विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 25 February 2024

"दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न सांभाळणारे राजनीतीधुरंधर छत्रपती राजाराम महाराज"

 


"दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न सांभाळणारे राजनीतीधुरंधर छत्रपती राजाराम महाराज"
____________________
____________________
साधारण १६९९ चा तो काळ. औरंगजेबाला मराठ्यांनी झुंजवून पुरता जेरीस आणलेला. राजकीय डावपेचानं आठ-दहा वर्ष जिंजी लढवून राजाराम महाराज महाराष्ट्रात परतलेले. औरंगजेबापासून पळण्याचा काळ सरलेला, आता औरंगजेबावर निर्णायक घाव घालण्याची मराठयांची बारी. १६९९ च्या साधारण सप्टेंबरमध्ये राजाराम महाराजांनी धनाजी जाधवराव, खंडेराव दाभाडे, परसोजी भोसले ह्यांना सोबत घेवून औरंगजेबाने गिळलेला मुलुख जिंकायला सुरुवात केली. एवढ्यावरच मराठे थांबले नाहीत तर पुढे काही दिवसात भीमा नदी उतरून ब्रम्हपुरीतल्या औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून कैद शाहू महाराजांना सोडवण्याचा प्रचंड धाडसी प्रयत्नही मराठ्यांनी केला. ज्याचं नेतुत्व खुद्द राजाराम महाराज करत होते. हा हल्ला निकामी ठरला पण मराठे खचले नाहीत. शाहू महाराज सुटू शकले नाहीत तरीही मराठयांचं आधीच वाढलेलं मनोबल ह्या हल्यानं अजूनच उंचावलं.
२२ डिसेंबर १६९९ रोजी विठोबा बाबर ह्यांना राजाराम महाराजांनी एक पत्र लिहिलं ज्यात त्यांच्या कमालीच्या उंचावलेल्या मनस्थितीचं दर्शन घडतं. त्या पत्रात राजाराम महाराज म्हणतात,
" आम्ही सिंहगडावर पोचलो आहोत, आणि बादशहाच्या सैन्याचा पाडाव करण्यासाठी आपल्या सर्व शक्तीनिशी पुढे निघणार आहोत. सेनापती धनाजी, नेमाजी शिंदे, परसोजी भोसले आणि इतर पुढार्यांनी ब्रह्मपुरी येथे तळ देऊन असलेल्या बादशहाच्या छावणीवर भयंकर हल्ला केला, त्यांनी बादशहाच्या मुलीला व इतर अनेक प्रमुख कुटुंबियांना पकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांनी, दहा हजार बैलांचा एक तांडा पडकला. या बैलांवरून बादशाही सैन्याला रसद पुरवली जात होती. हे सैन्य सातार्याकडे निघाले आहे. गनिमाचे धैर्य गळाले आहे. त्यामुळे या सैन्याचा सातार्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्हाला आता या बादशहाच्या सामर्थ्याची दखल घेण्याची गरज वाटत नाही. ईश्वरकृपे आम्ही त्याला पार उखडून टाकू."
ह्यानंतर लगेच राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी बादशाही छावणीवर हल्ला केला. राजारामांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाच्या छावणीवर मराठ्यांनी केलेल्या हल्ल्याचा सविस्तर रंजक वृत्तांत चिटणीस बखरीत आलाय जो वाचण्यासारखा आहे. ही वेगवान मोहीम राजाराम महाराजांच्या तब्ब्येतीवर बेतली. ह्या मोहिमेनंतर त्यांनी अंथरूण धरलं.
आहे ते स्वराज्य वाटेल त्या किमतीवर राखण आणि त्याचा मिळेल तसा उपभोग घेणं ही राजाराम महाराजांनी वृत्ती कधीच नव्हती. वडिलांसारखा, मोठ्या भावासारखा त्यांचा पिंडही जातीचा लढवय्या होता. औरंगजेबाला पुरता खिळखिळा करून त्याच्या दिल्लीचाच घास घ्यावा हे थोरल्या महाराज साहेबांचं स्वप्न त्यांनीही उरी सांभाळलं होतंच ( जे पुढं थोरल्या शाहू महाराजांनी पूर्ण केलं.).
घोरपडे घराण्याचा एक नातलग कृष्णाजी (?) यांना सरंजाम ठरवून दिला तेंव्हा त्यात राजाराम महाराजांची वाक्यं त्यांच्या दिल्ली विजयाच्या स्वप्नाचं थेट दर्शन घडवतं.
राजाराम महाराज लिहीतात,
" महाराष्ट्र धर्म पूर्ण रक्षावा हा तुमचा संकल्प स्वामिनी जाणून उभयतास जातीस व फौजखर्चास सहा लक्ष होनांची नेमणूक चालवण्याचा निश्चय करून दिधला असे. पैकी (१) रायगड प्रांत व (२) विजापूर (३) भागनगर व (४) औरंगाबाद हे चार काबीज केल्यावर दर कामगिरीस पाऊण लाखाप्रमाणे एकदंर तीन लाख आणि बाकीचे तीन लाख प्रत्यक्ष दिल्ली घेतल्यावर द्यावयाचे असा निश्चय केला आहे. एकनिष्ठपणे सेवा करावी. स्वामी तुमचे बहुतेक प्रकारे चालवितील."

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...