विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label अटकेवर झेंडे. Show all posts
Showing posts with label अटकेवर झेंडे. Show all posts

Wednesday, 30 August 2023

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...भाग ७

 

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे


भाग ७
ही मेहनत करायचे दादा अर्थातच मनावर घेतल्याशिवाय राहिला नाही, अबदालीच्या शहाजाद्याविरुद्ध शीख सरदार अलासिंग जाट आणि आदिनाबेग मोगल यांनी संघर्ष जारी ठेवला होता. राघोबा त्यांच्या मदतीसाठी लाहोरकडे रवाना झाला. मानाजी पायगुडे व आदिनाबेग थेट लाहोरवर चालून गेले. मराठ्यांची धास्ती घेऊन तैमूरशहा व जहानखान यांनी पलायनाचा मार्ग चोखाळला. ही घटना 20 एप्रिल 1758 रोजी घडली. पळपुट्या पठाणांचा मराठ्यांनी चिनाब नदीपर्यंत पाठलाग केला. आपले सामान तेथेच (वजिराबाद) टाकून पठाणांनी पळण्याचा वेग वाढवला व अटकपार करून काबुल गाठले.
दरम्यान, राघोबाने लाहोरचा कब्जा घेतला. तेथील मोगलांच्या प्रसिद्ध शालिमार बागेतील वाड्यात मराठी सैन्याचा शाही पाहुणचार आदिनाबेगने केला. मोठा दीपोत्सव करण्यात आला. त्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च झाला.
4 मे 1758ला रघुनाथराव दादाने नानासाहेब पेशव्यांस लिहिलेल्या पत्रातून काही गोष्टींचा स्वच्छ उलगडा होतो.
""लाहोर, मुलतान, काश्मीर वगैरे अटकेअलीकडील सुभ्यांचा बंदोबस्त करून अंमल बसवावा. त्यास काही झाला, काही होणे, तोही लौकरच करितो. तयमूर सुलतान व जहानखान यांचा पाठलाग करून फौज लुटून घेतली. थोडीशी झडतपडत अटकेपार पिशावरास ते पोहचले.''
दरम्यान, अहमदशहा अबदालीचा पुतण्या पुणे दरबारात नानासाहेब पेशव्यांच्या भेटीस गेला होता. अबदालीविरुद्धच्या राजकारणात त्याचा उपयोग करून घ्यावा या उद्देशाने नावाने त्याला राघोबाकडे पाठवला होता. त्यावर राघोबा लिहितो ः ""इकडून जोरा पोहचवून सरकारचा अंमल अटकेपार करावा. त्याचा पुतण्या व दौलतेचा वारस स्वामीपाशी देशास आला, तो स्वामींनी आम्हाकडे पाठवित होता. त्यास अटकेअलीकडे थोडीशी जागा बसावयास देऊन अटकेपार काबूल पिशावरचा सुभा देऊ.''
यांचे मनसुबे आता असे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे होते. त्यांची उमेद रूमशाम उर्फ कॉन्स्टन्टिनोपलपर्यंत झेप घ्यायची होती.

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...भाग ६

 

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे


भाग ६
दरम्यान, यथेच्छ लुटालूट करून अहमदशहा अबदाली काबुलास परतला. शाहजादा तैमूरशहा व जहानखान यांस त्याने लाहोरात ठेवले. पातशहा आलमगिराच्या मुलीशी तैमूरशहाचा निकाह लावून पंजाबचे राज्य त्याच्या नावे चढविण्याचा उपद्‌व्यापही त्याने जाताना केला. हे सर्व निस्तरण्याची जबाबदारी आता मराठ्यांवर आली. त्यासाठी निघालेला रघुनाथराव 11 ऑगस्ट 1757 रोजी दिल्लीदाखल झाला. अबदालीच्या वतीने दिल्लीचा कारभार पाहणाऱ्या नजीबखानास मराठ्यांनी पंधरा दिवसांत जेरीस आणले. विठ्ठल शिवदेव विंचूरकर या सेनानीने नजीबास पकडून दिल्लीचा ताबा घेतला.
दिल्लीतील अबदालीच्या नजीबादि हस्तकांना काढून टाकून पूर्ववत व्यवस्था केल्यानंतर राघोबाने नानासाहेबांस लिहिले ः ""बावीस सुभ्यांपैकी दक्षिण, माळवा, गुजरात, आगरे, अजमीर हे सहा आपणाकडे आलेच आहेत. लाहोर प्रांती अटकपावेतो सहा सुभे अबदालीकडे आहेत. प्रयागचा कराकुडा, अंतर्वेद पहिलीच आपल्याकडे आहे. राहिले चार अयोध्या, बंगाल, पटणे, दिल्ली. त्यात दिल्लीखालील एक करोडीचा मुलूख सरहिंदपावेतो प्रस्तुत तेशी नव्वदपावेतो वसुलीच आहे. पैकी नि महाल दोचौ दिवसांत वाटून मिळतील. बंगालचे दरसाल पातशहास चौपन लक्ष येतात ते व अयोध्या दोन जागे निमेनीम घ्यावे. बाकी जाट तरी आगरे सुभ्यात आला. मेहनत केली तर लाहोरदेखील सुटावयाजोगे आहे.''

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा.भाग ५

 

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे

भाग
उत्तरेत गेले; तेव्हा त्यांचे कोणी पायघड्या घालून स्वागत केले, असे समजायचे कारण नाही. दिल्लीच्या राजकारणात त्यांचा प्रवेश नको असणाऱ्यांचाही प्रबळ गट होताच; पण त्याला पुरून उरून मराठ्यांनी आपले सामर्थ्य आपल्या तलवारीच्या जोरावर सिद्ध केले. परिणामतः मराठे हेच रोहिले व अबदाली यांच्यापासून आपला बचाव करू शकतील, अशी खात्री पटल्यामुळेच मराठ्यांना पातशाही सनदा मिळाल्या व त्यामुळे त्यांना मुलतान, पंजाब, सिंध, राजपुताना, रोहिलखंड यांच्यासह मोगल साम्राज्याच्या सर्व सुभ्यांवरील चौथाईचा हक्क प्राप्त झाला. सार्वभौम सत्तेला करारानुसार महसूल देण्यास नेहमीच टाळाटाळ करण्यास सोकावलेल्या स्थानिक सत्ताधिशांना मराठे न आवडण्याचे कारण हेच होय. बळाचा उपयोग करून वसुली करण्याचे सामर्थ्य मराठ्यांमध्ये होते, हे वेगळे सांगायला नकोच; मात्र मराठ्यांचे सामर्थ्य कितीही असले, तरी दिल्ली आणि उत्तरेतील मराठ्यांच्या फौजा इतक्या प्रबळ नव्हत्या, की दक्षिणेतून कुमक न मागवता त्यांना अबदालीसारख्याचा प्रतिकार करता यावा. पहिल्यांदा हेच घडले. अंताजी माणकेश्वरासारखा दिल्ली प्रदेशातील मराठा सरदार अबदालीपुढे काय करणार? अबदालीने दिल्ली व आसपासचा प्रदेश लुटला. बादशहा व त्याच्या कुुटंबियांची विटंबना केली. हिंदूधर्मियांची सरसकट कत्तल केली. पंजाब-लाहोर प्रांत आपल्या घशात घातले. 1755च्या सुरवातीची ही घटना आहे. अंताजीने नानासाहेब पेशव्यांस लिहिले ः ""पातशहा रात्रंदिवस म्हणे, की हे पातशहात बाळाजी रायाची आहे, त्याचे सरदारांस सत्वर बोलावून हे काम सिद्धीस नेणे.''

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा.भाग ४

 

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे

भाग ४
निजामाचा कायमचा निकाल पेशव्यांना लावता आला नाही, हे खरे आहे; पण त्याला एका मर्यादेत रोखून धरण्यात त्यांना यश आले, हेही तितकेच खरे आहे. उत्तरेत मात्र मराठ्यांच्या अभावी उत्पन्न झालेल्या निर्नायकीचा फायदा चुकीच्या शक्तींनी घेऊन हिंदुस्थानचा राजकीय नकाशाच बदलून टाकला असता. बंगालची दिवाणी घेताना इंग्रजांनी दिल्लीचे रक्षण करण्याचे कबूल केले असूनही अबदालीच्या आक्रमणाच्या वेळी ते स्वस्थ व पर्यायाने सुरक्षित राहिले. उलट मराठ्यांनी लाहोर-मुलतानच्या भानगडीत पडून व पानिपतवर धाव घेऊन नुकसान करून घेतले, असा हिशेब मांडणारे शेजवलकर, जेव्हा मराठे जेथपर्यंतच पोहचले नाहीत, तेथपर्यंत पाकिस्तानच्या सीमारेषा भिडल्या आहेत, असे सांगतात; तेव्हा त्यांच्यातील विसंगती आपली आपोआपच दृश्यमान होते.
या व्यवहाराकडे पाहण्याची मराठ्यांची वृत्ती व्यापारी फायद्यातोट्याची नसून, देश व धर्म यांच्या राहण्याची होती. त्यांच्या या कृतीला आततायी मूर्खपणा न मानता आत्मबलिदानच मानायला हवे. या बलिदानातूनच भारताचे भवितव्य घडले हे विसरता कामा नये.

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा..भाग ३

 


अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे

भाग ३
इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी पूर्वी एकदा काही कागदांचे चुकीचे वाचन केल्यामुळे गैरसमज होऊन मराठ्यांचे सैन्य चिनाब नदी ओलांडून पुढे गेलेच नव्हते, असे विधान केले होते. त्यावर विसंबून रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी जून 1943मध्ये पुण्यात भरलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एका संमेलनाचे उद्‌घाटन करताना यदुनाथांची री ओढली. तेव्हा इतिहाससंशोधक ग. ह. तथा तात्यासाहेब खरे यांनी "केसरी' व "सह्याद्री'मध्ये लेख लिहून त्याचा प्रतिवाद केला व मराठ्यांच्या पराक्रमाचे यथार्थ दर्शन घडविले. खऱ्यांनी अस्सल कागदपत्रांच्या आधारे दाखवून दिले, की मराठ्यांच्या काही तुकड्या अटकेजवळ सिंधूचे पात्र ओलांडून गेल्या व त्यांनी पेशावर येथे काही काळ मुक्कामही केला. 5 सप्टेंबर 1758 च्या एका पत्रातील उल्लेखानुसार ""पूर्वीच्या मुलुकाखेरीज लाहोरचा सुभा अटकपावेतो दो करोडाचा मुलूक या साली महाराजाचा जाला. आता पश्चमेस मुलतान-काबूल व पूर्वेस बंगाल-अयोध्या प्रयाग राहिली.'' यावरून मराठ्यांची राजकीय कार्यक्रमपत्रिका स्पष्ट होते.
यांच्या या राज्यविस्ताराची मीमांसा काही प्रमाणात याअगोदरही आपण केलेली आहे. शाहू महाराजांच्या काळात पहिला बाजीराव आणि श्रीपतराव प्रतिनिधी यांच्यात भर दरबारात झालेल्या वादाचा उल्लेखही झालेला आहे. प्रतिनिधींच्या मते मराठ्यांनी आधी दक्षिण दिशा सुरक्षित करावी व मगच उत्तरेच्या राजकारणात हात घालावा, तर उलट बाजीराव दक्षिणेचा मामला घरचा व म्हणून सोपा आहे; सबब उत्तरेच्या राजकारणास प्राधान्य द्यावे, या मताचा होता. शाहू महाराजांनी बाजीरावास अनुकूल कौल दिला व त्यानुसार मराठे उत्तराभिमुख झाले. पेशव्यांच्या या उत्तरायणावर राजारामशास्त्री भागवत व शेजवलकर यांनी तीव्र आक्षेप घेऊन प्रतिनिधींची बाजू उचलून धरल्याचे जाणकारांना ठाऊक आहेच. या धोरणामुळे निजाम बळावला हे त्यांचे निरीक्षण यथार्थच आहे; परंतु, मराठे जर उत्तरेत गेले नसते, तर संपूर्ण उत्तर हिंदुस्थान नादिरशहा किंवा अबदाली अशा धर्मवेड्या प्रवृत्तींच्या हाती गेला असता, हे ते विसरतात.

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा... भाग २


अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे



भाग २
या प्रदेशाचे वर्णन करताना शेजवलकर काहीसे भावुक झाले ः ""सिंधू नदी या भागात अटकेपासून दक्षिणेकडे व नैऋत्येकडे शुद्ध खडकातून बहू युगांच्या वाहण्याने मार्ग खोदून एकाकी काळाबादपर्यंत बिनवाळवंटी पाणातून शंभर मैल वाहत जाते. अटकेच्या दक्षिणेकडील हा भाग नदी ओलांडण्यास अत्यंत दुष्कर असा आहे. पश्चिम बाजूस उंच डोंगरांच्या ओळी असून अटकेहून पलीकडे पाहिले, म्हणजे त्यांच्या दूरवर काळ्याकभिन्न दिसणाऱ्या रांगा मनात भय उत्पन्न करतात. मी गेलो त्या दिवशी आकाश बहुतेक ढगांनी व्याप्त होते. वर विचित्र आकाराचे दाट ढग, पलीकडे राक्षसाकृती डोंगर, नदीकाठचा काळा खडक, किल्ल्याच्या तशाच भिंती, मागेही तसाच डोंगर, असे हे एकंदर दृश्य मन चरकेल असेच होते; पण याच वाटेने प्राचीन काळापासून अनेक जेते भारतवर्षात आले होते. त्यांना भय वाटलेले दिसत नाही किंवा खोल खळखळाटी नदीच्या प्रवासाने अटकही झाली नाही आणि याच दुर्लघ्य मार्गाने काही धाडसी मराठे-आपले ऐतिहासिक पूर्वज, दोनशे वर्षांपूर्वी दक्षिणेतून पंधराशे मैल घोडदौड करून, न भीता, पलीकडे वाघाच्या गुहेत त्याच्या मिशा उपटण्यास व दात मोजण्यास शिरले होते. अशी गोष्ट त्यापूर्वी अनेक शतके कोणी स्वतंत्र हिंदू जमातीने करून दाखविली नव्हती. त्यांच्या घोड्यांनी तुडविलेल्या नदीच्या खडकावर मी त्याचे चित्र आठवीत आता उभा होतो.''
अटकेपार झेंडे लावणे, ही मराठ्यांच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे. मराठ्यांच्या पराक्रमावर व कर्तबगारीवर शिक्कामोर्तब करणाऱ्या या घटनेला दुसऱ्याही एका दृष्टीने महत्त्व आहे. धर्मशास्त्राने निर्बंध घालून निर्माण केलेल्या काही चमत्कारिक रूढींपैकी "अटक' ओलांडायची नाही, ही एक होती. मराठ्यांनी अधिकृतपणे ती झुगारून लावली. विशेष म्हणजे मराठ्यांच्या या मोहिमेचे नेतृत्व रघुनाथ बाजीराव उर्फ राघोबादादा नावाचा ब्राह्मण सेनानी करीत होता. हिंदूंमध्ये ब्राह्मण जात ही अधिक रूढीप्रिय असल्याचा समजही या कृतीमुळे मोडीत निघाला. मराठ्यांची घोडी यावेळी केवळ गंगेतच नाही, तर सिंधूत न्हाऊन निघाली.

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा. भाग १

 

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे

भाग
अटकेपार झेंडे लावणे, ही मराठ्यांच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे. या घटनेला दुसऱ्याही दृष्टीने महत्त्व आहे. धर्मशास्त्राने निर्माण केलेल्या काही चमत्कारिक रूढींपैकी "अटक' ओलांडायची नाही, ही एक रुढी होती. मराठ्यांनी अधिकृतपणे ती झुगारून लावली.
इ.स. 1761 यावर्षी पानिपतच्या युद्धाची द्विशताब्दी होती. त्यानिमित्ताने प्रसिद्ध इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी पानिपतच्या युद्धावर स्वतंत्र शोधग्रंथ लिहिण्याचा संकल्प सोडला. आता असा ग्रंथ लिहिणे म्हणजे प्रत्यक्ष पानिपतच्या युद्धभूमीवर जाऊन तिचे निरीक्षण करणे क्रमप्राप्तच होते. ते त्यांनी केलेच; परंतु त्याच्याही आधी वीस वर्षे, शेजवलकर मराठ्यांच्या इतिहासातील अटक नावाच्या ठिकाणी असलेला किल्ला पाहण्यासाठी गेले होते. येथील अहमदशहा अबदालीच्या तळावर हल्ला करून त्याला पिटाळून लावल्यामुळे पानिपत जणू अपरिहार्य झाले होते.

अटकेचा किल्ला (पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमा)

 


अटकेचा किल्ला (पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमा)
२० एप्रिल १७५८ मधे तुकोजी होळकर व साबाजी शिँदे यांनी जिँकला आणि अटकेपार मराठी भगवा फडकला.
इ.स.१७५२ मधे महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानास्पद अशी घटना घडली. राघोबादादा पेशव्यांनी आताच्या पाकिस्तानात असलेल्या अटकेपर्यँत धडक मारुन मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तिथे रोवला. ही घटना तिथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक आहे. या पराक्रमावरच अटकेपार झेंडे रोवणे नावाची म्हणही अस्तित्वात आली.
१७५२ मधे अफगाणिस्तानच्या अहमदशाहा अब्दा
लीने तत्कालीन हिँदुस्तानातील लाहोर आणि मुलतान या मोगलांच्या प्रांतावर स्वारी करुन ते काबीज केले. ही बातमी पुण्यात आल्यावर मराठ्यांना करारानुसार बादशहाच्या रक्षणासाठी जाणे आवश्यक होते. त्याप्रमाणे रघुनाथराव पेशव्यांच्या पुढाकाराखाली उत्तरेची मोहीम काढण्यात आली. रघुनाथराव दिल्लीला गेले तेव्हा खुद्द बादशहानेच मराठ्यांविरुद्ध कारस्थान चालविलेले पाहुन रघुनाथरावांनी त्यास कैद केले आणि बहादुरशाहाचा एक नातु अजीजउद्दीन यास तख्तावर बसवुन व रोहीलखंडात बंदोबस्त ठेवुन ते दक्षिणेत परतले.
मराठ्यांची ही हीँम्मत पाहुन दिल्लीतले सगळे राजपुत, अफगाण, मुसमान दरबारी संतापले. पण राघोबादादा दिल्लीत असेपर्यंत ते काही करु शकले नाहीत. मराठ्यांची पाठ फिरल्यानंतर या दरबारी धेडांनी गुप्तपणे निरोप धाडुन अब्दालीला पुन्हा एकदा हिँदुस्थानात स्वारी करण्याचे निमंत्रण दिले. त्या वेळेपर्यंत अब्दालीने जिँकलेले लाहोर व मुलतान परत दिल्लीच्या बादशहाच्या हातात गेलेले होते. अब्दालीने १७५६ मधे पुन्हा स्वारी करुन ते जिँकले. दिल्लीत येऊन नवीन बादशहाला कैद केले आणि त्याच्याकडुन खंडणी वसुल केली. रघुनाथरावाने सोडविलेली मथुरा, वृंदावन हि हिँदुंची पवित्र क्षेत्रे लुटली. आधीच्या बादशहाला पुन्हा गादीवर बसवुन तो परत गेला.
हे कळताच मराठे संतापले. आता बादशहा आणि अब्दाली दोघांचे कंबरडे मोडायचे या हेतुनेच जंगी तयारी करुन रघुनाथराव पुण्याहुन निघाले. आधीच्या स्वारीचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. यावेळी दिल्ली शहरात आणि तिथल्या कारभारात गूतुन न राहता त्यांनी पंजाबात वायव्येच्या दिशेने मुसंडी मारली. पंजाबाच्या एकेक नद्या पार करीत सरहिंद येथे अब्दालीच्या समदखान या सरदाराचा ८ मार्च १७५८ ला पराभव केला. त्याहीपुढचा भीमपराक्रम म्हणजे लाहोर, मुलतान हे प्रांत काबीज करुन थेट सिंधु नदी गाठली. तिच्या तीरावरील अटक या गावी दि.१० ऑगस्ट १७५८ रोजी आपली छावणी टाकली. त्या आधीच म्हणजे २० एप्रिल १७५८ रोजी अटकेचा किल्ला तुकोजी होळकर व साबाजी शिँदे यांनी जिंकला हे मराठ्यांचे आणि कुठल्याही हिँदु आणि दक्षिण राजवटीचे उत्तर हिंदुस्थान सरहद्दी बाहेरील पहीले यश मानले जाते.
तिकडे ईराणच्या शहानेही अब्दालीचा पराभव केला आणि राघोबादादाकडे पत्रे पाठवुन मराठ्यांशी मैत्री राखण्याबद्दलची मनीषा व्यक्त केली. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याच्या शौर्याचा हा कळसबिंदु मानता येईल. इराणच्या राजाने महाराष्ट्रातल्या मराठींशी दोस्तान्याचा पैगाम पाठविणे याचा अर्थ मराठ्यांच्या पराक्रमाला, शौर्याला मिळालेली पावती आहे. मराठ्यांचा दरारा किती होता हेही या घटनेवरुन दिसुन येते. भिमथडीच्या तट्टांनी प्रथमच सिंधु नदीचे पाणी प्यायले. बखरकारांनी मराठ्यांचा हा भीमपराक्रम मोठ्य सुरसतेने वर्णन केला आहे. मानाजी पायगुडे लाहोरवर चालुन गेले परंतु तयदरशहा व जहानखान यांनी पळ काढल्याने अनायसे लाहोर मराठ्यांच्या ताब्यात आले यावरुन मराठी पराक्रमाची कल्पना येते.
पुढे त्यांनी अफगाणांचा पाठलाग करीत चिनाब गाठली. रावी, बियास एकेक नद्या ओलांडल्या. दक्षिणी फौज दिल्ली पलीकडे आली नव्हती ती चिनाब सिँधुपर्यंत पोचली. इराणच्या पातशहाची पत्रे रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर दोघांनाही आली की,
"कंदाहरी येऊन यांचे पारिपत्य करा आणि अटकेची हद्द करावी".
रघुनाथरावाने ही वार्ता पुण्यास कळविताना म्हटले की," काबुल कंदाहर अटकेपारचे सुभे हिँदुस्तानचे अकबरापासुन आलगिरापावेतो होते ते आम्ही विलायतेत का द्यावे. आम्ही कंदाहारपावेतो अंमल बसवून तुर्त त्यास गोडीचा जाब पाठवणार आहोत".
मराठी फौजा मूलतान अटकेपर्यंतचा पंचनंदचा मुलूख करून मुलूख करुन माघारी निघाल्या. पेँढारी व लष्कर कुबेर झाले. रघुनाथराव मल्हारराव यांनी मोठे यश संपादले.
(संदर्भः महाराष्ट्राच्या कालमुद्राः लेखक म. वि. सोवनी)

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...