामनची कन्या पुळूमाविची पट्टराणी होती. त्यामुळे सातवाहनांच्या चालिरीतीमध्ये, वेशभूषेमध्ये, केशभूषेमध्ये फार मोठा फरक झालेला दिसतो. पुळूमावी त्याच्या नाण्यांवर ग्रीक - रोमन राजपुत्रा सारखा दाखवलेला असून नाणेही ग्रीक - रोमन नाण्यांसारखे जोडभाषेत काढण्यात आले आहे.

उत्तरेतील सत्ता गेली तरी पुळुवामीचे राज्य महाराष्ट्र, कोकण, वऱ्हाड, आंध्र ते दक्षिणेस पाँडिचेरी पर्यंत पसरले होते. नंतरचे क्षत्रपांचे हल्ले पुळूमाविने परतवून लावले. या सोबतच दक्षिणेतील कुंतलचा विस्तृत प्रदेश त्याने जिंकून घेतला आणि दक्षिण भारतावरील आपली सत्ता मजबूत केली. गौतमीपुत्र सातकर्णीच्या क्षत्रपांविरुद्धच्या अभियानामध्ये पुळूमाविने मोठी कामगिरी बजावल्याचे दिसते. प्रतिष्ठान ही त्याची आवडती राजधानी होती. क्षत्रपांनी आक्रमणात पैठणची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे दिसते. पैठण मध्ये क्षत्रपांची नाणी आणि ते ओतण्याचा साचा देखील मिळालेला आहे त्यावरून पैठण हे काही काळ क्षत्रपांनी जिंकून घेतले होते असे दिसते. नंतर पैठण जिंकून घेऊन पुळूमाविने नव्याने घडी बसविल्याचे दिसते.
क्षत्रपांच्या धर्तीवर स्वतःचा मुखवटा असलेली प्राकृत व द्राविडी भाषेतील नाणी त्याने प्रचारात आणली. पैठण येथे अशी नाणी मिळालेली आहेत. इथे सापडलेल्या नाण्याच्या दगडी साच्यात पुळूमाविचे भिन्न वयातील तीन मुखवटे कोरलेले आहेत ( तरुण, मध्यम, वृद्धत्व). गरूडा सारखे बाकदार नाक, किंचित पुढे आलेला खालचा ओठ आणि भारदस्त चेहेरा ही त्याच्या व्यक्तिमत्वाची वैशिषट्ये उठून दिसतात. त्यानेही रोमन राजपुत्रा प्रमाणे आपले केस मोकळे ठेवले असून भोवती रत्नांचा पुंजका असणारी रिबीन बांधलेली आहे. हा क्षत्रपांच्या संपर्काचा परिणाम असावा.

पुळूमावी हा महाराष्ट्राच्या समृध्द कारकीर्दीचा शेवटचा राजा म्हणता येईल. पुळूमावी नंतर सातवाहन साम्राज्याचे विभाजन झाले असावे. महाराष्ट्रात स्कंद सातकर्णी तर आंध्र प्रदेशात वाशिष्ठीपुत्र सत्करणीने राज्य केले असावे असे त्यांच्या नाण्यांवरून दिसते.

- प्राजक्ता देगांवकर

संदर्भ
१) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) मुसलमानपूर्व महाराष्ट्र महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास - वा. कृ. भावे

मुरार जगदेव.


 मुरार जगदेव.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचायला सुरुवात केल्यावर राजमाता जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांच्या बरोबर शिवरायांच्या प्रथम पुणे भेटीचा प्रसंग आपल्याला वाचायला मिळतो.इ.स.१६३६ मध्ये शिवरायांनी जेव्हा पुण्यात प्रवेश केला त्यावेळी त्यांना विजापूरकर आदिलशाही फौजेने सहा वर्षांपूर्वी पुण्याचा केलेला विध्वंस बघायला मिळाला.इ.स.१६३० च्या पावसाळ्यात शहाजहान बादशाहच्या मदतीस धावलेल्या आदिलशाहने मुरार जगदेव,रणदुल्लाखान.कान्होजी जेधे, राया राव वगैरे सरदाराना शहाजी राजांच्या जहागिरीवर विजापुरी फौजेसह रवाना केले होते. त्यावेळी मोगल( शहाजहान ) व निजामशाही यांतील संघर्षात शहाजी राजे निजामशहा च्या बाजूने होते तर आदिलशाह मोगलांच्या बाजूने होता.

 मुरार जगदेवाने ‘ पुणे कसबा वस्ती जाळून गाढवाचा नांगर पांढरीवर ( नागरी वस्तीवर )धरिला.पुण्याचा कोट पाडून शाहजीचे वाडे जाळिले व लुट केली;आणि भुलेश्वराच्या डोंगरावर दौलत मंगळ किल्ला बांधून तेथून पुणे परगण्याचा कारभार आदिलशाह कडून चालावा अशी व्यवस्था ठरविली.’ तसेच रस्त्यावर जमिनीत एक लोखंडी पहार ठोकून तिच्यावर फाटक्या तुटक्या वहाणांचे आणि जोड्यांचे तोरण  टांगले ज्यातून ध्वनित करावयाचे होते कि आता हे गाव बरबाद करण्यात आले असून पुन्हा ते कुणी आबाद करण्याचा प्रयत्न करू नये,तसे केल्यास तो शाही अपराध समजला जाईल.

 आदिलशाही फौजांनी विद्रूप केलेल्या पुण्याचा चेहरा मोहरा बदलुन पुन्हा पूर्वीच्या वैभवशाली पुण्याच्या  पुनर्निर्मितीसाठी जिजामाता व दादोजी कोंडदेवांनी विविध उपाय योजना करून पुण्याला पूर्वीची शान प्राप्त करून दिली. त्याचा श्रीगणेशा गाढवाचा नांगर फिरवलेल्या पांढरीत अस्सल सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने जमीन नांगरून करण्यात आला होता.

अशा रीतीने आपल्याला मुरार जगदेवांचे नाव माहित पडते.हे मुरार जगदेव कोण,कुठले होते,त्यांची मराठ्यांच्या इतिहासात दखल घेण्यासारखे कुठले कार्य,कामगिरी बजावली होती, ( सुरुवातीस नमूद केलेले पुणे विध्वंसाचे कृत्य सोडून ) ,इ.प्रश्न बरेच दिवस माझ्या मनात घोळत होते. मराठ्यांच्या इतिहासावरील माझ्या संग्रही असलेली पुस्तके वाचल्यावर मुरार जगदेव यांच्या विषयी मिळालेली माहिती संकलीत करून समूहातील सदस्यांच्या माहितीसाठी सादर करत आहे.

 मुरार जगदेव यांचे मूळ गाव धोम ( सातारा ) हे होते.आपल्या कुशाग्र बुद्धी व स्वामी निष्ठेच्या जोरावर ते आदिलशाहीत वजीर समतुल्य अधिकार,प्रतिष्ठा असलेल्या पदावर जवळपास पंचवीस वर्षे टिकून राहिले.ते अत्यंत  धार्मिक वृत्तीचे असून त्यांना आदिलशाहने ‘ महाराज राजाधिराज ‘ ह्या पदवीने गौरविले होते..ऐतिहासिक लिखाणात त्यांचा मुरारी पंडित,मुरार पंडीत ह्या नावांनी पण उल्लेख केलेला आढळतो. मुरार जगदेव यांचे विजापूर दरबारात अनन्य साधारण महत्व होते.पण ते हिंदू व धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांना विजापूर दरबारात छुपे शत्रू पण बरेच होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.१६३० मध्ये झाला.तेव्हा शहाजी राजे आपल्या आयुष्यातील अत्यंत अस्थिर राजकीय वाटचाल करत होते.मलिक अंबरचा मृत्यू,मुर्तजा निजामशहा ने लखोजी जाधव ( जिजामाता यांचे वडील ),त्यांचे दोन पुत्र अचलोजी व रघुजी,नातू यशवंतराव यांची भेटीस बोलावून विश्वासघाताने केलेली हत्त्या,शहाजहान च्या प्रबळ फौजांकडून निजामशहावर होत असलेली आक्रमणे,तात्कालिक स्वार्थासाठी आदिलशहा च्या नेहमी बदलणाऱ्या भूमिका,निजामशाहीतील अंतर्गत हेवेदावे,वगैरे कारणांमुळे शहाजी राजांचे चित्त पण कुठे  स्थिर होत नव्हते.त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द निजामशाही, ( अहमदनगरची,हैदराबाद निजामशाहीशी काही संबंध नाही.)आदिलशाही,निजामशाही,मोगल,निजामशाही ह्या विविध शाह्यांमध्ये गेली.शहाजी राजांच्या आदिलशाहीतील प्रवेश व तेथील दरबारी राजकारणात टिकाव लागण्यामागे मुरार जगदेव यांची मोठी भूमिका होती. या संबंधात जेधे शकावलीत म्हटले आहे कि,’ शके १५५८ शहाजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी ईदलशहाकडून झाली.सरंजामास मुलुख दिल्हे त्यात पुणे देश राजांकडे दिल्हा.त्यांनी आपले तर्फेने दादाजी कोंडदेउ मलठणकर यांसी सुभा सांगून पुणीयास ठाणे घातले,तेव्हा सोन्याह नांगर पांढरीवर धरिला,शांती केली....’

कालौघात मुरार जगदेव आणि शहाजी राजे यांचे सख्य,मैत्री इतकी वाढली कि मुरार जगदेवानी पुणे जाळल्याच्या  घटनेचे शल्य विसरून शहाजी राजे मुरार जगदेवांच्या तुलाविधीस स्वतः जातीने हजर राहिले.भाद्रपद वद्य अमावस्येच्या दिवशी—२३ सप्टेंबर १६३३—सूर्यग्रहण होते.या दिवशी पुण्यापासून दहा कोस अंतरावरील भीमा व इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेल्या नागरगावी सोने,रूपे,धान्य आदी चोवीस पदार्थांनी मुरार जगदेवांची तुला करण्यात आली.( एका पदार्थाने एकदा,म्हणजे एकूण चोवीस वेळा.) अल्लाउद्दिन खिलजीने हिंदू धर्मीय यादवांचे राज्य बुडविल्या नंतर च्या तीनशे वर्षांत वेद्घोषात झालेला हा पहिला तुलाविधी होता.ह्या तुला विधीमुळे नागरगाव चे नवीन नांव ‘ तुळापुर ‘ झाले.

नागरगाव इथे तुला करण्याचे एक कारण असे पण सांगितले जाते कि मुरार जगदेवांच्या अंगावर कुष्ठ उठले होते ज्यामुळे ते फार दुःखी झाले होते.नागरगाव इथे रुद्रनाथ नावाचे सत्पुरुष होते.त्यांच्या दर्शनाने व भीमा इंद्रायणी नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने त्यांचे दुखणे बरे झाले.त्या प्रीत्यर्थ मुरार जग्देवानी त्या ठिकाणी संगमेश्वर म्हणून देवालय बांधले.

शहाजी राजे,मुरार जगदेव,रणदुल्लाखान,व अन्य आदिलशाही सरदारांनी उत्तरेकडून शहाजहान पुत्र शुजा,दस्तुरखुद्द मोगल सेनापती महाबतखान यांच्या नेतृत्वाखाली चालून आलेल्या मोगली फौजांची परीन्ड्याच्या आजूबाजूस  कोंडी करून त्यांची रसद तोडून त्यांना दाती त्रूण धरून शरण येण्यास भाग पाडले.विजयाची आठवण  म्हणून मुरार जग्देवानी जगप्रसिद्ध मुलुख मैदान तोफ जिचे वजन ५५ टन होते व अहमदनगर इथे निजामशाहीत ओतली ( बनवली ) गेली होती,विजापूरला नेली.त्यासाठी ४०० बैल,१० हत्ती तसेच शेकडो सैनिकांचा उपयोग करावा लागला.भीमा नदीतून नेताना तिची नावच बुडाली,जी पुन्हा बाहेर काढण्यासाठी अतोनात कष्ट,मेहनत घ्यावी लागली.अखेरीस २९ सप्टेंबर १६३२ रोजी हे प्रचंड धूड विजापुरात पोहचले. ‘ धूळधाण ‘ नावाची अजून एक अवजड तोफ मुरार जग्देवानी मुलुख मैदान तोफेबरोबर विजापूरला नेण्याचे प्रयत्न केले पण तोफ  वाहून नेणारा तराफा भीमा नदीत बुडाल्याने धूळधाण तोफेस पण जलसमाधी मिळाली व काढता आली नाही.

आदिलशाहीची प्रदीर्घ सेवा करूनही मुरार जगदेवांचा शेवट मात्र फारच करुणास्पद झाला.विजापूर दरबारात खवासखान म्हणून वजीर होता.त्याचे व आदिलशहाचे काही कारणांवरून संबंध बिघडले.मुरार जगदेव व खवासखान एक विचाराने,एक दिलाने काम करणारी जोडी होती.खवास्खानाने इ.स.१६३५ मध्ये शहाजहान कडे गुप्त रीतीने वकील पाठवून शहाजहान ला मोगली फौजा विजापूरवर धाडण्याचा सल्ला दिला. त्या फौजेस लागणारी मदत आपण करू जेणेकरून विजापूर राज्य मोगलांना जिंकता येयील असा भरोसा पण दिला.खवासखानाच्या हालचाली विजापूरचा सुलतान महमद शहा यास कळल्यावर त्याने प्रथम खवासखानाची हत्त्या केली.( ऑक्टोबर १६३५ ).त्यानंतर एक महिन्याने मुरार जगदेवाना पण कैद करून,त्यांची जीभ छाटून,हात पाय मोडून विजापूर शहरातून धिंड काढून त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले.

अशा तऱ्हेने एका कर्तृत्वशाली व्यक्तीचा शोचनीय शेवट झाला.सत्तेच्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या सेवाकाळात घेतलेल्या भूमिकांमुळे अशा व्यक्तींना प्रसंगी प्राणास हि मुकावे लागल्याची भरपूर उदाहरणे इतिहासात सापडतात.

संदर्भ: ( १ ) मराठी रियासत..गो.स.सरदेसाई,खंड एक.

      ( २ ) राजा शिवछत्रपती ...पूर्वार्ध..लेखक बाबासाहेब पुरंदरे

      ( ३ ) मराठ्यांचा इतिहास..खंड पहिला.संपादक ग.ह.खरे आणि अ.रा. कुलकर्णी

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...