विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label छत्रपती शिवाजी महाराज. Show all posts
Showing posts with label छत्रपती शिवाजी महाराज. Show all posts

Monday, 8 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज- ९

 


छत्रपती शिवाजी महाराज- ९
--------------------------
औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखानाची बोटे तोडली -
जुलै 1659 मध्ये औरंगजेबाचा राज्याभिषेक पार पडला आणि त्याने सहजादा मोजम च्या जागी शाहिस्तेखानाची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. शिवाजी महाराजांचे पारिपत्य करणे हे त्याचे मुख्य काम होते.
शिवाजी महाराजांनी रुस्तम हे जमान आणि फजल खान यांचा पराभव करून पन्हाळा सर केला. आदिलशहाने सिद्धी जोहरला सलाबत खान हा किताब दिला आणि शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी फौज देऊन पाठवले. त्यामुळे शिवाजी महाराजांना पन्हाळा गडावर जाणे भाग पडले (दोन मार्च 1660). आपल्या पंधरा हजार सैनिकांच्या दलासह सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला.
पन्हाळ्याचा वेढा जवळपास पाच महिने चालू होता. महाराजांनी सिद्धी जोहरला फितूर करून घेऊन त्यांची मध्यरात्री भेटी घेतली आणि एकमेकांना सहाय्य करण्याचे ठरले.
विजापूरच्या सैन्यात फाजल खान हा अफजलखानाचा मुलगा आणि मित्र सिद्धी हलाल ही होता. परंतु पंधरा हजार फौजेसह पन्हाळा जिंकणे शक्य नव्हते त्यामुळे विजापूरच्या सैन्याने शेजार च्या पावनगडावर हल्ला सुरू केला. पावनगड पडला असता तर पन्हाळा लढवणे आणखी कठीण गेले असते. म्हणून महाराजांनी थोडी फौज पन्हाळ्यावर ठेवून निवडक फौजेच्या साह्याने पावनगड च्या बाजूच्या विजापूरच्या सैन्यावर अचानक हल्ला चढवला. मग सैन्याचा वेढा तोडून ते विशाळगडाच्या दिशेने निघाले.
फाजल खान व सिद्धी हलाल महाराजांचा पाठलाग करू लागले. गजापूरच्या खिंडीत आल्यानंतर हिरडस मावळचे बाजीप्रभू देशपांडे यांनी आपण ती खिंड लढवू तुम्ही विशाळगडाला निघा असे शिवाजी महाराजांना सांगितले. त्यानुसार बाजीप्रभूंनी पाच तास खिंड लढवली आणि ते गंभीर जखमी होऊनही लढत राहिले. शिवाजी महाराज सुखरूप पन्हाळा च्या वेढ्यातून नि सटून विशाळगडला पोहोचले व तोफेचे बार काढले. तोफेचे आवाजाने बाजीप्रभू सुखावले आणि आपले प्राण सोडले.
सिद्धी जोहर फितूर झाल्याचे पाहून नबाब स्वतः मोहिमेवर निघाला आणि दोन्ही बंडखोरांना शिक्षा करण्यासाठी येऊन त्याने मिरजेत तळ ठोकला. मग शिवरायांनी पन्हाळा सिद्धी जोहरच्या ताब्यात दिला आणि त्याने तो आदिलशहाच्या लोकांकडे सुपूर्द केला (२२ सप्टेंबर १६६०).
शाहिस्तेखान अहमदनगर वरून 25 फेब्रुवारी रोजी प्रचंड सैन्यासह निघाला. सुप्यावरून पाच एप्रिल रोजी तो बारामतीत आला. तेथील दोन किल्ले घेऊन मिरच्या काठावरून 18 एप्रिल रोजी तो शिरवळला पोहोचला. तिथून राजगडाभोवतीची गावे त्याने काबीज केली. एक मे 1660 रोजी शाहिस्तेखान सासवड मध्ये आला.
राव भाऊ सिंग यांच्या नेतृत्वाखाली 3000 मराठा घोडदळांन 30 एप्रिल रोजी मुलांच्या पिछाडीवर हल्ला केला तो त्यांनी परतवून लावला. आता शाहिस्तेखानाने पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये लुटालुट सुरू केली. मराठ्यांच्या फौजेने त्यांच्यावर हल्ले केले तेही त्यांनी परतवून लावले. त्यानंतर नऊ मे रोजी ही फौज पुण्यात आली. पावसाळ्यात फौजेला दाना वैरण मिळणे कठीण झाले असते म्हणून शाहिस्तेखानाने आपला मुक्काम चाकणला हलवण्याचे ठरवलं आणि 19 जूनला पुणे सोडले. तो 21 तारखेला चाकण जवळ पोहोचला. फिरंगोजी नरसाळा यांनी 56 दिवस चाकणचा किल्ला लढवला.
ऑगस्ट 1660 च्या अखेरीस शाहिस्तेखान पुण्यात परत आला. मग त्याने 20 नोव्हेंबर रोजी परांडा कडे भले मोठे सैन्य पाठवले आणि गालिब या किल्लेदारास लाच देऊन किल्ला ताब्यात घेतला.
आता शाहिस्तेखानाने कल्याणवर आपले लक्ष केंद्रित केले. त्यासाठी त्याने कर तलब खान या ऊझबेक सरदाराची निवड केली. त्याच्यासोबत उदाजीरामाची शूर विधवा माहूरची रायबागिनी होती. पुण्यावरून लोहगड मार्गे भोरच्या दक्षिणे तून कर्तलब खान उंबरखिंडीला पोहोचला. त्या ठिकाणी मराठा सैन्याने चोहोबाजूने जोरदार हल्ला करून मोगली फौजेची दाणा दान उडवली. एकही मराठा सैनिक कामी न येता ही लढाई जिंकण्यात ते यशस्वी झाले. आपल्याकडील सर्व संपत्ती आणि साहित्य देऊन कर्तलबखनाने 3 फेब्रुवारी सोळाशे 61 रोजी माघार घेतली.
आता शिवाजी महाराजांनी दक्षिण कोकण वर आपले लक्ष केंद्रित केले आणि दांडा राजपुरी पासून खारेपाटण पर्यंतची संपूर्ण किनारपट्टी त्यांच्या ताब्यात आली. त्यांनी राजापूरची दुसऱ्यांदा लूट केली आणि तीन मार्चला ते ताब्यात घेतले. त्यांनी चिरदुर्गला तटबंदी बांधून मजबूत केले व मंडणगड असे नाव दिले. तिथे पालगड हा दुसरा किल्ला बांधला. पल्ली वन घेतल्यानंतर शृंगारपूर घेतले (29 एप्रिल). शेजारचा प्रतीत गड (प्रचित गड) दुरुस्त केला. महाराजांनी श्रंगारपूरच्या शिर्के यांना आपल्या सेवेत ठेवून घेतले व त्या कुटुंबाशी सोयरीक जुळवली.
मुघलांनी मे 1661 मध्ये कल्याण काबीज केले. तर शिवाजी महाराज वर्धनगड या गडावर विश्रांतीसाठी गेले. पेंड जवळील देयरी गडाला बुलाखी या सरदाराने वेडा घातला होता. कावजी कोंढाळकर यांच्या सैन्याने 400 लोक कापून काढून त्यांना हकले 21 ऑगस्ट 1661.
मराठ्यांनी 1662 च्या सुरुवातीला मिऱ्या डोंगरावर नामदार खानावर हल्ला केला. तथापि या मोहिमेत महाराजांना फार मोठे नुकसान झाले. नंतरचे सव्वा वर्ष मुघल आपल्या प्रांताची आणि मराठे ही आपल्या प्रांताची व्यवस्था राखण्यात व्यस्त होते. सरनोबत नेताजी पालकर मुलांच्या मुलाखात लुटा लूट करीत असताना 7000 च्या मुघल फौजेंने त्यांचा पाठलाग केला. यात नेताजी कसेबसे निष्टून गेले तरीही ते जखमी झाले होते आणि तीनशे घोडे गमवावे लागले होते (३० मार्च ते आठ एप्रिल 1663).
शाहिस्तेखानाचा पुण्यातील मुक्काम लाल महालात होता. शिवरायांचे बालपण याच ठिकाणी गेलेले असल्यामुळे त्यांना लाल महालांची खडान खडा माहिती होती. बहिर्जी नाईकांनी सुद्धा लाल महालात आपले हेर पेरून पूर्ण विठ्ठल बातमी मिळवलेली होती. बहिर्जी नाईक आणि शिवराय दोघांनी मिळून शाहिस्तेखानावरच रात्रीच्या वेळी हल्ला करण्याची योजना आखली. रविवार दिनांक 5 एप्रिल 1663 रोजी 400 निवडक सैनिकांसह शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या छावणीत आपण मोगली सैन्याचे दक्षिणेकडील लोक आहोत असे भासवून तसेच अन्य मार्गाने दिवसा ढवळ्या प्रवेश केला. रात्र होईपर्यंत आडोशाच्या जागी विश्रांती घेतली आणि मध्यरात्री ठरल्याप्रमाणे आपली योजना राबवून ते लाल महालात घुसले.
रमजान चे दिवस असल्यामुळे सैनिक भरपूर जेवण करून गाढ झोपलेले होते. रोजे असल्यामुळे ते पहाटे लवकर उठणार होते. जेवण करण्याच्या कामासाठी जागे झालेल्या लोकांना कापून काढून ते स्वयंपाक घर आणि सेवकांची खोली या दरम्यान आले. इथून हराम मध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्वी एक दरवाजा होता तो आता बंद केला होता. तेथील विटा काढून ते हराम मध्ये घुसले. त्यांच्यासोबत 200 निवडक सैनिक होते. शिवाजी महाराज शाहिस्तेखानाच्या शयन कक्षात गेले. तोपर्यंत काही लोकांना जाग आली होती तर काही आवाज गोंधळ व संशयाने उठले होते. या सर्वांची कत्तल करण्यात आली. तोपर्यंत हराम मधील गुलाम स्त्रियांनी आणि खानाच्या बायकांनी तेथील दिवे विझवले व अंधार केला. अशातच महाराजांनी खानावर तलवार चालवली. त्यात त्याची बोटे तुटली. अबुल भात खान हा शाहिस्तेखानाचा मुलगा वडिलांच्या सुटकेसाठी आला होता त्याला कापून काढले. एका सेनापतीलाही कापून काढले. कापाकापी करत शिवराय आणि सोबतचे सैनिक लाल महालातून निघून गेले. या हल्ल्यात मराठ्यांचे फक्त सहा लोक कामी आले परंतु शाहिस्तेखानाच्या मुलाला आणि एका सेनापतीला व 40 सहाय्यकांना ठार केलं होतं. तसेच अंधारामध्ये काही स्त्रिया ही ठार झाल्या होत्या. इतर दोन मुलगे आठ महिला आणि स्वतः शाहिस्तेखान जखमी झाला होता.
या हल्ल्याच्या वेळी महाराजा जसवंत सिंग लोहगडाजवळच छावणीत असून जाताना अगर येताना त्यांनी कसलीही हालचाल केलेली नव्हती. औरंगजेबाला हे वृत्त मिळाले त्या तेव्हा तो काश्मीरला निघाला होता. तिथूनच त्याने शाहिस्तेखानाची नेमणूक बंगाल प्रांतावर केल्याचे फर्मान दिले. त्याच्याजागी शहजादा मुअजम दख्खनचा सुभेदार झाला.
दिलीप गायकवाड.
०७-०४-२०२४.

छत्रपती शिवाजी महाराज - ८

 


छत्रपती शिवाजी महाराज - ८
---------------------------
अफजलखानाचा वध - वारसाच्या दावेदारीतून औरंगजेब उत्तरेत निघून गेला. त्यामुळे आदिलशाही दरबारात बंडखोर सरदारांना वठणीवर आणण्यासाठी मोहीम सुरू केली. शिवाजी महाराजांवर कारवाई करण्यासाठी कोणी तयार नव्हते. अब्दुल्ला भटारी उर्फ अफजल खानाने हे आव्हान स्वीकारले. बडी बेगम साहेबांने खानाला सांगितले होते की," मैत्रीच्या बहाण्याने आणि आदिलशहाकडून त्यांना माफी दिली जाईल असं ढोंग करून शिवाजी महाराजांना पकडून आणावं किंवा ठार माराव."
अफजलखानाने ही दरबारात "मी शिवाला बेड्या घालून जिवंत कैद करून चढ्या घोड्यानिशी घेऊन येतो" अशी वल्गना केली होती.
विजापूर दरबाराने मावळातील सर्व देशमुख आणि सरदारांना अफजलखानाला मिळून शिवाजीचे पारिपत्य करण्यासाठी मदत करावी असे खलीते धाडले होते. देशमुखीची वाट पहात बसलेल्या खंडोजी खोपडेने आपण शिवाजीला पकडण्यास तयार आहोत असे लेखी संमती पत्र दिले.
सप्टेंबर 1659 मध्ये अफजल खान पहिल्यांदा विठोबाच्या मंदिरात आला आणि तोडफोड केली. नंतर तो फलटण जवळ माळवाडी इथे आला. बजाजी नाईक निंबाळकर या फलटणच्या देशमुख यांना हत्तीच्या पायाखाली देऊन ठार करतो अशी धमकी दिली आणि दोन लाख रुपये खंडणी वसूल केली. आजूबाजूच्या तीर्थस्थळांची विटंबना केली व लोकांकडून ही खंडणी उकळली. सर्व भाग उजाड केला.
शिवाजी महाराज पुण्यासारख्या मैदानी प्रदेशात लढण्याऐवजी जावळी भागात प्रतापगडावर आले. त्यांनी आपले सर्व सैन्य हे जावळी भागात जमा केले.
अफजल खान पूर्वी वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्यानेही डोंगराळ प्रदेशात न जाता शिवाजी महाराजांना कृष्णाजी भास्कर या दुताकरवी निरोप पाठवला की - 'तुमचे वडील माझे खास मित्र असून मला येऊन भेटा. मी तुम्हाला कोकण आणि तुमच्या ताब्यातील किल्ले तुमच्याकडेच रहावेत ही आदिलशहाने खात्री द्यावी म्हणून प्रयत्न करीन. तुम्हाला सरंजाम व रोकड देण्याची ही व्यवस्था करीन.'
शिवाजी महाराजांकडे हेरांमार्फत खडान् खडा खात्रीची माहिती मिळालेली होती. त्यामुळे अफजल खान दगाफटका करणार हे नक्की होते. विजापूरचा वजीर खान मोहम्मद याच्या खुनातही अफजलखानाचा हात होता, किंबहुना तो कट अफजलखानानेच रचलेला होता. तो अत्यंत क्रूर आणि विश्वास घातकी होता. त्याच्यासोबत दहा हजार घोडदळ आणि पायदळ असून ते उत्तम शस्त्रांनी सज्ज होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी सर्व प्रकारची दक्षता बाळगून युद्ध करण्याचा निर्धार केला. मोरो त्रिंबक पिंगळे आणि नेताजी पालकर यांच्या लष्कराला कोकण आणि घाटातून बोलावून घेतले. प्रतापगडाच्या आजूबाजूला पाळत ठेवण्यास सांगितले.
शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करचा आदर करून गुप्त भेट घेतली. तसेच सोबत अंताजी गोपीनाथ हे आपले वकील पाठवले आणि सांगितले की सुरक्षिततेची हमी दिली तर राजे अफजल खानाची भेट घेतील. पंताजी गोपीनाथ यांना पाठवण्याचे मुख्य उद्दिष्ट खानाची इत्तंभूत माहिती मिळवणे हा होता. त्यानुसार खानाच्या अधिकाऱ्यांकडून लाच देऊन अतिशय महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी मिळवली ती म्हणजे -'शिवा अतिशय कावेबाज आणि हुशार असल्यामुळे त्याला खुल्या लढाईत पकडणं शक्य नाही म्हणून भेटीच्या वेळी त्याला पकडण्यात येणार आहे.'
आता शिवाजी महाराजांनी आपण खानाला घाबरत असल्याची बतावणी केली आणि वाईला जाऊन भेटण्यास नकार दिला. तथापि खान त्यांना जवळपास कुठे भेटणार असेल तर आपण भेटू तसेच त्या वेळच्या सुरक्षिततेची वैयक्तिक हमी द्यावी असेही सांगितले. अफजल खानाने हे मान्य केले. मग शिवाजी महाराजांनी वाई ते प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत घनदाट जंगलातून रस्ता तयार केला. खान रडतोंडीच्या घाटातून प्रतापगडाच्या पायथ्याशी पार या गावी एका मैलावर आला. खानाच्या लष्कराने कोयनेच्या काठावर पाण्याची सुविधा पाहून मुक्काम केला.
भेटीचे स्थळ प्रतापगडाच्या बुरुजाखाली होतं आणि तिथून कोयनेच सर्व खोर दिसत होतं. शिवाजी महाराजांनी शामियान्यापर्यंत जाणाऱ्या मार्गावर आपल्या सैनिकांना आड बाजूला सज्ज ठेवलेलं होतं. शाही पाहुण्याला शोभेल असा आलिशान शामियाना उभारला होता.
खानाच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशीची भेटीची वेळ ठरवली दहा नोव्हेंबर 1959. भेटीवेळी शिवाजी महाराजांनी जरीचा कुडता आणि त्याच्या आत चिलखत घातलं होतं. डोक्यावरच्या मंदिलाच्या आत लोखंडी शिरस्त्राण होतं. पायात चोळणा होता. त्यानी डाव्या हातात वाघ नखे लपवली होती आणि बाही मध्ये बिचवा लपवलेला होता. जीवा महाला आणि संभाजी कावजी हे फक्त दोन अंगरक्षक सोबत घेऊन महाराज खानाच्या भेटीला निघाले. खान मात्र एक हजार बंदूकधारी सैन्य घेऊन भेटीस निघाला तेव्हा गोपीनाथ यांनी हरकत घेतली आणि शिवाजी महाराजां प्रमाणेच आपणही दोन शरीर रक्षका सह भेटीसाठी जावं असं त्यांनी सुचवलं. त्यानुसार दोन सैनिकांनी घेतलेल्या पालखीत बसवून बसून आणि सय्यद बंडा हा तलवारबाज शरीर रक्षक सोबत घेऊन खान निघाला. शामियाना पाहताच जहागीरदाराच्या मुलाला हे जास्त आहे असा असा शेरा खानाने मारला. त्याला सांगण्यात आले की हे सर्व साहित्य शिवाजी राजांच्या शरणागतीनंतर विजापूरच्या राजवाड्यात पाठवले जाईल. मग तो शांत झाला.
आता शिवाजी महाराजांनी जलद यावे असा निरोप पाठवला. शिवाजी महाराज मंद पावले टाकत पुढे गेले आणि सय्यद बंडाला पाहून थांबले. त्याला शामियाण्याच्या बाहेर थांबायला सांगितले आणि मग शिवाजी महाराज शामियाण्यात गेले. आता शामियाण्यात प्रत्येक बाजूचे चार लोक होते. दोघांच्याही सोबत दोन सशस्त्र अंगरक्षक आणि एक दूत उभे होते. शिवाजी महाराज चौथऱ्यावर चढले आणि त्यांनी अफजल समोर मान झुकून नमस्कार केला.
खानाने कृष्णाजी ला विचारले - हा माणूस शिवाजी आहे का? मग तोच शिवाजी आहे असे समजल्यावर विचारले - तू आमची भूमी उध्वस्त केलीस आणि किल्ले ही का हस्तगत केलेस?
शिवाजी महाराजांनी उत्तर दिले याआधी हा देश आणि किल्ले घुसखोरांच्या व लुटारूंच्या ताब्यात होते. मी लोकांचा तो त्रास दूर केला आणि त्यांना भरभराटीला आणलं. या चांगल्या सेवेच्या बदल्यात मी प्रशंसेस पात्र आहे, खरडपट्टी आणि शिक्षेस पात्र नाही.
अफजल खान बोलला की झालं ते झालं, आता तू मला सगळे किल्ले दे आणि समोर दरबारात हजर हो.
शिवाजी महाराजांनी उत्तर दिले की माझ्या नावाने तसं शाही फर्मान निघालं तर मी आदेशाचे पालन करेन.
कृष्णाजी भास्कर मध्येच बोलला आता तुम्ही खान साहेबांच्या छत्राखाली आला आहात, म्हणून पहिल्यांदा तुमचे गुन्हे माफ करून घ्या आणि नंतर शाही फर्मानाची अपेक्षा बाळगा.
शिवाजी महाराज म्हणाले की, आम्ही दोघे सुलतान साहेबांचे सेवक आहोत. मग खान माझ्या अपराधांना कसे काय क्षमा करू शकतील? पण मी तुमचा सल्लाही नाकारू शकत नाही त्यामुळे मी माझे मस्तक त्यांच्या कुशीत ठेवतो. असं म्हणून त्यांनी खानाला मिठी मारली. खानाने ही मिठी मारण्याचे नाटक करून घट्ट पकडलं आणि कट्यारीचा वार केला. परंतु चिलखत असल्यामुळे तो वार वाया गेला. झटकन शिवाजी महाराजांनी वाघ नखांनी त्याचा कोथळा काढला आणि बिचव्याने भोकसले. आता खानाची पकड सुटली. त्याने पोटावर शेला दाबून धरला आणि मस्तकावर जोरदार वार केला परंतु शिरस्त्राण असल्यामुळे शिवाजी महाराज त्यातूनही बचावले. तरीही तो वार इतका भयंकर होता की शिरस्त्राणाचे दोन तुकडे झाले.
कृष्णाजीने लगेच शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार केला परंतु शिवरायांनी तो चुकवला आणि कृष्णाजीचे शिर धडा वेगळे केले.
खान ओरडला -दगा! दगा! खून! धावा! धावा! दोन्ही बाजूचे शरीर रक्षक एकमेकांवर धावले. सय्यद बंडा आपल्या हातातील कट्यारीचा वार करण्यासाठी धावून गेला आणि वार केला. तोपर्यंत जीवा महालाने सय्यद बंडाच्या हातावर वार करून तो तोडला. संभाजी कावजी यांनी जखमी खानाला पालखीतून नेणाऱ्या सैनिकांचे पाय तोडले. त्यामुळे पालखी खाली ठेवताच त्यानी खानाचे शीर तोडले आणि महाराजांकडे घेऊन आले.
शिवाजी महाराज शरीररक्षकासह गडावर गेले आणि तोफांचा आवाज केला आवाज ऐकताच मोरो त्रिंबक आणि नेताजी पालकर यांचे सैन्य शत्रु सैन्यावर तुटून पडलं हजारो मावळ्यांनी विजापूरच्या सैनिकांवर चौफेर हल्ला करून त्यांची दाना दान उडवली. अफजलखानाचा मृत्यू झाल्याचे ऐकून त्यांचे सैनिक व अधिकारी खचून गेले. यात खानाचे तीन हजार सैनिक ठार झाले.
मिळालेली लूट ही प्रचंड होती- तोफा दारुगोळा खजिना व इतर उपयुक्त सामग्री मिळाली. 65 हत्ती 4000 घोडे बाराशे उंट कापडाचे 2000 गठ्ठे आणि रोख दहा लाख रुपये व जडजवाहीर अशी संपत्ती ताब्यात आली.
कैद करण्यात आलेल्या मध्ये वरिष्ठ दर्जाचे सरदार आणि अफजलखानाचे दोन मुलगे तसेच लांबाजी भोसले व झुंजारराव घाटगे हे दोन मराठा सरदार होते.
खानाचा कुटुंब कबीला घेऊन मोठा मुलगा फाजलखान खंडोजी खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोयनेच्या काठाकाठाने कराड कडे पळून गेले.
खास टिप्स - १) शिवरायांनी या सर्व गोष्टींची आखणी बारीक सारीक तपशील लक्षात ठेऊन केली!
२) शिवरायांच्या हेरांनी खानाची इत्थंभूत माहिती मिळवली होती. परंतु खानाचे सैन्य इतके गाफील होते की आपण चहूबाजूंनी घेरलो आहोत हे त्यांना माहीत नव्हते!
३) भेटीचे ठिकाण असे होते की ते खानाच्या फौजेला दिसू शकत नव्हते. मात्र खानाची फौज दिसत होती. जर फौजेला समजले तर ती येण्याआधी राजे गडावर सुरक्षित जातील असे अंतर ठेवले होते!
४) शिवरायांनी कृष्णाजी भास्कर व अफजलखान यांना दिलेली उत्तरे एखाद्या कसलेल्या मुत्सद्द्याप्रमाणे होती! हे सर्वात महत्वाचे आहे!!!
म्हणून मी सतत सांगत आहे की आपण शिवचरित्र ध्यान पूर्वक अभ्यासून बोध घ्यावा. अजून ही आपण जग जिंकू शकतो!
जय शिवराय.
दिलीप गायकवाड.
०६- ०४-२०२४.

छत्रपती शिवाजी महाराज -७

 


छत्रपती शिवाजी महाराज -७
---------------------------
शहाजहान आजारी म्हणून औरंगजेब उत्तरेत आणि आदिलशहा आजारी म्हणून कल्याणचा मुल्ला अहमद विजापुरातच अडकून पडलेला होता. याचा अचूक फायदा उठवत शिवरायांनी कल्याण, भिवंडी पाठोपाठ माहुली गड आणि ठाणे व कुलाबा जिल्ह्यातील मोठा भूभाग ताब्यात घेतला. विशेष म्हणजे मुस्लिम अत्याचार्यांचे जोखड फेकून देण्याच्या उद्देशाने छोट्या मोठ्या स्थानिक सुभेदारांनी शिवरायांना निमंत्रण दिले! सूरगड, सुधागड, घोसाळगड,बिरवाडी, तळा, कांगोरी, रायरी एवढा मोठा प्रदेश स्वराज्यात समाविष्ट केला व बिरवाडी आणि लिंगाणा येथे भक्कम गड बांधले. माहुली ते महाड हा उत्तर कोकण स्वराज्यात सामील करून घेतले.
कल्याणच्या शेजारच्या पोर्तुगीज हद्दीतून लूट केली. माहिम आणि जवाहरच्या मध्यभागी असेरीच्या किल्ल्यात सैन्याने तळ ठोकला. त्यामुळे पोर्तुगीजांनी वार्षिक खंडणी देण्याचे कबूल केले.
इथे महाराजांनी आरमारी तळ आणि जहाजे बांधण्यासाठी गोद्या बांधल्या. आबाजी सोनदेव यांच्याकडे संपूर्ण प्रांताचे व्यवस्थापन दिले. इथेच इतिहास प्रसिद्ध कल्याणच्या मुल्ला अहमद याच्या सुनेचे कथानक घडले. त्याने शिवरायांना अमाप कीर्ती लाभली!
या विस्तारित मराठा राज्याची चोख व्यवस्था लावण्यासाठी महाराजांनी श्यामराज निळकंठ यांचे जागी त्रिंबक पिंगळे यांची पेशवा म्हणून, आबाजी सोनदेव सुरनीस आणि गंगाजी मंगाजी वाकनीस म्हणून नियुक्ती केली. निळो सोनदेव मुजुमदार आणि बाळकृष्णपंत उपमुजुमदार तर नेताजी पालकर सरनौबत होते. ७००० पागा(सरकारी) आणि ३००० शिलेदार (स्वतः चे घोडे असलेले) घोडदळ होते. पायदळ १०,००० व सेनापती येसाजी कंक होते. १६५९ साली ४० किल्ले स्वराज्यात होते. (१४ में १६५७ रोजी स्वराज्याचा वारस जन्मला होता हे आधी यायला हवे होते.)
वजीर खान महंमद याच्या खुनानंतर कार्यक्षम खवासखान विजापूरचा वजीर झाला होता. राज्य कारभार कुशल व अनुभवी बडी बेगम करीत होती. बंडखोर सरदारांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न म्हणून शहाजी राजे यांना शिवाजी महाराजांना शिक्षा करायला सांगितले. शहाजीराजे यांनी यांनी ती जबाबदारी झटकली. त्यामुळे शिवाजी महाराजांना जिवंत पकडून आणण्याची अथवा ठार करण्यासाठी मोहीम हाती घेतली. हा विडा अब्दुल्ला भटारी ऊर्फ अफजल खान याने उचलला.
३०-०३-२०२४.

छत्रपती शिवाजी महाराज- ६

 


छत्रपती शिवाजी महाराज- ६
--------------------------
शिवरायांनी आपली सर्व पाऊले अत्यंत काळजीपूर्वक उचलली होती. आपणास काय करायचे आहे आणि काय केले पाहिजे हे त्यांनी अचूक ठरविले. त्यानुसार त्यांनी निजाम व आदिलशाही मुलुख आणि किल्ले ताब्यात घेऊन स्वराज्य निर्माण केले. खंडण्या उकळून प्रचंड खजिना जमा केला आणि मजबूत किल्ले व फौज उभी केली. मुघलांशी संघर्ष शिताफीने टाळला. कारण १६५३ पासून मुघलांचा दक्षिणेचा सुभेदार शहजादा औरंगजेब हुशार आणि सामर्थ्यशाली होता.
मुहम्मद आदिलशहाच्या मृत्यू नंतर (०४-११-१६५६) औरंगजेबाने विजापूरवर स्वारी करण्याची तयारी सुरू केली. आदिलशहाच्या सरदार व जहागीरदारांना आपल्याकडे वळवण्याचे काम करत होता. अहमदनगर येथे मुल्तफत खान हा मुघल प्रशासक होता. शिवरायांनी त्याला खलिता धाडला - आम्ही मुघलांशी हातमिळवणी करू इच्छितो. "त्याच्याशी संपर्काचा मार्ग खुला ठेवावा!" औरंगजेबाने ही सामोपचाराच्या भाषेत उत्तर देण्यास सांगितले होते.
शिवरायांनी सोनाजीपंत हा वकील मार्च १६५७ मध्ये औरंगजेबाकडे भेटीसाठी पाठवला. तेव्हा त्याने बिदरला वेढा घातला होता. मराठा प्रमुखांच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील अशी हमी मुघलांच्या वतीने दिली. त्या मागण्या अशा -
१) विजापूरच्या ताब्यातील सर्व किल्ले आणि त्यांच्या ताब्यातील गावांवरच्या महाराजांचा हक्क मान्य करावा.
२) दाभोळ आणि त्याच्या सभोवतालचा प्रदेश आम्हाकडे असावा.
त्याला औरंगजेबाने २३-०४-१६५७ रोजी उत्तर दिले - महाराजांनी सशस्त्र मदत पाठवून मुघलांना मदत करावी व निष्ठा सिद्ध करावी.
महाराजांनी चतुराईने दूतास सल्लामसलत करण्यासाठी परत बोलावून घेतले आणि तातडीने मुघलांच्या विरोधात युद्ध सुरू केले. मिनाजी भोसले व काशी यांनी राशीन व चांभारगोंदे (श्रीगोंदे) उपविभागातील गावे लुटली. पण किल्ल्यातील पेठ लुटण्याचा प्रयत्न फसला.
शिवरायांनी स्वतः ३० एप्रिल रोजी रात्री जुन्नर शहर लुटून ३,००,००० होऊन, २०० घोडे कपडे आणि दागिने मिळाले.
मग औरंगजेबाने नासिरीखान व इराजखान आणि काही सरदार ३००० घोडदळासह अहमदनगर उपविभागात पाठविले. रावकर्ण यास आपले औरंगाबाद ठाणे सांभाळण्यासाठी सांगितले.
मुल्तफत खानने मिन्हाजींचा पराभव केला व मराठ्यांना हुसकावून लावले.
शाहिस्तेखान आणि रावकर्ण यांच्या फौजा आल्यावर शिवराय जुन्नरमधून निघून नगर जिल्ह्यात जाऊन लुटालूट केली. नासिरीखानाने अतीशय वेगवान चढाई करून मराठा सैन्याला तडाखा दिला. त्यामुळे बरेच मावळे मारले गेले व बाकीचे पळून गेले.
औरंगजेबाने नासिरीखान व इतर अधिकार्यांना लिहिले की - शिवाजीच्या भूमीत घुसून सूड घ्या, लूट करा, गावे जाळा, लोकांना गुलाम बनवा. जे पाटील सरदार शिवाजीला मिळाले असतील त्यांना ठार करा. त्याने चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी करतलबखान जुन्नर, अब्दुल मुनिम नमुना गड व नासिर खान आणि रावकर्ण यांना परांडा जवळ पांडा येथे तैनात केले.
पावसाळ्यात काही करता येत नव्हते. शहाजहान बादशहा आजारी पडला आणि वारस होण्यासाठी मुलांमध्ये युद्धे झाली. विजापूरने मुघलांच्या बरोबर तह केला.
नासिरीखान परत गेला होता. त्यामुळे शिवरायांनी २४ ऑक्टोबर रोजी कल्याण शहर ताब्यात घेतले.
विजापूरकर व मुघल एकत्र आल्यामुळे शिवरायांनी नासिरीखानाशी परत एकदा समेटासाठी बोलणी सुरू केली. खानाच्या सूचनेनुसार मागण्या घेऊन दूत पाठवला. पण समेट झाला नाही. म्हणून शिवरायांनी औरंगजेबाकडे २५ जानेवारी १६५८ रोजी रघुनाथ पंतांना पाठविले. तेव्हा तो दिल्लीला निघाला होता. त्याने सांगितले - तुमचे गुन्हे क्षमा करण्याच्या पात्रतेचे नसले तरी तुम्हाला पश्चात्ताप होत असल्याने क्षमा करीत आहे. जुन्या निजामशाहीतील आमच्या ताब्यात असलेले व सद्या आदिलशाहीतील कोकणातील किल्ले आणि प्रदेश, शाहजींच्या जुन्या जहागिरीतील गावे तुम्हाला दिली. सोनोपंत हे दूत पाठवून तुम्ही मुघल सीमांचे रक्षण केले पाहिजे. तुमच्या एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ५०० स्वारांची फौज आमच्या चाकरीत पाठवावी. सोनोजी आल्यावर तुमच्या मागण्या मान्य करू.
शिवरायांना हमी न देताच औरंगजेब पुढे निघून गेला. आता तो वारसाच्या लढाईत गुंतून पडल्याने दोन वर्षे शिवराय निश्चिंत होते.
३०-०३-२०२४.

छत्रपती शिवाजी महाराज - ५

 


छत्रपती शिवाजी महाराज - ५
---------------------------
पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात घेऊन शिवरायांनी जसे बचावासाठी मोठे पाऊल उचलले तसेच राज्य विस्तार करण्यास दक्षिणेत व पश्चिमेस जायचे तर जावळीचे खोरे आपल्या ताब्यात असणे आवश्यक होते. त्या दिशेने सामोपचाराचे प्रयत्न शिवरायांनी केले. पण अहंकारी मोरेंनी ते साफ धुडकावून लावले.
विजापूरच्या पहिल्या सुलताना कडून सोळाव्या शतकात मोरे नावाच्या मराठा कुटुंबाला जावळीचे राज्य दिले. आठ पिढ्यांपर्यंत भोवतालचे प्रमुख जिंकून घेऊन, खंडण्या उकळून प्रचंड खजिना जमा केला आणि १२००० ची फौज उभी केली! त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता! अखेरचा चंद्रराव गर्विष्ठ, आळशी आणि व्यसनी झाला होता.
शिवाजी महाराजांनी १२५ निष्णात सैनिक त्यांचे सबनीस रघुनाथ बल्लाळ कोरडे यांना देऊन चंद्रराव मोरे यास ठार करण्यासाठी जावळीस पाठविले. ते महत्त्वाच्या राजकीय मिषान दूत म्हणून गेले! पहिल्या दिवशी औपचारिक बोलणी करून टेहळणी केली आणि आता बाहेर जायचे मार्ग माहिती करून घेतले.
चंद्रराव असंरक्षितपणे राहतो हे पाहून प्रभूंनी आपली योजना तयार केली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी एकांतात भेटीदरम्यान चंद्रराव आणि त्याचा भाऊ सूर्यराव यांच्यावर वार करून झपाट्याने प्रवेशद्वाराच्या बाहेर पडले! घाईघाईने जमलेल्या थोड्या लोकांचा पराभव करून जंगलात लपून रहाण्यासाठी निवडलेल्या जागी गेले.
मोरेच्या हत्येची बातमी मिळताच १५ जानेवारी १६५६ रोजी जावळीवर हल्ला केला. सहा तासातच जावळी ताब्यात घेतली. चंद्ररावाचे संपूर्ण कुटुंब रायरीला गेले होते! फक्त हनुमंत मोरे याने एका खेड्यात आश्रयाला जाऊन प्रतिकार सुरू ठेवला होता. शिवाजी महाराजांनी सेनाधिकारी शंभूजी कावजी यांना त्याचे पारिपत्य करण्यासाठी पाठविले. हनुमंत रावांच्या मुलीच्या सोयरिकीसाठी आल्याची बतावणी करून त्यांना ठार केले!
नव्याने जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावून ३० मार्चला शिवाजी महाराज रायरीस गेले. महाराजांच्या दोन मावळ्यांनी मध्यस्थी करून दोन्ही मुलांना महाराजांना शरण येण्यासाठी उद्युक्त केले. अशा रीतीने एप्रिल १६५६ मध्ये संपूर्ण जावळीचे राज्य स्वराज्यात आले. आता कोल्हापूर आणि कोकणात राज्य विस्तार करणे सुलभ झाले!
पुढे आदिलशहाशी संधान बांधण्याच्या आरोपाखाली मोठा मुलगा कृष्णाजीला मृत्यूदंड दिला. (लहान मुलगा बाजी याने आपली सुटका करून घेतली (२८ऑगष्ट) आणि चंद्रराव किताब धारण करून अंबाजी गोविंदराव मोरे सह मार्च १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंगाला जाऊन मिळाला.
जावळी ताब्यात घेऊन पश्चिमेला दोन मैलांवर प्रतापगड हा नवीन किल्ला बांधला. तिथे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे मंदिर बांधले. रत्नजडित अलंकार सुशोभित मूर्तीची स्थापना करून तुळजापूर प्रमाणे महोत्सव सुरू केला!
सप्टेंबर १६५६ मध्ये सुपे परगाणाही स्वराज्यात समाविष्ट केला! सावत्र आईचे भाऊ संभाजी मोहिते यांना सुपे परगाण्याचे कामकाज पहाण्यासाठी नेमले होते. हा भाग स्वतंत्र होता. शिवाजी महाराज मैत्रीपूर्ण भेटीवर गेले आणि अचानक हल्ला करून पहारेकरी ताब्यात घेतले. सर्व मालमत्ता ताब्यात घेतली. मोहित्यांनी चाकरी करण्यास नकार दिल्यानंतर सर्व कुटुंब व नोकरचाकर शहाजी राजे यांच्याकडे पाठवले!
रोहिडा किल्ला ही महाराजांनी आपल्या स्वराज्यात समाविष्ट केला. तारीख अज्ञात आहे. अशा रीतीने पुरंदर, राजगड तोरणा कोंढाणा रोहिडा हे किल्ले व बारामती, सुपे, इंदापूर हा भाग ताब्यात घेऊन तसेच तिकोना, लोहगड व राजमाची हे किल्ले ही ताब्यात घेऊन स्वराज्य मजबूत केले.
२९-०३-२०२४.

छत्रपती शिवाजी महाराज - ४

 


छत्रपती शिवाजी महाराज - ४
--------------------------
शिवाजी महाराजांचा स्वतंत्र राजा म्हणून उदय होण्यापूर्वी या भागातील परिस्थिती विचित्र होती. एक तर मुघल, निजामशाही आणि आदिलशाही यांच्या सीमांचे अखेरच्या टोकाला असलेल्या प्रदेशाला प्रशासकीय व्यवस्थाच नव्हती. त्यामुळे अर्थातच न्याय व्यवस्था नव्हती!
सर्वत्र चोर, लुटारू आणि पुलांनी हैदोस घातला होता. बळी तो कान पिळी अशी परिस्थिती होती. लोक बळाच्या जोरावर मालमत्ता बळकावत असत. तसेच भावांमधील वाटणीचे वादही असत.
शिवाजी महाराज यांनी लोकांना निष्पक्ष न्याय द्यायला सुरुवात केली. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या पंचायतीशी (महाझरशी) सल्लामसलत करण्याची अविस्मरणीय पद्धत सुरू केली! त्यामुळे जनतेचा नैतिक पाठिंबा मिळाला. त्यांच्या खंबीरपणे न्यायाची आणि दुर्बल लोकांच्या बाजूने उभे राहण्याची कीर्ती खेडोपाडी सर्वत्र पसरली! लोक त्यांच्याकडे संरक्षक आणि तारणहार म्हणून म्हणून पहात होते. सोबत तरुणांना सर्वसामान्य सैनिक ते सरदार अशा संधी दिल्या.
मराठा देशमुख आणि पाटील आपल्या वतनांसाठी "करू किंवा मरू" असा निकराचा लढा द्यायला तयार होते. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या एकजुटीची ताकत उभी राहू लागली. ते आपल्या सोबत्यांसह, शिलेदारांसह सर्वत्र फिरत असत आणि हद्दीबाहेर जाऊन गावात छापे मारून तसेच प्रवासातील सरकारी महसूल अधिकारी यांच्यावर छापे मारून लूट जमा करीत असत.
खेलोजी भोसले यांच्या हत्येचे शल्य आणि मुघल व आदिलशहाने शहाजीराजांची जहागीर परस्परच वाटून घेण्यामुळे आपले स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा त्यांचा विचार पक्का झाला होता! ७ मार्च १६४७ साली दादोजी कोंडदेवाच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला सुरुवात केली. अखेरच्या निजामशहाचा हंगामी शासक म्हणून काम करण्याचे अधिकार त्यांच्याकडे होतेच!
आजारपणामुळे १६४६-५६ या काळात विजापूरच्या आदिलशहानेही काही फारसे काम केले नव्हते. शिवरायांनी विजापूरच्या ताब्यातील तोरणा किल्ला युद्ध न करता कावेबाजपणे ताब्यात घेतला होता (१६४६). तिथे त्यांना दोन लाख होनांचा खजिना मिळाला! त्याच्या पूर्वेस पाच मैलांवर राजगड किल्ला व तीन माच्या बांधल्या.
चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, तसेच बारामती आणि इंदापूर येथील अधिकार्यांनी शिवाजी महाराज यांचे अधिपत्य मान्य केले! पुण्यापासून ११ मैलांवर असलेला कोंढाणा किल्ला ही आदिलशहाच्या तिथल्या किल्लेदारास लाच देऊन ताब्यात घेतला!
शिवाजी महाराजांच्या विरोधात आदिलशाही दरबारात तक्रारी गेल्या. परंतु दरबारातील काही मानकरी शिवरायांनी आपल्याकडे वळवले होते आणि त्यांनी शिवरायांची बाजू घेतली!
विजापूरचा मुख्य सेनापती मुस्तफा खान याने २५ जुलै १६४८ मध्ये शहाजी राजे यांची कपटाने अटक करून सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन फौज ही काढून घेतली होती! (कारण ते जिंजीच्या वेढ्यातून बाहेर पडून स्वदेशी जाणार होते!)
विजापूरचे बालंट आपल्यावर येणार हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आले होते. त्यामुळे पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात असला पाहिजे असे त्यांच्या लक्षात आले.
महादजी नायकवार उर्फ 'निळकंठराव' तेथील प्रमुख होते. आदिलशाहीच्या अंदाधुंदीमुळे सैनिकांची उपासमार होत होती! महादजींनी हा किल्ला सर केला आणि भोवतालच्या खेड्यांमधूनही त्यांनी जुलुमाने खंडण्या उकळणे सुरू केले. त्यांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र निळोजी निळकंठराव कारभार पाहू लागले. ते हेकेखोर होते. लहान बंधू पिलाजी व शंकराजी यांना वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेतील वाटा देत नव्हते!
शिवरायांनी त्यांना व कुटुंबियांना आश्रय द्यावा म्हणून पत्र दिले धाडून दिले. शहाजीराजे या कुटुंबाचे जुने मित्र होते. पावसाळ्यात शिवाजी महाराज पायथ्याशी असलेल्या खेड्यात आश्रयाला गेले! शंकराजी यांच्याशी मैत्री झाली. त्यांनी निळोजींची हकालपट्टी करावी अशी विनंती केली. ५ ऑक्टोबर १६४८ रोजी महाराज दिवाळी साजरी करण्यासाठी कुटुंब आणि अंगरक्षकांसह पुरंदर किल्ल्यावर गेले. शंकरोजींच्या मार्गदर्शनानुसार आठ तारखेला रात्री निळोजीच्या महालात शिरून अटक केली आणि फौजेने किल्ला ताब्यात घेतला!
शिवरायांनी मुघल सुभेदार शहजादा मुरादबक्ष याच्याशी संधान बांधून शहाजी राजे यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले! मुरादबक्षनेही ते मान्य करून बादशहाला तसे कळवले! परंतु शहाजहानची आदिलशहावर दबाव आणण्याची संमती नव्हती!
इकडे आदिलशहाने बेंगळुरू आणि कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या दोन फौजा रवाना केल्या. शहाजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी यांनी फरहाद खान आणि तानाजी दुरे यांच्या फौजेला पराभूत केले!
पुरंदरवर हल्ला करण्यासाठी आलेल्या फत्तेखान आणि स्थानिक मराठा नेतृत्त्वाखाली आलेल्या फौजेचीही दाणादाण उडाली! बाळाजी हैबत शिरवळला तळ ठोकून होता. त्याच्यावर शिवाजी महाराजांचे सेनापती कावजी यांनी हल्ला चढवला व त्यांच्या सेनापतीला ठार केले.
आता आदिलशहापुढे शहाजीराजे यांची मनधरणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. ५ में १६४९ रोजी मुहंमदशहाला मुलगा आणि आदिलशाहीला वारस जन्मला होता! १६ में १६४९ रोजी शहाजीराजे यांची सुटका करून दरबारात मानाची वस्त्रे दिली आणि त्यांची जप्त केलेली सर्व मालमत्ता व जहागीर परत केली!
२८-०३-२०२४.

छत्रपती शिवाजी महाराज - ३

 


छत्रपती शिवाजी महाराज - ३
--------------------------
१९३६ चे तहानुसार शाहजींनी मुघलांना दिलेल्या सात किल्ल्यात शिवनेरीचा समावेश होता. त्यामुळे त्यांनी मुतालिक दादोजी कोंडदेव यांना सांगितले की -"माझी पत्नी जिजाबाई आणि मुलगा शिवाजी यांना पुण्यात ठेवा. त्याप्रमाणे बहुधा १६३८ मध्ये शिवाजी महाराज पुण्यात आले असावेत. कारण पुण्यात निवासाची उचित व्यवस्था नव्हती. नंतर लाल महाल बांधला. जहागिरीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून दोघांचा उदरनिर्वाह होत होता.
जिजाऊ व शिवबा पुण्यात नवखे. जवळच कोणी नाही. त्यामुळे बालशिवाजी एकांतवासात वाढले. जिजाऊ धार्मिक बनल्या. माय लेकरांचे आत्यंतिक प्रेम निर्माण झाले. बालपणापासून शिवबाला स्वावलंबी होण भाग पडले. त्यामुळे आपल्या कल्पना कोणाच्याही मदतीशिवाय अंमलात आणणे, पुढाकार घेणे, कोणाच्या मदतीशिवाय कार्य करणे या गोष्टी ते आपोआप करू लागले!
रणदुल्लाखान याच्या हाताखाली शहाजी राजे यांना १६३९ च्या बेंगलोर मोहिमेत विजय मिळाला. आदिलशहाने त्यांना नवीन जहागिरीची राजधानी वसविण्यासाठी बेंगलोर दिले. १६४० साली शाहजींना राहण्यासाठी स्थिर ठिकाण मिळाले.
शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी निष्णात शिक्षक नेमले होते. सात वर्षांचे झाले की गरुकडे सोपवून लिपी पूर्ण शिकवली. (शहाजीराजे व त्यांचे मुलांना संस्कृत येत होते.) ते कुस्ती, मुष्टियुद्ध, घोडेस्वारी आणि इतर शिक्षणात पारंगत झाले होते.
राम व पांडवांच्या कथांमधून त्यांच्या मनावर उत्तम संस्कार झाले होते! कुठे ही गेले तरी ते हिंदू मुस्लिम संतांच्या सहवासात जात असत.
शिवाजी महाराज १२ वर्षांचे झाले आहेत. त्यांचा विवाह करावा आणि पहिल्या दर्जाच्या सरदाराचा पुत्र म्हणून उचित नियमित तरतूद करावी असे पत्र जिजाबाईंनी पाठविले होते. त्यामुळे त्यांना बेंगळुरूला १६४०-४१ साली बोलावून घेतले होते. बेंगळुरू येथील सर्व मालमत्ता तुका बाईंच्या पुत्राला दिली होती याचा जाब जिजाबाईंनी विचारला होता. त्यानंतर पुण्याची जहागिर (४०,००० होन किंवा १५०००० रुपये) औपचारिकरित्या शहाजींचा कारभारी म्हणून आणि नंतर पूर्ण मुखत्यार म्हणून शिवाजी महाराजांना दिली. तसेच बेंगळुरू येथील सईबाई निंबाळकर यांच्याशी शिवबाचा विवाह ही केला!
आता जिजाबाई आणि शिवाजी महाराज यांना पुणे जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी चार विभाग प्रमुख सोबत देऊन पुण्यास पाठविले. दादोजी कोंडदेव जिजाबाई आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर मंत्रीमंडळ आणि सार्वजनिक न्यायालयांचा (महाजर) कारभार पाहू लागले. १६४२ मध्ये ही नवीन प्रशासकीय व्यवस्था सुरू झाली तेव्हा शिवाजी महाराजांनी १६ वर्षात पदार्पण केले होते! सन १६४६ मध्ये दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर पुण्याचे जहागिरदार म्हणून ते स्वतंत्रपणे आणि पूर्णत्वाने कारभार पाहू लागले!
सततच्या लढाया आणि दुष्काळ यामुळे पुणे परगणा उजाड बनला होता. लांडगे फार झाले होते. ४०००० होन महसूल असला तरी तो प्रत्यक्ष फार कमी मिळत होता. त्यामुळे आधी लांडगे ठार केले आणि नवीन लागवड करणाऱ्यांना सारा कमी केला-
पहिल्या वर्षी फक्त प्रति बिघा एक रुका (आण्याचा १२ वा भाग.)
दुसर्या वर्षी आण्याचा चौथा भाग आणि तिसरे वर्षी अर्धा आणा.
चौथ्या वर्षी पाऊण आणा, पाचव्या वर्षी चार आणे, सहाव्या वर्षी आठ आणे, सातव्या वर्षी एक रुपया, आठव्या वर्षी पासून पुढे मलिक अंबरच्या जमीन व्यवस्थेप्रमाणे!
एक बिघा = ४३८३ चौरस यार्ड. एक एकर=४८४० चौरस यार्ड.
बारा मावळ - पुण्याच्या पश्चिमेस ९० मैल लांब व १२ ते २४ मैल रुंदीचा डोंगर दर्या खोर्यांनी व घनदाट जंगलांनी भरलेला पट्टा! या जंगलातून बाहेर पडणे कठीण!
उत्तरेकडील भागात कोळी लोक आणि दक्षिणेस मराठे राहतात. (वाचकांनी कृपया सत्यता तपासून सांगावी.)
सामाजिक स्वरूप आदिवासी पद्धतीच किंवा पितृसत्ताक पद्धतीचही नव्हतं! प्रांताचा उपविभाग देशमुखांच्या अखत्यारीत होता. त्यांचे कारभारी ब्राम्हण आणि हिशोब व पत्रव्यवहार चिटणीस व फडणीस हे कायस्थ प्रभू जातीचे असत.
शिवाजी महाराज सतत भेटी देत असल्याने लोकांशी सलगी आणि जिव्हाळा निर्माण झाला होता. याच मुलुखातून शिवाजी महाराजांना निष्णात सैनिक मिळाले! येसाजी कंक, बाजी पासलकर, तानाजी व सूर्याजी मालुसरे हे त्यात प्रमुख. करीचे जेधे नायक, हिरडस मावळचे बांदल नायक हे सुरूवातीचे निष्ठावान अनुयायी होते! गुंजन मावळचे शिळीमकर नायक व कानद खोऱ्यातील मरळ देशमुख (झुंजारराव) यांचाही समावेश होता.
२७-०३-२०२४.

छत्रपती शिवाजी महाराज -२

 


छत्रपती शिवाजी महाराज -२
--------------------------
निजामशहाच्या अखत्यारीतील पुणे जिल्ह्यातील हिंगणी बेरडी व देऊळगाव पाटीलकीच्या वतनावर बाबाजी भोसले आपल्या मालोजी व विठोजी या दोन पुत्रांसह रहात होते. त्या भागातील लोकांशी तंटा निर्माण झाल्याने ते दौलताबाद पायथ्याशी वेरूळ येथे स्थलांतरित झाले. दोघे बंधू नोकरीसाठी निजाम सरदार सिंदखेडच्या जाधवराव यांच्याकडे बारगीर म्हणून गेले.
जाधवराव यांच्याकडे घरी कार्यक्रम होता. जाधवरावांनी मालोजी यांचा छोटा मुलगा शाहजी यास व आपल्या मुलीला मांडीवर बसवून दोघे अतीशय अनुरूप आहेत असे म्हटले. लगेच मालोजींनी घोषणा केली की जाधवराव यांची कन्या त्यांची सून झाली! संतप्त जाधवरावांनी दोघा भावांना नोकरी वरून काढून टाकले!
एके रात्री मालोजी शेतात राखण करीत असताना त्यांनी एका बिळातून नाग बाहेर आलेला पाहिला. नाग पुरलेल्या खजिन्याची राखण करतात या समजुतीने त्यांनी त्या ठिकाणी खोदले तर त्यांना सोन्याच्या नाण्यांनी भरलेले सात हंडे सापडले! त्यानंतर त्यांनी एक हजार सैनिकांच सशस्त्र घोडदळ तयार केले. ते फलटणच्या निंबाळकर यांना जाऊन मिळाले! नंतर ते निजामशाहीचे सरदार बनले.
आता लखुजी जाधवराव यांनी आपली कन्या जिजाबाईचा शहाजींशी विवाह करून दिला!
मालोजींच्या मृत्यूनंतर विठोजी फौजेचे प्रमुख झाले आणि त्यांच्या मृत्यूनंतर मालोजींचे ज्येष्ठ पुत्र शहाजी प्रमुख सरदार झाले. (बहुधा १६२३).
मलिक अंबर निजामाचा वजीर होता. त्याच्या मृत्यूनंतर मुलगा फत्तेखान वजीर झाला. निजामशाहान कारस्थानी फत्तेखानाला एप्रिल १६३० मध्ये कैदेत टाकले. त्याचवर्षी दरबारात लखुजी जाधवराव यांना ठार केले! शहाजीराजे यांनी निजामशाही सोडली. निजामशाही, आदिलशाही व मुघल राज्यांच्या सीमा एक मेकींना भिडलेल्या होत्या आणि तिथे बंदोबस्त नव्हता. शहाजींनी तिथेच हल्ले केले. १६३० अखेरीस ते आपल्या मोठ्या मुलासह आणि बंधूसह मुघलांच्या सेवेत दाखल झाले! तिथून ते १६३२ मध्ये विजापूरच्या सेवेत गेले.
फेब्रुवारी १६३२ मध्ये वजीर फत्तेखान याने निजामशहाला ठार करून त्याच्या वारसाला - हुसेन निजामशहा - गादीवर बसवले. १७ जून १६३३ रोजी मुघलांनी दौलताबादवर हल्ला करून जिंकून घेतले व निजामशहाला कैद केले! निजामशाही खिळखिळी झाली. त्यामुळे स्थानिक सुभेदारांनी त्यांच्या ताब्यातील सुभ्यांना 'स्वतंत्र राज्य ' म्हणून घोषित केले! शाहजींनी पुणे ते चाकण, नाशिक, नगर पर्यंतचा मुलुख जिंकून घेतला आणि भरपूर लुटालूट केली. विजापूरच्या सहाय्याने निजामशाह या मुलाला राज्याभिषेक करवून घेतचकला आणि तीन वर्षे राज्यकारभार चालवला. उत्तर कोकण ताब्यात घेतले. मुघलांच्या ताब्यातील बिदर व दौलताबादच्या मुलखावर हल्ले करून पूर्वीच्या निजामशाहीचा २० लाख होनांचा पाव भाग जिंकून घेतला.
सन १६३६ च्या फेब्रुवारीत मुघलांच्या हल्ल्यात सपशेल पराभव झाला आणि ७ किल्ले व निजामशहाला मोगलांच्या ताब्यात देऊन ते विजापूरच्या सेवेत दाखल झाले! आदिलशहाने चाकण पासून इंदापूर ते शिरवळपर्यंतचा भाग शहाजी राजे यांना जहागीर म्हणून दिला होता! त्याचा कारभार दादोजी कोंडदेव यांच्याकडे सोपवला होता. पुढे त्यांनी स्वतःसाठी म्हैसूरचा पठारावर आणि पूर्व कर्नाटकात प्रचंड मालमत्ता उभी केली.
शाहजी राजे आणि जिजाबाईंना दोन पुत्र झाले- संभाजी आणि शिवाजी. (जदुनाथ सरकार यांनी शहाजीराजे व जिजाबाई यांचे लग्नाची तसेच थोरल्या पुत्राची माहितीच दिली नाही! तसेच १६३०च्या सुमारास तुकाई मोहिते यांचेशी दुसरा विवाह केला एवढीच माहिती दिली आहे.)
शहाजीराजे यांचे दुसरे पुत्र पुण्याच्या उत्तरेस जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर जन्मले. जिजाबाईंनी स्थानिक देवता शिवाई देवीला नवस केला होता. म्हणून आपल्या पुत्रावर कृपादृष्टी ठेवण्यासाठी 'शिवाजी' नाव ठेवले. परंतु जन्मतारखेची विश्वासार्ह नोंद नसल्याने १० एप्रिल १६२७ या तारखेला ते स्वीकारतात. (आणखी एका तज्ञांच्या मते हीच तारीख योग्य असल्याचे मला ठाऊक आहे. तसेच १६२३ ते १६३० हा इतिहास देखील फारच त्रोटक आहे.)
दिलीप गायकवाड.
२६-०३-२०२४

छत्रपती शिवाजी महाराज -(१)-

 


छत्रपती शिवाजी महाराज -(१)- 
लेखन : जदुनाथ सरकार.
संकलन :दिलीप गायकवाड
---------------------------------------------
२३ जानेवारी रोजी जदुनाथ सरकार यांचे छत्रपती शिवाजी महाराज, काळ आणि कर्तृत्व हे पुस्तक घेतले होते. पण ज्ञानेश्वरी समजून घेण्यात बराच काळ गेला. मराठा आणि शेतकरी संघटन उभे करण्यासाठी पायपीट ही खूपच झाली. मराठा भामट्यामागे पळाला आणि शेतकरी निवडणूक संपल्यावर विचार करतील. त्यामुळे आधी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. आता उसंत मिळाली आहे तर हा ऐतिहासिक ग्रंथ तरी पूर्ण वाचून घेतो. नंतर परत एकदा ज्ञानेश्वरी घ्यायचीच आहे!
सुरूवातीलाच भूमी आणि लोक या प्रकरणात फारच उपयुक्त माहिती दिली आहे!
घाटाला समांतर असलेल्या प्रदेशाला "डांग किंवा मावळ" म्हटलं जातं.
पूर्व आणि पश्चिम असे नैसर्गिक अलगीकरण झाले आहे. डोंगर रांगांच्या प्रदेशाजवळ कुठल्याही आक्रमणाला खीळ बसत होती. त्यामुळे लोकांना शांतता आणि सुरक्षितता लाभत होती! याउलट समृद्ध पठारी प्रदेशांमध्ये क्रांतीची आणि लुटालुटीची दृश्य नित्याची झाली होती!
बळकट स्नायुंच्या आणि नीडर हृदयाच्या या लोकांना केंद्रीय पठारी प्रदेशातील बलाढ्य हुकूमशाही सल्तनतीच्या लष्करात वरिष्ठ पदांवर काम करून मोठी बक्षिसी मिळत होती! ते दुसर्या राज्यात सुद्धा सैनिक म्हणून जात आणि तिथे दिलेल्या जहागिरीतच स्थायिक होत! ही माहिती भारतभर मराठा समाज का विखुरला आहे याचे कारण देते.
डोंगराळ प्रदेश आणि दुष्काळ यामुळे लोकांना फक्त दैनंदिन आयुष्याच्या प्राथमिक गरजांसाठी आनंदाचा पदोपदी त्याग करावा लागत होता. त्यामुळे ऐष आराम आणि रसिकतेसाठी जागाच नव्हती! सौंदर्यांभिरुची आणि सफाईदार शिष्टाचार शक्य नव्हते! त्यामुळे उत्तरेकडील लोकांना दक्षिणेकडील योद्धे अचानक धनप्राप्ती झालेले गर्विष्ठ, पैशामुळे उद्धट झालेले, रुबाबदारपणा आणि शिष्टाचार यांचा अभाव असलेले वाटले! गंमत म्हणजे आजही हीच परिस्थिती आहे!
मराठ्यांचे गुणधर्म - या वातावरणामुळे स्वावलंबीपणा, धैर्य, शौर्य, चपळपणा, चिकाटी, दीर्धोद्योगीपणा, अत्यंत साधेपणा, रांगडा स्पष्टवक्तेपणा, सामाजिक समतेची जाणीव आणि परिणामी माणसाला माणूस म्हणून बघत त्याची प्रतिष्ठा जपण या गुणांची जडणघडण झाली होती. दुर्दैवाने आज यातील बहुतांश सद्गुण मराठ्यांनी टाकून दिले आहेत!
धर्मगुरू - पवित्र पारंपरिक ज्ञानाच्या क्षेत्रात ब्राह्मणांनी त्यांची मक्तेदारी जपली होती! आध्यात्मिक अभिजात उच्चस्तरीय वर्ग म्हणून ते इतर समाजापासून अलिप्त रहात होते! परंतु जोरदार भक्तिचळवळीचा उदय झाला आणि देवासमोर सगळे समान मानले जाऊ लागले! पंढरपूर हे त्या चळवळीचे केंद्र होते!
पंधराव्या व सोळाव्या शतकात दख्खन मध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या. त्या ब्राम्हणी परंपरावादी नव्हत्या.त्या कर्मकांड, विविध रुढी, समारंभ आणि जन्म यांवर आधारित वर्ग निहाय भेदभाव या विरोधात होत्या. त्या सगळ्यांच्या प्रमुखपदी संत आणि प्रेषित, कवी आणि तत्वज्ञ होते!
(टीप: मी १२ वर्षांपासून सांगत आहे - "संघटित व्हाल तर वाचाल! नाही तर भिकारी व वेठबिगार बनाल!" खरे ठरले आहे?)
मराठा सैनिक आणि शेतकरी:- मराठा आणि कुणबी या दोन जाती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा कणा होत्या!
मराठी भाषा बोलणार्या सर्व लोकांची जात मराठा नसते. त्यामुळे मराठी बोलणारे लोक म्हणजे मराठा असा अर्थ प्रतीत होत नाही.
सन १०११ मध्ये मुंबई प्रांतात ५०००००० मराठा व २५००००० कुणबी होते! मराठा हा एक शूर, निर्भीड, मर्दानी आणि बुद्धीमान वंश आहे! (आता तर ही बुद्धीमत्ता पार लयाला गेली आणि तिसऱ्यांदा बोगस आरक्षण घेऊन चक्क गुलाल उधळून लोकांना नाचायला लावले!)
मराठ्यांच्या गुणवैशिष्ट्यातील दोष - त्यांच्याकडे संघटनात्मक कौशल्य, सांघिक काम करण्याची चैतन्यशील प्रवृत्ती, साधनांच आणि सहकार्यांच व्यवस्थापन करण्याची खुबी, दूरदृष्टी आणि अँग्लो -सॅक्सन वंशाप्रमाणे स्वतःच्या इतर अवगुणांची भरपाई करणारे व्यवहारज्ञान ह्या गोष्टी कमी प्रमाणात होत्या!
(टीप - माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी जे पराक्रम गाजवले ते अपवाद वगळता वरील विधान खरे आहे!)
यावरून सर्वांना बोध घेता येईल.
जय शिवराय.
दिलीप गायकवाड.
२३-०३-२०२४.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...