विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label सरसेनापती संताजी घोरपडे. Show all posts
Showing posts with label सरसेनापती संताजी घोरपडे. Show all posts

Wednesday, 4 February 2026

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

 


संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दाखवून शत्रूच्या रुधीराचा अभिषेक आपल्या मातृभूमीला केला, त्या संताजींना आज भूमिगत होऊन वावरावे लागत आहे. तरी आपल्या ब्रिदाला कलंक लागू दिला नाही. आज त्यांच्या मागावर परकीय व स्वकीयही होते.

नागोजी माने जळभावी घाट ओलांडून पूर्वेला उतरला आणि कारखेल गावातून संताजींबद्दल विचारपूस करू लागला. पण गावकऱ्यांनी त्याला दाद दिली नाही. मग पर्यंती गावाजवळील डोंगरावर चढला. त्याच्याबरोबर सात-आठ माणसे होती. संपूर्ण डोंगर चिक्कार वृक्षांनी व्यापला होता. मोक्याची जागा पाहून प्राण डोळ्यात आणून सावज टिपण्यासाठी बसला.

कारखेलच्या परिसरात पर्यंती गावाजवळ एक जलौघ खळखळ वाहत होता. नागोजीने विचार केला, संताजी जंगलात कुठेही असला तरी, पाण्यासाठी ओढ्यावर त्याला यावंच लागेल. नागोजीने पूर्ण रात्र जीव मुठीत घेऊन काढली. दुसरा दिवस उजाडला. बाजूच्या झाडीतून सळसळ ऐकू आली, तसा नागोजी माने सावध होऊन कान टवकारले. एक मानवाकृती दबकत दबकत कानोसा घेत पुढे पुढे जात होती. तसा नागोजीही आकृतीच्या मागे अंतर ठेवून सावधतेने जाऊ लागला.

ती मानवाकृती ओढ्याच्या काठावर आली. इकडे तिकडे पाहत कपडे काढले. नागोजीने ओळखले, ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपली शिकार संताजी घोरपडेच आहे.

संताजींनी मेरु स्वामींचा अनुग्रह घेतल्यापासून सूर्योदयाची अंघोळ कधी चुकवली नव्हती. एवढे संकटे, एवढा वनवास पदरी आलात तरी मेरु स्वामींच्या महामंत्रानेच आपल्याला आधार दिला ही त्यांची पक्की धारणा होती. संताजी पाण्यात उतरले. त्याचवेळी नागोजी माने ओढ्या काठी येऊन लपून बसला. आंघोळ झाल्यावर संताजी नेहमीप्रमाणे ओंजळीत पाणी घेऊन सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पूर्वाभिमुख उभे राहिले. ओठातून आपोआप मंत्राचे शब्द उमटले.... ॐ नमो... संताजी देहभान विसरले. मंत्राचे शब्द आपोआप ओठातून बाहेर पडत होते. संताजी बाह्य जगाचे भान विसरले. आणि हीच संधी साधून नागोजी माने पुढे झाला आणि संताजीच्या मानेवर तलवारीचा प्रहार केला. पाण्यात उष्ण रक्ताची धार मिसळली. आत्मा परमात्मात विलिन झाला.

लाख वेळा तलवारीच्या वारांना सामोरी गेलेली पहाडी छाती शेवटपर्यंत अभंगच राहिली. "लढून मरावं, मरून जगावं" ही वडिल म्हाळोजींची शिकवण! संताजी आयुष्यभर लढले आणि परमेश्वराची आराधना करत या शूरवीराचा आत्मा परमात्म्यात विलीन झाला... कायमचा...

संताजीच्या हत्येचा वृत्तांत जिंजी दरबारात कळला मात्र! महाराणी ताराबाईंचा कंठ्ठ दाटून आला. महाराजांनी संताजींना एकाकी पाडले नसते तर हा मराठ्यांचा मोहरा असा स्वकीयांनीच लयाला धाडला नसता.

सदरेवर छत्रपती महाराज सुन्न मनाने एकटक महाद्वाराकडे पाहत होते. महाराजांचं मन व्याकूळ झाले. त्यांना खरं काय ते कळून चुकलं. संताजी मोगलांना फितूर झाला नव्हता. तसे असते तर बादशहाने नागोजीला हाताशी धरून खुन करायला लावलेच नसते. बादशहाला नागोजी सारख्यांची गरज नव्हती. त्याला शूर सरदार हवे होते. संताजी त्याला मिळाले असते तर, औरंगजेबाने दख्खनची सुभेदारी नक्की बहाल केली असती आणि त्याने तसे प्रयत्नही केले होते. पण संताजी लोभाला बळी पडले नव्हते.

संताजींनी एवढी लूट केली की ते आपली कोठारे भरू शकला असते. पण जे काही मिळाले ते त्यांनी रायगड, पन्हाळा, जिंजीच्या सरकारी खजिन्यात जमा करून, स्वराज्य उभारणीस हातभार लावला. संताजीने तन मन धन खर्च करुन अपूर्व मराठेशाही रुजवली, जगवली. एवढेच नाही तर, आणीबाणीच्या वेळेस छत्रपतींना परांगदा होण्याची वेळ आली तेव्हा, त्यांनी आपली समशेर पाजळून स्वराज्याचे रक्षण केले. राजाराम महाराजांचा कंठ दाटून आला. डोळे अश्रूंनी भरले. त्यांना आपली चूक उमगली.. पण वेळ निघून गेली होती.

कारखेलच्या घाटात संताजीचा वध केल्यावर काही अंतरापर्यंत नागोजीने त्यांच धड आणून तेथेच टाकले आणि त्या शूरवीराचे शिर बादशहाला नजर करण्यासाठी मोठ्या दिमाखात मिरवत घेऊन गेला.

देशाभिमानी मराठ मावळ्यांना संताजींच्या हत्येची खबर मिळताच त्यांनी कारखेलचे जंगल धुंडाळून संताजी घोरपडेंचं धड शोधून कुरुंदवाडला आणले आणि कृष्णा-पंचगंगेच्या पवित्र संगमावर संताजींच्या पार्थिवावर विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले.

तिकडे बादशहाच्या छावणीत भाल्याच्या टोकावर संताजीचे शिर घेऊन धिंड निघत होती.

ज्यांच्या हयातीत नुसत्या धसक्याने त्यांच्या आजूबाजूलाही फिकायला कोणी धजावत नव्हते, तेच त्यांचे निस्तेज शिराची टिंगल टवाळी करू लागले. मानोजी माने, गाजीउद्दीन फिरोजजंग संताजीच्या हत्येचे श्रेय आपल्या पदरात घ्यायला बादशहाच्या दरबारात धडपडत होते. पण नियतीने ते कोणालाही लाभू दिले नव्हते.....

खरं म्हणजे नागोजीच्या तलवारीचा घाव पडायच्या आधीच मेरु स्वामींनी दिलेला महामंत्र आळवीत परमात्म्याशी एकरूप झाले होते.

अशा या महान कर्तुत्वान पराक्रमी व शेवटी एकाकी पडल्यालेल्या वीराला कोटी कोटी प्रणाम!!

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!


स मा प्त

Wednesday, 13 September 2023

सरसेनापती संताजी घोरपडे

 





















सरसेनापती संताजी घोरपडे
. सरसेनापती संताजी घोरपडे घराणे हे छत्रपतींच्या भोसले घराण्याचे चुलत घराणे आहे .ही दोन्ही कुळे मूळची मेवाडच्या राजघराण्याशी संबंधित सिसोदिया राजपूत घराणी आहेत. त्यांचे पूर्वज कर्णसिंह व भीमसिंह हे बहामनी साम्राज्यात चाकरीस होते. त्यांच्यावर खेळणा किल्ला सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हा किल्ला अतिशय दुर्गम होता. तेव्हा या भोसले बंधूंनी घोरपडीचा वापर करून सैन्य गडावर पाठवले आणि किल्ला हस्तगत केला होता.मात्र दुर्दैवाने कर्णसिंहाला या युद्धात मरण पत्करावे लागले .पण हा पराक्रम पाहून बहामनी सुलतानाने भिमसिंहाला भीमसिंहाला "राजा घोरपडे बहाद्दूर " हा किताब देऊन मुधोळची जहागिरी दिली. त्यामुळे भोसलेंच्या या धाकट्या पातीचे आडनाव घोरपडे असे पडले.
इ.स.१६८९ ला मोगल सेनापती मुकर्रबखानाने कोकणातील संगमेश्वर येथे वेढा घालून छत्रपतीं संभाजीराजांना अटक केली त्यावेळी म्हाळोजी घोरपडे यांनी छत्रपतीं संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली. त्यामध्ये म्हाळोजी बाबांना अपयश आले .म्हाळोजीबाबांनी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
या म्हाळोजी घोरपडे याना तीन मुले. संताजी,बहिर्जी ,आणि धाकटे मालोजी.या भावांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांना सुखरूपपणे दक्षिणेत जिंजी किल्ल्यावर पोहोचवले होते.
या शौर्यामुळे खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे यांना "ममलकतमदार"
बहिर्जी घोरपडे यांना " हिंदुराव "
तर मालोजी घोरपडे यांना " अमीर- उल -उमराव " असे किताब देऊन गौरव केला.
संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी वाचवले व पुढे अठराव्या शतकात जवळपास संपूर्ण भारतभर आपला दरारा निर्माण केला. छत्रपती शिवाजीराजांनी कर्नाटकात स्वारी केली.त्यावेळी संताजी घोरपडे त्यांच्या बरोबर होते .पुढे कृष्णेच्या दक्षिणेकडील कर्नाटकाचा बहुतेक भाग संताजी घोरपडे यांनी जिंकल्यावर सोंडूर, गजेंद्रगडकर ,दत्तवाड ,कापशी , इत्यादी घोरपडे घराण्याच्या शाखा उत्पन्न झाल्या . गजेंद्रगडकर घोरपडे यांच्या पदरी कवायती फौज होती. त्यामुळे त्यांचा दरारा निजाम ,हैदरअली व इंग्रज यांच्यात होता.अनेकदा मराठा साम्राज्याचा आणि छत्रपती ंच्या वतीने बोलणी करण्यासाठी घोरपडे यांना पाठवले जायचे .
संताजी घोरपडे यांना छत्रपती राजाराम महाराजांनी १६९१ मध्ये सेनापती पद दिले .संताजींचे वास्तव्य नेहमीच शंभू महादेवाच्या डोंगरात असत. तेथूनच ते चारही दिशेत विजेसारखे चमकत राहिले.बादशहाने जिंकलेल्या विजापूर प्रांत संताजी घोरपडे यांनी लुटून फस्त केला. संताजी घोरपडे अत्यंत शूर व धाडसी होते ."बलाढ्य फौजा बाळगून आत्मविश्वासाने वावरणाऱ्या शत्रूच्या शूर सेनानीना आपल्या गनिमी युद्धतंत्राच्या विलक्षण कौशल्याने हमखास पेचात आणून दाती तृण धरावयास लावणारा सेनानी म्हणून दक्षिणेत संताजींची ख्याती होती " संताजी घोरपडे यांचे नाव ऐकताच मोगल सेनानींच्या उरात धडकी भरत असे. संताजींशी लढण्याचा प्रसंग आला तर भल्या भल्या सरदारांना कापरे भरत असे. संताजीराव घोरपडे हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते .छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली .त्याच काळातले संताजी घोरपडे व धनाजी जाधव या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घकाळ म्हणजे सतरा वर्षे औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी घोरपडे यांची प्रचंड दहशत होती .औरंगजेबाचा इतिहासकार खाफीखानाने संताजीच्या या महान विजयाची कहाणी लिहून ठेवली हे विशेष .अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले ते संताजी घोरपडे यांनी .
संताजी घोरपडे यांचे लष्करी डावपेच व हालचाली अतिशय काटेकोरपणे आखल्या जात. हाताखालच्या सैनिकांना त्यांचे आदेश बिनचूक आणि बिनबोभाट पार पाडावे लागत. सन १६८९ साली बादशहा औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांची वडू कोरेगावच्या छावणीत अमानुषपणे हत्या केली. त्याच छावणीत औरंगजेब बादशहा असताना काही मोजक्या लोकांना बरोबर घेऊन औरंगजेबाच्या छावणीवर संताजी घोरपडे यांनी यशस्वी छापा घातला व तंबूचे सोन्याचे कळस कापून ते पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुढे पेश केले.मराठ्यांच्या छत्रपतीची अमानुष हत्या झाल्याने सारी मराठी दौलत हादरून गेली असता , संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या छावणीवर घातलेला छापा मराठी सैन्याला एक नवसंजीवनी सारखा वाटला. या घटनेमुळे सार्यांच्या कामाला एक दिशा मिळाली. त्याचा पूर्ण अनुभव पुढील सतरा-अठरा वर्षे औरंगजेबाला घ्यावा लागला. मोगल बादशहाला मराठ्यांनी दे माय धरणी ठाय करून टाकले. त्याच्या मुळाशी संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाला दिलेले आव्हान होते.
संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेले व त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या मुशीतून तयार झालेले सेनानी होते.छत्रपती .निराशेच्या घोर अंधकारात हे स्वराज्याचाच विचार करत राहिले.या सर्व मंडळीत संताजी घोरपडे यांचे स्थान प्रथम दर्जाचे मानले पाहिजे. गनिमी काव्याच्या युद्धाचे आद्य धडे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतच मिळाले. लढाईच्या कामी शिस्तीचे महत्व असते,हा धडा त्यांनी याच काळात घेतला. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात संताजींची कडव्या लष्करी शिस्तीचे सेनानी म्हणून जी प्रतिमा उदयास आली तिचा उगम या तालमीत तयार झाला आहे. पुढचा इतिहास असे सांगतो की संताजी सारखा प्रति संताजी मराठ्यांना परत निर्माण करता आला नाही .पुढे औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत मराठी फौजा मोठ्या जिद्दीने व पराक्रमाने मोगलांशी गनिमी युद्ध करत राहिल्या.पण संताजी प्रमाणे एकामागून एक असे नेत्रदीपक विजय कोणाही मराठा सेनानीस कमवीता आले नाहीत. संताजीची महती यातच आहे. संताजी घोरपडे यांना छत्रपती राजाराम महाराज यांनी ममलकतदार ( स्वराज्य चा आधार) हा किताब दिला होता. संताजी घोरपडे यांना छ राजाराम महाराज यांनी कापशी, माध्याळ, बहादुर गड, गजेंद्रगड, सोंडुर, बेल्लारी, मुधोळ अशा अनेक गावांची जहागीर दिली होती.
जिंजी तंजावर पर्यंत पसरलेल्या कर्नाटकाचा विस्तिर्ण प्रदेश संताजी यांच्या कार्याचे खास क्षेत्र होते. मोहिमेत ठीक ठीकाणी मोगली सैन्याचा समाचार घेत विविध ठिकाणच्या चौथाईच्या खंडण्या वसूल करीत मराठ्यांचा हा सेनानी राजाराम महाराजांच्या दर्शनाला जात असत. संताजी मोगली फौजेचे हालचालींची व तिच्या सेनानीँच्या योजनांची बित्तंबातमी राखून असत .यावरून संताजी घोरपडे यांच्या शौर्याची कल्पना येते .छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले स्वराज्य पुढे अठराव्या शतकात आपल्या दरार्याने व अतुलनीय पराक्रमामुळे संताजी व धनाजी यांनी वाचवले .
'वाजल्या जरी कुठे टापा l
धुरळ्याच्या दिसती छाया ll
छावणीत गोंधळ व्हावा l
संताजी आया आया ll
एवढी संताजींची दहशत होती.औरंगजेबाला जर संताजींनी मारले असते तर पुढील शंभर वर्षाचा तरी भारत देशाचा इतिहास नक्कीच बदलला असता.
शेकडो लढाया गाजवणारा, अनेक नामांकित मोगल सरदारांना धुळीस मिळवणार्या संताजी घोरपडे यांचा पराभव होऊन असहाय्य अवस्थेत १८ जुन १६९७ रोजी अंत झाला. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या नंतर मालोजी आणि राणोजी या दोन मुले यांच्या सह बंधु बहिर्जी आणि हिंदूराव घोरपडे यांनी छ राजाराम महाराज, छ, ताराराणी यांच्या बरोबर स्वराज्याची सेवा केली. त्यांनतर घोरपडे घराणे शेवटपर्यंत कोल्हापूर छत्रपती घराण्याशी एकनिष्ठ राहिले.
🙏"अशा या महान सेनानीला मानाचा मुजरा"🙏
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...