विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label जव्हार राजवाडा. Show all posts
Showing posts with label जव्हार राजवाडा. Show all posts

Wednesday, 18 August 2021

जव्हारचे आदिवासी राज्य भाग 4

 

जव्हारचे आदिवासी राज्य
सदाशिव टेटविलकर

भाग 4
मुकणे राजघराणे नेहमी नेमस्त व तटस्थ राहत आले. त्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे ते इंग्रज राजवटीतही सुमारे सहाशे वर्षे त्यांचे राज्य टिकून राहिले. स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे म्हणून जी आंदोलने झाली त्यात जव्हार संस्थानही होते. जव्हार संस्थानचे विलिनीकरण लवकर व्हावे म्हणून २१-१-१९४८ रोजी मुंबईस सरदारगृहात तात्यासाहेब शिखरे, नाना कुंटे, भाऊसाहेब परांजपे, शामराव पाटील, दत्ता ताम्हाणे, वासुदेवराव करंदीकर व जव्हारचे मुकुंदराव संख्ये, केशवराव जोशी, रेवजी चौधरी, दत्तोबा तेंडुलकर अशा कार्यकर्त्यांची सभा होऊन 'जव्हार लोकसेवा संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथूनच जव्हार विलिनीकरणाच्या लढ्यास प्रारंभ झाला. या लढ्याचे स्वरूप ध्यानात येताच जव्हारच्या महाराजांनी मुकुंदराव संख्ये, वासुदेव करंदीकर व दत्ताजी ताम्हाणे यांना जव्हारला बोलावून घेतले. हे तिघे आणि त्यांच्यासोबत केशवराव जोशी होते. या चौघांना अचानक अटक करण्यात आली व नंतर सोडून देण्यात आले. यानंतर करंदीकर व संख्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे सेक्रेटरी श्री. व्ही. पी. मेनन यांची दिनांक १७-३-१९४८ रोजी भेट घेऊन सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. या लढ्यात राष्ट्रसेवादल व समाजवादी पार्टीचे कार्यकर्तेही सामील झाले होते. शेवटी दिनांक २०-३-१९४८ रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचे आकाशवाणीने जाहीर केले.

जव्हारचे आदिवासी राज्य भाग 3

 

जव्हारचे आदिवासी राज्य
सदाशिव टेटविलकर


भाग 3
जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच आहे. काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात.

मुकणे राजांचा जो नवीन राजवाडा आहे तो एसटी स्टँडपासून दोन किमीवर आहे. जव्हारच्या एसटी स्टँडपासून रिक्षा केल्यास ती आपल्याला राजवाड्यापर्यंत घेऊन जाते. राजवाडा अतिशय भव्य असून त्याचे बांधकाम व रचना पाहण्यासारखी आहे. आतली दालने, दरबार हॉल, छतावरील झुंबर, भिंतीवरील राजघराण्यांतील व्यक्तींची जुनी तैलचित्रे आणि इथला एकूण परिसर आपल्याला इतिहासकाळात घेऊन जातो. भोवताली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.

जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर यांचे जावई स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. ते आपल्या सासुरवाडीला चिपळूणकरांच्या वाड्यात १९०१ ते १९०८च्या दरम्यान राहत होते. सावरकरांना अटक झाल्यावर चिपळूणकरांना जव्हारचा वाडा सोडून परागंदा व्हावे लागले. जव्हारचे रहिवाशी विष्णू उर्फ अप्पा महादेव वैद्य यांनी रत्नागिरी येथे तर रेवजी पांडू चौधरी यांनी पुणे येथे राहून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास नाही.

जव्हारचे आदिवासी राज्य भाग 2

 

जव्हारचे आदिवासी राज्य
सदाशिव टेटविलकर


भाग 2
मुहमद्दीनने इ. स. १२९४च्या सुमारास दख्खनवर स्वारी केली तेव्हा जव्हारला कातकरी, कोळी, नाईक इत्यादींच्या वेगवेगळ्या टोळ्या होत्या. आदिवासी समाज विस्कळीत होता. इ. स. १३४१ साली दिल्लीचा सुलतान महमंद तुघलक (इ. स. १३२६ ते १३४७) याने जव्हारच्या एका टोळी नायकाला राजा ही पदवी देऊन त्याला मांडलिक बनविले व त्याच्याकडून दरसाल नजराणा वसूल करू लागला. हे नायक म्हणजे आताचे मुकणे राजांचे पूर्वज होय. दरम्यान तीनशे वर्षे उलटून गेली आणि एक दिवस येथे सोनपाऊले उमटली.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय जव्हारला लागले. ५ जानेवारी इ. स. १६६४ रोजी शिवाजी महाराज स्वत: जातीने सुरतेवर स्वारी करण्यास निघाले असता त्यांना कोळवणातून म्हणजे जव्हारच्या राज्यातून जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी जव्हारच्या राजाची सदिच्छा भेट घेतली. जव्हारचा राजा विक्रमशहा पहिला याने या मराठा राजाचे जंगी स्वागत केले. त्यांच्या या भेटीची आठवण जव्हारपासून दीड किमी अंतरावरील मूरचूंडी गावाजवळ शिरपामाळ येथे एका कमानीच्या रूपाने जपून ठेवण्यात आली आहे. जव्हारच्या राजाने शिवाजी राजांची भेट घेतली ही गोष्ट दिल्लीच्या औरंगजेब बादशहाला रुचली नाही. त्याने तुम्ही दिल्लीचे मांडलिक आहात असा सज्जड दम दिला, परिणाम स्वरूप जेव्हा पुन्हा एकदा इ. स. १६७०च्या ऑक्टोबरमध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून सुरत लुटली तेव्हा मात्र जव्हारच्या राजाने मदत न करता तटस्थ राहणे पसंत केले. त्यामुळे जव्हारला बगल देत आडमार्गाने शिवाजी महाराजांना स्वराज्यात यावे लागले.

जव्हारचे आदिवासी राज्य भाग १

 

जव्हारचे आदिवासी राज्य

सदाशिव टेटविलकर

भाग १
ठाण्यावर शिलाहार राजांनी ४५० वर्षे राज्य केले, पण शिलाहारांचा राजवाडा वा त्याचे अवशेष कुठे पाहण्यात नाही, किंबहुना त्याआधी आणि त्यानंतर इथे अनेक राजवटी नांदल्या, त्यांचेही राजवाडे वा वाडे कुठे दिसत नाहीत. पण मध्ययुगात ठाणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला चहूबाजूने घनदाट जंगलाने वेढलेल्या उंच पठारावर एका आदिवासी राजाचे राज्य होते. हा पठारी भाग म्हणजे जव्हार होय. या जव्हारला जुना आणि नवा राजवाडा आहे. ठाणे जिल्ह्यातील राजघराण्यांपैकी हा एकुलता एक राजवाडा मोठ्या दिमाखात उभा आहे.

जव्हार हे शहर समुद्रसपाटीपासून दीड हजार फूट उंचीवर असून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. चहूबाजूने तुटलेले कडे, दऱ्याखोरी, त्यात वाढलेले गच्च जंगल आणि दरीत कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे असा नयनरम्य सृष्टीसोहळा पाहण्यास विशेषतः वर्षा ऋतूत अनेक पर्यटक दूरवरून येथे येतात. जव्हार म्हणजे जुने संस्थानिकाचे राज्य 'महिकावतीची बखर' यामध्ये जी ग्रामनावे येतात त्यात जव्हारचा उल्लेख 'यवसाहार प्रेक्षादिगण' असा केला आहे. येथे कातकरी आणि डोंगर कोळी लोकांची मूळ वस्ती आहे. जव्हारला आदिवासी राज्य कसे स्थापन झाले, याबद्दल दोन मतप्रवाह आहेत.

जव्हार संस्थान इ. स. १३४३ मध्ये 'जयबा' नावाच्या मूळ पुरुषाने स्थापन केले. या मूळ पुरुषाचे पूर्वज राजस्थानमधून नाशिकजवळ पिंपेरा गावी स्थायिक झालेले. रजपुतांच्या चालीरीतीचे पालन करणारे क्षत्रिय कुटुंब होते, अशी माहिती संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांनी सन १९७०मध्ये 'जयबा' नावाच्या इंग्रजी पुस्तकात दिली आहे. त्यात मूळ संस्थापकाने राज्य कसे स्थापन केले, याचे रसभरीत वर्णन करून इतिहास लिहिला आहे. जयबाने मोगलांच्या महाराष्ट्रात स्थिर होत असलेल्या सत्तेच्या जुलूमाविरुद्ध बंड करून इ. स. १३४३ मध्ये जव्हारचे स्वतंत्र राज्य स्थापले. याला ऐतिहासिक पुरावा वा सनद उपलब्ध नाही. शिवाय मोगल घराण्याची स्थापना दिल्लीत १५२६मध्ये झालेली आहे. ठाणे गॅझेटियरमध्ये खालील माहिती आहे.

जव्हार संस्थान (Jawhar State)

 


जव्हार संस्थान (Jawhar State)

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील महाराष्ट्रात असणारे एक जुने संस्थान. ठाणे जिल्ह्याच्या ईशान्येस असलेले जव्हार संस्थान सांप्रत जव्हार तालुका असून तो पालघर जिल्ह्यात आहे.
जव्हार संस्थानची राजमुद्रा.
संस्थानाचा बहुतेक भूप्रदेश पठाराचा आहे. प्रथम हे संस्थान वारल्यांकडे होते. वारल्यांकडून जयाबा उर्फ जयदेवराव मुकणे यांनी ते मिळविले आणि कोळी राज्याची स्थापना केली (१३१६). जयाबानंतर त्यांचा मुलगा धुळबाराजे उर्फ नीमशाह हे पराक्रमी शासक झाले. नीमशाहांनी सैन्य उभे करून सध्याच्या नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांतील बराच मोठा प्रदेश घेऊन सु. २२ किल्ल्यांवर नियंत्रण ठेवले. १३४३ मध्ये दिल्लीच्या तुघलकांनी नीमशहांना राजा ही पदवी दिल्यावरून नवीन शक सुरू झाला (५ जून १३४३). तो अखेरपर्यंत जारी होता. जव्हार येथील भोपटगड (भूपतगड) किल्ला या कोळी साम्राज्याची राजधानी होती.
नीमशाहांनंतर सु. दोनशे वर्षांच्या काळातील इतिहास ज्ञात नाही. पोर्तुगीजांशी युद्धे करून कोळी राजांनी वसई ते डहाणू टापूवर अंमल बसवला होता. १७८२ पासून पेशव्यांनी दुसऱ्या पतंगशाहांवर १,००० रु. खंडणी बसवली.
जव्हारचे साम्राज्य हे मुख्यत: उत्तर कोकणात असल्यामुळे त्यांचा इतर साम्राज्यांशी संबंध येत असे. त्यांत प्रामुख्याने मोगल, पोर्तुगीज, मराठे, इंग्रज यांचा समावेश होता. या कोळी साम्राज्याशी मराठ्यांचा संबंध हा छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून येतो. छ. शिवाजी महाराजांनी जानेवारी १६६४ मध्ये सुरत लुटण्यासाठी जव्हारच्या अरण्यमार्गाचा उपयोग केला. यावेळी जव्हारवर राजे विक्रमशाह मुकणे प्रथम यांचे राज्य होते.
१६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग याला औरंगजेबाने छ. शिवाजी महाराजांविरुद्ध पाठविले, तेव्हा औरंगजेबाने जव्हारच्या कोळी राजांनी स्वतः किंवा आपल्या मुलांना औरंगजेबाच्या फौजेत दाखल व्हावे, असे फर्मान पाठविले होते. त्याप्रमाणे विक्रमशाह यांनी आपल्या भावाला मिर्झाराजे जयसिंग यांच्या फौजेत दाखल केले व येथून कोळी राजे व मराठे यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली.
छ. शिवाजी महाराजांनी आपले प्रधान मोरोपंत पिंगळे यांना जव्हारवर स्वारी करण्यासाठी पाठविले (१६७२). मोरोपंतांनी ५ जून १६७२ रोजी विक्रमशाहांचा पराभव केला, परंतु विक्रमशाह मराठ्यांच्या हाती लागले नाहीत. या स्वारीत मराठ्यांना जव्हारचा सु. १७ लक्ष रुपयांचा खजिना मिळाला. मराठ्यांनी जव्हारवर १,००० रु. खंडणी बसवली. पुढे १६७८ मध्ये साल्हेरच्या लढाईत विक्रमशाहांना वीरगती मिळाली. पुढे १६८८ मध्ये विक्रम पतंगराव यांनी मराठ्यांकडून कोहोज किल्ला जिंकून घेतला.
१७५८ ते १७६१ या काळात येथे पेशव्यांची सत्ता होती. पेशव्यांनी जव्हारवर सरदेशमुखी कर बसविला. जव्हारच्या राज्यात अनेकांनी बंड केले होते. कोळी राजांना हे बंड मोडता आले नाही, म्हणून पेशव्यांना दरवर्षी १००० रु. नजराणा द्यावा लागत असे. मराठ्यांनी टकमक, तांदुळवाडी, काळदुर्ग हे किल्ले जिंकले, तेव्हा याकामी त्यांना कोळी राजांची मदत झाली (१७८२). पेशव्यांनी दुसरे पतंगशाह यांच्यावर १,००० रु. खंडणी बसवली (१७८२). दुसरे पतंगशाह १७९८ मध्ये मृत्यू पावले. पेशव्यांच्या आज्ञेवरून पतंगशाह यांचा मुलगा विक्रमशाह तिसरे यांस गादीवर बसविले; परंतु पेशव्यांना त्यांनी ३,००० रु. नजराणा देणे व त्र्यंबकच्या मामलेदाराच्या साहाय्याने राज्यकारभार केला जाईल, असे लेखी कबूल केले. विक्रमशाह तिसरे यांच्या मृत्यूनंतर (१८२१) त्यांचा मुलगा पतंगशाह तिसरे लहान असल्याने विक्रमशाहांच्या दोन्ही भावांत भांडणे सुरू झाली. यावेळी राणी सगुणाबाई यांनी इंग्रजांच्या मदतीने पतंगशाह तिसरे यांस गादीवर बसविले.
१८९० मध्ये संस्थानला दत्तकाचा अधिकार मिळाला. राजाला खूनखटल्यांचा अधिकार होता. जव्हार हीच राजधानी होती व संस्थानात १०८ खेडी होती. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे संस्थानवर पूर्ण नियंत्रण असे. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थान प्रथम मुंबई प्रांतातील ठाणे जिल्हा आणि नंतर महाराष्ट्र राज्य यांत समाविष्ट करण्यात आले.
संदर्भ :
राजवाडे, वि. का. महिकावतीची बखर, पुणे, १९९१.
साठे, श्रीनिवास, कल्याणचा इतिहास, कल्याण, १९९७.

मुकणे राजघराणे

 








मुकणे राजघराणे

जव्हार संस्थान ची स्थापना करणारे जयदेवराव (जयबाजीराजे) हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते. इ.स. १४व्या शतकात जयबाजीराजे मुकणे यांनी प्रथम या संस्थानाची स्थापना केली. आणि जवळपास ६०० वर्षे मुकणे राजघराण्याची या संस्थानावर सत्ता होती. त्यानंतर १९४७ मध्ये यशवंतराव मुकणे यांनी जव्हार संस्थान भारतात विलीन केले.
इतिहास
मुकणे राजघराण्याचे प्रथम शासक जयबाजीराव मुकणे यांनी डहाणू येथील महालक्ष्मी मंदिर बांधले. [१][२]
जायबाजीराव च्या मुलाने म्हणजे, नेमशाह मुकणे यांनी तब्बल २२ किल्ले जिंकून साम्राज्यविस्तार केला. यामुळे ५ जून १३४३ रोजी दिल्लीचा तत्कालीन सुल्तान मुहम्मद बिन तुघलक ने महाराज नेमशाह यांना शाह ही उपाधि देऊन सम्मानित केले आणि प्रथमच स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला.[३] त्यानंतर नेमशाह चा नातू महाराजा देवबारराव मुकणे यांनी बहामनी सल्तनत चे सुल्तान अहमदशहा (अल्लाउद्दीन) बहमानी विदार च्या किल्ल्यावर युद्ध केले. युद्ध कळताच ते बहामनी सल्तनत च्या राजकुमारीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न करून जव्हार ला परत आले.
मुकणे राजघराण्यातील शासनकर्ते
जव्हार संस्थान वर राज्य केलेल्या मुकणे राजघराण्यातील महाराजांची यादी पुढीलप्रमाणे आहे[४][५]
1)श्रीमंत जयबाजीराव मुकणे(इ.स.1316-1337)
2)श्रीमंत धुळाबाराव उर्फ नेमशाह मुकणे(इ.स.1337-1388)
3)श्रीमंत भीमराव उर्फ भीमशहा मुकणे(इ.स.1388-1429)
4)श्रीमंत देवबाराव उर्फ महंमदशहा मुकणे(इ.स.1429-1492)
5)श्रीमंत कृष्णाराव मुकणे प्रथम(इ.स.1492-1560)
6)श्रीमंत नेमशाह मुकणे द्वितीय(इ.स.1560-1630)
7)श्रीमंत विक्रमशाह मुकणे प्रथम(इ.स.1630-1678)
8)श्रीमंत पतंगशाह मुकणे प्रथम(इ.स.1678-1694)
9)श्रीमंत कृष्णशहा मुकणे द्वितीय(इ.स.1694-1710)
10)श्रीमंत विक्रमशहा मुकणे द्वितीय(इ.स.1710-1742)
11)श्रीमंत कृष्णशहा मुकणे तृतीय(इ.स.1742-1758)
12)श्रीमंत गंगाधरराव उर्फ पतंगशहा द्वितीय(इ.स.1758-1798)
13)श्रीमंत मालोजीराव उर्फ विक्रमशहा तृतीय(इ.स.1798-1821)
14)श्रीमंत हनुमंतराव उर्फ पतंगशाह तृतीय(इ.स.1821-1865)
15)श्रीमंत नारायणराव उर्फ माधवराव उर्फ विक्रमशहा चतुर्थ(इ.स.1865-1865)
16)श्रीमंत मल्हारराव उर्फ पतंगशहा चतुर्थ(इ.स.1865-1905)
17)श्रीमंत गणपतराव उर्फ कृष्णशहा चतुर्थ(इ.स.1905-1917)
18)श्रीमंत मार्तंडराव उर्फ विक्रमशहा पंचम(इ.स.1918-1927)
19)श्रीमंत यशवंतराव मार्तंडराव मुकणे उर्फ पतंगशहा सहावे (इ.स.1927-1978)
20)श्रीमंत दिग्विजयसिंहराजे मुकणे (इ.स.1978-1992)
21)श्रीमंत महेंद्रसिंहराजे मुकणे (इ.स1992)
संदर्भ
"महालक्ष्मी के इस मंदिर में चढ़ती है पहली फसल रहस्य जानकर चौंक जाएंगे आप - mobile". punjabkesari. 2018-12-21. 2021-02-21 रोजी पाहिले.
Tribhuwan, Robin D. (2003). Fairs and Festivals of Indian Tribes (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 978-81-7141-640-0.
"Imperial Gazetteer2 of India, Volume 14, page 87 -- Imperial Gazetteer of India -- Digital South Asia Library". dsal.uchicago.edu. Archived from the original on 2021-02-21. 2020-04-27 रोजी पाहिले.
"Indian Princely States before 1947 A-J". www.worldstatesmen.org. Archived from the original on १५ जुलै २०१५. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
"Indian states before 1947 A-J". rulers.org. Archived from the original on १५ जुलै २०१५. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.

जव्हार संस्थान





 जव्हार संस्थान

जव्हार संस्थान हे इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान मुंबई इलाख्यात विलीन झाले[१][२] जव्हार संस्थान हे ठाणे क्षेत्रातील हे एकमेव संस्थान होते. जव्हार संस्थान चे राजघराणे हे महादेव कोळी समाजाचे होते, त्यामुळे बोलीभाषेत महादेव कोळ्यांचे साम्राज्य - जयहर असे पण म्हटले जाते. या संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे हे होते.[३][४]
इतिहास
मुकणे गावातील जयदेवराव (जयबाजीराजे) हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते. जयबाजी जमीनदार/सामंत होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी ३१ लहान किल्ले जिंकले. त्याच सोबत भूपतगड हा मोठा किल्लाही त्यांनी जिंकला. नंतर भूपतगड ला जव्हार संस्थान ची राजधानी करण्यात आले. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली.
इ.स. १३१६ मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जयबा राजांना धुळबाराव आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले. इसवी सन १३४१ ते १७५८ सालापर्यंत जव्हारच्या राजाकडे दमण नदीपर्यंतचा, सह्याद्रीपर्यंतचा आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता. त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापर्यंत महसूल गोळा व्हायचा.
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया 1 डिसेंबर 1661 ला जव्हारचे नरेश पहिले विक्रमशहा यांना भेटावयास आले.विक्रमशहा यांनी जव्हारच्या जवळच असलेल्या एका टेकडीवर मोठा शामियाना उभारला होता. येथे मोठा दरबार भरवण्यात आला होता. शिवाजी महाराज आणि विक्रमशहा यांच्यात तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली. यानंतर स्वतः विक्रमशहा यांनी शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपात मानचा तुरा रोवला होता. ते ठिकाण म्हणजे आजचे शिर्पामाळ होय.यानंतर विक्रमशहा यांनी शिवराय यांना सैन्य आणि साहित्य देऊन सुरतला जाण्याचे जवळच्या वाटाचे मार्गदर्शन केले पुढे स्वारी वरून परतताना राजांनी विक्रमशहा यांना काही सम्पत्ती दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जव्हार भेटीने दिल्लीकर सत्ताधिकारी(औरंगजेब) आणि सरदार यांच्या भुवया उंच्यावल्या होत्या.सुरतेच्या स्वारी नंतर मोघल आणि जव्हारकर यांच्या संबंधामध्ये वितुष्टाता निर्माण झाली होती.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर यांचे जावई होते. सावरकर आपल्या सासुरवाडीला चिपळूणकरांच्या वाड्यात १९०१ ते १९०८च्या दरम्यान राहत होते. सावरकरांना अटक झाल्यावर चिपळूणकरांना जव्हारचा वाडा सोडून परागंदा व्हावे लागले. जव्हारचे रहिवाशी विष्णू उर्फ अप्पा महादेव वैद्य यांनी रत्नागिरी येथे तर रेवजी पांडू चौधरी यांनी पुणे येथे राहून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास नाही. मुकणे राजघराणे नेहमी नेमस्त व तटस्थ राहत आले. त्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे ते इंग्रज राजवटीतही सुमारे सहाशे वर्षे त्यांचे राज्य टिकून राहिले. स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे म्हणून जी आंदोलने झाली त्यात जव्हार संस्थानही होते. जव्हार संस्थानचे विलिनीकरण लवकर व्हावे म्हणून २१-१-१९४८ रोजी मुंबईस सरदारगृहात तात्यासाहेब शिखरे, नाना कुंटे, भाऊसाहेब परांजपे, शामराव पाटील, दत्ता ताम्हाणे, वासुदेवराव करंदीकर व जव्हारचे मुकुंदराव संख्ये, केशवराव जोशी, रेवजी चौधरी, दत्तोबा तेंडुलकर अशा कार्यकर्त्यांची सभा होऊन 'जव्हार लोकसेवा संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथूनच जव्हार विलिनीकरणाच्या लढ्यास प्रारंभ झाला. या लढ्याचे स्वरूप ध्यानात येताच जव्हारच्या महाराजांनी मुकुंदराव संख्ये, वासुदेव करंदीकर व दत्ताजी ताम्हाणे यांना जव्हारला बोलावून घेतले. हे तिघे आणि त्यांच्यासोबत केशवराव जोशी होते. या चौघांना अचानक अटक करण्यात आली व नंतर लगेचच सोडून देण्यात आले. यानंतर करंदीकर व संख्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना व त्यांचे सेक्रेटरी श्री. व्ही. पी. मेनन यांची दिनांक १७-३-१९४८ रोजी भेट घेऊन सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. या लढ्यात राष्ट्रसेवादल व समाजवादी पार्टीचे कार्यकर्तेही सामील झाले होते. शेवटी दिनांक २०-३-१९४८ रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचे आकाशवाणीने जाहीर केले.
राजधानी
संस्थानाची राजधानी ही सुरुवात-शेवट पर्यंत जव्हार होती. जयदेवराव यांनी जेव्हा जव्हार राज्याची निर्मिती केली तेव्हा भूपतगड किल्ला हीच राजधानी होती. मधल्या काळात कोहेजगड आणि गंभीरगड यांना उपराजधानीचा मान मिळाला होता. विक्रमशहा प्रथम यांच्या काळात जव्हारला भुईकोट किल्ला तयार झाला आणि तीच राजधानी केली नंतर याच किल्ल्याचा परिसरात जुना राजवाडा हा कृष्णशहा द्वितीय यांनी बांधला. याच राजवाड्यात अनेक दुरुस्ती झाली आणि येथूनच संस्थानाचा कारभार होत असे. पुढे यशवंतराव महाराज यांनी नवीन राजवाडा बांधल्यावर काही काळ येथे दरबार भरत असे आणि भारत स्वातंत्र्य झाल्यावर संस्थान भारतात विलीन झाले.
क्षेत्रफळ
मुंबई इलाख्यातील (बॉम्बे प्रेसिडन्सी) मधील ठाणे जिल्ह्यातील (एजन्सी) एकमेव संस्थान होते आणि भौगोलिक दृष्टीने जव्हार संस्थान गुजरात स्टेट एजन्सीचा भाग होता.
उ.अ.19°43'ते 20°5'व पू.रे.72°55'ते 73°20'यांच्या दरम्यान वसलेले होते.उत्तरेस डहाणू, मोखाडे हे ठाणे तालुक्यातील तालुके आणि दमण प्रदेश पूर्वेस मोखाडे दक्षिणेस वाडे व पश्चिमेस डहाणू आणि माहीम तालुके होते. यास कोळवण असे म्हणत.
सन 1818 च्या तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात लॉर्ड एल्फिन्स्टनने कॅप्टन डिफीन्सनला जव्हार राज्य जिंकण्यासाठी पाठवले. त्यावेळी जव्हार राज्यातील 10 किल्ले आणि जव्हार जिंकले.
इ.स.1821 च्या कंपनीने केलेल्या जाहीरनाम्यानुसार जव्हारच्या वतीने राणी सगुणाबाई यांनी तह केला. तेव्हा त्याना फक्त 320 चौ.किमी.एवढा प्रदेश दिला तो 1877 पर्यंत तेवढाच होता तेव्हा जव्हार संस्थानामध्ये थोरली आणि धाकटी पाती असे भाग होते.
सन 1877 मध्ये जव्हारचे राजे पतंगशहा चौथे यांनी इंग्रज यांनी केलेल्या सहकार्यबद्दल तसेच समाजसुधाराबद्दल जव्हारला अजून थोडा प्रदेश इंग्रज सरकार तर्फे देण्यात आला तेव्हा जव्हार संस्थानाचे क्षेत्रफळ हे 500 चौ. किमी. होते.
पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सरकारला केलेल्या सहकार्य बद्दल संस्थानाला अजून 300 चौ.किमी.प्रदेश देण्यात आला. तेव्हा संस्थानाचे क्षेत्रफळ हे 803 चौ.किमी. होते आणि शेवट पर्यंत तेच होते. शेवटचे महाराज यशवंतराव यांनी केलेल्या सहकार्य बद्दल इंग्रज यांनी जव्हारच्या राजाला ठाणे जिल्ह्यात मोखाडे तालुकाची जबाबदारी देण्यात आली तसेच जिल्हात असिस्टंट कलेक्टर रूपात कारभार करावा असे आदेश देण्यात आले.
जव्हार संस्थानात एकूण तीन महाले/तालुके होते.मलमाड(150 चौ.किमी) कर्यात हवेली(350चौ. किमी) आणि गंजाड/कराडोह(100 चौ.किमी) असे होते. पुढे कुडाण(100चौ.किमी) हा अजून एक तालुका तयार करण्यात आला.
संस्थानात जव्हार,विक्रमगड आणि आशागड ही तीन शहरे होती.संस्थानाच्या कराडोह महालातून मुंबई-बडोदे हा रेल्वेमार्ग जात होता.संस्थानात एकही रेल्वे स्टेशन नव्हते. संस्थानाच्या हद्दीवर छोटे वाणगाव रेल्वे स्टेशन होते पण जव्हारकर मात्र डहाणू रेल्वे स्टेशनचा वापर करत असे.
संस्थानात एकूण 108 खेडी होती.नंतर त्यांची संख्या वाढली. नाशिक जिल्यातील त्रंबक आणि इगतपुरी तालुक्यातील काही गावे संस्थानकडे होती.संस्थानाचा बराच भाग हा डोंगराळ आणि पठारी प्रदेश होता. संस्थानातून अनेक नद्या वाहत होत्या. मुंबई शहरापासून सर्वात जवळ असे जव्हार संस्थान होते.
जव्हार संस्थानाची वैशिष्ट्ये
1)भारतातील सर्वात जुन्या संस्थानांपैकी एक संस्थान
2)बहुजनांची मोठी परंपरा असेलेले संस्थान
3)देशभक्ती असलेले येथील राजे आणि प्रजा
4)ब्रिटिश भारताततील एकमेव पिता-पुत्र राजांनी महायुद्धात सहभागी संस्थान-(नेटिव्ह इन्फट्री बटालियन)
महाराज मार्तंडराव मुकणे (लेफ्टनंट-पहिले महायुद्ध)
महाराज यशवंतराव मुकणे(फ्लाईट लेफ्टनंट-दुसरे महायुद्ध)
5)भारतातील पहिले देवीची लस(मोफत) देणारे संस्थान
6)भारतातील सर्वात जास्त आरोग्य आणि शिक्षण यावर खर्च करणारे संस्थान
7)जगप्रसिद्ध वारली चित्रकला यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान
8)लोकप्रिय तारपा वाद्य आणि नृत्य यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान
9)महाराष्ट्रातील सर्वात जुने संस्थान, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध, कोकणातील थंड आणि जास्त पावसाचे ठिकाण
10)स्वखर्चाने धरण(जयसागर डॅम) बांधलेले भारतातील एकमेव संस्थान
11)ब्रिटिशांकित जव्हार संस्थानास 9 तोफा (9-Gan salute) सलामी होती.
जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच आहे. काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात.
मुकणे राजांचा जो नवीन राजवाडा आहे तो एसटी स्टँडपासून दोन किमीवर आहे. राजवाडा अतिशय भव्य असून त्याचे बांधकाम व रचना पाहण्यासारखी आहे. आतली दालने, दरबार हॉल, छतावरील झुंबरे, भिंतीवरील राजघराण्यांतील व्यक्तींची जुनी तैलचित्रे आणि इथला एकूण परिसर आपल्याला इतिहासकाळात घेऊन जातो. भोवताली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
जव्हारची समुद्रसपाटीपासूनची उंची ५१८ मीटर आहे. येथे हिल स्टेशन आहे. हे नाशिकपासून ८० कि.मी.वर आणि मुंबईपासून १५० कि.मी.वर आहे. हे एक सुंदर व समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेले एक नैसर्गिक शहर आहे. जव्हार मधील ९९ टक्के जनता आदिवासी आहे. जव्हारला ऐतिहासिक वारसा आहे. खूप सुंदर ठिकाण असल्याने मुंबई, ठाणे यासारख्या प्रदूषण जास्त असणाऱ्या ठिकाणच्या लोकांना हे ठिकाण विशेष आवडते.
जव्हारमध्ये काळमांडवी धबधबा व दाभोसा धबधबा आहे. जव्हारचा जय विलास पॅलेस हा राजवाडा एक ऐतिहासिक वारसा आहे तसेच सनसेट पाॅईॅंट, हनुमान पाॅईॅंट इत्यादी ठिकाणे बघण्यासाठी खास आहेत.
१ सप्टेंबर १९१८ला राजे मार्तण्ड यांनी लोककल्याणकारी पाऊल उचलत जव्हार नगरपरिषद स्थापन केली, अशी माहिती जव्हार संस्थानच्या माहिती पुस्तकेतून मिळते. आज घडीला जुना राजवाडा भग्नावस्थेत आहे. राजवाड्याची इमारत दुमजली. जुन्या राजवाड्याच्या आतील परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जव्हार शहराच्या परिसरात निसर्गरम्य देखावे, वारली चित्रकला आदी गोष्टी पाहावयास मिळतात. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये शाळकरी मुले- मुली तसेच पर्यटक आणि गिर्यारोहक येथे निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.जव्हार राज्यातील किल्ले
अलंग-कुलंग
अशेरीगड
आसवगड
इगतपुरीचा किल्ला
इंद्रगड
कमानदुर्ग
काळदुर्ग
कोहेज किल्ला
गंभीरगड
गुमतारा किल्ला
टकमक किल्ला
तांदूळवाडी किल्ला
तारापूर चा किल्ला (जलदुर्ग)
त्रंबकगड
त्रिगलवाडी किल्ला
पट्टागड
बल्लाळगड
किल्ले बेलापूर
भास्करगड
भूपतगड (राजधानी)
मदनगड
माहुलीगड
रांजणगिरी किल्ला
विवळवेढे किल्ला
संजान किल्ला (जलदुर्ग)
सिद्धगड
सेगवा किल्ला
सेवागड
हरिहरगड

जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत









 जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत

जव्हार संस्थानच्या राष्ट्रगीताला दिनांक १३ नोव्हेंबर १९४४ रोजी राजमान्यता मिळाली. हे राष्ट्रगीत, बडोद्याचे राजकवी कवी यशवंत यांनी रचले. त्याचे पहिले गायन जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज हे दुसऱ्या महायुद्धावरून परत आल्यानंतर त्यांच्या २७ व्या वाढदिवसा निमित्त झाले. जव्हार संस्थानची भौगोलिकता, वनवैभव, राजगुरू कृपाशीर्वाद, राजांची शौर्यगाथा, मायभूमीवरील प्रेम, जनकल्याणकरी राजा अश्या रीतीने जव्हार संस्थानाचा गौरव करणारे हे राष्ट्रगीत आहे. ते दि.१३ नोव्हेंबर १९४४ रोजी राजमान्यता मिळाल्यापासून ते जव्हार संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणापर्यंत, प्रत्येक समारंभात गायले जात असे.
जय मल्हार ! जय मल्हार !
गर्जू या जय मल्हार !!
सह्याद्रीचे हे पठार I
शौर्याचे हे शिवार I
राखाया या बडिवार I
येथे नवोनव अवतार II१II
येथले धनुष्यबाण I
अजून टणत्कार करून I
टाकतात परतून I
कळी काळाचेही वर II२II
साग, शिसव, ऐन दाट I
सोन्याचे बन अफाट I
त्यांत शाह नांदतात I
दीनांचे पालनहारII३II
सदानंद -वरद- हात I
जयबांची शौर्य- ज्योत I
ध्वज भगवा सूर्यांकित I
दावी राज्य हे जव्हारII ४ II
प्यार अशी माय भूमी I
माय भूमी तव कामी I
वाहू सर्वस्व आम्ही I
होऊ जीवावर उदार II ५ II
जय वंशी क्षेम असो I
राजा वीरहो क्षेम असो I
जनता- कल्याण वसो I
त्यात सदा अपरंपार II ६ II

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...