विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 29 January 2019

संभाजी आंग्र्यांची (इंग्रजी चांदी वापरून पाडलेली!) नाणी आणि कॅप्टन ॲन्सेल्मची सॅलरीस्लीप (१७३६ मधली!)

संभाजी आंग्र्यांची (इंग्रजी चांदी वापरून पाडलेली!) नाणी आणि कॅप्टन ॲन्सेल्मची सॅलरीस्लीप (१७३६ मधली!)
लेखक :- संकेत कुलकर्णी (लंडन)
=========================
१८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत ईस्ट इंडीया कंपनीच्या सागरी व्यापाराचे बस्तान चांगलेच बसले होते. व्यापारासाठी कंपनीकडे स्वत:ची जहाजे होतीच पण त्याचबरोबर बरेचदा अतिरिक्त मालाची वाहतूक करण्यासाठी कंपनी इतर जहाज मालकांकडून किंवा जहाज कंपन्यांकडूनही जहाजे भाडेतत्वावर (chartering) घेत असे. ह्या बोटावरचे कॅप्टन (त्यांना ‘शिपमास्टर’ म्हणत) आणि खलाशी त्या दुसऱ्या कंपनीचे नोकर असत पण माल मात्र ईस्ट इंडीया कंपनीचा असे. ह्या जहाजांवर देखरेख करण्यासाठी ईस्ट इंडीया कंपनीचे अधिकारीही कधीकधी ह्या दुसऱ्या जहाजांवर असत. अजून एक पध्दत त्या वेळी रूढ होती ती म्हणजे ह्या जहाजवाहतूक करणाऱ्या कंपन्या खलाश्यांचे पगार त्यांच्या हाती देत नसत. कारण खलाशी हे पैसे बाई - बाटली - जुगारात उडवून टाकत असत. असं होऊ नये म्हणून हे पगार खलाश्यांच्या बायकांना दिले जात आणि त्यांची सही त्या कागदांवर घेतली जात असे.
असेच एक जहाज होते ‘डर्बी’. ‘मेसर्स जॉन स्पेन्सर ॲंड हेन्री क्रॅब’ ह्या कंपनीचे हे जहाज ईस्ट इंडीया कंपनीने भाडेतत्वावर घेतलेले होते. ह्या जहाजाचा कॅप्टन होता अब्राहम ॲन्सेल्म. त्याला महिन्याचा पगार होता £३.५०. त्याच्या २३ जुलै १७३६ रोजी मिळालेल्या दोन महिन्याच्या पगाराची - म्हणजे £७ ची ही पावती. हा पगार त्याच्या बायकोला - मिसेस रेबेका ॲन्सेल्मला दिल्याचा उल्लेख आहे. पण त्याचा हा पगार तिला देण्याचे कारण मात्र वेगळे आहे. ह्या काळात कॅप्टन ॲन्सेल्म विजयदुर्गावर संभाजी आंग्र्यांच्या तुरूंगात खितपत पडलेला होता. त्याची ही गोष्ट.
ह्या डर्बी जहाजाने बंगाल ते इंग्लंड माल वाहतूक एकदा केलेली होती. पण दुसऱ्या गोव्याहून निघाल्यानंतर सफरीदरम्यान २६ डिसेंबर १७३५ रोजी संभाजी आंग्र्यांनी ९ जहाजे घेऊन त्याच्यावर दक्षिण कोकणात हल्ला केला आणि पकडून विजयदुर्गाकडे आणले. कॅप्टन ॲन्सेल्मसह बरेच खलाशीही पकडले गेले. डर्बीवर आंग्र्यांना ३ पेट्या भरून चांदी मिळाली. सोबत चांदीचे ३२००० स्पॅनिश डॉलर्सही होते. मालाची किंमत सुमारे वीस लाख होती. (विचार करून पहा - १७३० मध्ये फक्त सुमारे सोळा हजार रुपयांत पुण्यात शनिवारवाडा बांधून झाला होता म्हणजे त्या काळी वीस लाख रूपयांची काय किंमत असेल!) ईस्ट इंडीया कंपनीच्या इतिहासातही संपूर्ण जगात सागरी चाच्यांनी त्यांची केलेली ही सर्वात मोठी लूट होती - ह्यावरूनही लुटीचा अंदाज येईल. संभाजी आंग्र्यांना ह्या लुटीने मोठा हात दिला. त्यांची बरीचशी ह्यामुळे कर्जे फिटली.
(एक अशीही गोष्ट सांगतात की, ह्या डर्बी जहाज जिंकल्यावर त्याच्यावरील इंग्लिश तलवारी पाहून त्या केवळ ‘लोणी कापायच्या’ कामाला योग्य आहेत असे उद्गार संभाजी आंग्र्यांनी काढले होते - खरे खोटे इतिहासालाच माहीत!)
इथे विजयदुर्गावर तुरूंगात ठेवलेल्या इंग्रज खलाश्यांचे मात्र हाल झाले. त्यांना शिधा म्हणून फक्त भात आणि पाणी दिले जात असे. आंग्र्यांसमोर आणून त्यांना सतत छळाच्या धमक्या दिल्या जात असत. कॅप्टन ॲन्सेल्मबरोबर पुढे आंग्र्यांनी ओळख वाढवली. डर्बीवरच्या मालाची मोजदाद आणि त्याचा भाव निश्चित करायचे कामही ॲन्सेल्मने केले. पोर्तुगीजांना हा सगळा माल विकायचा आंग्र्यांचा मनसुबा होता. बरेचदा थोडी ‘जास्त’ झाल्यावर आंग्रे आणि त्याचे सहकारी चक्क लंडनवर हल्ला करून ते बेचिराख करायच्या ‘गप्पा’ मारत असत - हे ॲन्सेल्मने त्याच्या रिपोर्टसमध्ये लिहून ठेवलेले आहे!
७ नोव्हेंबर १७३६ रोजी मुंबईचा गव्हर्नर जॉन हॉर्नच्या सांगण्यावरून कॅप्टन इंचबर्ड विजयदुर्गावर वाटाघाटींसाठी आला. डर्बीच्या खलाश्यांना सोडवणे हे कामही त्याला सांगितले होते. इथेही त्यांचा एक डाव होता. इंग्रज कैद्यांसाठी म्हणून त्याने काही पत्रं आणली होती. प्रत्येक पत्रात सोन्याच्या पुतळ्या (व्हेनेशियन डुकाट्स) लपवलेल्या होत्या. वेळ पडताच कैद्यांनी आंग्र्यांच्या पहारेकऱ्यांना त्याची लाच द्यावी व तुरूंगातून निसटायची योजना आखावी हा इंचबर्डचा हेतू होता. पण आंग्रे त्यालाही पुरून उरले. त्यांनी ती कैद्यांसाठीची पत्रंही इंचबर्डला आधी उघडायला लावली. त्यातूनही त्यांना ९०० सोन्याच्या पुतळ्यांची ‘लूट’ मिळाली! कैद्यांनी आपले सोने परत मिळावेत म्हणून बऱ्याच विनंत्या केल्या. शेवटी आंग्रे कबूल झाले पण त्यांनी अट घातली की ते चांदीच्या रुपयांत त्या सोन्याची किंमत देतील. चांदीचे रूपये कुठले - तर डर्बीवर लुटलेल्या चांदीचेच आंग्र्यांनी रूपये पाडले आणि कैद्यांना दिले. ह्यांना ‘बंदर राजापूर नाणी’ म्हणतात. मुघल बादशाह मुहम्मदशहाच्या नावाने ही नाणी पाडली गेली. म्हणजे गंमत पहा - चांदी इंग्रजांची - नाणी पाडणार आंग्रे - मुघल बादशहाच्या नावाने - आणि देणार पुन्हा त्याच इंग्रजांना - त्यांच्याकडून जप्त केलेल्या सोन्याच्या मोबदल्यात. ह्यात आंग्र्यांचे नुकसान शून्य होते! ह्यातली काही नाणी आजही पहायला मिळतात. सोबत त्यांचे फोटो देतोय. (डॉ. शैलेन्द्र भांडारे ह्यांनी ह्या विषयावर एक पेपरही पब्लिश केलेला आहे. फोटोही त्यांच्याकडचेच आहेत.)
सुमारे १८ महिने कंपनी सरकारने पत्रव्यवहार आणि वाटाघाटी केल्यावर ॲन्सेल्म आणि बाकी खलाश्यांना सोडवण्यात त्यांना यश आले. कॅप्टन ॲन्सेल्मचे मात्र पुढे फार हाल झाले. १७३८ मध्ये इंग्लंडला परतताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. जहाज आणि त्यावरील माल गेल्याने त्याला ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आले. लढाई न करता डर्बी जहाज आंग्र्यांना दिल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. ह्या आगळीकीबद्दल त्याचे पगार आणि पेन्शनही बंद करण्यात आले. त्याने मृत्यूपूर्वी बरेच पत्रव्यवहार - कोर्टकचेऱ्या केल्या पण कसलाही उपयोग झाला नाही. ह्यातल्या एका पत्रांत कॅप्टन ॲन्सेल्म आंग्र्यांबरोबरच्या लढाईचे सखोल वर्णनही करतो. डर्बी जहाजाच्या मूळ शिपिंग लॉगसोबत आजही हे पत्रव्यवहार ब्रिटीश लायब्ररीत उपलब्ध आहेत - ते कागदही अभ्यासकांसाठी विशेष वाचनीय आहेत.
- संकेत कुलकर्णी (लंडन)

Wednesday, 23 January 2019

वडगावची लढाई



वडगावची लढाई



वडगावची लढाई मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली. याला पहिले मराठा-इंग्रज युद्ध म्हणूनसुद्धा ओळखले जाते. मराठे व इंग्रज यांच्यात एकूण तीन लढाया झाल्या. भारताच्या इतिहासात या तीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लढायांत मराठ्यांचे नेतृत्व तुकोजीराव होळकर महादजी शिंदे यांनी केले. मराठ्यांनी या लढायांत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन क‍रून इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले.



पार्श्वभूमी
माधवराव पेशवे यांच्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने १७७२ ला झालेल्या अकाली निधनानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव यांना पेशवेपदी बसवले गेले. पण माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका रघुनाथराव ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने रघुनाथरावांची सत्तालालसा वाढली व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. पण रघुनाथरावाच्या पत्नी आनंदीबाई यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठीतला मजकूर "नारायण रावांस धरावे" ऐवजी " नारायण रावांस मारावे" असा केला. मराठीतील ध चा मा करणे ही म्हण याच प्रसंगावरुन पडली. नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावा पेशवेपद मिळाले. पण बऱ्याच जणांना ते रुचले नाही. नाना फडणवीसांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विरोध केला. नारायणराव पेशव्यांच्या पत्नी गंगाबाई या नारायणरावांच्या खूनावेळी गर्भार होत्या. त्यांना पुरंदर किल्ल्यावर हलवले गेले. यथावकाश त्यांना ही मुलगाच झाला. त्याचे नामकरण सवाई माधवराव असे केले गेले. छत्रपतींनीसुद्धा त्यांनाच पेशवे पदासाठी मान्यता दिली. त्यातच रामशास्त्री न्यायमूर्तींनी रघुनाथरावांना खुनासाठी दोषी धरत देहान्त प्रायश्चिताची शिक्षा दिली. ती रघुनाथराव मान्य करणे शक्यच नव्हते. त्यांनी इंग्रजांशी संधान साधून पुणे सरकारच्या विरोधात युद्ध पुकारले
रघुनाथरावांची भूमिका
पेशवेपदावरचा आपला हक्क सोडण्यास रघुनाथराव तयार नव्हते. मुळात नारायणरावांच्या खुनाच्या आरोपाचा ससेमिरा चुकवण्यासाठी निजामावर मोहिमेची आखणी केली. रघुनाथराव हे परमप्रतापी असल्याने (१७५० च्या दशकात त्यांनीच अटकेपार सैन्य नेत मराठ्यांचा वरचष्मा उत्तर भारतात पुन्हा स्थापन केला होता.) कोणी उघड विरोध केला नाही. पण मुळात निजामाला न दुखावता त्यांनी मोहीम अर्थहीन ठेवली. त्याचाच फायदा घेत बरेच जण साथ सोडून गेले. नाना फडणीस, सखाराम बापू, हरिपंत खुबीने पुण्यास परत आले. पण सवाई माधवरावांच्या जन्मानंतर त्यांना पेशवे घोषित करून कारभार पाहू लागले. याकाळात रघुनाथराव जास्त सैन्य न उरल्याने सरळ पुण्यावर चालून न येता, त्यांनी शिंदे , होळकरांसोबत बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या दबावामुळे शिंदे , होळकरांनी त्यांनी सरळ नकार न देता झुलवत ठेवले. अखेर त्यांनी इंग्रजांकडून मदत मिळवण्यासाठी पुण्यातील वकील माष्टीनशी बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या पैशांच्या मागणीवरून आणि इंग्रजांच्या मुलुखाच्या आणि महसुलाच्या मागण्यांवरून करार पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या. अखेर रघुनाथरावांनी गुजराथेतून आपल्या मित्रफौजेसोबत नर्मदा ओलांडून मराठ्यांवर चढाई केली. पण हरिपंत तात्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्यांचा पराभव केला. कसेबसे तुटपुंज्या सैन्यासह रघुनाथराव सुरतेच्या इंग्रजांकडे पोहोचले. अखेर धर्मबंधन झुगारून त्यांनी समुद्र प्रवास करत मुंबई गाठली. वसई व सालशेत बेटे व गुजराथेतून सुरत ,भडोचचा महसुल इंग्रजांना द्यायचे मान्य करून, बदल्यात इंग्रजांकडून आगाऊ पैसे सैन्य खर्चासाठी घेत करार झाला.
इंग्रजांची भूमिका
त्यावेळी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे तीन विभाग होते. मुंबई , कलकत्ता, मद्रास. यातले कलकत्ता, मद्रास भाग सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले होते. तुलनेने मुंबई विभाग उत्पन्नात मागेच होता. त्यामुळे मुंबई विभाग दडपणात आणि मराठी साम्राज्याच्या राजकारणाच्या हस्तक्षेपाच्या संधी शोधत होता. मराठी साम्राज्याच्या नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतरच्या परिस्थितीचा फायदा उचलत त्यांनी सालशेत, साष्टी पूर्वीच ताब्यात घेतले. रघुनाथरावांनी आयती संधी दिली. याचकाळात इंग्लंडमध्ये कंपनीच्या विभागात मध्यवर्ती निर्णय अधिकार कलकत्याच्या प्रमुखाकडे दिले. मुंबई विभागाने तरीही तांत्रिक बाबींचा फायदा उचलत रघुनाथरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
नाना फडणीसांनी याविरुद्ध कलकत्याच्या कंपनीला तक्रार केली. कलकत्त्याने सुरतेच्या कराराला नामंजूर करत आपला स्वतःचा वकील आप्टन पुणे दरबारी/पुरंदर वर पाठवला. नाना फडणीसांनी त्याचे खास जंगी स्वागत करून पुरंदरचा तह ( मार्च १७७६) केला. यानुसार रघुनाथराव आणि पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेले रघुनाथराव यांना पुणे दरबारी हवाली करायचे होते. तर मुंबई विभागाने बळकावलेले काही भागही परत करायचे होते. मराठ्यांनी सालशेत अन वसई वरचा दावा बाजूला ठेवला.
पण मुंबई विभागाने साहजिकच हा करार मानायला नकार देत रघुनाथराव व पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेल्यांना हवाली केले नाही आणि प्रदेश परत देण्यासही टाळाटाळ केली. कलकत्ता कंपनीनेही प्रतिसादात टाळाटाळ केली. अखेर नाना फडणीसानी कलकत्ताला जरब म्हणून फ्रेंचाना सुरतेत जागा दिली आणि त्यांचे पुण्यात जंगी स्वागत केले. यावर कलकत्ता कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट, उत्तर भारतातून आपले सैन्य मदतीसाठी पाठवले. यात अयोध्येच्या नबाबाकडून मिळालेली कंदाहारी फौजही होती.
युद्ध
पावसाळा संपल्यानंतर इंगजांनी मुंबईहून साधारण ४००० सैनिकांची फौज घेत प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथरावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांनी पनवेल मार्गे, कर्जत-खंडाळा-पुणे असा मार्ग आखला होता.
मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकरही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथरावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्यासारख्या होत्या. का‍र्ले, खंडाळा या भागात इंग्रज पोहोचेपर्यंत मराठ्यांनी त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, तसतशी मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिके कापून जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून त्यातील पाणी पिण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीचे वेळीसुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्याला आल्या वर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढू दिला, हेतु हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा.
यादरम्यान उत्तर भारतातून येणाऱ्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. नागपूरच्या भोसलेंना तशा सूचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिल्यांनाही तशाच सूचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून आवश्यक रसदी इंग्रजांना मिळाल्याच नाहीत. ३१ डिसेंबरला इंग्रज फौजेने खंडाळ्याला मुक्काम केला. ४ जानेवारीला फौजा कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. ११ जानेवारी 7 ७९ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठी फौजेने माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगावचा आश्रय घेतला. १३ जानेवारीला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांनी १७७३पासून जिंकलेला सर्व मुलुख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्चही द्यायचा होता.

स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे 

स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे माणकोजी दहातोंडे सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा. मुळगाव – चांदा तालुका – नेवासा जिल्हा – अहमदनगर सुरूवातीच्या काळात शहाजीराजेंबरोबर निजामशाहीत काम. मुगलांविरूद्धच्या अनेक लढाईत माणकोजींचा मोठा पराक्रम. शहाजहान व आदिलशहा यांच्या बरोबर झालेल्या तहानंतर माणकोजी व शहाजीराजे विजापुरच्या सेवेत दाखल. विजापुरातच शहाजीराजेंनी माणकोजींना स्वराज्याचा संकल्प सांगितला. स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून शहाजीराजेंनी माणकोजींची नियुक्ती केली. शिवाजीराजेंच्या मदतीसाठी माणकोजी पुण्यात दाखल. माणकोजी दहातोंडे म्हणजे शहाजीराजेंचा खास जुना व इमानदार माणुस. माणकोजी हे शिवाजी महारांजाचे फक्त सरसेनापतीच नाही तर मार्गदर्शक व गुरूपण होते. माणकोजींच्या अनुभवामुळे व युद्धनितीमुळे स्वराज्याच्या सुरूवातीला शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. माणकोजी हे गनिमी कावातज्ञ म्हणून ओळखले जात. स्वराज्याच्या विस्तारात माणकोजींचे खुप मोठे योगदान. लोहगङ व विसापुरचे किल्ले माणकोजींनी स्वतः जिंकले. पुरंदरचा किल्ला महाराजांनी पहिल्यांदाजिंकला तेव्हा माणकोजी महारांजासोबत होते. १६५६ मध्ये जावळी जिंकली तेव्हा माणकोजी व रघुनाथ बळ्ळाल यांनी रणतोंङीच्या घाटात नाकेबंदी केली होती. १६५७ हे माणकोजींच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष. १४ मे १६५७ ला युवराज संभाजीराजेंचा जन्म. घरात नातवासमान युवराज जन्माला आल्यामुळे माणकोजींना आनंद. बढती – मार्च१६५९मध्ये माणकोजींना स्वराज्याचे प्रमुख सल्लागार व युद्धशास्र तज्ञ (Senior Adviser & Warfare Minister) म्हणून नियुक्त करण्यात आले. जिजाबाई व शिवाजीराजेंनीदरबारात खुप मोठा सत्कार केला. राजेंच्या सदरेवर माणकोजींना भारी वजन होते. सईबाईंचे निधन झाले तेव्हा माणकोजींनी जातीने महाराजांचे सांत्वन केले. अफजलखाना विरुद्धच्या लढाईच्या नियोजनामध्ये माणकोजींचा मोठा सहभाग होता. पुन्हा एकदा रणतोंङीचा घाट बंद करण्याचे ठरविले म्हणजे खान व त्याची फौज परत जाता कामा नये. खानाच्या भेटीआधीच्या बैठकीत माणकोजींचे खास मार्गदर्शन. खानाच्या भेटीला जाण्याआधी महाराजांनी माणकोजींचे दर्शन घेतले.
खानाला मारुन आल्यानंतर दारातच उभ्या असलेल्या माणकोजींना राजांनी मिठी मारली. खानाच्या वधानंतर शहाजीराजे व माणकोजींची पुण्यात भेट. शहाजीराजेंच्या स्वागताला माणकोजी हजर. खुप दिवसांनी भेट झाल्यामुळे दोघांनाही आनंद. शहाजीराजे , शिवाजीराजे, माणकोजी व जिजाबाई मध्ये स्वराज्याची खाजगीत चर्चा. माणकोजींची तब्येत ढासळते. जिजाबाई स्वतः भेटुन येतात व महाराजांना खबर देतात. महाराज स्वतः शिवापुरला माणकोजींना भेटायला जातात. शेवटच्या घटका मोजत असतांनाही माणकोजींना स्वराज्याचीच काळजी. एवढी प्रकृती खालावली असुनही स्वराज्याची चिंता बघुन महाराज गहिवरतात. महाराजांना शायिस्तेखानाचा बंदोबस्त करायला सांगतात. माणकोजी माँसाहेबांना मुजरा सांगतात. महाराज व माणकोजींची हिच शेवटची भेट. जुलै ते अॉगष्ट दरम्यान १६६२ मध्ये शिवापुर येथे माणकोजींचे निधन. माणकोजींच्या निधनाची बातमी राजांना कळते. लहानपणापासून बघितलेला एक जिव्हाळ्याचा माणूस गेल्याची राजांना खंत. महाराजांनी मोठ्या मानाने माणकोजींचा अंत्यविधि केला. माणकोजी हे दिलदार व मनमिळाऊ स्वभावाचे होते. शहाजीराजे व शिवाजीराजे या दोघांसाठी काम करणारे एकमेव सरसेनापती. सलग ३५ वर्षे स्वराज्याची सेवा. शहाजीराजेंसाठी १५ वर्षे तर शिवाजीराजेंसाठी २० वर्षे सेवा. १६४२-१६५९ अशी सलग सतरा वर्षे सरसेनापती म्हणून सेवा कराणारे एकमेव सरसेनापती. बाकीचे वर्षे प्रमुख सल्लागार (Senior Adviser) व युद्धशास्त्र तज्ञ (Warfare Minister) म्हणून काम. दोन्ही राजांची मर्जी असल्यामुळे संपत्तीचा मोह व चिंता कधीही नाही. माणकोजींना शेवटच्या श्वासापर्यंत फक्त स्वराज्याचाच ध्यास होता.

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...