विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 27 February 2024

|| शिवरायांची एक शपथ आणि त्यात शंभुराजांची कामगिरी. ||

 


|| शिवरायांची एक शपथ आणि त्यात शंभुराजांची कामगिरी. ||
शाहिस्तेखानाची फ़जीती केल्यानंतर मोगलांनी शिवाजी महाराजावर जयसिंघाची स्वारी रवाना केली. मोठा संघर्ष घडुन आला आणि शिवरायांनी जयसिंघाशी यशस्वी तह केला. पुढे औरंगजेबाला भेटण्यासाठी शिवरायांना आग्र्याला जावे लागले, हि घटना या प्रसंगी घडलेली आहे.
महाराज औरंगजेबाच्या जन्मदिवसावर त्याला भेटण्यास त्याच्या दरबारात गेले होते. दिवाने खास मध्ये गेल्यानंतर महाराजांना पान विडे दिले पण मानाची जागा आणि खिल्लात दिली गेली नाही. याचा महाराजांना फ़ार मोठा संताप आला कारण औरंगजेबाने शिवाजी महाराजांना मोठी मानाची जागा दिली होती पण त्याने तशे वचन दरबारात पाळले नाही. महाराज स्वाभीमानी व्यक्ती होते. त्यांनी भर दरबारात या बाबी विषयी संताप व्यक्त केला, या विषयी परकलदास लिहितो_ “उन दी(न) सालगिरह की जलूस का पान शाहजदा जी वगैरह उमरावां ने दिया, सु सेवा ने भी दीया। पाछै सरोपाव जलुस का शाहजादा ने व जाफ़र खां ने व राजा जसवंतसिंघ ने दिया। तव सेवो (शिवाजी राजे) दिलगीर हुवो, गुस्सो खायो, गलगली सी आंख्यां हुवो। सु पातशाह जी की नजरी आये। तब पातसाह (औरंगजेब) जी कंवर जी ने फ़रमायो "सेवा को पूछो "क्यों हो?" तब कंवर (रामसिंघ) जी सेवा काठो आया, तब सेवो कही "तुम देखो, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारा पातशाही देख्या। मैं एसा आदमी हों जु मुझे गोर करने खडा रखो। मैं तुम्हारा मनसीब (मनसब) छोड्या। मुझे खडा तो करीना सीर रख्या होता।" वैठा थे मरोड खाई उठी चालो। तब श्री महाराज कंवार जी हाथ पकड्यो सु हाथ भी छुडाई बगलाउ आणी वैठो। जठै कंवरजी फ़ेरी आनी समझायो, सु मानी नहीं; कही "म्हारो मरण आयो। यो तो तुम मुझे मारोगे, या मैं अपघात कर मरोंगा। मेरा सिर काट कर ले जावो तो ले जावो, में पातशाह जी की हजूरी नहीं चलता।"
अर्थ:- " त्या दिवशी बादशाहाचा जन्मोत्सव असल्याकारणानें पादशाहाजादे व उमराव यांना पानविडे दिले. त्यासोबत शिवाजीलाही दिले. सरोपाव शाहजादे व जाफ़र खां आणि राजा जयवंतसिंघ यांना(च) दिले. तेव्हां शिवाजीं हे पाहुन दिलगीर जाला व त्याला राग आला. डोळे लाल होऊन अश्रुहि भरले. हे बादशाहाच्या नजरेत आले. तेव्हा पादशाहाने कुमारला सांगितले की, "शिवाजीला विचार काय झाले?" तेव्हा कुंवर शिवाजी जवळ आला. तेव्हा शिवाजी म्हणाला. "तु पाहात आहेस, तुझ्या पित्यानेही पाहिले आहे, तुझ्या बादशाहानेही पाहिले आहे की, मी कसा मानुस आहे तरी मला दुसर्याच्या जागी उभे केले. मी तुमची मनसब सोडतो. मला उभेच करायचे होते तर माझ्या मानाच्या जागी समोर उभे करावयचे होते. तो नंतर ताबडतोब पाठ फ़िरवून (दरबारातुन) निघुन जात होता. तेव्हा श्री महाराज कुंवर जी (रामसिंघ) ने त्यांना हाथ पकडला परंतु शिवाजीने तो झिडकारून टाकला आणि एका बाजूला जाऊन बसला. तेव्हां कुंवरने जाऊन समजावन्याचा व दरबारात परत आनण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु शिवाजी ऐकण्यास तयार झाला नाही. तो म्हणाला "माझे मरण आले आहे. एक तर तुम्ही मला मारा नाही तर मी स्वत:ला मारीन. माझे डोके कापुन न्या पण मी बादशाहाच्या दरबारात येनार नाही." माझा जीवहि गेला तरी मी दरबारात जानार नाही, हि त्याप्रसंगी शिवरायांनी घेतलेली शपथच होती. औरंगजेबाने मुलतफ़ीखान, आकीलखान, मुखलिसखान यांना पाठुन माहाराजांना संम्मान देऊन दरबारात आनन्यासाठी पाठवले पण महाराजांनी तेही नाकारले. मला बादशाची मनसब नको आहे. मी त्याचा चाकर होनार नाही. तुम्हाला वाटत असेल तर माझा खुन करा किंवा कैद करा मी सिरोपाव घेनार नाही व बादशाहाच्या दरबारातही जानार नाही!
महाराजांची हि शपथ पुर्ण करने महाराजांसाठी फ़ार अवघड होते, पण त्यांनी ती पुर्ण करून दाखवली. या कामी शिवाजी महाराजांनी बाल शंभुराजांची मदत घेतली. महारजांवर दरबारात जाण्याचा बराच दबाव येत होता हे पाहुन महाराजांनी आपल्या जागी शंभुराजांना दरबारात पाठवले आणि शंभुराजांनी देखील औरंगजेबाच्या दरबारात आपली भुमीका योग्यरीत्या सांभाळली. अगदी सुरवाती पासुन ते शेवटपर्यंत शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधीच गेले नाही... सर्व जबाबदारी शंभुराजेच उचलत असत. शिवाजी महाराजांना आपली शपथ पुर्ण करण्यात फ़ार काही अडचन आली नाही कारण राजकारणाचा धुरंधर शंभुराजा या कारयात त्यांची साथ देत होता.
शिवाजी महाराजांनी शंभुराजांना बाल वयातच राजकारनातील घडामोडित नेहमीच अग्रेसर ठेवले होते. तसेच याही वेळेस महाराजांनी शंभुराजांनाच मुख्य भुमीका निभावण्याची जबाबदारी दिली होती, जी शंभुराजांनी योग्य रीत्या सांभाळली. पित्याच्या जीवावर आलेले संकट शंभुराजांनी आपल्या जीवावर लिलया पेल्ले हि काही साधी गोष्ट नव्हती. मराठा आज स्वत:ला स्वाभिमानी समजतात ते शिवरायांमुळे. पण शिवराय स्वत:चा स्वाभिमान टिकवुशक्ले ते शंभुराजांमुळे! हि बाब ध्यानात घेतली पाहीजे.
संदर्भ:-
Shivajis Visit to Aurangzib att Agra, Rajasthani Records_ J. Sarkar & R. Sinh
पुरन्धर की संधि_ राजस्थान राज्य अभिलेखागार, बीकानेर

“महाराणी येसूबाईसाहेब” तब्बल ३० वर्षाच्या कैदेतून मुक्तता.

 

२८ फेब्रुवारी १७१९...

“महाराणी येसूबाईसाहेब” तब्बल ३० वर्षाच्या कैदेतून मुक्तता....🙏🏻🚩
―――――――――――――――――――
आम्ही जंग जंग पछाडले, आसवांचे आगडोंब शमविले, पण त्या अश्रूतून जन्माला आलेला भडाग्नीतून असे काही निखारे फुलले, की आम्ही पाठ भिंतीला टेके पावेतो लढलो.
हुंडी खंडी भरासाठी लढणाऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होत लढा उभारला अन इतिहासाला आपल्या कर्तृत्वाची दखल घेणे भाग पडले आणी यानंतर जेते म्हणून कित्येक दशकं मराठ्यांचाच इतिहासात लिहिला गेला...
पण तरी काही जुने प्रश्न मार्गी लागणे बाकी होते,
राजमाता येसूबाई यांच्या सुटकेसाठी त्यांचे पुत्र छत्रपती शाहूंच्या अधिपत्याखाली आणि खंडेराव दाभाडे तसेच शंकराजी मल्हार व सय्यद हुसेन अली यांच्या नेतृत्वात ३५००० ची मोठी फौज दिल्लीला रवाना झाली , बादशाह फारुखसियर ने येसूबाई व इतर राजबंदी यांच्या सुटकेच्या अटी मान्य केल्यातर ठीक नाहीतर बादशाह बाजूला करावा असा ठराव होता...
मराठे दिल्लीत पोचले आणि त्यांनी दिल्ली शहराचा ताबा घेऊन दिल्ली च्या किल्ल्याला वेढे दिले शंकराजी मल्हार आणि हुसेन अली ने शाहूराजांच्या मागण्या बादशहा समोर मांडल्या त्या बादशाह ने अमान्य केल्या त्यावेळी तिथे दोन्ही बाजूंमध्ये अश्लील शिवीगाळ झाली.
दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये बादशहा समर्थकांनी मोठी दंगल घडवून आणली ज्यामध्ये २००० मराठे मारले गेले ज्यात सेनापती संताजी भोसले सुद्धा होते या गोष्टीमुळे मराठे चवताळले...
बादशाह ऐकत नाही हे बघून दुसरा पर्याय म्हणजे बादशहा हटवण्याचे निश्चित झाले.
२७ फेब्रुवारी १७१९ ला लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले रफी ऊत दर्जत ला नवीन बादशाह घोषित करण्यात आले व ३० वर्षांच्या राजबंदी नावाच्या सोनेरी कुंपणातून राजमाता येसूबाईसाहेबांची सुटका झाली...
कुलमुखत्यार महाराणी येसुबाई यांना त्रिवार वंदन 🙏

Sunday 25 February 2024

दिल्लीदिग्विजयवीर 🚩

 


दिल्लीदिग्विजयवीर 🚩* -----------------------------------------------
पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचे दिल्लीवरील वर्चस्व संपुष्टात आले.उत्तरेत मराठा सत्तेचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर दिल्ली पहिल्यांदा आपल्या ताब्यात घ्यावी लागेल हे मराठे चांगलेच जाणून होते.पानिपत युध्दाचा शिंदे घराण्याला जबर फटका बसला होता परंतु आलेल्या अपयशाने खचून न जाता मराठ्यांना पुन्हा संघटीत करून श्रीमंत महादजी शिंदे यांनी मराठासत्तेची मूळे उत्तर हिंदुस्थानात अधिक बळकट केलीच त्याचबरोबर मराठा साम्राज्याविरोधात एकजूट होणाऱ्या शक्तींना 'दे माय धरणी ठाय' करून सोडले.
राजपुतांना वठणीवर आणून पाटीलबाबांनी दिल्लीकडे कूच केले.पानिपत युद्धानंतर नजीब खानाने दिल्लीवर आपला चांगलाच वचक बसवला होता, मराठ्यांच्या उत्तरेतील या हालचाली पाहून त्याने मोठी धास्ती घेतली.मराठ्यांची विजयी घोडदौड बघुन नजीबाने आपले हातपाय गाळले.व आपल्या कपटबुद्धीने तह करण्याचा तगादा लावला परंतु 'नजीबाच्या नरडीचा घोट घेऊनच माझी समशेर मी म्यान करेल'असा प्रण पाटीलबाबांनी पूर्वीच केला होता.काही राजकीय कारणांमुळे नजीबाला उघडपणे गाठून ठार करणे महादजीबाबांना शक्य नव्हते.पाटीलबाबांचा उत्तरेतला वाढता प्रभाव पाहून काहींना त्यांच्याविषयी ईर्षा उत्पन्न झाली.आपले जुने लागेबंध उकरून काढून नजीबाने काहींना आपलेसे केले.नजीबाच्या खानदानांचा सर्वनाश करण्याचा निश्चय केलेल्या महादजीबाबांनी मराठ्यांच्या गनिमीकाव्याचा उपयोग करून नजीबाला संपवले.मराठा छावणीत मसलत करण्यासाठी आलेला नजीब खान रोहिला पठाण आपल्या छावणीत पोहचेपर्यंतच पालखीत गतप्राण झाला होता.
नजीबाच्या मृत्यूनंतर जाबेता खान याने आपल्या बापाचीच कपटनीती अवलंबून दिल्लीवर जबरदस्तीने कब्जा केला.रोहिल्यांच्या कपटी डावपेचांमुळे गाफील असलेल्या मराठ्यांना जाबेता खानाने अचानक आक्रमण करून पहिला फटका दिला.या पहिल्या घातपाताने खडबडून जागे झालेल्या मराठ्यांनी पाटीलबाबांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे व त्यांना सहकार्य करण्याचे कबुल केले.पाटीलबाबांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या मराठ्यांनी अनेक ठिकाणी जाबेता खानाच्या फौजेचा सपाटूनपराभव केला.जाबेता खानाच्या फौजेचे अनेक मोठे मोठे सरदार या लढायांमध्ये मारले गेले.पठाणांच्या ताब्यात असणाऱ्या अनेक किल्ल्यावर मराठ्यांचे जरीपटक्याचे निशाण लागले.
रोहिलखंडामध्ये मराठयांच्या घोड्यांच्या टापा चौफेर धुराळा उडवू लागल्या.या मोहिमेत रायाजीराव पाटील शिंदे,शंकरबुवा शिंदे,भगीरथराव शिंदे,धारराव शिंदे,रानेखान,खंडेराव हरी भालेराव,अंबाजीराव इंगळे,जिवाजी केरकर,विठोजी इंगळे,माधवराव फाळके यांनी पाटीलबाबांच्या खांद्याला खांदा लावून मोठा पराक्रम गाजविला.रोहिलखंडावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून पाटीलबाबांनी दिल्लीसंबधी हालचालींना वेग दिला.
बादशहा शहाआलम आधीच अलाहाबादला इंग्रजांच्या वळचणीला जाऊन बसला होता.बादशहाला २६,००,००० लाखांची पेन्शन देऊन इंग्रजांनी आपला हेतू स्पष्ट केला होता.दिल्लीच्या बादशहावर वर्चस्व प्रस्थापित करून इंग्रजांना पूर्ण भारतभर आपली पाळेमुळे घट्ट करायची होती.इंग्रजांनी आपल्याला अनुकूल अशी काही माणसे दिल्ली दरबारात पेरली होती.महादजीबाबांच्या उत्तरेतील वाढत्या प्रभावाच्या बातम्यामुळे बादशाह शहाआलम गुप्तपणे पाटीबाबांकडे संदेश पाठवत होता.याची भनक इंग्रजांना लागताच त्यांनी आपल्या गोड बोलण्याने बादशहाचे मन आपल्याकडे पुन्हा वळवून घेतले.बादशहाचा हा तळ्यात-मळ्यात स्वभाव बघून महादजीबाबांनी संयम दाखवत आपला मुत्सद्देपणाची चुणूक दाखवायला सुरवात केली.
पाटीलबाबांनी दिल्लीच्या किल्ल्यावर त्वरित हल्ला केला किल्लेदार कासीम खानाला धूळ चारून मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर १० फेब्रुवारी १७७१ ला मोठ्या दिमाखाने फडकविला. खऱ्या अर्थाने छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे स्वप्न महादजीबाबांनी पूर्ण केले.परंतु लाल किल्ला घेऊन हि मोहीम पूर्ण होणार नव्हती.बादशहाला इंग्रजांच्या छावणीतून बाहेर काढून आपल्या ताब्यात आणण्याचे महत्वपूर्ण काम पाटीलबाबांनी देवासच्या(मोठी पाती) पवार राजघराण्याचे श्रीमंत कृष्णाजीराव पवार यांच्या साथीने मोठ्या चलाखीने केले.तीन-चार महिन्यात मराठ्यांनी पूर्णपणे दिल्लीवर कब्जा मिळवून चौक्या-पहारा मजबूत केला.
इंग्रजांचा बादशहावरील असणारा प्रभाव लक्षात घेऊन महादजीबाबांनी संयमाने त्याच्याशी बोलणी चालू ठेवली.परंतु बादशहाचा लहरी स्वभाव असल्यामुळे आपली रणनीती त्यांनी बदलून बादशहावर दबाब टाकण्यास सुरवात केली.बादशहाचे विरोधक असणाऱ्या व्यक्तींशी मुद्दामहून जवळीक दाखविण्याचा प्रयत्न केला.एवढयावरच न थांबता बादशहाला सज्जड दमच भरला की 'आपण दिल्लीला येऊन आमच्या अधीन होणार नसताल तर आम्ही दुसरा बादशाह बनवू'.पाटीलबाबांचा हा संदेश बादशाह शहाआलमला मिळताच तो खडबडून जागा झाला व त्याने उत्तरेत असणारा मराठ्यांचा प्रचंड प्रभाव लक्षात घेऊन दिल्लीला येण्याचे कबुल केले.बादशहाला अनुकूल करून घेतल्यावर मध्येच आडकाठी बनून राहिलेल्या इंग्रजांना अद्दल घडविण्यासाठी मराठ्यांनी कंबर कसायला सुरवात केली.
बादशहाला इंग्रजांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी वेगवान हालचाली चालू केल्या.जनरल रॉबर्ट वॉरकरच्या नेतृत्वाखाली दोन शिस्तबद्ध पलटणी होत्या त्यामुळे इंग्रजांसोबत युद्ध करण्यापूर्वी पाटीलबाबांनी अभ्यासपूर्ण नियोजन केले.या युद्धात महादजीबाबांचे काही प्रमुख उद्देश होते ते म्हणजे इंग्रजांना पराभूत करून त्यांची भारतावर मजबूत होत चाललेली पकड ढिली करायची.तसेच इंग्रजांच्या मनात आपल्याबद्दल दहशत बसवावी.अलाहाबादजवळ इंग्रजांसोबत झालेल्या लढाईत मराठ्यांनी विजय मिळविला व आपल्या सूचक नियोजनाच्या आधाराने इंग्रजांच्या बऱ्याच सैन्याची खराबी केली.अखेर २७ डिसेंबर १७७१ साली बादशहाला दिल्लीला आणण्यात आले त्याला गादीवर बसवून पाटीलबाबांनी आपल्या अधीन ठेवले.
पुढील काही महिन्यांमध्ये पाटीलबाबांनी पत्थरगडावर हल्ला करून रोहिला पठाणांवर शेवटचा वार केला.पत्थरगडावर मिळालेला विजय पानिपतचा बदला मानला गेला.तसेच पत्थरगडाच्यापासून काही अंतरावर असलेल्या नजीबाबाद या नजीबाने वसवलेल्या शहरावरून गाढवाचा नांगर फिरवून शहर पूर्ण बेचिराख केले.नजीबाची कबर फोडून त्याची हाडे जाळण्यात आली.दिल्लीवरील विजय आणि पत्थरगडावरील विजयाने अनेक सत्ताधीशांना चांगलीच दहशत बसली.श्रीमंत महादजीबाबांनी स्वराज्य हा उदात्तविचार पानिपतच्या अपयशानंतर मरगळलेल्या मराठ्यांच्या मनात नुसता पुनर्जीवितच केला नाही तर बुलंद ही केला.पुढील काही दशके मराठ्यांनी उत्तरेत पाटीलबाबांच्या नेतृत्वाखाली आपला इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला.
----------------------------------------
©प्रसाद शिंदे सरकार

"दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न सांभाळणारे राजनीतीधुरंधर छत्रपती राजाराम महाराज"

 


"दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न सांभाळणारे राजनीतीधुरंधर छत्रपती राजाराम महाराज"
____________________
____________________
साधारण १६९९ चा तो काळ. औरंगजेबाला मराठ्यांनी झुंजवून पुरता जेरीस आणलेला. राजकीय डावपेचानं आठ-दहा वर्ष जिंजी लढवून राजाराम महाराज महाराष्ट्रात परतलेले. औरंगजेबापासून पळण्याचा काळ सरलेला, आता औरंगजेबावर निर्णायक घाव घालण्याची मराठयांची बारी. १६९९ च्या साधारण सप्टेंबरमध्ये राजाराम महाराजांनी धनाजी जाधवराव, खंडेराव दाभाडे, परसोजी भोसले ह्यांना सोबत घेवून औरंगजेबाने गिळलेला मुलुख जिंकायला सुरुवात केली. एवढ्यावरच मराठे थांबले नाहीत तर पुढे काही दिवसात भीमा नदी उतरून ब्रम्हपुरीतल्या औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून कैद शाहू महाराजांना सोडवण्याचा प्रचंड धाडसी प्रयत्नही मराठ्यांनी केला. ज्याचं नेतुत्व खुद्द राजाराम महाराज करत होते. हा हल्ला निकामी ठरला पण मराठे खचले नाहीत. शाहू महाराज सुटू शकले नाहीत तरीही मराठयांचं आधीच वाढलेलं मनोबल ह्या हल्यानं अजूनच उंचावलं.
२२ डिसेंबर १६९९ रोजी विठोबा बाबर ह्यांना राजाराम महाराजांनी एक पत्र लिहिलं ज्यात त्यांच्या कमालीच्या उंचावलेल्या मनस्थितीचं दर्शन घडतं. त्या पत्रात राजाराम महाराज म्हणतात,
" आम्ही सिंहगडावर पोचलो आहोत, आणि बादशहाच्या सैन्याचा पाडाव करण्यासाठी आपल्या सर्व शक्तीनिशी पुढे निघणार आहोत. सेनापती धनाजी, नेमाजी शिंदे, परसोजी भोसले आणि इतर पुढार्यांनी ब्रह्मपुरी येथे तळ देऊन असलेल्या बादशहाच्या छावणीवर भयंकर हल्ला केला, त्यांनी बादशहाच्या मुलीला व इतर अनेक प्रमुख कुटुंबियांना पकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांनी, दहा हजार बैलांचा एक तांडा पडकला. या बैलांवरून बादशाही सैन्याला रसद पुरवली जात होती. हे सैन्य सातार्याकडे निघाले आहे. गनिमाचे धैर्य गळाले आहे. त्यामुळे या सैन्याचा सातार्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्हाला आता या बादशहाच्या सामर्थ्याची दखल घेण्याची गरज वाटत नाही. ईश्वरकृपे आम्ही त्याला पार उखडून टाकू."
ह्यानंतर लगेच राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी बादशाही छावणीवर हल्ला केला. राजारामांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाच्या छावणीवर मराठ्यांनी केलेल्या हल्ल्याचा सविस्तर रंजक वृत्तांत चिटणीस बखरीत आलाय जो वाचण्यासारखा आहे. ही वेगवान मोहीम राजाराम महाराजांच्या तब्ब्येतीवर बेतली. ह्या मोहिमेनंतर त्यांनी अंथरूण धरलं.
आहे ते स्वराज्य वाटेल त्या किमतीवर राखण आणि त्याचा मिळेल तसा उपभोग घेणं ही राजाराम महाराजांनी वृत्ती कधीच नव्हती. वडिलांसारखा, मोठ्या भावासारखा त्यांचा पिंडही जातीचा लढवय्या होता. औरंगजेबाला पुरता खिळखिळा करून त्याच्या दिल्लीचाच घास घ्यावा हे थोरल्या महाराज साहेबांचं स्वप्न त्यांनीही उरी सांभाळलं होतंच ( जे पुढं थोरल्या शाहू महाराजांनी पूर्ण केलं.).
घोरपडे घराण्याचा एक नातलग कृष्णाजी (?) यांना सरंजाम ठरवून दिला तेंव्हा त्यात राजाराम महाराजांची वाक्यं त्यांच्या दिल्ली विजयाच्या स्वप्नाचं थेट दर्शन घडवतं.
राजाराम महाराज लिहीतात,
" महाराष्ट्र धर्म पूर्ण रक्षावा हा तुमचा संकल्प स्वामिनी जाणून उभयतास जातीस व फौजखर्चास सहा लक्ष होनांची नेमणूक चालवण्याचा निश्चय करून दिधला असे. पैकी (१) रायगड प्रांत व (२) विजापूर (३) भागनगर व (४) औरंगाबाद हे चार काबीज केल्यावर दर कामगिरीस पाऊण लाखाप्रमाणे एकदंर तीन लाख आणि बाकीचे तीन लाख प्रत्यक्ष दिल्ली घेतल्यावर द्यावयाचे असा निश्चय केला आहे. एकनिष्ठपणे सेवा करावी. स्वामी तुमचे बहुतेक प्रकारे चालवितील."

मराठेशाहीतील पराक्रमी घराणे तावरे पाटील

 







मराठेशाहीतील पराक्रमी घराणे तावरे पाटील
-------------------------------------------------------------------
या महाराष्ट्राच्या मातीचा रक्तरंजित इतिहास आहे.इथे कणा कणात मराठ्यांच्या पराक्रमाचा गंध दरवळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभरणी केली यावेळी अनेक मराठा सरदारांनी तरवार गाजवली.. त्यापैकी एक घराणे म्हणजे तावरे पाटील..
सांगवी, कऱ्हाटी, आंबी, जांभळी खोरे,पार्वती आणि माळेगाव बु. भागाची पाटीलकी भूषवित असताना, राज्य प्रस्थापित करण्याकरीता आपल्या पागे रणांगण गाजवीत..
मराठा आणि निजाम यांच्यात झालेल्या पालखेडच्या लढाईत मल्हारजी तावरे पाटील यांनी तरवारीची शर्थ करीत आपला देह समरभुमीवर ठेवला...
विठोजी तावरे हे पानिपतावर पडले... तर मुल्हेरच्या लढाईत शिवराम तावरे जख्मी झाल्याची नोंद पाहायला मिळते..
तावरे घराणे शिंदे होळकर आणि नागपूरकर भोसले यांच्या सोबत उत्तरेत आले.. राणोजी शिंदे यांच्या सोबत आलेले तावरे घराणे आज नीमज येथे स्थायिक आहे आज देखील त्याभागात आपला दबदबा कायम राखून आहे...
तुळाजी तावरे हे होळकरांच्याकडील एक मत्ताबर सरदार.. यांची अनेक पत्रे व कारनामे पेशवे दप्तरात पाहायला मिळतात..
महिपतीराव तावरे हे काऱ्हाटी येथील पाटील.. याचा उल्लेख सुपे परगण्यातील महजर मध्ये पहायला मिळतो..
सरखेल रघुजी आंग्रे यांच्या कडे रामजी तावरे हा एक सरदार होता..
खंडोजी बिन सोमजी तावरे,मोराजी बिन रतणाजी तावरे,मलजी बिन साऊजी तावरे
१६८९ च्या इनामपत्रात ग्वाही दिल्या बद्दलचा उल्लेख सांगवी चे मोकदम-पाटील शिवचरित्र साहित्य खंड 2 मध्ये उल्लेख पाहायला मिळतो..
या घराण्यावर अभ्यास करण्यास इतिहास अभ्यासकांना वाव आहे... भविष्यत तावरे घराण्याचा इतिहास अजून मोठ्या प्रमाणात उजेडात येऊ शकतो.. या बद्दल प्रयत्न होणे गरजेचे आहे...!
#तावरे पाटील
©शेखर शिंदे
चित्र :- Ai च्या मदतीने बनवलेले मल्हारजी तावरे पाटील यांच चित्र
संदर्भ:- शिवचरित्र साहित्य खंड 2
पेशवे माधवराव दप्तर
इतिहास संग्रह

Saturday 24 February 2024

नेसरिची लढाई

 








नेसरिची लढाई
🚩#वेडात दौडले _वीर मराठे #सात 🚩
आज २४ फेब्रुवारी शौर्य दिन इतिहासाच्या पानावर नेसरीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे .ही घटना घडली तो दिवस इंग्रजी तारीख २४ फेब्रुवारी १६७४ शिवराज्याभिषेका पूर्वी काही महिने महाराज पन्हाळगडावर होते. याच काळात आदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती -घोड्यांसह वीस हजार सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागतात प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना छत्रपती शिवाजीराजांनी गडावर बोलावले, आणि आज्ञा दिली की, "खान वळवळ भारी करतो, त्यास मारोन फते करणे"
महाराजांची आज्ञा घेऊन सरसेनापती प्रतापराव गुजर आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले .बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता.मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूस झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली. पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करल्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही.त्यांनी प्रतापरावांकडे आपला वकील पाठवला .वकिलाच्या रदबदलीने आणि गोड शब्दांनी प्रतापरावांचे मन तयार झाले.खानाची चांगली खोड मोडल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी त्यांना खात्री वाटली .
सरसेनापती प्रतापराव गुजरांनी खानाला अभय दिले .इतकेच नाही तर त्याला कैद न करता,तेथून निघून जाण्यास वाट करून दिली.खानाने प्रतापराव गुजरांचा विश्वास घात केला होता.या सर्व गोष्टी महाराजांना कळल्यावर महाराज अत्यंत चिडले होते.कारण महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव गुजर अत्यंत कमी पडले होते.
बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका हुशार आणि हिकमती महाराजांना आल्याशिवाय राहिली नाही.महाराजांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून "सला काय निमित्य केला? असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत ,सेनापती सारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या महाराजांच्या खरमरीत पत्रामुळे प्रतापराव गुजर मनातून दुखावले गेले.
महाराजांच्या अंदाजाप्रमाणे बहलोलखान याने परत हल्ले करण्यास सुरुवात केली. शिवराज्याभिषेकाची अत्यंत जोरदार तयारी राजगडावर सुरू होती .आणि यातच बहलोलखानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते .त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले," हा बहलोलखान वरचेवर का येतो त्यास गर्दीस मिळवून फत्ते करणे .अन्यथा आम्हाला तोंड न दाखवणे .राज्याभिषेकापूर्वी बहलोलखानाचा जर फडशा उडविला नाही तर ,राज्यारोहणप्रसंगी महाराजांना प्रतापरावांचा मानाचा पहिला मुजरा झडणे अशक्य होते! रायगडावरचे दरवाजे एकट्या प्रतापरावास बंद होते.!
महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या खुप जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते .खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर प्रतापराव गुजरांना लागली. आणि हाताशी असणार्या सहा शिलेदारांसह प्रतापराव खानावर चालून गेले.खानाच्या अफाट सैन्यासमोर या सात विरांचा निभाव लागणे कठीण होते. प्रतापराव धाडस आणि शौर्याची परिसीमा गाठू लागले होते.
एवढ्या प्रचंड पठाणी फौजा पुढे आपण अवघे सात जण काय करू शकणार असा साधा विचार सुद्धा त्यांच्या डोक्यात आला नाही.सात जणात विसाजी बल्लाळ , विठोजी शिंदे, विठ्ठल पिळदेव ,दिपाजी राऊतराव ,सिद्धी हिलाल,कृष्णाजी भास्कर या सर्वांनी खानाला गर्दीला मिळवल्याशिवाय महाराजांना मुजरा नाही असे ठरवले होते. प्रतापराव देहभान विसरले त्याने एकदम बेहोषपणे बेहाय घोडा पिटाळला. त्यांच्या मागोमाग ते सहा शिलेदार दौडत सुटले!कुठे ?बहलोलखानावर ! पठाणावर ! सहा ते अन् सातवे प्रतापराव ! अवघे सात ! सातच ! सूर्याच्या रथाचे जणू सात घोडे रथापासून निखळले !आणि बेफाम सुटले .
प्रतापरावांचा तोल सुटला. मराठी रक्त तेलासारखे भडकले. जमीन तडकू लागली. धुळीचे लोट उधळीत उधळीत सातजण नेसरीच्या रोखाने निघाले.
प्रतापराव सूडासाठी तहानलेले होते.त्यांच्या मस्तकात संताप आणि सूड घुसळून उठला होता. विचारायला तेथेही रिघच नव्हती .प्रतापराव सरदारी विसरले .त्यांनी केवळ शिपाईगिरीची तलवार उचलली .त्यांना आता कोण थांबू शकणार होते? ते आणि ते सहाजण बंदुकीच्या गोळ्या सारखे सणाणून सुटले होते.
बहलोलखान अफाट फौजेनिशी नेसरीच्या डोंगरातील खिंड ओलांडीत होता. एवढ्यात धुळीचा पिसारा पसरीत पसरीत हे सात मराठी स्वार खानाच्या फौजेवर चालून आले. कोणत्या शब्दात वर्णन करायचे त्यांच्या आवेशाचे आणि त्यांच्या अविचाराचे? बहलोलखान चकितच झाला. अवघ्या सहा लोकांनिशी खासा प्रतापराव आपल्यावर चालून येईल अशी सुखद कल्पना त्याला मनोराज्यातही कधी आली नव्हती.
सरसेनापती प्रतापराव आणि ते सहा खानाच्या तुफान खवळलेल्या सेना समिंदरात एकदम तलवारी घालीत घुसले .जे त्यांच्या तडाख्यात सापडले ते मेलेच पठाणांच्या एवढ्या प्रचंड फौजेत अवघे सात विजेचे लोळ अनिर्बंध धुमाकूळ घालू लागले. सातांनी शर्थ केली.पठानांचे घाव सातावर कोसळत होते. नेसरीची खिंड रक्ताने शिंपून निघाली .शत्रूचा गराडा सातांभोवती भोवर्यासारखा पडला. वादळात घुसलेल्या नौका खालीवर होऊ लागल्या. इतक्याविरुद्ध अवघे सात ! किती वेळ टिकतील? एक एक इरेचा मोहरा धरणीवर कोसळू लागला .शर्थीची समशेर करून अखेर प्रतापरावही उडाले ! ठार झाले ! दख्खनच्या दौलतीतले सात तारे तुटले! महाराजांचा दुसरा तानाजी पडला !खानाच्या सेनासमिंदराची प्रचंड लाट महाराष्ट्रातून वाहात गेली.
महाराजांचे शब्द प्रतापरावांच्या इतक्या खोलवर वर्मी रुतले होते. खानाला तरी मारीन नाही तर मी तरी मरेन अशी तिडीक त्यांनी धरली होती. धाडस आणि शौर्याचे परिसीमा गाठणारे हे वीर धारातीर्थी पडले. महाराजांना ही वार्ता कळल्यावर ते अतिशय दुःखी झाले .राज्याच्या सरसेनापतीला दूरदृष्टी हवी ही अपेक्षा महाराजांनी करणे स्वाभाविक होते, परंतु भावनेच्या भरात सरसेनापती प्रतापरावांसारख्या निधड्या छातीचा वीर दुसरी चुक करुन बसला 24 फेब्रुवारी 1674 रोजी प्रतापरावांसह सहा वीरांना वीरगती मिळाली.दौलतीचे फार मोठे नुकसान झाले. महाराजांचा दौलतबंकी हरपला .
प्रतापरावांच्या मृत्यूने मनाला लागलेली टोचणी शिवरायांनी प्रतापरावांच्या कन्येशी आपले धाकटे पुत्र राजारामांचा विवाह करून काहीशी कमी केली. नंतरच्या काळात छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या कैदेतून शंभुपुत्र शाहूंना मुसलमान करण्याचा घाट औरंगजेबाने घातला असताना त्यांच्याऐवजी प्रतापरावांचे दोन पुत्र खंडेराव व जगजीवन राव यांनी पुढे होऊन मुस्लिम धर्म स्वीकारला व शाहुराजांना बाटवण्यापासून वाचवले.
नेसरी येथे प्रतापरावांचे समाधीस्थान अत्यंत चांगल्या रीतीने जिर्णोध्दारीत करून त्यांचा पुतळा गावातील मुख्य चौकात उभा करण्यात आला आहे. भोसरे या त्यांच्या जुन्या वाड्यातही त्यांचे छोटेखानी स्मारक उभारण्यात आले आहे.
या सात योद्धांची नावे….
१) विसाजी बल्लाळ.
२) दीपोजी राउतराव.
३) विट्ठल पिलाजी अत्रे.
४) कृष्णाजी भास्कर.
५) सिद्धि हिलाल.
६) विठोजी शिंदे
७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर
🙏अशा या सात विरांना कोटी कोटी प्रणाम 🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

🚩रायाजीराव जाधवराव ( भुईंज )🚩

 




🚩रायाजीराव जाधवराव ( भुईंज )🚩
२५ फेब्रुवारी १७२८
जिजाऊंचे वडील लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील मातब्बर व पराक्रमी सरदार होते. १६२९ मध्ये देवगिरीच्या किल्ल्यात बुरा निजामशहा तिसरा ह्याने केवळ संशयावरून लखुजीराव जाधवराव त्यांचे पुत्र रघुजी व अचलोजी आणि लखुजींचे नातू यशवंतराव यांची हत्या केली. जिजाऊंचे जन्मदाते व दोन भाऊ ,भाचा ठार झाले .बंद झालेले माहेर पुढे संपूर्ण उध्वस्त झाले. जिजाऊ व शिवाजीराजे पुढे दोन वर्षांनी सिंदखेडला आले. लखुजीराजे यांच्या मृत्यूनंतर जाधव घराण्यातील वीर पुरुष व स्त्रियांनी अत्यंत मोलाचे कार्य पुढे स्वराज्यासाठी केले.
जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ बंधु संभाजीराजे यांच्या बरोबर कनकगिरीच्या लढाईत लखुजीराजे यांचे नातु सृजनसिंह ऊर्फ संताजी जाधव ठार झाले होते. कारण स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मदत म्हणून जाधवांकडील लोकांना जिजाऊसाहेबांनी आपल्या सोबत आणले होते.
संताजी जाधवांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शंभूसिंह जाधवराव, दत्ताजी जाधवरावांचा मुलगा ठाकूरजी यांना जिजाऊंनी आपल्याबरोबर राजगडावर आणले होते. मोठ्या प्रेमाने आऊसाहेबांनी त्यांचा सांभाळ केला होता. शंभूसिंह जाधवराव स्वराज्यनिर्मीतीच्या कामासाठी छ. शिवाजीराजांच्या बरोबर होते .त्यांनी राजांबरोबर अत्यंत मोलाचे कार्य केले. अफजलखानाच्या वधाच्या वेळी महाराजांच्या सोबत शंभूसिंह जाधवराव होते. सिद्दी जौहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला तेव्हा महाराजांना विशालगडावर पोहचण्याचे अत्यंत जिकीरीचे काम शंभूसिंह जाधवरावांनी केले होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणाकरता गजापूरच्या खिंडीत शंभूसिंह जाधवराव प्राणपणाने लढले होते. याच लढाईत शंभूसिंह जाधवराव ठार झाले होते.त्यानंतर त्यांचाच मुलगा धनाजी जाधवराव यांनी छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठ्यांचा स्वतंत्र लढा लढविला व आपले स्वराज्य वाचवले होते. संताजी जाधव यांचे पुत्र शंभूसिंह जाधवराव यांनी आपले बलिदान देऊन स्वराज्यासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले होते.
लखुजीराजाच्या वंशातील कर्तबगार पुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यनिर्मीतीच्या कामी अत्यंत मोलाची साथ दिली होती.
पुढे अचलोजींच्या पत्नी आपले पुत्र संताजी यांच्यासह जिजाऊंच्या आश्रयाला आल्या. लखुजीराजे यांचे बंधू जगदेवराव मोगलांना जाऊन मिळाले. लखुजीराजे यांचे मारले गेलेले पुत्र रघोजी, नातू यशवंतराव यांच्यापैकी एकाचे वंशज सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे स्थायिक झाले.
पुढे जिजाऊ साहेबांनी आपल्या नात म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या दोन नंबरच्या कन्या राणुआक्का यांचा विवाह अचलोजी जाधवरावांशी मोठ्या धुमधडाक्यात राजगडावर लावून दिला.पुढे अचलोजीराजे जाधवराव व राणुआक्का यांना सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील जहागिरी देऊन राजांनी त्यांचा जणू गौरवच केला.या विवाहामुळे माँसाहेबांनी आपले माहेर, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले. या राणुआक्कांचे वास्तव्य भुईंज येथेच होते .जाधवरावांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वाघोली येथे स्थायिक झाली.
छत्रपती शाहू महाराजांच्या काळात भुईंजचे रायाजीराव जाधव हे महत्वाचे सरदार होते. रायाजीरावांना भुईंजसह नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी, महालगाव व पिंपळगाव येथील पाटीलकी व इनाम जमिनी होत्या. शाहू महाराजांच्या काळात आपल्या पराक्रमाने रायाजींनी अनेक अधिकार मिळवले.ह्यात गंगापूर महालाची चौथाई वसुली, राहुरी आणि अंमळनेरचा मोकासा आणि संपूर्ण निरथडी प्रांतातील सरंजामासाठीची नेमणूक व पाटीलकी वतनाचे उत्पन्न मिळून रायाजीरावांना १५ लाख रुपयांचा एकूण सरंजाम होता.
छत्रपती शाहूराजांच्या राज्य विस्ताराच्या मोहिमेत रायाजीराव लढायांवर जात असत. पेशवे पहिले बाजीराव व हैदराबादचा निजाम यांच्यात पालखेड येथे पहिला संग्राम घडला. यात बाजीरावाने निजामाच्या सैन्याला चारी बाजूने घेऊन कोंडले. यातून सुटण्यासाठी हल्ले करणार्या निजामाच्या सैन्याविरुद्ध लढताना रायाजीराव २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेड येथे लढाईत धारातीर्थी पडले.निजाम अखेर शरण आला पण मराठेशाहीने एक महत्त्वाचा मोहरा गमावला .छत्रपती शाहू महाराजांनी रायाजीरावांचे पुत्र खंडोजीराव यांना १७३३ मधे दिलेल्या संनदेत वरील सरंजामाचे नूतनीकरण करून दिले.
भुईंजमध्ये रायाजीरावांची भव्य दगडी बांधकामाची काहीशा अनोख्या शैलीची समाधी आहे. कोरीव कामाने सजविलेल्या ह्या समाधीचे बांधकाम लखुजीराजे यांच्या समाधीशी शैली व मराठेकालीन बांधकामाचे मिश्रण आहे. गावाच्या विस्तारात समाधी चारी बाजूंनी झालेल्या बांधकामात झाकाळून गेली आहे .समाधीच्या अंतर्भागात शिवपिंडीमागे रायाजीरावांच्या पत्नीसह मूर्ती आहे. त्यांच्या पत्नी बहुधा सती गेल्याने या दांपत्याची एकत्रित मूर्ती स्थापन केली असावी. गावात जाधवरावांचा जुना वाडा असून भूईंजचा रामनवमीचा उत्सव प्रसिद्ध आहे.
आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाउलखुणा जपत मोठ्या दिमाखात उभा आहे.
राणुआक्का व रायाजीरावांचे वंशज महेंद्रसिंह ऊर्फ भैय्यासाहेब जाधवराव आजही येथे वास्तव्यास आहेत.
🙏 अशा या थोर व शौर्यशाली रायाजीराव जाधवरावांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा 🙏
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
संदर्भ
शिवपत्नी महाराणी सईबाई
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

राजे लखुजीराव जाधवराव यांचे जेष्ठ पुत्र दत्ताजीराव व शहाजीराजे यांचे चुलत बंधु संभाजी भोसले

 


राजे लखुजीराव जाधवराव यांचे जेष्ठ पुत्र दत्ताजीराव व शहाजीराजे यांचे चुलत बंधु संभाजी भोसले  🚩
२३ फेब्रुवारी रोजी राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र दत्ताजीराव जाधवराव व शहाजीराजे यांचे चुलत बंधु संभाजी भोसले यांचा स्मृती दिन.
राजे दत्ताजीराव जाधवराव व संभाजी भोसले यांचा मृत्यु २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला.
निजामशाही दरबारामध्ये खंडागळे नावाचा एक सरदार होता .दरबाराचे काम संपवून सर्व सरदार मंडळी आपापल्या घराकडे जाण्यास निघाले असता खंडागळे सरदारांचा हत्ती अचानकपणे बिथरला व वाटेत येईल त्याला बेफामपणे चिरडून तुडवू लागला. हत्तीवरती माहुत होता. तो हत्तीला आवरण्यासाठी प्रयत्न करत होता. पण तो बिथरलेला गजराजा लोकांना तुडवीत चित्कार करीत धावत होता. त्याने असा काही अवतार धारण केला होता की त्याला अडवण्याची कोणाची छाती होईना ; त्या पिसाळलेल्या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवराव म्हणजे जिजाऊंचे भाऊ यांना सहन होईना.कारण हत्तीने जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून उडवून दणादणा भुईवर आदळले व पायाखाली चिरडून मारले.
दत्ताजीं जाधवरावांचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले .हा पराभव दत्ताजी जाधवराव यांना खुप झोंबला .दत्ताजी जाधवराव हत्तीहून जास्त पिसाळले व हत्तीवरच धावून गेले. स्वतः दत्ताजी जाधवराव हत्तीशी सामना करू लागले. त्यांनी हत्तीवर वार करून त्याची सोंड धडावेगळे केली. खूप गर्दी व गोंधळ, धक्काबुक्की आणि रेटारेटी झाली. आपल्या हत्तीला वाचवण्यासाठी खंडागळे सरदार मध्ये पडले. यावेळी मालोजीराजांचे बंधू विठोजी भोसले व त्यांची दोन मुले संभाजी भोसले व खेळोजी भोसले खंडागळे यांच्या मदतीला धावून आले.
दत्ताजी जाधवरावांनी रागाच्या भरात आपला मोर्चा संभाजी भोसले यांच्याकडे वळवला .संभाजी भोसले यांची तलवार सपासप वार करू लागली. दोघांची खडाजंगी लढाई सुरू झाली. खडाखड एकमेकांवर घाव पडू लागले.दत्ताजी जाधवराव व संभाजी भोसले या दोघांची झटापट पाहून दोन्ही बाजूची मंडळी हत्यारे घेऊन धावली व एकच झुंबड उडाली. दोन्ही पक्षात अटीतटीची झुंज सुरू झाली. क्षणभरातच दत्ताजी जाधवराव व संभाजी भोसले एमेकावर तूटून पडले. हत्तीचे बिथरने बाजूलाच राहिले. जाधवराव व भोसले आपआपसात भांडू लागले .नाते-गोते विसरून एकमेकावर हत्यार चालवू लागले. हे पाहून एकमेकांचे सैनिकही एकमेकांवर हल्ला करू लागले.
दत्ताजी जाधवरावांनी सैनिकावर प्रतिहल्ला करून अनेक लोकांना ठार मारले. हे पाहून विठोजी भोसले यांचे पुत्र संभाजी भोसले यांनी दत्ताजी जाधवराव यांच्यावर हल्ला करून त्याचे शीर धडावेगळे केले. लखुजी जाधवराव त्यावेळी तेथे नव्हते.त्यांना व शहाजीराजांना हे वृत्त समजताच दोघेही माघारी फिरले. आपापल्या लोकात मिसळून एकमेकांच्यावर तुटून पडले. आपला पुत्र ठार झाल्याचे पाहून लखुजीराजे यांच्या डोळ्यात अंगार फुलला.भयानक ज्वालामुखी भडकला. संतापाने लखोजी जाधवराव लाल झाले. अंगाची लाही लाही झाली. त्यांच्या क्रोधाने अवघ्या दशदिशा शहारल्या.लखुजीराजे यांना समोर दिसले ते आपले जावई शहाजीराजे.
प्रत्यक्ष जावई .लाडक्या लेकीचे कुंकू. कसली माया आणि कसली नाती. आपल्या पोटच्या गोळ्याचा अंत करणाऱ्याचा नायनाट करण्याकरता त्यांनी आपली तलवार उपसली.त्या रागातच त्यांनी संभाजी भोसले यांना ठार केले. आपला भाऊ वाचत नाही हे पाहून शहाजीराजे मध्ये पडले. परंतु लखुजी राजांनी संतापून जावई शहाजीराजे भोसले यांच्या दंडावर तलवारीने वार केला .झालेल्या जखमेने दंडातून भळाभळा रक्त वाहू लागले.त्याचा परिणाम होऊन शहाजीराजे बेशुद्ध पडले. शहाजीराजांच्या अंगरक्षकांनी त्यांना उचलून नेले. या घटनेने सारे आवाक झाले.सगळीकडे हाहाकार उडाला.
निजामशहा मलिक अंबर पर्यंत ही बातमी गेली. तेव्हा त्यांनी मध्ये पडून दोन्ही पक्षाला बाजूला सारून सर्व आपसातील भांडणे मिटवली. लखुजी जाधवरावांना असे वाटले की निजामशहाने शहाजीराजांची बाजू घेतली. लखुजीराजांनी या गैरसमजातून निजामशाहीचा धिक्कार करून पुन्हा मोगलांची नोकरी पत्करली. तसेही निजामशहाचा लखुजी राजांवर विश्वास नव्हता. निजामाने लखुजीराजांनाच दोष दिला.लखुजीराजे अत्यंत मुत्सद्दी, अनुभवी व वजनदार सरदार होते.ते रागापोटी मोगलांकडे निघून गेले. मोगलांनी त्यांना २४,००० स्वारांची मनसब आणि १५,००० घोडेस्वारांचा सरंजाम दिला.
मोगलांना दक्षिणेतील राजकारणात लखुजी राजांसारखा चांगला मोहरा मिळाल्याचा आनंद झाला. त्यामुळे त्यांनी आपल्याकडे लखुजीराजे यांची एकाद्या शहजादा प्रमाणे बडदास्त ठेवली गेली .लखोजीराजे जाधवरावांनाही आपल्या महत्वाकांक्षेची पूर्ती झाल्याचा अनुभव आला.पण या सर्व प्रकरणात जाधव-भोसले कुटुंबातील दोन जीव विनाकारण बळी गेले .या प्रकरणामुळे दोन्ही कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले. एक तासापूर्वी कोणालाही कल्पना नव्हती की इथे असा काही भयंकर प्रकार घडेल.जाधवराव - भोसले यासाठी लग्नबंधनाने एकत्र आले होते का?
ढाली - तलवारी घेऊन लढण्यासाठी ? आपल्या बायकांच्या कपाळाचे कुंकू रक्षणासाठी का पुसण्यासाठी ? भोसले संभाजीसाठी तर जाधवराव दत्ताजिकरीता अश्रू ढाळत बसले .जिजाऊंनी कोणासाठी रडावे भावासाठी की दिरासाठी.हत्ती आपसात झुंजले. जिजाऊंचे माहेर कायमचे परके झाले. भोसले जाधवराव कायमचे अंतरले .परंतु जिजाऊंनी सासर - माहेरच्या भांडणाचा राग आपल्या संसारावर अजिबात होऊ दिला नाही .
खंडागळे हत्ती प्रकरण अनपेक्षितपणे घडलेली घटना होती. या प्रकरणामुळे जाधव-भोसले कुटुंबात तणावाचे वातावरण तयार झाले पण ते फार काळ टिकले नाही. मलिक अंबरने मात्र वरील प्रकरणाचा फायदा घेऊन लखुजी जाधवरावांना मात्र कायमचे दूर केले .मलिक अंबर लखुजीराजे यांचा कायमचा द्वेष करत होता. शहाजीराजे व लखुजीराजे यांच्यामध्ये कायमचे वितुष्ट निर्माण करण्याचे निजामाचे प्रयत्न होते; पण त्यात त्याला फारसे यश आले नाही.
आता काय म्हणायचे या दैवगतीला ? काय नाव द्यायचे ह्या यादवीला ? दत्ताजींच्या आणि संभाजीराजांच्या राण्यांचे ! दोघींच्याही भाळी वैधव्य आले.बांगड्या फुटल्या... कशासाठी ? काय कारण ?.. काही नाही ! काय तर म्हणे एक हत्ती बिथरला. पण म्हणून काय माणसाने एवढे बिथरायचे ?
जाधवरावांच्या सिंदखेडराजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशजशाखा जवळखेड , उमरद , रुसुमचे या असुन सिंदखेडराजा परिसरा व्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज (सातारा), करवंड,कन्हेरखेड,वडाळी व सारवडी या होत...
दत्ताजी जाधवराव व संभाजी भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा
लेखन ✒️
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

🚩९ फेब्रुवारी १६८९ छत्रपती राजाराम महाराज यांचे मंचकारोहण🚩

 


🚩९ फेब्रुवारी १६८९ छत्रपती राजाराम महाराज यांचे
मंचकारोहण🚩
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य संरक्षण हेच आता जीवितकार्य मानून मराठ्यांमध्ये नीतिधैर्य वाढवण्याचे काम येसूबाई राणीसाहेबांनी निर्माण केले होते. ही गोष्ट विलक्षण मानली पाहिजे. मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतींचा असा बाणेदार शेवट झाला होता.व स्वराज्यासाठी औरंगजेबाशी कोणतीही तडजोड न करता संभाजीराजांनी आपला मृत्यू स्वीकारला होता.छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसूबाई यांच्या अंगावर जणू ब्रह्मांडच कोसळले होते. एखाद्या उंच कड्यावरुन मृग पाय घसरून खाली पडावा ,आणि त्याचा गतप्राण देह पाहून हरिणी वेडीपिशी व्हावी, तशी अवस्था येसूबाई राणीसाहेबांची झाली होती .
जो जन्माने राजा होता, वृत्तीने राजर्षी होता ,अशा आपल्या प्राणप्रिय पतिराजांच्या नशिबी हे असे दुर्दैवाचे दशावतार येऊन ,येसूराणींच्या भाळावरचा सौभाग्यसूर्य अस्ताकडे प्रवास करीत होता. रात्रीचा दिवस करून येसूबाई आल्या प्रसंगाला निर्धाराने तोंड देत देत पुरत्या एकाकी झाल्या होत्या .
वादळातली मोगरवेल भरभरावी तशी अवस्था येसूबाई राणीसाहेबांची झाली होती. क्षणभरातच ऊभी हयातच फिरल्या सारखी झाली होती .
स्वारीला दोन वर्षाचे असताना सोडून गेलेल्या आईसाहेब ,भरल्या डोळ्यांसमोर सूनबाई आहोत असे कधीच भासू नये असे आबासाहेब ,थोरल्या आऊ ,सती गेलेल्या माँसाहेब यांनी दिलेला घरोबा, सिंहासनाच्या हौव्यासापोटी रात्रंदिन स्वारींना व आम्हाला पाण्यात बघणाऱ्या सोयरा माँसाहेब , त्यांचे पाठीचे बंधू असून आम्हाला वडीलकीचा आधार देणारे हंबीरमामा,साफ मनाची ,वावगी बाब समोर आली तर तडक बोलून दाखवणारी स्वारी .आई वेगळ्या आपल्या नातवावर मायेची सावली धरणारे आजोळचे फलटणकर नाईक निंबाळकर हे सारे आठवून लहान मुलीगत हमसुन हमसून रडणार्रया ,आणि आपण "श्री सखी राज्ञी जयती"आहोत राजगडावर आहोत, महाराणी आहोत याचे कशाचे कशाचे भान नसणार्या येसूबाई राणीसाहेबांच्या समोर केवढा मोठा प्रसंग उभा राहिला होता.
संभाजीराजांच्या क्रूर हत्येने संपूर्ण मराठा मंडळ अत्यंत शोकाकुल झाले होते .येसूबाई राणीसाहेबांच्या कपाळीचे कुंकू पुसून सुर्य जणू अस्ताला निघाला होता.
तरिही आपल्या स्वतःचे दुःख बाजूला ठेवून येसूबाईंनी खुप मोठा निर्णय घेतला होता.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जरा कुठे राज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न होत असतानाच त्यांच्यावर हा आघात अगदी वर्मी बसला होता .पुरंदरचा तह करून छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्याचे रक्षण केले होते, तसाच स्वराज्य रक्षणाचा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाडक्या व जेष्ठ सुनेवर येऊन ठेपला होता. छत्रपती शिवाजीराजे व जिजाऊंच्या संस्कारात वाढलेल्या येसूबाईंनी आपले स्वराज्य सांभाळण्यासाठी पावले उचलली होती .समयसूचकता अंगी बाणलेल्या येसूबाईंच्या समोर दोन पर्याय होते.एक म्हणजे ७ वर्षाच्या आपल्या पुत्राला शाहूला गादीवर बसवून राज्यकारभार करणे, आणि दुसरा पर्याय म्हणजे आपले दीर राजारामास गादीवर बसवून अष्टप्रधानांच्या सहकार्याने राज्यकारभार करणे .
अशा परिस्थितीत शक्य तितक्या लवकर कोणताही निर्णय घेणे गरजेचे होते . रिक्त झालेल्या छत्रपती पदाचा राजाविना कोणतेही निर्णय घेणे ,युद्ध मोहिमांच्या हालचाली करणे कठीण होते .औरंगजेबासारखा शत्रु स्वराज्यात ठाण मांडून बसला होता. अशा परिस्थितीत लवकर निर्णय घेणे गरजेचे होते . एखाद्या स्वार्थी, सत्तालोलूप स्त्रीने आपल्या मुलाला गादीवर बसवून राज्यकारभार केला असता ,पण येसूबाईंनी असे न करता स्वार्थ व त्यागाचा आदर्श मराठा राज्यासमोर ठेवला .आपल्या मुलाला गादीवर न बसवता स्वतःहून राजारामाचे मंचकारोहण ९ फेब्रुवारी १६८९ रोजी करण्याचा निर्णय घेतला .त्यांच्या या निर्णयाने मराठा राज्याचा प्रश्न मिटला, आणि दुसरी गोष्ट सर्व मराठा मंडळी एक होऊन औरंगजेबाविरुद्ध लढण्यासाठी सिद्ध झाली.औरंगजेब दिल्लीहून अखंड भारताचा बादशहा होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आला होता.त्याचे स्वप्न उध्वस्त करण्यामधे येसूबाई राणीसाहेबांचा मोठाच हात होता.प्रबळ इच्छाशक्ती, नवी उमेद , नि:स्वार्थपणे केलेला त्याग, औरंगजेबाची शक्ती कमी करण्यात नक्कीच कारणीभूत ठरला.सरदार व अधिकारी यांच्याशी चर्चा करून ,मराठी राज्यात फूट पडणार नाही याची येसूबाई राणीसाहेबांनी काळजी घेतली.
९ फेब्रुवारी इ.स.१६८९ किल्ले रायगडाला झुल्फिकार खानाचा वेढा होताच त्यामुळे गडावर मसलत बसुन महाराणी येसूबाईसाहेब व सर्वानुमते राजाराम महाराजांचे मंचकारोहण पार पडले.
इतिहासाच्या दृष्टीने येसूबाई राणीसाहेब समरांगिनी, रणरागिनी जरी नसल्या तरी धैर्य समयसूचकता व स्वाभिमान या गुणांनी त्या परिपुर्ण होत्या .राज्याचे कल्याण व्हावे ,राज्य शत्रूपासून वाचवावे ही लोककल्याणाची भावना येसुबाईंच्यामध्ये होती.अत्यंत प्रयत्नशील ,शांत ,संयमी ,धीराची अशी ही शिवाजीराजांची ज्येष्ठ सून होती. या महाराणीस तब्बल २९ वर्षे मोगलांच्या कैदेत ,अपमानीत जीवन जगावे लागले .यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
🙏अशा या " सखी राज्ञी जयतीला" आमचा मानाचा मुजरा 🙏
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
संदर्भ ग्रंथ
महाराणी येसूबाई
लेखक
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

लोककल्याणकारी राजे सयाजीराव गायकवाड

 

🚩

लोककल्याणकारी राजे सयाजीराव गायकवाड  🚩
सयाजी महाराजांचा जन्म १० मार्च १८६३ रोजी झाला. महाराज सयाजीराव गायकवाड हे १८७५ ते १९३९ दरम्यान बडोदा संस्थानचे राजे होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना विशेषत्वाने ओळखले जात.
,प्रजाहितदक्ष आदर्श सयाजी नरेश पूर्वाश्रमीचे गोपाळ काशीराम गायकवाड होत ते अत्यंत हुशार व चुणचुणीत होते.
दहा मार्च १८६७ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवळाने येथे त्यांचा जन्म झाला .सर्व साधारण शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले गोपाळ पुढे बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यू नंतर राजघराण्यात दत्तक म्हणून गेले. आणि बडोद्याच्या राजगादीवर एक महाराजा म्हणून सिंहासनारूढ झाले .
.हिंदुस्थानातील एकमेव अशा सयाजीराव महाराजांनी आपल्या छोट्याशा संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन ,सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा ,अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन ,कला शिक्षणाची सोय ,सर्वसामान्य माणसांसाठी अशा कितीतरी सुधारणा त्यांनी प्रत्यक्षात आणल्या.त्या व्यतिरिक्त स्त्रियांच्या बाबतीतही पुढाकार घेऊन त्यांचे रुग्ण हक्क त्यांना मिळावेत म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले .बालविवाह बंदी ,स्त्रियांना वारसाहक्क, विधवा विवाह ,कन्या विक्रीय बंदी ,पडदा पध्दत बंदी ,इत्यादी सुधारणा आपल्या संस्थानात करून स्त्रियांना आधुनिक युगाचे दालन उघडून दिले .
अत्यंत पुरोगामी विचाराच्या या महाराजांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले.१८८६ मध्ये मुंबई येथील एका समारंभात उस्फूर्तपणे त्यांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी प्रदान केली. तसेच डॉक्टर आंबेडकरांना शिष्यवृत्ती आणि नोकरीही दिली .दादाभाई नवरोजी ,नामदार गोखले, महात्मा गांधी ,मदन मोहन मालवीय, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे , कर्मवीर भाऊराव पाटील ,न्यायमूर्ती रानडे या समाजधुरीणांना नैतिक व आर्थिक मदत केली.अत्यंत चातुर्याने क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांना आणि कर्त्या समाजसुधारकांना अप्रत्यक्षपणे महाराजांनी सर्वतोपरी मदत केली.
सयाजीराव महाराजांनी राजेशाहीचे लोकशाहीत रूपांतर करण्याचा धाडसी प्रयोग करून ,भारताच्या जडणघडणीचा पाया रचला. जनतेला मतदानाचा अधिकार, ग्रामपंचायतीची स्थापना सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा ,वाचनालयाची स्थापना ,अस्पृश्यता, वेट बिगारी, बालविवाह प्रतिबंधक कायदे ,राज्यात समृद्धी आणण्यासाठी रस्ते ,पाणीपुरवठा जमीन सुधारणा, आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायासाठी कौशल्य, शिक्षण, कायद्याचे सामाजिकीकरण व पारदर्शी प्रशासनासाठी जन माध्यमांचा प्रभावी वापर अशा अनेक मार्गाने विधायक राजनीतीचा नमुना आदर्श निर्माण केला.
नागरिकांमध्ये साहित्य व कलेची अभिरुची निर्माण करण्यासाठी आणि कलावंतांना राजाश्रय देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यशस्वी राज्यकर्ता, कुशल प्रशासक आणि दृष्ट्या विचारवंतांची सर्व गुणवैशिष्ट्ये महाराजांकडे होतीच परंतु अस्तित्वाची कोंडी करणाऱ्या घटना प्रसंगावर मात करण्यासाठी लागणारी प्रबुद्धताही त्यांनी संपादन केली होती .
सयाजीराव गायकवाड यांना वाचनाची अत्यंत आवड होती. त्यांचे स्वतःचे मोठे ग्रंथसंग्रहालय होते. पहिले फिरते वाचनालय ही संकल्पना प्रथम सयाजीराव गायकवाड यांनीच राबवली. वाचनालयाच्या प्रसारासाठी व स्थापनेसाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले होते. ते दहा वर्षे बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय म्हणून कार्यरत होते .सयाजीराजे यांनी संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालय स्थापन केली. प्राचीन संस्कृत ग्रंथाचे प्रकाशन करण्यात त्यांनी उत्तेजन दिले .सयाजीराजांनी श्री सयाजी साहित्य माला व श्री सयाजी बालक ज्ञान माला या दोन माला मधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. होतकरू विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण मिळावे म्हणून कलाभवन ही संस्था स्थापन केली. गरजू हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
सयाजीराजांना अर्थकारणाची जाण असल्याने बँक ऑफ बडोदाची स्थापना ही त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाचे कार्य होते .त्यांना बँकेची परवानगी मिळवण्यासाठी आठ वर्षे प्रयत्न करावे लागले. शेवटी बँक स्थापन झाल्यावर त्याच्या व्याजातून आपणच स्थापन केलेल्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे अशी व्यवस्था त्यांनी केली.
ऑलिम्पिकची संधी साधून त्यांनी हिटलरची भेट घेतली होती. त्यांच्या सूचनेनुसार खेळाडूंनी बडोदे संस्थानचे प्रतिनिधी म्हणून बडोद्याचा भगवा ध्वज बर्लिन येथे वापरला .योगी अरविंद हे त्यांच्या सेवेत होते, त्यांनी त्यांना योग विद्या शिकवण्यासाठी उत्तेजन दिले .अनेक लेखक, प्रकाशक, रंगकर्मी ,शिल्पकला , शिल्पकार, चित्रकार ,तसेच उद्योजकांनाही त्यांनी अत्यंत मदत केली. जात,पात ,धर्म असा जातिभेद न करता ,सर्वांना मदत हाच त्यांचा स्थायीभाव होता.
महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते.
सयाजीराव गायकवाड हे प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत हे नियोजन करत असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. शंभर वर्षांपूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. ते प्रजाहितदक्ष राजे होते. जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली
बडोद्यात १९२७ च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जाऊ जास्त पाऊस पडला. यावेळी वाघोडियामध्ये ५५ इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागे.पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला. परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापूरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हाणी कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यासाठी उपाययोजना केल्या. लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारच्या मदत कार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली. बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला.
मुंबई येथे ६ फेब्रुवारी १९३९ रोजी निधन झाले.
🙏 अशा या थोर लोककल्याणकारी ,कर्तव्यदक्ष
समाजहितवादी राजाला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा 🙏
लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

*कथा पुण्यातील एका चौकाची.*"आप्पा बळवंत चौक (ABC ).

 

*कथा पुण्यातील एका चौकाची.*
शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याचे रुपांतर मराठ्यांनी साम्राज्यात केले. मराठ्यांच्या पराक्रमाचा दबदबा पुर्या हिंदोस्तानात गाजत होता. अशाच वेळी अहमदशाहा अब्दाली दिल्लीवर चालून आला. दिल्ली हादरली होती. मग मात्र दिल्ली रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या मराठ्यांनी आव्हान स्विकारुन दिल्ली गाठली. नेतृत्व करीत होते सदाशिवराव भाऊ पेशवे.
भाऊंच्या हाताखाली होळकर, शिंदे, पटवर्धन, मेहेंदळे असे कसलेले आणि पराक्रमी सरदार होते. दोन्ही सैन्य समोरासमोर उभी ठाकली होती. एकमेकांच्या सेना एकमेकांची ताकद अजमावत होते. याचवेळी भाऊची सेनाप्रमुखांशी खलबते चालू होती. अशाच एका खलबतात जनकोची शिंदे या अठरा वर्षाच्या सरदाराच्या स्वाभिमानाला धक्का लागला.
तसा जनकोजी पेटून उठला छावणीतून बाहेर पडला आणि सैन्यासहित गिलच्यांच्या सैन्यावर कोसळला. बघताबघता १०००० सैन्य गारद केले. पण जनकोजी शिंदेच्या पाठराखणीला भाऊंनी पराक्रमी सरदार बळवंतराव मेहेंदळेना सैन्यासह पाठविले. पण अंतर्गत वादामुळे बळवंराव मात्र लढणार्या जनकोजीला लांबून पहात होते.
शेवटी भीम पराक्रम करत जनकोजी सदाशीवभाऊंकडे परत आला.भाऊंनी त्याचा सत्कार केला. तसा जनकोजीनी भाऊंना प्रश्न विचारला माझ्या मागे बळवंतरावांना का पाठवला होता.?आणि बळवंतराव काय करत होते विचारा त्यांना.
त्यावरुन शब्दाला शब्द झाला. दरबार संपला. सगळे सरदार आपआपल्या छावणीत पोहचले. पण बळवंतरावांच्या बायकोला घडला दरबारातील प्रसंग कोणीतरी लगबगीने कळवलाच आणि त्या आर्यपत्नीचा स्वाभिमान दुखावला. तीने आरतीच्या तबकातील निरांजन पेटविले. आरती घेऊन ती छावणीच्या दरवाजातच उभी राहिली. एव्हढ्यात बळवंतराव जवळ आले.
आर्यपत्नी म्हणाली या पराक्रम करुन आलात ओवाळते पंचारतीने आपण रक्ताचा थेंब ही आपल्या अंगावर न उडविता गिलचे कापलात. बळवंतरावांनी मान खाली घातली. तसा पत्नीच्या तोंडाचा सुटला. ती म्हणाली उद्या माझ्या पोराने लोकांना कोणाचा पोर म्हणून सांगाव ? एका नामर्दाचा ? की पळपुट्याचा ? लाज कशी वाटली नाही तुम्हाला ?
पत्नी ताडताड बोलत होती आणि बोलता बोलता म्हणाली जा परत गिलच्यांना ठेचा त्याशिवाय तोंड ही मला दाखवू नका. जिंकून आलात ओवाळीन आणि लढताना स्वर्गवाशी झालात तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या शवासोबत स्वर्गात असेन.
गरम शिश्याचा रस कानात ओतावा तसे ते शब्द बळवंतरावांच्या कानात पेटले. सरदशी हात तलवारीवर निघाला. बळवंतरावांनी घोड्यावर मांड ठोकळी. बळवंतरावांचे बाहू स्पुरण पावले. हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी आरोळी घुमली. अफाट कापाकापी सूरु झाली.
गिलचे पाठीला पाय लावून मागे हटत होते. बळवंराव त्वेशाने दांडपट्टे फिरवत होते.त्यांचे कान फक्त आकडे एकत होते. हजार. पाचहजार. आठहजार. एकच कापाकापी. रक्ताचा चिखल अन प्रेतांचा ढीग. दिसू लागला. एव्हढ्यात पाठीमागच्या बाजूने शिंगाचा हलगीचा नाद घुमला. फिरणारा दांडपट्याला स्वल्पविराम देत बळवंतरावांनी मागे पाहिल.
साक्षात सदाशिवराव पेशवे लढण्यासाठी आणि बळवंतरावाच्या प्रेमासाठी रणांगणात. बळवंतरावांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. प्रत्यक्ष स्वामी. फक्त माझ्यासाठी. खरच धन्य झालो मी आज. एव्हढ्यात बळवंतरावांवर काळाने झडप घातली. एक दोन तीन चार गोळ्या बळवंतरांवाच्या छातीची चाळण करुन मोकळ्या झाल्या.
भीमाच्या ताकदीचा बळवंतरावाचा देह धरणीवर कोसळला. सदाशीवभाऊनी त्या अचेतन देहाला मिठीच मारली. आदर्श प्रेमाच हे उदाहरण.
भाऊंनी तो देह मागे आणला. पानपताजवळ अग्नी देण्यासाठी चिता रचली. बळवंतरावांची पत्नी सती जायला निघाली. त्या सती जाणार्या पत्नीला सदाशीवराव भाऊ सांगत होते. बाई तुला दोन वर्षाचा मुलगा आहे किमान त्याच्यासाठी तरी सती जाऊ नको. पण बाई आपल्या निश्चयावर ठाम राहिली. तिने ते पोर उचलून भाऊंच्या पदरात घातले आणि भाऊंना म्हणाली की याचा सांभाळ आपण करा.
आणि मोठा झाला की फक्त एव्हडच सांगा त्याला तुझे आई वडील का मेले हीच आठवण द्या. बाकी करण्यास तो नक्कीच समर्थ होईल कारण तो वीराचा पुत्र आहे. पुढे १४ जानेवारी १७६१ ला पानिपतचा रणसंग्राम झाला. मराठे तळहातावर शीर घेऊन लढले. देशासाठी धर्मासाठी महाराष्ट्राची एक तरुण पीढी एका दिवसात पराक्रम करीत मावळली.
पण,पानिपतात जय मिळवूनही अहमदशहा अब्दालीने हाय खाल्ली मराठ्यांची. अब्दालीने काही दिवसातच हिंदोस्तान सोडला. पण महाराष्ट्राने मात्र पुन्हा यज्ञकुंड पेटवला आपल्या स्वाभिमानाचा. राष्ट्रभक्तीचा आणि १७७५-७६च्या वर्षात मराठ्या पुन्हा दिल्लीला धडक दिली. पार सिंधूपर्यत भगवा रोवला. यात एक १६/१७ वर्षाचा पोर भीमथडी पराक्रम करत होता. पानपतावरच्या युद्धाचे उट्टे फेडत होता. आपल्या तलवारीचे पाणी त्याने हजारोंना पाजले.
तो पोर म्हणजेच लढवय्या बळवंतराव मेहेंदळेचाच मुलगा आप्पा बळवंत मेहेंदळे. आपल्या आई वडीलांच्या हौतात्म्याची आठवण जिवंत करणारा.
त्याच्या पराक्रमावर बेहोत खूश होऊन पेशव्यांनी त्याची आपल्या शनिवारवाड्याजवळ राहण्याची हवेली उभी करुन दिली. आणि त्याची आठवण म्हणूनच शनिवारवाड्याच्या कडेच्या चौकाचे नाव ठेवले गेले




"आप्पा बळवंत चौक (ABC ).
या चौकाच्या नावाच्या निम्मित्ताने स्मरण त्या बळवंतराव आणि आर्यपत्नीचे, स्मरण त्या सैन्यावर पोटच्या पोरासारखे प्रेम करणार्या सदाशिवरांवांचे आणि आई वडीलांचा शब्द साकार करणार्या त्या आप्पा बळवंतांचे. राष्ट्रासाठी स्वतःची आहूती देणार्या या सार्या वीरपुरुषांना दंडवत🙏
*आप्पा बळवंत चौक*
या नावाचा आज अर्थ उमगला.

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...