विनोद जाधव एक संग्राहक

Monday 26 July 2021

सांगोला करार

 25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला



सांगोला करार :-
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर इ.स. १७०७ मध्ये निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले. चौथाई आणि सरदेशमुखीसाठी मात्र इ.स. १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. छत्रपती शाहू महाराज यांचा १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत त्यांना मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्रमी माणसे निवडून राज्यविस्तार केला. याकामी त्यांना बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव व बाळाजी बाजीराव हे कर्तबगार पेशवे आणि कान्होजी आंग्रे, रघूजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले.
बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे
दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली. परंतु मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता. म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्घाची तयारी केली.
सय्यद हुसेन अली बरोबर झालेल्या करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना दिल्लीला पाठविले. त्यांच्या सोबत राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते. हे सर्व सैन्य यथावकाश फेब्रूवारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले.
याची परिणीती म्हणून सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तुरुंगात टाकले आणि रफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले. सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या. त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छत्रपती शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंचे बंधू मदनसिंग, मातोश्री येसूबाई यांची सुटका करण्यात आली. परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छत्रपती संभाजी राजांबरोबरचा संघर्ष संपला नव्हता.
निजामाच्या मदतीने छत्रपती संभाजींनी छत्रपती शाहूं विरुद्घ मोहीम उघडली. ती आठ-दहा वर्षे चालली. अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीराव याने निजामाचा पालखेड युद्घात पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे तह होऊन छत्रपती शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथाई व सरदेशमुखीचा तोच खरा धनी आहे, हे निजामाने मान्य केले. त्यानंतर छत्रपती संभाजी व छत्रपती शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली.
वारणेच्या तहानंतर कोल्हापूर–सातारा अशी मराठी राज्याची दोन स्वतंत्र संस्थाने (छत्रपतींच्या गाद्या) उभयता मान्य करण्यात आली. तथापि कोल्हापूर व सातारा यांत आपापसांत पुढे अनेक वर्षे संघर्ष चालू होता. छत्रपती शाहूंना पुत्रसंतती नव्हती म्हणून त्यांनी महाराणी ताराबाई यांचा नातू रामराजा उर्फ राजाराम द्वितीय यांना दत्तक घेण्याचे ठरविले आणि मृत्यूपूर्वी राज्यकारभार-विषयक सर्व अधिकार आज्ञापत्राद्वारे पेशवे बाळाजी बाजीराव यांना दिले.
पुढे छत्रपती शाहूंच्या निधनानंतर, इ.स. १७४९ मध्ये राजाराम द्वितीय यांना विधिवत सातारच्या गादीवर बसविण्यात आले. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे व राजाराम द्वितीय यांत २५ सप्टेंबर १७५० रोजी सांगोला येथे करार झाला.
सांगोला करारानुसार पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावांनी त्यांना सालिना ६५ लाख रुपये नेमणूक करून दिली. राजाराम द्वितीय हे पेशव्यांच्या आहारी जात आहेत, हे पाहून ताराबाईंनी संधी साधून राजाराम द्वितीय यांना कैद केली. इ.स. १७५५ मध्ये बाळाजी बाजीरावांनी ताराबाईंशी समझोता केला, त्यामुळे प्रत्यक्षात ताराबाई राज्यकारभार पाहू लागल्या आणि राजाराम यांना फारसे अधिकार उरले नाहीत. पुढे ताराबाईंच्या मृत्यूनंतर (१७६१) जवळपासचा थोडाबहुत प्रदेश, इंदापूरची देशमुखी एवढाच मर्यादित अधिकार छत्रपतींना राहिला होता. तत्पूर्वीच मराठ्यांच्या सत्तेचे केंद्र पुणे होऊन पेशवे मराठी राज्याचे सूत्रधार-सर्वेसर्वा झाले.
स्रोत :-
ताराबाई | Wikiwand
बाळाजी बाजीराव पेशवे - विकिपीडिया
मराठ्यांच्या इतिहासात सर्वाधिक काळ पेशवेपदावर राहिले नानासाहेब

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...