विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label महाराष्ट्राचे वैभव. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्राचे वैभव. Show all posts

Friday, 20 August 2021

लेणी.महाराष्ट्राला लाभलेल शिल्पकलेच सुंदर लेण.

 लेणी.महाराष्ट्राला लाभलेल शिल्पकलेच सुंदर लेण.

पोस्तसांभार ::केतन  पुरी 




भारतात आढळणाऱ्या 1200 लेण्यांपैकी जवळ-जवळ 800 लेण्या एकट्या महाराष्ट्रात आढळतात.इथल्या सह्याद्रीने केवळ शुरवीरांचेच संगोपन केले,असे नाही तर अनेक जगप्रसिद्ध आणि सर्वांना आश्चर्य करायला भाग पाडणाऱ्या लेण्याही आपल्या अंगा-खांद्यावर गोंदून घेतल्या.

निसर्गाच्या विविध रंगछटांचा योग्य वापर करुन हजारो वर्षाखाली तीन-तीन मजले खोदून केलेले कोरीवकाम आणि भित्तीचित्रे आजही एक आश्चर्य आहे.मानव आधीच्या काळात किती प्रगत होता,यावरून लक्षात येते.वेरूळ येथील कैलास शिल्प हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण.

मराठवाड्यामधे असणाऱ्या जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ येथील लेण्या,औरंगाबाद लेणी,घटोत्कच लेणी,पितळखोरे लेणी,लातूर नजीक असनारी खरोसा लेणी,अंबेजोगाई येथील हत्तीखाना,पांडव लेण्या,धाराशिव लेण्या यांचे अस्तित्वच आता नष्ट होत चालले आहे.
हीच गत पश्चिम महाराष्ट्रात आढळणाऱ्या दुर्लक्षित लेण्यांची.कराडची जखिनवाडी लेणी,साताराजवळील पाटेश्वर लेणी,बोरीवली येथील मागाठाणे लेणी,जुन्नर परीसरात आढळणाऱ्या तुळजा लेणी,गणेश लेणी,अंबाअंबिका लेणी,शिवनेरी,नानेघाट लेणी,गीध विहार-भीमाशंकर येथील लेण्या आपल्या गतवैभवाच्या खुणा जपत आजही त्याच डौलाने उभ्या आहेत पण दुर्लक्षित..!!

उन,वारा,पाऊस,झाडी यांमुळे कितीतरी लेण्यांची प्रवेशद्वारे बुजली आहेत,पडली आहेत.साप,विंचू,कटेरी वनस्पती,मधमाशांचे पोळे,साचलेले पाणी यामुळे लेण्या पाहणे जिकारीचे ठरते.त्यात ठिकठिकाणी असनारी अस्वच्छता,विद्रूपिकरन याने लेण्यांची शोभा आणखी खराब झाली.

28 एप्रिल 1819 ला जॉन स्मिथ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने अजिंठा येथील 10व्या लेणी मधे एका भिंतीवर आपले नाव कोरले.आज या ऐतिहासिक ठिकाणी,गड-किल्ल्यांवर,लेण्यामधे आपल्या गलिच्छ रंगरंगोटीने वास्तू विद्रूप करणारे बहुदा या स्मिथचेच वंशज असावेत.

आपल्या वैभवशाली इतिहासाचा अमूल्य ठेवा आपनच जपायला हवा.ती आपली जबाबदारी आहे.

केतन पुरी.
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची.

Wednesday, 11 August 2021

श्रीक्षेत्र वाई

 





श्रीक्षेत्र वाई
(इतिहासवाटा - ७५)
श्रीक्षेत्र वाई इतिहासकालीन सातारा इलाख्यातील कृष्णेच्या तीरावर वसलेले निसर्गसंपन्न असे ठिकाण आहे. कृष्णेचा प्रवाह पसरणीचा घाट व पांडवगड यांच्यामधून पश्चिमेकडून पूर्वेस वाहत आहे. इ.स.१४२९ मधे बाहामणी राज्याच्या सुभेदार असलेल्या 'मलिकउलतुजा' याने वाई आपल्या ताब्यात घेतली मात्र ती कोणाकडून घेतली याची माहिती उपलब्ध होत नाही. या घटनेनंतर जवळजवळ वीस वर्षे वाईवर बाहामणी सुलतानाचा अमल होता.
त्यानंतर पुढे कधीतरी विजापूरच्या अदिलशाहीची सत्ता वाई परगण्यावर सुरू झाली असावी. विजापूरी सरदार थोरला रनदौलाखानाकडे अनेक वर्षे मुकासा असलेला वाई परगणा त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रहमतखान याच्याकडे अल्पकाळासाठी आला. या रहमतखानाच्या नावावरून कुमठे बुद्रुक या गावाला रहिमतपूर हे नाव मिळाले असावे. लवकरच म्हणजे इ.स.१६४८ अफजलखान याच्याकडे वाई परगणा मुकासा म्हणून आला. इ.स.१६६९ मधे वाईचा सुभेदार असलेल्या अफजलखान यांस प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपति शिवाजी महाराजांनी त्यास मृत्यूलोकचा रस्ता दाखविला. प्रतापगड रणसंग्रामात जरी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांनी विजय मिळविला तरी वाई भागावर मुलकी अधिकार स्थापित होण्यास काही वर्षांचा अवधी लागला. छत्रपति संभाजी महाराजांच्या निघृण हत्येनंतर मोगलांनी इ.स.१६९० मधे वाईवर हल्ला चढविला परंतु त्यांना वाई जिंकून घेता आले नाही कारण स्वराज्याच्या सैन्याने संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना कडवा प्रतिकार करून अपयशाचे धनी केले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांच्या कैदेत असलेल्या छत्रपति संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांना काही शर्तीवर मुक्त केले पण त्यावेळी स्वराज्याच्या गादीवर राजाराम महाराजांच्या पत्नि ताराराणी होत्या. साहजिकच स्वराज्याच्या गादीच्या वारसा हक्कासाठी त्यांच्यात यादवी सुरू झाली. शाहू महाराजांनी इ.स.१७०८ मधे स्वराज्याची राजधानी सातारा येथे केली. मोगलांनी स्वराज्याची फार हानी केली होती व शाहू महाराजांची आर्थिक बाजू सशक्त नव्हती. अशावेळी रास्ते घराण्यातील भिकाजी शामराव नाईक व सदाशिव शामराव नाईक या दोन्ही बंधूनी सातारा येथे सावकारी करण्यास सुरूवात केली.
त्यावेळी राज्याचा कारभार चालविण्यास व युद्धकर्मास लागणारा पैसा राजेलोकांना सावकारापासून कर्जाऊ घेण्याचा प्रसंग वारंवार येत असे. शाहू महाराजांनी रास्ते बंधूंना पाच हजार दोनशे रुपयेचा सरंजाम दिला होता. तेव्हा सदाशिव शामराज हे सातारा येथे राहू लागले तर महाराजांनी भिकाजी शामराव व रामाजी दामोदर गाडगीळ यांना वाई येथे वाडा बांधण्यासाठी जागा दिली व ती दोन्हीहि कुटुंबे वाई मधे वाडा बांधून राहू लागली. शाहू महाराजांशी आर्थिक देवाणघेवाणीतून रास्ते कुटुंबाचा घरोबा वाढला व पुढे महाराज रास्तेच्या घरी दिपावली फराळासाठी आले असताना भिकाजीची मुलगी गोपिकाबाई त्यांच्या दृष्टीस आल्या. महाराजांनी थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवे व गोपिकाबाई यांच्या विवाहाचा प्रस्ताव रास्ते यांचेकडे मांडला व तो त्यांना मान्य होऊन लवकरच वाई मुक्कामी नानासाहेब पेशवे व गोपिकाबाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
रास्ते हे कित्येक पिढ्यांचे गर्भश्रीमंत कुटुंब मूळ कोकणातील गुहागर जवळ असलेल्या वेळणेश्वर येथील रहिवासी. ते गर्भश्रीमंत असल्याने विजापूरच्या अदिलशाही काळापासून सावकारी करीत होते. कोकणप्रांताची रसद विजापूरला पोहचविण्याची जबाबदारी ते चोखपणे करीत. त्यांच्या घराण्यातील एका पुरुषाने वेळणेश्वर भागातील लाखो रुपये किंमतीची बेवारस मिळकत जप्त करून विजापुरच्या बादशाहकडे पावती केली. त्यांची ही कृती बादशाहास रास्त वाटल्याने बादशाहाने त्यांस रास्ते ही पदवी दिली. बादशाहाने दिलेली रास्ते ही पदवी इतकी नावारुपाला आली की त्यांचे मूळचे गोखले हे आडनाव जाऊन तेथे रास्ते हे रूढ झाले.
भिकाजी रास्ते यांची मुलगी गोपिकाबाई व नानासाहेब पेशवे यांचा विवाह झाल्यामुळे रास्ते कुटुंबियांचा प्रवेश पेशव्यांच्या दरबारी होऊन त्यांचे जेष्ठ चिरंजीव मल्हारपंत यांस सरदारकी मिळाली. भिकाजींना एकूण सात पुत्र होते ते अनुक्रमे मल्हारपंत, गणपतराव, आनंदराव, लक्ष्मणराव, गंगाधर, रामचंद्रराव व जीवनराव. मल्हारराव भिकाजी हे पेशव्याकडे सरदारकी करीत असताना पेशव्यांनी कर्नाटकातील सावनूरच्या नबाबवर स्वारी केली तेव्हा ते पेशव्यांच्या बरोबर मोहिमेवर होते. यावेळी पेशव्यांनी बागलकोट किल्ला मल्हाररावांच्या स्वाधीन करून तेथील बंडाईचा बंदोबस्त करण्यास सांगितले. सरदार मल्हाररावांनी आपल्या तोफखाना, पायदळ यांच्या साह्याने बंडाई लगाम लावला व आल्लीखानचा बदामी किल्ला राजकारण करून घेतला. त्यांचे कर्तृत्व पाहून पेशव्यांनी त्यांना तीन हजार फौजेची सरदारकी देऊन दौलतशिक्क्यासह बढती दिली व कापडबाबसह २१,०२०० रुपयेची तैनाती दिल्या. मल्हाररावांच्या निधनानंतर त्यांना पुत्र नसल्याने त्यांचे बंधू आनंदरावांना यांना त्यांच्या कर्तृत्वावर पेशव्यांनी सरदारकी बहाल केली. आनंदराव भिकाजी रास्ते व त्यांच्या बंधूंच्या कारकीर्दीत त्यांनी मोठमोठी बांधकामे केली आहेत. अनंतपूर येथे एक लाख रुपये खर्च करून मोठा किल्ला बांधला व पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर, सातारा, तासगांव, अनंतपूर, अथनी, पंढरपूर, तालीकोट व वाल्हे येथे मोठे वाडे बांधले. ह्या सर्व बांधकामांना सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे.
भिकाजी रास्ते यांच्या मुलांनी श्रीक्षेत्र वाईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असून मंदिरे, घाट व गावकोस, वेशी इ. निर्माण केले असल्याचे इतिहासाने पाहिले आहे.
रास्त्यांनी श्रीक्षेत्र वाई येथे श्री महाविष्णु, लक्ष्मी, गणपति काशीविश्वेश्वर, गंगा रामेश्वर व पंचायतन ही देवालये व कृष्णानदीस भव्य घाट बांधले आहेत. धर्मपुरी ही नवी पेठ निर्माण करून बावन्न ब्राम्हणांना तेथे घरे बांधून दिली तर गंगापुरीत ब्राम्हणांना घरे बांधण्यास अर्थसाह्य केले. खांबाटकी घाटापासून वाईपर्यत दगडी बांधकामातील पाट बांधला व परिसरात मंदिरे बांधली, विहिरी खोदल्या. आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आमराई निर्माण केल्या आहेत.
१)श्री गणपति मंदिर - हे मंदिर ज्या घाटावर आहे तो घाट आनंदराव रास्ते यांनी बांधलेला असून त्याच्यावर गणपतराव रास्ते यांनी इ.स.१७८० मधे दीड लाख रुपये खर्च करून गणपति मंदिर निर्माण केले आहे. हा घाट काशी येथील घाटाच्या धर्तीचा असून गणपति मूर्ती कर्नाटकातील मूर्तीप्रमाणे विशाल आहे. या विशाल मूर्तीमुळे यास " ढोल्या गणपति " या नावाने संबोधले जाते. ही गणपति मूर्ती पाहताना बंगलोरचा गणपति व बसवण्णा यांच्या विशालपणाची नक्कीच आठवण झाल्याशिवाय राहत नाही. घडीव दगडी बांधकामातील पूर्वाभिमुखी गणपति मंदिर प्रेक्षणीय आहे. ३० चौरस फूटाच्या गाभाऱ्यात ७ फूट उंच व ६ फूट रुंदीची विशाल गणपति मूर्ती ज्या चौथ-यावर आहे तो चौथरा १-४| उंच, १२-८|| लांब व ११-११ फूट रुंद आहे. ज्या दगडी प्रभावळी टेकून श्री गणपति मूर्ती आहे, ती प्रभावळ १०-२ फूट उंच व १- ५ फूट रुंद अशी आहे. गाभा-यास पुर्वाभिमुख तीन दरवाजाची उंची समान असून ती ९-३ फूट आहे मात्र रुंदीमधे मधील दरवाजा काहीसा मोठा आहे. गाभाऱ्यास असलेल्या दक्षिणोत्तर दरवाजाची उंची ७-५|| व रुंदी ४-९ फूट इतकी असून गाभाऱ्याची उंची सुमारे २५ फूट असावी. पूर्वाभिमुख गाभारा दरवाजाबाहेर ६४ फूट लांब, ३८ फूट रुंद व १५ फूट उंचीचा मोठा सभामंडप असून उत्तरेस ५, दक्षिणेस ५ व पूर्वेस तीन अशा साधारणतः १० फूट उंचीच्या व ६-८ फूट रुंदीच्या कमानी आहेत. या सर्व तेरा कमानीचे दहा मच्छ व सभामंडपास आठ दगडी खांब आहेत. श्रीक्षेत्र वाई मधील सर्वात उंच शिखर हे श्री गणपति मंदिराचे असून त्याची उंची सुमारे ७५ फूट असावी. कृष्णानदीच्या घाटावर हे मंदिर असल्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे पाण्यात असते. पावसाळ्यातील महापूराच्या पाण्याला फार वेग असल्याने मंदिरास नुकसान होऊ नये म्हणून मंदिराच्या पाठीमागील बाजूस दगडी बांधकामातील मजबूत कोन केला आहे.
२)श्री काशिविश्वेश्वर मंदिर - काशीविश्वेश्वराचे पूर्वाभिमुख मंदिर आनंदराव भिकाजी रास्ते यांनी इ.स.१७५७ मधे बांधले असून सभोवतालच्या भक्कम दगडी तटबंदींची उंची पंधरा फूटाची असून एकूण लांबी सुमारे २१६ फूट व रुंदी ९५ फूट आहे. बहुतेक मंदिरांची तटबंदी मजबूत केली जायची कारण परचक्र आल्यावर मंदिरातील देवदेवतांचे चांदी सोन्याचे दागिने, मुखवटे व मूर्ती सुरक्षित राहाव्यात हा हेतू असावा, याला श्रीक्षेत्र वाई मधील श्री काशीविश्वेश्वर मंदिर देखील अपवाद नाही. पुरातन काळात संपत्ती व देवतांचे रक्षण करण्याकडे विशेष कल असल्याचे दिसून येते. पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराच्या तीन कमानीच्या तटबंदीवर नगारखाना असून नगारखान्यात जाण्यासाठी उत्तरेच्या बाजूने पूर्वतटास लागूनच एकोणीस पायऱ्यांचा जिना आहे. आतमधे यती, ब्रम्हचारी, प्रपंच विरक्त कर्ममार्गींना निवासासाठी दक्षिण - उत्तर ओव-या बांधलेल्या आहेत. आतील संपूर्ण भागात फरसबंदी असून ५० × २७ फूटांच्या चौथ-यावर काशीविश्वेश्वराचा गाभारा, सभामंडपासह देवालय आहे. सभामंडपासमोर एका दगडी चौथरा असून चौफेर कमानी बांधकामात अतिशय प्रेक्षणीय भव्य नंदी विराजमान झालेला आहे. नंदीच्या गळ्यात घातलेले अलंकार, माळा, साखळ्या तर पाठीवर झुल पांघरलेली आहे. नंदीच्या तोंडात व पायातील साखळ्या इत्यादींचे कोरीव काम अतिशय सुरेख आहे. याच्या शेजारीच चौरस चौथ-यावर १६ खांबी व २४ कमानीचा " कुंड मंडप " आहे.कुंडमंडपाच्या दक्षिणेस व उत्तरेस अष्टकोनी चौथ-यावर सुमारे २३ फूट उंचीच्या दोन दगडी दीपमाळा आहेत. दक्षिण बाजूच्या तटावर जाण्यासाठी जिना असून तटाजवळ आतील बाजूला एक पायविहीर आहे. या देवालयास एकूण १४ शिखरे असून त्यातील सर्वात उंच काशीविश्वेश्वराचे आहे तर त्याच्या खालोखाल घंटाघराचे व सभामंडपाचे आहे. मंदिराच्या पाठीमागे तुलसीवृंदाव असून उत्तरेस फरसबंदीत चंडीचा दगडी पुतळा आहे. काशीविश्वेश्वराचा सभामंडपाच्या दक्षिण उत्तर भिंतींना दगडी जाळ्या आहेत. गाभाऱ्याचे दरवाजास लागूच घंटाघर असून येथे भली मोठी घंटा आहे. गाभाऱ्यात श्रीकाशीविश्वेश्वर बाणाचा व्यास पाच फूट तर उंची आठ इंच इतकी आहे. गाभाऱ्यात प्रकाश येण्यासाठी दक्षिणेस दगडी जाळी असून त्या जाळीत तत्कालीन कारागीराने अतिशय कल्पकतेने दोन नाग कोरलेले आहेत.
३ ) श्री महालक्ष्मी मंदिर - हे पश्चिमाभिमुख मंदिर इ.स.१७७८ मधे सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांनी २,७५,६३० रुपये खर्च करून बांधले. या मंदिराच्या सभोवती १८ फूट उंच व ५ फूट उंचीचा चिरेबंदी तट आहे. पश्चिम पूर्व तटाची लांबी १४५ फूट तर दक्षिण उत्तर तट सुमारे १०० फूटांचा आहे. आतील भागात संपूर्ण फरसबंदी असून हिच्यावर ३ फूट उंच, ६८ फूट लांब व ३५ फूट रुंदीच्या चौथ-यावर श्री महालक्ष्मी मंदिराची पडवी, सभामंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यात जाण्यासाठी तीन पायऱ्या चढून जावे लागते. गाभाऱ्यातील दक्षिण उत्तर भिंतींना प्रकाश व हवा येण्यासाठी दगडी जाळ्या आहेत. गाभाऱ्यातील सुमारे पावनेतीन फूट उंचीच्या दगडी सिंहासनावर ३ फूट उंचीची काळ्या पाषाणाची चतुर्भुज श्रीमहालक्ष्मीची मूर्ती आहे. गाभाऱ्यासमोर ३६ फूट लांब, २४ फूट रुंद व १३ फूट उंचीचा सभामंडप असून सभामंडपाचे दुसऱ्या कमानीत पावणेतीन फूट चौरस हौदात कारंजा आहे. सभामंडपास पडवीसह दहा खांब व अठ्ठावीस कमानी आहेत. या मंदिरास उत्तर व दक्षिण तटास मिळून दोन दरवाजे आहेत. मंदिराची सुमारे उंची पंचवीस फूट असून शिखर ५० फूटाचे आहे. श्रीमहालक्ष्मीचे दैनंदिन पुजारी ओक उपनामाचे आहेत. देवीच्या पूजा, नैवेद्य व वार्षिक उत्सवाचे खर्चासाठी श्रीमंत पेशवे सरकार यांनी गुळुम हे गाव देवस्थानला इनाम करून दिले होते.
४)श्री महाविष्णु मंदिर - हे पूर्वाभिमुखी मंदिर सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांनी इ.स.१७७४ मधे २, १६,२५० रुपये खर्च करून बांधले आहे. पडवी, सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. गाभाऱ्यातील ३ - ७ लांबीच्या २-१ रुंदीच्या सिंहासन चौथ-यावर ३-३ फूट उंचीची श्री महाविष्णुची व १-११ फूट उंचीची श्री लक्ष्मीची मूर्ती विराजमान आहे. गाभाऱ्यात दक्षिणेकडील भिंतीत दगडी जाळी बसविलेली आहे. ११ कमानीचा सभामंडप असून तीन कमानीच्या पडवीसमोर चौरस हौदात कारंजा आहे. सभामंडपाची उंची १६ फूट आहे तर समोर ६|| फूट चौरस चौथ-यावर गरूड आहे. सभामंडपाचे उत्तरेस इ.स.१८३९ मधे वासुदेवभटजी दिवेकर यांनी बांधलेला औदुंबर पार आहे. ईशान्य कोपऱ्यात विहीर असून नैऋत्य कोपऱ्यात बापूदीक्षित जोग यांची समाधि आहे. श्रीमंत पेशवे सरकार यांनी ह्या देवस्थानाच्या खर्चासाठी केंजळ गाव इनाम दिला होता. या इनाम सनदेतीलच सारांशाचे एक पत्र श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी, सरदार आनंदराव भिकाजी लिहले होते त्यातील विशेष मजकूर पुढीलप्रमाणे आहे,
" सनदेत नमूद केल्याप्रमाणे केंजळ गांव व धामणा डोंगर श्रीविष्णु व समस्त ब्राम्हण यांना नूतन करार करून भोगवटी यास आलाहिदा इनाम पत्रें करून देऊन हे सनद तुम्हास सादर केली असे. तरी इनाम पत्राप्रमाणे तुम्ही मौजे मजकूर ऐवजाची व सदरहू डोंगराचे कुराणाची नेमणूक श्रीकडे व समस्त ब्राम्हणांस करून याचे दुमाला करून देऊन चालविणे" जाणीजे छ.११ जिल्हेज. हे पत्र सातारचे दप्तरी बुकास ५९६ नंबर नोंदिले ता.५/८/१८५४ इ.
५) श्रीउमामहेश्वर मंदिर - हे पूर्वाभिमुखी मंदिर गंगाधरराव भिकाजी यांनी इ.स.१७८४ मधे बांधले. तटबंदीयुक्त असलेल्या या मंदिराचे शिखर ४० फूट उंचीचे आहे. सभामंडप व गाभारा असे मंदिराचे स्वरूप असून सभामंडपासमोर चौफेर कमानी चौथ-यात नंदी विराजमान झालेला आहे. या मंदिराच्या तटबंदीच्या अंतर्गत भागात चारहि कोपऱ्यात लहान देवालये असून नैऋत्येस श्रीगणपति, वायव्येस श्रीलक्ष्मी, ईशान्येस श्रीविष्णु व अग्नयेस श्रीसूर्य आहेत म्हणून याला पंचायतनाचे मंदिर देखील म्हणतात.
याशिवाय वाई येथे असंख्य मंदिरे आहेत, त्यतील काहीचा फक्त नामोल्लेख
अ) श्रीदत्तमंदिर - २ फूट उंचीची तीनमुखी संगमरवरी श्रीदत्तात्रयाची मूर्ती असणारे मंदिर मुंबईला जवाहिराचा व्यापार करणाऱ्या नारो गोविंद यांनी बांधले.
ब) श्रीबहिरोबा मंदिर - हे लाकडी कामातील, काळ्या पाषाणातील दोन मूर्ती असलेले मंदिर गंगाधरपंत रास्ते यांनी बांधले आहे. मंदिराच्या पूर्व कोपऱ्यावर अतिशय चांगली विहीर देखील आहे.
क) श्री व्यकंटेश मंदिर - हे मंदिर नरगुंदकरीण बाईंने बांधले असून येथील पुजारी खरे उपनामाचे आहे.
संदर्भ - १) श्रीक्षेत्र वाई - वर्णन
लेखक - गोविंद विनायक आपटे
आवृत्ती - जानेवारी १९११
किंमत - आठ आणे पृ.संख्या - ९६
२) ) पेशवेकालीन महाराष्ट्र
लेखक - वासुदेव कृष्ण भावे
प्रथमावृत्ती - डिसेंबर १९३५
किंमत - ३ रुपये
पृष्ठ संख्या - ५५८
३) सातारा गॕझीटीयर
४) श्री राजा शिवछत्रपती
लेखक - गजानन भास्कर मेहेंदळे
© सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com

Saturday, 27 March 2021

अहमदनगरच्या मातीत रुजलेल्या रसिकतेचा पुरावा "चारशे वर्षांपूर्वीच ऑडिटोरियम"!!! - फराहबक्ष महाल किंवा फरहाबाग.

 

रसिक आणि हौशी किती असावं बरं! राजदरबारी येणाऱ्या खास पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी ऑडिटोरियम बांधलं. राज्याच्या कोलाहलापासून लांब. विश्वास बसतो का? नाही ना! पण शौकीन लोगोकी शौकीन बाते!! अहमदनगरच्या मातीत रुजलेल्या रसिकतेचा पुरावा, 3 मजली ऑडिटोरिम, मुस्लिम आणि पर्शियन शैलीचं उत्कृष्ट बांधकाम असलेलं, सर्व बाजूनी करंज्यांनी सजवलेलं, तलावाच्या मधोमध वसलेलं,










"चारशे वर्षांपूर्वीच ऑडिटोरियम"!!! - फराहबक्ष महाल किंवा फरहाबाग. अर्थ ही किती छान बघा फराह म्हणजे आनंद, खुशी, उत्साह त्याची बाग फराहबाग , फराह देणारा किंवा बक्षणारा फराहबक्ष महाल.
नगर सोलापूर रोड वर असणारा हा महाल चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी, चौथर्यावर असणारी अष्टकोनी वास्तु, मुर्तुझा निजामशहा ने 1576 च्या दरम्यान बांधून घेतली. मोठे गवाक्ष आणि उंच कमानींनी ही इमारत सुशोभित आहे. महालाच्या मध्यभागी कारंजा, त्याभोवती रंगमहाल, महालाच्या चारही बाजूंना पुन्हा कारंजे. कारंजे आणि तालावसाठी पाणी खापरी नळांनी जवळजवळ चार मैलावरून आणण्यात आलेले.
महालाच्या भोवती मोठ्ठा चौथरा, चौथर्याच्या चारही बाजूंना सुरेख कारंजे. त्याच्या आजूबाजूला कृत्रिम तलाव त्याच्या बाहेर आमराई आणि गुलाबाचे देखणे उद्यान त्यामध्ये सुद्धा कारंजे!! किती सुंदर असेल ते वातावरण आपण फक्त विचारच करू शकतो
नगरचे वातावरण खूप शुष्क असते. त्यामुळे उन्हाळ्यात महाल थंड राहावा म्हणून छतात पोकळी ठेवून त्यात पाण्यावरून येणारी थंड हवा खेळती राहील अशी रचना केलेली आहे. जलविहार करूनच महालात येण्याचा रस्ता होता. वायुविजन, ध्वनी व प्रकाश यांची उत्कृष्ट रचना या इमारतीमध्ये दिसून येते. या महालात नृत्य, गाणी, व मुशायरे होत असत. तो ध्वनी सर्वत्र योग्य पद्धतीने पोहोचण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कोनाड्याच्या रचना केलेल्या दिसतात. तिसऱ्या मजल्यावरील श्रोत्यांना स्पष्ट आवाज ऐकू जाईल अशी रचना आहे. विशेष म्हणजे जुन्या इमारतींमध्ये जसा आवाज घुमतो तसा आवाज येते घुमत नाही कारण इथले वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम. या वास्तूला आतून एकसुद्धा खांब नाहीये. आरसीसी बांधकामा सारखं सागवानी लाकडाच्या मोठया फळ्या कॉलम सारख्या भिंतीत वापरल्या आहेत. रंग महालाच्या फ्लोरिंग मध्ये काच लावलेले दिसते. त्याचा उद्देश म्हणजे दिवे लावले की पूर्ण जमीन उजळल्या सारखी दिसेल. तिथे असणारी ग्रीन रूम तर इतकी बेमालूम बांधलेली आहे की आत जाईपर्यंत कोणाला कळणार पण नाही की इथे ग्रीन रूम आहे. पूर्ण वास्तूमध्ये प्रत्येक दिशेला अनेक दरवाजे आहेत जेणेकरून प्रेक्षक कुठूनही आत-बाहेर जाऊ शकतात. ह्याचा अजून एक उद्देश हा की आत-बाहेर करणाऱ्या लोकांचा इतर प्रेक्षकांवर आणि कार्यक्रमावर काही फरक पडायला नको, त्यांच्यामुळे व्यत्यय यायला नको. असे एक ना अनेक वैशिष्ट्य असणारी ही वास्तू, ताजमहालची रोलमॉडेल आहे. ताजमहाल मध्ये फक्त तीन घुमट जास्तीचे केलेले आहेत बाकी पूर्ण रचना ही नगर मधल्या या वास्तु वरून घेतलेली आहे. किंबहुना एक कथा अशीही सांगितली जाते की शहाजहानने इथलेच कारागीर तिकडे नेले. आणि ते खरं पटतं कारण दोन्ही वस्तूंच्या बांधकामामध्ये खूपच समानता आहे.
मध्यंतरीच्या काळात बरीच पडझड झाली पण आता स्वयंसेवी संघटना आणि पुरातत्त्व खात्याकडून संगोपनाचे प्रयत्न चालू आहेत.
..... दिपाली विजय

*नक्षीची हवेली* नाशिक.

 









*नक्षीची हवेली*
नाशिक.
लेखक :- श्री. सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८.
ही गोष्ट आहे इसवी सन १८०० च्या आसपासची. फार मोठा दुष्काळ पडला होता महाराष्ट्रात. गोरगरिबांना जगणं मुष्किल झालेलं असताना नाशकातील काही धनिकांनी आपल्या घरांची, वाड्यांची कामे काढली. उद्देश एकच..हातांना काम मिळावं हा. पेशव्यांचे उपाध्याय देवराव हिंगणे यांनी दिल्लीकडुन कसबी कारागीर मागवुन लाकडांवरील कोरीव काम करुन घेतले. अनेक उत्तमोत्तम वाड्यांची उभारणी त्या काळात झाली. त्यातलाच एक वाडा म्हणजे *भालेराव वाडा*.
गोदावरी नदी गावाच्या बाहेर पडते ती मोदकेश्वरा पासुन. तेथुनच नाव दरवाजा सुरु होतो. तर या नाव दरवाज्याच्या मध्यावर उभा आहे हा भालेराव वाडा.. अर्थात *नक्षीची हवेली*.
हो..नक्षीची हवेलीच. हेच नाव रुढ आहे या वाड्याचे.आणि ते यथार्थही आहे.
पावसाळ्यात गोदेला पुर येतो..पण कधी तो महापुराचे रुप धारण करतो. कुठपर्यंत पाणी येऊ शकते जास्तीत जास्त? याचा विचार करुनच या हवेलीचे बांधकाम केलेले आहे. रस्त्यापासुन पाच फुट उंचीचे दगडी जोते बांधुन त्यावर या हवेलीचे बांधकाम केले आहे.
दगडी जोत्यावर उभा असलेला हा वाडा. त्याचे पाच खण. तळमजला आणि पहिला मजला. आणि दर्शनी भागावर असलेले अप्रतिम नक्षीकाम. त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. पाच खणांमध्ये असलेले पाच दरवाजे.. आणि वरच्या मजल्यावर असलेल्या पाच खिडक्या. हे या वाड्याचे दर्शनी रुप. या संपूर्ण भागांवर असलेले उठावदार.. कोरीव काम..वेलबुट्टी..सुर्य, चंद्र, कमळ,कलश..मधुन द्रुष्टीस पडणारे मोर,पोपट.. आज इतकी वर्षे झाली.. पण अजूनही त्यात ताजेपणा आहे, प्रमाणबध्दता आहे.
दरवाज्यांच्या आणि खिडक्यांच्या महिरपी तर विलक्षण सुंदर आहेत. पुर्वी ही हवेली दोन मजली होती. म्हणजे तळमजला आणि पहिला मजला. त्यावर कौलांनी शाकारलेलं छत. बबनशेठ भालेराव आणि नारायणशेठ भालेराव हे दोघे बंधु. त्यांच्या व्यवसाय सोनारकाम. एक खानदानी सोनार म्हणून नावलौकिक. तळमजल्यावर असलेले त्यांचे दुकान अजूनही डोळ्यासमोर आहे. पांढरे शुभ्र धोतर, खादीची कोपरी, त्यांचे ते कामाचे टेबल, ऐरण हातोडा..गिर्हाइकांसाठी पांढरी शुभ्र भारतीय बैठक.. पानाचा डबा, आणि पितळेचा चकचकीत खलबत्ता.. पान कुटण्यासाठी. (विशेष म्हणजे थोड्याफार फरकाने हे दुकान अजुनही तसेच आहे).
दुकानच्या मागील भागात माजघर. तेथुन वर जाणारा लाकडी जिना. या जिन्याच्या मध्यावर एक लहानशी खिडकी. झरोक्यासारखी. जिन्यातुन कोण चढ उतार करतो ते बघण्यासाठी. त्याकाळी पुरुष मंडळींचा बराच धाक असायचा.
वरच्या मजल्यावर एक प्रशस्त बैठकीची खोली. त्याला सर्वजण म्हणायचे..बंगला.
या बंगल्यात मी आयुष्यातला बराच काळ घालवलेला. हा भालेराव वाडा म्हणजे माझ्या आजीचे माहेर. लहानपणापासून तेथे जाणे येणे. माझ्या आजीची एक बहिण होती. बाई म्हणत तिला. अजुनही डोळ्यासमोर दिसतीय मला. सकाळच्या कोवळ्या उन्हात.. खिडकीतून येणाऱ्या उन्हात बसलेली आहे. धुलीकणांनी भरुन गेलेला तो उन्हाचा कवडसा. समोर ठेवलेल्या लाकडी पेटीतल्या आरशात बघुन ती वेणी घालतेय.
१९४०-४२ च्या आसपास स्वातंत्र्य सैनिक श्री वसंतराव नाईक भुमीगत होते. त्यावेळी दोन वर्षे त्यांना आसरा दिला तो याच हवेलीने.
खुप आठवणी आहेत या हवेलीच्या. त्यावेळी लक्षात आले नाही.. पण आता जाणवतंय. गेल्या पन्नास वर्षात काही काही बदल झाला नाही या हवेलीत. नाही म्हणायला दोन मजले चढवलेत यावर, पण ते मुळ रुपाला धक्का न लावता. ब-याच वेळा आपण पहातो पावसाळ्यात घरांचे दरवाजे फुगतात, व्यवस्थित लागत नाही. पण या हवेलीचे सर्वच.. अगदी खिडक्यांचेही दरवाजे कोणत्याही ऋतुत अगदीच व्यवस्थित लागतात. त्याच्या बिजागर्-या, कडी कोंडे सर्वच वेगळ्या घडणीचे आहेत.
सध्या या हवेलीच्या पाच खणांपैकी तीन खण भालेराव कुटुंबाकडे..तर दोन खण पवार कुटुंबाकडे आहेत. भालेराव कुटुंबाने ही हवेली अगदी काटेकोरपणे जपली आहे. अगदी दोनशे वर्षापुर्वी होती तशीच. त्याची देखभाल ठेवणे हे नक्कीच सोपे नाही. या वास्तु जतन करण्यासाठी देखील एक द्रुष्टी असावी लागते. जुन्याच वास्तुंमध्ये..वाड्यांमध्ये एक प्रकारची कलात्मकता होती. हळुहळु गावे बदलत चालली आहे.. शहरीकरण होत आहे. शेकडो वर्षे जुन्या संस्था, जागा, इमारती.. आणि त्यांच्यातली कलात्मकता पाश्चिमात्य देशात जशी जपली जाते, तशी आपल्याकडे. त्या प्रमाणात तरी जपली जात नाही.
आणि म्हणुनच भालेराव कुटुंबाने जपलेल्या या हवेलीचे मोल खुप मोठे आहे. आणि याची जाण खर्या अर्थाने आहे ती विदेशी पर्यटकांना.. अभ्यासकांना. नाशिकमध्ये आले की त्यांची पावले नाव दरवाज्याकडे हमखास वळतात.
संकलन-सुधीर लिमये पेण

नगरचा भुईकोट किल्ला म्हणजे "कोट बाग निजाम" अहमदनगर ची ओळख.

 













नगरचा भुईकोट किल्ला म्हणजे "कोट बाग निजाम" अहमदनगर ची ओळख.
१४९० मध्ये अहमद निजामशाहने निर्माण केलेला हा किल्ला स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून जमिनीवर बांधलेला अभेद्य ,अजिंक्य असा किल्ला आहे. 1 मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, त्यात पाणी आणि त्यात मगरी आणि सुसरी. खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकड्या आहेत. ह्या सगळ्यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी केलेली आहे. टेकड्यांमुळे बुरुजांवर तोफा डागणं अशक्य असल्याने किल्ला सुस्थितीत आहे. वर्तुळाकार असलेल्या या किल्ल्याला २२ बुरूज आहेत. अहमद निजामशहानं आपल्या कर्तबगार, मुत्सद्दी प्रधान-सेनापतींची नावं बुरुजांना देऊन त्यांचा सन्मान केल्याचं दिसून येतं. त्या बुरुजांची पण रचना अशी आहे की तोफगोळा चुकून पोहचला तरी बुरुजाच्या बाहेरच्या बाजूला गोळा पडेल बुरुजाच्या मुख्य बांधकामाला धक्का लागणार नाही. तटबंदीच्या आतील बाजूस एकेकाळी सहा राजमहाल आणि 4 बारव होत्या.
इथे दरवाज्याजवळ हत्तीच्यावरती वाघ असे कोरलेले शिल्प खूप छान आहे. "तुम्ही कितीही ताकदवान असले तरी आम्ही राजे आहोत. आम्ही राज्य करणार." असा काहीसा संदेश या शिल्पातुन देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे काल कोठरी आणि तुरुंग आहेत. तिथे असणारे गज अजूनही शाबूत आहेत. त्यांना अजूनही गंज लागलेला नाही, ह्यावरून त्याकाळी धातू शास्र किती समृद्ध होते ह्याची कल्पना आपण करू शकतो.
पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह बारा मोठे राजकीय नेते बत्तीस महिन्यांसाठी या किल्ल्याच्या बंदिवासात होते. पंडित नेहरूंनी इथेच "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" या ग्रंथाचे लेखन केले आणि मौलाना आझाद यांनी "गुब्बारे खातीर" ह्या उर्दूतील अतिशय श्रेष्ठ कलाकृतीचे लिखाणही ह्याच किल्ल्यात केले. युवराज्ञी येसूबाई आणि त्यांचे युवराजांना औरंगजेबाने याच किल्ल्यात बंदी बनवून ठेवले होते. औरंगजेब जेव्हा नगरला मुक्कामी होता तेव्हा किल्ल्याचा दरवाजा पाहून त्याने "आमच्या पूर्वजांना नगरचा किल्ला माहीत नसावा नाहीतर आगऱ्याच्या किल्ल्याचे दार असे समोर नसते ठेवले." असे उद्गार काढले होते. इतके नगरच्या किल्ल्याचे प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण जागी आहे .
या किल्ल्यावर फडकणार्या ध्वजाचा एक इतिहास आहे. ह्याची size अगदी लाल किल्ल्याच्या खालोखाल आहे. त्यामागचा इतिहास असा की इथल्या बुरुजावर इंग्रजांनी लोखंडी युनियन जॅक लावला होता कारण त्यांना खात्री होती की तो उतरवायची वेळ कधीच येणार नाही. स्वातंत्र्य मिळवल्यानंतर तिरंग्याची size त्या युनियन जॅकपेक्षा लहान असूच शकत नाही म्हणून तेव्हा पासून इथला ध्वज हा भारतातील सर्वात मोठ्या ध्वजांपैकी एक आहे.
ऐतिहासिक दृष्ट्या ह्या किल्ल्याचे महत्त्व असे की लढाई मध्ये तो एकदाही जिंकता आला नाहीये. फंदफितुरी करूनच किल्ला मिळवावा लागला आहे. स्वराज्यामध्येही हा किल्ला कधीच येऊ शकला नाही. पेशव्यांच्या काळात जेव्हा हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला तेव्हासुद्धा फंदफितुरीनेच मिळवला होता.
सुरुवातीपासूनच मोठी कुमक किल्ल्यात होती, त्यानंतर इंग्रजांचे हे सैन्यतळ होते आणि त्यानंतर भारतीय लष्कराच्या ताब्यात राहिल्यामुळे हा किल्ला बर्यापैकी सुस्थितीत आहे. कोणी बांधला यापेक्षा तो एक ऐतिहासिक वारसा आहे म्हणून त्याची एकदा नक्कीच सफर करायला हवी.
दिपाली विजय

Friday, 26 March 2021

मराठी माणसालाच माहित नसलेले शिवाजी महाराजांचे मंदिर.

 



मराठी माणसालाच माहित नसलेले शिवाजी महाराजांचे मंदिर.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखत नसेल असा महाराष्ट्रात एकही माणूस नाही. आजही सर्वत्र त्यांच्या पराक्रमाच्या गाथा मोठ्या अभिमानाने सांगितल्या जातात. राजाचं हे महान कार्य आपणही पुढच्या पिढीला नेहमीच सांगत असतो. महाराष्ट्रात राजांचे जसे गडकिल्ले आहे तसे मंदिरे सुद्धा आहे.अनेक शिवभक्तांना आणि मराठी माणसाला ते माहित सुद्धा नाही.यांचा प्रचारप्रसार करण्यात आपण कमी पडलो.
देशात महाराजांची तीन जुनी मंदिरे आहे. १)सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिर २)आंध्रप्रदेशामधील शिवाजी स्फूर्ती केंद्रम आणि ३)नाशिक मधील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर.
योद्ध्याचं शहर (The City of Warrier) अशी जरी नाशिकची ओळख असली तरी नाशिकला मंदिराचं शहर असेही म्हणतात.गोदावरी नदीच्या काठी हे शहर वसलेल आहे. येथे मंदिरच मंदिर आहे. आकडा सांगायचा अंदाज लावला तर साडेतीन हजाराहून अधिक मंदिरे असल्याचा दावा करण्यात येतो.विविध धर्म व पंथाची मंदिरे येथे आढळतात. मात्र नाशिकच्या कालनानगर,वैदुवाडी येथे एक मंदिर आहे हे कोणत्याच धर्माचे किंवा पंथाचे नाही.ते मंदिरे हिंदवी स्वराज्य संस्थापक,सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांचे.
अहमदनगर येथील पारनेरकर महाराज यांनी देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची १ हजार मंदिरे स्थापण्याचा संकल्प केला होता.त्याची मुहूर्तमेढ नाशकात झाली.तब्बल १८ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच मंदिर उभारण्याचा मान नाशिकला मिळाला.
मंदिरात महाराजांची मांडी घालून बसलेली मूर्ती आहे.तिची नित्यनियमाने पूजा केली जाते.त्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला सिंहाची मूर्ती आहे. महाराजांच्या मूर्तीचा डाव्या हाताला संत तुकाराम तर उजव्या हाताला रामदास स्वामींची मूर्ती आहे.
एवढे सगळे असून सुद्धा ह्या मंदिराचा प्रसार झालेला नाही.नेते मंडळी फक्त महाराजांचं नाव वापरून मोठे झाले नंतर त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. महाराज पूजनीय वंदनीय आहे.त्यांच्या कार्याबरोबर त्यांच्या ऐतिहासिक स्थळांची सुद्धा माहिती आपण सर्वाना आणि आपल्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे.
-रोहित सरोदे

Thursday, 25 March 2021

नागपुरातील सर्वात सुंदर ब्रिटिश कालीन वास्तू म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालय.

 ** विभागीय आयुक्त कार्यालय **

( जुने सचिवालय )
सिव्हिल लाइन्स , नागपूर .
***************************















नागपुरातील सर्वात सुंदर ब्रिटिश कालीन वास्तू म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालय.
सन १८६१ मध्ये नागपूर प्रांत, सागर नर्मदा टेरिटरीज व छत्तीसगड प्रदेश मिळून मध्य प्रांत तयार करण्यात आला. सन १९०३ मध्ये निजामाकडून वऱ्हाड प्रांत काढून मध्य प्रांताला जोडण्यात आला आणि मध्य प्रांत व वऱ्हाड ( सी. पी. अँड बेरार ) असे नाव देण्यात आले. ( भारत स्वातत्र्यापुर्वी सन १९४७ पर्यन्त हेच नाव प्रचलित होते. )
८ नोव्हेबर १९१२ रोजी मध्य प्रदेश लेजिस्लेटिव्ह कॉन्सिल निर्माण करण्यात आले. या करिता सचिवालय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. सन १९१० ते १९१६ दरम्यान या सुंदर व भव्य वास्तुचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
सध्या ही ईमारत जुने सचिवालय या नावाने ओळखन्यात येते. हि अष्टकोनी आकाराची दोन मजली इमारत इंडो - युरोपियन वास्तूचा उत्तम नमुना आहे. इमारतीचे बांधकामामध्ये कळ्या बसाल्ट व सावनेर सॅन्ड स्टोन चा वापर करण्यात आला आहे. इमारतीवर जागोजागी सुंदर सुबक व कोरीव नक्षीकाम केलेले आहे. या इमारतीच्या जोत्याचे क्षेत्रफळ ८१२२.७६ वर्ग मीटर आहे. या इमारतीच्या बांधकामाकरिता त्याकाळी सुमारे रू .१०,८०,०३३/- इतका खर्च झाला.
इमारतीसमोर सुंदर बाग असुन त्यात ब्रिटिश बनावटीच्या तीन तोफा ठेवण्यात आल्या आहेत.
सध्या या इमारतीत नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय व विभागीय स्तराची २० कार्यालये आहेत.
संकलन - धिरज लिंगे , नागपूर.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...