विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label पेशवाई. Show all posts
Showing posts with label पेशवाई. Show all posts

Friday, 22 July 2022

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या स्वराज्यसेवेचा घटनाक्रम

 

बाळाजी विश्वनाथ पेशव्यासंबंधी थोडक्यात सर्व काही

 


श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या स्वराज्यसेवेचा घटनाक्रम :-

  • सन १५७५ महादजीपंत भट श्रीवर्धनचे देशमुख
  • सन १६६० परशुरामपंत भट शिवाजीमहाराजांच्या कारकुनी सेवेत दाखल.
  • परशुरामपंत भट शिवाजीमहाराजांच्या सेवेत सरदार.
  • सन १६८४ साली बाळाजी विश्वनाथ चिपळूण सोडून सासवडास पुरंदरे यांच्याकडे वास्तव्यास आले. सन १६८४ ते सन १६९९ औरंगजेबाच्या विरुद्ध रामचंद्रपंत यांच्या सेवेत.
  • सन १६९९ ते सन १७०३ पुणे प्रांताचे सरसुभेदार.

या कार्यकाळातील कार्ये

  1. नारायणगाव येथे बंधारा बांधला.
  2. नारायणगड हा किल्ला बांधला.
  3. विसापूर किल्ल्याची डागडुजी.
  • मोगलांशी एकीकडे मुत्सद्दी वाटाघाटी तर दुसरीकडे सिंहगड किल्यास पुरंदरे यांच्या मार्फत दारूगोळा रसद पुरवठा. या काळात दिम्मत सेनापती असा बाळाजी विश्वनाथ यांचा उल्लेख.
  • सन १७०४ ते सन १७०७ दौलताबाद प्रांताचे सरसुभेदार.
  • या काळात या सुभे दौलताबाद प्रांताचा उत्तम बंदोबस्त.
  • नोव्हेंबर सन १७०५ मध्ये दहा हजार फौजेनिशी दिंडोरीवर स्वाऱ्या.
  • बाळाजी विश्वनाथ यांची हुशारी पाहून

अंबाजीपंत पुरंदरे व प्रतिनिधी यांच्या शिफारशीनुसार सेनापती धनाजी जाधव यांच्या सेवेत. फौज बाळगून प्रतिकूल परिस्थितीत उत्तम महसूल वसूली.

  • बाळाजी विश्वनाथ यांची ताराबाईसाहेबांकडून रांगणा किल्यावर नेमणूक.
  • सन १७०५ औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला असतांना बाळाजी विश्वनाथ यांची मोगलांच्या ताब्यातील गुजरातवर स्वारी. झाबुआ व गोध्रा प्रांतांचा मोगल सुभेदार मुरादबक्ष याचा पराभव.
  • मुरादबक्षचा दोन लाख दहा हजार खंडणी भरून बाळाजी विश्वनाथ यांच्याशी तह.

शाहूमहाराज यांची दिनांक ८ मे सन १७०७ रोजी दारोहा गावी सुटका.

ऑक्टोबर सन १७०७ च्या खेडच्या निर्णायक लढाईत सेनापती धनाजी जाधव यांना थोरल्या धन्याविरूद्ध न लढण्याचाबाळाजींचा सल्ला. सेनापती धनाजी जाधव आणि शाहूमहाराज यांची भेट. सेनापती धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ शाहूमहाराजांच्या सेवेत दाखल. खेडची लढाई. सातारा शाहूमहाराजांकडून काबीज.

दिनांक १२ जानेवारी सन १७०८ सातारा येथे शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक. छत्रपती शाहूमहाराज यांच्याकडून अष्टप्रधानांच्या नेमणूका. बाळाजी विश्वनाथ यांची अमात्यांचे मुतालिक म्हणून नियुक्ती.

दिनांक २७ जून सन १७०८ सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.

दरम्यान छत्रपती शाहूमहाराजांकडून बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते किताब व सेना उभारणीसाठीच्या खर्चास पंचवीस लाख दहा हजार दोनशे रूपयांचा सरंजाम बहाल.

सन १७१२-१३ छत्रपती शाहूमहाराज यांचे पेशवा बहिरोपंत पिंगळे यांची सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वर स्वारी. स्वारीत पेशवा बहिरोपंत पिंगळे यांचा सरखेल कान्होजी आंग्रे यांजकडून पराभव. पेशवा बहिरोपंत पिंगळे कैदेत. याच स्वारीत श्रीपतराव प्रतिनिधी यांनी गाजविलेल्या पराक्रमामुळे शाहूमहाराजांच्या कैदेत असलेले परशुरामपंत प्रतिनिधी यांची कैदेतून सुटका. दिनांक १६ मार्च सन १७१३ रोजी परशुरामपंत प्रतिनिधी यांची पेशवा म्हणून नियुक्ती. आंग्रे यांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यात पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची चालढकल. दिनांक १९ जून सन १७१३ रोजी पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची पून्हा प्रतिनिधी पदावर नियुक्ती.

पेशवा पद दिनांक १९ जून सन १७१३ ते दिनांक १६ नोव्हेंबर सन १७१३ पर्यंत रिक्त.

दरम्यानच्या काळात बाळाजी विश्वनाथ यांचे फौजेचे वळण चांगले असल्याने बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा पद देण्याविषयी अंबाजीपंत पुरंदरे आणि प्रतिनिधी यांची शाहूमहाराज यांच्याकडे शिफारस. दिनांक १७ नोव्हेंबर सन १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांची पेशवा पदी नियुक्ती.

सन १७१८ जानेवारीत पोलवण येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांची पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी भेट घेऊन सरखेल कान्होजी आंग्रे यांना शाहूमहाराजांच्या पक्षात आणण्यात यश आले. दिनांक २८ फेब्रुवारी सन १७१४ रोजी पेशवे व आंग्रे यांच्यात सलोख्याचा तह. बहिरोपंत पिंगळे व निळो बल्लाळ चिटणीस यांची सुटका. सरखेल कान्होजी आंग्रे शाहूमहाराजांच्या पक्षात आल्याने पश्चिम किनारपट्टीवर शाहूमहाराज यांची सत्ता स्थापन झाली.

नोव्हेंबर सन १७१५ पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी पुणे प्रांत स्वराज्यात आणला. चंद्रसेन जाधव याने शाहूमहाराज यांना व दमाजी थोरात याने बाळाजी विश्वनाथ यांना कपटाने कैद करण्याचा कट रचला. ५ ऑगस्ट सन १७१६ रोजी दमाजी थोरात यांजकडून पेशवा बाळाजी विश्वनाथ, अंबाजीपंत पुरंदरे आदी यांना कपटाने कैद केले. खंडणी देऊन सुटका झाली. बाळाजी विश्वनाथ यांनी पिलाजी जाधव यांच्यावर दमाजीची मोहीम सोपवली. पिलाजी जाधव यांनी दमाजी थोरात याचा पराभव करून त्यास अटक करून या प्रकरणाचा कायमचा सोक्षमोक्ष लावला.

सन १७१४ आंग्रे – पेशवे यांच्या संयुक्त स्वारीने जंजीरेकर हबशाकडील काही किल्ले स्वराज्यात आणले.

सन १७१७ – १८ पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि हुसैन अली सय्यद यांनी कोल्हापूरकर संभाजींचा पूर्ण पाडाव केला. गुजरात, खानदेश आदी बादशाही मुलखात मराठ्यांनी छापेमारी आरंभली.

सन १७१८ सालच्या अखेरीस पेशवा बाळाजी विश्वनाथ आपला जेष्ठ पुत्र बाजीराव फौजेसह उत्तरेकडील दिल्ली मोहिमेवर रवाना झाले. सय्यद बंधूंनी मदतीबदल्यात पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्याशी स्वराज्याचा मुलूख, मराठ्यांचे चौथाईचे हक्क आदी बाबतच्या शाही सनदा देण्याचा तह केला. सय्यद बंधूंनी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या साह्याने बादशहा फर्रूखसियरला पदच्युत केले व त्याच्या जागेवर रफिउद्दोरजात बादशहा केले. या सर्व धामधुमीचा फायदा उचलत पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद बंधूवर दबाव आणून महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपरीवार यांची सहीसलामत सुटका करून घेतली. शाही सनदा मिळाल्यानंतर पेशवा बाळाजी विश्वनाथ साताऱ्यास आले. या मोहिमेतील खर्च वजा करून पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी तीस लाख रूपये व शाही सनदा छत्रपती शाहूमहाराजांच्या चरणी अर्पण केल्या.

सन १७१९ साली पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी चासकर जोशी यांच्यामार्फत कल्याण – भिवंडी प्रांत स्वराज्यात आणला. यानंतर बेळगांव, रूकडी, तावळे, डिग्रज या भागात मोठी मोहीम राबविण्यात आली. सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांचा बंदोबस्त करून आष्टा व येळावी ही दोन महत्त्वपूर्ण ठाणी ताब्यात घेतली. कोल्हापूरकर संभाजी राजे आणि शाहूमहाराज यांच्यात वैमनस्य वाढत होते. दरम्यान पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी कोल्हापूरला वेढा घातला. दिनांक २० मार्च सन १७२० रोजी कृष्णतीरावरील उरणबाहे येथे कोल्हापूरकर संभाजी राजे यांचा पूर्ण पराभव करून त्यांनी संभाजी राजेंना साताऱ्यास राजदर्शनासाठी आणले. साताऱ्यास राजबंधूंच्या भेटीगाठी, राजकीय खलबते झाली.

मोहिमेनंतर सासवड येथे घरी परतल्यावर चाळीस वर्षांच्या अविश्रांत दगदगगीने पेशवा बाळाजी विश्वनाथ आजारी पडले. अखेर दिनांक २ एप्रिल सन १७२० रोजी एका कर्तव्यदक्ष, कर्तबगार पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची प्राणज्योत मावळली.

**********

बाळाजी विश्वनाथ भट

 

बाळाजी विश्वनाथ भट 

 सातारच्या शाहूमहाराजांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांची आज जयंती (१ जानेवारी १६६२ – २ एप्रिल १७२०). (प्रधान –पेशवा हा मूळ फारसी पेसवा शब्दाचा मराठी उच्चार )
भट घराण्यातील पहिला पेशवा. त्याने पेशवेपदाचे महत्त्व वाढविले व ते पुढे त्याच्या वंशजांकडे गेले; या अर्थाने बाळाजीस पेशवाईचा संस्थापक म्हटले जाते. पूर्ण नाव बाळाजी विश्वनाथ भट. याच्या पूर्वजांविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही; तथापि कोकणातील महाल दंडा राजपुरी आणि श्रीवर्धन येथील देशमुखीचे वतन या घराण्यात चालू होते. हा मुलूख जंजिऱ्याच्या सिद्दीच्या अंमलाखाली होता. त्याच्या जुलमास कंटाळून बाळाजी व त्याच्या समवेत नाना फडणीसाचे पूर्वज भानु १६९० च्या सुमारास साताऱ्याकडे आले. पुढे धनाजी जाधव याजकडे बाळाजी नोकरीस राहिला. स्वकर्तृत्वाने धनाजीकडे पुणे, दौलताबाद या प्रदेशांवर सुभेदार, सर सुभेदार इ. पदावर त्याने काम केले.

 

मोगलांच्या कैदैतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी, या करिता चाललेल्या १७०५ मधील खटपटीत तो मध्यस्थी करीत असावा असे दिसते. खंडो बल्लाळ चिटणीस आणि बाळाजी यांच्यामुळे खेडच्या लढाईत ताराबाईंचा पराभव झाल्यानंतर धनाजीने शाहूचा पक्ष स्वीकारला. १६९०-१७०७ दरम्यान मराठी कारभार आणि राजकारण यांचा अनुभव घेतलेल्या बाळाजीपंताला शाहूने राज्याभिषेकसमयी सेनाकर्ते ही पदवी बहाल केली. शाहूने बाळाजीचा पक्ष घेतल्यामुळे धनाजीचा मुलगा चंद्रसेन महाराणी ताराबाईस मिळाला. दुसरेही काही सरदार ताराबाईस जाऊन मिळाले. त्याच वेळी काही मोगल अधिकाऱ्यांनी शाहूला विरोध करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे शाहूला शत्रूने वेढले होते. बाळाजीने कर्जे काढून फौजा उभारल्या आणि कृष्णराव खटावकर, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण यांसारख्या पुंडांचा आणि छत्रपतींच्या इतर शत्रूंचा उपशम केला. सेनाकर्ते ही पदवी त्याने सार्थ केली. कान्होजी आंग्रे हा त्या वेळी ताराबाईला मिळाला आणि लोहगड घेऊन पुण्यावर त्याने स्वारी केली. शाहूने त्याचा बंदोबस्त करण्याकरिता पेशवा बहिरोपंत पिंगळे यास पाठविले; पण पेशव्याचा पराभव होऊन तोच कान्होजीच्या कैदेत पडला. अशा बिकट परिस्थितीत बाळाजीने मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहूच्या पक्षात ओढले आणि त्यास सरखेलपद बहाल करविले. शाहूने बाळाजीस पेशवेपद दिले. (१७१३).

आंग्र्यांशी झालेल्या करारनाम्याने बाळाजी पेशव्याने एक मोठा प्रश्न निकालात काढला. १६८१ पासून मोगलांशी चाललेल्या लढ्यात जाधव, घोरपडे, भोसले, दाभाडे, आंग्रे इ. सरदारांनी आपापल्या हिमतीवर फौजा उभारून मुलूख जिंकून त्यांवर अंमल बसविला होता. या सरदारांना त्याने एकत्र आणले व नवीन सरदार उत्पन्न केले. या प्रबळ सरदारांचे आणि छत्रपतींचे संबंध कसे असावे, हा गुंतागुंतीचा प्रश्न होऊन बसला होता. सरदार-जाहगीरदारांचे महत्त्व वाढत चालले होते. एकतंत्री राजसत्ता जाऊन मराठी सत्तेला सरंजामी सत्तेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशा वेळी आंग्र्यांशी झालेला करार हा या बदलत्या राजकारणाचा पहिला आविष्कार होता. यामुळे एक एक सरदार शाहूच्या आधिपत्याखाली येत गेला आणि स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखी यांच्या सनदांनी जो मुलूख आणि जे हक्क छत्रपतींस प्राप्त झाले, ते अष्टप्रधान आणि इतर सरदार यांत शाहूतर्फे वाटले गेले.

बाळाजीने दुसराही असाच एक महत्त्वाचा प्रश्न सोडवून मराठी राज्याला स्थैर्य आणले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फरूख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांचे वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्याच्या बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या. आत्मरक्षणार्थ सय्यद बंधूंना मित्र शोधावे लागले. दक्षिणेचा सुभेदार सय्यद हूसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह केला. त्यात शिवाजीमहाराजांचे स्वराज्य बिनशर्त शाहूला देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्क मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहूने पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी, या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते. बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साहाय्यास नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गेला. दिल्लीत सत्तांतरण झाले. फरुख सियरची इतिश्री होऊन महमूदशाह गादीवर आला. १७१९ च्या मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशाहचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी दक्षिणेत परतला. संभाजीची पत्नी येसुबाई आणि इतर मंडळी मोगलांच्या कैदेत होती. त्यांना घेऊन जुलै महिन्यात पेशवा बाळाजी साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटला.

अशा रीतीने शाहूच्या सत्तेला मान्यता आणि स्थैर्य बाळाजी विश्वनाथने मिळवून दिले. बाळाजी विश्वनाथाने सय्यद बंधूंशी तह करून मोगली राजकारणात प्रवेश मिळविला. या प्रवेशामुळे बाजीराव पेशव्यांस उत्तरेकडे मराठी राज्याचा विस्तार करता आला. चौथ-सरदेशमुखीचे जे हक्क पेशव्याने मिळविले ते वसूल करण्याच्या निमित्ताने मराठी फौजांचा संचार दक्षिणेत चोहोकडे सुरू झाला व त्यांच्या वाढत्या पराक्रमास वाव मिळाला.

बाळाजी विश्वनाथ दिल्लीहून परत आल्यावर दक्षिणेत कोल्हापुरच्या बंदोबस्तासाठी गेला. काही दिवस कोल्हापुरला वेढा देऊन तो १७२० च्या मार्च महिन्यात साताऱ्यात आला आणि तेथून सासवडला गेला. तेथेच त्याचे निधन झाले. त्याची पत्नी राधाबाई त्याच्या मृत्यूनंतर बरीच वर्षे जिवंत होती. त्याला पहिला बाजीराव आणि चिमाजी आप्पा असे दोन मुलगे होते. ते मराठेशाहीत स्वपराक्रमाने प्रसिद्धीस आले.(मराठी विश्वकोश )

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकाच्या फलकावरून साभार


पेशव्यांचे सरदार दावलजी सोमवंशी

 

दावलजी सोमवंशी हे बाळाजी विश्वनाथ पेशवे व नंतर थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळामधील एक निष्ठावान व शूर सरदार होते. मी 1700 ते 1740 काळांतील मराठी राज्याचा अभ्यास करत आहे. पण मला यांचेविषयी समग्र माहीती मिळालेली नाही. सोमवंशी हे आडनाव असलेले लोक एका विशीष्ठ समाजाचे आहेत. हे पुर्वी घोड्यांचे संगोपन व नाल लावण्याचे काम करत असत. कालांतराने हा व्यवसाय कालबाह्य झाल्यावर ते इतर व्यवसायांकडे वळले. ते मुळचे महाराष्ट्रातील आहेत का उत्तरेकडून आले याबाबत ठोस माहीती मिळत नाही.

बाळाजी विश्वनाथ पेशवे असताना छत्रपती शाहू महाराजांशी निष्ठावान राहून सातत्याने सेवा केलेल्या मोजक्या नावांमधे हे एक नाव सापडतं. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली मोहीम आखली गेली. ही मोहीम अत्यंत यशस्वी झाली. बाळाजींनी या दिल्ली मोहीमेतून दिल्ली दरबारकडून शाहू महाराजांच्या नावाने दख्खनच्या सनदा आणल्या तसेच शाहू महाराजांच्या मातोश्री, व इतर कुटूंबीय यांना मुघलांच्या कैदेतून सोडवून आणलं. या मोहीमेमधे भाग घेणार्यी मराठी सरदारांमधे दावलजी सोमवंशी हे एक ठळक नाव समोर येतं.

बाळाजी विश्वनाथ यांचेमागून बाजीराव हे पेशवे झाले. परंतु शाहू महाराजांच्या दरबारामधील जुने जाणते सरदार यांचे सहाय्य बाजीराव यांस मिळालं नाही. बाजीराव हा तरूण असल्याने त्याच्यापेक्षा आपणंच पेशवेपदासाठी अधीक लायक आहोत असा या मंडळींचा दावा होता. अर्थात तो दावा पुढे फोल ठरला. जुन्या सरदारांपैकी जे दोन महत्वाचे सरदार बाजीरावाच्या प्रत्येक लढाईमधे पुर्ण जीव ओतून लढले ते म्हणजे वाघोलीचे पिलाजी जाधव व दावलजी सोमवंशी.

1727 मधे निजाम स्वराज्यावर चालून आला. दुर्दैव म्हणजे निजामास कोल्हापूरच्या संभाजी राजेंची साथ लाभली. अशा संयुक्त फौजेशी सामना करणे सोपं नव्हतं. बाजीरावाच्या कुशल नेतृत्वाखाली निजामाने हार पत्करली. ही लढाई जगांतील युद्ध इतिहासांत एक महत्वाची लढाई म्हणून नोंदली गेली आहे. या लढाईत बाजीरावासोबत जे सरदार प्राणपणाने लढले त्यामधे एक म्हणजे दावलजी सोमवंशी हे होते.

अशा दावलजी सोमवंशी यांच्या पराक्रमाच्या कथा आहेत. मात्र त्यांचा मृत्यू व पुढे वारस यांचेबाबत फारशी माहीती मिळत नाही. सध्या उत्तर इथेच थांबवतो. पण सवडीने अधीक लिहून याच उत्तरामधे भर घालेन.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...