विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label *गुंजन मावळ*. Show all posts
Showing posts with label *गुंजन मावळ*. Show all posts

Saturday, 15 May 2021

मराठा साम्राज्य भाग २

 


मराठा साम्राज्य
भाग २
भोसले, जाधव, निंबाळकर, मोरे, घोरपडे, माने, घाटगे, सावंत, शिर्के, महाडिक, मोहिते इ. मराठे सरदार निजामशाही अथवा आदिलशाहीच्या चाकरीत असल्याने लष्करी आणि मुलकी प्रशासनाचे त्यांना उत्तम शिक्षण मिळाले होते.
परंतु हे मराठा सरदार घराणे आपल्या युद्ध नैपुन्याचा आणि शौर्याचा वापर हा यवनी सत्तेच्या रक्षणासाठी करत असल्याने त्यांस स्वराज्याची आस लागणे अजुन बाकी होते. यवनी सत्ता चंद्रसूर्य असेपर्यंत टिकणारी आहे.आपले सर्व प्रकारे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य फक्त दिल्लीश्वरांचे हाती आहे,अशी सर्वत्र पराभूत मनोवृत्ती निर्माण झाली असता साऱ्यांना खडबडून जागे करण्याचे काम शिवरायांनी केले. बादशहाने मेहरबानीने दिलेल्या वतने, जहागिरी, मनसबदारी, इनामे स्वीकारण्यात भूषण न मानता स्वतःच्या पराक्रमाच्या जीवावर महाराष्ट्राची वितभर जमीन स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करा. त्यात तुम्हाला हौतात्म्य मिळाले तरी स्वतः धन्य माना, असा महामंत्र शिवरायांनी साऱ्या महाराष्ट्रीयांना दिला.

Saturday, 20 March 2021

*गुंजन मावळ*

 


*गुंजन मावळ*
महाराष्ट्रातील मावळतीच्या भागाला मावळ म्हणतात. याच बारा मावळातील संपन्न आणि दैदीप्यमान इतिहास ज्या मावळाला लाभला ते गुंजन मावळ.
राजगडच्या रामेश्वरच्या जटांतुन गुंजवनी नदीचा उगम झाला. गुंजन मावळाच्या समृद्धशाली आणि वैभवशाली पराक्रमाची घोडी याच गुंजवनी नदीच्या तिरावर फुरफुरली .
इतिहासाला परिचित -अपरिचित अनेक घराणी नदीच्या दुतर्फा नांदत आहेत. अनेक महासत्तांनी राज्य केलेल्या खुणाही आढळतात. मढे घाट , बिरमदेवाच्या किल्ल्याच प्राचीन उल्लेख , महुरीचे अमृतेश्वराचे मंदिर , प्राचीन पाण्याच्या टाक्या ह्या सर्व गोष्टी वर्षानुवर्ष बदलत गेलेल्या राजसत्तांच्या वैभवाची प्रतीक आहेत.
बारा मावळातील गाजलेल्या देशमुखीच्या तंट्यातील मुजोर रगील घराण्यांची हातघाई याच गुंजवणीच्या तिरावर घडल्या.
त्याचा न्यायनिवाडा खुद्द थोरल्या *राजश्री स्वामिनी अमृतेश्वराच्या मंदिरात केला.
शिळीमकर - चोरघे , शिळीमकर - कोंडे , शिळीमकर - शिंदे
ह्या घराण्यात गुंजन मावळाच्या देशमुखीसाठी प्रचंड वाद झाले होते.
इतिहास लेखनाबाबत गुंजन मावळ उपेक्षित राहिल. इथल्या प्रत्येक गावात , शिवारात इतिहास घडलाय. ओढ्या काठी , वीरान माळावर , गावकुसाच्या शिवारात , प्राचीन शिवालयांच्या बाहेरील समाध्या , वीरगळी सतिशीळा साक्ष आहेत इथल्या पराक्रमी योध्याच्या पराक्रमाच्या.
शिवकालीन गुंजन मावळाच्या घडामोडी पूर्व - आग्नेय दिशेला सर्वाधिक घडल्या. बोरावळे , विरवाड़ी , कुरंगवड़ी , वांगणी , केतकावने , हतवे ,तांभाड , वडगाव झांजे. ह्या गावांमध्ये गुंजन मावळातील ऐतिहासिक कुलीन घराण्यांच्या शाखा आजही नांदतात.
ह्याच कुलीन शिवकालीन घराण्यांच्या इतिहास नवीन लेखात पाहू.
क्रमशः
राजधानीचं मावळ
गुंजन मावळ

गुंजन मावळ मढे घाट

 

गुंजन मावळ
आजच्या लेखात आपण गुंजन मावळातील एका प्राचीन घाटमार्गाबद्दल माहिती घेणार आहोत.
सातवाहन कालखंडात युरोप किंवा आखाती देशांतून होणारा व्यापार हा बंदरातुन कोकणमार्गे घाटावर येत असे आणि त्यानंतर देशभर मोठमोठ्या व्यापारी शहरामध्ये हा माल पोहचवला जात असे.
ह्या सर्व गोष्टींला ठराविक कालावधी लागत असे, त्यासाठी सातवाहन राजवटीत अनेक ठिकाणी लेणी , पाण्याच्या टाक्या , विसाव्यासाठी गुहा खोदन्यात येत होत्या.मढे घाट मार्गावरून होणारा व्यापार पैठण ला जात असे. महाड बंदरातून व्यापार

मढे घाट वर चढून येऊन घाटावार येत असे. गुंजन मावळातील मंजाई आसनी , दामगुड़ा आसनी , मार्गासनी ही गावे ह्याच व्यापारी मार्गावरील आहेत. विसाव्या साठी ह्या गावांमध्ये थांबा होता. मार्गासनी मार्गे विंझर खिंडीतून आल्यानंतर समोरच्या वांगणीच्या डोंगरावर काही टाक्यांचा समूह असून एक प्रशस्थ तळघर आहे. या ठिकाणी टेहळनी करण्याचे ठिकाण असु शकते. तर वांगणी - रहाटवडे खिंडी मध्ये एक खोदीव टाकं आहे. त्याच मार्गे पुढे गाऊडदरा गावामध्ये विसाव्यासाठीच्या गुहा आहेत.
ह्या घाटमार्गावरुन येणाऱ्या व्यापाऱ्यांला राजाश्रय तर होताच पन त्याच संरक्षण करण्याची जबाबदारी किल्ल्यांची होती.
शिंदे घराणे प्राचीन काळापासून गुंजन मावळात वस्ती करून आहे. मढे घाटमार्गाचा नीट अभ्यास केल्यास जाणवत की ह्या घाटमार्गावर ठिकठिकाणी शिंदे घराण्याच्या वस्त्या आहेत. गुंजन मावळात अशी मोजकीच घराणी आहेत जी प्राचीन काळापासून वस्ती करून आहेत. त्यात शिंदे , पानसरे ,चोरघे , बिरामने (शेलार) ही घराणी प्रामुख्याने दिसतात.
गुंजन मावळाला शिवकाळात सुवर्ण दिन होतेच, पन प्राचीन राजवटीमध्ये गुंजन मावळ तितकचं समृद्ध दिसते.
उगाच नाही छत्रपती शिवाजी महाराज 25 वर्ष गुंजन मावळात रहाळ करून राहिले.
गुंजन मावळाची माती शतकानुशतके पराक्रमी कर्तबगार आणि वैभवशाली आहे.
पुढील लेखात अशाच एका प्राचीन ठेव्यासहित घराण्यांबद्दल माहिती घेऊ.
क्रमशः
राजधानीचं मावळ
गुंजन मावळ

गुंजन मावळातील कर्तबगार घराण्यांबद्दल माहिती

 

आजच्या लेखात

गुंजन मावळातील कर्तबगार घराण्यांबद्दल माहिती घेणार आहोत.
छत्रपती थोरल्या महाराजांनी अफझल खान नावाचे संकट स्वराज्यावर चालून आले असताना गुंजन मावळातील वडगाव गावातील झांजे पाटील ह्यांच्या मोकदमी वतनासंदर्भातील हुकुम स्वतः थोरल्या महाराजांनी बाळाजी शिलिमकर देशमुख ह्यांना दिले होते.
(पत्र - १) आदिलशाह सरदार सिपेसालार अफझल खान वाई परगन्यात आला आहे. तरी तुम्ही लोक कमालीचे कर्तबगार आहात. ही वेळ जोखमीची आहे. मनामध्ये कुठलाही संशय न ठेवता तुमच्या जमावानिशी हजर व्हा.
(पत्र - २) वडगावची मोकदमी ही देशमुखाची आहे तरी मोकदमीचे कागद बकाजी बिन येसाजी झांजे याचे नावे करून स्वामी कार्यास लावणे. ही मोकदमी पीढिजात बकाजीच्या वंशी चालवावी. तुमच्या येणाऱ्या पिढीनेही झांज्याच्या वंशाचे चालवावे. अस न केल्यास त्याला अमृतेश्वराची आन आहे.
ह्या मजहर वरुण लक्षात घेण्याची बाब ही की , छत्रपती शिवाजी महाराज संकटसमयीसुद्धा कर्तव्यात कसर करत नव्हते.
बाळाजी हैबतराऊ देशमुख आणि त्यांच्या जमावातील काही सरदारांची नावे दिले आहेत.
बाळाजी शिलिमकर देसमुख.
गोमाजी श्रीपती व त्रिंबक श्रीपति देशकुलकर्णी
धाकजी बिन येसाजी चोरघे
सुर्याजी व बापुजी बिन दादजी थिटे - हतवे
धाऊजी बिन राजजी लेकवळे मोहरी बु
कोंडाजी व मातजी लिम्हण -पारवडी
चांदजी व मंबाजी डिवळ निगडे बु
(निगडे बु. या गावामध्ये डिवल आडनावाची घरे नाहीत. कदाचित टक्के असावेत. कारण निगडे गावची मोकदमी बोरावळे गावच्या देशमुखाकड़े होती. टक्केला चौगुला वतन होत.)
येसजी बिन विठोजी सोंडकर -तांभाड
सोनजी व रामाजी कारले - मौजे सोंडे
बाजी पिलाणे खोत - सोंडे हिरोजी
तुलाजी तळेकर -आंबवणे
सूर्याजी व कोंडाजी व सोनजी सरपाले -सोंडे
त्रिंबकभट पुरोहित - वडगाव
ह्या सर्व घरान्यांनी प्रतापगड युद्धामध्ये गुंजन मावळाच्या पराक्रमाची शर्थ केली. इतिहासलेखनाला मुकलेली अनेक घराणी आहेत. छोट्या मोठ्या कथल्यामध्ये त्यांचे उल्लेखही आढळतात पन इतिहास लिहिताना अशाच अनेक घराण्यावर अन्याय झालेले आहेत.
इतिहास लिहिताना देशमुख पाटील अश्या बिरुदावल्या लावणाऱ्या घराण्याचा विचार केला गेला पन अशी अनेक छोटी मोठी घराणी आजही त्यांच्या खऱ्या इतिहासापासून वंचित आहेत.
आपण पानीपत युद्धाच वर्णन करताना सहज म्हणतो की पानिपतावर महाराष्ट्रातील प्रत्येक घरातली बांगडी फुटली आहे. हे अगदी खर आहे पन प्रतापगड युद्धामध्ये अफझल खान संपवायला ह्या बारा मावळ खोर्यातील प्रत्येक घरातील मावळी मनगट तेवढ्याच अवेशाने लढलय.
प्रतापगड रणसंग्रामात स्वराज्यातील अनेक नामजात सरदारांनी मर्दुमकी गाजवली पन त्या मर्दुमकीला खरं बळ ह्या छोट्या सरदार घराण्यांनी दिले.
गुंजन मावळाचा सर्वोत्तम पराक्रमी इतिहास वाचताना लिहिताना ह्या घराण्यांच्या शौर्याला आजवर दिलेल्या त्यागाला मुजरा.🙏🏻
पुढील लेखात गुंजन मावळातील अशाच इतिहासलेखनापासून वंचित राहिलेल्या घराण्यांविषयी माहिती घेऊ.
क्रमशः
राजधानीचं मावळ
गुंजन मावळ

*गुंजन मावळ* चोरघे घराणे

 

*गुंजन मावळ*
आजच्या लेखात आपण गुंजन मावळाच्या मातब्बर आणि अनुवांशिक पुंड स्वभावाच्या चोरघे घरण्याविषयी माहिती पाहनार आहोत. गुंजन मावळाच्या पराक्रमाचा इतिहास पाहिला तर पहिला मान शिळीमकर देशमुख घराण्याचा येतो पण शिळीमकरांला देशमुखी मिळण्याअगोदर तिच्यावर हक्क सांगितला होता तो चोरघे घराण्यानी. मुळात गूंजन मावळाची मुळ देशमुखी कोणाची होती ह्यावर अनेक मत - मतांतर आहेत. देशमुखीचा मुळ वाद सुरु चोरघे घराण्याने केला. काही इतिहास लेखकांच्या मते गुंजन मावळाची देशमुखी ही हतव्याच्या *काळे कासराची* पन अनेक इतिहास कारांनी हा मजहर खोटा असल्याचे सिद्ध केल आहे.
शिवपूर्व काळात निजामशाहीचा वजीर मलिक अंबर चोरघे आणि शिंदे घराण्याचा देशमुखीचा वाद सोडवताना दिसतो.
चोरघे घराण्याच्या शाखा वसई पासून गगनबावढ्या पर्यंत पसरलेल्या आहेत.
महिकावती (माहिम) बखरी मध्ये वसई जवळील #पापडी गावातील चोरघ्याचा उल्लेख #देव_चोरघे* असा आहे. महिकावती बखर ही देवगिरीकर यादव घराण्याची आहे. यादव वास्तु शास्त्राशी निगडित असच एक शिवमंदिर वांगनी येथे आहे.

चोरघे हे मुळ कदम वंशाचे , चोरघ्याच कुलदैवत तुळजापुर निवासिनी भवानी आहे. कदंबा राज्य बुडल्यानन्तर कदंबांची काही कुळ कोकण सोडून घाटमाथ्यावर स्थिरावली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपले अस्तित्व आजही टिकवून आहेत.
वसई पापडी पासून गगन बावढ्या पर्यंतच्या चोरघे घराण्याच्या शाखा ह्या मुळ कदम वंशाच्या आहेत. अशाच अनेक शाखा महाराष्ट्रभर स्थिरावत गेल्या.
गुंजन मावळात चोरघ्याइतके शिरजोर कोणी नव्हते. शिंदे घराण्याच्या काही लोकांची खुनाख़ूनी झाल्यानंतर चोरघ्याचा बंदोबस्त करण्याकरिता शिंदयांचे गोते भाऊ पवन मावळातील शिळीम गावच्या शिळीमकर घरान्यातील काही लोक चोरघ्याच्या तोंडावर बोरावळेत आणून त्यांची वस्ती करून दिली. तरीही चोरघे आपल्या मुळ स्वभावात बदल न करता त्यानी आपला हक्क लाउन धरला त्यातच शिळीमकरांनी भिवजी चोरघा ह्यावर मारेकरी पाठवून त्याचा खून केला. परंतु भिवजीच्या वंशाचे येसजी आणि बाबाजी यांनी कुरंगवड़ी च्या माळावर दसरोजी शिळीमकर याचा खून पाडला. यातच मावळात सुवर्णदिनांची चाहुल सुरु झाली होती. शहाजी पुत्र शिवाजी स्वराज्य स्थापनेच्या मंगल कार्यास लागले होते. त्यासाठी दादोजी कोंडदेव नरसप्रभु ह्यांच्यावर मावळातील देशमुख मंडळी ला साम दाम दंड भेद या नीतिने स्वराज्य कार्यास सामिल करण्याची जबाबदारी होती.
यातच बरवाजी शिळीमकर यानी केतकावन्याच्या फुलाजी शिंदे -शिळीमकराचा कालोजी दीघा ह्याकरवी खून करून वाड्यातील देशमुखीचे कागद नेऊन दादोजी कोंडदेवास लाच देऊन देशमुखी आपल्या नावावर करून घेतली.
तरीही चोरघे ऐकेनात शिलिमकर आणि चोरघ्यामध्ये चकमकी होतच होत्या.
शिलिमकर आणि चोरघे यांच्या मध्ये एकूण तीन #गोत( *meeting*) बसले होते. एक गोत स्वतः मलिक अंबर याच्या उपस्थितीत झाला होता पन निजामशाहीला मुळात मावळातील तंटयांची तमा नव्हती त्यामुळे तो वाद तसाच निवाडयाविणा राहिला. दूसरा गोत स्वतः शिलिमकर आणि चोरघ्यानी नि:हत्ता गोत बसवन्याच्या हेतुने गोत बसला पन शिळीमकरानी दगा फटका गोत चालू असताना चोरघ्यावर हल्ला करून वंश बुडवन्याच्या प्रयत्न केला.( ह्याला ऐतिहासिक संदर्भ नाही तरीही दोन्ही कुळांमध्ये ह्या लढाई विषयी आजही बोलले जाते. याच घटनेनन्तर चोरघे थोडे नरमले पन देशमुखीच्या हक्कावर ठाम होते.
सरते शेवटी शिवरायांनी जावळी स्वारीच्या अगोदर दादोजी कोंडदेव ह्यांच्या सांगण्यावरुण महाराजांनी शिळीमकराच्या बाजूने न्याय देऊन एक मोठी राजकीय खेळी करून अमृतेश्वरच्या देवालयात निवाड़ा केला.
आणि गुंजन मावळाच्या देशमुखीचा तंटा कायमचा निकालात काढून चोरघे यांला पाच गांव पाटीलकी देऊन त्यांचा सन्मान केला.
यातच गुंजन मावळाचा तंटा वाढू नये म्हणून वांगनी च्या चोरघ्याच्या तीन (तक्षीमा) वाटण्या करून गुंजन मावळातील वांगणी , कानंद मावळातील कोळवड़ी आणि खेडे बारे मावळातील रहाटवडे अश्या तीन वाटण्या करून दिल्या.
धाकजी बिन यसाजी चोरघे यांनी शिळीमकराच्या जमावत मोकदमी करून स्वराज्य सेवा केली.
प्रतापगढ़ युद्धामध्ये शिळीमकराच्या बरोबरीने चोरघ्याचा जमाव युद्धामध्ये लढला होता.
चोरघे घरण्याला धाकजी बिन यसाजी आणि त्यांचे दोन भाऊ यानी इमानेइतबारे स्वराज्यसेवा केली यात दुमत नाही.
क्रमशः
राजधानीचं मावळ
गुंजन मावळ

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...