विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label रघूजीराजे भोसले प्रथम. Show all posts
Showing posts with label रघूजीराजे भोसले प्रथम. Show all posts

Thursday, 26 October 2023

रघूजीराजे भोसले प्रथम- नागपूर साम्राज्याचे मराठा शासक भाग ३

 




रघूजीराजे भोसले प्रथम- नागपूर साम्राज्याचे मराठा शासक
भाग ३
लेखक ::सतीश राजगुरे
त्याकाळातील रघुजी भोसल्यांचे राज्य आणि उत्पन्न असे होते.
१. देवगड प्रांत (नागपूरसह) - ३० लक्ष
२. गढा मंडला - १४ लक्ष
३. होशंगाबाद, शिवनी, माळवा, चौरागड - ७ लक्ष
४. मुलताई - २ लक्ष
५. वऱ्हाडचे निम्मे उत्पन्न, गाविलगड, नरनाळा - ३० लक्ष
६. ओरिसा व मांडलिक संस्थाने - १७ लक्ष
७. चंद्रपूर - ५ लक्ष
८. छत्तीसगड व मांडलिक संस्थाने - ६ लक्ष
देवगड- यामध्ये छिंदवाडा, बालाघाट हे घाटावरील मुलुख तसेच नागपूर, भंडारा वगैरे घाटाखालचा मुलुख यांचा समावेश होता. हा सर्व प्रदेश देवगडच्या 'बख्तबुलंद' या गोंड राजाचा होता. तो पहिल्या रघुजीने मिळवला होता. या सुभ्यात शिवनीचा पठाण जहागीरदार व खैरागड, राजनांदगाव, छुईखदान वगैरे मांडलिक येत होते.
गढा मंडला- हे गोंडांचे सर्वात जुने असलेले राज्य तेव्हा सागरच्या मराठ्यांच्या ताब्यात होते. या मुलुखाकरिता भोसल्यांचा आणि पेशव्यांचा अनेक दिवस झगडा सुरू होता. परंतु खर्ड्याच्या लढाईनंतर हा मुलूख भोसल्यांच्या ताब्यात आला.
होशंगाबाद, शिवनी, माळवा, चौरागड- होशंगाबाद हे नर्मदेच्या उतारास असलेले मोक्याचे ठाणे होते. ते भोपाळच्या नबाबाच्या मूळ पुरुषाने देवगडच्या राजापासून लष्करी मदत देण्याचे कबूल करून मिळवले होते. १७९६ मध्ये दुसरा रघुजी भोसले याने तेथील किल्ला लढून मिळवला होता. १७९९ मध्ये नर्मदा ही भोसल्यांची सरहद्द ठरली. इंग्रजांकडे आल्यानंतर मात्र तेथे लष्कराची छावणी कायमचीच झाली.
मुलताई, बैतुल, बदनूर - हा भाग मूळ 'देवगड' राजाचा भाग होता. मुलताई येथे भोसल्यांनी एक सुभेदार नेमला होता. या भागांत सावळीगड, भवरगड, खेरडा इत्यादी डोंगरी किल्ल्यांचा समावेश होता.
गाविलगड व नरनाळा- हे दोन्ही किल्ले पहिल्या रघुजीने १७५१ मध्ये जिंकून घेतले होते. याचे सर्व उत्पन्न भोसल्यांना मिळत असे. त्यावेळी साठ-चाळीस असा उत्पन्नाचा प्रकार नव्हता. नरनाळ्याचा किल्लेदार अकोट येथे राहत होता. १७७५ मध्ये निजामाने हे किल्ले मुधोजीकडून घेतले होते. पण मुधोजी एलिचपूरला गेल्यावर त्याने ते किल्ले परत मिळवले. गाविलगड येथे अडचणीच्या वेळी भोसले आपला खजिना ठेवत असत. १८०३ च्या तहाने बाकीचा वऱ्हाड निजामाच्या ताब्यात आला, पण गाविलगड भोसल्यांकडेच होता. पुढे १८१८ मध्ये झालेल्या तहानुसार तो आप्पासाहेबांकडून इंग्रजांकडे आला.
ओरिसा आणि मांडलिक संस्थाने- हा प्रांत सध्याचे बालासोर, कटक आणि जगन्नाथपुरी हे तीन जिल्हे मिळून होता. जगन्नाथाचे देऊळ या प्रांतात असल्यामुळे या भागाला विशेष महत्त्व होते. त्याकाळी ओरिसातील महानदीच्या काठाकाठाने कटकवरून रायपूर, रतनपूरास येऊन तेथून पश्चिमेस नागपुराला येण्याचा रस्ता होता. कटक प्रांत १८०३ पर्यंत भोसल्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर वऱ्हाडबरोबर हा प्रांत सुध्दा निजामाकडे व त्यानंतर इंग्रजांकडे आला.
चंद्रपूर- पूर्वी हा सुभा गोंडांच्या ताब्यात होता. पहिल्या रघुजीने तो मिळवला. या सुभ्यात चांदा जिल्हा, औंढी, अंबागड चौकी या जमिनदाऱ्या व माणिकदुर्गचा किल्ला येत असे. नागपूरच्या खालोखाल या प्रांताला किंमत होती. तेथे बरेच उद्योगधंदे आणि व्यापार चालत असत. त्याकाळी दक्षिणेकडून येणारा नारळ, सुपारी, मीठ इत्यादी माल प्रथम येथे येत असे. मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे वऱ्हाडातून कापूसही येत असे. चांदा येथे विणकर लोकांची मोठी वस्ती होती. येथील कापड देश-विदेशात पोहोचत असे.
छत्तीसगड सुभा- यामध्ये छत्तीस लहान-मोठे किल्ले व गढया येत होत्या. त्यात फक्त रायपूर आणि रतनपूर ही मोठी शहरे आणि भोवतालचा मुलूख हा खूप महत्वाचा आणि उत्पन्नाचा भाग होता. बाकीचा मुलूख जंगली व नापिकीचा असल्यामुळे त्यातून फारसे उत्पन्न येत नसे. राज्याच्या वाटणीत हा सुभा बिंबाजीला मिळाला होता. ते स्वतः रतनपूरला रहात असत. पण ते सगळ्यात नाराज होते. कारण हा भाग नुसता तांदूळ पिकवणारा असून दुसरे काही उत्पन्न नव्हते. १७९० मध्ये सिरगुजा हे डोंगरी संस्थान भोसल्यांच्या लष्कराने घेतले होते. यामध्ये सिरगुजा, जसपूर व उदेपूर यांचा समावेश होता. येथून भोसल्यांना तीन हजार रुपये खंडणी मिळत होती. काशी, गया, मिर्झापूर व बंगाल प्रांतातून नागपुरास येण्याचा रस्ता तेथून असल्यामुळे तो सांभाळून त्याची आवकजावक करण्याची जबाबदारी सिरगुजाच्या मांडलिकावर होती. कोरिया हे लहानसे संस्थानही छत्तीसगड सुभ्यात होते.
संबलपूर- हे संस्थान भोसल्यांचे मांडलिक म्हणून होते. आजूबाजूला दहा ते पंधरा लहान संस्थाने होती. याशिवाय बस्तर हे मोठे संस्थान व कांकर व कालाहंडी ही लहान संस्थानेही या सुभ्यात मोडत असत. १८०३ च्या देवगावच्या तहाने भोसल्यांना या सर्व संस्थानांवर पाणी सोडावे लागले.
विदर्भाचे आद्य इतिहासकार कै.यादव माधव काळे म्हणतात-
मराठी साम्राज्यात अगर हिंदुस्थानातील दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांच्या ताब्यात यावेळेस एवढ्या मोठ्या विस्ताराचा प्रदेश नव्हता. "रघुजी भोसल्यांच्या अंगी पहिला रघुजी अगर महादजी शिंद्यांप्रमाणे धडाडी, पराक्रम, बुद्धिबळ व संघटन चातुर्य असते तर तो संपूर्ण हिंदुस्थानातील अत्यंत प्रबळ असा संस्थानिक झाला असता व हिंदुस्थानच्या राजकारणात त्याचा शब्द निर्णायक ठरला असता!"
सामान्यपणे मध्य भारतातील तत्कालीन विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातील जबलपूर, शिवनी, गढा-मंडला, छपरा, रेवा, सिरगुजा, होशंगाबाद, बैतुल हा प्रमुख भूभाग, छत्तीसगडमधील रायपूर, रतनपूर व ओरिसा-कटक हे प्रांत नागपूरकर भोसल्यांच्या नियंत्रणाखाली होते. जो रेसिडेंटच्या माध्यमातून हळूहळू ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली जाऊन पुढे ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला.
संदर्भ/माहितीस्रोत:
नागपूर राज्याचा अर्वाचीन इतिहास-डॉ. श.गो.कोलारकर, गो.मा.पुरंदरे, विकासपीडिया, विकिपीडिया

रघूजीराजे भोसले प्रथम- नागपूर साम्राज्याचे मराठा शासक भाग २

 



रघूजीराजे भोसले प्रथम- नागपूर साम्राज्याचे मराठा शासक
भाग २
लेखक ::सतीश राजगुरे
जॉर्ज फॉस्टर या इंग्रज वकिलाने भोसल्यांच्या राज्याचे सविस्तर वर्णन केले आहे. दुर्दैवाने मराठ्यांनी अशी माहिती कुठे लिहून ठेवल्याचे दिसत नाही. फॉस्टर म्हणतो-
"भोसल्यांचे मुलुखाची उत्तरेकडील सरहद लखनादौनच्या उत्तरेस चार कोसांवर शेरनदी ही आहे. पलिकडेस काल्पीचे बाळाजीचा म्हणजे गोविंदपंत बुंदेल्याचा मुलगा बाबाजी गोविंद खेर याचा मुलूख आहे. पूर्वेस रतनपूरच्या प्रदेशापर्यंत तसेच संबलपूर व इतर संस्थाने धरून कटकपर्यंत त्यांचा अंमल आहे. दक्षिणेस गोदावरीच्या उत्तरेस दहा कोसापर्यंत भोसल्यांचा अंमल चालतो. पश्चिमेस सर्व वऱ्हाड प्रांत भोसल्यांच्या अंमलाखाली आहे. एकंदरीत दक्षिणेस गोदावरीपासून उत्तरेस नर्मदेपर्यंत त्यांचा अंमल आहे."
इ.स. १८०० हा नागपूरकर भोसल्यांच्या वैभवाचा अत्युच्च काळ समजला जातो. याकाळात नागपूरच्या भोसल्यांची सत्ता उत्तरेस नर्मदेपासून ते दक्षिणेस गोदावरी पर्यंत आणि पश्चिमेस वऱ्हाडपासून ते पूर्व दिशेला पूर्व समुद्र किनाऱ्यापर्यंत कायम झाली.
भोसल्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्र इ.स.१८००👇
दुसऱ्या रघुजीच्या काळात झालेल्या इंग्रज-मराठा युद्धात भोसल्यांनी १७ डिसेंबर १८०३ चा 'देवगावचा तह' स्वीकारला. या तहानंतर मात्र कंपनीने भोसल्यांच्या मोठ्या भूभागावर नियंत्रण मिळवले होते. यात नर्मदेच्या उत्तरेकडील जबलपूर, धामोनी दक्षिणेकडील मंडला, शिवनी, होशंगाबाद, बैतुल, मूलताई तसेच विदर्भातील गाविलगड, नरनाळा तर पूर्वेस संबळपूर, सिरगुजा या भागांचा समावेश होता. भोसल्यांच्या अखत्यारीत फक्त नागपूर, चंद्रपूर, छत्तीसगड व वैनगंगेचा प्रदेश हा भूभाग राहिला.

रघूजीराजे भोसले प्रथम- नागपूर साम्राज्याचे मराठा शासक भाग १

 



रघूजीराजे भोसले प्रथम- नागपूर साम्राज्याचे मराठा शासक
भाग १
लेखक ::सतीश राजगुरे
'नागपूरकर भोसले' हे महाराष्ट्रातील मराठी अंमलातील एक पराक्रमी मराठा घराणे होते. असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी 'हिंदवी स्वराज्याची स्थापना' केली तर नागपूरकर भोसल्यांनी 'हिंदवी स्वराज्याचा विस्तार' केला. एके काळी थेट ओरिसापर्यंत नागपूर राज्याची सीमा पसरली होती.
तसं बघितलं तर भोसल्यांच्या काळात असलेला 'नागपूर प्रांत' कोणत्याही दृष्टीने एकजिनसी नव्हता. भौगोलिक रचना, भाषा आणि पूर्वेतिहास सर्व भिन्न होते. नागपूरकर भोसले व पुढे इंग्रजांच्या काळात वेगवेगळे प्रांत आणि मुलुख त्यांच्या वर्चस्वाखाली येत गेले व ते नागपूर प्रांताचा भाग बनले!
पहिला रघुजी
बंगाल आक्रमणानंतर पहिला रघुजी याने 'देवगड' हे गोंड संस्थान आपल्या नियंत्रणाखाली घेऊन खालसा केले. त्यानंतर चंद्रपूर, नरनाळा, गाविलगड, माणिकदुर्गही ताब्यात घेतले. तसेच नागपूर-बंगालला जोडणारा छत्तीसगड हा भागही आपल्या नियंत्रणाखाली आणला. इ.स. १७४५ च्या दरम्यान रायपूर, संबलपूर, रतनपूर या छोट्या राज्यांसह छत्तीसगडही घेतले. उत्तर हिंदुस्थानात स्वारी करून 'गढा-मंडला' या प्रांतावर देखील आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
याशिवाय बिहार व बंगालची चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा मिळून सुमारे ४०% उत्पन्नाचा भाग रघुजीस मिळत असे. रघुजी भोसल्यांनी आपले राज्य शून्यातून निर्माण केले होते. केवळ एका माणसाने इतका मोठा राज्यविस्तार क्वचित केलेला आढळतो. रघुजी भोसले यांना त्याकाळच्या मराठे सरदारात एका दृष्टीने सर्वात श्रेष्ठ सरदार म्हणावे लागेल.
नगरधन हा ‘भुईकोट’ प्रकारातील एक किल्ला आहे. भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यात असलेला हा किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे.रामटेकपासून वायव्येस सुमारे ७ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.इ.सनाच्या ४थ्या शतकात ही जागा ‘नंदीवर्धन’ म्हणुन ओळखल्या जात होती.नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे.
रघुजींनी बांधलेल्या वाकाटककालीन 'नगरधन' किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार.👇
(हा नागपूर जिल्ह्यात असलेला ‘भुईकोट’ प्रकारातील एक किल्ला असून रामटेकपासून वायव्येस ७ कि.मी. अंतरावर आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास प्राचीन इतिहास आहे. इ.स.च्या चौथ्या शतकात ही जागा ‘नंदीवर्धन’ म्हणून ओळखल्या जात होती. नगरधन हा नंदीवर्धनचा अपभ्रंश आहे.)

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...