विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 3 October 2026

महाराजांची युद्धनीती (Guerrilla Warfare) आणि लष्करी शिस्त

 छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य मोगल, आदिलशाही आणि परकीय सत्तांना केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे, तर आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने आणि अनोख्या युद्धनीतीने धूळ चारली.


महाराजांची युद्धनीती (Guerrilla Warfare) आणि लष्करी शिस्त ही जगातील अनेक लष्करी अभ्यासक्रमांत आजही शिकवली जाते.

१. गनिमी कावा (Guerrilla Warfare Tactics)
कमीत कमी सैन्यात जास्तीत जास्त नुकसान: शत्रूच्या प्रचंड फौजेला समोरासमोर (मैदानी युद्धात) भिडण्यापेक्षा, त्यांच्या कच्च्या दुव्यांवर अचानक हल्ला करणे आणि त्यांचे अतोनात नुकसान करून वेगाने पसार होणे, हे या नीतीचे मुख्य सूत्र होते.
भौगोलिक परिस्थितीचा अचूक वापर (Terrain Advantage): सह्याद्रीच्या डोंगररांगा, दाट जंगले आणि दऱ्याखोऱ्यांचा महाराजांनी जणू हत्यारासारखा वापर केला. शत्रूला अनोळखी आणि दुर्गम भागात (उदा. जावळीचे खोरे, उंबरखिंड) ओढून आणून कोंडीत पकडणे, यात मराठा सैन्य वाकबगार होते.
बळकट गुप्तहेर यंत्रणा: बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखालील गुप्तहेर खात्यामुळे शत्रूच्या छावणीतील इत्थंभूत माहिती, सैन्यसंख्या आणि रसद मिळण्याचे मार्ग महाराजांना आधीच माहीत असायचे. युद्धाचा अर्धा विजय या अचूक माहितीवरच अवलंबून असायचा.
वेगावर आणि रात्रीच्या वेळी हल्ले: लाल महालातील शाहिस्तेखानावरील हल्ला असो वा सुरतेची मोहीम, गरुडाच्या वेगाने शत्रूवर झडप घालणे आणि ते बेसावध असताना रात्रीच्या वेळी हल्ले करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यावर महाराजांचा भर होता.
२. कडक लष्करी शिस्त आणि नियम
रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये: सैन्याच्या कूच करताना शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी महाराजांचे सक्त आदेश होते. सैन्यासाठी लागणारा चारा आणि धान्य रयतेकडून योग्य मोबदला देऊन विकत घेतले जायचे, फुकट किंवा जुलूम करून नाही.
स्त्रियांचा आणि धर्माचा सर्वोच्च आदर: युद्धात किंवा छाप्यादरम्यान शत्रूच्या गोटातील स्त्रियांना, लहान मुलांना आणि वृद्धांना अजिबात धक्का लागता कामा नये, हा अत्यंत कडक नियम होता (उदा. कल्याणच्या सुभेदाराची सून). तसेच, मशिदींचे किंवा कुराणसारख्या ग्रंथांचे कोणतेही नुकसान न करण्याची सक्त ताकीद सैन्याला होती.
जहागिरीला फाटा आणि रोख पगार: सरदारांना जहागिरी (जमीन) देण्याऐवजी रोख पगार देण्याची पद्धत महाराजांनी सुरू केली. यामुळे सरदार रयतेवर अन्याय करत नसत आणि ते कोणत्याही जमिनीला न बांधता थेट राजाशी आणि स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले.
पावसाळ्यातील नियोजन आणि दसरा: पावसाळ्यात सर्व सैन्य छावणीत किंवा गडावर असायचे. या काळात सैनिकांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी मुभा असायची आणि घोडे, शस्त्रे यांची निगा राखली जायची. दसऱ्याच्या मुहूर्तावर (सीमोल्लंघन करून) नवीन मोहिमांची सुरुवात होत असे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच गनिमी काव्याचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अचूक वापर करून, २०,००० च्या बलाढ्य फौजेला अवघ्या मोजक्या मावळ्यांनी कसे पराभूत केले.

सुभेदार मल्हारराव होळकर आणि दाभाडे घराण्याचा चांदवड वेशीवरील एक फारशी शिलालेख !!!

 








सुभेदार मल्हारराव होळकर आणि दाभाडे घराण्याचा चांदवड वेशीवरील एक फारशी शिलालेख !!!

===================================
चांदवड येथील सोमवार पेठ प्रवेशद्वार फारसी शिलालेख .!!!!
उपलब्धी व स्थळ :- हा शिलालेख नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील चांदवड शहरातील सोमवार पेठ येथील एका वेशीवर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला वरील भागात कोरलेला आहे. सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून तीन ओळींचा फारसी भाषेत आहे. सदर शिलालेख हा अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून लेखातील काही अक्षरे झिजली असून पुसट झाली आहेत तरी छाप घेतला असता त्यावरील मजकूर अथक प्रयत्नांनी वाचता येतो..
====================================
शिलालेखाचे वाचन :-
फारसी पाठ
۱) هولکر شد دیسمکهثانی طهار شد بعهد او در این سوموار
۲) سال تعمیرش ز فصلی گفته شد یکهزار و یکصد و شست و چهار
۳) در عمل مشار الیه باهتمام شاه جی ده بهاریه ترتب شد
देवनागरी पाठ
१) होलकर शुद देसमुके सानी तहार
शुद बहद ओ दर ईं सोमवार
२) साल तामीरश ज फ़सली गुफ्ता शुद
यक हजार ओ यक सद ओ शस्त ओ चाहर
३) दर अमल मुशार इलैह बा एहतमाम
शाहजी दाभाडे बहारिये तरत्तुब शुद
अर्थ :- होळकर घराण्यातील प्रतिष्ठित सरदार मल्हारराव होळकर देशमुख यांच्या कारकिर्दीत, सोमवारी या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण करण्यात आले. या प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीचे वर्ष फसली ११६४ म्हणजेच सन १७५७ असे काव्यात्मक पद्धतीने शिलालेखात नोंदविण्यात आले आहे. तसेच, वरील उल्लेखित अधिकारी मल्हारराव होळकर यांच्या देखरेखीखाली शाहजी दाभाडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे काम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्यात आले.
==================================
शिलालेखाचे महत्व :- हा शिलालेख मराठा कालखंडातील सार्वजनिक बांधकामे, प्रशासकीय व्यवस्था आणि फारसी भाषेच्या वापराचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावा आहे. शिलालेखात मल्हारराव होळकर यांचा उल्लेख आढळत असल्याने त्या काळातील होळकर घराण्याच्या प्रशासनाचा आणि त्यांच्या अधिपत्याखाली झालेल्या बांधकामांचा संदर्भ स्पष्ट होतो. त्याचबरोबर शाहजी दाभाडे यांनी या प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नांची नोंद असल्यामुळे स्थानिक पातळीवरील सरदार व अधिकाऱ्यांचा सार्वजनिक कामांतील सहभाग अधोरेखित होतो.शिलालेखात फसली ११६४ हे वर्ष नोंदविले असून, तत्कालीन प्रशासनात फसली कालगणनेचा वापर होत असल्याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच दुरुस्तीचे वर्ष काव्यात्मक शैलीत नोंदविण्याची परंपरा त्या काळातील फारसी शिलालेखांच्या साहित्यिक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकते. या शिलालेखामुळे मराठा राज्यातील स्थापत्यसंवर्धन, जीर्णोद्धाराची परंपरा, फारसी प्रशासकीय भाषेचा प्रभाव आणि होळकर–दाभाडे यांसारख्या प्रमुख घराण्यांची सार्वजनिक बांधकामांतील भूमिका स्पष्ट होते. त्यामुळे हा शिलालेख अठराव्या शतकातील मराठा इतिहास, स्थापत्यकला आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो.
=====================================
गावाचे नाव : मु.पो चांदवड (सोमवार पेठ ) ता. चांदवड , जि. नाशिक
जी.पी.एस. : २०°३२ '०० .९९ "N-- ७४ °२४ '५१ .०७ "E
शिलालेखाचे स्थान :-सोमवार पेठ गाव वेश मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कोरलेला आहे
अक्षरपद्धती : उठाव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : फारसी
प्रयोजन : वेशीच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण केल्याची स्मृती जपणे .
मिती / वर्ष : –फसली ११६४
काळ वर्ष : १८ वे शतक –सन १७५७
कारकीर्द :- छत्रपती रामराजे ,
व्यक्तिनाम : मल्हारराव होळकर,शाहजी दाभाडे .
शिलालेख संशोधन:- श्री.अनिल दुधाणे
शिलालेखाचे वाचक : मोहमद तारिक रसूल .
संदर्भ:-ARIE १९६१-६२,
@©माहिती व संकलन :-अनिल किसन दुधाणे .
=====================================
टीप:- सदर शिलालेख संशोधन कार्यात करण सोनी ,श्री अतुल पवार पत्रकार सुनील थोरे,तसेच शिलालेख वाचन कार्यात,डॉ.शैलेंद्र भांडारे यांचे विशेष सहकार्य लाभले.

दुष्काळ आणि शिवाजी महाराज...

 


दुष्काळ आणि शिवाजी महाराज...

महाराष्ट्रात वारंवार दुष्काळ पडल्याचे अनेक पुरावे इतिहासात आढळतात. शिवपूर्वकाळ ते शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पेशवाईपर्यंत दुष्काळाचे बरेच उल्लेख आढळतात. इ. स. १६२९- ३० मध्ये पूर्ण दख्खन परिसरात मान्सून झालाच नाही. यामुळे लोकांना दुष्काळाचे बरेच परिणाम भोगावे लागले. कित्येकांवर स्थलांतराची बारी आली. पावसाअभावी पडलेल्या दुष्काळामुळे आदिलशाही दिवानाने गावाच्या पाटलाच्या धान्य कोठारीतील निम्मे धान्य सरकार जमा केल्याचे वाचायला मिळते.
शिवकाळात सुद्धा १६६५ सालच्या दरम्यान दुष्काळ पडल्याचे आपल्याला दिसते. पुणे प्रांतातील मांजरी येथे दुष्काळाचा तडाखा बसला असता, त्यावेळी मांजरीचा सरकारी अधिकारी तेथे जातो व शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार तातडीने तेथील रयतेस पाचशे रुपयांची मदत घेऊन जातो.
असाच एक आदेश प्रभावळी प्रांताच्या (आजचा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, शृंगारपूर आणि आसपासचा प्रदेश) अधिकाऱ्याला दिलेला आढळतो. तो खालीलप्रमाणे...
"ज्याच्याकडे शेती करण्याची क्षमता आणि मनुष्यबळ असेल, त्याच्याकडे जर माफक प्रमाणात बैल आणि धान्याचा साठा असेल तर उत्तम होईल, तो शेती करेल.
ज्या माणसाकडे शेती करण्याची क्षमता आणि मनुष्यबळ आहे, पण नांगराला जुंपण्यासाठी बैल आणि पोटासाठी धान्य नाही, त्यामुळे जो अडकून पडून निष्क्रिय झाला असेल, त्याला रोख पैसे हातात देऊन दोन बैलांचे पैसे द्यावेत. त्याने बैल खरेदी करावेत. तसेच पोटासाठी खाण्याकरिता एक-दोन खंडी धान्य द्यावे आणि त्याच्याकडून जितकी शेती करून घेता येईल तितकी शेती करून घ्यावी.
त्याच्याकडून बैलांचे आणि धान्याचे पैसे घेताना कोणताही व्याज न लावता, फक्त मुद्दल रक्कम हळूहळू उसनवार म्हणूनच परत घ्यावी. जोपर्यंत त्याच्यामध्ये ताकद किंवा ऐपत येत नाही, तोपर्यंत त्याच्या क्षमतेनुसार आणि सवलत देत त्याला सांभाळून घ्यावे. आमची एक बाकी राहिलेली थकबाकी माफ केली आहे आणि त्याच्या संपूर्ण कुळाला (कुटुंबाला) ती माफ करण्यात आली आहे."
( मूळ आदेश मोडी भाषेत आहे त्याचे भाषांतर इथे मी केले आहे )
दुष्काळ काळात शेतकऱ्याला जितकी मदत व संरक्षण देता येईल तितके शिवाजी महाराजांनी दिले आहे. दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारे तोशीस लागणार नाही असा आदेशच शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिला होता.
म्हणूनच शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही बिरुदावली शोभते...🙏
- कपिल जाधव
संदर्भ - १) मराठ्यांच्या इतिहासाची साधने.
२) शिवचरित्र साहित्य
३) कित्ता खंड ५

#सरसेनापती_श्रीमंत_हरजीराजे_राजेमहाडीक


 #सरसेनापती_श्रीमंत_हरजीराजे_राजेमहाडीक

हिंदवी स्वराज्य साकारण्यासाठी सोळाव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत देव, देश आणि धर्मासाठी झुंजलेले आणि राजेभोसले घराण्याशी एकनिष्ठ राहिलेले एक शूर मराठा सरदार घराणे म्हणजे राजेमहाडीक घराणे. हे श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खूप प्रसिद्ध होते. सोळाव्या शतकात हे महाडला आले. महाडवरून त्यांना राजेमहाडिक असे आडनाव पडले.
त्यांचे महापुरुष कृष्णाजीराजे १६१४ साली युसूफ आदिलशहाच्या लुटालुटीत मरण पावले. त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती. नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरुवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कान्होजी यांना ही मुकादमकी मिळाली. कान्होजी १६५०मध्ये युद्धात मरण पावले. त्यांचे पुत्र परसोजी हे शहाजीराजांना कर्नाटकात मदत करत असताना मरण पावले. त्यांचा मुलगा हरजीराजे राजेमहाडिक यांच्यावर शहाजीराजांचे चांगलेच लक्ष होते.
हरजीराजे शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते. जी मोहीम छत्रपती देतील, ती मोहीम यशस्वी करूनच हरजीराजे येत होते. छत्रपती शिवरायांनी हरजीराजे यांच्या कर्नाटकातील कामगिरीवर खुश होऊन सोन्याची जेजुरी गडावर हरजीराजांना ‘राजेशाही’ हा किताब सन्मानार्थ देऊ केला. राज्याचा महत्त्वाचा जिंजी प्रांत हा मुघलांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय हरजीराजे महाडिक यांना आहे. अशा कर्तबगार राजेमहाडिक घराण्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडिक यांनी कर्नाटकसह दक्षिण प्रांत औरंगजेबाच्या झंझावाती आक्रमणापासून वाचवला. हरजीराजेंनी त्या वेळी जिंजी व वेल्लोर, मद्रास, म्हैसूर, अर्काट, बंगळूर आदी प्रांत म्हणजे संपूर्ण कर्नाटक व तमिळनाडू जिंजीच्या आधिपत्याखाली आणले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज १६८९मध्ये जिंजीस आले. तेथे राजधानी घोषित करून तेथूनच त्यांनी काही काळ राज्यकारभार केला. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता; मात्र हरजीराजे नेहमी त्याच्या आड आले.
दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशा वेळी हरजीराजे यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवला, ही त्यांची कामगिरी अद्वितीयच म्हणावी लागेल. त्यांच्या शूरवीरतेच्या गुणामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी अंबिकाबाई यांचा हात विश्वासाने सन १६६८मध्ये श्रीमंत हरजीराजे यांच्या हाती दिला. हा विवाह राजगडावर झाला होता. पुढे शिवरायांच्या मृत्यूनंतरही हरजीराजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर इमानाने वागले. दक्षिण भारताची जबाबदारी शिवरायांनी त्यांच्याकडे ठेवली होती. ती संभाजीराजेंनीही परत त्यांच्याकडेच कायम ठेवली. हरजीराजे यांनी पराक्रमामुळे छत्रपतींचे मन जिंकून घेतले व संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी पराक्रम गाजवले.
पुढे हरजीराजे कांचीवर (कर्नाटक प्रांत) चाल करून गेले त्यांच्या पराक्रमापुढे कांचीही नमली व हरजीराजे महाडिक यांनी कांचीही जिंकून घेतली. संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी हरजीराजेंनी जिंजीत शौर्य, पराक्रम गाजवले. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखानाशी लढता लढता २९ सप्टेंबर १६८९ रोजी हरजीराजे जिंजी येथे तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पडले.
पुढे हरजीराजे महाडिक यांचे पुत्र शंकराजी महाडिक यांच्याशी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपली मुलगी भवानीबाई यांचे लग्न लावून दिले. १७०९मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी भवानीबाई व शंकराजी राजेमहाडिक यांना तारळे महालाअंतर्गत २४ गावे व ७२ वाड्यांची पाचही वतनाची सनद करून दिली. सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकराजीराजे तारळ्यात आले. त्याच्या आधी मोगलांनी तारळे महालाची वाताहत केली होती. अशा वेळी हनगोजी काटे-देशमुख, सिदोजी, विठोजी साळवे-देशमुख, देशपांडे, मुकादम, कुलकर्णी, शेटे, महाजन व बलुतेदार मंडळींनी रयतेला संरक्षण देण्याबरोबरच महालाला ऊर्जितावस्था आणण्याचे भवानीबाईंना साकडे घातले. त्यानुसार भवानीबाई व शंकराजीराजे यांनी तारळे महालावर आपला अंमल प्रस्तावित करून विस्कटलेली घडी बसवली.
धाकट्या शाहूराजांजवळ दुर्गाजीराजे महाडिक व कुशाबाराजे महाडिक हे सरदार होते. कान्होजीराजे महाडिक, परसोजी राजेमहाडिक, हरजीराजे महाडिक यांनी मराठेशाहीत आपले पराक्रम गाजवून आपल्या घराण्याचे नाव अजरामर केले. तारळ्यात या पराक्रमाच्या अनेक पाऊलखुणा, दस्तऐवज, पत्रव्यवहार उपलब्ध आहेत. आजही राजेमहाडिक बंधूंचे आठ वाडे मोठ्या दिमाखात उभे असून, त्यात आजची राजेमहाडिक घराण्यातील पुढची पिढी नांदते आहे.
अशा ह्या रणमर्दाला स्मृतिदिनानिमित्त त्रिवार मुजरा!!!
- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

**भारतातील हिंदू राजाची सर्वात मोठी समाधी**-राजे लखूजीराव जाधव समाधी,सिंदखेड राजा,बुलडाणा

 












**भारतातील हिंदू राजाची सर्वात मोठी समाधी**-राजे लखूजीराव जाधव समाधी,सिंदखेड राजा,बुलडाणा

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात वसलेले सिंदखेड राजा हे शहर मराठा साम्राज्याच्या उदयाची नांदी ठरलेल्या एका महत्त्वाच्या पर्वाचे केंद्रबिंदू आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, राजमाता जिजाऊ यांचे हे जन्मस्थान आहे. ही भूमी दख्खनच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अनेक वादळी घडामोडींची मूक साक्षीदार आहे. या ऐतिहासिक वारशाचा सर्वात प्रबळ आणि महत्त्वाचा पुरावा म्हणजे सिंदखेड राजा येथे असलेले राजे लखुजीराव जाधव यांचे समाधीस्थळ होय. हे समाधीस्थळ १७व्या शतकातील अस्थिर राजकीय परिस्थिती, निजामशाही आणि मुघल साम्राज्याच्या संघर्षात ताठ मानेने उभ्या राहिलेल्या मराठा सरदारांच्या स्वाभिमानाचे आणि शौर्याचे जिवंत प्रतीक मानले जाते.
१३व्या शतकात अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणामुळे देवगिरीचे यादव साम्राज्य लयाला गेले. तरीही यादवांच्या अनेक शाखांनी महाराष्ट्राच्या विविध भागांत आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते. त्यातीलच एक पराक्रमी शाखा म्हणजे सिंदखेडचे जाधव घराणे. १५व्या शतकात बहमनी राजवटीत हा परगणा एका स्थानिक काझीकडे होता, परंतु १५५० च्या सुमारास त्याचा ताबा जाधव घराण्याकडे आला आणि तेव्हापासून या स्थानाला ‘सिंदखेड राजा’ ही ओळख प्राप्त झाली. लखुजीराव जाधवांचे वडील विठोजीराव यांनी या जहागिरीचा विस्तार केला. तथापि, लखुजीरावांच्या काळात सिंदखेडला खऱ्या अर्थाने राजधानीचे वैभव प्राप्त झाले. त्यांनी आपल्या पराक्रमाने निजामशाहीतील एक अत्यंत मातब्बर सरदार म्हणून स्थान निर्माण केले होते.
राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव हे त्या काळातील एक बलाढ्य सरदार आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. त्यांच्याकडे हजारो घोडदळाची मनसब होती. दख्खनच्या राजकारणात त्यांचे महत्त्व इतके होते की निजामशहा असो वा मुघल सम्राट जहांगीर, प्रत्येकाला लखुजीरावांची साथ हवी होती. १६२१ च्या सुमारास त्यांनी मुघलांकडून ५००० जात आणि ५००० स्वार अशी उच्च मनसब मिळवली होती. याच काळात लखुजीरावांची कन्या जिजाबाई यांचा विवाह वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. हा विवाह म्हणजे दख्खनमधील दोन सर्वात शक्तिशाली मराठा कुटुंबांचे मिलन होते. मात्र, पुढे ‘खंडागळ्याचा हत्ती’ या दुर्दैवी प्रकरणामुळे जाधव आणि भोसले यांच्यात वैमनस्य निर्माण झाले. ती घटना अशी की १६२१-२२ च्या सुमारास निजामशाहीच्या लष्करी छावणीत निजामशाहीतील एक सरदार दत्ताजीराव खंडागळे यांचा ‘रायबाघ’ नावाचा हत्ती अचानक पिसाळला आणि त्याने छावणीत धुमाकूळ घालायला सुरुवात केली. या हत्तीला आवरण्यासाठी लखुजीराव जाधवांचे पुत्र दत्ताजी जाधव आपल्या पथकासह पुढे सरसावले. त्याच वेळी शहाजीराजे भोसले यांचे बंधू शरीफजी भोसले आणि इतर भोसले मंडळीही तिथे बचावासाठी आली. मात्र, हत्तीला आवरण्याच्या प्रक्रियेतून उभय पक्षात अहंकाराचा संघर्ष सुरू झाला. या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण युद्धात झाले आणि भरदरबारात तलवारी निघाल्या. या संघर्षात लखुजीरावांचे पुत्र दत्ताजी जाधव हे भोसल्यांच्या हातून मारले गेले. आपल्या मुलाची हत्या स्वतःच्या जावयाच्या (शहाजीराजे) भावांनी केल्याने लखुजीरावांचा संताप अनावर झाला. या एका घटनेमुळे जाधव आणि भोसले या दोन बलवान घराण्यांतील नातेसंबंधांत कायमची दरी निर्माण झाली. जिजाऊंच्या माहेरचा आणि सासरचा हा संघर्ष इतका विकोपाला गेला की त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटले.
लखुजीरावांच्या आयुष्याचा आणि पर्यायाने एका मोठ्या पर्वाचा शेवट ज्या घटनेने झाला, ती घटना मराठा इतिहासातील एक भीषण शोकांतिका मानली जाते. २५ जुलै १६२९ रोजी देवगिरी किल्ल्यावर (दौलताबाद) निजामशहाने लखुजीरावांना काही तातडीच्या मसलतीसाठी बोलावले. लखुजीराव आपले पुत्र अचलोजी, राघोजी आणि नातू यशवंतराव यांच्यासह दरबारात हजर झाले. मात्र, हा सुलतानाचा एक विश्वासघातकी कट होता. ते दरबारात प्रवेश करत असतानाच त्यांच्यावर अचानक हल्ला चढवण्यात आला. भर दरबारात, सुलतानाच्या डोळ्यासमोर मराठा इतिहासाच्या या आधारस्तंभाची आणि त्यांच्या वारसदारांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने जाधव घराण्याचे अतोनात नुकसान झाले आणि त्यातून निजामशाहीच्या अंताची आणि स्वराज्याच्या निर्मितीची बीजे रोवली गेली. आपल्या सासऱ्यांची झालेली ही हत्या पाहून शहाजीराजांनी निजामशाहीचा कायमचा त्याग केला आणि जिजाऊंच्या मनात परकीय सत्तेविरुद्ध जो संताप निर्माण झाला, त्यातूनच पुढे शिवरायांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली.
‘सिंदखेड राजाचा इतिहास’ या डॉ. शिवरतन शेठ लिखित पुस्तकात व सुनील कोष्टी लिखित ‘राजमाता जिजाऊंचे माहेर : सिंदखेड राजा’ या पुस्तकांतील वर्णनानुसार, लखुजीरावांच्या या बलिदानानंतर त्यांचे बंधू राजे जगदेवराव (भूतजी) जाधव यांनी सिंदखेड राजाचा कारभार सांभाळला. राजे जगदेवराव यांनी सिंदखेड राजा येथे लखुजींचे भव्य स्मारक उभारण्याचे कार्य केले. ही वास्तू आज ‘इंडो-इस्लामिक-मराठा’ स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून गणली जाते. सुमारे ४० बाय ४० फूट आकाराची ही चौरस वास्तू एका उंच दगडी जोत्यावर उभारलेली आहे. समाधीचे ताशीव चिरेबंदी बांधकाम आजतागायत चांगल्या स्थितीत उभे आहे. तिचे बांधकाम काळ्या बेसाल्ट पाषाणात आणि वरचा भाग विटा व चुन्यात केलेला आहे. चौरसाकृती समाधीचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे, तर दक्षिण-उत्तर बाजूस दोन उपद्वारे आहेत. स्मारकाचे घुमट २४ कमानींवर बांधलेले आहे. स्मारकाच्या बाहेरच्या भिंतीवर दोन ठिकाणी लखुजी जाधवांच्या वंशावळीचे शिलालेख कोरलेले आहेत. मुख्य प्रवेशाच्या दोन्ही बाजूंनी गच्चीकडे जाणारी पायऱ्यांची रचना आहे. यापैकी एक मार्ग सध्या बंद आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस हत्तींना मारणाऱ्या सिंहांचे (शरभ) लक्षवेधी पुतळे आहेत. या समाधीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा भव्य घुमट. एका हिंदू सरदाराच्या समाधीवर असा घुमट असणे हे त्या काळातील समन्वयवादी संस्कृतीचे दर्शन घडवते. बाहेरून ही वास्तू एखाद्या इस्लामिक मकबऱ्यासारखी भासते. या वास्तूच्या मध्यभागी लखुजीरावांच्या आत्म्याच्या शांतीसाठी एक मोठे शिवलिंग प्रतिष्ठापित केलेले आहे. याच इमारतीत लखुजीरावांसह त्यांच्या पुत्रांच्या आणि नातवाच्या अशा एकूण पाच समाध्या आहेत. या स्मारकासमोरच जाधव घराण्यातील काही समाध्या आणि सतीशिळा आहेत.
सिंदखेड राजाचा हा वारसा प्राचीन काळाशीही जोडलेला आहे. याची प्रचिती जून २०२४ मध्ये लागलेल्या एका शोधातून आली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे या समाधीच्या परिसरात उत्खनन सुरू असताना, सुमारे २.२५ मीटर खोलीवर भगवान विष्णूंची एक अत्यंत दुर्मिळ ‘शेषशायी’ मूर्ती सापडली. क्लोराईट शिस्ट या मऊ दगडापासून बनवलेली ही मूर्ती साधारणपणे ११ व्या शतकातील असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. १.७० मीटर लांबीची ही अखंड शिळा भगवान विष्णूंच्या शांत मुद्रेतील रूपाचे दर्शन घडवते. विष्णूंच्या चरणांशी देवी लक्ष्मी, प्रभावळीवर कोरलेले दशावतार आणि समुद्रमंथनाचा प्रसंग इतक्या सुबकपणे कोरलेला आहे की त्या काळातील प्रगत शिल्पकलेची साक्ष पटते. जाधव घराणे स्वतःला ‘यदुवंशी’ म्हणजेच विष्णूचे वंशज मानतात. त्यामुळे लखुजीरावांच्या आधी म्हणजेच ५०० वर्षांपूर्वीपासून येथे एक भव्य विष्णू मंदिर अस्तित्वात असावे, असा दावा केला जातो.
दरवर्षी १२ जानेवारीला राजमाता जिजाऊंची जयंती असते. हा जयंती सोहळा येथील जिजाऊ सृष्टीवर होत असला, तरी लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळावर आणि राजवाड्यात या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यावेळी हजारो शिवभक्त व जिजाऊभक्त येथे अभिवादन करण्यासाठी येतात. याशिवाय २५ जुलै रोजी राजे लखुजीराव जाधव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या समाधीस्थळावर दरवर्षी पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी धार्मिक विधी, पूजा आणि मराठा इतिहासाच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. मराठा परंपरेत दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंदखेड राजा येथे जाधव घराण्याचे वंशज आणि स्थानिक नागरिक एकत्र येऊन ‘शस्त्रपूजन’ करतात. राजे लखुजीराव जाधव यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून या दिवशी समाधीस्थळावर आणि परिसरात पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा होतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असल्याने सिंदखेड राजा येथे शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. त्यावेळी समाधीस्थळावर फुलांची सजावट, पालखी सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे समाधीस्थळ खुले असते.
-महेश कोते-पाटील (शिर्डी)

कल्याण-भिवंडीच्या रोखाने शिवरायांची वादळी धडक: १ ऑक्टोबर १६५७ – राजगडावरून झेपावले शिवछत्रपती!

 



कल्याण-भिवंडीच्या रोखाने शिवरायांची वादळी धडक: १ ऑक्टोबर १६५७ – राजगडावरून झेपावले शिवछत्रपती!

🚩
१ ऑक्टोबर १६५७... आश्विन शुद्ध चतुर्थी, शके १५७९ (हेमलंबी संवत्सर), गुरुवार! 🏇⚔️️
हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याच्या सीमा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून थेट उत्तर कोकणातील समृद्ध सागरी बंदरांपर्यंत विस्तारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अत्यंत चाणाक्ष लष्करी खेळीचा!
इ.स. १६५७ च्या उत्तरार्धात मुघल साम्राज्यात प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली होती. दिल्लीपती शाहजहान गंभीर आजारी पडल्यामुळे उत्तरेत मुघल तख्तासाठी वारसाहक्काचे युद्ध पेटू लागले होते. दख्खनचा सुभेदार असलेला औरंगजेब आपले लक्ष दक्षिणेतून काढून थेट दिल्लीच्या गादीवर केंद्रित करू लागला होता.
उत्तरेतील या सत्तासंघर्षाचा अचूक राजकीय फायदा उचलून स्वराज्याचा विस्तार करण्याची अद्वितीय संधी शिवछत्रपतींनी ओळखली! 📜🧭
⚔️ हशंमखानाचा लढा आणि जुन्नरच्या मुघलांशी चकमक!
कल्याण आणि भिवंडी ही तत्कालीन काळातील अत्यंत श्रीमंत, व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय जहाजांची ये-जा असणारी मोक्याची बंदरे होती.
परंतु, याच सुमारास जुन्नरचा मुघल ठाणेदार मोहम्मद युसुफ हादेखील कल्याणचा ताबा आपल्याकडे घेण्यासाठी सैन्यासह पुढे सरसावला होता.
आपला सरदार पडल्याची बातमी मिळताच शिवराय स्वस्थ बसणारे नव्हते. कल्याणसारखे मोक्याचे व्यापारी ठाणे मुघलांच्या किंवा आदिलशाहीच्या हाती जाणे स्वराज्याच्या भविष्यासाठी घातक होते.
कोणताही विलंब न लावता, आजच्याच दिवशी म्हणजे १ ऑक्टोबर १६५७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः निवडक फौजेनिशी किल्ले राजगडावरून खाली उतरले आणि त्यांनी कल्याण-भिवंडीच्या दिशेने कूच केले!
सह्याद्रीचे दुर्गम घाट रपेट करत महाराजांनी अवघ्या दोन दिवसांत मजल-दरमजल केली. समकालीन ऐतिहासिक नोंदीनुसार, दिनांक ३ ऑक्टोबर १६५७ रोजी महाराज कल्याण-भिवंडी परिसरात दाखल झाले होते!
महाराज स्वतः रणांगणात उतरल्याने मावळ्यांमध्ये नवा उत्साह संचारला, मुघल फौजांची पळताभुई झाली आणि अवघ्या काही दिवसांत कल्याण-भिवंडीचा समृद्ध भूभाग आणि दुर्गाडी किल्ला स्वराज्याच्या भगव्याखाली आला. 🦁🚩
संधर्भ :'शिवापूरकर दप्तर यादी' आणि 'शिवचरित्र प्रदीप (पृ. ५०)
स्वराज्याच्या सीमा समुद्रापर्यंत विस्तारणाऱ्या आणि सैन्यासाठी स्वतः रणांगणात धाव घेणाऱ्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन चरणी मानाचा मुजरा! 🙏✨
कल्याण-भिवंडी मोहिमेसाठी शिवरायांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि रणनीतीबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇

Thursday, 1 October 2026

आंगरे घराण्याची वंशावळ


 आंगरे घराण्याची वंशावळ पुढीलप्रमाणे

तुकोजी सेखोजी संकपाळ आणि त्यांच्या पत्नी अंबाबाई यांचे चिरंजीव कान्होजी जे पुढे सरखेल कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले.
कान्होजींच्या पुढची वंशावळ खालीलप्रमाणे (स्वराज्याच्या सरखेल पदावर नियुक्त झालेल्यांची नावं ठळक अक्षरात दिली आहेत.)
कान्होजी, पत्नी: मथुराबाई, लक्ष्मीबाई, गहिनाबाई
सेखोजी (मथुराबाईपासून)
संभाजी (मथुराबाईपासून)
तुळाजी (गहिनाबाई या उपस्त्रीपासून)
मानाजी (गहिनाबाई या उपस्त्रीपासून)
येसाजी
धोंडाजी
मानाजी कान्होजी आंग्रे यांच्या पुढची वंशावळ खालीलप्रमाणे
मानाजी, पत्नी: राधिकाबाई, भागीरथीबाई
महिमाजी
रघुजी
चिमाजी
हिरोजी
धोंडजी
तुकोजी
कृष्णाजी
सुभानजी
तुळाजी
रामाजी
मानाजी कान्होजी आंग्र्यांनंतर त्यांच्या १० पैकी दुसरे चिरंजीव रघुजी सरखेल झाले ज्यांचा वंश पुढीलप्रमाणे
रघुजी, पत्नी: नर्मदाबाई, आनंदीबाई, राधाबाई
संभाजी (नर्मदाबाईपासून)
मानाजी (आनंदीबाईपासून)
रघुजी (गजराबाईपासून), पत्नी: भागीरथीबाई, कमलाबाई, भवानीबाई, यशोदाबाई (यांच्यापासून कान्होजी हा मुलगा झाला), अंबिकाबाई.
कान्होजी (आनंदीबाईपासून)
जयसिंग (राधाबाई या उपस्त्रीपासून)
मुरार (सकवारबाईपासून)
सरखेल कान्होजींच्या येसाजी नामक मुलाची शाखा कुलाब्यास होती जी खालीलप्रमाणे
येसाजी
बाबुराव
संभाजी (मावजीचा पुत्र दत्तक घेतला)
मावजी
या शाखेची वंशावळ खालीलप्रमाणे
येसाजी -> बाबुराव -> संभाजी -> अप्पासाहेब/बाबुराव (दत्तक) -> त्र्यंबक/संभाजी (दत्तक) -> चंद्रोजी -> संभाजी
या सर्व शाखांची एकत्र वंशावळ खालीलप्रमाणे
मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या सहाय्याने मी बनवलेली वंशावळ
आंग्रे घराण्यातील सर्व सरखेलांची यादी
कान्होजी तुकोजी आंग्रे (१६९०-१७२९)
सेखोजी कान्होजी आंग्रे (१७२९-१७३३)
संभाजी कान्होजी आंग्रे (१७३३-१७३५)
तुळाजी कान्होजी आंग्रे (१७३५-१७५६)
मानाजी कान्होजी आंग्रे (१७३५-१७५८)
रघुजी मानाजी आंग्रे (१७५८-१७९३)
मानाजी रघुजी आंग्रे (१७९३-१७९९)(१८१३-१८१७)
बाबुराव येसाजी आंग्रे (१७९९-१८१३)
रघुजी मानाजी आंग्रे (१८१७-१८३८)
कान्होजी रघुजी आंग्रे (१८३८-१८३९)
माहिती स्रोत: महाराष्ट्रीय ज्ञानकोश

महाराजांची युद्धनीती (Guerrilla Warfare) आणि लष्करी शिस्त

  छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य मोगल, आदिलशाही आणि परकीय सत्तांना केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे, तर आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने आणि अनोख्...