विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label कर्नाटक स्वारी. Show all posts
Showing posts with label कर्नाटक स्वारी. Show all posts

Tuesday, 30 March 2021

कर्नाटक स्वारी : भाग ५

 


कर्नाटक स्वारी : भाग ५
अशी सर्व तयारी झाल्यानंतर बिनीचे सरदार, खास अश्वदल, प्रभावी पायदळ बरोबर घेऊन इ. स. १६७७च्या प्रारंभी महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली. प्रथम भागानगरला जाऊन कुतुबशहाची भेट घेतली आणि आपल्या मोहिमेस त्याचा पाठिंबा मिळविला. कुतूबशहाचा सेनापती मिझ महंमद हाही ससैन्य महाराजांच्या मोहिमेत सामील झाला. कर्नाटककडे जाताना श्रीशैल याठिकाणी असलेल्या मल्लिकार्जुन या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे महाराजांनी दर्शन घेतले. त्यानंतर अनंतपूर, मंदियाळ, कडप्पा, तिरूपती या मार्गाने मे १६७७च्या पहिल्या आठवड्यात शिवाजी महाराज मद्रासजवळ पोहोचले. तेथून त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी सैन्याचे एक पथक पाठविले. वास्तविक पाहता जिंजीचा किल्ला अतिशय अभेद्य असून सहजासहजी जिंकण्यासारखा नाही.
परंतु जिंजीचा किल्लेदार नसीर महंमदखान याने ५०,००० रुपयांच्या जहागिरीच्या मोबदल्यात १३ मे १६७७ रोजी जिजीचा किल्ला मराठ्यांना देऊन टाकला. जिंजी जिंकल्यानंतर वेलोरचा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकण्याचे ठरविले. हा किल्लाही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता. किल्ल्याच्या खंदकात खोलवर पाणी असून त्या पाण्यात सुसरी आणि इतर जलचर प्राणी फिरत होते.'या तोडीचा गड पृथ्वीवर दुसरा नाही अशी याची ख्याती होती. अशा या अवघड किल्ल्याला मराठ्यांनी चिवटपणे वेढा घातला. परंतु किल्ला लवकर हाती येण्याची शक्यता वाटेना. तेव्हा या वेढ्याची जबाबदारी महाराजांनी रघुनाथराव व आनंदराव यांच्यावर सोपविली आणि स्वतः शेरखान लोदी या सरदाराच्या पाठलागावर निघाले. २६ जून १६७७ रोजी शेरखानाचा सर्व सरंजाम मराठ्यांच्या हाती लागला. स्वत: शेरखान शिवाजी महाराजांना शरण गेला. त्यानंतर महाराजांनी मदुरेपर्यंत जाऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
🚩व्यंकोजीचा प्रश्न 🚩
व्यंकोजीला आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याची शिवाजी महाराजांची इच्छा होती. परंतु महाराज कर्नाटक मोहिमेवर निघाल्यापासून व्यंकोजीला त्यांच्या हेतूविषयी शंका वाटत होती. मोहिमेत ज्यावेळी तंजावरपासून नऊ मैल अंतरावर कावेरीच्या काठी महाराजांचा मुक्काम होता, तेव्हा त्यांनी व्यंकोजीला मुद्दाम भेटीसाठी बोलावले. महाराजांच्या मुक्कामापासून तंजावर छत्रपती शिवाजी महाराज केवळ ८-९ मैल दूर होते. तेव्हा आपल्या राजधानीपासून सुरक्षित अंतर असलेल्या महाराजांच्या तळापर्यंत जाणे व्यंकोजीला अवघड नव्हते. व्यंकोजीने शिवाजी महाराजांची भेट घेतली. महाराजांनी त्याच्याशी दिलखुलासपणे बातचीत केली. शहाजीच्या कर्नाटक जहागिरीतील वाटाही मागितला. त्यापूर्वीही वकीलामार्फत व्यंकोजीशी महाराजांचे बोलणे झाले होते. ही सर्व बोलणी सामोपचारपद्धतीने झाली होती. बोलणी चालू असताना अचानकपणे महाराजांना न सांगताच व्यंकोजी पळून गेला, याचे फारच दु:ख महाराजांना झाले.
'व्यंकोजीला पकडण्याचा किंवा त्याची बिरूदे हिसकावून घेण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असे असताना न सांगता व्यंकोजी राजे का पळाले?"म्हणून महाराज व्यथित होऊन बोलले ,‘उगी उठून पळून गेले. अति धाकटे ते धाकटे, बुद्धीही धाकटेपणास योग्य केली.'
व्यंकोजी पळून गेल्याचे दु:ख शिवाजी महाराजांना अतोनात झाले. परंतु स्वतः व्यंकोजीने मात्र मराठ्यांविरुद्ध लढा देण्याची तयारी केली. कावेरीच्या परिसरात संताजी भोसले याचे लष्कर होते. त्याच्यावर १५ नोव्हेंबर १६७७ रोजी व्यंकोजीने हल्ला केला आणि त्याला पळवून लावले. संताजी त्यावेळी बेसावध होता. यशस्वी माघार घेतल्यानंतर त्याने पुन्हा तयारी केली आणि वलीगंडपूर येथे झालेल्या लढाईत व्यंकोजीचा पराभव केला. अशाप्रकारे व्यंकोजीचा पराभव झालेला असला तरी शिवाजी महाराजांना त्याचेबद्दल माया वाटत होती आणि म्हणून एक सविस्तर पत्र लिहून शिवाजीने व्यंकोजीला लिहिले, ‘दुर्योधनासारखी बुद्धी करून, तुम्ही युद्ध केले...... झाले ते झाले आता हट्ट न करणे' दरम्यान मराठ्यांनी व्यंकोजीची अनेक ठाणी जिंकून घेतली. शेवटी व्यंकोजीने रघुनाथपंत हणमंते याचेमार्फत शिवाजी महाराजां बरोबर तह केला.
ऐन पावसाळ्यातही शिवाजीची कर्नाटक मोहिम चालू होती. जुलै १६७७च्या सुमारास शिवाजी महाराज तिरूमलवाडीतून वृद्धाचलम् या मार्गाने पटनोव्हा या ठिकाणी आले. ते स्थळ काबीज करून दक्षिण अर्कटवर महाराजांनी प्रभुत्व संपादन केले. पावसाळा संपल्यावर म्हणजे ऑक्टोबर १६७७ मध्ये आरणी, होसकोट, शीरे, बाळापूर इत्यादी पश्चिम-दक्षिण जोडणारी स्थळे
ताब्यात घेऊन नोव्हेंबर १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहिमेची सांगता केली.
जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था ।
शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे एक खास वैशिष्ट्य दिसून येते. जो प्रदेश जिकला आहे किंवा जे किल्ले जिंकले आहे त्यांची उत्तम व्यवस्था लाऊन दिल्याशिवाय शिवाजी महाराज पुढे जात नसत. कर्नाटक मोहिमेवर असताना जो प्रदेश आपल्या ताब्यात आला त्याची चोख व्यवस्था लावण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी प्रथम केले.
संताजी भोसले याला कर्नाटकात जिंकलेल्या प्रदेशावर सुभेदार म्हणून नेमले आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी रघुनाथपंत हणमंते यांची निवड केली. जिंजी किल्ला जिंकताना काही बुरूज कोसळले होते, तटांना खिंडारे पडली होती, परंतु महाराजांनी कारागिर लावून किल्ल्याची उत्तम डागडुजी केली. एवढेच नव्हे तर पहिल्यापेक्षा किल्ला अधिक भक्कम केला. ‘अनेक, नवे भुईकोट व डोंगरी किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले. केवळ किल्ल्यांची डागडुजी आणि प्रशासन व्यवस्था एवढ्या कार्यावरच महाराज संतुष्ट राहत नसत. रयतेचा किंवा सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या अधिका-यांना, सैनिकांना ते सूचना देत असत, निष्पाप लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घेण्यास सांगत.
जानेवारी १६७८ मध्ये म्हैसूरमार्गे महाराष्ट्राकडे परत येताना बेळगाव जिल्ह्यात महाराजांनी प्रवेश केला. तेथून संपगावमार्गे पुढे जात असताना बेलवाडी येथील सावित्रीबाई देसाई हिने शिवाजी महाराजां विरूद्ध युद्ध पुकारले. ही देसाई स्त्री एवढी पराक्रमी होती की बेलवाडीचा छोटासा किल्ला तिने २७ दिवस लढविला. शेवटी शिवाजी महाराजां पुढे तिला माघार घ्यावी लागली.महाराजांनी या देसाई स्त्रीचे मोठे कौतुक केले. एप्रिल १६७८ मध्ये शिवाजी महाराज पन्हाळगडावर
आले आणि तेथून मे महिन्यात रायगडावर गेले. अशाप्रकारे शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम जवळजवळ दीड वर्षे सुरू होती असे म्हणावे लागेल. ही मोहीम यशस्वी झाल्याने शिवाजी महाराजांचा दरारा दक्षिणेत सर्वदूर निर्माण झाला. पाश्चात्य वखारवाले अधिक सावध झाले. राज्याभिषेकानंतर दक्षिण हिंदुस्थानात मोठा विस्तार करून शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची इमारत पक्की केली.
🚩संभाजी महाराज मुघलांना मिळाले🚩
कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना संगमेश्वरास पाठविले होते. महाराज स्वारीहून परत येईपर्यंत ते संगमेश्वरलाच राहिले होते. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर निघण्यापूर्वीच दोघांमध्ये वितुष्ट आले असावे असे वाटते. युवराज संभाजी महाराजांवर शिवाजी महाराजांचा विश्वासहीं होता कारण कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी इंग्रज सरवखारवाल्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी महाराजांनी संभाजी महाराजांवर सोपविली होती. साधारणपणे असे दिसून येते की, कर्नाटक मोहिम आटोपून शिवाजी महाराज स्वराज्यात परत आले आणि तेव्हापासून त्यांचे मन संभाजीमहाराजां विषयी कलुषीत झाले. रायगडावर असताना प्रधानांचे आणि संभाजी महाराजांचे काही कारणामुळे बिनसले होते. कदाचित कर्नाटक मोहिमेवरून परत आल्यावर प्रधानांनी आणि इतर अधिका-यांनी महाराजांजवळ संभाजी महाराजांविषयी कागाळ्या केल्या असाव्यात. अर्थात अशा कागळ्यांमुळे गैरसमज करून घेण्याचा शिवाजी महाराजांचा स्वभाव नव्हता. स्वत: संभाजीमहाराजांच्याही काही तक्रारी होत्या. परंतु या तक्रारींना विशेष महत्त्व शिवाजी महाराजांनी दिले नाही. थोडक्यात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले होते, हे मात्र निश्चित.
कर्नाटक मोहिमेहून परत आल्यावर महाराजांनी संभाजीमहाराजांना सज्जनगडाकडे पाठविले तेथे समर्थ रामदासांच्या सहवासात संभाजीमहाराजांची चित्तवृत्ती शांत होईल असा शिवाजी महाराजांचा कयास असावा. परंतु संभाजीमहाराज जेव्हा सज्जनगडाकडे गेले तेव्हा समर्थ रामदास तेथे नव्हतेच. अगोदरच उद्दिग्न झालेल्या संभाजीमहाराजांचे सज्जनगडावर मन रमेना. संभाजीमहाराजांच्या या मन:स्थितीचा अंदाज मुघलसरदार दिलेरखान याला आला होता आणि म्हणून आपले हस्तक संभाजीमहाराजांकडे पाठवून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न दिलेरखानने चालू केला.
शिवाजी महाराज आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा समज झाल्यामुळे संभाजीमहाराजांनी मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिम आटोपून १६७८ च्या पावसाळ्यापूर्वी स्वराज्यात आले. संभाजीमहाराज १६७९च्या प्रारंभी केव्हातरी मुघलांना जाऊन मिळाले. संभाजीमहाराज आपल्याकडे आल्यानंतर दिलेरखानाला विलक्षण आनंद झाला. त्याने ताबडतोब मराठ्यांविरुद्ध मोहिम उघडण्याचा निर्णय घेतला. पण याच वेळेला मुघल आणि आदिलशहा यांच्यातही संघर्ष चालू होता. तरीपण आदिलशाहीविरूद्ध मोहीम चालू असताना मराठ्यांना डिवचण्यासाठी दिलेरखानाने १७ एप्रिल १६७९ रोजी भूपाळगड किल्ल्याला वेढा दिला. यावेळी भूपाळगडावर फिरंगोजी नरसाळा हा किल्लेदार होता. याच किल्लेदाराने चाकणचा किल्ला मोठ्या हिकमतीने लढवून शायिस्तेखानास जेरीस आणले होते. परंतु यावेळी दिलेरखान संभाजीमहाराजांना बरोबर घेऊन आल्यामुळे त्याने किल्ला खानाच्या स्वाधीन केला. भूपाळगड ताब्यात आल्यानंतर दिलेरखानाने आदिलशाहीविरूद्ध चाललेली मोहिम अधिक तीव्र केली. मंगळवेढा वगैरे प्रदेश जिंकून घेऊन ऑक्टोबर १६७९ पर्यंत दिलेरखानाने थेट विजापूरपर्यंत धडक मारली. या सर्व मोहिमेत संभाजीमहाराज दिलेरखानाबरोबर होते अथणी शहर लुटण्यामध्ये दिलेरखानास संभाजीमहाराजांनी मदत केली. या सर्व वार्ता शिवाजी महाराजांस समजत होत्या. संभाजीमहाराज आपणास सोडून गेले याचे त्यांना विलक्षण दु:ख झाले होते. परंतु संभाजीमहाराजांच्या मानी स्वभावास मुघलांची चाकरी परवडणार नाही याची महाराजांना पूर्ण खात्री होती. काही दिवसांनी दिलेरखानाचे उत्तान वागणे संभाजीमहाराजांना पटेनासे झाले.दिलेरखान आणि संभाजीमहाराज यांच्यात झगडा झाला. याच काळात औरंगजेबाने संभाजीमहाराजांना कैद करण्याचाही घाट घातला होता. मुघलांच्या या राजकारणात संभाजीमहाराज पूर्णपणे विटले. शिवाजी महाराजांनी काही माणसे संभाजीमहाराजांच्या मागावर ठेवलेली होती. गुपचूपपणे संभाजीमहाराजांना ती भेटतही होती. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होती.अथणीजवळ छावणी असताना एके दिवशी संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या माणसांबरोबर गुपचूपपणे दिलेरखानास सोडून बाहेर पडले आणि पन्हाळ्यास परत आले. त्यांना भेटण्यासाठी शिवाजी राजे पुरंदरहून पन्हाळ्यास आले. १३ जानेवारी १६८० रोजी पिता-पुत्रांची भेट झाली. शिवाजी महाराजांनी पूर्वीप्रमाणे पाश्चात्य वखारवाल्यांशी बोलणी करण्याचा संभाजीमहाराजांना अधिकार दिला.
🚩मुघलांविरूद्ध आघाडी🚩
कर्नाटकाची मोहीम हाती घेण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी ‘दक्षिण देश दक्षिणेतील सत्ताधिशांच्याच स्वाधीन राहिला पाहिजे' असे धोरण निश्चित केले होते. “दक्षिण्यांची दक्षिण' हे त्यांच्या नव्या राजकारणाचे सूत्र होते. त्या अनुषंगाने मुघलांविरूद्ध कुतुबशहा आणि आदिलशहा यांना मदत करण्याचे धोरण महाराजांनी स्विकारले होते. संभाजी राजे मध्यंतरी मुघलांना जाऊन मिळाल्यामुळे विलक्षण पेच महाराजांपुढे निर्माण झाला होता. परंतु संभाजीमहाराज मुघलांकडे फार काळ राहू शकले नाही. ते परत येताच शिवाजी महाराजांनी मुघलांविरूद्ध नवी आघाडी उभारली. आदिलशहाला मदत करण्यासाठी थेट विजापूरपर्यंत जाऊन मुघली फौजांची दाणादाण उडवली. त्यानंतर मराठवाड्यात थेट जालन्यापर्यंत जाऊन तेथील पेठ लुटली. आणि मुघलांमध्ये दहशत निर्माण केली. याच काळात शिवाजीमहाराजांच्या आज्ञेप्रमाणे मोरोपंत पेशव्याने खानदेशात शिरून धरणगाव, चोपडा ही शहरे लुटली. मलकापूर पर्यंतचा प्रदेश काबीज करून बागलाणामध्ये मुघलांचा पुरता बिमोड केला. अहिवंतसारखे किल्ले जिंकून घेतले आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या या प्रदेशावर हुकूमत निर्माण केली. या नव्या मोहिमेमुळे दिलेरखान मोठ्या पेचात सापडला होता. कारण मराठ्यांनी त्याची रसद तोडून पूर्ण नाकेबंदी केलेली होती. औरंगजेबाच्या आदेशानुसार
रणमस्तखान हा सरदार मोठी फौज घेऊन दिलेरखानाच्या मदतीसाठी निघाला होता. परंतु वाटेतच मराठ्यांनी रणमस्तखानास गाठले आणि त्याच्या फौजेवर असा काही चौफेर हल्ला केली की त्यामुळे त्याला औरंगाबादकडे पळून जावे लागले अशाप्रकारे मुघलांच्या पदरात नामुष्की आली. शेवटी मुघलांनी आदिलशाहीविरूद्ध मोहिम थांबविली आणि फेब्रुवारी १६८० मध्ये विजापूरचा वेढा उठविला. मुघलांसारख्या जबरदस्त शत्रूचा बंदोबस्त केल्यानंतर शिवाजी महाराज रायगडकडे परतले. काही घरगुती मंगलकार्ये त्यांना उरकायची होती म्हणून राजधानी रायगडवरच थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्याशी तर महाराजांचे सख्य झाले होते. १६८० च्या प्रारंभी क्रमांक एकचा शत्रू मुघल नामोहरम झाला होता आणि १६८० च्या प्रारंभापर्यंत पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्त्य वखारवाले यांनाही शिवाजी महाराजांनी आपल्या वर्चस्वाखाली आणले होते.
समाप्त....
🚩जय जिजाऊ ,जय शिवराय, जय शंभूराजे🚩

कर्नाटक स्वारी : भाग ४

 


कर्नाटक स्वारी : भाग ४
दक्षिणेचे राजकारण करताना शिवाजी महाराजांनी कुतुबशहाशी मित्रत्वाचे संबंध राखले होते. विजापूर दरबाराची सूत्रे हाती आल्यावर बहलोलखानाने आक्रमक धोरण स्वीकारले. कुतुबशहाच्या प्रदेशात धुडगूस घालण्यासाठी पठाणांची तुकडी पाठविली. चंदीचंदावरकडे कुतुबशाही प्रदेशात पठाणांनी बंडखोरी सुरू केली होती तेव्हा दक्षिणेत आदिलशाहीबरोबर कुतुबशाहीलाही पठाणांच्या घुसखोरीचा धोका निर्माण झाला होता. अर्थात हा धोका शिवाजी महाराजांच्या स्वराज्यालाही निर्माण झाला होता. हा धोका नाहीसा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी एका नव्या राजकीय सूत्राची मांडणी केली. ते सूत्र म्हणजे दक्षिण देश दक्षिण्यांच्याच स्वामित्वाखाली असला पाहिजे. 'दक्षिण्यांची दक्षिण' हे सूत्र त्यांनी आपल्या भावी राजकारणासाठी निश्चित केले. 'दक्षिण पातशाही तो राखली पाहिजे' हे शिवाजी महाराजांच्या मुघलविषयक धोरणाचे आता मुख्य सुत्र झाले होते. मार्च १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपड्यास जे पत्र लिहिले त्या पत्रात या सूत्राचे स्पष्टीकरण महाराजांनी केलेले आहे. ‘दक्षणचे पादशाहीस पठाण जाला, ही गोष्ट बरी नव्हे! ...आपली पातशाही जितकी वाढवू ये तितकी वाढवणे, पठाणांची नेस्तनाबूद करणे; दक्षणची पादशाही आम्हा दक्षणियांच्या हाती आहे ते करावे.
शिवाजी महाराजांचे नेमके धोरण या पत्रावरून स्पष्ट होते आणि या धोरणाला अनुसरून मार्च १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी गोवळकोंड्यास जाऊन कुतुबशहाची भेट घेतली. प्रत्यक्ष भेटीमध्ये दक्षिण भागात पठाणांचा धोका कसा निर्माण झाला आहे याची जाणीव महाराजांनी कुतुबशहास आणि मादण्णा प्रधानास करून दिली. त्यानंतर कर्नाटक मोहिमेची कडेकोट तयारी करण्याचे त्यांनी ठरविले. तंजावरचा राजा व्यंकोजी भोसले हा आपला सावत्र भाऊ असून शक्य झाल्यास त्यालाही स्वराज्यकार्यात ओढून घ्यावयाचे; शक्य न झाल्यास आपल्या पित्याच्या कर्नाटकातील जहागिरीचा वाटा त्याच्याकडे मागावयाचा म्हणजे काहीतरी युक्तीप्रयुक्ती होऊन व्यंकोजीला आपल्याकडे वळवायचे असाही एक हेतु शिवाजी महाराजांनी मनात बाळगला होता. ।
कर्नाटकसारख्या दूरवरच्या प्रदेशात मोहीम काढावयाची असल्यामुळे समर्थ शत्रूना काहीकाळ तरी स्वस्थ बसवावे म्हणजे त्यांच्याकडून आक्रमण होणार नाही असा दूरगामी विचार शिवाजी महाराजांनी केला. विशेषतः मुघलांचा धोका उद्भवण्याची अधिक शक्यता होती. म्हणून डिसेंबर १६७६ मध्ये शिवाजी महाराजांनी मुघल सरदार बहादूरखान याचेबरोबर सलोख्याचा तह केला.
कर्नाटक मोहीम प्रदिर्घ काळ चालणार असल्यामुळे स्वराज्याची कडेकोट व्यवस्था महाराजांनी लावली. मोरोपंत पेशवे, अण्णाजी दत्तो, दत्ताजी त्रिंबक आणि युवराज संभाजी महाराज यांच्यावर स्वराज्यामध्ये सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोपविली. अशी सर्व तयारी झाल्यानंतर बिनीचे सरदार, खास अश्वदल, प्रभावी पायदळ बरोबर घेऊन इ. स. १६७७च्या प्रारंभी महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली.
क्रमशः ....!!!

Monday, 29 March 2021

कर्नाटक स्वारी : भाग ३



कर्नाटक स्वारी : भाग ३
या विजयानंतर लगेच जुलै १६७६ मध्ये बहलोलखानाने शिवाजी महाराजांशी तह केला. या तहाप्रमाणे शिवाजी महाराजांचे राज्य आणि आदिलशाही राज्य यांची सीमा कृष्णा नदीपर्यंत निश्चित केली. कृष्णा नदीच्या उत्तरेकडील मुलूख शिवाजी महाराजांना मिळाला. अशाप्रकारे शिवाजी महाराज आणि आदिलशाही यांच्यामध्ये सख्य निर्माण झाले.आता कुतूबशहाशी सख्य जोडून संपूर्ण दक्षिण देश मुघली वर्चस्वातून मुक्त करण्याचा शिवाजी महाराजांनी निर्धार केला.
🚩कर्नाटक स्वारीची तयारी🚩
आपल्या स्वराज्याचा विस्तार कर्नाटकापर्यंत करावा अशी महत्त्वाकांक्षा शिवाजी महाराज बाळगून होते. पूर्वी समुद्रमार्गे त्यांनी बसनूरपर्यंत स्वारी केली होती. त्यांच्या उत्तेजनामुळे मराठ्यांनी कारवारपर्यंत धडक मारली होती. महाराजांचे पिताजी शहाजी राजे यांची बंगलोर ही जहागिरी होती. त्यांच्या पश्चात महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे बंगलोरच्या जहागिरीचा मालक होता. त्यांनी तंजावरपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणून आपले मुख्य ठाणे तंजावर हेच केले. व्यंकोजी राजे विजापूरच्या आदिलशहाशी एकनिष्ठ असल्याचे भासवत होते. शिवाजी महाराजांना आपल्या सावत्र भावाचा पराक्रम माहित होता. त्याला स्वराज्यकार्यात सामील करून घेतले तर संपूर्ण दक्षिण भागात स्वराज्याचा विस्तार होईल आणि मुघल किंवा आदिलशहा नामोहरम होतील अशी महाराजांची अपेक्षा होती.
मुघल हे पहिल्या क्रमांकाचे शत्रू आहेत याची खूणगाठ महाराजांनी मनाशी बांधली होती. म्हणून बहादूरखानाविरुद्ध विजापूरचा सरदार बहलोलखान याला महाराजांनी मदत केली होती. बहलोलखानाने वरकरणी मराठ्यांशी सलोखा जरी जोडलेला होता, तरी विजापूरच्या दरबारात पठाणांचे वर्चस्व वाढविण्यास त्याने सुरुवात केली. अनेक पठाण सरदार बहलोलखानाच्या प्रेरणेने आदिलशाहीत दाखल झाले. त्यामुळे विजापूरदरबारात पठाणांचे वर्चस्व वाढू लागले. आदिलशहा काय किंवा कुतुबशहा काय यांच्या राजवटी पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून दक्षिण भारतामध्ये होत्या आणि या राजवटीत दख्खनी लोकांचाच वर्षानुवर्षे प्रभाव होता. परंतु जानेवारी १६७५ मध्ये जी रक्तरंजित क्रांती विजापुर दरबारामध्ये झाली, तेव्हापासून पठाणांचा भरणा आदिलशाहीच्या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला. विजापुर दरबारातील पठाणांचे वाढते वर्चस्व शिवाजी महाराजांना धोक्याचे वाटत होते. कुतुबशहाच्या दरबारात पठाणांचे वर्चस्व नव्हते. कुतुबशहाच्या वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशात दख्खनी मुसलमान आणि हिंदू अधिकारी यांचे वर्चस्व होते. प्रत्यक्ष कुतुबशहाच्या दरबारात हिंदूंनाही मानाच्या जागा दिल्या जात होत्या, मादण्णा आणि अकण्णा नावाचे दोन हिंदू मुत्सद्दी कुतुबशहाचे दोन प्रमुख सल्लागार होते.

क्रमशः ......!!

कर्नाटक स्वारी : भाग 2


 कर्नाटक स्वारी : भाग 2

हा वेढा चालू असताना शिवाजी महाराजांनी एक पथक कनटिक प्रदेशात आक्रमण करण्यासाठी पाठविले. त्यामुळे दोन आघाड्यांवर तोंड देण्याची पाळी आदिलशहावर आली, फोंड्याचा किल्ला दुर्गम असल्यामुळे आणि किल्ल्याचा खंदक पार करण्यास अवघड असल्यामुळे फोंड्याचा वेढा प्रदीर्घ काळ चालू ठेवावा लागला. खंदक भरून काढण्यात आला. किल्ल्याच्या तटावर चढण्यासाठी ५५०० शिड्या तयार करण्यात आल्या. अशी तयारी पूर्ण झाल्यानंतर १७ एप्रिल १६७५ रोजी किल्ल्याच्या तटबंदीला सुरुंग लावून शिवाजी महाराजांनी फोंडा जिकला. हा महत्त्वाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर कुठलीही विश्रांती न घेता शिवाजी महाराजांनी कर्नाटकात घोडदौड सुरू केली व केवळ १५ दिवसात अंकोला, शिवेश्वर इत्यादी किल्ले जिंकून घेतले.
बहलोल विरुद्ध बहादूर।
औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी बहादूरखानला दक्षिणेत पाठविले तसेच शिवाजी महाराजांना धडा शिकविण्याची प्रतिज्ञा करून विजापुरी सरदार बहलोलखान याने कोल्हापूर भागात मराठ्यांची नाकेबंदी सुरू केली. बहादूरखानाने बहलोलखानाची मदत घेऊन शिवाजी महाराजां विरुद्ध आक्रमण करावे अशी औरंगजेबाची इच्छा होती. दरम्यान जानेवारी १६७५ मध्ये विजापूर दरबारात एक रक्तरंजित क्रांती घडली. बहलोलखानाने खवासखानाला ठार मारून विजापूर दरबारची राजकीय सूत्रे आपल्या हाती घेतली. बहादूरखानाने पूर्वी शिवाजी महाराजां विरुद्ध हालचाली करण्यासाठी औरंगजेबाच्या आदेशाप्रमाणे खवासखानाशी सख्य जोडले होते त्यामुळे या दोघात मैत्रीची भावना निर्माण झाली होती. परंतु बहलोलखानाने खवासखानाला ठार मारल्याबरोबर बहादूर खानाला त्याच्याविषयी चीड निर्माण झाली. दोघांमधील वैमनस्य वाढत चालले. याचा परिणाम असा झाला की बहलोलखानाने बहादूरखानाविरुद्ध शिवाजी
महाराजांकडे मदत मागितली. शिवाजी महाराजांच्या दृष्टीने मुघलसत्ता ही पहिल्या क्रमांकाची शत्रू असून आदिलशाही आणि कुतूबशाही या शाही राजवटी दक्षिणेतील असल्यामुळे त्यांच्याशी सख्य जोडणे अधिक सोयीचे होते. म्हणून बहलोलखानाचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला. मराठ्यांची मदत घेऊन जून १६७६ मध्ये बहलोलखानाने बहादूरखानाचा पराभव केला.
क्रमशः .....!!!

कर्नाटक स्वारी : भाग १🚩

 कर्नाटक स्वारी : भाग १

६ जून १६७४ रोजी छत्रपती शि

वाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र सार्वभौम राजे झाले.महाराजांच्या या कृतीचा मुघलांना राग येणे स्वाभाविक होते. औरंगजेब तर अतिशय प्रक्षुब्ध झाला. दक्षिणेत असलेल्या आपल्या सरदाराला - बहादूरखानला छत्रपती शिवाजी महाराजां विरुद्ध आक्रमक धोरण अंगिकारण्याचा त्याने इशारा दिला. बहादूरखान पेडगाव येथे छावणी करून राहिलेला होता. तो स्वतः ऐषारामी वृत्तीचा असल्यामुळे शिवाजी महाराजां विरुद्ध मोहिम काढण्यामध्ये दिरंगाई करीत होता. औरंगजेबाकडून निर्वाणीचा इशारा मिळाल्यानंतर बहादूरखानाने आक्रमणाची जय्यत तयारी सुरू केली. परंतु ऐन पावसाळ्यात म्हणजे जुलै १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी अश्वदलाचे एक पथक पाठवून बहादूरखानाची छावणी लुटली. त्या लुटीमध्ये सुमारे १ कोटीचा खजिना मराठ्यांच्या हाती आला. या लुटीच्या प्रकारामुळे बहादूरखान चांगलाच हबकला. दरम्यान मराठ्यांनी खानदेशपर्यंत स्वारी करून धरणगाव लुटले आणि मराठ्यांचे हे पथक थेट बहाणपूरपर्यंत गेले. अशा प्रकारची दहशत मुधली प्रदेशात निर्माण होत असताना शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सुभेदाराकडे खंडणीची मागणी केली. दुस-या बाजूने शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी रामनगरपर्यंत मजल मारली आणि वसईच्या पोर्तुगिजांकडे चौथाईची मागणी केली. थोडक्यात राज्याभिषेकाचा सोहळा संपतो न संपतो तोच मराठ्यांनी मुघलांच्या प्रदेशात चांगलीच दहशत निर्माण केली.
फोंड्याची लढाई ...!!
औरंगजेबाच्या चिथावणीमुळे आदिलशाही दरबारातील सरदारही शिवाजी महाराजां विरुद्ध लहानमोठ्या कारवाया करीतच होते. फोड्याच्या सुभेदाराने शिवाजी महाराजांच्या राज्यातील एका व्यापा-याला पकडले आणि विनाकारण मराठ्यांना डिवचले. शिवाजी महाराजांनी आपला विश्वासू सरदार दत्ताजी पंडित यांना दोन हजार अश्वदळ देऊन फोंड्याकडे पाठविले.
दत्ताजी पंडित फोंड्यापर्यंत जाऊन पोहोचता न पोहोचता तोच खुद्द शिवाजी महाराज वायुगतीने निवडक सैन्यदल घेऊन फोंड्यापर्यत आले आणि त्यांनी फोंड्याला वेढा घातला.
क्रमशः ....!!!

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...