सन १७५० ते १७५२ हा मराठयांचा इतिहासातला परमोच्च बिंदू होता.
त्यावेळी
मुघल साम्राज्याचा वजीर सफदरजंग होता. परंतु बादशहाची आई उधमबाई हिच्या
कारस्थानांमुळे तो निष्प्रभ झाला होता. रोहिले आणि पठाण यांनी एकत्र येऊन
सफदरजंगावर हल्ले करण्यास सुरवात केली. तेव्हा सफदरजंगाने मराठयांची मदत
मागितली. त्यावेळी शिंदे, होळकरांसह सर्व प्रमुख मराठे सरदार छत्रपती
रामराजांच्या राज्याभिषेकासाठी साताऱ्याला आले होते. ते जुलै, १७५० मध्ये
उत्तरेस जाण्यास निघाले. पण ते सफदरजंगास मदत करण्यापूर्वी अहमदशहा बंगश
याने अलाहाबादच्या किल्ल्याला वेढा दिला होता.
दोन
हजार मराठा सैन्य गंगा-यमुनेच्या अंतर्वेदीत घुसले. त्यांनी इटावा येथे
बंगशचा पराभव केला. त्यामुळे बंगशला अलाहाबादचा वेढा उठवावा लागला. रोहिले
त्याच्या मदतीला धावून आले. परंतु गंगाधर यशवंत या शूर सरदाराच्या
नेतृत्वाखाली मराठयानी रोहिल्यांवर आकस्मित भीषण हल्ला चढवला. या लढाईत दहा
हजार रोहिले मारले गेले आणि मराठ्यांना मोठा विजय मिळाला. या यशात
दत्ताजी शिंदे यांचा महत्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचा लौकिक पसरला.
मराठयांचा
या विजयाने सफदरजंगची बाजू सावरली गेली. एप्रिल, १७५२ मध्ये सफदरजंगाने
मराठ्यांशी करार केला. हा 'लखनऊ करार' या नावाने ओळखला जातो. या करारानुसार
शिंदे - होळकरांनी मुगल बादशहाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. त्याबदल्यात
मराठयांना पन्नास लाख रुपये आणि पंजाब, सिंध तसेच अंतर्वेदीत चौथाई वसूल
करण्याचा अधिकार मिळाला.
या
विजयाने मराठेशाहीत मोठा आनंद आणि उत्साह पसरला. नानासाहेब पेशव्यांनी
सरदारांना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, "…बहादूरखान रोहिला बुडवला.
पन्नाससाठ हजार फौज बुडवली. हजारो घोडी व हत्ती व तोफखाना पाडाव केले. बंगश
घाबरा होऊन गंगापार पळून गेला. हे वाचून संतोषप्राप्ती जाली. शाबास
तुमच्या हिमतीची आणि दिलेरी रुस्तुमीची. दक्षिणेच्या फौजानी गंगायमुना पार
होऊन पठाणांशी युद्ध करून फत्ते पावावे, हे कर्म लहान सामान्य नव्हे.
तुम्ही एकनिष्ठ कृतकर्मे दौलतीचे स्तंभ आहात."
काशी
- प्रयाग ही हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्रे आपल्या वर्चस्वाखाली आणण्याची
मराठयांची स्वप्ने आता दृष्टिपथात आल्यासारखी वाटत होती. औरंगझेबाला
मराठी मातीत गाडल्यावर मराठयानी घेतलेली गरूडभरारी 'हिंदुस्थान
हिंदवासीयांसाठी' हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणत होती. मराठयांचा इतिहासातला
हा परमोच्च बिंदू होता.
परंतु
इतिहासाचे रहाटगाडगे वरखाली होत असते. या परमोच्च बिंदुनंतर रहाटाचा
खालचा प्रवास सुरु झाला आणि नऊ वर्षांनी पानिपतचा प्रसंग घडला.
No comments:
Post a Comment