विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label यावनी आक्रमण. Show all posts
Showing posts with label यावनी आक्रमण. Show all posts

Tuesday, 4 August 2020

यावनी आक्रमण: भाग - ९





यावनी आक्रमण: भाग - ९
postsaambhar ::

Prashant Babanrao Lavate-Patil

__________________
जर आपण भाग- ८ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग- ९ वाचण्या आगोदर भाग- ८ नक्की वाचून घ्यावा. भाग- ८ ची लिंक खाली दिलेली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग ७ आणि ८ मधून आपण खल्जी घराण्याचा इतिहास पाहत आहोत. खलजींचा इतिहास थोडा खोलात जाऊन पाहण्याची अनेक कारणे आहेत. त्यामधील दोन महतवाची कारणे जी माझ्या दृष्टीने महत्वाची आहेत ती म्हणजे, सलग २० वर्षे दिल्लीचा सुलतान राहून जवळ-जवळ निम्म्याहून अधिक हिंदुस्थानावर राज्य केलेला पहिला सुलतान म्हणजे अलाउद्दीन खल्जी आणि दुसरे कारण म्हणजे दक्षिणेत उतरणारा पहिला सुलतान सुद्धा अलाउद्दीन खल्जीच. अलाउद्दीन हे नाव ऐकले की, त्याच्या दोनच गोष्टी आपल्याला आठवतात एक, 'देवगिरीवरचे आक्रमण' आणि दुसरे म्हणजे 'राणी पद्मावती'. नक्कीच, या दोन घटना सोडून सुद्धा अलाउद्दीनचा खूप मोठा इतिहास आहे. फक्त या दोन घटना ज्या इतिहासात प्रसिद्ध झाल्या आणि त्याचे कारण म्हणजे अतिशय रंजकपणे या गोष्टी सामान्यांपर्यंत पोहचवण्यात आल्या.
या दोन्ही घटनांकडे पाहताना फार कमी लोकांनी समकालीन इतिहासकारांनी काय लिहिले आहे याकडे नेहमी दुर्लक्ष केले. यामुळेच देवगिरीचे राज्य म्हणजे एकदम साधेसुधे राज्य होते आणि किरकोळ सेना घेऊन लुटीच्या उद्देशाने आलेल्या अलाउद्दीनने हे राज्य पहिल्याच आक्रमणात अगदी खिळखिळे करून टाकले अशीच समजूत जनसामान्यांची झाली. सातव्या भागामध्ये हेच सर्व मी उत्तरकालीन अभ्यासकांनी आपल्या विविध लेखनातून कसे मांडले हे सांगितले. पण ज्यावेळी मला उत्तर भारतातील काही लेखकांनी लिहिलेली पुस्तकं ज्याला समकालीन इतिहासकारांनी केलेल्या नोंदींचा आधार आहे आणि त्यांचे लेख मिळाले. त्यावेळी या घटनेची दुसरी बाजू मांडणे मला गरजेची वाटली जी मी आठव्या भागात मांडली. तशीच दुसरी घटना म्हणजे 'अलाउद्दीन आणि राणी पद्मावती व चित्तोडगडचा पाडाव'. आता या संपूर्ण घटनेचा प्रवास आपण करू. सुरवात करू ती आजवर काय सांगितले गेले त्यापासून आणि नंतर मग या घटनेच्या समकालीन नोंदी पाहू आणि मग याचे विश्लेषण करू. त्यानंतर लोकशाहीचा फायदा घेत मी माझे मत मांडेनच जे पूर्णपणे माझे वयक्तिक मत असेल ☺️. वाचकांनी सुद्धा यावरून आपले निष्कर्ष काढावेत. याचबरोबर अलाउद्दीनची संपूर्ण कारकीर्द आपण थोडक्यात पाहू.
(इतिहासातील कोणत्याही घटनेचे निष्कर्ष एकदा मांडले की ते कायमस्वरूपी पक्के नसतात. भविष्यात अनेक संशोधने होतील ज्यातून नवीन माहिती उजेडात येऊन जुनी माहिती खरी किंवा खोटी ठरू शकते☺️).
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दिल्लीचा सुलतान आणि अलाउद्दीनचा चुलता व सासरा "जलालुद्दीन खल्जी" याचा अलाउद्दीनने खून केला. जलालुद्दीनला मारल्यावर सहजासहजी आपल्याला दिल्लीची गादी मिळेल असे अलाउद्दीननला वाटत नव्हते कारण जलालुद्दिनचे अनेक निकटवर्तीय मंत्री व सरदार दिल्लीत होते. म्हणून आपले स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा विचार अलाउद्दीनने केला होता. जलालुद्दीन मेला ही बातमी दिल्लीला कळताच त्याच्या बायकोने आपल्या मोठ्या मुलाला गादीवर बसवले, आणि दिल्लीमध्ये चाललेली ही सत्ता बदलीची खळबळ अलाउद्दीनला दिल्लीपर्यंत घेऊन गेली. ऐन पावसाळ्यात तो दिल्लीकडे चालला. वाटेमध्ये जलालुद्दीनच्या अनेक सरदारांनी त्याला विरोध केला परंतु पैशाच्या जोरावर त्यांने सर्वांना आपल्याकडे वळवले. दिल्लीची सत्ता काबीज करायची असेल तर आर्थिक बळ हे लागणारच होते जे देवगिरीमुळे अधिक बळकट झाले होते, आणि त्याचबरोबर जर सत्ता काबीज करण्यासाठी दिल्लीवर आक्रमण करावे लागले तर लष्करी बळ सुद्धा तितकेच महत्वाचे आहे हे अलाउद्दीन जाणून होता. दिल्लीपर्यंत पोहचेपर्यंत वाटते अनेक सरदार व अंमलदार यांना त्यांच्या फौजेसहित आपल्या बाजूला करून घेतले आणि छप्पन हजार घोडेस्वार व साठ हजार पायदळ एवढी मोठी फौज अलाउद्दीनने गोळा केली. अलाउद्दीन येत आहे हे समजताच जलालुद्दीनची बायको आपल्या मुलाला घेऊन मुलतानला पळून गेली. अलाउद्दीन दिल्लीमध्ये पोहचला आणि २१ आक्टोबर १२९६ रोजी त्याने स्वतःला दिल्लीचा सुलतान म्हणून घोषित केले.
अलाउद्दीनचे मूळ नाव "अली गुरशास्प उर्फ़ जूना खान खिलजी" हे होय. दिल्लीच्या गादीवर बसल्यावर त्याने स्वतःला "सिकंदर-ए-सानी" ( सानी म्हणजे द्वितीय) असे उपनाव दिले. या नावाने त्याने नाणी सुद्धा बनवून घेतली. सुलतान बनतात त्याने स्वतःचे नाव "अलाउद्दीन वाड दिन मुहम्मद शाह सुल्तान" असे बदलून घेतले.
अलाउद्दीन तसा बेरका माणूस. खलजींचा पहिला सुलतान ज्याने दिल्लीवर आपली सत्ता काबीज केली त्याला मारून हा सुलतान झाला होता त्यामुळे अनेक सरदार, मंत्री, सैन्य आणि दिल्लीची जनता नाराज असणार हे त्याला माहित होते. लोकांची मने जिंकण्यासाठी त्याने मोठमोठ्या मेजवान्या घेतल्या, समारंभ घेतले. अनेकांना कोणत्यानाकोणत्या कारणांवरून मोठमोठी बक्षिसे दिली. सैनिकांना आगाऊ पगार देऊ केला. अशा अनेक गोष्टी करून त्याने लोकांच्या मनातून राज्यापहरणाचे पाप नाहीसे करण्याचा प्रयत्न अलाउद्दीनने केला. या सर्व घटनांना एक समकालीन आधार मिळतो तो बरनीच्या एका नोंदीचा. तो म्हणतो, "... अलाउद्दीन सुलतान होताच त्याचे पहिले वर्ष अतिशय खुशालीचे गेले. असे खुशालीचे दिवस दिल्लीच्या लोकांनी पूर्वी कधीही पाहीले नव्हते". अलाउद्दीन नेहमी सतर्क असलेला दिसतो. ज्यांना-ज्यांना त्याने पैसे देऊन आपल्याकडे वळवले होते त्यांना राज्यकारभारात स्थिरता आल्यावर शासन केले. काहींना मारून टाकले तर काहींचे डोळे फोडून बंदिवासात टाकले. त्यांची सर्व संपत्ती जप्त करून सरकारात जमा केली. पण काही अंमलदार असे होते की अलाउद्दीनने पैशाची लालच देऊन सुद्धा जलालुद्दीनला सोडले नव्हते परंतु अलाउद्दीन सुलतान झाल्यावर ते नोकरीत राहिले. त्यांना अलाउद्दीनने कधीचा त्रास दिला नाही. पैशासाठी जे एका सुलतानाला दगा देऊ शकतात तर मग दुसऱ्या सुलतानाला दगा देणार नाहीत असे कसे? अशा सगळ्या लोकांना अलाउद्दीनने शासन केले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ अलाउद्दीन आणि मंगोल
अलाउद्दीन इकडे दिल्लीमध्ये स्थिरता आणायची धडपडत होता आणि वायव्य सरहद्दीवर मंगोल उभे होते. अलाउद्दीन १२९६ साली सुलतान झाला आणि त्याला पुढचे जवळ-जवळ आठ दहा वर्षे मंगोलांशी कडवी झुंज द्यावी लागली. पण अलाउद्दीनने मंगोलांना प्रत्येक लढाईमध्ये हरवले. इ.स. १३०६ पर्यंत जवळ-जवळ सहा आक्रमणे झाली.
जियाउद्दीन बरनीने आपल्या "तारीख-ए-फिरोजशाही" मध्ये मोंगली आक्रमणाच्या नोंदी केल्या आहेत. १२९६-९७ मध्ये जे आक्रमण झाले त्यामध्ये उलूग खां (खान) आणि जफर खां (खान) या दोन सरदारांच्या नेतृत्वाखाली अलाउद्दीन मंगोलांचा पराभव केला. पुढे १२९९ ला कुतलुग ख्वाजा याने वीस हजाराची सेना घेऊन हिंदुस्थानावर आक्रमण केले. पुढे १३०३, १३०५ आणि १३०६ साली मंगोलांनी आक्रमणे केली परंतु प्रत्येकवेळी अलाउद्दीनने त्यांना पराभूत केले. जगावर राज्य करण्याचे स्वप्न बाळगून निघालेल्या मंगोलांचा अलाउद्दीनने असा पराभव केला की भीतीपोटी मंगोलांनी इस्लाम धर्म स्वीकरला. अनेक मंगोली इथेच स्थायिक झाली. मंगोली राजकारणात खूप हुशार आहेत हे अलाउद्दीन जाणून होता. मंगोलांनी जरी इस्लाम धर्म स्वीकारला असला तरी त्याला मंगोलांवर आजिबात विश्वास नव्हता. याच दरम्याने त्याने तीस हजार मंगोल्यांना मारून टाकले आणि त्यांच्या कुटुंबियांना गुलाम बनवले.
■ गुजरातचा पाडाव:
अलाउद्दीन सुलतान झाला त्यावेळी त्याने पहिली स्वारी गुजरातवर केली. त्यावेळी त्या प्रांताचे रखवालदार होते राजे करणराय. अलाउद्दीननं आपले सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांना या मोहिमेवर पाठवले होते. या दोघांनी करणराय यांचा सपाटून पराभव केला. अलाउद्दीनचा सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांनी संपत्तीची तर लूट केलीच, सोबत राजा करणराय यांची राणी कमला देवी हिलाही बंदी केलं. कमला देवीला दिल्लीत आणण्यात आलं. तिची रवानगी अलाउद्दीनच्या जनानखान्यात करण्यात आली. अलाउद्दीन तिच्या सौंदर्यावर इतका भाळला की त्यानं तिच्याशी लग्न केलं.या युद्धामध्ये सोमनाथ मंदिर पुन्हा लुटले गेले. महमूद गझनवीच्या आक्रमणानंतर जी मूर्ती बसवली होती ती फोडून तिचे दगड दिल्लीला नेऊन मशिदीच्या पायऱ्यांना बसवण्यात आले.
■ रतनभोरचा पाडाव:
जयपूरच्या परिसरात रतनभोर नावाचा एक किल्ला. हंबीरदेव नावाचा राजा तिथे राज्य करीत होता. हा किल्ला घेण्यासाठी अलाउद्दीनने आलफखान व नुसरतखान या दोन सरदारांना १२९९ साली पाठवले. हंबीरदेवाने अलाउद्दीनच्या सेनेला कडवी झुंज दिली व त्यांना मागे हटण्यास मजबूर केले. अलाउद्दीन मग स्वतः हा किल्ला घेण्यास रणांगणात उतरला. अलाउद्दीनचा एक पुतण्या होता. त्याचे नाव 'रुक्न्नखान;. याने अलाउद्दीनला एकटे गाठून त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला आणि अलाउद्दीन मेला समजून गोटात परत येऊन राज्यपद स्वीकारले. इतक्यात अलाउद्दीन परत आला आणि त्याने रुक्न्नखानाचा बंदोबस्त केला. रतनभोरला अलाउद्दीनने वेढा टाकला. हंबीरदेवने अलाउद्दीनशी मोठी झुंज दिली परंतु त्याच्या प्रधानाने त्याचा घात केला आणि तो अलाउद्दीनला जाऊन मिळाला. राजपुतांचा पाडाव झाला आणि अनेक राजपुताना कापून काढले. दगाबाज प्रधानास अलाउद्दीनने 'तू तुझ्याच राजाला दगा देऊ शकतोस तर मला देणार नाहीस कशावरून?' असा प्रश्न केला आणि त्याचे डोके धडापासून वेगळे केले.
■ चित्तोडवर स्वारी:
अलाउद्दीनच्या इतिहासातील एक बहुचर्चित घटना म्हणजे त्याने केलेली चित्तोडगडावरची स्वारी. ही स्वारी इतिहासात प्रसिद्ध केली गेली ती फक्त राणी पद्मावतीच्या नावाने. आजवर नक्की काय सांगितले गेले हे बऱ्यापैकी सर्वांना माहित आहे. नेमके काय सांगितले गेले ते त्याची थोडक्यात उजळणी करू,
१) सिंहल द्वीपचा राजा गंधर्व सेन आणि त्याची रानी चंपावती यांची एक मुलगी होती जिचे नाव 'पद्मावती' आणि रतन सिंह रावल यांचे लग्न होते.
२) राघव चेतन नावाचा एक त्याचा गुरु होता जो काळी जादू करतो हे समजल्यावर रतन सिंह रावल त्याला राज्यातून हाकलून देतो.
३) राघव चेतन बदला घेण्यासाठी अलाउद्दीन खलजीला जाऊन मिळतो आणि राणी पद्मावतीच्या सुंदरतेचे वर्णन करून अलाउद्दीनला तिच्याकडे आकर्षित करतो.
४) राणी पद्मावतीला मिळवण्यासाठी अलाउद्दीन चित्तोडगडावर आक्रमण करतो. वेढा देऊन काही होत नाही म्हणून अलाउद्दीन रतन सिंह रावलला भेटीसाठी विचारतो आणि राणी पद्मावतीचा चेहरा पाहून मी दिल्लीला परत जाईन असे वचन देतो.
५) राणी महालाच्या पायरीवर पद्मावती उभी राहते जिचे प्रतिबिंब महालाच्या आजूबाजूला असलेल्या पाण्यात पडते आणि ते प्रतिबिंब समोर असलेल्या शिषमहालामध्ये एक आरसा असतो ज्यामध्ये दिसते आणि त्या आरशातून पद्मावतीचा चेहरा अलाउद्दीनला दाखवला जातो. चेहरा पाहताच तो तिच्या प्रेमात पडतो आणि तिला मिळवायची शपत तो खातो.
६) अलाउद्दीनला गडाच्या खाली सोडायला म्हणून रतन सिंह रावल जातो आणि अलाउद्दीन त्याला कैद करून पद्मावतीला माझ्याकडे पाठवा मगच राजाची सुटका करतो असा निरोप गडावर जातो.
७) पद्मावती ७०० पालख्या पाठवते ज्यामध्ये राजपूत बसलेले असतात आणि युद्ध होते ज्यातून रतन सिंह रावल सुखरूपपणे सुटून येतात.
८) मग पुन्हा भयंकर युद्ध होते. ज्यामध्ये रतन सिंह रावल मारतो आणि गडावर १६००० स्त्रिया अग्निकुंडात जौहार करतात ज्यामध्ये राणी पद्मावती असते.
९) राणी पद्मावती न मिळाल्यामुळे रंगाच्या भरात अलाउद्दीन संपूर्ण किल्ला जाळून टाकतो. वगैरे वगैरे ....
■ आता जरा यावर चर्चा करू,
मेवाडवर आक्रमण करण्यापूर्वी उत्तरेतील बऱ्यापैकी प्रदेश अलाउद्दीनने जिंकला होता. त्याआधी दक्षिणेत देवगिरीवर त्याने विजय मिळवला होता. मेवाडचा राजा 'समर सिंह रावल ' याचा मृत्यू १३०२ साली झाला आणि त्याचा मुलगा 'रतन सिंह रावल' गादीवर आला. सिंहल द्वीपचा राजा गंधर्व सेन आणि त्याची रानी चंपावती यांची एक मुलगी होती जिचे नाव 'पद्मावती' होते असे अनेकांच्या लिखाणातून दिसून आले आहे. सिंहल द्वीप म्हणजे श्रीलंका. १६व्या शतकात म्हणजे या घटनेच्या दोन-अडीचशे वर्षानंतर 'मलिक मोहम्मद जायसी' या मनुष्याने 'पद्मावत' नावाचे एक काव्य लिहिले ज्यामध्ये अलाउद्दीनच्या शौर्याचे अनेक किस्से सांगितले आहेत. त्याचे वर्णन केले आहे. ज्यावेळी अलाउद्दीन युद्धाची तयारी करत असतो त्यावेळी इंद्रदेव सुद्धा घाबरतो. ज्यावेळी त्याची सेना चालायला सुरवात करते त्यावेळी किल्ले हादरून जातात व त्यावर बसलेला राजा थरथर कापू लागतो. अशी अनेक वर्णने अलाउद्दीनबाबत केली आहेत. पण या महाकाव्यामध्ये अलाउद्दीन खल्जी हा एक खलनायक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि नायक होता तो रतन सिंह रावल.
दोन काव्ये, एक म्हणजे 'पद्मावत' जे 'मलिक मोहम्मद जायसी' याने लिहिले ज्यामध्ये अलाउद्दीनने चित्तोडवर स्वारी केली ते म्हणजे राणी पद्मावतीला मिळवण्यासाठी. आणि दुसरे काव्य, 'छिताई वार्ता' जे नारायण दास ने लिहिले ज्यामध्ये छिताईच्या राणीसाठी अलाउद्दीनने देवगिरीवर आक्रमण केल्याचे वर्णन केले आहे. पद्मावती काव्यामध्ये पद्मावती ही चौहान राजपूत हमीर शंक चौहान या श्रीलंकेच्या राजाची मुलगी म्हणून सांगतात. पद्मावती नेमकी राजा गंधर्व सेनानी मुलगी का मग हमीर शंक चौहानाची मुलगी? असो, कोणाचीही का असेना हमीर शंक चौहान हा राजपूत राजा सांगितला गेला मग राजपुतांच्या इतिहासात एकही मनुष्य श्रीलंकेला गेला असेल आणि तिथे राज्य स्थापन केले असेल अशी एकही नोंद नाही.
■ खाली आपण या घटनांची तीन वेगवेगळ्या पद्धतीने केलेली मांडणी पाहू,
१) जायसी सांगतो की, अलाउद्दीन, रतन सिंहाला कैद करून दिल्लीला घेऊन जातो. यानंतर शेजारचा राजा देवपाल हा राणी पद्मावतीवर अत्याचार करतो. पद्मिनीचे दोन नातेवाईक गोरह आणि बादल हे दिल्लीवर आक्रमण करून रतन सिंहाला सोडवून आणतात. रतन सिंह पद्मावतीवर झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून देवपालावर आक्रमण करतो आणि दोघेही त्या युद्धामध्ये मरण पावतात.
२) आता हीच घटना 'फरिश्ता' आपल्या 'गुलशन-ए- इब्राहिमी' (१५८९ मध्ये लिहिली गेली) मध्ये कसे सांगतो बघा, "अलाउद्दीनची चित्तोडगडची मोहीम यशस्वी होते आणि तो चित्तोडगडच्या राजाला कैद करतो (राजाचे नाव सांगत नाही). राजाचे नातेवाईक कसेबसे आपला जीव वाचवून अरवली पर्वतरांगेमध्ये लपून बसतात. अलाउद्दीनला समजते की राजाची मुलगी पद्मावती खूपच सुंदर आहे आणि मग तो राजाला सोडवण्यासाठी तिची मागणी करतो"
३) आता रियासतकार ज्यांनी मुस्लिम शासकांवरती 'मुस्लिम रियासत' लिहिली ते काय सांगतात बघा, "राणा लक्ष्मणसिंह चित्तोड येथे राज्य करत होता. त्याचा चुलता भीमसिंह याने सिंहलद्विपच्या रावाची रूपमती कन्या पद्मावती हिच्याशी विवाह केला. अलाउद्दीनने पद्मावतीच्या लोभापायी चित्तोडगडावर आक्रमण केले. पद्मावतीला माझ्या स्वाधीन कर, असे म्हणून त्याने गडाला वेढा टाकला. किल्ला पडत नाही हे दिसताच 'मला पद्मिनीचा एकदा चेहरा दाखव, मग मी परत जाईन' असा निरोप अलाउद्दीनने भीमसिंहाला पाठवला. मग ते सगळं प्रतिबिंब, आरसा वगैरे झाले. भीमसिंह अलाउद्दीनला सोडायला गडाच्या जरा बाहेर गेला असता अलाउद्दीनने त्याला कैद केले आणि पद्मावतील माझ्या स्वाधीन केल्याशिवाय तुला सोडणार नाही असे सांगितले. ही बातमी गडावर समजताच 'माझ्या संपूर्ण लवाजम्यानिशी मी तुला भेटायला येत आहे' असा निरोप पद्मावतीने अलाउद्दीनला पाठवला. मग ७०० पालख्या गेल्या ज्यामध्ये एक-एक राजपूत बसला होता आणि एक पालखी उचलायला सहा सहा शिपाई भोयांच्या वेशात होते. पद्मावती नव्हतीच. पद्मावती आली असे समजून अलाउद्दीनने तिला नवऱ्याला भेटण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ दिला. भीमसिंहाला सोडायचे नाही असेच त्याने ठरवले होते परंतु एका पालखीत बसून भीमसिंह किल्यात परत गेला. पद्मावतीच्या भेटीची घाई अलाउद्दीन करताच पालखीतून सैन्य बाहेर पडले आणि युद्ध सुरु झाले. अलाउद्दीन सावध होता. युद्धात सर्व राजपूत कापले गेले. पुढे काही दिवस युद्ध होऊन अलाउद्दीनचे भरपूर नुकसान झाले आणि त्याच दरम्यान मंगोलांनी दिल्लीवर आक्रमण केल्यामुळे अलाउद्दीनला दिल्लीला परतावे लागले. पुढे एकाच वर्षात म्हणजे १३०४ मध्ये अलाउद्दीनने पुन्हा चित्तोडवर स्वारी केली. राजपुतांनी जोरदार लढा दिला परंतु काहीच चालेना असे दिसताच पुरुषांनी आपल्या बायकामुलांची अग्नीत आहुती देऊन युद्धभूमीत मरण पत्करले. किल्ला काबीज केल्यावर अलाउद्दीनने झालॊरच्या घराण्यातील मालदेव नामक एका राजास गादीवर बसवले व दिल्लीस परत गेला.
अनेकांनी ही घटना बऱ्यापैकी अशाच पद्धतीने मांडली आहे. थोडाफार मांडणीचा फरक असेल.. वरती तीन वेगवेगळ्या पद्धतीने केलेली मांडणी पाहून एकंदरीत करून ठेवलेला गोंधळ आपण समजू शकतो.
■ आता या घटनेच्या काही समकालीन नोंदी पाहू:
१) अमीर खुसरो हा समकालीन इतिहासकार आहे आणि ही घटना त्याने स्वतहा पहिली आहे व त्याची नोंद करून ठेवली आहे. तो काय म्हणतो पहा,
"२८ जानेवारी १३०३ रोजी सुलतानाने चित्तोड जिंकायचा निश्चय केला. सुलतान सैन्य घेऊन चित्तोडला पोहचला. किल्ल्याच्या दोन्ही बाजूने हल्ले करण्याचे आदेश त्याने सेनेला दिले. दोन-तीन महिने शाही सेना किल्ल्यावर आक्रमण करत राहिली परंतु विजयश्री प्राप्त होत नव्हता. चत्रवारी नावाच्या डोंगरावरून सुलतान सेनेचं नेतृत्व करीत असे. मनोरंजनासाठी सुलतान पूर्वेकडील पैलवान आणि पश्चिमेकडील पैलवानांच्या कुस्त्या लावत असे. २५ ऑगस्ट १३०३ रोजी ज्या किल्यात कोणता पक्षीही जाऊ शकत नाही त्या किल्यात सुलतान शिरला. सुलतानाचा दास अमीर खुसरो देखील सुलतानाबरोबर होता (म्हणजे हा समकालीन लेखक स्वतः तिथे हजर होता). राजा स्वतः सुलतानाच्या सेवेत उभा होता व त्याने क्षमा मागितली. सुलतानाने राजास कोणतीही हानी पोचवली नाही. परंतु क्रोधाने सुलतानाने तीस हजार हिंदूंची हत्या केली. हिंदूंची हत्या करत असताना सुलतानाने एकाही शेतकऱ्याला हानी पोचवली नाही. चित्तोडचे नाव 'खिजाबाद' असे ठेवण्यात आले ......"
अमीर खुसरो इथे पद्मावतीचा उल्लेख सुद्धा करत नाही . मेवाडचा राजा 'समर सिंह रावल ' याचा मृत्यू १३०२ साली झाला आणि त्याचा मुलगा 'रतन सिंह रावल' गादीवर आला आणि या संधीचा फायदा घेऊन नवीन राजावर आपली वचक ठेवण्यासाठी केली गेलेली ही सैनिकी कारवाही होती.
२) "तारिखे फिरोज शाही" चा मुख्य समकालीन लेखक जियाउद्दीन बरनीने ही घटना मोजून तीन-चार ओळीत मांडली आहे. तो म्हणतो, "सुलतानाने देहलीतून सेना घेतली आणि चित्तोडवर आक्रमण केले. चित्तोडला चारी बाजूने वेढा टाकला आणि अतिशय कमी वेळात किल्ला जिंकला. किल्ला जिंकून दिल्लीला परत आल्यावर मोंगलांच्या आक्रमणाची भीती पुन्हा सुरु झाली होती."
३) 'एसामी' या लेखकाने "फुतूहुस्सलातीन" ची रचना १३५० साली केली. म्हणजे अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर ३४ वर्षांनी. तो यामध्ये म्हणतो, "सुलतानाने चित्तोडवर आक्रमण केले. राजा ८ महिने लढला. त्यानंतर राजाने सुलतानाची क्षमा मागितली. सुलतानाने राजाला खिल्लत देऊन सन्मानित केले. शिरजा नावाच्या एका वीराला सुलतान आपला पुत्र समजत असे. त्याची चित्तोडवर नियुक्ती केली आणि त्याला खुसरो खां ही पदवी भलं केली व सुलतान दिल्लीला परत गेला".
४) 'यहया बिन महमद बिन अब्दुल्लाह' हा थोड्या नंतरच्या काळातील इतिहासकार. यहयाने १४३४ पर्यंतचा इतिहास लिहून ठेवला आहे. त्याने आपल्या 'तारिखे मुबारक शाही' मध्ये लिहिले आहे की, "सुलतानाने चित्तोडवर आक्रमण केले आणि चित्तोडवर विजय प्राप्त केला. चित्तोडचे नाव खिरजाबाद ठेवले आणि किल्ल्यावर खिज्र खां याला नियुक्त करून सुलतान दिल्लीला परतला".
वरती जे काही समकालीन किंवा घटनेनंतर थोड्या वर्षांनी लिहिलेल्या लेखकांच्या नोंदी पहिल्या तर थोडाफार फरक जाणवतो परंतु कुठेही पद्मावतीचा उल्लेख केला गेला नाही. अलाउद्दीन आणि पद्मावती यांच्या संदर्भातील घटना ज्या पदतीने रंगवून सांगितली जाते जर ती घडली असती तर निदान राणी पद्मावतीचे नाव इतिहासाच्या एका तरी पानावर नक्कीच असते.
आता प्रश्न उरतो तो 'पद्मावत' या काव्याचा. १६व्या शतकात हे काव्य ज्यावेळी जायसी लिहीत होता त्यावेळी राजपूत राजा 'जगत देवा' याने जायसीला संपूर्ण संरक्षण दिले होते. याचे कारण काय असू शकते हे वाचकांनी ठरवावे. यावर माझे वयक्तिक मत हेच की, ज्या अलाउद्दीन खल्जीने यांच्या पूर्वजांना नेस्तनाबूत केले त्या अलाउद्दीनला जास्तीतजास्त क्रूर दाखवून इतिहासात त्याला खलनायक ठरवायचे होते म्हणून या काव्याची रचना करवून घेण्यात आली.
"जर कोणाची महानता फक्त त्याच्या दुश्मनांशी तुलना करून ठरवायची असेल तर मग अलाउद्दीन खल्जी त्या काळातील प्रत्येक राजाच्या तुलनेत खूप खूप पुढे जातो" असे मत प्रसिद्ध इतिहास संशोधक रुचिका शर्मा यांनी मांडले आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पुढे १३०६ मध्ये दक्षिणेत दुसरी स्वारी झाली. १३१० मध्ये तिसरी आणि १३१२ मध्ये चौथी स्वारी झाली. याबद्दलची माहिती आपण मागच्या काही भागात पाहिलीच आहे. या सर्व देवगिरीवर झालेल्या स्वाऱ्या आहेत.
मलिक काफूरच्या दक्षिणेतील शेवटच्या स्वारी दरम्यान खलजींचे राज्य भरभराटीचे झाले होते. अतिशय थोड्या कालावधीमध्ये अलाउद्दीनने त्याच्या राज्याच्या सीमा दूरवर पसरवल्या होत्या. त्याची शासन व्यवस्था कमालीची होती. बरनी सांगतो, "शेतीलायक जमिनीची तपासणी करून मगच शेत पिकातील अर्धा हिस्सा कराच्या स्वरूपात सरकारात जमा करायचा आणि अर्धा शेतकऱ्याकडे अशी शेतीची व्यवस्था त्याने लावली होती". खोत, मुक़द्दम, चौधरी अशी मंडळी शेतकऱ्यांना विविध करांच्या रूपात लुटत असत. या सर्वांचा बंदोबस्त अलाउद्दीनने केला.
२ जानेवारी १३१६ साली अलाउद्दीनचा मृत्यू झाला. मलिक काफूर याने अलाउद्दीनला विष देऊन मारले अशी काही जणांचे म्हणणे आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ मुबारिक खल्जी (१३१६ ते १३२०):
मलिक काफूरने अलाउद्दीनला मारले असे बरनीचे सुद्धा म्हणणे आहे. अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर मलिकने एक खोटं मृत्युपत्र सादर केले ज्यामध्ये 'अलाउद्दीनचा पाच वर्षांचा एक मुलगा उमरखान यास गादीवर बसवून मलिक काफूरने कारभार पहावा' असे लिहिले होते. उमरखानच्या मोठ्या भावांचा खून केला व त्यांच्या आईला बंदी बनवले व मलिक स्वतः राज्यकारभार पाहू लागला. मुबारिक नावाचा अलाउद्दीनचा मुलगा मलिकच्या तावडीतून वाचला. मलिकचा हा खेळ काही जास्त दिवस चालला नाही. एक दिवस पहारेकर्यांच्या मदतीने मुबारिकने त्याला ठार केले. मुबारिक स्वतः सुलतान बनला. १३१८ मध्ये त्याने हरपालदेवला मारून देवगिरीचे राज्य संपवले. देवगिरीचे व्यवस्था लावून ज्यावेळी मुबारिक दिल्लीस परत आला त्यावेळी दिल्लीत बंडे होऊ लागली होती. मुबारिक ज्यावेळी दक्षिणेच्या स्वारीवर गेला होता त्यावेळी त्याने मलिक खुस्रोला मलबार देश जिंकण्यास पाठवले. खुस्रोने इथून भरपूर संपत्ती गोळा केली. सुलतानाने खुश होऊन आपले सर्व अधिकार त्याला सोपवले. खुस्रोला आता सुलतान व्हायचे होते. त्याने कारभार हाती घेतला. मुबारिक व्यसनात बुडाला. एक दिवस खुस्रोने खल्जी घराण्यातील सर्व पुरुषांचा खून केला. फौजेला पैशाचे लालच देऊन स्वतःकडे वळवले व नासिरुद्दीन असे नाव धारण करून तो सुलतान झाला. तो स्वतःस हिंदू समजून मुस्लिम विरोधी कृत्ये करू लागला. जनानखान्यात अंगावर काटा येईल असे कृत्ये करू लागला. पाच महिने दिल्ली शहर हिंदू बंडवाल्यांच्या ताब्यात दिले. शेवटी पंजाबचा सुभेदार "गाजीबेग तुगलख" याने दिल्लीवर स्वारी केली व त्याने खुस्रोला पकडून ठार मारले. गाजीबेग तुगलखने स्वतःचे नाव बदलून ग्यास-उद्दीन तुघलख असे नाव ठेवले व स्वतः दिल्लीचा सुलतान बनला (इ.स. १३२१).
आता दिल्लीमधील खल्जी घराण्याची सत्ता संपुष्टात आली होती आणि आता दिल्लीवर तुघलख घराण्याची सत्ता प्रस्तापित झाली होती. इ.स. १३२१ ते १३८८ दिल्लीवर तुघलख घराण्याने राज्य केले. याची चर्चा आपण पुढच्या काही भागात करूच.

यावनी आक्रमण: भाग - ८






यावनी आक्रमण: भाग - ८
__________________
जर आपण भाग- ७ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग- ८ वाचण्या आगोदर भाग- ७ नक्की वाचून घ्यावा. भाग- ७ ची लिंक खाली दिलेली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
७व्या भागात आपण पाहिले की खल्जी घराण्याची सत्ता कशी भारतात अधिकृतपणे सुरू झाली. दिल्लीवर सत्ता प्रस्थापित करण्याआधी बंगालमध्ये खल्जी मंडळींनी बंड करून वेगळे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न चालवले होते. जलालूद्दीन खल्जी हा ७० वर्षाचा म्हातारा दिल्लीच्या गादीवर बसला व स्वतःला त्याने हिंदुस्थानचा सुलतान म्हणून घोषित केले. त्याची कारकीर्द आपण पाठीमागच्या भागात पहिलीच. अलाउद्दीन खल्जीने दक्षिणेत केलेले आक्रमण आणि यादवांचा केलेला पाडावही आपण पाठीमागच्या भागात पाहिला. ज्यामध्ये आपण उत्तरकालीन इतिहासकारांनी मांडलेल्या इतिहासाच्या आधारे चर्चा केली. अलाउद्दीन आणि रामदेवराय (रामचंद्रदेव) यांच्या युध्दाबद्दल अनेक लेखकांचे व अभ्यासकांची वेगवेगळी मतं आहेत, म्हणून या प्रकरणावर अजून अभ्यास करून माहिती उपलब्द करून घेण्याच्या प्रयत्नात मी आहे. उत्तरकालीन इतिहासकारांनी त्यांच्या अभ्यासानुसार आपापली मते मांडलीच आहेत पण त्याच बरोबर काही समकालीन मुसलमान इतिहासकार आहेत ज्यांनी अलाउद्दीन आणि यादवांच्या युद्धाबद्दल नोंदी करून ठेवल्या आहेत ज्या मला इथे मांडाव्यात असे वाटले. कारण असे की, अलाउद्दीनच्या या स्वारीमुळे दक्षिणेत असलेले यादवांचे एवढे बलाढ्य राज्य अगदी एका पत्याच्या पानाच्या घरासारखे कसे काय कोलमडू शकते? ... नक्की युद्ध झाले कसे आणि युद्धामध्ये नेमके काय झाले ? असे अनेक प्रश्न आहेत जे एकाबाजूने संभ्रमात टाकतात आणि दुसऱ्या बाजूने विचार करायला लावतात. त्यामुळे समकालीन मुस्लिम इतिहासकार याबद्दल काय म्हणतायत हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. नक्कीच, त्यानंतर प्रत्येकाने आपापले मत मांडायचे आहे किंवा त्यातुन तर्क शोधून अलाउद्दीन आणि देवगिरी या प्रकरणावर आपापले निष्कर्ष ठरवायचे आहेत.
(इतिहासातील कोणत्याही घटनेचे निष्कर्ष एकदा मांडले की ते कायमस्वरूपी पक्के नसतात. भविष्यात अनेक संशोधने होतील ज्यातून नवीन माहिती उजेडात येऊन जुनी माहिती खरी किंवा खोटी ठरू शकते☺️).
या युद्धाची कारणीमीमांसा करताना अनेकांनी आपापली मते मंडळी आहेत. अनेकांनी यामध्ये अलाउद्दीनचा आक्रमकपणा सांगताना त्याच्या युद्धकौशल्यांचा आणि कपटीपणाचा देखील दाखला दिला. यादवांच्याबाबतीत बोलताना अनेकांनी त्यांच्या असावधानतेवर आणि त्यांच्या हेरखात्यावर प्रश्न उभे केले. यादवांच्या पराभवाची अनेक कारणे अभ्यासकांनी मांडली आहेत. नक्कीच, यामध्ये मतांतरे असू शकतात कारण कारणीमीमांसा करत असताना अभ्यासक जो तर्क मांडतो तो त्याच्या अभ्यास करण्याच्या दृष्टीकोनावर आणि पद्धतीवर अवलंबून असतो. परंतु, यादवांच्या पराभवाची करणे देत असताना समकालीन इतिहासकारांनी काय लिहिले आहे यावर नजर टाकणे गरजेचे आहे कारण ते इतिहासाच्या खूप जवळचे आहे.
दक्षिण भारतात अनेक हिंदू राजांनी युद्धामध्ये हत्तींना प्राधान्य दिले. यादवांच्या सैन्यामध्ये हत्तीची संख्या भरपूर असायची. हत्तींना त्यांच्या सैन्यात भरपूर महत्व असायचे हे त्यांच्या अनेक शिलालेखांतून दिसून येते. हत्तीच्या सोंडेमध्ये विविधप्रकाराची हत्यारे बांधून त्यांचा युद्धामध्ये वापर केला जाई. हत्तीच्या मागे पायदळ असायचे त्यामुळे युद्धाची संपूर्ण मदार ही हत्तींवर असायची. हत्तींना यासाठी प्रशिक्षण दिले जाई. या युद्धशैलीमुळे सैन्यांच्या हालचाली मंद होत असत. याउलट, जे काही अरब व तुर्क मंडळींनी आक्रमणे केली त्यामध्ये त्यांनी घोड्यांचा वापर जास्त केला. यामुळे अरबांच्या व तुर्कांच्या युद्धभूमीवरच्या हालचाली अतिशय जोरदार असायच्या. कदाचित या फरकामुळे आपल्या लोकांना अरब आणि तुर्क हे जास्त आक्रमक आणि त्यांची युद्धनीती प्रगतशील वाटली असावी आणि मानसिक दडपण घेऊन आपल्या सैन्यांची तारांबळ उडाली असावी. युद्धामध्ये घोड्यांचा वापर करून सैन्यांची हालचाल वेगवान करू शकतो यावर त्याकाळच्या आपल्या राजांनी जास्त विचार केला नसावा.
इथे आपण समकालीन काही इतिहासकार मंडळींनी या प्रकरणावर प्रकाश टाकताना कोणत्या नोंदी केल्या आहेत या पाहू. देवगिरी युद्धाबद्दल लगत अशा नोंदी मिळत नाहीत परंतु काही घटनांवर विविध नोंदी मिळतात ज्यावरून एकंदरीत परिस्थिती समजू शकते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रख्यात जगप्रवासी मार्कोपोलो यांनी याबद्दल सविस्तरपणे लिहून ठेवले आहे. ते म्हणतात, "भारतीय राजे एकेका घोड्याला ५०० सागी (म्हणजे एक प्रकारचे सुवर्ण नाणे) देऊन विकत घेत परंतु त्यांची निगा कशी राखावी हे त्यांना माहित नसे. ते घोड्यांना उत्कृष्ट आहार देऊन ४० दिवसांपर्यंत ठाणबंद करून ठेवत असत. त्यामुळे घोडे थोडे पुष्ट होत. पण चपळ होत नसत. त्यांना घोड्यांचा व्यायाम, औषधोपचार याबद्दल काहीच माहित नसे. यामुळे घोडे लवकर थकत व ते युद्धासाठी निकामी होत असत. दरवर्षी हे राजे नवीन घोडे विकत घेत असत व त्यांचा यामध्ये अमाप पैसा खर्च होत असे". मार्कोपोलो पुढे लिहितो, की "... अरब व्यापारी भारतीयांना घोड्यांच्या आजराबद्दल आणि औषोपचाराबद्दल काहीच माहिती देत नसत."
जियाउद्दीन बरनी हा एक समकालीन इतिहासकार ज्याने अलाउद्दीनच्या देवगिरीच्या स्वारीबद्दल बऱ्यापैकी नोंदी करून ठेवलेल्या आहेत. अलाउद्दीनने नेमके हे आक्रमण कधी केले याबद्दल बरनी माहिती देत नाही परंतु प्रख्यात कवी अमीर खुसरो मात्र याबद्दल नोंदी सांगतो.
ता. १९ रबिऊलआखर ६९५ हिजरी (ता. २५ फेब्रुवारी १२९६ इ.स.) रोजी अलाउद्दीनने कडा-माणिकपूर सोडले. आणि ता. २८ रजब ६९५ हिजरी (ता. १ जून १२९६) रोजी अलाउद्दीन कडा-माणिकपूरला परतला.
वस्सफ यबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगतो त्यापैकी एक म्हणजे, "अलाउद्दीनने देवगिरीवर आक्रमण करण्यापूर्वी देवगिरीबद्दल आणि सैन्यांच्या एकंदरीत परिस्थितीबद्दल आपल्या हेरांकडून माहिती काढून घेतली होती. रामदेवरायचे बरेचशे सैन्य देवगिरीमध्ये नाही याची त्याने खात्री करून घेतली होती.
अलाउद्दीनचा पहिला तळ एलिचपूर येथे पडला. याबद्दलचे वर्णन करताना बरनी सांगतो की, "विंध्य ओलांडून अलाउद्दीनने एलिचपूर येथी आपला तळ ठोकला व तो घाटलाजौरच्या (घाटी लाजुरा) मार्गाने देवगिरीकडे निघाला. घाटी लाजुरा (घाट लाजूर) हे ठिकाण देवगिरीच्या पश्चिमेस बारा मैलांवर आहे असेही तो सांगतो. देवगिरीजवळ पश्चिमेस लासूर नावाचे गाव आहे आणि ते मैदानावर असून घाट नाही. बुलढाणा भागातून देवगिरीकडे येताना राजुरा घाट लागतो. परंतु हा देवगिरीच्या पूर्वेस आहे. कदाचित याची माहिती फरिश्ता (तारिखे फरिश्ताचा लेखक) यास असावी.
आता इथून पुढचा भाग व समकालीन नोंदी महत्वाच्या आहेत.
* अलाउद्दीन देवगिरीजवळ आला आहे ही बातमी 'कान्हा' नामक एका सामंताने रामदेवरायास सांगितले पण याकडे रामदेवरायाने दुर्लक्ष केले असे बरनी सांगतो.
* 'एसामी इब्ते बत्तुता' सांगतो की 'कान्हा'ने जमेल तेवढे सैन्य गोळा करून लाजोरा घाटात अलाउद्दीनला अडवायला उभा राहिला पण त्याचा टिकाव लागला नाही. तो स्वतः व त्याच्या कुटुंबातील दोन स्त्रिया (स्त्रियांची नावे तो सांगत नाही) तर वाघिणीसारख्या लढल्या परंतु कान्हाचा पराभव झाला आणि अलाउद्दीन देवगिरीकडे निघाला.
आता, इथंपर्यंत आपणास एवढे समजू शकते की नेमके अलाउद्दीन देवगिरीकडे कोणत्या तारखेला निघाला, एलिचपूर नंतर तो कोणत्या मार्गाने देवगिरीकडे आला आणि तो आल्याची वार्ता सामंताने दिली आणि बत्तुताच्या म्हणण्यानुसार त्याअगोदर सामंतांचे आणि अलाउद्दीनचे युद्ध झाले होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■आता प्रश्न उरतो तो "देवगिरीमध्ये नेमके काय घडले?"
या संपूर्ण प्रकरणावर लगत अशी माहिती एकही मुस्लिम इतिहासकार देत नाहीत. एकतर ते मौन पाळतात किंवा वेळ मारून नेतात. बरनी, खुसरो, बत्तुता, फरिश्ता यापैकी जर अलाउद्दीन आणि देवगिरी संदर्भात बोलायचे झाले तर खुसरो हा सर्वात आधीचा लेखक. त्याचा ग्रंथ 'अनाई' हा इ.स. १३२० च्या आसपासचा असावा, कारण १३२५ च्या दरम्यान खुसरो हा मरण पावला होता. अलाउद्दीनच्या या पहिल्या आक्रमणात नेमके काय घडले याबद्दल तो काहीच सांगत नाही.
'बरनी' तर अलाउद्दीन आणि रामदेवराय यांच्या युद्धाचा कोणताच प्रसंग सांगत नाही. याउलट तो म्हणतो, अलाउद्दीन देवगिरीस आला तेव्हा रामदेवराय आपले सैन्य व कुटुंबियांना घेऊन दूर कुठेतरी गेला होता. त्याला अलाउद्दीनची बातमी लागताच कान्हा या सामंताला जमेल तेवढे सैन्य घेऊन लाजौरा घाटात अलाउद्दीनला अडवण्यासाठी पाठवले. या युद्धाचे नेतृत्व कान्हाने केले होते. मराठ्यांनी तुर्कांचे (लेखकाला इथे कदाचित अलाउद्दीनचे नाव असे म्हणायचे असेल) नावही यापूर्वी ऐकले नव्हते. बरनी पुढे म्हणतो की अलाउद्दीनने पहिल्या दिवशी तीस हत्ती व एक हजार घोडे जिंकले आणि नंतर रामदेवराय अलाउद्दीनास शरण आला.
'एसामी इब्ते बत्तुता' या युद्धाचे वर्णन बऱ्यापैकी करतो. तो म्हणतो, "तुर्कांनी कान्हा याचा पराभव करून देवगिरीपर्यंत त्याचा पाठलाग केला. रामदेवरायाचा मुलगा भिल्लम (सहावा) हा सैन्य घेऊन दूर देशी गेला होता. गडावर सैन्य नसल्याने रामदेवरायाला फार वाईट वाटले. तुर्कांनी देवगिरीला वेढा दिला. रामदेवरायाने अलाउद्दीनास संपत्ती देऊन त्याच्याशी तह केला. इकडे भिल्लम परतल्यावर फारच आवेशाने तो तुर्कांवर तुटून पडला. रामदेवरायाने त्याला समजावून गप्प बसवले. रामदेवरायाने आपली मुलगी अलाउद्दीनास दिली. रामदेवरायाने अलाउद्दीनास आपला पुत्र म्हंटले व अलाउद्दीनाने रामदेवरायास बाप म्हंटले. संपत्ती घेऊन अलाउद्दीन परत फिरला.
आता उरला 'फरिश्ता', या बंड्याने अलाउद्दीनच्या पहिल्या आक्रमणानंतर तीनशे वर्षांनी त्याचा ग्रंथ लिहिला आहे. त्यामुळे कदाचित त्याने जिथे गॅप दिसेल तिथे स्वतःचे तर्क लावून लिखाण केले असावे असे वाटते. 'फरिश्ता' म्हणतो, "अलाउद्दीनने असा भास निर्माण केला की, त्याच्या मदतीसाठी आणखीन प्रचंड सैन्य येत आहे. त्यामुळे राजा घाबरला आणि त्याने अलाउद्दीनास ५० मन सोने, रत्ने आदी देऊन तह केला. त्याचा पुत्र शंकरदेवराय सैन्य घेऊन परतला. रामदेवरायाने त्याला शांत बसण्यास सांगितले परंतु त्याने मुस्लिम सैन्यावर हल्ला केला. पण त्याचा पराभव झाला. आता अलाउद्दीनने ६० मन सोने, २ मन मोती, १०० मन रूपे व ४००० रेशमी वस्त्रे लुटली व एलिचपूर प्रांत आपल्या राज्यास जोडला (इथे एक विचार झाला पाहिजे की, खल्जी मंडळींचे दक्षिणेत नेमके कुठेपर्यंत राज्य होते जेणेकरून हा एलिचपूर अलाउद्दीनने आपल्या राज्यास जोडले असे लिहिले).
वरती आपण पाहिले की विवीध मुस्लिम लेखकांनी या युद्धाचे वर्णन कसे केले आहे ते. पण यामध्ये फरिश्ताने केलेले वर्णन आजवरच्या बऱ्याच इतिहासकारांनी उचलून धरले कारण ते जरा रंगतदार वाटते. आणि फरिश्ताने केलेल्या वर्णनाला धरून आजवर अनेक इतिहासकारांनी यादवांचा दारुण पराभव कसा झाला हे सांगण्यास हायगय केली नाही. हे करत असताना फरिश्ताने त्याचा ग्रंथ या घटनेच्या ३०० वर्षानंतर लिहिला आहे व तो किती विश्वसनीय धरावा याबद्दल किंचितही विचार केला गेलेला दिसत नाही. याला अनुसरून श्री. द. ग. गोडसे यांनी लिहिले आहे की, "अलाउद्दीनने यादव सम्राटांची संपूर्ण देवगिरी लुटून ६०० मन सोने, ७ मन मोती, १००० मन रूपे व ४००० रेशमी वस्त्रे एवढी अफाट संपत्ती नेली."
एकंदरीत जर तत्कालीन लेखकांनी केलेल्या नोंदींचा विचार केला तर पहिल्याच आक्रमणात रामदेवरायांचा पराभव होऊन देवगिरीचे राज्य पडले असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण,
१) खुसरो, बरनी, एसामी हे समकालीन इतिहासकार आहेत जे या युद्धाचे असे कोणतेही वर्णन करत नाहीत जेणेकरून देवगिरीचे राज्य पूर्णपणे उद्वस्त झाले असे म्हणता येईल. जर का या युद्धाचे गांभीर्य एवढे महत्वाचे असते किंवा हे युद्ध एवढे निर्णायक असते तर याच्या नोंदी यांनी नक्कीच केल्या असत्या.
२) जी काही प्रचंड प्रमाणात केलेली लूट आज सांगितली जाते त्याचे वर्णन फरिश्ताने त्याच्या ग्रंथात केले आहे जो या घटनेनंतर ३०० वर्षांनी लिहिला आहे.
३) अलाउद्दीनशी लढणाऱ्या रामदेवरायाच्या पुत्राचे नाव कोणी भिल्लम सांगते तर कोणी शंकरदेवराय सांगते. रामदेवरायाच्या पुत्राचे आणि अलाउद्दीनचे युद्ध झाले असे एकही समकालीन इतिहासकार सांगत नाही.
४) मग नक्की देवगिरीच्या दारात युद्ध झाले का? की मग अलाउद्दीन एलिचपूर व इतर भाग लुटून परत गेला? असे प्रश्न उभे राहतात.
५) शंकरदेवरायाला एकच मुलगी होती जिचा पती हरपालदेवराय होता. त्यामुळे रामदेवरायाने आपली मुलगी अलाउद्दीनला दिली ही सरळ सरळ एक थाप वाटते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ देवगिरीवरील दुसरे आक्रमण:
अलाउद्दीनास उत्तरेत राजपूत व इतर राजसत्तेंशी युद्ध करण्यासाठी खजिन्याची गरज पडायची, त्यावेळी त्याने देवगिरी, वरंगळ अशा राज्यांवर वक्रदृष्टी टाकली. १३०७ साली त्याने देवगिरीवर दुसरे आक्रमण केले. या वेळी सुद्धा मुस्लिम इतिहासकार वेगवेगळी माहिती देतात.
'खुसरो' लिहितो, "... रामदेवरायाने मांडलिकत्व झुगारून टाकल्यामुळे मलिक नायब बारबक याच्या नेतृत्वाखाली ३०,००० घोडेस्वार असलेली सेना त्याच्याविरुद्ध पाठवली.ते देवगिरी येथे १९ रमजान ७०६ अ हिजरी (मार्च १३०७) रोजी पोचले. यादवांचा पराभव झाला. त्याला (रामदेवरायाला) एक लालछत्र देऊन सन्मानपूर्वक वागणूक देऊन सोडले."
'बरनी' लिहितो, "अलाउद्दीनने सर्व आघाड्यांवरचे सैन्य एकत्र करून "मलिकनायब काफूर हजारदिनारी" याच्या नेतृत्वाखाली आणि बरोबर लालछत्र देऊन देवगिरीला पाठवले. बरोबर ख्वाजा हाजी हाही होता. काफूरने यादवांचा प्रदेश लुटून जाळून टाकला. रामदेवरायाला व त्याच्या पुत्राला पकडून दिल्लीस नेले. अलाउद्दीनाने रामदेवरायास सन्मानाने वागवले व एक लाख टंक (एक प्रकारचे चांदीचे नाणे) व रायरायान ही पदवी देऊन परत पाठवले.
'एसामी' म्हणतो की, "आपला मुलगा माझ्याविरुद्ध कारस्थाने करतो, त्याला शासन करा." असा निरोप रामदेवरायाने अलाउद्दीनास दिला. आणि यामुळेच अलाउद्दीनाने काफूराला देवगिरीवर पाठवले. अलाउद्दीनाने रामदेवरायास 'नवसारी' प्रांत दिला. फरिश्ताही याच मताचा आहे.
एकंदरीत पाहिले तर इथे सुद्धा खूप विसंगती आहे. नवसारी येथे एक शिलालेख सापडला असून तो विक्रम संवतचा आहे (इ.स. १३०२). ज्यामध्ये रामदेवरायाला 'महाराजाधिराज' अशी पदवी आहे. त्यामुळे अलाउद्दीन रामदेवरायाला नवसारी प्रांत कसा देईल? कदाचित पहिल्या आक्रमणाच्या वेळी किंवा आगोदर कधी त्याने हा प्रांत जिंकला होता जो परत त्याने रामदेवरायाला दिला असे असावे का? परंतु अशा नोंदी कुठेही मिळत नाहीत. आणि पराभूत राजास एक लाख टंक (म्हणजे एक प्रकारचे चांदीचे नाणे) का कोणी देईल? याचा दुसरा अर्थ असाही होतो की, रामदेवरायाला अलाउद्दीनने सन्मानाने वागवले म्हणजे तो नक्कीच सामर्थ्यवान होता हे स्पष्ट होते. हाती सापडलेल्या राजाला अलाउद्दीन का जिवंत सोडेल? आणि हे सर्व यावनी राज्यकर्ते किती धर्मांध होते हे आपणास माहित आहेच. एक हिंदू राजा ज्याला कैद करून दिल्लीला आणले आहे त्याला सन्मानाने वागवून देऊन त्याची मुक्तता एक मुस्लिम सुलतान कसा करेल? यामागे नक्कीच काहीतरी कारण असायला पाहिजे. राजकीय तर असे मोठे कारण कोणते दिसत नाही परंतु रामदेवराय आणि त्याचे सामर्थ्य नक्कीच एकमेव कारण असू शकते. रामदेवरायाला दिल्लीला पकडून नेले होते तर मग अशी सन्माननीय वागणूक का दिली? मग नक्की पकडून नेले होते का रामदेवराय स्वतःला गेला होता? रामदेवरायाने अलाउद्दीनचे मांडलिकत्व स्वीकारले होते असे कुठेही दिसत नाही आणि अलाउद्दीनने दिलेली 'रायरायान' ही पदवी रामदेवरायाने कुठे वापरली असावी असा एकही उल्लेख सापडत नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
या प्रकरणानंतर रामदेवरायाचा मृत्यू झाला. त्यानंतर शंकरदेवराय गादीवर बसला. मागे सांगितल्याप्रमाणे अलाउद्दीनशी बंड किंवा युद्ध नक्की शंकरदेवरायाने केले होती का भिल्लमने केले होते हे नक्की सांगता येत नाही. कारण यांच्या युद्धाबद्दल एकाही मुस्लिम समकालीन इतिहासकाराने लिहिले नाही.
फरिश्ता सांगतो की, "देवगिरीच्या पुढच्या युद्धामध्ये रामदेवरायाचा पराभव झाला व त्याला क्रूरपणे ठार मारले."
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पुढे जाऊन ज्यावेळी अलाउद्दीनचा मृत्यू झाला त्यावेळी बऱ्याच रक्तपातानंतर अलाउद्दीनचा तिसरा मुलगा 'कुतुबुद्दीन मुबारकशहा' हा सुलतान बनला. तिकडे मलिक काफूरच्या मृत्यूनंतर हरपालदेव याने देवगिरी पुन्हा जिंकली.
यावर बरनी लिहितो की, "खुद्द मुबारकशहा सुलतान स्वतःला देवगिरीवर चालून आला व त्याने कोणताही रक्तपात न करता देवगिरी पुन्हा जिंकला.हरपालदेव यास पकडून त्याचे चामडे सोलून देवगिरीच्या वेशीवर टांगण्यात आले."
एसामी सांगतो की, "हरपालदेव यास पकडण्यात आले व त्याची संपत्ती हिसकावण्यात आली."
फरिश्ता सांगतो की, "हरपालदेवाचे मुंडके कापून ते देवगिरीच्या दुर्गावर लटकवण्यात आले."
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विनाकारणची अतिशयोक्ती व फरिश्ता सारख्या लेखकांचा आधार घेऊन यादवांचे राज्य हे प्रतिकाराशिवाय नष्ट झाले असे दाखवण्यात आले. जर समकालीन साधनांचा आधार घेऊन आणि त्याला थोडासा तर्काचा आधार दिला तर रामदेवराय, शंकरदेवराय, भिल्लम, हरपालदेव यांनी खलजींना कडवा प्रतिकार दिला असणार हेच सिद्ध होते.
इतिहासाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत ज्याची वाट निरनिराळ्या साधनांतून मिळते. अलाउद्दीन जरी लुटीच्या उद्धेशाने आला असला तरी एका आक्रमणात यादवांचे राज्य संपवले असे म्हणणे साफ चुकीचे ठरू शकते. बाकी वाचकांनी ठरवावे.
पुढच्या भागामध्ये अलाउद्दीन सुलतान झाल्यावर सुलतान म्हणून कशी सुरवात केली आणि त्याची जगप्रसिद्ध चित्तोडगडाची लढाई यावर चर्चा करू.

यावनी आक्रमण: भाग - ७


यावनी आक्रमण: भाग - ७
postsaambhar ::Prashant Babanrao Lavate-Patil
__________________
जर आपण भाग- ६ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग- ७ वाचण्या आगोदर भाग- ६ नक्की वाचून घ्यावा. भाग- ६ ची लिंक खाली दिलेली आहे.
~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~
सहाव्या भागात आपण घोरी घराण्याचा इतिहास संक्षिप्त स्वरूपात पहिला. घोरी सलतनीतील शेवटचा सुलतान कैकुबाद याच्या विलासी वागणुकीचा फायदा घेत खल्जी सरदारांचा म्होरक्या 'जलालुद्दीन खल्जी' याने एक दिवस कैकुबाद नशेत असताना त्याचा खून केला व त्याचे तुकडे करून यमुना नदीत फेकून दिले, आणि त्याच्या मुलासही मारून दिल्लीचे तक्त बळकवले. कैकुबादच्या मृत्यूने १२८८ साली गुलामवंशाचा शेवट झाला. १२०६ पासून ते १२८८ पर्यंतचा हा जवळजवळ ८२ वर्षांचा काळ आहे ज्याला मुस्लिम इतिहासकार 'घोरच्या सुलतानाचे गुलाम' असे म्हणतात.
१२८८ साली खल्जी घराण्याने दिल्लीची सत्ता हाती घेतली जी पुढे १३२० पर्यंत चालली. खल्जी हे मूळ पठाण मंडळी. अफगाणिस्थानात खल्ज म्हणून एक ठिकाण आहे तिथले हे मूळचे. खल्ज वरून त्यांना खल्जी किंवा खिलजी हे नाव प्राप्त झाले. बऱ्यापैकी ही लुटारू मंडळी होती. काही मंडळी कोणाच्यातरी चाकरीत राहत असत. घोरीच्या काळात, ब्लबनने यांना फौजेत भरती केले होते. मलिक नावाचा एक खल्जी सरदार बल्बनच्या काळात नावारूपास आला. कर्तृत्ववान सरदार होता तो. त्याचा मुलगा जलालुद्दीन. कैकुबाचा वजीर होता निजामुद्दीन, जो एक तुर्क होता. आणि तुर्कांच्या त्रासाला जनता कंटाळलेली होती. यासाठी लोकांनी यांना बाजूला करण्यासाठी जलालुद्दीनला मदत केली. यावेळी खल्जी मंडळी बंगाल प्रांतात होते. 'जलालुद्दीन खल्जी' याने एक दिवस कैकुबाद नशेत असताना त्याचा खून केला व दिल्लीवर आपली सत्ता स्थापन केली. जलालुद्दीन त्यावेळी ७० वर्षांचा होता. खल्जी मंडळींनी दिल्लीवर तीस एक वर्षे राज्य केले. या तीस वर्षात सहा सुलतान होऊन गेले, परंतु या सर्वांमध्ये एकच सुलतान होऊन गेला ज्याने वीस वर्षे राज्य केले ज्याचे नाव "अलाउद्दीन खल्जी".
पूर्ण पोस्ट वाचेपर्यंत डोक्यात प्रश्न नको म्हणून इथे काळ मांडतो.
१) जलालूद्दीन खल्जी (इ. स. १२८९ ते १२९५)
२) अलाउद्दीन खल्जी (इ. स. १२९६ ते १३१६)
३) मुबारिक खल्जी (इ. स. १३१६ ते १३२०)
थोडक्यात खल्जी मंडळींचा इतिहास आता आपण पाहू. यामध्ये अलाउद्दीनचा इतिहास तसा दांडगा आणि विशेष लक्ष देण्यासारखा आहे. का? ते आपण बघणारच आहोत.
~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~
■ जलालूद्दीन खल्जी (इ. स. १२८९ ते १२९५-९६):
जलालुद्दीन खल्जी' याने ज्यावेळी दिल्लीवर आपली सत्ता स्थापन केली. जलालुद्दीन त्यावेळी ७० वर्षांचा होता. सुलतान होईपर्यंत हा माणूस अतिशय आक्रमक राहिला परंतु जसा तो सुलतान बनला तसा त्याच्यात व त्याच्या वागणुकीत अतिशय फरक पडला. त्याच्या वागणुकीत ममता आणि प्रेम वाढत गेले आणि त्याने कोणालाही कडक शासन देणे शक्यतो टाळले त्यामुळे लुटारूंचे चांगलेच फावले. तो हुशार, विद्वान आणि कवी लोकांना दरबारात आदराने वागवू लागला व त्यांना प्रतिष्टेचे स्थान देऊ लागला. परंतु खल्जी लोकांना हा त्याचा बदललेला स्वभाव काय पचेनासा झाला होता कारण मुळातच ही सगळी मंडळी क्रूर व आक्रमक स्वभावाची होती. जलालुद्दीनच्या अशा बदलेल्या स्वभावामुळे सलतनीचे नुकसान होणार असे दरबारी असलेल्या सरदारांना व इतर मंडळींना वाटू लागले होते. सिद्दीमौला नावाच्या एकाने सुलतानाला मारण्याचा बेत केला होता आणि हे ज्यावेळी जलालाउद्दीनला समजले त्यावेळी त्याने त्याला फाशी दिली गेली. जलालुद्दीनने माळवा, पंजाब अशा ठिकाणी स्वाऱ्याही केल्या. १२९२ साली मंगोलांनी ज्यावेळी पंजाबवर आक्रमण केले त्यावेळी स्वतः जलालुद्दीन लढाईमध्ये सामील झाला. पाच दिवस दोन्ही सैन्य एकमेकांसमोर तळ ठोकून बसले होते आणि सहाव्या दिशी जोरात युद्ध झाले आणि मंगोलांचा पराभव झाला. या युद्धात विशेष पराक्रम केला तो त्याचा पुतण्या 'अलाउद्दीन खल्जी' याने. 'उत्कायखान' हा चंगेज खानाचा एक नातू ज्याने नंतर जलालुद्दीनच्या मुलीशी लग्न केले. उत्कायखानने आपले ३००० सैन्य दिल्लीस ठेवले ज्यांना राहण्यासाठी जलालुद्दीनने एक जागा नेमून दिली त्याला 'मोंगलपुरा' हे नाव दिले गेले. आज ही जागा 'मोगलपुरा' म्हणून ओळखली जाते.
शहाबुद्दीन मसूद हा जलालुद्दीनचा भाऊ ज्याला दोन मुले होती. पहिला अलाउद्दीन आणि दुसरा आल्ब्सबेग. अलाउद्दीनने मंगोलांना हरवून जो पराक्रम केला होता त्यामुळे पूर्ण दरबारात त्याचे वजन वाढले होते. या पराक्रमामुळे जलालुद्दीनने अलाउद्दीनला गंगा व यमुना या नद्यांच्या संगमाजवळ 'कुरा' हे ठिकाण आहे तिथला सुभेदार नेमले. १२९३ मध्ये अलाउद्दीनने माळव्यात पुन्हा स्वारी केली व अनेक ठिकाणे त्याने जिंकली म्हणून जलालुद्दीनने त्याला अयोध्याचा सुभाही दिला.
■ जलालुद्दीन व अलाउद्दीन:
अलाउद्दीन हा अतिशय हुशार व कपटी होता. सैनिकापासून ते सरदारापर्यंत त्याचा प्रवास हा अतिशय खडतर होता. संपूर्ण जगावर फक्त खलजींचे राज्य असावे असे त्याला नेहमी वाटायचे. दिल्लीचा सुलतान झाल्यावर त्याने स्वतःला 'सिकंदर-ए-सानी' (सानी म्हणजे 'द्वितीय' म्हणजे दुसरा सिकंदर) हा किताब लावून घेतला. स्वभावाने अतिशय आक्रमक व जिद्दी होता. एखादी गोष्ट जर का त्याच्या मनात आली तर कोणत्याही परिस्थिती ती पूर्णत्वास न्यायचाच. संजय भन्साळीच्या 'पद्मावत' सिनेमात याला अनुसरून एक डायलॉग आहे, 'अल्ल्हाने बनाई हुवी हर एक नायाब चीज पर सिर्फ अलाउद्दीनका हक हे'.
त्याचा हा स्वभाव म्हणजे जलालुद्दीनसाठी धोक्याची घंटाच होती. पुढे जाऊन अलाउद्दीन बंड करू शकतो अशी भीती कदाचित त्याच्या मनात असावीच. म्हणूनच कदाचित जलालुद्दीन स्वतःच्या मुलीचे लग्न अलाउद्दीनबरोबर लावून दिले होते. अलाउद्दीन पराक्रमी होताच आणि खल्जी मंडळींना जसा नेता पाहिजे तसाच तो होता त्यामुळे दरबारात तो प्रसिद्ध होता. दरबारात अनेकांना तोच सुलतान असावा असे वाटायचे. याला कारण म्हणजे जलालुद्दीनचा बदलेला स्वभाव आणि अलाउद्दीनचा आक्रमकपणा. जर खल्जी सलतनीच्या सीमा वाढवायच्या असतील तर अलाउद्दीनसारखा नेताच पाहिजे असे सर्वांना वाटत होते. अलाउद्दीनच्या या स्वभावामुळे जलालुद्दीनने त्याला नेहमीच दिल्लीपासून दूर ठेवले. इकडे अलाउद्दीनची नजर नेहमीच दिल्लीच्या तख्ताकडे लागली होती. त्याने भारतभर अनेक ठिकाणी आक्रमण करून भरपूर खजाना गोळा केला होता त्यामुळे त्याच्याकडे सैन्यही भरपूर होते. जलालुद्दीन व अलाउद्दीन म्हणजे दोघेही एकमेकांबद्दल कोणताही आदर नसलेली मंडळी होती. अलाउद्दीनला अचूक वेळ साधून जलालुद्दिनला संपवायचे होते आणि जलालुद्दिनला जमले तेवढे अलाउद्दीनला दिल्लीपासून दूर ठेवून त्याच्याकडून सलतनीचा जेवढा फायदा करून घेता येईल तेवढा फायदा करवून घ्यायचा होता. पण या कपटनीतीच्या लढाईत जिंकला तो अलाउद्दीनच.
~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~
■ जलालुद्दीनचा शेवट आणि अलाउद्दीन दिल्लीचा नवा सुलतान:
अलाउद्दीनला दिल्लीचा सुलतान व्ह्याचे होते आणि त्यासाठी त्याला दरबारातील सगळ्या मात्तबर मंडळींना स्वतःकडे घ्यायचे होते. दरबारातील अनेकांचा पाठिंबा हा अलाउद्दीनला होताच पण जे त्याच्या पाठीमागे नव्हते त्यांना लाच देऊन स्वतःकडे घायचे होते. याचे कारण असे की, स्वतः सुलतान झाल्यावर त्याला कोणतेही अंतर्गत वाद नको होते, आणि यासाठी अलाउद्दीनने पूर्ण तयारी करायचे ठरवले होते. त्याला आता अफाट संपत्ती जमा करायची होती. भिलसा येथे असताना अलाउद्दीनला दक्षिणेत देवगड (देवगिरी) नावाच्या शहराची माहिती मिळाली. हे शहर खूप श्रीमंत असून येथे असंख्य श्रीमंत लोक राहतात असे त्याला समजले. जर हे शहर लुटले तर प्रचंड खजाना मिळणार जो त्याला दिल्लीच्या तख्तावर बसण्यास निर्णायक ठरणार हे कळून चुकले आणि त्याने जलालुद्दीनकडे दक्षिणेत जाण्यासाठी परवानगी मागितली. काही इतिहासकार म्हणतात की जलालुद्दीनने त्याला परवानगी दिली नाही तरीही त्याने खोटे कारण सांगून दक्षिणेत आला. काही इतिहासकार म्हणतात की मावळ्यांच्या स्वारीवर जातो म्हणून अलाउद्दीन दक्षिणेत आला. काहीही असो, अलाउद्दीन दक्षिणेत आला हे खरे.
देवगडापर्यंतचा मार्ग खूप कठीण होता. नर्मदा ओलांडून महाराष्ट्रातून जंगली मार्गातून बिकट वाटेतून हा प्रवास होता. वाटेमध्ये असंख्य प्रकारची लोकं होती. त्याचा वाटेत त्रास होऊ शकतो किंवा अचानक छापे टाकून ते सर्व सैन्य कापू शकतात याची शंका अलाउद्दीनला होतीच. परंतु त्याला माहित होते की हिंदू लोक विनाकारण त्रास देत नाहीत. धर्माचे नियम ते मोडीत नाहीत. आपण जर कोणालाही कसलाही त्रास दिला नाही तर आपल्याला सुद्धा कसलाच त्रास होणार नाही हे अलाउद्दीन जाणून होता.आपला खरा मनसुबा काय आहे हे त्याने कोणालाच कळू दिला नव्हता. वाटेत कोणाचाही कसलाही त्रास होऊ नये म्हणून त्याने एक अफवा सोडली की "मी माझा चुलता जलालुद्दीन याच्याशी भांडून त्याला सोडून आलो आहे आणि माझी जी काही फौज आहे तिच्यासोबत तेलंगणाच्या राजाकडे चाकरीस चाललो आहे". जवळ-जवळ ७०० मैलाचा प्रवास करून अलाउद्दीन दक्षिणेत उतरला तो थेट देवगिरीच्या दारात. काही इतिहासकारांचे म्हणणे असे आहे की अलाउद्दीन दक्षिणेत आला आणि युद्धे झाली ती दोनच, पहिले म्हणजे विंध्य ओलांडल्यावर एलिचपूरमध्ये जे आजच्या खान्देशात आहे, आणि दुसरे म्हणजे देवगिरी किल्ल्याच्या दारात म्हणजे सरळ राजधानीमध्ये.
यावेळी देवगिरीचा राजा होता रामदेवराया होता. अलाउद्दीन खल्जी आणि देवगिरीचे यादव यांच्या लढाईचे वर्णन अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने केले आहे. अलाउद्दीन आपल्या राज्यावर आला आहे आणि त्याने लूट सुरु केली आहे हे रामदेवराय यांना माहीतच नव्हते. शहराबाहेर ज्यावेळी ते देवदर्शनास गेले होते त्यावेळी त्यांना अलाउद्दीन आल्याची बातमी लागली. देवगरीचे गुप्तखाते नेमके होते का नाही हा प्रश्न इथे नक्कीच उभा राहतो, कारण ७-८ हजाराची एक फौज आपल्या राज्यावर येत आहे याची कसलीच बातमी राजधानीत आली नाही. अलाउद्दीनचा मनसुबा हा फक्त लुटीचा होता आणि त्याला लुटीतून जास्तीतजास्त खजाना मिळवायचा होता. त्याने शहरामध्ये जबरदस्त लूट सुरु केली. अतिशय थोडके सैन्य घेऊन तो आला होता. काही इतिहासकारांच्या मते तो ८००० सैन्य घेऊन आला होता आणि काही इतिहासकारांच्या मते तो ४००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन आला होता. अलाउद्दीनने देवगिरीला वेढा दिला होता आणि काही सैनिक शहरात धुमाकूळ घालून लूटमार करत होते. दुर्दैव म्हणजे देवगिरीला एकच दरवाजा असल्याने अलाउद्दीनने गडाची श्वासनलिकाच दाबून टाकली होती. त्यामुळे गडावर रसद पोहचवणे हे अशक्य होऊन बसले होते.
देवगिरीच्या सैन्यांपूढे अलाउद्दीनचे सैन्य काहीच नव्हते, पण दुर्दैवाने रामदेवरायचा मुलगा शंकरदेवराय हा बरेच सैन्य घेऊन दक्षिणेत एका मोहिमेवर गेला होता (काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की शंकरदेवराय आपल्या बहुतांश सैन्यासह यात्रेला गेला होता). ज्यावेळी रामदेवरायाला अलाउद्दीनची खबर मिळाली त्यावेळी त्याने शहरातून काही माणसं जमा केली आणि जे काही नोकर चाकर होते त्यांची जमवाजमव करून तो अलाउद्दीनशी लढायला गेला पण जास्त काळ त्याचा टिकाव लागला नाही आणि पुन्हा तो गडावर परत आला. रामदेवरायाला वाटले की आता जोपर्यंत आपला मुलगा येत नाही तोपर्यंत आपणास काहीच करता येणार नाही. त्यामुळे त्याने आपल्या मुलाची वाट पाहण्याचे ठरवले. इकडे अलाउद्दीनच्या सैन्याने शहरात जाळपोळ सुरु केली. लोकांनी त्यांचा खजाना व पैसा कुठे कुठे लपवून ठेवला आहे हे जाणून घेण्यासाठी लोकांवर अमानुष अत्याचार सुरु केले. अनेक स्त्रियांवर अत्याचार केले. असंख्य पुरुषांच्या कत्तली केल्या. या सर्व बातम्या रामदेवरायाला गडावर पोचत होत्या परंतु त्याच्यापुढे हे सर्व सहन करण्यापेक्षा दुसरा कोणताच मार्ग नव्हता.
रामदेवरायापुढे मोठे संकट उभे राहिले ज्यावेळी त्याला समजले की गडावर जो धान्यसाठा आहे त्यामध्ये धान्य नसून ती मिठाची पोती आहेत. दुसऱ्याबाजूला अलाउद्दीनने एक अफवा पसरवली की, मी फक्त मोजके सैन्य घेऊन येथे आलो आहे, बादशहाची दुसरी वीस हजाराची फौज पाठीमागून येत आहे. या बातमीमुळे रामदेवरायाला अलाउद्दीनपुढे गुडघे टेकण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्याने अलाउद्दीनशी तह केला.
या तहामध्ये अफाट खंडणी रामदेवरायाला त्याला द्यावी लागली. नेमकी ही खंडणी किती होती?
रियासतकार म्हणतात "... त्याने (रामदेवरायाने) पुष्कळ द्रव्य देऊन अलाउद्दीनशी तह केला." नेमके किती हे रियासतकार सांगत नाहीत.
विजयराव देशमुख म्हणतात ..." तहानुसार ५० मन सोने, अगणित हिरेमोती व लुटीत जमा केलेली सर्व रक्कम अलाउद्दीनला द्यायचे ठरले."
डॉ. दुलारी कुरेशी यांच्या मते, या तहामध्ये अलाउद्दीनला ६ मण सोनं, ७ मण मोती, २ मण हिरे, माणिक, पाचूसह मौल्यवान खडे, १००० मण चांदी आणि ४००० गज रेशमी कापड मिळालं.
इतिहासकारांची (सर्वच इतिहासकारांची यावरची मते इथे मांडणे शक्य नसल्याने फक्त माहितीसाठी म्हणून दोन-तीन इतिहासकारांची मते मांडली आहेत) जरी वेगवेगळी मते असली तरी तहामध्ये अलाउद्दीनला मिळालेली खंडणी ही नक्कीच बलाढ्य होती हे दिसून येते. तह झाला, तहानुसार जी काही खंडणी ठरलेली ती अलाउद्दीनला मिळाली आणि त्याने परत उत्तरेत निघायचा निर्णय घेतला. तेवढ्यात रामदेवरायाचा मुलगा शंकरदेवराय मोहिमेवरून परत आला. ज्यावेळी त्याच्या अनुपस्थित जे काही देवगिरीमध्ये घडले ते कळाले त्यावेळी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. इकडे रामदेवरायाने त्याला कळवले की,
"अलाउद्दीनशी तह झालेला आहे आणि ठरलेली खंडणी घेऊन तो परत चालला आहे आता तू त्याच्याशी युद्ध करू नको".
पण वडिलांचा हा सल्ला त्याने ऐकला नाही आणि तो अलाउद्दीनवर चालून गेला. दोघांमध्ये जोरदार युद्ध झाले. शंकरदेवरायांनी इथे खूप पराक्रम गाजवला. अलाउद्दीनचा पराभव निश्चित होता आणि जे काही त्याने लुटले होती आणि खंडणीच्या स्वरूपात रामदेवरायांकडून घेतले होते ते परत मिळणार असे वाटत होते. शंकरदेवरायाच्या मदतीला किल्ल्यातून काही सैनिक एका सरदाराच्या नेतृत्वाखाली आले (या सरदाराचे नाव शंकरदेवा असे सांगितले जाते). त्यांच्या पायाने उडालेली धूळ पाहून शंकरदेवरायाला वाटले की अलाउद्दीनची जी काही नव्या दमाची वीस हजाराची सेना पाठीमागून येणार होती ती आली आणि यामध्ये सर्व गोंधळ उडाला. या गोंधळाचा फायदा खल्जी सेनेला झाला आणि जिंकत आलेली लढाई शंकरदेवराय हारला. शंकरदेवरायाने जो काही खजिना त्याच्या मोहिमेतून लुटून आणला होता तो ही अलाउद्दीनने लुटला. यानंतर अलाउद्दीनने शंकरदेवरायाकडे आणखीन खंडणीची मागणी केली. विजयराव देशमुख सांगतात, की अलाउद्दीनने शंकरदेवरायाकडे ६० मण सोने, २ मण हिरे, १०० मण चांदी आणि ४००० गज रेशमी कापड एवढी मागणी केली. शिवाय, एलिचपूर परगणा खर्चासाठी मागून घेतला व दरवर्षी खंडणी पाठवण्याचे रामदेवरायाकडून कबूल करून घेतले. रामदेवरायाकडे हे मान्य करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.
दुर्दैव असे की, या घटनेच्या काही दिवसच आधी महाराष्ट्रातील संतांची दिंडी उत्तर हिंदुस्थानात यात्रांना जाऊन आली होती. त्यांनी सुलतानांची सत्ता पाहिली होती, तिथले काही कठोर कडवट अनुभव घेऊन लोकांना ते सांगितले. तरीही रयतेसह राजा गाफील राहिला आणि दक्षिणेत सुलतानांचा अमल सुरु झाला. पुढे जाऊन रामदेवरायाचा मृत्यू झळा, शंकरदेवरायाने खंडणी देणे बंद केले आणि पुन्हा अलाउद्दीनचा जवळचा सरदार मलिक कफूर देवगिरीवर चालून आला. शंकरदेवरायाचाही मृत्यू झाला. देवगिरीचे राज्य जवळपास संपले होते परंतु रामदेवरायाचा जावई हरपालदेवराय उभा राहिला परंतु तो ही खलजींच्या सेनेपुढे टिकला नाही. रामदेवरायानंतरचा इतिहास खूप मोठा आहे, हरपालदेवराय ज्यावेळी मृत्यू पावला त्यावेळी अलाउद्दीन हयात नव्हता त्याचा मुलगा गादीवर बसला होता ज्याने हरपालदेवरायाला देवगिरी किल्ल्यातच जिवंतपणे त्याची कातडी सोलून काढायची आज्ञा दिली होती.
~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~
असो... हा शेवटचा भाग मी अगदी थोडक्यात मांडला आहे. इथे एक गोष्ट आहे जिथे आपल्याला लक्ष दिलेच पाहिजे. ती गोष्ट म्हणजे,
"अलाउद्दीन रामदेवरायची मुलगी घेऊन गेला की नाही ?"
आजवर अनेकवेळा सांगितले गेले की अलाउद्दीन रामदेवरायची मुलगी घेऊन गेला आणि त्याने तिला आपल्या जनानखान्यात ठेवले. हे खरे आहे की खोटे यावर ठामपणे काहीच सांगता येत नाही, परंतु इतिहासकारांची विविध मते समजवून घेतली तर हे खोटे आहे असेच म्हणावे लागेल. वाचकांनी आपापली मते ठरवावीत. माझे वयक्तिक मत आहे की, अलाउद्दीनने रामदेवरायची मुलगी नेली नाही. या विषयावर आपण थोडी चर्चा करू ते ही वेगवेगळ्या इतिहासकारांच्या मांडणीनुसार.
रियासतकारांनी यावर कोणतेही भाष्य केलेले दिसत नाही. विजयराव देशमुखांच्या मते, हे खरे नाही. रामदेवरायाला तीन मुले व एक मुलगी होती. शंकरदेव, बल्लाळदेव आणि बिंबदेव अशी तीन मुले होती. मुलीचा विवाह हा हरपालदेवशी झाला होता. हरपालदेवचा मृत्यू हा अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर झाला आहे. समकालीन वाड्मयात कुठेही रामदेवरायाने आपली मुलगी दिल्याचा उल्लेख नाही. तसेच समकालीन अरब इतिहासकार अमीर खुसरू व बरनी हे देखील असा उल्लेख करत नाहीत. रशिदुद्दिन मात्र रामदेवरायाने मुलगी दिल्याचा उल्लेख करतो मात्र या स्वारीची हकीकत याने कुठेच मांडली नाही, कदाचित गुजराथच्या राजकन्येमध्ये आणि रामदेवरायच्या मुलीमध्ये याचा गोंधळ झालेला असावा.
आता, गुजराथच्या राजकन्येचा गोंधळ नेमका काय आहे?
जलालुद्दिनला मारून ज्यावेळी अलाउद्दीन सुलतान झाला त्यावेळी त्याने पहिली स्वारी गुजराथवर केली. त्यावेळी त्या प्रांताचे रखवालदार होते राजे करणराय. अलाउद्दीननं आपले सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांना या मोहिमेवर पाठवले होते. या दोघांनी करणराय यांचा सपाटून पराभव केला. अलाउद्दीनचा सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांनी संपत्तीची तर लूट केलीच, सोबत राजा करणराय यांची राणी कमला देवी हिलाही बंदी केलं. कमला देवीला दिल्लीत आणण्यात आलं. तिची रवानगी अलाउद्दीनच्या जनानखान्यात करण्यात आली. अलाउद्दीन तिच्या सौंदर्यावर इतका भाळला की त्यानं तिच्याशी लग्न केलं. इतिहासकारांनी लिहिलं आहे की अलाउद्दीन हा कमला देवीवर खूप प्रेम करायचा. म्हणूनच जेव्हा कमला देवीला आपल्या मुलीची आठवण आली, तेव्हा अलाउद्दीननं ताबडतोब उलूग खान आणि मलिक कफूर यांना देबाला देवीला कुठूनही शोधून आणायला सांगितलं. इकडे रामदेवरायाचा मुलगा शंकरदेवराय याला कमळादेवीच्या मुलीबरोबर लग्न करायचे होते ज्याला रामदेवरायांनी विरोध केला. शेवटी, करणराय यांच्या परवानगीने आपला शंकरदेवरायाने आपल्या भावाला देबाला देवीला आणण्यासाठी पाठवले. दरम्यान, वेरूळ लेण्यांच्या परिसरात उलूग खान आणि मलिक कफूर यांची यादवांच्या सेनेशी गाठ पडली आणि देबाला देवीला पकडून दिल्लीला नेण्यात आले. अलाउद्दीनने आपल्या मुलाशी म्हणजे खिजरशी देबालाचे लग्न लावून दिले.या घटनेवर प्रख्यात कवी अमीर खुसरो यांनी पूर्ण कविताच लिहली आहे. पण आता ही कविता किती काल्पनिक आहे आणि किती वास्तववादी आहे हे सांगता येणार नाही. कदाचित देबाला देवीलाच काही इतिहासकारांनी रामदेवरायची मुलगी समजले असावे.
तर एकंदरीत अलाउद्दीन आणि देवगिरीचा इतिहास हा असा आहे ज्यामध्ये अनेक इतिहासकारांची अनेक मतं आहेत. यादवांचे राज्य संपण्याची अनेक कारणे आहेत त्याचबरोबर अलाउद्दीनचा कपटीपणाही तेवढाच महत्वाचा आहे. अवघ्या २०० वर्षांची परंपरा असलेले देवगिरीचे वैभवशाली साम्राज्य, अलाउद्दीन, जो हे राज्य संपवण्याच्या हेतूने आला नव्हताच त्याचा हेतू फक्त लूट करून संपत्ती मिळवायचा होता, असे राज्य अवघ्या १५-२० दिवसात पहिल्याच दणक्यात कोसळले. अगणित संपत्ती आणि मोठा विजय मिळवून अलाउद्दीन कोरा येथे परतला. तो सरळ दिल्लीला न जाता कोरा येथे थांबला आणि इथेच त्याने बादशहाला म्हणजे जलालुद्दिनला संपवायचा बेत आखला. जलालुद्दीन त्याला भेटायला येणार हे त्याला नक्की माहित होते आणि जलालुद्दीन अतिशय मोजक्या सैन्यानिशी तेथे आला. अलाउद्दीन आणि जलालुद्दीन यांच्या भेटीदरम्यानच लपून बलेल्या मारेकऱ्याने जलालुद्दीनवर तलवारीचे असंख्य वार करून त्याला मारून टाकले. त्याचे शीर कापून भाल्याच्या टोकावर टोचून संपूर्ण शहरात फिरवले.
~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~
इथून आता अलाउद्दीनची सुलतान म्हणून कारकीर्द सुरु होते जी पुढचे २० वर्षे चालते. या एका भागात हे सर्व मांडणे शक्य नाही त्यामुळे खल्जी घराण्याचा इतिहास आपण पुढच्या अजून एक-दोन भागात पाहू.
क्रमश:

यावनी आक्रमण: भाग - ६







यावनी आक्रमण: भाग - ६
postsaambhar ::Prashant Babanrao Lavate-Patil
____________________
जर आपण भाग- ५ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग- ६ वाचण्या आगोदर भाग- ५ नक्की वाचून घ्यावा. भाग- ५ ची लिंक खाली दिलेली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मागील भागात आपण पहिले की, शहाबुद्दीन उर्फ महंमद घोरी याने केलेली आक्रमणे कशी होती, आणि विविध काव्यस्वरूपातील त्याच्या आक्रमणाबद्दल केलेल्या नोंदी आणि यामुळे होणार गोंधळ कसा होता हे पाहिले. शहाबुद्दीन घोरी आपल्या लक्षात राहिला तो म्हणजे पृथ्वीराज चौहान यांच्यामुळे. कारण या दोघांचा झालेला संघर्ष म्हणजे दिल्लीवर कायमस्वरूपी यावनांच्या सत्तेला झालेली सुरवात. पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून गझनीला परत जाताना शहाबुद्दीनने त्याचा एक गुलाम सरदार 'कुतुबुद्दीन ऐबक' याला भारताचा कारभारी म्हणून नियुक्त केले होते आणि त्याला भारतातच ठेवले होते ज्याने दिल्लीमध्ये आपली सत्ता स्थापन केली.
'ऐबकांचा' काळ ज्याला इतिहासामध्ये गुलाम वंशीयांचा काळ असे म्हंटले जाते. यांचा काळ हा इ. स. १२०६ पासून ते इ. स. १२८८ पर्यंतचा आहे. या ८२ वर्षांच्या काळात अनेक सत्ताधारी होऊन गेले ज्यामध्ये अल्तमश, नासिरुद्दीन महंमूद, बल्बन (हा घोरी घराण्यातला नसून नासिरुद्दीनचा वजीर होता) यांनी जास्त काळ म्हणजे २०-२५ वर्षे राज्य केले. ज्याने दिल्लीवर सत्ता स्थापन केली तो मात्र चारच वर्षे सत्ता भोगू शकला, तो म्हणजे 'कुतुबुद्दीन ऐबक'. १२०६ ते १२१० कुतुबद्दीनने दिल्लीचा सुलतान म्हणून राज्यकारभार पहिला.
■ कुतुबुद्दीन ऐबक (इ.स. १२०६ ते १२१०):
कुतुबुद्दीन हा एक गुलाम होता. लहान असताना त्याला कोणीतरी पळवून आणले होते. खुरासानची राजधानी निशापूर येथील एका माणसाने त्याला विकत घेतले व त्याचा सांभाळ केला आणि त्याला शिक्षण दिले. विकत घेतलेल्या माणसाचे निधन झाल्यावर त्याला एका व्यापाऱ्याने विकत घेतले आणि नंतर शहाबुद्दीन घोरीच्या स्वाधीन केले. बराच काळ कुतुबुद्दीन हा शहाबुद्दीन सोबतच राहिला. कालांतराने त्यांच्यामध्ये अगदी मैत्रीपूर्व संबंध निर्माण झाले. शहाबुद्दीनने त्याला सरदार बनवले व अनेक मोहिमांचे नेतृत्व त्याच्याकडे दिले. कर्तृत्वाच्या जोरावर त्याने खूप नाव कमवले. शहाबुद्दीनने त्याला भारताचा प्रतिनिधि म्हणून नेमले होते. त्यावेळी त्याने दिल्ली हे आपले मुख्य ठाणे बनवले होते. शहाबुद्दीनच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीनने स्वतःला हिंदुस्थानचा स्वतंत्र सुलतान म्हणून घोषित केले. यामुळे हिंदुस्थान म्हणजे फक्त लुटीचे केंद्र ही संकल्पना संपली आणि, आता इथे एक स्वतंत्र सुलतान राज्य करू लागला होता ज्यामुळे लुटीच्या हेतूने जी भारतावर सारखी आक्रमण होत होती त्याला आळा बसला कारण आता कुतुबुद्दीनला स्वतःचे राज्य राखणे गरजेचे होते. त्याने शहाबुद्दीनच्या बाकीच्या अनेक सरदारांशी नाते जोडले. स्वतःच्या मुलींची लग्ने त्याने त्यांच्याशी लावून दिली. त्याच्याच बरोबरीचा गझनीचा सरदार 'एल्डोझ' याच्या मुलीशी कुतुबुद्दीनने लग्न केले. अशा प्रकारे त्याने चारी बाजूने ताकद कमावली आणि हळू-हळू मीरत, बनारस, काल्पी, बिना, ग्वालेर अशी ठिकाणे त्याने जिंकून घेतली. दिल्ली जिंकून घेण्यासाठी 'एल्डोझ'ने कुतुबुद्दीनवर आक्रमण केले होते परंतु त्याचा त्यामध्ये पराभव झाला व कुतुबुद्दीनने गझनीपर्यंतचा भाग जिंकून घेतला. कालांतराने 'एल्डोझ'ने पुन्हा तो भाग जिंकून घेतला व कुतुबुद्दीनला दिल्लीला परत यावे लागले.
१२१० सालापर्यंत कुतुबुद्दीनने दिल्लीवर सुलतान म्हणून राज्य केले. 'चौगन' हा खेळ खेळताना (ज्याला आपण आज 'पोलो' म्हणतो) घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला. 'हसन निजामी' हा त्याच्या दरबारी असणारा एक माणूस ज्याने कुतुबुद्दीन हा खूप दानशूर आणि न्यायी होता असे नमूद करून ठेवले आहे. त्याच्या या स्वभावामुळे त्याला 'लखवक्ष' म्हणजे 'लक्ष दान देणारा' असे नाव पडले होते. दिल्लीची 'जुम्मामशीद' प्रथम त्यानेच बांधली. त्यानंतर राज्यात त्याने अनेक मशिदी बांधल्या (मशिदीसाठी लागणारे दगड हे मंदिरे पाडून आणली होती). दिल्लीमध्ये एक उंच असा दगडी विजयस्तंभ त्याने बांधायला सुरु केला होता जो त्याच्या काळात बांधून पूर्ण झाला नाही. त्या विजयस्तंभाला आपण आज 'कुतुबमिनार' म्हणून ओळखतो. याचे बांधकाम पुढे जाऊन त्याचा जावई 'अल्तमश' याच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. या विजयस्तंभाचे नाव 'कुतुबमिनार' ठेवायचे हे कुतुबुद्दीन ऐबकने स्वतःच्या नावावरून नाही तर एक मुस्लिम संत 'कुतुबुद्दीन बख्तियार' यांच्या नावावरून ठरवले होते, ज्यांना कुतुबुद्दीन ऐबक गुरु मनात होता. म्हणून पुढे जाऊन अल्तमशने याचे बांधकाम जरी पूर्ण केले असले तरी त्याचे नाव बदलले नाही.
कुतुबुद्दीनला एक मुलगाही होता. त्याचे नाव 'आरम' होते. कुतुबुद्दीनच्या मृत्यूनंतर पुढे दोन वर्ष सत्तेसाठी 'आरम' आणि 'अल्तमश' मध्ये संघर्ष चालला ज्यामध्ये आरमचा पराभव झाला व १२१२ साली अल्तमश रितसर दिल्लीचा सुलतान झाला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ अल्तमश (इल्तमश) (इ.स. १२१२ ते १२३५):
आरमला बाजूला करून अल्तमश गादीवर आला होता. अल्तमशने १२१२ ते १२३५ असा मोठा काळ दिल्लीचा सुलतान बनून कारभार केला. या काळात त्याने अनेक प्रदेश जिंकला. १२२४ ला त्याने सिंध प्रांतावर हल्ला करून नसिरुद्दीनचा पराभव केला. १२२६ साली अल्तमशने माळवा प्रांत जिंकला व मांडव (मांडू) किल्ला जिंकला. १२३१ साली त्याने ग्वालेरचा किल्लाही जिंकला.
अल्तमशच्या काळात भारताचा आणि चंगेज खानाचा संबंध आला. तो कसा हे आपण पाहू.
१२२१ साली खारिजम (ख्वारिझम, म्हणजे आजच्या उझबेकिस्थान, तुर्कमसीस्थान आणि अफगाणिस्तानचा काही भाग) चंगेजने जिंकला. तिथला सुलतान महंमद याचा अतिशय क्रूरपणे पराभव केला. महमंद हा कॅस्पियन समुद्राच्या कोणत्यातरी बेटावर अतिशय हालअपेष्टा सोसून मरण पावला असे रियासतकार म्हणतात. त्याचा मुलगा जलालूद्दीन याने चंगेजचा सामना करण्याचा प्रयत्न केला परंतु चंगेजला रोखणे त्याला शक्य झाले नाही. चंगेज पाठलाग करत असताना त्याने आपल्या घोड्यासकट पोहून सिंध नदी पार करून भारतात प्रवेश केला. त्याने अल्तमशला आसरा मागितला पण जलालूद्दीनला आसरा देणे म्हणजे चंगेजला भारतात बोलावणे असेच आहे हे अल्तमश जाणून होता म्हणून त्याने त्याला आश्रय दिले नाही आणि काही प्रमाणात चंगेजला खुष ठेवण्याचा प्रयत्न केला.
अल्तमश आश्रय देत नाही हे पाहून जलालूद्दीन सिंधमध्ये नसिरुद्दीनकडे गेला व तिथे आश्रय घेतला ज्याचा पराभव अल्तमशने १२२४ साली केला. यामुळे चंगेजखानाने या भागात अनेक आक्रमणे केली आणि तो त्या भागात अडकून राहिला आणि भारत चंगेजखानाच्या आक्रमणापासून दूर राहिला. सिंध नदी ओलांडणे अवघड जात आहे हे दिसताच चंगेज खारिजममध्ये इतर भागात आक्रमणे करत राहिला आणि सिंध प्रांत त्याने पूर्ण चाळून काढला. याचा परिणाम म्हणजे सिंध नदीच्या पलीकडे भारताची सीमा संपली. हा भाग जिंकून भारतात प्रवेश करायचा असा विचार चंगेजचा होता परंतु १२२६ साली चंगेजखानाचा मृत्यू झाला आणि बलाढ्य मंगोल साम्राज्य त्याच्या दोन मुलांमुळे विभागले गेले.
पुढे जाऊन अल्तमशने गुजराथ वगैरे भागात स्वाऱ्या केल्या पण त्याला जास्त यश मिळाले नाही. इवाज नावाच्या एका मुस्लिम माणसाने 'सुलतान गियासुद्दीन' हे बिरुद लावून बंगाल व बिहार भागात आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. १२२६-२७ साली अल्तमशच्या मुलाचा आणि इवाजचा लखनौजवळ संघर्ष झाला आणी इवाजचा पराभव केला. यात तो मारला गेला.
अल्तमश कट्टर मुस्लिम होता आणि खूप धार्मिक होता. आपण इस्लामचा अंश असल्याचे दाखवण्यात खूप धन्यता मानत होता. १२२९ साली त्याने बगदादाच्या खलिफाकडून स्वतःसाठी बादशाही पोशाख मागवले. आणि खलिफाच्या आदेशाने त्याने स्वतःला हिंदुस्थानचा बादशहा म्हणून घोषित केले. १२३५ साली अल्तमशचा मृत्यू झाला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ 'रझिया सुलतान' / 'सुलताना रझिया' (इ.स. १२३६ ते १२३९):
अल्तमशचा मृत्यू झाला आणि राजकीय वातावरण तसे पेटत गेले. याचे कारण म्हणजे अल्तमशच्या शेवटच्या काळात त्याला सतावत असलेली एक चिंता. त्याला माहित होते की आपल्यानंतर आपला एकही मुलगा राज्य सांभाळण्याच्या लायकीचा नाही परंतु आपली मुलगी रझिया ही खूप मुत्सद्दी व हुशार आहे व ती राज्यकारभार अगदी व्यवस्थितपणे सांभाळू शकेल याची खात्री अल्तमशला होती. परंतु एक स्त्री अंतर्गत राजकारण आणि बाहेरील शत्रू अशी दोन्ही आव्हाने कशी सांभाळेल याची काळजीही त्याला होती. परंतु त्यांने तिलाच गादीचा वारसदार म्हणून नेमले आणि इ.स. १२३६ साली रझिया दिल्लीच्या गादीवर आली जिला आज आपण 'रझिया सुलतान' किंवा 'सुलताना रझिया' म्हणून ओळखतो.
तिचा कार्यकाळ हा खूप कमी आहे म्हणजे तीन वर्षांचा आहे. रझिया सुलतान नक्कीच हुशार आणि दूरदृष्टी असणारी होती. दरबारात सुद्धा खूप अंतर्गत राजकारण होते. अल्तमशच्या काळात तुर्की सरदारांचा एक गट होता ज्यांना अल्तमशच्या मृत्यूनंतर आपल्या तालावर नाचणारा प्रशासक हवा होता. या गटाला 'चालिसा' किंवा 'चहलगानी' या नावाने ओळखले जात होते. रझिया गादीवर बसल्यावर त्यांचा हेतू सफल होईल असे त्यांना वाटत होते. पण रझिया जरी स्त्री असली तरी ती एका पराक्रमी पुरुषासारखी वागत असे. दरबारात ती पुरुषांचा पोशाख घालून पडदा न घेता बसत असे. तिचा सुलतान म्हणून ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांच्या बंडाविरुद्ध तिने शस्त्र उचलले व त्यांना पळवून लावले. यापैकी एक म्हणजे दिल्लीचा वजीर 'निझाम-उल-मुल्क जुनैदी'.
रझियायचा इतिहास खूप रोमांचकारी आहे. तिनच वर्षांची कारकीर्द आहे परंतु अतिशय पराक्रमी व काबील-ए-तारीफ इतिहास आहे. पण रझियाच्या इतिहासात तिचा अंत तिच्या प्रेमप्रकरणामुळे झाला असे सांगितले जाते. याबद्दल इतिहासकारांची दोन मते आहेत.
१) एका हबशी गुलामावर तिचे मन बसले आणि तिने त्या गुलामाला कारभारात आणले व संपूर्ण राज्यकारभार त्याच्या हाती दिला. हे पाहून दरबारातील अनेक सरदारांनी तिच्या विरुद्ध बंड पुकारले. यामध्ये तिच्यात आणि बाकीच्या सरदारांमध्ये चकमक झाली आणि त्यामध्ये हबशी गुलाम मारला गेला व रझिया कैद झाली. अल्तुनिया (आल्टूनिया) सरदारांच्या नजरकैदेत ती होती. चालाकीने तिने त्यांच्यापैकी एकाशी लग्न केले.या नवरा-बायकोनी इतर सरदारांशी दोन निकराच्या लढाया केल्या पण त्यांचा पराभव झाला आणि यामध्ये दोघेही मारले गेले.
२) एक स्त्री शासक म्हणून रझियाला सुरवातीपासून अंतर्गत विरोध होताच. अशा परिस्थितीत एक निष्ठावंत सेनेची तुकडी तयार करणे हे कोणत्याही शासकाचा मनसुबा असतोच. रझियाने सुद्धा हेच केले. आपल्याशी एकनिष्ठ अशा सरदारांचा एक गट तयार करण्याचा प्रयत्न तिने केला ज्यामध्ये याकूतखान या हबशी सरदाराला तिने एका उच्चपदावर नेमण्याचा निर्णय घेतला. याकूतखान हा तुर्की नव्हता त्यामुळे अनेक तुर्की सरदारांनी यावेळी रझियाला विरोध केला. तिच्यावर हबशी सरदाराशी जास्त जवळीकता दाखविल्याचा आरोप केला आणि तिच्याविरुद्ध उठाव झाले. या उठावाची सुरवात 'लाहोर' आणि 'सरहिंद' येथून झाली. लाहोरचा उठाव रझियाने मोडून काढला परंतु सरहिंद येथे तिचा पराभव झाला. या पराभवाचे मुख्य कारण होते अंतर्गत वाद ज्यामध्ये याकूतखान मारला गेला व रझियाच्या सेनेचा पराभव झाला आणि तिला कैद करण्यात आले, तिला तबरहिंद (भटिंडा) येथे कैदेत ठेवण्यात आले. पुढे तिने अल्तुनियाच्या एका सरदाराला आपल्या बाजूने वळवून घेऊन त्याच्याशी लग्न केले व पुन्हा दिल्लीवर स्वारी केली. परंतु यामध्ये ती हरली व जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून गेली व तिथे लुटारुंच्या टोळीने तिला मारून टाकले. इ.स. १२३९ साली तिचा अंत झाला.
एक पराक्रमी, व्यवहारी आणि मुत्सद्दी स्त्री एका गुलामांच्या प्रेमात पडून त्याच्याकडे सगळा राज्यकारभार देईल हे कोणत्याही अंगाने पटण्यासारखे नाही. कदाचित त्यावेळी तिची बदनामी करून तिच्याविरुद्ध लोकांना भडकवण्याचा प्रयत्न तुर्की सरदारांनी केला असेल ज्यांना ती सुलतान म्हणून अगदी सुरवातीपासून नको होती.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ मोइझ-उद्दीन बहराम (इ.स. १२३९ ते १२४१):
१२३९ ला रझियाचा मृत्यू झाला आणि तिचा भाऊ बहराम गादीवर आला. दोनवर्षे हा सुलतान म्हणून राहिला. ज्या लोकांनी याला गादीवर बसवले तेच त्याच्या जीवावर उठले होते. सुलतान झाल्यावर याने अनेकांची कपटाने कत्तल केली. शेवटी याला यखत्यारुद्दीन नावाच्या त्याच्याच दिवानाने कैद करून ठार मारले. तो १२४१ साली मेला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ अला-उद्दीन मसूद (इ.स. १२४२ ते १२४६):
हा १२४२ साली गादीवर आला. हा बहुरामचा पुतण्या. फिरोजशहाचा मुलगा. हा बंड्या एकदम ऐषोआरामात राहणारा आणि क्रूर होता. राज्यकारभारात अजिबात लक्ष नव्हते. सरदारांच्या जीवावर राज्य टिकले होते. याच्या काळात मंगोलांनी दोनवेळा भारतावर आक्रमण केले पण तिथल्या सरदारांनी त्यांना परतवून लावले. याच्या या ढिसाळ कारभारामुळे लोकांनी त्याचा चुलता नासिरुद्दीन महंमूद यास गादीवर बसवले. मसूदने १२४२ ते १२४६ असे चारच वर्षे सुलतान म्हणून राज्य केले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ नासिरुद्दीन महंमूद (इ.स. १२४६ ते १२६६):
हा अल्तमशचा मुलगा. अतिशय साधा आणि शांत स्वभावाचा हा माणूस होता. लहान असताना तो बंगालचा सुभेदार म्हणून काम करत होता, परंतु त्याच्या सावत्र आईने त्याला बंदी बनवले होते. पुढे मसूदने त्याची सुटका केली. बंदिवासात असताना कुराणाच्या नकला करून तो विकत असे आणि आपला उदरनिर्वाह करत असे. याला एकच पत्नी होती. स्वतःला तो राज्याचा मालक नाही तर रक्षक समजून राज्यकारभार करत असे. त्यामुळे राज्याच्या पैशातून विलासी जीवन जगणे त्याला मान्य नव्हते.
त्याने त्याच्या काळात सर्व बंडखोर सरदारांना बाजूला करून चांगल्या माणसांची नेमणूक केली. वायव्य दिशेकडून मंगोलांचा धोका पाहून त्याने तिथला बंदोबस्त चोख ठेवला. नर्मदा नदीच्या बाजूची छोटी-मोठी राज्ये जिंकून त्यांने स्वतःच्या राज्याला जोडली. माळवा, बुंदेलखंड अशी समृद्ध राज्ये त्याने दिल्लीला जोडून घेतली. 'ग्यास-उद्दीन बल्बन' नावाचा हुशार वजीर त्याच्या पदरी होता. अतिशय विश्वासाने त्याने बल्बन वर राज्यकारभार सोपविला होता. नासिरुद्दीनचा दयाळू स्वभाव पाहून मध्यआशियातले अनेक राजे मंगोलांना कंटाळून त्याच्या दरबारी येऊन राहिले होते. असा हा दयाळू आणि शांत स्वभावाचा सुलतान एका आजाराने १२६६ साली मरण पावला. याला मुलगा नव्हता त्यामुळे याच्या मृत्यूनंतर राज्य बल्बनच्या हाती गेले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ बल्बन (इ.स. १२६६ ते १२८६):
नासिरुद्दीन महंमूद १२६६ साली मरण पावला आणि बल्बन म्हणजे त्याचा वजीर गादीवर आला. हा सुद्धा एक गुलाम होता. मंगोलांनी याला पळवून नेऊन एका व्यापाऱ्याला विकले होते. पुढे त्याची विक्री होत होत अल्तमशच्या पदरात पडला होता. अल्तमशला खुश ठेवण्यासाठी त्यांने अनेक हिंदू लोकांची बंड मोडण्यास पुढे आला. रझियाविरुद्धच्या कटात हा सामील असल्याने तो कैदेत पडला होता. पुढे बहुरामच्या कारकिर्दीत त्याने अनेक ठिकाणी कारभारी म्हणून काम केले. पुढे मग नासिरुद्दिनच्या काळात तो वजीर म्हणून काम पाहू लागला.
बल्बनने राजसत्तेची प्रतिष्ठा व सामर्थ्य वाढवण्यास नेहमीच प्रयत्न केले. त्याचबरोबर त्याने तो गुलामवंशी असल्याने स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम सुद्धा चालू ठेवले. यासाठी त्याने तो एक इराणचा पौराणिक राजा आफ्रासियाब याचा वंशज असल्याचे घोषित केले. उच्च व प्रतिष्टित मंडळींना त्याने दरबारात नेहमी स्थान दिले आणि तुर्की सरदारांना जवळ धरले. स्वतः उच्चवर्णीय असल्याचे दाखवण्यासाठी तो खालच्या कुळातील लोकांचा अतिशय तिरस्कार करत असे. असे म्हंटले जाते की "ज्या ज्या वेळी तो खालच्या कुळातील माणसाला पाहत असे त्यावेळी क्रोधाने त्याचा हात आपोआप तलवारीकडे जात असे". बल्बनने कधीही कोणाला सत्तेमध्ये भागीदार होऊ दिले नाही. एका बाजूला त्याने उच्चवर्गीयांना जवळ धरले आणि दुसरीकडे सामान्य जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे न्यायदान केले. कधीही सामान्य माणसाला न्यायदानाच्या बाबतीत नाराज केले नाही. मंगोलांची भीती त्यालाही होती त्यामुळे त्याने नव्या दमाची फौज नेहमी तयार ठेवली.
त्याकाळात लुटारूंचा खूप त्रास असे. त्यामुळे व्यापाऱ्यांना याचा खूप त्रास होत असे. बल्बनने अनेक जंगले तोडून, चांगले रस्ते बांधले. राजपूत बंडखोरांना पराभूत करून त्यांचे किल्ले पाडून टाकले. अनेक ठिकाणी अफगाणांच्या वस्त्या बसवल्या व तेथे सैनिकांना राहण्याचा सल्ला दिला जेणेकरून व्यापाऱ्यांना प्रवासात लुटारूंचा त्रास होऊ नये व त्यांचे रक्षण व्हावे.
इ.स. १२८६ ला बल्बनचे निधन झाले. नासिरुद्दीनच्या काळात वजीर म्हणून २० वर्षे कारकीर्द व स्वतः सुलतान म्हणून वीस वर्षे, असा ४० वर्षे त्याने राज्यकारभार त्याने पहिला. १२८३ मध्ये तैमूरशहाने बल्बनच्या मुलखावर हल्ले चढवले होते. स्वतः म्हातारा झाल्याने त्याने आपला लाडका मुलगा महंमूद यास त्याच्यावर पाठवले. १२८५ साली दीपलपूर येथे जबरदस्त लढाई झाली ज्यामध्ये महंमूदचा विजय झाला. तैमूरशहाचा पाठलाग करत असताना तो दूरवर गेला असे त्याला वाटले आणि महंमूद परत फिरला व मंगोलांनी अचानक परत वार केला आणि त्यामध्ये महंमूदचा मृत्यू झाला.
उच्चवर्णीयांना जवळ धरणे व बाकीच्यांचा तिरस्कार करणे यामुळे समाजातील अनेक मंडळी त्याच्यावर नाराज होते. यामुळे त्याच्या मृत्यूनंतर नाईक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ कैकुबाद (इ.स. १२८६ ते १२८८):
कैकुबाद हा बल्बनचा नातू. बल्बनला दुसरा उलगडू होता 'बोगराखान' जो बंगालच्या कारभारावर होता. बापाच्या मृत्यूसमयी त्याने बापाजवळ येऊन राहण्याची पर्वा केली नाही म्हणून बल्बनने महंमदाच्या मुलास म्हणजे 'कैखुस्त्रू' यास गादीवर बसवण्याचे आपल्या मृत्युपत्रात लिहिले होते. परंतु उमरावांनी बोगराखानच्या मुलास म्हणजे 'कैकुबाद'ला गादीवर बसवले. हा खूप विलासी होता. याच्या या वागण्याने सगळीकडे अंदाधुंदी माजली होती. दरबारात खल्जी (खिलजी) सरदारांनी बंड पुकारला होता. खल्जी सरदारांचा म्होरक्या 'जलालुद्दीन खल्जी' याने एक दिवस कैकुबाद नशेत असताना त्याचा खून केला व त्याचे तुकडे करून यमुना नदीत फेकून दिले, आणि त्याच्या मुलासही मारून दिल्लीचे राज्य बळकावले.
कैकुबादच्या मृत्यूने १२८८ साली गुलामवंशाचा शेवट झाला. १२०६ पासून ते १२८८ पर्यंतचा हा जवळजवळ ८२ वर्षांचा काळ आहे ज्याला मुस्लिम इतिहासकार 'घोरच्या सुलतानाचे गुलाम' असे म्हणतात जो इथे मी संक्षिप्त स्वरूपात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.
१२८८ साली खल्जी घराण्याने दिल्लीची सत्ता हाती घेतली. यामध्ये 'अला-उद्दीन खल्जी' इतिहासात जास्त प्रसिद्ध झाला.खल्जी घराण्याचा इतिहास आपण पुढच्या भागात पाहू.
सोबत काही फोटो दिले आहेत आणि त्यांच्या कप्शनमध्ये फोटोबद्दलची एका ओळीत माहिती.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...