विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label दत्ताजी शिंदे. Show all posts
Showing posts with label दत्ताजी शिंदे. Show all posts

Tuesday, 5 April 2022

श्रीमंत सुभेदार दत्ताजीराव शिंदे

 

१० जानेवारी १७६०
बुराडीघाट

श्रीमंत सुभेदार दत्ताजीराव शिंदे 
पोस्तसांभार :प्रसाद शिंदे 
-----------------------------------------------------------
१० जानेवारी १७६० या दिवशी बुराडी घाटावर मराठ्यांच्या समशेरीतून निघणाऱ्या ठिणग्या अब्दालीच्या सैन्याच्या नुसत्या लाह्या करत होत्या.शत्रू संख्येने प्रचंड परंतु एखाद्या पर्वताप्रमाणे मराठ्यांच्या सेनापती त्यांच्या समोर उभा होता.सुभेदार दत्ताजीराव शिंदेंचा वेग प्रचंड, रणांगणावरील त्यांचा आवेश,ऊर्जा,चपळता आणि धाडसाचे वर्णन करावे तर शब्दही कमी पडतील.परंतु त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक मावळा झुंज देत होता.
सुभेदार दत्ताजीराव शिंदे शत्रूच्या गोटात मधोमध घुसून झुंज देत होते.त्यांचा प्रत्येक वार नजीब-कुतुबशहाच्या सैन्याच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या करत होता. गनीमांचा अक्षरशः चिखल करत सुभेदार दत्ताजीराव शिंदे हे जगदाळे,वाबळे,भोईटे,जगताप, निकम, भापकर,मोहिते या आपल्या सहकार्यासोबत खूप पुढे आले.दत्ताजीरावांचा लालमनी नावाचा घोडा पण जखमांनी सजून-धजून दत्ताजीरावांना साथ देत मोठ्या थाटात पठाणांना तुडवत-तुडवत दौडत होता.एखाद्या प्रलयाप्रमाणे मराठे शत्रूवर तुटून पडत होते.एक एक शिलेदार हिंदुस्थानच्या रक्षणासाठी कामी येत होता.काही वेळातच मालोजीराव शिंदे व बयाजीराव शिंदे पडल्याची खबर दत्ताजींच्या कानावर येते.परंतु शोक करण्यास फुरसत तरी कोणाला होती.दत्ताजीराव त्याच आवेशाने घोड्याला टाच मारून झुंज देत होते.परंतु तोफा आणि बंदुकानी सज्ज असलेले नजीबाचे आणि कुतुबशहाचे सैन्य मराठ्यांना मागे रेटत होते.
तलवारी,ढाली,भाले यावर ज्यादातर अवलंबून असणाऱ्या मराठयांची शत्रू पक्षाने तोफा आणि बंदुकीच्या केलेल्या माऱ्यामुळे दयनीय अवस्था झाली.अश्या प्रसंगी सुभेदार दत्ताजीराव शिंदेचे अंगरक्षक तानाजीराव खराडे म्हणतात की,"निशाण काढता उत्तम आहे." म्हणजेच युद्धातून तूर्तास माघार घेऊन जीव वाचवला पाहिजे.
यावर सुभेदार दत्ताजीराव शिंदे यांनी तानाजी खराडेंना क्षत्रिय धर्माची आठवण करून देत उत्तर केले की,"रणसोडुन निघाल्यास इकडे नरकसाधन,इकडे अपयश मरणाहून वोखटे. क्षत्रिय धर्म हाचकी रणात विन्मुख होऊ नये.या रणात ईश्वरे मृत्यू आणिला तरी उत्तम आहे.योगी संन्यासी नाना प्रकारचे देहदंड करितात की मोक्षसाधन व्हावे. अशात कोणी अभागी असेल तो विन्मुख होईल."
याचा अर्थ असा की रणभूमीतून पळून न जाता शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणे हाच खरा क्षत्रियांचा धर्म. रणभूमीतुन पळून जाणे म्हणजे जीवनभर अपयश आपल्या माथी मारून घेण्यासारखे होईल अश्या योद्ध्याच्या नशिबी नरकयातनाच येतात. साधू संन्याशी मोक्ष मिळावा म्हणून किती साधना करण्यात तल्लीन असतात आणि आपल्याला या रणभूमीत प्राण देऊन मोक्ष मिळणार असेल तर मी देवाचे आभार मानतो.कोणी कपाळकरंटाच असेल जो युद्ध सोडून पळून जाण्याचा विचार करत असेल.
सुभेदार दत्ताजीरावांचे हे शब्द कानी पडताच यशवंतराव जगदाळे,तानाजीराव खराडेच्यात अंगात वीरश्री संचारली.आणखी त्वेषाने ते लढू लागले. दत्ताजीरावांच्या खांद्याला खांदा लावत गनीम कापत सुटले.दत्ताजीरावांच्या पाठीवरचा वार आपल्या छातीवर घेत हे वीर धारातीर्थी पडले.तेवढ्यात एक गोळी दत्ताजींचा वेध घेत त्यांच्या बरकडीत घुसली आणि दत्ताजीराव आपल्या लालमनी घोड्यावरून वरून खाली कोसळले.दत्ताजींरावांना चारही बाजूंनी पठाणांनी घेरले.ही बातमी वाऱ्यासारखी नजीबाच्या आणि कुतुबशहाच्या कानावर पडली तडक त्यांनी दत्ताजीरावांना गाठले.सिंहासारख्या मराठ्यांचा सेनापतीची अशी अवस्था पाहून ही गिधाडे अधिकच चेकळू लागली.कुतुबशहाने पुढे सरसावत दत्ताजींच्या छातीवर बसत "क्यू पाटील और लढेंगे तुम हमारे साथ "?असा प्रश्न विचारला त्यावर सुभेदार दत्ताजीरावांनी प्राण एकवटून उत्तर केले की "क्यू नही बचेंगे तो और भी लढेंगे" दत्ताजीरावांचा हा आवेश पाहून कुतुबशहा चिवताळला त्याने दत्ताजीरावांचे शीर धडापासून वेगळे केले.
१० जानेवारी १७६० या दिवशी मराठ्यांच्या तेजस्वी सूर्याचा अस्त झाला. श्रीमंत सुभेदार दत्ताजीराव शिंदे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
✍️ प्रसाद शिंदे

Tuesday, 12 January 2021

मराठ्यांच्या पालखीचा गोंडा दत्ताजी शिंदे

 

मराठ्यांच्या पालखीचा गोंडा दत्ताजी शिंदे 
 
लेखन 
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

 
गाॅल्हेरचे शिंदे घराणे हे मराठी स्वराज्यातील अत्यंत शूर व पराक्रमी घराणे होय .सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेडची पाटीलकी या घराण्याकडे होती. शिंदे घराण्यात राणोजी ,दत्ताजी ,जनकोजी ,जयाप्पा सारखे पुरुष मराठी साम्राज्याचे अभिमानी होऊन गेले. कुकडीच्या लढाईत निजामाच्या हत्तीची अंबारी खाली पाडणार्यात दत्ताजी शिंदे प्रमुख होते. दत्ताजी शिंदे हे अत्यंत शूर व पराक्रमी होते .ऊत्तरेत लाहोरचा बंदोबस्त दत्ताजी शिंदे यांनीच केला होता. त्यावेळी ऊत्तरेतील तिर्थक्षेत्रे मुक्त करून आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी दत्ताजी शिंदे यांनी पैसा उभा केला होता. मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे फार मोठे योगदान आहे .या घराण्यातील राणोजी, महादजी या कर्तृत्ववान पुरूषामुळेच पानिपतचे अपयश धुवून निघाले होते, व ऊत्तर हिंदुस्तानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.या घराण्याचा दौलतीचे ,स्वराज्याचे आधारस्तंभ म्हणण्यात आले.
सन.१७५८ मध्ये दत्ताजींचे लग्न भागीरथीबाई यांच्याशी झाले होते.भागिरथीबाई या अत्यंत सालस ,हुशार व धोरणी होत्या. लग्न झाल्यावर दत्ताजी ऊज्जैनला आले. दत्त्ताजीं यांचा शूर व पराक्रमी स्वभाव पाहता ,मल्हारराव होळकरांनी त्यांनां नजीबाचे पारीपत्य करण्यास १० जानेवारी १७६० मध्ये पानिपतला पाठवले. दत्ताजींनी नजीबावर हल्ला केला.अफगाणी सैन्य बंदुका घेऊन तयार होते .मराठी सैन्याची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी आणि भाले .मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला दत्ताजी आणि जनकोजीला समर्थपणे तोंड देता आले नाही.
बुरांडी घाटावर रोहिल्यांच्या गोळीबारात दत्ताजी शिंदे घोड्यावरून खाली आले .सुडाने फुरफुरलेले दत्ताजी रोहिल्यांकडे झेपावले .त्यातच समोरच्या गर्दीत त्यांना नजिबांचे तोंड दिसले ,तसे ते बेफान होऊन एकेकाला कंठस्नान घालीत दत्ताजी वादळासारखे घोंगावत पुढे जात होते. तोच समोरून कुतुबशहा व नजीर, दत्ताजी शिंदे यांच्यावर झेपावले .दत्ताजी जखमी होऊन पडले होते.अंगात थोडी धुगधुगी दिसत होती. कुतुबशहाने "दत्ता ss" म्हणून हाक दिली तसे दत्ताजी यांनी त्यांच्यावर डोळे रोखले.
कुतुबशहा म्हणाला "क्यु पाटील ,और लढोगेss?" कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.त्या दिवशी
दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.
रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.
त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून
पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता .हा भयंकर प्रसंग पाहून झाडावरची पाखरे सुध्दा थबकली. यमुनेचा प्रवाह सुद्धा स्तब्ध झाला.ईतका भयंकर प्रसंग होता तो.
जनकोजींचा जखमी देह घेऊन मराठा सैन्य तळावर आले. त्यांच्या तोंडावरची घोंगडी पत्नी काशिबाई यांनी बाजूला केली.त्यांच्या सर्वांगावर जखमांचे वार दिसत होते." पाणी ऽ पाणी ऽऽ" असे जनकोजी क्षीण आवाजात पुटपुटत होते.जनकोजींच्या पत्नी काशीबाई गलबलून गेल्या. आणि ओरडू लागल्या " माझ्या दौलतीचा राजा s शिपीभर पाण्याला तू महाग झालास का?" जनकोजी विचारू लागले, "माझे काकासाहेब कुठे आहेत? कुठे आहेत काका ?"
सार्यांनी माना खाली घातल्या. भागीरथीबाई कावर्याबावर्या होऊन मुक्या हरिणीसारखे साऱ्यांकडे बघू लागल्या होत्या. झाला प्रकार त्यांच्या ध्यानात आला आणि त्या धाय मोकलून रडू लागल्या. तोंडात मारून घेऊ लागल्या.जमिनीवर हात आपटू लागल्या . त्यांच्यासाठी धरती फाटली आणि आभाळ पण फुटलं. टाका कसा घालायचा ? त्या जोर जोरात किंचाळून रडू लागल्या."माझ्या चांदसूर्या ss कुठे गेलास रे ? कुणाची ही दौलत ,कुणाचे वाडे आणि राजवाडे ? माझ्या चांदाचा मुखडाही बघायला मिळाला नाही ,मला एकटीला टाकून कुठे गेलास रे माझ्या बाजींद्या सरदारा s?"
भागीरथीबाईंच्या शोकाने सारे व्याकुळ झाले होते .परंतु पुढे भागीरथीबाईंनी आपला शोक आवरला .त्या जनकोजीना म्हणतात " बाबा ,तुम्ही बायकांसारखे का रडता ?आपण सारेच असे बसलो तर वैरी सारी उरलीसुरली माणस घशात घालेल.चला उठा s"भराभरा निघूया जिच्यावर आभाळ कोसळले तिचे धीराचे बोल ऐकून साऱ्यांच्या उरात उभारी आली.
.मोडकी -तोडकी ,अर्धमेली फौज तशीच वाट तुडवत पुढे निघाली. भागीरथीच्या भाग्याचा गोळा ढगाआड गेला होता .आता पोटातला गोळा जगविण्यासाठी त्या जीवाच्या आकांताने पळत सुटल्या होत्या .नऊ महिने भरलेल्या भागिरथी बाई घोड्यावर बसून निघाल्या. पुढे भागिरथी बाई शिंदे बुरांडी घाटातून निसटुन कोटपुतली या भूईकोटला आल्या.तेथे त्या प्रसुत झाल्या.धावपळ व संकटामुळे मुलगा जगला नाही. या युद्धात कोवळी ,निष्पाप लेकरसुध्दा बळी पडली.हे मुल गेले आणि दत्ताजी शिंदे यांचा वंशच समाप्त झाला.निखळलेल्या गोंड्याचा साधा धागाही शिल्लक राहिला नाही.
दत्ताजी शिंदे म्हणजे मराठ्यांच्या पालखीचा गोंडा होता .काळाने हा गोंडा खुडून नेला होता.
अहिल्याबाई होळकर या तेथेच तळावर होत्या. भागीरथीबाई यांची त्या समजूत काढत असतात. म्हणतात बाई रडू नका .आपण मराठी सरदारांच्या बायका .आपल लगीन सरदारांशी नव्हे तर तलवारीशी लागत. तलवार गळाली की आपण कोसळतो."यावर भागिरथीबाई म्हणतात "बाईसाहेब, खंडेराव गेले तेव्हा त्यांचे तुम्ही अंत्यदर्शन तरी घेतले असेल.तिरडीवर चुडा तरी फोडला असेल" त्यांच्या अंत्यदर्शनाचे भाग्यसुध्दा मला लाभले नाही.
१० जानेवारी १७६० रोजी शोर्यशाली दत्ताजी शिंदे यांचा पानिपताच्या रणांगणावर मृत्यू झाला.
मराठ्यांच्या इतिहासात अशा कितीतरी समंजस ,धाडशी ,पराक्रमी स्रिया होऊन गेल्या.
🙏अशा या थोर दत्ताजी शिंदे आणि भागीरथीबाई शिंदे यांना आमचा मानाचा मुजरा🙏

संदर्भ
मराठी विश्वकोष
पानिपत
विश्वास पाटील
मराठी रियासत
गो.स.सरदेसाई
( टिप या लढाई नंतर एक वर्षांनी १४ जानेवारी १७६१ ला पानिपतच्या रणक्षेत्रावर सदाशिव भाऊसाहेब ,विश्वासराव पेशवे ,अहमदशहा अब्दाली यांच्यात शेवटचा निकाली रणसंग्राम झाला .

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...