विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label राजेभोसले वावीकर. Show all posts
Showing posts with label राजेभोसले वावीकर. Show all posts

Monday, 4 April 2022

श्रीमंत राजेभोसले वावीकर घराण्यातून दत्तक गेलेले स्वराज्याचे छत्रपती शाहू महाराज दुसरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची मुद्रा आणि अष्टप्रधान मंडळ.

 



श्रीमंत राजेभोसले वावीकर घराण्यातून दत्तक गेलेले स्वराज्याचे छत्रपती शाहू महाराज दुसरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची मुद्रा आणि अष्टप्रधान मंडळ.
अष्टप्रधान मंडळामध्ये आधी चतुरसिंग राजे भोसले वावीकर हे सेनापती होते. त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सेनापती म्हणून चतुर सिंग राजे भोसले वावीकर यांचे चिरंजीव बळवंतराव राजे भोसले वावीकर यांची नियुक्ती केली. त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे स्वराज्याची आणि छत्रपतींची सेवा केली.

सरलष्कर चतुरसिंग राजेभोसले सेनापती वावीकर

 


सरलष्कर चतुरसिंग राजेभोसले सेनापती वावीकर
(? - १५ ऑगस्ट १८१८). 
उत्तर पेशवाईतील एक तडफदार सेनानी. त्याचे घराणे मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातील. मालोजी राजे भोसले यांचा धाकटा भाऊ विठोजी राजे यांच्या वावी कर राजेभोसले यांच्या शाखेतील. यांचा मोठा भाऊ विठोजी राजे सातारच्या रामराजास १७७७ मध्ये दत्तक गेले. तेच पुढे छत्रपती शाहू दुसरे (कार. १७७७-९८) म्हणून प्रसिद्धीस आले. त्यामुळे चतुरसिंग राजे बालपणापासून राजकीय वातावरणात वाढले. दुसऱ्या बाजीरावच्या वेळी (कार. १७९५-१८१८) सातारच्या गादीची होत असलेली अवहेलना त्यांना सहन झाली नाही. त्यांच्या मते पेशव्यांकडून सत्ता काढून घेऊन छत्रपतींचे हात बळकट करावेत, असे होते.
पुढे चतुरसिंग राजे यांनी मराठी राज्याचा खरा स्वामी सातारचा राजा आहे, त्याने आपल्या हाती सर्व सत्ता घ्यावी, असा दावा मांडून तसेच सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन इंग्रजांशी मुकाबला करावा, म्हणून त्यांनी मराठी राज्याच्या एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हिंडून हा विचार प्रसृत केला; तथापि नागपूरकर भोसल्यांशिवाय त्यांना कोणीच फारसा प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांच्या मदतीने चतुर सिंग राजेंनी इंग्रजांशी असई व अशीरगड या ठिकाणी मातब्बर मुकाबला दिला; परंतु इंग्रजांनी त्याचा पाडाव करून त्यांना कैद केले (१८०९). या त्यांच्या उद्योगास काही इतिहासाकारांनी बंडखोरी असे म्हटले आहे.
ते अत्यंत धाडसी, स्वाभिमानी व पराक्रमी होते. १८०१ मध्ये सर्जेराव घाटग्याने त्यांना सरदारकी द्यावी, अशी शिफारस दुसऱ्या बाजीरावाकडे केली होती पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यांना दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे एकूण धोरण नापसंत होते, म्हणून त्यांनी पुणे सोडले. पुढे यशवंतराव होळकराने जेव्हा पुणे लुटले, तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांची मदत घेतली (१८००). ही गोष्ट त्यांस मानहानीकारक वाटली.
मराठी राज्याची विस्कटलेली घडी नीट बसावी व मराठा राजमंडळाचा उत्कर्ष व्हावा, म्हणून त्यांनी शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले आदी मातब्बर सरदारांच्या भेटी घेतल्या. त्यांची मदत मिळावी, म्हणून ते चंबळ, अजमीर, दिल्ली वगैरे भागांत फौजफाटा घेऊन गेले; तथापि याच वेळी यशवंतरावास वेडाचे झटके आल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ झाले. छत्रपती शाहू दुसरे यांच्या मृत्यूमुळे तर ते हताश झाले. पुढे काही वर्षे ते धार येथे राहिले आणि अखेर दुसरा बाजीराव तर्फे त्रंबकजी डेंगळे यानी फसवून त्यांना मालेगाव नजिक कैद केले आणि रायगडाच्या जवळ कांगोरी किल्ल्यावर ठेवले. सुमारे तेरा वर्षांचा तुरुंगवास सोसून ते तुरुंगातच (कांगोरी किल्ल्यावर) मरण पावले.

मराठा साम्राज्याचे छत्रपती श्री शाहूमहाराज(दुसरे) यांच्यासाठी छातीचा कोट करून लढणारी इमानी सरदार-शिलेदार मंडळी

 




मराठा साम्राज्याचे छत्रपती श्री शाहूमहाराज(दुसरे) यांच्यासाठी छातीचा कोट करून लढणारी इमानी सरदार-शिलेदार मंडळी
----------------------------------------------------------- 
मराठा साम्राज्याचे छत्रपती श्री शाहु महाराज(दुसरे) यांच्यावर नाना फडणवीसाने कपटाने चौक्या-पहारे बसविले होते.फडणवीसला श्रीमंत दौलतराव शिंदे यांनी कैदेत टाकल्यावर छत्रपतींना मोकळीक मिळाली व त्यांनी तातडीने सातारच्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील फडणवीसांच्या माणसांना कैदेत टाकून किल्ला व सातारा शहर आपल्या ताब्यात घेतले.
छत्रपतींनी सत्ता हाती घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या.आपले बंधु चतुरसिंगराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आपली सोयरे मंडळी व फौज गोळा करण्यास सुरुवात केली.चतुरसिंगराजेंच्या नेतृत्वाखाली अनेक इमानी सरदार-शिलेदार मंडळी फौजेत सामील झाली त्यातील काही मंडळींची यादी पुढे देत आहे.
1. बापूजीराव शिंदे कुडाळकर
2. गोविंदराव शिंदे कुडाळकर
3. पिराजीराव शिंदे मायणीकर
4. दुर्गोजीराव महाडिक
5. कुशाबा महाडिक
6. दारकोजीराव भोसले
7. येसबा भोसले
8. सुभानजी भोसले वस्ताद
9. धोंडजी भोसले
10. लक्ष्मणराव भोसले
11. संताजीआबा भोसले
12. पर्वतरावनाना भोसले जिंतीकर
13. भवानजीमामा शिर्के
14. माधवरावमामा शिर्के
15. रघुनाथराव गुजर
16. नरसिंगराव गुजर
17. तुकोजी बाजी तळबीडकर
18. लखोजीराव मोहिते
19. विठोजी घोरपडे मंगलापूरकर
20. जयसिंगराव जाधव
21. बापुराव जाधव भक्तवाडीकर
22. पर्वतराव जाधव पळशीकर
23. देवराव गाढवे खंडाळेकर
24. खंबाजीराव गाढवे
25. हैबतराव गाढवे
26. तुकोजी गाढवे
27. हणमंतराव बोधे
28. कृष्णाजी बोधे
29. बहिरजी बोधे
30. सुलतानजी फाळके पाडळीकर
31. काशीबा फाळके
32. नारायणजी फाळके
33. रघुनाथराव धुमाळ नायगावकर
34. दाजीबा देशमुख आवंधकर यादव
35. आगनाप्पा हवालदार
36. बापु हवालदार
37. भवानराव ×××××
38. दाजी केदारकर
39. मकाजी तरडे
40. भवनसिंग हिम्मतबहादूर बरसी पानगावकर
41. लक्ष्मण सिंग
42. बच्याबा ××××× येचलेकर
43. केदारी कळसकर
44. गुलाब महंमद
45. राने महंमद
46. इमामभाई सोलापूरकर
47. इसमालशाह काजी वाईकर
48. नबीशाह केवलकर
49. मूर्तिजाशाह काजी
50. इमामशाह काजी
--------------------------------------------------
©प्रसाद शिंदे
संदर्भ- vkrajwade.com
सरदारांची यादीमधुन मिळालेले एक मोडीलिपीतील पत्र

राजे भोसलेंची वावी

 

वेशीवरच्या पाऊलखुणा

राजे भोसलेंची वावी
ऐतिहासिक नोंदी अभावी विस्कटू लागलेले इतिहासाचे धागे कधी कधी अज्ञात पैलूंचा उलगडा करून देतात. असे पैलू न कधी ऐकलेले असतात न कधी पाहिलेले. पण त्यांच्या अज्ञातपणातही एक मोठा इतिहास दडलेला असतो. गावागावात जमीनदोस्त होत असलेल्या ऐतिहासिक वास्तू हा इतिहास कुरवाळून उभ्या असतात. यादवकाळाशी ऋणानुबंध सांगत छत्रपतींच्या घराण्यांची वंशावळ उलगडणारे सिन्नरमधील वावी हे गाव वरद परशरामाच्या समृद्ध लोककलेचीही ओळख करून देते. मन प्र‌सन्न करणारा हा प्रवास आपल्याला इतिहासाच्या पानांपलीकडे घेऊन जातो.
वावीतील राजे भोसले घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी असलेला संबंध वावीची ऐतिहासिक गूढता वाढव‌ितो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे दक्षिणेत येण्यापासून ते पणजोबा बाबाजी भोसले यांच्यापर्यंतचा प्रवास वावी उलगडताना दिसते. अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी केली. यानंतर घडलेल्या अनेक घडामोडीनंतर सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलिपसिंह बहामनी राज्याची स्थापना करणाऱ्या हसन बहामनीकडे आले. याच दिलिपसिंहापासूनच‌ी १३ वी पिढी म्हणजे बाबाजी भोसले, असे संदर्भ मराठी रियासत, शिवछत्रपती समज-अपसमज व क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज या पुस्तकात म‌िळते व वावीतील राजे भोसले घराण्यातील वंशजही त्यास दुजोरा देतात. बाबाजी भोसलेंकडे आठ गावाची पाटीलकी होती. त्यांना मालोजी राजे व विठोजी राजे अशी दोन मुले होती. दोघेही निजामशाहीत वेरूळ-घृष्णेश्वर भागात पराक्रमी व उत्तम प्रशासक होते. पुढे मालोजींना पुणे व सुपे जहागिरी मिळाली तर विठोजी भोसलेंना मुंगी, पैठण, हिरडी, बेरडी, जिंती, वेरूळ, वांबोरी व वावी ही गावे मिळाली. विठोजींनी आपल्या आठ मुलांना प्रत्येक गाव दिले. यात नागोजी यांना वावी हे गाव मिळाले अन् वावी राजे भोसलेंची म्हणून ओळखली जाऊ लागली. दुसरीकडे विठोजींचे भाऊ मालोजींना शहाजी व शरीफजी ही मुले झाली. यामागेही एक कथा आहे. मालोजीराजे भोसलेंनी शहाशरीफ नावाच्या नगरजवळील पिरास पुत्र व्हावा म्हणून नवस केला होता. पुत्र झाल्यावर शहाशरीफ या पिराचे नाव दोन्ही मुलांना शहाजी व शरीफजी असे ठेवले. शहाजी राजांचा सुपुत्र शिवाजी महाराज हे पुढे सुरत लुटीतून परतताना विश्रामगडावर असताना वावीत आपल्या नातलगांना भेटण्यासाठी आल्याचे वावीतील राजे भोसले घराण्याचे वंशज विठ्ठल राजे भोसले व सागर राजे भोसले सांगतात. मालोजींचा दुसरा मुलगा शरीफजी नगर येथील भातवडी (भातोडी) येथील लढाईत ऑक्टोबर १६२४ रोजी धारातीर्थी पडला. हा इतिहास पाहिल्यावर वावीमध्ये भोसले घराणे कसे आले याचा उलगडा होतो. मात्र वावीचा प्रवास येथेच थांबत नाही तर येथून सुरू होतो.
सिन्नरपासून शिर्डीरोडवर वीस किलोमीटरवर वावी हे गाव लागते. उजव्या हाताच्या दिल्ली दरवाजातून गावात प्रवेश केल्यावर पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे वावी म्हणजे काय? असा. सिन्नर परिसर हा यादवांची राजधानी. यादवकालीन शिलालेखातून वावी हा शब्द बारवेसाठी (विहीरीसाठी) उपयोगात आणलेला दिसतो. असाच उल्लेख चक्रधर स्वामींच्या साहित्यात सापडतो. त्यांनी वावी पोखरणी (विहिर खणणे) असे म्हटल्याने वावी म्हणजे बारव. याला वावीतील वैजेश्वराच्या मंदिरासमोर असलेल्या यादवकालीन बारव दुजोरा देते. या बारवेतून लग्नासाठी भांडी बाहेर येतात, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. पाण्याने काठोकाठ भरलेली ही बारव त्यात साचलेल्या कचऱ्यामुळे आज उपेक्षित आयुष्य जगताना दिसते. वाल्ह्याकोळ्याची वावी अन् वैजेश्वर महादेव मंदिरामुळे गावाला वावी म्हटले जात असावे, असेही ग्रामस्थ सांगतात. या विहिरीसमोरच तटबंदीतील महादेवाचे वैजेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे दगडी प्रवेशद्वार सुंदर नक्षीकामाने सजलेले आहे. मंदिरातील शिलालेखाची हेळसांड झाल्याने हा इतिहास अज्ञात आहे. याच मंदिरासमोरील बारवे शेजारी उभा असलेला प्राचीन मंदिराचा दगडी स्तंभ वावीत आणखी काही आखीवरेखीव मंदिरे असावीत याची साक्ष देतो. वैजेश्वर मंदिराचे पुजारी दत्तात्रेय शिंदे-गुरव यांच्या घरी महादेवाचा पंचमुखी मुखवटा आहे. हा वारसा पेशवाईपासून त्यांनी जपला आहे. हा सोहळा अनुभवून थोडे पुढे गेल्यावर राजे भोसले घराण्याच्या तीन मोठाल्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील एकच वाड्याचे अवशेष थोडेफार शिल्लक आहेत. वाड्याचा उंच बुरूज कणा ताट करून वावीतील भोसले घराण्याचे महत्त्व आजही सांगताना उभा असल्याचा दिसतो. वावीतील राजे भोसले घराण्याने साताऱ्याची छत्रपतींची गादी चालविण्यासाठी वावीतून शाहू राजे दुसरे (आबासाहेब, मूळ नाव विठोजी त्र्यंबक भोसले, वावी) दत्तक म्हणून गेले. हा विठोजींच्या घराण्याचा गौरवशाली इतिहास मात्र अंधारात राहिला. हा वाडा पाहताना वावीतील राजे भोसले घराण्याचे ऐश्वर्य डोळ्यापुढे उभे राहते. वाड्याच्या आजूबाजूला पडलेले अनेक दगडी अवशेष, वाड्यातील भुयार अन् भिंतींवरील देवळींचे लहानमोठे नमुने पाहताना हा वाडा पुन्हा उभा राहिला तर अनेक अज्ञात पैलू पुढील शेकडो वर्ष भोसले घराण्याचा इतिहास सांगत राहतील, असे वाटायला लागते. शहाजी राजांकडून वावीतील घराण्याला मिळालेली तलवार विष्णूच्या दशावताराने सजली आहे. तर दुसऱ्या तलवारीची मूठ सोन्याची आहे. मात्र हे वैभव आता वावीत नाही. राजे भोसले घराण्याचा इतिहास संग्रही करण्याचीही गरज आहे.
वावीत भटकंती करताना अनेक मंदिरे पहायला मिळतात. गावात दोन मारूती मंदिरे आहेत. गावात पिराचे ठाण अन् साती आसराही पहायला मिळते. वावीचे वारकरी संत रामगीरी महाराजांची समाधीही येथे आहे. गावाला चार दरवाजे होते. दिल्ली दरवाजा सोडला तर इतर वेशी आता नाहीत. मात्र दिल्ली दरवाजा व पुणे दरवाजा सोडला तर इतर वेशीच्या आठवणीही आता शिल्लक नाहीत. आखाडात बोहाड्यात सोंगे मिरविण्याची परंपरा वावीकरांनी जपली आहे. वावीचा प्रवास वरदी परशरामांची वावी या ओळखीशिवाय पूर्ण होत नाही. परशराम आपल्या वेगळ्याशैलीत सांगतात की,
विठू परशराम येशूचे तोंड अति गोड रसिकरंग भरून/
रामकृष्ण रामाचे छंद ऐकती चतुर जिवी धरून/
वावी नांव गांव धनवटात आडा जबरू
कोणी विरळा एकादा राहील सांभाळून अबरू/
इषकाचे पायी सजण मारिला गबरू/
वरदी परशराम यांचा जन्म (जन्म १७५४- मृत्यू १८४४)मध्ये सिन्नर-शिर्डी मार्गावरील वावी या गावात झाला. देवपूरच्या भागवतबाबांनी त्यांना अभंग करण्याऐवजी आताच्या समाजाचे लावण्यांमाध्यमातून प्रबोधन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच त्यांच्या अनेक लावण्या पौराणिक कथांवर व आध्यात्मिक विषयांवर असून, त्यावर संतकाव्याची छाया आहे. तत्कालीन समाजस्थितीचे उत्कृष्ट चित्रण त्याच्या कवनांत आढळून येते. पेशवाईच्या काळात तमाशा ही लोककला बहरली. वरदी परशराम यांनी आपल्या लावणीनं महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला. पेशवे तसेच इंदोरचे होळकर व बडोद्याचे गायकवाड घराण्याने त्यांच्या कलेचा गौरवही केला. परशराम यांची `आध्यात्मिक लावणी' हे त्यांचं वेगळेपण अनेकांना भावल्याने त्यांना वरदी परशराम म्हटले जाऊ लागले. आपले गाव असलेल्या वावीबद्दलचा अभिमान वरदी परशरामाच्या शाहिरीतून ओथंबून वाहताना दिसतो. म्हणून ते म्हणतात...
वावी गाव तेथे परशराम येसू वर्णी हरीच्या गुणा/
रमारंगे श्रीरंगे अभंगे तारि-तारि मज..//
लोककलेतील एक अनोखी संस्कृतीनिर्माण करणारा हा कवी व कुटुंबिय अज्ञात आहेत. त्यांची परंपरा निष्ठेने पुढे घेऊन जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. मात्र वावीत परशरामाचे मंदिराशिवाय काहीच नाही. असे म्हणतात की, मरणापूर्वी वरदी परशरामाने आपल्या मृत्यूची वार्ता आईला कळविली होती व मृत्यूपूर्वी चार दिवस आधी त्यांनी वावीतून कोपरगाव येथील गोदाकाठचे मंजूर या गावी प्रस्थान केले. त्यांनी सांगितलेल्या दिवशीच कवने करताना त्यांनी प्राण सोडले. ‘वरदी’ नावाला शोभावी अशी त्यांच्या मृत्यूबद्दलची अख्यायिका आजही गावात सांगितली जाते.
वैजेश्वराचे सान्निध्य, बारवेचा गारवा, बोहाड्यांची परंपरा, मंदिरांचा साज, राजे भोसले घराण्याचे ऐश्वर्य अन् परशरामाची अध्यात्मिक काव्यभक्तीने वावी मंत्रमुग्ध झालेली दिसते. दुष्काळी परिसर असला तरी हा ऐतिहासिक गारवा वावीची सफर आनंददायी करतो.
-रमेश पडवळ, नाशिक

चतुरसिंगराजे भोसले वाविकारांचा इतिहास

 पोस्तसांभार ::

श्रीमंत राजेभोसले वावीकर

महाड तालुक्यातील कांगोरी किल्ल्यावर (मंगळगड) १५ एप्रिल १८१८ मध्ये एका राजकुलीन, धाडसी, मातब्बर योद्ध्याचा कैदेत मृत्यू झाला.कोण होते ते वीर पुरुष ?
आपल्या बंधुंच्या सिंहासनाला वाचवणारा हा राजपुरुष,...इंग्रज आणि फितुर मराठे सरदार यांच्या कुटनितीमुळे बळी गेला.
ती व्यक्ती म्हणजे "

चतुरसिंगराजे"...त्यांनी केलेला पराक्रम,धैर्य दाखवलेले शौर्य अगदी त्रोटक स्वरुपात इतिहासात नोंदवले गेले आहे.
कोण होते चतुरसिंग राजे?
मालोजी व विठोजी या सुप्रसिद्ध भोसले बंधुंपैकी विठोजी यांना आठ मुले....
यापैकी एक म्हणजे वावीकर राजेभोसले. या शाखेतील त्रिंबकजी यांना तीन मुले झाली.
* विठोजी
* परशुराम आणि
* चतुरसिंग.
यातील मोठा मुलगा विठोजी हे छत्रपती थोरल्या शाहू महाराजांचे दत्तक पुत्र सातारकर छत्रपती राजाराम महाराज यांना इ सन १७७७ मध्ये दत्तक गेले.१७७७ ला राज्याभिषेक करुन त्यांचे नाव बदलुन "धाकटा शाहु" आसे ठेवण्यात आले.त्यांचे धाकटे बंधु चतुरसिंग राजे हे सातारा येथे त्यांच्या सोबत रहात होते. परशुराम हे वावी येथे होते.सध्या त्यांचें वंशज वावी (तालुका सिन्नर जिल्हा नाशिक) येथे राहतात.
छ. धाकट्या शाहुंची चतुर्थ पत्नी शिर्के कन्या आनंदीबाई या कर्तबगार होत्या.१८८६ साली त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन पुत्र झाले.
* प्रतापसिंह उर्फ बुवासाहेब
* रामचंद्र उर्फ भाऊसाहेब
* शहाजी उर्फ आप्पासाहेब
चतुरसिंग यांचा विवाह--
छत्रपती धाकटे शाहुं यांच्या प्रथम पत्नी लक्ष्मीबाई नारायणराव मोहिते यांच्या कन्या .... त्यांच्याच धाकट्या बहिण बबईसाहेब यांच्याशी २६ नोव्हेंबर १७८९ ला चतुरसिंगराजेंचा विवाह झाला.पुढे बबईसाहेब १८ जुलै १७९८ ला या दांपत्याला मुलगा झाला. ज्यांचें नाव बळवंतराव. हेच बळवंतराव उर्फ बाळासाहेब... छत्रपती प्रतापसिंह यांनी त्यांना आपले सेनापती नेमले होते.
छत्रपती शाहू महाराज (धाकटे) यांच्या प्रथम पत्नी माईसाहेबांचे भाऊ खंडेराव मामा शिर्के आणि शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजरांचे वंशज रघुनाथराव यांनी नेहमीच चतुरसिंग यांना साथ दिली.
चतुरसिंग यांची अस्वस्थता
नाना फडणीस आणि पेशवे यांच्यामुळे छत्रपतींना बरेचदा त्रास सहन करावा लागला.सवाई माधवरावांचा मृत्यू झाल्यावर बाजीरावाने सर्व कारभार आपल्या हाती घेतला. छत्रपतींवर चौकी पहारे बसवले.आपल्याच मुलखात छत्रपती नजरकैद झाले. पेशवाईतले घोटाळे वाढले. पेशव्यांविरुद्ध राजमंडळी असे स्वरुप झाले यात छत्रपतींचा पाडाव झाला. शाहु छत्रपतींची सर्व भिस्त चतुरसिंग यांच्यावर होती. चतुरसिंग अस्वस्थ झाले.
चतुरसिंग आणि सहकारी
चतुरसिंग यांना सातारा व करवीर राजमंडळे यांचा पाठिंबा होता. व्यासराव गोपाळ डबीर, बापु कान्हो फडणीस, मल्हार रामराव चिटणिस, मुंगीकर मालोजीराजे , भवानजी राजेशिर्के, रघुनाथ गुजर आणि मंडळी चतुरसिंग यांच्यासह रानोमाळ फिरु लागले. यावेळी चतुरसिंग यांना केवळ सातारा गादीच्या सुरक्षिततेची चिंता होती. काही सरदारांनी(सर्जेराव घाटगे) त्यांना सरदारी करुन आपला स्वार्थ पहावा असे सुचवले परंतु चतुरसिंग राजे बधले नाहीत. त्यावेळच्या पावसाळ्यात चतुरसिंग पुण्यात चार महिने राहिले. परंतु दुसऱ्रेबाजीराव यांच्या वर्तनामुळे पुणे सोडुन ते विजापुरला गेले.
बाजीराव पेशव्यांनी चालवलेली गैरकृत्ये -
बाजीराव पेशवे नी छत्रपतीःवर बंधने आणली.त्यांचा वाढता मुजोरपणा बघुन यशवंतराव होळकर पुण्यावर चालुन गेले.यावेळी पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेतली आणि यशवंतराव होळकरांविरौद्ध उभे राहिले. बाजीरावाच्या या कृत्यामुळे सातारा राजघराण्याची अवस्था बिकट झाली. तोंड दाबुन बुक्क्याःचा मार अशी अवस्था झाली.
चतुरसिंग यांचे प्रयत्न --
सन १८०३ च्या उन्हाळ्यात चतुरसिंग यांनी या परिस्थितीवर उपाय करण्यासाठी निश्चय केला.आणि आपले बंधु छ. छाकटे शाहु यांच्या छत्रछायेत आपली पत्नी व मुलास ठेवुन ते इतर मराठा सरदारांच्या भेटीसाठी निघाले.
जगदेवराव जाधवराव यांची भेट --
चतुरसिंग शिंदे यांना भेटण्यासाठी निघाले. शिंदे बुर्हाणपुरला होते. तिकडे जात असताना वाटेत चृतुरसिंग यांनी सिंदखेड येथिल जिजाबाईंच्या वंशातील प्रतिष्ठित सरदार जगदेवराव जाधवराव यांची गाठ घेतली. तत्कालीन परिस्थितीवर चर्चा केली.
१० आॕगस्ट १८०३ --अजिंठाच्या घाटात दौलतराव शिंदे व सर्जेराव घाटगे यांची चतुरसिंग यांनी भेट घेतली. दौलतराव हे चतुरसिंग राजेंच्या भेटीला स्वतःहुन आले. दरम्यान इंग्रजांनी शिंदेंच्या विरुद्ध युद्ध पुकारले होते. आईसआडगावात शिंदेंसोबत चतुरसिंग यांनी स्वतः हुन भाग घेतला.या युद्धात पेशव्यांनी ब्रिटिशांना मदत केली. इंग्रजांचा विजय झाला.
करवीर आणि सातारा राजघराणे तसेच इतर घरंदाज मात्तबर मंडळींना या युद्धातील पराभवामुळे प्रचंड यातना झाल्या. या युद्धात चतुरसिंगराजे हे
होळकर ,शिंदे यांच्या बाजुने उभे राहिल्याने त्यांना बंडखोर ठरवण्यात आले.
नागपुरच्या रघुजी यांची भेट --
युद्ध शांत झाल्यावर चतुरसिंगराजे नागपुरला रघुजी भोसलें यांच्या कडे गेले. मराठेशाही आणि सातारा छत्रपतींच्या बाजुने विचार करणारे चतुरसिंग यांचे नागपुरच्या भोसल्यांकडुन स्वागत झाले.भोसले घराण्याने त्यांना सन्मानाने वागवले.चतुरसिंग यांना पंधरा हजाराची नेमणुक मिळाली. ते नागपुरातदहा महिने राहिले.परंतु चतुरसिंगराजे यांना छत्रपतींना बाजीरावांच्या नजरकैदेतुन सोडवायचा ध्यास होता.ते तिथे याच उद्देशाने गेले होते.
निश्चयी चतुरसिंगराजे--
दौलतराव शिंदें यांनी चतुरसिंग यांना भेटीचे निमंत्रण दिले,नागपुर वरुन दोन हजार लोकांची फौज घेऊन जबलपुर सागर वरुन पुढे चंबळ नदीकाठी सबाळगडावर दौलतरावजी शिंदे व यशवंतरावजी होळकर यांचा मुक्काम एकत्र होता. सन १८०५ मध्ये चतुरसिंग तिथे पोहचले यावेळी सर्जेराव घाटगे हे देखिल होते. छत्रपतींंशी शिंदे घाटगे यांनी केलेल्या करारांची आठवण करुन देत चतुरसिंग यांनी दोघांना शाब्दिक फटकारे दिले.तिघांमध्ये काही बोलणी झाली पुढे ते अजमेरला गेले.
चतुरसिंग यावेळी भरतपुरला जाट राजास भेटले.नंतर दिल्ली ला माल्कन आणि सेनापती लाॕर्ड लेक यांनाही भेटले.
चतुरसिंग यांची स्वामीनिष्ठा---
लेक व माल्कन यांना दिल्लीला भेटल्यावर चतुरसिंग यांना ब्रिटीशांशी हात मिळवणी करुन ...ब्रिटीशांकडुन बक्षिशी ,सरदारकी मिळवता आली असती.तसे पहता कोणासाठीही ही एक संधी ठरली असती.परंतू चतुरसिंगराजे स्वाभिमानी होते. त्यांना बक्षिशी वा सरदारकीचा मोह नव्हता.त्यांना सातारा गादीच्या छत्रपतींच्या बाजुने भक्कम पाठिंबा मिळवायचा होता.
जोधपुर-जयपुर-उदयपुर- मंदसोर- बडोदा प्रवास ----
सातारा छत्रपतींच्या बाजुने उभे राहण्यासाठी अनेकांना भेटुन चतुरसिंग राजे प्रवास करीत राहिले.जुलै १८०६ मध्ये चतुरसिंग पुष्कर येथे यशवंतराव होळकर यांना भेटले.पुढे जोधपुरला मानसिंग रारेस भेटुन दिल्लीला परत आले.१८०६ डिसेंबर मध्ये जयपुरला जगतसिंह यांची भेट तर उदयपुरला राणा यांची भेट घेतली.
बडोद्याचे गायकवाड --
बडोद्याला गायकवाड घराण्याकडुन काही सहकार्य मिळेल या अपेक्षेने ते कान्होजी गायकवाडांना भेटले.परंतु गायकवाड घराण्यातील राजमंडळी आधीच इंग्रजांच्या आधीन झालेली असल्याने निराशा झाली.तेथुन ते मंदसोरला गेले.दरम्यान उज्जयनीला असताना चतुरसिंग यांना छ.धाकटे शाहु यांच्या निधनाची बातमी मिळाली.
छत्रपती धाकटे शाहुंचे निधन --
आपले बंधु छत्रपती शाहुंच्या निधन झाल्याचे कळताच चतुरसिंगराजे यांना दुःख आवेगाने धक्का बसला.. ज्यांच्याकरता वणवण केली तेच बंधु राहिले नाहीत या विचाराने चतुरसिंगराजे खचुन गेले. या संधीचा फायदा घेऊन बाजीरावाने चतुरसिंग यांच्या पत्नी व चिरंजीवास (बळवंतराव) याना कैदेत ठेवले.आणि घाई घाईने प्रतापसिंह राजेंचा राज्याभिषेक उरकला.
या परिस्थिती नंतर (१८०९) चतुरसिंगराजे यशवंतराव होळकरांना भेटण्यासाठी गेले आसता यशवंतरावांना वेड लागलेले पाहुन अधिक कष्टी झाले. इकडे दुसऱ्या बाजीरावाने छत्रपती प्रतापसिंह यांची मर्जी संपादन केली.परंतु त्याने राज्यकारभार आपल्या ताब्यात घेतला.
चतुरसिंग, त्यांचे साथीदार आणि धार मुक्काम ---
चतुरसिंगांबरोबर बापु कान्हो, व्यासराव डबीर,,मल्हारराव चिटणीस, वैगरे साथीदार त्यांच्यासोबत सुरवातीपासुन सर्व प्रवासात होते. ही सगळी मंडळी (१८०९ ) जुलैमध्ये धारला गेली.इथे धामधुम असल्याने दोन वर्षे तिथेच गेली.
बाजीराव पेशव्यांची कुटनिती--
बाजीरावांनी त्र्यंबक डेंगळे यांना चतुरसिंग यांचेकडे पाठवले. सावध चतुरसिंग सोनगड वाटेने खानदेशात आले. तरी बाजीराव यांना चतुरसिंग यांच्याबद्दल तक्रार नाही उलट ते हितचिंतकच आहेत असा डेंगळेनी निरोप दिला. डेःगळेःनी बेलभंडारा उधळुन शपथ घेतली. आणि त्याच्यावर विश्वास ठेवुन चतुरसिंग डेंगळेच्या भेटीला गेले. रात्री बैठक झाली.
चतुरसिंगराजे, रघुनाथ गुजर,बापु फडणीस,आप्पाजी इंगळे,हे चौघे तसेच गोपाळराव न्यायाधिश, आपाभट पुणतांबेकर,त्यांचे दोन बंधु बाबाजी केशव पाडाळीकर, लाडेखान जमादार व हवालदार खिजमतगार असे एकुण अकरा जणणाःना एकाएकी वेढा घालुन कैद करण्यात आले.
सर्वांना मालेगावच्या किल्लात ठेवण्यात आले.बाजीराव नाशिकला आल्यावर चतुरसिंगराजेंना बेड्या घालुन रायगडावर रवाना करण्यात आले.(मे १८११)
चतुरसिंग राजे यांचा अखेर--
१५ एप्रिल १८१८ रोजी कैदेत असलेल्या चतुरसिंग राजेंचा कांगोरी किल्ल्यावर कैदेत मृत्यू झाला.
चतुरसिंगराजेंच्या अस्थी प्रथम वाई नंतर सातारा येथे आणुन त्यांचे उत्तर कार्य करण्यात आले.
चतुरसिंग यांचे पुत्र बळवंतराव --
चतुरसिंगाच्या पश्चात् त्यांचे पुत्र बळवंतराव राजेभोसले उर्फ बाळासाहेब सेनापती. बळवंतराव उर्फ बाळासाहेब राजेभोसले म्हणजे छत्रपती प्रतापसिंहांचे सेनापती हे देखील त्यांच्या स्वामीनिष्ठेसाठी ओळखले जातात.
चतुरसिंग राजेभोसले वावीकर यांच्या स्मृतीस अभिवादन ! चतुरसिंग यांच्या सोबत असणारे सहकारी यशवंतराव व विठाजी होळकर,अमीरखान, सर्जेराव घाटगे,धोंडजी वाघ यां सर्वांना अभिवादन ...
संदर्भ ग्रंथ - मराठी रियासत -८

श्रीमंत चतुरसिंग राजेभोसले वावीकर यांचा वंश विस्तार

 


श्रीमंत चतुरसिंग राजेभोसले वावीकर यांचा वंश विस्तार 
श्रीमंत चतुरसिंग राजेभोसले यांचे वडील श्रीमंत त्रिंबकजी राजे भोसले वावीकर हे नामवंत सरदार नागपुरास होते. श्रीमंत त्रिंबकजी राजे यांना तीन मुले
१) श्रीमंत विठोजी राजे उर्फ श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (धाकटे) यांचा जन्म साधारणतः १७६३ वावी येथे झाला. यांना श्रीमंत छत्रपती रामराजे महाराज यांनी १७७७ ला दत्तक घेतले.
२) श्रीमंत परशराम राजे भोसले यांचा जन्म साधारणतः १७६७ वावी येथे झाला आणि मृत्यू १८५१ ला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (धाकटे) यांचे ज्येष्ठ पुत्र श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या समवेत काशी येथे राहत असताना झाला.
३) श्रीमंत चतुरसिंग राजेभोसले यांचा जन्म साधारणतः १७७१ साली वावी येथे झाला.
श्रीमंत चतुरसिंग राजे यांचा विवाह बबईसाहेब नारायणराव मोहिते यांच्यासोबत २६ नोव्हेंबर १७८९ सातारा येथे झाला. बबईसाहेब ह्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (धाकटे) यांच्या पत्नी लक्ष्मीबाईसाहेब यांच्या बहीण. श्रीमंत चतुरसिंग राजे आणि बबईसाहेब यांना १८ जुलै १७९८ रोजी पुत्र प्राप्ती झाली. त्यांचे नाव श्रीमंत बळवंतराव राजे भोसले उर्फ बाळासाहेब सेनापती. श्रीमंत चतुरसिंग राजे यांचा मृत्यू १५ एप्रिल १८१८ कांगोरी किल्ल्यावर झाला.
श्रीमंत बळवंतराव राजे भोसले उर्फ बाळासाहेब सेनापती यांच्या पत्नी गुणवंताबाई श्रीमंत चिमणाजी राजे शिर्के पळसांबकर यांची कन्या. श्रीमंत बळवंतराव राजे यांना १८२६ च्या दसऱ्याच्या दिवशी छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सेनापती म्हणून निवड केली होती. श्रीमंत बळवंतराव राजे आणि गुणवंताबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १८४० ला श्रीमंत त्रिंबकजी राजे यांचा जन्म झाला. श्रीमंत बळवंतराव राजे यांचा मृत्यू २७ जानेवारी १८४० रोजी महू (मध्य प्रदेश ) येथे झाला.
श्रीमंत त्रिंबकजी राजेभोसले उर्फ श्रीमंत शहाजी राजे (जंगली महाराज) यांना श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी २५ जानेवारी १८४७ काशी येथे असताना दत्तक घेतले. त्यांचा विवाह तारळेकर महाडिक यांच्या कन्या आनंदीबाई साहेब यांच्याशी झाला. श्रीमंत जंगली महाराज यांचा मृत्यू १ जून १८९२ भवानी पेठ पुणे येथे झाला.
आपल्या मुलाला श्रीमंत छत्रपती यांनी दत्तक घेतल्यामुळे गुणवंताबाई साहेब यांनी त्याच दिवशी म्हणजे दत्तक २५ जानेवारी १८४७ रोजी श्रीमंत राजेभोसले शेडगावकर घराण्यातून जिजाबासाहेब यांना दत्तक घेतले. त्यांचे नाव श्रीमंत दुर्गासिंह राजेभोसले उर्फ काकासाहेब राजे. श्रीमंत दुर्गासिंह राजे यांचा विवाह श्रीमंत तात्यासाहेब शिर्के तरसळकर यांची कन्या सकवारबाई आणि त्यानंतर नागपूरकर मोहिते यांची कन्या बयाबाई उर्फ मैनाबाई यांच्यासोबत झाला. श्रीमंत दुर्गासिंह राजेभोसले यांचा मृत्यू १८९१ वावी येथे झाला.
श्रीमंत दुर्गासिंह राजे यांचे यांचे पुत्र श्रीमंत लक्ष्मणसिंह राजे भोसले यांचा जन्म १८८४ ला झाला. त्यांचा आणि त्यांची पत्नी यांचा मृत्यू सप्टेंबर 1909 मध्ये वयाच्या पंचविशीमध्ये झाला.
श्रीमंत लक्षणसिंह राजे यांचे पुत्र श्रीमंत अमरसिंह राजे भोसले उर्फ श्रीमंत बाबुराव राजे आणि श्रीमंत रामसिंह राजेभोसले उर्फ श्रीमंत आप्पासाहेब राजे यांचा सांभाळ आई वडिलांच्या मृत्यूनंतर आजी मैनाबाई यांनी केला.
श्रीमंत अमरसिंह राजे भोसले उर्फ श्रीमंत बाबुराव राजे यांचा विवाह नागपूरचे मोहिते यांची कन्या उमादेवी यांच्या सोबत झाला. उमादेवींच्या मृत्यूनंतर श्रीमंत बाबुराव राजे आपल्या बंधूंसोबत राहत होते. श्रीमंत अमरसिंह राजे वावीकर यांचा मृत्यू १९८० वावी येथे झाला.
श्रीमंत रामसिंह राजेभोसले उर्फ श्रीमंत आप्पासाहेब राजे वावीकर यांच्या पत्नी गजराबाई श्रीमंत दादबाजी पालकर नागपूर यांची कन्या. श्रीमंत आप्पासाहेब राजेंचा मृत्यू झाल्यांनतर गजराबाई साहेब आपल्या माहेरी नागपूर येथे राहू लागल्या. तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
श्रीमंत राजेभोसले वावीकर परिवारातील सर्व शूर वीरांना विनम्र अभिवादन ...

अपिरिचित महापराक्रमी श्रीमंत खेळोजी राजे भोसले

 

श्रीमंत खेळोजी राजे

भोसले 
श्रीमंत बाबाजी राजे भोसले यांना वेरूळ, वावी, बनसेन्द्रे, बेरडी, हिंगणी, जिंती , मुंगी पैठण अशा आठ दहा गावांचे वतन होते. श्रीमंत बाबाजी राजे यांचे दोन्ही पुत्र मोठे कर्तृत्ववान होते . थोरले श्रीमंत मालोजी राजे आणि धाकटे श्रीमंत विठोजी राजे हे मोठे मनसबदार होते. श्रीमंत मालोजी राजे यांना इंदापूरच्या लढाईत वीरमरण आले. तेव्हा श्रीमंत शहाजी राजेंचे वय होते अवघे पाच वर्षे. श्रीमंत मालोजी राजे यांच्यानंतर श्रीमंत विठोजी राजे यांनी श्रीमंत शहाजी राजे आणि श्रीमंत शरीफजी राजे यांचा सांभाळ केला. श्रीमंत मालोजी राजे यांची मनसब त्यांनी श्रीमंत शहाजी राजे याना मिळवून दिली. श्रीमंत बाबाजी राजे यांच्या मूळ वतनाच्या गावावर श्रीमंत विठोजी राजे आणि त्यांचे आठ पुत्र आपला पराक्रम करत होते. श्रीमंत विठोजी राजे यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीमंत संभाजी राजे यांना वावी गावाचे वतन होते. श्रीमंत संभाजी राजे हे देवगिरीच्या किल्ल्यावर झालेल्या खंडांगळे हत्ती प्रकरणात वीरगतीला प्राप्त झाले. त्यांच्यानंतर हे वावी गावाचे वतन श्रीमंत विठोजी राजे यांचे द्वितीय पुत्र श्रीमंत खेळोजी राजे यांना देण्यात आले. वावीच्या वतनावर असताना इसवी सन १६३३ च्या सुमारास त्यांनी निर्गुडी गावाचे वतन विकत घेतले होते. हे इतिहासातील अपिरिचित महापराक्रमी श्रीमंत खेळोजी राजे म्हणजे नेमके कोण ?
श्रीमंत बाबाजी राजे भोसले यांचे नातू आणि श्रीमंत विठोजी राजे भोसले यांसह द्वितीय चिरंजीव . श्रीमंत खेळोजी राजेंनी दौलताबादच्या निजामशाही कडून मनसबदारी मिळविली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर श्रीमंत शहाजी राजे यांच्या कालखंडात श्रीमंत खेळोजी राजे हे नामवंत पराक्रमी सरदार होते. इसवी सन १६२९ च्या सुमारास श्रीमंत शहाजी राजे यांनी निजामशाही सोडली त्यावेळी श्रीमंत खेळोजी राजे यांनी परसोजी आणि मालोजी या आपल्या दोन भावांसह निजामशाही सोडली आणि शहाजहान बादशहाच्या मुघलशाहीत जाऊन मिळाले. मुघल बादशाह शहाजहानला श्रीमंत खेळोजी राजेंच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची जाणीव असल्याने त्याने श्रीमंत खेळोजी राजेंना पंचहजारी मनसबदारी बहाल करून मोठा सन्मान केला.
स्वराज्य स्थापनेच्या आधी पंचहजारी मनसबदार म्हणजे पाच हजार पायदळ आणि पाच हजार घोडदळ बाळगण्याचे सामर्थ्य असणे हि मराठ्यांसाठी फार मोठी बाब होती. त्याप्रमाणे त्यांनी मुघलांकडून बऱ्याच ठिकाणी आपले शौर्य दाखवले. परंतु दक्षिणेत वाढता मुघलांचा हस्तक्षेप त्यांना मान्य नव्हता. इसवी सन १६३३ ला मुघलांनी दौलताबादच्या किल्ल्याला वेढा घालून तो हस्तगत करण्याचा प्रयन्त केला, तेव्हा श्रीमंत खेळोजी राजे यांनी मुघलांची साथ सोडून विजापूरच्या आदिलशाहीला साथ दिली. कारण होते श्रीमंत शहाजी राजे. श्रीमंत शहाजी राजे हे श्रीमंत खेळोजी राजेंचे सख्खे चुलत भाऊ. आदिलशाही कडून त्यांनी मुघलांचा कडवा प्रतिकार केला. श्रीमंत खेळोजी राजेंनी इसवी सन १६३३ आणि १६३६ च्या लढाईत श्रीमंत शहाजी राजे यांना मोलाची साथ दिली. श्रीमंत खेळोजी राजेंच्या शौर्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा रणझुंझार महाप्रतापी वीर अशी निर्माण झाली. श्रीमंत खेळोजी राजेंना एकच पुत्र होता. त्यांचे नाव श्रीमंत जिवाजी राजे.
कमी कालावधीत आपल्यावर शिरजोर झाल्यामुळे मुघलांनी कट कारस्थाने रचून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. श्रीमंत खेळोजी राजेंच्या पत्नी पर्वणीनिम्मित गोदावरी नदीवर स्नानासाठी गेलेल्या असताना मुघल सरदार महाबतखान याने त्यांना पकडून कैद केले. त्यांची अब्रू वाचविण्यासाठी श्रीमंत खेळोजी राजे विनम्र होऊन आपले मांडलिक होतील अशी त्याची धारणा होती. महाबतखानाने श्रीमंत खेळोजी राजेंकडे चार लक्ष एवढी खंडणी मागितली. आपल्या पत्नीच्या अब्रूसाठी आणि घराण्याच्या इभ्रतीसाठी श्रीमंत खेळोजी राजेंनी निरुपायाने चार लक्ष रुपये महाबतखानाला देऊन आपल्या पत्नीची सुटका केली. हि घटना भोसले घराण्यासाठी खूपच वाईट होती. श्रीमंत शाहजी राजेंच्या पत्नी , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब यांना हि गोष्ट अजिबात रुचली नाही. जिथे भोसले घराण्याची सून सुरक्षित नाही तिथे इतरांचे काय? म्हणून त्यांना श्रीमंत शहाजी राजेंनी पाहिलेल्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाची सत्यात उतरविण्याची घाई झाली होती. त्यातूनच त्यांनी आपल्या पुत्राकडून हे स्वप्न सत्यात उतरवलं मराठा साम्राज्यच.
काही कालावधीनंतर मुघल बादशाह आणि विजापूरकर आदिलशाह यांचा तह झाल्याने श्रीमंत खेळोजी राजेंनी आदिलशाही सोडली. अर्थात श्रीमंत खेळोजी राजे यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ अनेक प्रसंगी करून दाखविली. पण त्यांच्या पाणीदार स्वभावाप्रमाणे त्यांचा यथायोग्य गौरव कोठेच झाला नाही. वेळोवेळी त्यांचा अपमान होऊ लागल्याने ते आपल्या मूळ वतनावर म्हणजे वेरूळ या गावी जाऊन राहू लागले. तेथे त्यांनी आपल्या शौर्याच्या बळावर पुन्हा स्वतःचे सैन्य जमवले आणि मुघल-आदिलशाह यांचा प्रतिकार करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. हे औरंगजेबास कळल्यानंतर त्याने आपला विश्वासू सरदार मलिक हुसेनला सैन्य देऊन श्रीमंत खेळोजी राजेंवर हल्ला करण्यासाठी पाठवले. एकाएकी झालेल्या हल्ल्यामध्ये श्रीमंत खेळोजी राजे यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली. तरी देखील इसवी सन १६३९ च्या नोव्हेंबर महिन्यातील १५ तारखेला ते धारातीर्थी पडले. श्रीमंत खेळोजी राजेंच्या अचानक जाण्याने श्रीमंत राजे भोसले घराण्याची अपिरिमित हानी झाली . त्यांच्या नंतर श्रीमंत जिवाजी राजे यांचा श्रीमंत मालोजी राजे यांनी पुत्रवत सांभाळ केला. आजही श्रीमंत खेळोजी राजेंचे वंशज वावी, कळस, मंजूर, बनसेन्द्रे ,निर्गुडी येथे राहतात. श्रीमंत खेळोजी राजे यांचा आज ३८२ वा स्मृतीदिन. अशा महापराक्रमी रणझुंझार योद्धयाला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ...
फोटो वावी येथील श्रीमंत खेळोजी राजेंच्या वंशजांच्या वाड्याचा ... कदाचित या भूमीला श्रीमंत खेळोजी राजेंचा चरणस्पर्श झाला असेल.
© श्रीमंत राजेभोसले वावीक

श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक

श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक 

पोस्तसांभार :

श्रीमंत राजेभोसले वावीकर

 छत्रपती शिवरायांचे निधन झाल्यानंतर आणि शंभूराजांच्या गैरहजेरीत वयाने खूपच लहान असलेले राजाराम यांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न झाला पण शंभूराजांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली. गादीसाठी फुटीर राजकारण स्वराज्यात होऊ शकते याचे भान राखून शंभूराजांनी राज्याभिषेक करवून घेण्याचा निर्णय घेतला.

शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच २० जुलै १६८० रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि स्वतः स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाल्याचे घोषित केले.

(तारखे संदर्भात विविध मतभेद आढळतात याची नोंद घ्यावी)

बिकट काळात आणि वातावरणात मंचकरोहणात राज्याभिषेक झाला होता पण शास्त्रार्थ दृष्टीने त्यामध्ये दोष असल्याचे सर्वांना आढळले. विधियुक्त राज्याभिषेक झाला पाहिजे असे शंभूराजांना पण वाटू लागले त्यानुसार मग रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२ म्हणजेच १४, १५ व १६ जानेवारी १६८१ यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.

राज्याभिषेकावेळी पूर्व कैद्यांना मुक्त करणे अशी परंपरा असल्याने शंभू राजांनी त्यांना मुक्त केले. राज्याभिषेक प्रसंगी छत्रपती संभाजी राजांनी स्वतःच्या नावे नवीन नाणी (चलन) बनवून घेतली. पुढील बाजूस “श्री राजा शंभूछत्रपती” अशी अक्षरे कोरली तर मागील बाजूस “छत्रपती” हे अक्षर कोरले

छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा:
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||

अर्थ- शिवपुत्र श्री शंभो यांची राजमुद्रा आकाशाप्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणुन असणार नाही ? (सर्वांवर छत्र म्हणुन राहील.)

श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा...🙏


श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज

 

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज
पोस्तसांभार :: © श्रीमंत राजेभोसले वावीकर

श्रीमंत राजेभोसले वावीकर घराण्यातून दत्तक घेण्यात आलेले श्रीमंत छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे चार विवाह झाले होते. त्यांचा चौथा विवाह भवानजी राजे शिर्के यांची कन्या आनंदीबाई यांच्या सोबत २५ मार्च १७८६ रोजी झाला. त्यांना तीन पुत्र झाले.
१. प्रतापसिंह उर्फ बुवासाहेब महाराज
२. रामचंद्र उर्फ भाऊसाहेब महाराज
३. शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा जन्म १८ जानेवारी १७९३ रोजी झाला. त्यांचं जन्मानंतर पेशवाईतून मुक्त होण्यासाठी छत्रपती शाहू महाराज धाकटे यांनी १७९८ ला प्रयत्न केला. त्यात त्यांना अपयश आल्याने दुसरा बाजीराव पेशवे याने छत्रपती आणि राजपरिवार यांच्या भोवती फास आवळला. त्यानंतर प्रतापसिंह महाराज, रामचंद्र महाराज, शहाजी महाराज यांना शिक्षण घेण्यास अडचणी येऊ लागल्या. तेच त्यांच्या मातोश्री आनंदीबाई साहेब यांनी रात्री अडीच वाजता आपल्या मुलांना उठवून शिकवून पहाटे पाच वाजता परत झोपवले आणि त्यांना सर्व शास्त्रात पारंगत केले.
छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे ४ मे १८०८ ला दुःखद निधन झाले. छत्रपती शाहू महाराज धाकटे यांच्या मातोश्री सगुणाबाई साहेब यांनी प्रतापसिंह महाराज याना तेरावे दिवशी १६ मे १८०८ ला वयाच्या पंधराव्या वर्षी सिंहासनावर बसवून राज्यारोहण करण्यात आले. त्यांचे वय कमी असल्याने सुरुवातीला स्वराज्याचा कारभार त्यांच्या मातोश्री आनंदीबाई साहेब यांनी पहिला. सन १८१२ नंतर छत्रपती राजघराणे आणि पेशवे यांच्यात तेढ वाढू लागला होता. यातच ९ नोव्हेंबर १८१७ ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज याना वासोट्याच्या किल्ल्यावर बंदोबस्तात ठेवले होते. १४ डिसेंबर १८१७ ला इंग्रज अधिकारी पेशवाईच्या विरोधात चालून आले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी इंग्रजांशी संधान साधू नये म्हणून बाजीरावाने त्यांना कुटुंब कबिल्यासह सिद्धटेक येथे लष्करी छावणीत बोलावून घेतले आणि त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची प्रचंड फरपट केली. काही दिवसातच बाजीराव छत्रपतींना सोडून पळून गेला. ४ मार्च १८१८ ला
बेलसर येथे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची इंग्रज अधिकारी यांची भेट झाली. १० मार्च १८१८ ला महाराजांचे साताऱ्यात आगमन झाले. महाराजांचे आगमनाने सातारकर जनता खुश झाली होतो, त्यांनी जागोजागी गुढी उभारून त्यांचेच स्वागत केले. ११ मार्च १८१८ ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे पुन्हा राज्यारोहण करण्यात आले.
एल्फिन्स्टनने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याशी तह करून त्यांच्या अनेक वाजवी हक्कांत काटछाट केली; तरी साताऱ्यात नेमलेल्या ग्रँट डफसारख्या रेसिडेंटने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना बरीच मदत केली. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून राज्यात शिस्त आणली. प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या. एप्रिल १८२२ ला स्वराज्याचा संपूर्ण कारभार श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या हाती आला. महाराज हे अतिशय सुसंस्कृत, निर्व्यसनी, उदार, स्पष्ठवक्ते, आणि अतिशय मानी होते. आपण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान होता.
राज्याची उत्तम व्यवस्था -
छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सातारा शहरात नवा राजवाडा, जलमंदिर यांसारख्या काही वास्तू बांधल्या; शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा सुरू केली आणि त्या शाळेमधून संस्कृत-मराठीबरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले; छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती. महाराजांना वाचनाची आवड असल्याने त्यांनी स्वतःचे ग्रंथालय देखील सुरु केले होते.
व्यापाऱ्यांनी सातारा राजधानीत येऊन व्यापार करावा म्हणू राजपथ बांधून त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने थाटण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन केले. त्यांच्यासाठी १९ विहिरी, पाण्याचे हौद बांधून नव्या पेठा वसवल्या. १८२२ च्या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराजांनी स्वतःच्या आर्थिक खर्चात कपात करून तात्काळ १ लाख रुपये उपलब्ध करून दिले. वेठबिगारी बंद करून गोहत्या बंदी कायदा स्वराज्यात लागू केला.
सन १८२६ मध्ये एल्फिन्स्टनने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची भेट घेतली आणि लिहून ठेवले" मराठ्यांचे कुळात प्रतापसिंहाइतका सुसंस्कृत पुरुष दुसरा मला आढळला नाही. त्याने राज्यात उत्कृष्ट व्यवस्था ठेवली असून रस्ते, पूल, पाण्याची टाकी अशा सोयी जागोजागी निर्माण करून लोकसुखासाठी तो सारखा झटत आहे." ६ ऑक्टोबर १८३३ ला गव्हर्नर लॉर्ड क्लेअर याने महाराजांची भेट घेतली अन लिहून ठेविलें "लोकांस विद्यादान देण्याची प्रतापसिंहास मोठी हौस असून त्याने साताऱ्यास पाठशाळा घातली आहे. त्यात इंग्लिश , पारशी, मराठी या भासग शिकवल्या जातात." जॉन ब्रिग्ज म्हणतो "महाराजांचे पोलीस दल कोणत्याही बाबतीत आमच्यापेक्षा कमी नाही." महाराजांनी साताऱ्यात दोन तुरुंगही बांधले होते. न्यायालयांची स्थापना करून अनेकदा महाराज स्वतः न्यायदानास बसत असत. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण महाराजांनीच विकसित केले होते. महाराजांनी सातारा ते महाबळेश्वर पुढे प्रतापगड आणि नंतर महाड पर्यंत रस्ता तयार केला. मुंबईचा गव्हर्नर सर जॉन मॅल्कम हे महाबळेश्वर येथे आल्यावर महराजनी तिथे पेठ वसवली. खरं तर या सर जॉन मॅल्कम यांची इच्छा होती की त्या पेठेला छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे नाव द्यायचे पण महाराजांनी याला आदरपूर्वक नकार दिला. पुणे सातारा हा देखील मार्ग महाराजांनी तयार करवून घेतला.
सन १८२८-२९ मध्ये छत्रपतींना क्षत्रियकुलावंतस म्हणण्यास नकार देणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महाराजांनी २४ मुद्दे निश्चित करून त्यावर चर्चा करण्यासाठी धर्म परिषद बोलावली. परिषदेच्या निर्णयाच्या दिवशी अनुचित प्रकट टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. स्वतः महाराज परिषदेच्या बाहेर तलवार घेऊन उभे होते. धर्म परिषदने क्षत्रियांचे अस्तित्व मान्य करून त्यांचे अधिकार मान्य केले.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांना आपले मराठा राज्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याची इच्छा होती. परंतु त्यांच्याविरुद्ध सारखीच कटकारस्थाने चालू होती. विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. ब्रिटिशांचा हस्तक बाळाजीपंत नातू याने बाजीरावांचा बीमोड करून मराठा राज्य इंग्रजांच्या घशात घालण्यासाठी केवळ स्वार्थापोटी अनेक कारस्थाने करून इंग्रजांना मदत केली होती. छत्रपतींनी राजद्रोहाचा आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला.शेवटी इंग्रजांविरुद्ध कट केल्याचा खोटा आरोप लादून ४ सप्टेंबर १८३९ रोजी त्यांना पदच्युत करून त्यांचा धाकटा भाऊ श्रीमंत आप्पासाहेब महाराज (शहाजी) यास छत्रपती म्हणून सातारच्या गादीवर बसविले व काशीला (बनारस) छत्रपती प्रतापसिंहांना स्थानबद्धतेत राजकुटुंबासह ठेवण्यात आले. छत्रपती प्रतापसिंहानी ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर व ब्रिटिश पार्लमेंट यांपुढे रंगो बापूजी गुप्ते यांस इंग्लंडमध्ये पाठवून व इंग्लंडमधील काही प्रतिष्ठित इंग्रजांमार्फत आपली सत्य बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला; पण यश आले नाही. ‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते.
काशी मुक्कामी छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आपले सेनापती बळवंतराव राजेभोसले वावीकर यांचे चिरंजीव त्रिंबकजी याना दत्तक घेतले. त्यांचे नाव बदलून त्यांना शहाजी उर्फ शाहू हे नवीन नाव देण्यात आले. त्यांनाच जंगली महाराज या नावाने ओळखले जाते. अखेर रंगों बापूजी परत येण्यापूर्वीच काशी येथे छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे स्थानबद्धतेत दुःखद निधन झाले.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कार्यकाळात त्यांना सेनापती बळवंतराव राजेभोसले वावीकर यांनी प्रचंड साथ दिली. गोविंदराव दिवाण, यशवंतराव शिर्के, रंगो बापूजी, शेडगावकर आणि हिंगणीकर राजेभोसले तसेच दिनकरराव मोहिते हंबीरराव, बळवंतराव चिटणीस, रघुनाथराव गुजर, तारळेकर राजे महाडिक आणि इतरही जुन्या नामवंत छत्रपतींचा इमान राखणाऱ्या सरदार मंडळींनी एकमेकांना स्वराज्याच्या कामी पूर्ण साहाय्य केले.
अशा सुसंस्कृत, लोकाभिमुख कार्य करणाऱ्या, लोकहितवादी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना आज जयंती दिनी त्रिवार मनाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन

२०४ वर्षांपूर्वी म्हणजे २५ जानेवारी १८१८ ला लिहिलेले ऐतिहासिक पत्र.

 


२०४ वर्षांपूर्वी म्हणजे २५ जानेवारी १८१८ ला लिहिलेले ऐतिहासिक पत्र.
सेनासाहेब सुभा श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले सेनापती वावीकर यांचे मराठा स्वराज्यासाठीचे प्रयत्न. दुसरा बाजीराव पेशव्याने त्यांना त्रिंबकजी डेंगळे करवी अनितीने कैद करून कांगोरीच्या किल्ल्यावर बंदिवासात ठेवले होते. पण त्यांचा मूळ स्वभाव क्रांतिकारक असल्याने त्यांना स्वस्थ बसून राहणे कधी जमलेच नाही. कैदेत असतांना देखील त्यांनी त्यावेळेस चा इंग्लिश अधिकारी एल्फिस्टन याला २५ जानेवारी १८१८ ला पत्र लिहून दोन पलटणे पाठवण्याची मागणी केली होती. सगळ्या गोष्टी पत्रात सांगता येणार नाही म्हणून गोविंदराव गायकवाड यांना सविस्तर बोलण्यासाठी पाठवले. बोलणे झाल्यानंतर दोन पलटणे पाठवून द्या आणि त्यानंतर आपण भेटून तुमच्या आमच्या विचाराने पुढे काय करायचे हे ठरवू, असं श्रीमंत चतुरसिंग राजे म्हणतात.
या पत्रात श्रीमंत चतुरसिंग राजे म्हणतात, '' बाजीराव पेशवे यांनी आमच्या राज्याचा बंदोबस्त करून आम्हास कैदेत ठेऊन कारभार करीत आहेत. हाली पाठवून नाना प्रकारचे उपद्रव आम्हास करीत आहेत. या प्रकारे आमची अवस्था आहे म्हणोन तुम्हास पत्रे पाठवली होती. तरी या समई आम्हास कुमकेस दोन पलटणे पाठवून द्यावी म्हणजे इकडून बंदोबस्त करीत येतो. भेटणीनंतर बोलणे होऊन तुमचे आमचे विचारे जे करणे ते करावयासी येईल. येविसी गोविंदराव गायकवाड पाठविले आहेत. मुखजबानी सविस्तर बोलतील ते समजून पलटण रवानगी करावी. चित्तात कोणयेक अंदेशा आणू नये. ''
श्रीमंत चतुरसिंग राजे यांच्या या पत्राचा काळ हा जानेवारी १८१८ म्हणजे इंग्रज आणि मराठा यांच्यासाठी खूप धामधुमीचा होता. म्हणून कदाचित एल्फिस्टन या इंग्रज अधिकाऱ्याने श्रीमंत चतुरसिंग राजे यांना प्रतिसाद दिला नसावा.
कदाचित हे पत्र श्रीमंत चतुरसिंग राजे यांचे अखेरचे पत्र असावे कारण या नंतर तीन महिन्यांच्या आतच १५ एप्रिल १८१८ ला स्वराज्याच्या सेनापतींचे दुःखद निधन झाले.

श्रीमंत बळवंतराव राजेभोसले सेनापती वावीकर उर्फ बाळासाहेब सेनापती

 

श्रीमंत बळवंतराव राजेभोसले सेनापती वावीकर उर्फ बाळासाहेब सेनापती 
पोस्तसांभार :: © श्रीमंत राजेभोसले वावीकर

इसवी सन १७७७ मध्ये श्रीमंत छत्रपती रामराजे महाराज यांच्या वारसाचा शोध वावी येथे येऊन संपला. मराठा स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत आजोबा असलेल्या श्रीमंत विठोजी राजेंचे वंशज असलेल्या वावीकर राजेभोसले घराण्यातून सरदार त्रिंबकजी राजेभोसले यांचे ज्येष्ठ सुपुत्र विठोजी राजे यांना दत्तक घेण्यात आले. त्यांचे नाव बदलून शाहू (धाकटे) असे ठेवण्यात आले. त्यांचे लहान बंधू चतुरसिंग राजे आपल्या भावासमवेत म्हणजेच श्रीमंत छत्रपती शाहू धाकटे यांच्या समवेत सातारा येथे राहू लागले.
श्रीमंत छत्रपती शाहू (धाकटे) यांचा विवाह नारायणजी मोहिते हंबीरराव माजगावकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई साहेब यांच्यासोबत झाला. महाराणी लक्ष्मीबाई साहेब यांच्या लहान बहीण बबईबाई साहेब यांचा विवाह सोहळा श्रीमंत चतुरसिंग राजे यांच्यासोबत २६ नोव्हेंबर १७८९ ला सातारा येथे पार पडला. श्रीमंत चतुरसिंग राजे हे मराठ्यांच्या इतिहासातील एक क्रांतिकारक व्यक्तिमत्व. ते मराठा साम्राज्याचे सेनापती झाले होते. श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले वावीकर आणि बबईबाई साहेब यांना १८ जुलै १७९८ ला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांचे नाव श्रीमंत बळवंतराव राजे. त्यांच्या जन्माचा मोठा उत्सव श्रीमंत छत्रपती शाहू (धाकटे ) महाराज आणि श्रीमंत चतुरसिंग राजे यांनी केला. श्रीमंत बळवंतराव राजे हे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (धाकटे) यांचे पुत्र श्रीमंत प्रतापसिंह राजे, रामचंद्र राजे आणि शहाजी राजे यांच्यासमवेत वाढू लागले.
श्रीमंत चतुरसिंग राजे यांना आपले बंधू छत्रपती शाहू (धाकटे) महाराज यांना होणारा त्रास असह्य वाटू लागला होता. मूळच्या क्रांतिकारक विचारांचे असल्याने श्रीमंत चतुरसिंग राजे मराठा सरदारांचे पाठबळ मिळविण्यासाठी इसवी सन १८०३ मध्ये साताऱ्यातून बाहेर पडले. श्रीमंत चतुरसिंग राजे यांनी छत्रपतींसाठी, मराठा साम्राज्यासाठी आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा, कुटुंबाचा कुठलाही विचार न करता भारतभ्रमंती सुरु केली. श्रीमंत चतुरसिंग राजे यांच्या क्रांतिकारक विचाराना अटकाव घालण्यासाठी दुसरा बाजीराव पेशवे याने त्यांची पत्नी बबईबाई साहेब आणि त्यांचे चिरंजीव श्रीमंत बळवंतराव राजे यांना कैद करून पुण्यात आणलं आणि ओलीस ठेवले.
श्रीमंत छत्रपती शाहू (धाकटे) यांच्यानंतर श्रीमंत प्रतापसिंह महाराज छत्रपती झाले. मे १८११ मध्ये दुसरा बाजीराव पेशवे याने त्रिंबकजी डेंगळे यांच्याकरवी श्रीमंत चतुरसिंग राजे यांना कैद करून कांगोरीच्या किल्ल्यात बंदिवासात ठेवले. त्यानंतर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी बबईबाई साहेब आणि श्रीमंत बळवंतराव राजे यांना सोडवून साताऱ्यात आणले.
१४ डिसेंबर १८१७ ला इंग्रज अधिकारी पेशवाईच्या विरोधात चालून आले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी इंग्रजांशी संधान साधू नये म्हणून बाजीरावाने त्यांना कुटुंब कबिल्यासह सिद्धटेक येथे लष्करी छावणीत बोलावून घेतले आणि त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची प्रचंड फरपट केली. काही दिवसातच बाजीराव छत्रपतींना सोडून पळून गेला. तेव्हा श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या समवेत मातोश्री माईसाहेब, महाराजांचे भाऊ श्रीमंत रामचंद्र राजे आणि श्रीमंत शहाजी राजे आणि श्रीमंत बळवंतराव राजेभोसले वावीकर हे होते. त्या कठीण प्रसंगी श्रीमंत बळवंतराव राजे, खंडोजी शिंदे, राघोजी भोसले, सदोबा खलतकर, खंडोजी भोसले, बागाजी मुसळे, बापू जाधव हे छत्रपतींभोवती कोट करून उभे होते. त्यानंतर छत्रपती आणि इंग्रज भेट होऊन ११ मार्च १८१८ ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे पुन्हा राज्यारोहण करण्यात आले. त्यानंतर श्रीमंत चतुरसिंग राजे यांचे आणि काही काळानंतर बबईबाई साहेब यांचे दुःखद निधन झाले.
इसवी सन १८२३ च्या विजयादशमीच्या दिवशी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी श्रीमंत बळवंतराव राजेभोसले वावीकर यांची सरलष्कर पदी नेमणूक केली. सन १८२४ च्या नाशिक त्रिंबक भेटीच्या वेळेस देखील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या सोबत श्रीमंत शहाजी राजे आणि सरलष्कर श्रीमंत बळवंतराव राजेभोसले हे सावलीप्रमाणे होते. सन १८२५ मध्ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी श्रीमंत बळवंतराव राजेभोसले वावीकर यांना सेनापती पद देऊन त्यांचा मोठा गौरव केला. श्रीमंत चतुरसिंग राजे हे मराठा साम्राज्याचे सेनापती होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र श्रीमंत बळवंतराव राजेभोसले वावीकर हे सेनापती झाले होते.
मराठी रियासतकार म्हणतात, '' चतुरसिंगचा कर्तृत्ववान पुत्र बळवंतराव सेनापती मराठ्यांचा अत्यंत अभिमान बाळगणारा होता. छत्रपती प्रतापसिंह महाराज, बळवंतराव सेनापति, बळवंतराव चिटणीस हे सर्व तरुण व होतकरू पुरुष एकविचाराने वागून बदललेल्या परिस्थितीत राज्याची व समाजाची उर्जितावस्था करण्यास अत्यंत आतुरतेने झटू लागले.'' ६ ऑक्टोबर १८३३ ला गव्हर्नर लॉर्ड क्लेअरने छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची भेट घेऊन बळवंतरावांविषयी लिहून ठेवले, '' काही प्रसंग ओढवल्यास लोकांचे डोळे बाळासाहेब सेनापतीकडे लागतात, कारण तो हुशार व तरतरीत आहे.''
श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती हे अतिशय कर्तृत्ववान होते. १८३९ मध्ये इंग्रजांची एक पलटण साताऱ्यावर चालून आली. श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांचा विचार होता कि त्यांच्यासोबत लढाई करून शर्थ करावी. दोघांच्या लढाईत शहर लुटले जाईल म्हणून छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी त्यांना रात्रभर जाऊ न देता त्यांची तलवार काढून त्यांना काठी देऊन आपल्याजवळ ठेवले. कारण तो शूर सेनापती प्रसंग प्राप्त झाल्यास कोणत्याही साहसास कचरणारा नव्हता. मृत्यू पर्यंत श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांनी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची सावली बनवून हनुमानाप्रमाणे त्यांची सेवा केली.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी ७ डिसेंबर १८३९ ला काशीला प्रयाण केले. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या दोन महाराणी, कन्या गोजराबाई साहेब, श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती, त्यांची पत्नी गुणवंताबाई साहेब , सेनापतीचे काका - श्रीमंत छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर, महाराजांना मानणारे सर्व आप्तेष्ठ होते. तेव्हा श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांची पत्नी गुणवंताबाई साहेब या गरोदर होत्या. त्याचा कोणताहि विचार मनात न आणता श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती हे आपल्या पत्नी गुणवंताबाई साहेब यांच्यासमवेत काशीस निघाले. या प्रवासात खान्देशात सांगवी मुक्कामी १२ जानेवारी १८४० रोजी गुणवंताबाई साहेब प्रसूत होऊन त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्रिंबकजी असे ठेवण्यात आले. जंगलात जन्म झाल्याने त्यांना जंगली महाराज हे नाव पडले. त्यांच्या जन्माचा कुठला उत्सव तर सोडा साधा आराम सुद्धा न करू देता इंग्रज अधिकाऱ्याने भोयांना पालखी उचलण्याचा इशारा केला. पालख्या काशीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. याच त्रिंबकजी उर्फ जंगली महाराज यांना श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी दत्तक घेऊन त्यांचे नाव ठेवले श्रीमंत शाहू उर्फ शहाजी महाराज.
या प्रवासात श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांना ताप येऊ लागला होता. इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्यावर कुठलाही औषधोपचार करू दिला नाही. ज्वर वाढत गेला. मुलगा झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी २७ जानेवारी १८४० ला स्वराज्याचे सेनापती आपल्या तान्ह्या मुलाला परकं करून, गुणवंताबाई साहेब यांना विधवा करून इहलोकी गेले. मध्य प्रदेशातील महू जवळील तिकुराई येथे स्वराज्याच्या सेनापतींचे श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती उर्फ बाळासाहेब सेनापती यांचे निधन झाले. प्रबोधनकार ठाकरे आपल्या रंगो बापूजी आणि प्रतापसिंह महाराज या पुस्तकात बाळासाहेब सेनापती यांचे निधन आमांशाने म्हणजे अतिसाराने झाले आहे असं मांडले आहे.
मराठी रियासतकार म्हणतात, "श्रीमंत चतुरसिंग राजे यांच्या पश्चात त्यांचा पुत्र श्रीमंत बळवंतराव सेनापती यांनीही छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या सेवेत आपला देह खर्चिला. उभयतां बापलेकानी एकनिष्ठपने छत्रपतींची सेवा मारुतीसारखी केली. मराठा साम्राज्यासाठी कष्ट मेहनत करून फार लढाया केल्या. प्राणानिशी खर्च झाले. या पितापुत्र राजे भोसलेनी चाकरी करून नमक अदा केले. आपले इनाम कायम राखले."
त्रिंबकजी उर्फ जंगली महाराज यांच्या दत्तकविधानानंतर लगेचच गुणवंताबाई साहेब यांनी संताजी राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव तात्याबा यांस दत्तक घेऊन त्याचे नाव दुर्गासिंह ठेवले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्यांना दुर्गासिंह सेनापती असे संबोधले.
मराठा साम्राज्याची आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची अखेरपर्यंत सेवा करणाऱ्या श्रीमंत बळवंतराव राजेभोसले सेनापती वावीकर उर्फ बाळासाहेब सेनापती यांच्या १८२ व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन.
© श्रीमंत राजेभोसले वावीकर

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...