१० जानेवारी १७६०
बुराडीघाट
पोस्तसांभार :प्रसाद शिंदे
-----------------------------------------------------------
१० जानेवारी १७६० या दिवशी बुराडी घाटावर मराठ्यांच्या समशेरीतून निघणाऱ्या ठिणग्या अब्दालीच्या सैन्याच्या नुसत्या लाह्या करत होत्या.शत्रू संख्येने प्रचंड परंतु एखाद्या पर्वताप्रमाणे मराठ्यांच्या सेनापती त्यांच्या समोर उभा होता.सुभेदार दत्ताजीराव शिंदेंचा वेग प्रचंड, रणांगणावरील त्यांचा आवेश,ऊर्जा,चपळता आणि धाडसाचे वर्णन करावे तर शब्दही कमी पडतील.परंतु त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक मावळा झुंज देत होता.
सुभेदार दत्ताजीराव शिंदे शत्रूच्या गोटात मधोमध घुसून झुंज देत होते.त्यांचा प्रत्येक वार नजीब-कुतुबशहाच्या सैन्याच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या करत होता. गनीमांचा अक्षरशः चिखल करत सुभेदार दत्ताजीराव शिंदे हे जगदाळे,वाबळे,भोईटे,जगताप, निकम, भापकर,मोहिते या आपल्या सहकार्यासोबत खूप पुढे आले.दत्ताजीरावांचा लालमनी नावाचा घोडा पण जखमांनी सजून-धजून दत्ताजीरावांना साथ देत मोठ्या थाटात पठाणांना तुडवत-तुडवत दौडत होता.एखाद्या प्रलयाप्रमाणे मराठे शत्रूवर तुटून पडत होते.एक एक शिलेदार हिंदुस्थानच्या रक्षणासाठी कामी येत होता.काही वेळातच मालोजीराव शिंदे व बयाजीराव शिंदे पडल्याची खबर दत्ताजींच्या कानावर येते.परंतु शोक करण्यास फुरसत तरी कोणाला होती.दत्ताजीराव त्याच आवेशाने घोड्याला टाच मारून झुंज देत होते.परंतु तोफा आणि बंदुकानी सज्ज असलेले नजीबाचे आणि कुतुबशहाचे सैन्य मराठ्यांना मागे रेटत होते.
तलवारी,ढाली,भाले यावर ज्यादातर अवलंबून असणाऱ्या मराठयांची शत्रू पक्षाने तोफा आणि बंदुकीच्या केलेल्या माऱ्यामुळे दयनीय अवस्था झाली.अश्या प्रसंगी सुभेदार दत्ताजीराव शिंदेचे अंगरक्षक तानाजीराव खराडे म्हणतात की,"निशाण काढता उत्तम आहे." म्हणजेच युद्धातून तूर्तास माघार घेऊन जीव वाचवला पाहिजे.
यावर सुभेदार दत्ताजीराव शिंदे यांनी तानाजी खराडेंना क्षत्रिय धर्माची आठवण करून देत उत्तर केले की,"रणसोडुन निघाल्यास इकडे नरकसाधन,इकडे अपयश मरणाहून वोखटे. क्षत्रिय धर्म हाचकी रणात विन्मुख होऊ नये.या रणात ईश्वरे मृत्यू आणिला तरी उत्तम आहे.योगी संन्यासी नाना प्रकारचे देहदंड करितात की मोक्षसाधन व्हावे. अशात कोणी अभागी असेल तो विन्मुख होईल."
याचा अर्थ असा की रणभूमीतून पळून न जाता शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणे हाच खरा क्षत्रियांचा धर्म. रणभूमीतुन पळून जाणे म्हणजे जीवनभर अपयश आपल्या माथी मारून घेण्यासारखे होईल अश्या योद्ध्याच्या नशिबी नरकयातनाच येतात. साधू संन्याशी मोक्ष मिळावा म्हणून किती साधना करण्यात तल्लीन असतात आणि आपल्याला या रणभूमीत प्राण देऊन मोक्ष मिळणार असेल तर मी देवाचे आभार मानतो.कोणी कपाळकरंटाच असेल जो युद्ध सोडून पळून जाण्याचा विचार करत असेल.
सुभेदार दत्ताजीरावांचे हे शब्द कानी पडताच यशवंतराव जगदाळे,तानाजीराव खराडेच्यात अंगात वीरश्री संचारली.आणखी त्वेषाने ते लढू लागले. दत्ताजीरावांच्या खांद्याला खांदा लावत गनीम कापत सुटले.दत्ताजीरावांच्या पाठीवरचा वार आपल्या छातीवर घेत हे वीर धारातीर्थी पडले.तेवढ्यात एक गोळी दत्ताजींचा वेध घेत त्यांच्या बरकडीत घुसली आणि दत्ताजीराव आपल्या लालमनी घोड्यावरून वरून खाली कोसळले.दत्ताजींरावांना चारही बाजूंनी पठाणांनी घेरले.ही बातमी वाऱ्यासारखी नजीबाच्या आणि कुतुबशहाच्या कानावर पडली तडक त्यांनी दत्ताजीरावांना गाठले.सिंहासारख्या मराठ्यांचा सेनापतीची अशी अवस्था पाहून ही गिधाडे अधिकच चेकळू लागली.कुतुबशहाने पुढे सरसावत दत्ताजींच्या छातीवर बसत "क्यू पाटील और लढेंगे तुम हमारे साथ "?असा प्रश्न विचारला त्यावर सुभेदार दत्ताजीरावांनी प्राण एकवटून उत्तर केले की "क्यू नही बचेंगे तो और भी लढेंगे" दत्ताजीरावांचा हा आवेश पाहून कुतुबशहा चिवताळला त्याने दत्ताजीरावांचे शीर धडापासून वेगळे केले.
१० जानेवारी १७६० या दिवशी मराठ्यांच्या तेजस्वी सूर्याचा अस्त झाला. श्रीमंत सुभेदार दत्ताजीराव शिंदे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
प्रसाद शिंदे
No comments:
Post a Comment