विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label महाराणी छत्रपती ताराबाई.... Show all posts
Showing posts with label महाराणी छत्रपती ताराबाई.... Show all posts

Saturday, 13 March 2021

*स्वातंत्र्यसौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराबाईं*

 *स्वातंत्र्यसौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराबाईं* 

 Rani Tarabai, The Indomitable Warrior Queen of the Marathas

*स्वातंत्र्यसौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराबाईं* वर
बादशहाने जोरदार आक्रमणे सुरु केली. याकाळात ताराराणींनी कुशल युद्धनीतीने मात केली. बादशहाच्या फौजेने वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त काळ लढवायचा पावसाळा जवळ येईपर्यंत किल्ला लढवायचा व नंतर वाटाघाटी करून रोख रक्कम घेऊन किल्ला बादशहाच्या ताब्यात द्यायचा ही रणनीती वापरली. वेढ्यातल्या सैन्यावर मराठे आक्रमण करतच याचबरोबर धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे मोगली मुलखात धुमाकूळ घालत यांना रोखण्यासाठी बादशहा दाऊदखान, राव डाळपात बुंदेला, शहजादा बेदरबख्तत, जुल्फिरखान यांना पाठवत. औरंगजेबाचा चरित्रकार भीमसेन सक्सेना म्हणतो एकट्या जुल्फिरखानाला १७०० च्या मोहिमेत २००० कोसांच्या हालचाली कराव्या लागल्या. सातारा, परळी दोन किल्ले घेतल्यानंतर बादशहा माणदेशात सरकला. पुढे त्याने पन्हाळा-पावनगडास वेढा घातला या परिस्थिती मराठे जोमाने लढत होते. विठोजी केसरकरांनी गडाबाहेर पडून मोर्चा मारल्यानंतर त्यांचे कौतुक करणारे पत्र ताराराणींनी लिहिले त्यातून त्यांनी जिद्द व आत्मविश्वास वाढविला "तुम्ही हमेशा कस्त करून गनिमास नजिता पावविता. एक दोन वेळ मोर्चा मारिला. औरंगजेबाला तरी ठेचगा द्यावा अशी उमेद धरता, म्हणून हे वर्तमान देवजी रघुनाथ व फडणीस यांनी विदित केले त्यावरून तुमचा मुजरा झाला. ऐसियास तुम्ही एकनिष्ठ सेवक तैसेच राहा. याउपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे. स्वामी उर्जित हरबाब करतील. दिलासा असो देणे." १२ मार्च १७०१. बादशहा विशाळगडाकडे येतोय हे समजताच ताराराणी व शिवाजीराजे प्रतापगडावर पोहचल्या. या प्रसंगी ताराराणींनी मराठा सरदार प्रतापराव मोरे यांना लिहलेले एक पत्र उपलब्ध आहे ज्यावरून त्यांचे लढाईचे धोरण, सरदारांशी वागणूक, शत्रूशी लढण्याचा निर्धार दिसून येतो. त्यातील एक वाक्य असे "औरंगजेब विशाळगडास बिलगला याजकरिता त्याचे कविलावाड मारून हमेशा गोटावर हल्ले करावेत, तरीच तो बलकुबल राहतो. याजकरिता तुम्ही लोक आपले अवघे एकदील होऊन औरंगजेबास जडून राहणे. तुम्ही स्वामींचे एकनिष्ठ सेवक, मायेचे विश्वासू आहा.*

Thursday, 24 December 2020

मराठेशाही अबाधित ठेवणाऱ्या महाराणी ताराबाई

 

जेथे गवतालाही भाले फुटत होते...
औरंगजेबसारख्या पाताळयंत्री मोगल पातशहाविरूद्ध सतत संघर्ष करून


मराठेशाही अबाधित ठेवणाऱ्या महाराणी ताराबाई यांची आज पुण्यतिथी.
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली.
घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई जात्याच अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे सात वर्षे औरंगजेबाला मराठय़ांशी झुंज देत दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस अपयश घेऊन येथेच मरण पत्करावे लागले.
सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी ताराराणींनी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.
ज्या काळात ताराराणी लढत होत्या, त्या काळात मोगलांच्या अत्याचार व दमनशाहीविरुद्ध गावागावात त्यांनी जनजागरण मोहिमासुद्धा चालवल्या. त्यामुळेच केवळ सैनिकच नव्हेत, तर शेतात राबणारे शेतकरी व वेगवेगळे उद्योग करणारे कामगारही मिळेल ते शस्त्र हाती घेऊन मोगलांविरुद्ध लढू लागले. त्यावरूनच 'गवतालाही भाले फुटणे' हा शब्दप्रयोग रुढ झाला.
एकीकडे मराठेशाही अधिक बळकट करत असताना त्यांच्याच काळात सत्तेचे राजकारण करताना मराठेशाहीत दुफळी निर्माण होत असल्याचेही ताराबाईंनी पाहिले. याच काळात मराठेशाहीच्या सातारा व कोल्हापूरात दोन गाद्या तयार झाल्या व ताराबाईंना सातारा सोडून कोल्हापुरला आश्रय घ्यावा लागला.
ताराबाईंचे कर्त्तृत्व अफाट होते, हे खरेच. 'गवतालाही भाले फुटतात' असे शौर्य ज्यांनी गाजवले, त्या महाराणी ताराबाईंना मानाचा मुजरा !
- भारतकुमार राऊत

Sunday, 26 July 2020

महाराणी छत्रपती ताराबाई...

महाराणी छत्रपती ताराबाई....

उपाधी = महाराणी.
राज्य_काळ = १७०० – १७०७
राज्याभिषेक = इ.स. १७००
राज्यव्याप्ती = पश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी = पन्हाळा
पूर्णनाव = महाराणी ताराबाई राजारामराजे भोसले
जन्मदिनांक = [1675/1674 (इतिहासात जन्मतारखेच कुठेही उल्लेख नाही]
जन्मस्थान = तळबिड
मृत्यूदिनांक = इ.स 9 डिसेंबर 1761
मृत्यूस्थान = सातारा
पूर्वाधिकारी = छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले
उत्तराधिकारी = छत्रपती शाहुराजे संभाजीराजे भोसले
वडील = हंबीरराव मोहिते
राजवंश = भोसले
राजचलन = होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन)

महाराणी ताराबाई (१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला. जर तुम्ही कुुुठेेेही ताराबाईंची जन्मदिनांक १४ ऐप्रिल पाहत असाल तर ती अत्यंत चुकीची आहे. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.

राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी तिने मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले.

करवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची तिने स्थापना केली. ताराबाई मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यामागे त्यानी कणखरपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचे पान आहे.

#_amar_durgeesht

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...