विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

 संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दाखवून शत्रूच्या रुधीराचा अभिषेक आपल्या मातृभूमीला केला, त्या संताजींना आज भूमिगत होऊन वावरावे लागत आहे. तरी आपल्या ब्रिदाला कलंक लागू दिला नाही. आज त्यांच्या मागावर परकीय व स्वकीयही होते.

नागोजी माने जळभावी घाट ओलांडून पूर्वेला उतरला आणि कारखेल गावातून संताजींबद्दल विचारपूस करू लागला. पण गावकऱ्यांनी त्याला दाद दिली नाही. मग पर्यंती गावाजवळील डोंगरावर चढला. त्याच्याबरोबर सात-आठ माणसे होती. संपूर्ण डोंगर चिक्कार वृक्षांनी व्यापला होता. मोक्याची जागा पाहून प्राण डोळ्यात आणून सावज टिपण्यासाठी बसला.

कारखेलच्या परिसरात पर्यंती गावाजवळ एक जलौघ खळखळ वाहत होता. नागोजीने विचार केला, संताजी जंगलात कुठेही असला तरी, पाण्यासाठी ओढ्यावर त्याला यावंच लागेल. नागोजीने पूर्ण रात्र जीव मुठीत घेऊन काढली. दुसरा दिवस उजाडला. बाजूच्या झाडीतून सळसळ ऐकू आली, तसा नागोजी माने सावध होऊन कान टवकारले. एक मानवाकृती दबकत दबकत कानोसा घेत पुढे पुढे जात होती. तसा नागोजीही आकृतीच्या मागे अंतर ठेवून सावधतेने जाऊ लागला.

ती मानवाकृती ओढ्याच्या काठावर आली. इकडे तिकडे पाहत कपडे काढले. नागोजीने ओळखले, ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपली शिकार संताजी घोरपडेच आहे.

संताजींनी मेरु स्वामींचा अनुग्रह घेतल्यापासून सूर्योदयाची अंघोळ कधी चुकवली नव्हती. एवढे संकटे, एवढा वनवास पदरी आलात तरी मेरु स्वामींच्या महामंत्रानेच आपल्याला आधार दिला ही त्यांची पक्की धारणा होती. संताजी पाण्यात उतरले. त्याचवेळी नागोजी माने ओढ्या काठी येऊन लपून बसला. आंघोळ झाल्यावर संताजी नेहमीप्रमाणे ओंजळीत पाणी घेऊन सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पूर्वाभिमुख उभे राहिले. ओठातून आपोआप मंत्राचे शब्द उमटले.... ॐ नमो... संताजी देहभान विसरले. मंत्राचे शब्द आपोआप ओठातून बाहेर पडत होते. संताजी बाह्य जगाचे भान विसरले. आणि हीच संधी साधून नागोजी माने पुढे झाला आणि संताजीच्या मानेवर तलवारीचा प्रहार केला. पाण्यात उष्ण रक्ताची धार मिसळली. आत्मा परमात्मात विलिन झाला.

लाख वेळा तलवारीच्या वारांना सामोरी गेलेली पहाडी छाती शेवटपर्यंत अभंगच राहिली. "लढून मरावं, मरून जगावं" ही वडिल म्हाळोजींची शिकवण! संताजी आयुष्यभर लढले आणि परमेश्वराची आराधना करत या शूरवीराचा आत्मा परमात्म्यात विलीन झाला... कायमचा...

संताजीच्या हत्येचा वृत्तांत जिंजी दरबारात कळला मात्र! महाराणी ताराबाईंचा कंठ्ठ दाटून आला. महाराजांनी संताजींना एकाकी पाडले नसते तर हा मराठ्यांचा मोहरा असा स्वकीयांनीच लयाला धाडला नसता.

सदरेवर छत्रपती महाराज सुन्न मनाने एकटक महाद्वाराकडे पाहत होते. महाराजांचं मन व्याकूळ झाले. त्यांना खरं काय ते कळून चुकलं. संताजी मोगलांना फितूर झाला नव्हता. तसे असते तर बादशहाने नागोजीला हाताशी धरून खुन करायला लावलेच नसते. बादशहाला नागोजी सारख्यांची गरज नव्हती. त्याला शूर सरदार हवे होते. संताजी त्याला मिळाले असते तर, औरंगजेबाने दख्खनची सुभेदारी नक्की बहाल केली असती आणि त्याने तसे प्रयत्नही केले होते. पण संताजी लोभाला बळी पडले नव्हते.

संताजींनी एवढी लूट केली की ते आपली कोठारे भरू शकला असते. पण जे काही मिळाले ते त्यांनी रायगड, पन्हाळा, जिंजीच्या सरकारी खजिन्यात जमा करून, स्वराज्य उभारणीस हातभार लावला. संताजीने तन मन धन खर्च करुन अपूर्व मराठेशाही रुजवली, जगवली. एवढेच नाही तर, आणीबाणीच्या वेळेस छत्रपतींना परांगदा होण्याची वेळ आली तेव्हा, त्यांनी आपली समशेर पाजळून स्वराज्याचे रक्षण केले. राजाराम महाराजांचा कंठ दाटून आला. डोळे अश्रूंनी भरले. त्यांना आपली चूक उमगली.. पण वेळ निघून गेली होती.

कारखेलच्या घाटात संताजीचा वध केल्यावर काही अंतरापर्यंत नागोजीने त्यांच धड आणून तेथेच टाकले आणि त्या शूरवीराचे शिर बादशहाला नजर करण्यासाठी मोठ्या दिमाखात मिरवत घेऊन गेला.

देशाभिमानी मराठ मावळ्यांना संताजींच्या हत्येची खबर मिळताच त्यांनी कारखेलचे जंगल धुंडाळून संताजी घोरपडेंचं धड शोधून कुरुंदवाडला आणले आणि कृष्णा-पंचगंगेच्या पवित्र संगमावर संताजींच्या पार्थिवावर विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले.

तिकडे बादशहाच्या छावणीत भाल्याच्या टोकावर संताजीचे शिर घेऊन धिंड निघत होती.

ज्यांच्या हयातीत नुसत्या धसक्याने त्यांच्या आजूबाजूलाही फिकायला कोणी धजावत नव्हते, तेच त्यांचे निस्तेज शिराची टिंगल टवाळी करू लागले. मानोजी माने, गाजीउद्दीन फिरोजजंग संताजीच्या हत्येचे श्रेय आपल्या पदरात घ्यायला बादशहाच्या दरबारात धडपडत होते. पण नियतीने ते कोणालाही लाभू दिले नव्हते.....

खरं म्हणजे नागोजीच्या तलवारीचा घाव पडायच्या आधीच मेरु स्वामींनी दिलेला महामंत्र आळवीत परमात्म्याशी एकरूप झाले होते.

अशा या महान कर्तुत्वान पराक्रमी व शेवटी एकाकी पडल्यालेल्या वीराला कोटी कोटी प्रणाम!!

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : भाग- ४०

 संताजी घोरपडे : भाग- ४०

धनाजी जाधव यांनी छत्रपती राजाराम महाराजांना बरोबर पटवून दिले. एखाद्या बंडखोर सेनानीकडे एवढे मोठे सैन्य ठेवणे छत्रपतीच्या गादीला धोकादायक आहे, असे भासवून त्यांनी संताजीच्या फौजेतील बहुसंख्य सरदार, सैन्य आपल्याकडे घेतले.

संताजीच्या सैन्याला गळती लागली आणि दिवसेंदिवस सैन्य कमी होऊ लागले. तरी या ही परिस्थितीत त्यांनी स्वराज्याचा शत्रू झुल्फिकारखानला कर्नाटकात अप्रतिम झुंज दिली. त्यामुळेच झुल्फिकार खान जिंजीचा वेढा उठवून मद्रासकडील सागर पट्टीवरील वेल्लोर, बंदीवश, अर्काट इथे मोठ्या बंदोबस्ताने राहू लागला. तो अर्काटला असताना संताजी त्याच्यावर चालून गेले. खानला खबर मिळताच अर्काट मधून हळूच बाहेर पडला. पण वाटेत त्याला संताजींनी अडवून त्याची कोंडी केली. खानाच्या सैन्याची उपासमार होऊ लागली शेवटी त्यांनी आपल्याला अर्काटकडे जाऊ देण्याची दिनवाणी विनंती केली. संताजीला आपले पाठबळ कमी झाल्यामुळे जास्त ताणून धरले नाही. त्यांनी खानाला जाऊ दिले.

संताजींच्या सैन्याला लागलेली गळती थांबलेली नव्हती. इतक्या कमी सेनेनिशी कर्नाटकात राहणे धोक्याचे म्हणून, ते महाराष्ट्राकडे वळले. बरेच सहकारी सोडून गेले तरी अजून उमेद कमी झाली नव्हती. उमेद बाळगूनच त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. पण धनाजी त्यांचे मागावरच होते. त्यांनी हिंमतराव निंबाळकराला पुढे करून दहिगावजवळ संताजीवर हल्ला चढविला. सैन्याचे पाठबळ नसतानाही संताजींनी माळशीच्या परिसरात दहिगाव जवळ हनुमंतरावास रोखून धरले. तोच धनाजीने निंबाळकरांच्या मदतीला फौज धाडली. लढाईच्या धुमचक्रीत संताजीचे कैक सैन्य त्यांना सोडून पसार झाले. काही हनुमंतास जाऊन मिळाले. आणि वीस हजार फौजेचा मराठ्याचा सरसेनापती संताजी घोरपडे एकाकी... अगदी निवळ एकाकी राहिले.

ज्याने औरंगजेबाच्या बलाढ्य सत्तेला शह देऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आणलेल्या मराठेशाहीला वाचवले, त्याच मराठेशाहीच्या म्होरक्यांनी संताजीला एकाकी पाडले. शिखर शिंगणापूरच्या डोंगराळ भागात हा मराठ्यांचा अंजिक्य वीर शत्रूपासून, स्वकीयांपासून स्वतःचे रक्षण करत रानोमाळ भटकू लागला. फक्त आत्मबळ आणि मेरू स्वामींनी दिलेला अमोल मंत्राच्या जोरावर....

धनाजी-संताजीच्या शिगेला पोहोचलेल्या वैमनस्याची खबर बादशहाला कळल्यावर, या आयत्याच चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यायचे ठरवले. संताजी दुर्दैवाच्या फेर्‍यात पुरते अडकले होते. त्यातून बाहेर पडण्याऐवजी अधिकाधिक गुरफटत गेले. त्याला कारण धनाजीचे पूर्वग्रह दूषित असलेले डावपेच कारणीभूत ठरले. मराठ्यांच्या महाराष्ट्रात एकेकाळचा सरसेनापती मोगल शत्रू आणि स्वकीयांच्या कात्रीत भरडला गेला.

बादशाहच्या छावणीत घोरपडेचा निःपात कसा करावा यावर मसलती होऊ लागल्या. संताजीला नेस्तनाबूत करण्यासाठी बादशहाने गाझीउद्दीन फिरोजगांची नेमणूक केली. इकडे धनाजीने संताजीचा पाठलाग सोडला नव्हताच. दोघांनी संतांजीची कोंडी केली. हनुमंत निंबाळकरने महादेवाचा डोंगर पिंजून काढला. सर्वांचं एकच लक्ष होते.. संताजी घोरपडे! संताजींनी प्रत्येकाला आपल्या तलवारीची चुणूक दाखवली होती. ते सर्वजण एकवटून ह्या एकाकी पडलेल्या अजिंक्य वीराच्या परिपत्यासाठी रात्रंदिवस भटकत होते.

वैरद्वेष माणसाला कोणत्या थराला नेऊन पोहोचवतो याचा अनुभव महादेवाच्या डोंगरावर दिसू लागला. शंभू महादेवाच्या डोंगरावर संताजी विपन्नावस्थेत भूमिगत वावरत होते. ते अजून तरी कोणाच्या दृष्टीस पडले नव्हते.

संताजी कारखेडच्या परिसरात वावरत असल्याची पक्की बातमी मसवडच्या नागोजी मानेच्या वाड्यावर पोहोचली. नागोजी मानेच्या पत्नीने नवऱ्याच्या मागे संताजीचा वध करण्याचा तगादा लावला. नागोजी म्हणाले, मी बादशहाच्या दरबारात विडा उचलून आलोय....

ते काही मला ठाऊक नाही. वैरी उंबऱ्यावर येऊन ठेपलाय. संताजी कारखेडच्या डोंगरात हमखास आहे. चारही दिशांनी त्याला मराठे व मोगलांनी घेरले आहे. अन्न मिळेना तरी, झाडाचा पाला खाऊन गुजरान करत आहे. आता तरी तुमची तलवार बाहेर काढा.

माझ्या भावाचा त्याने मुडदा पडल्यापासून माझ्या अंगाची नुसती लाहीलाही होतेय. कधी एकदा त्याचा नरडीचा घोट घेईन असं झालंय. नागोजी म्हणाला, मलाही अपमानाचा बदला घ्यायचा आहे. त्याने त्याच्या वाड्यातून मला घालवले ते विसरलो नाही. आता बघच, मी संताजीचा वध करूनच परत येईल. असे म्हणून नागोजी माने दख्खनचा वाघ कारखेलच्या जंगलात असण्याची पक्की खात्री घेऊन संताजींच्या मागावर राहिला.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : भाग - ३९

 संताजी घोरपडे : भाग - ३९

संताजी पुढे म्हणाले, "आम्हाला दुःख, खंत एकच आहे की, महाराजांना कैद करावे लागले, हे आमचे दुर्भाग्य!"

ताराऊ म्हणाल्या, "महाराज, ऐकलंत?"

राजाराम महाराज म्हणाले, "राणी सरकार, राजकारण बायकांचा विषय नाही. प्रत्येक वेळी ओंजळीने पाणी पिण्यास अजून आमची बुद्धी भ्रष्ट झाली नाही. ठीक! ठीक! आम्ही सावध झालो. उठा संताजीराव...

आणि आम्हाला मिळालेल्या राजमंडळाच्या अध्यक्षपदाचा वापर करून बोलतोय, संताजी, तुम्ही तुमच्या मुलाखत जा. घरी दारी फार शत्रू निर्माण करून ठेवलेत. आम्ही वातावरण निवळल्यावर तुम्हाला बोलावून घेऊ."

"येतो मातोश्री!"

संताजी जायला निघाले तोच, ताराबाई म्हणाल्या, "संताजी एक शपथ घेऊन जायचंय!"

"कोणती शपथ मातोश्री?"

"आतापर्यंत या दरबारातील बेबनावाची खबर बादशहाला मिळाली असेल. तो या बिघाडाचा पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न करेल. तुम्हाला दख्खनची सुभेदारी देतो म्हणेल."

"मातोश्री, देतो म्हणेल नाही, देतोच म्हणाला. तुमच्या या लबाड झुल्फीकारखान बरोबर कित्येक वेळा निरोप पाठवले. पण हा संताजी विकाऊ नाही. त्याने मोठमोठ्या रकमा, सनदा, वतने देण्याचे अमिष दाखवले. पण मी बधलो नाही."

महाराणी म्हणाल्या, "संताजीराव तुम्ही आज जरी घोरपडे नाव लावत असलात तरी, तुमचे पूर्वज भोसलेच होते. आमच्याच घराण्यातले."

"मातोश्री! हे मी जाणतो. म्हणूनच माझा जीव तिळ तिळ तुटतो." गदगदल्या आवाजात संताजी म्हणाले.

"या सावध रहा. स्वतःला सांभाळा."

दोघांनाही मुजरा करून संताजी घोरपडे निघून गेले.

महाराज म्हणाले, "ताराऊ, तुम्ही त्याला शब्द देऊन चुकलात. पण मी संताजीची गय करणार नाही. त्याच्या उर्मट, बेशिस्त वर्तनाबद्दल आम्ही त्याला शिक्षा देणारच. त्याला दोन वेळा माफ केले. आता त्याला दरबारात जागा मिळणार नाही."

गंभीर स्वरात ताराबाई म्हणाल्या, "आपण छत्रपती आहात. काहीही ठरवायला आणि करायला मुख्त्यार आहात. पण एक इशारा देऊन ठेवते, औरंगजेबाला धडकी भरवणारा हा असा हा एकच मोहरा आपल्या दरबारात आहे. तो नुसता पराक्रमीच नाही तर आपल्या गादीबद्दल तितकीच कडवी निष्ठा बाळगणारा सुद्धा! म्हणून प्रसंगी त्याचे शंभर अपराध पोटात घालून सांभाळले पाहिजे."

कैवारकुटीच्या पराभवामुळे महाराज आणि धनाजी जाधव यांच्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे संताजींचा समोरासमोर सरळ सरळ पराभव करणे सोपे नाही. म्हणूनच धनाजीने संताजीच्या सैन्यात फितुरी करण्याचे ठरवले. तसेही संताजींच्या कडक शिस्तीमुळे त्यांच्या सैन्यात, सरदारात असंतोष होताच. धनाजीने आपले जाळे पद्धतशीर पसरवले. धनाजीने पूर्वीचे तंत्र अमलात आणून राजाराम महाराजांना भरीस घालणे सुरू केले.

महाराजांना मुजरा करीत धनाजी म्हणाले, "महाराज, संताजीचे बळ त्याच्या सैन्यात आहे. तीच काढून घ्यायची पक्की तजविज करून आलोय. २०००० फौजेचा टेंभा मिळवणाऱ्या संताजी जवळ ५०० देखील स्वार उरणार नाही. संताजी पुढे निघाला की, माझी फौज त्याच्या पाठीवर कोसळणार. पुढून मोगल सरदार गाझीउद्दीन फिरजजंग आणि लल्फुल्ला खान दहा-बारा हजार फौजेनिशी चाल करून येतील. आमच्या दोघांच्या फौजा मिळून संताजी व त्याच्या सैन्याच्या पार बिमोड करून त्याला रानावनात पळायला लावतो. मोगल आणि मराठे एकत्र येऊन त्याला बरबाद करायला टपले आहेत. शिवाय नागोजी माने त्याच्या पाळतीवर आहेतच. त्याची बायको राधा वहिनीने तर आपला भाऊ अमृतराव निंबाळकर याच्या बदल्यात संताजीला ठार करण्याची शपथ घेतली आहे."

राजाराम म्हणाले नाही, "धनाजीराव' संताजींना ठार करावे अशी आमची इच्छा नाही. फक्त त्यांची मग्रुरी उतरेपर्यंत कैदेत ठेवावे."

"महाराज, आता ते आपल्या हाती राहिले नाही. तो खतरनाक लढवय्या व भडक माथ्याचा आहे. लढाईत तो जिवंत गवसणे कठीण आहे. तो बेसावध असतानाच हल्ला केला तरच..."

"नाही धनाजीराव. असं घडतं कामा नये. संताजींबद्दल आमच्या मनात राग जरूर आहे. पण त्याचा अद्भुत पराक्रम आणि कडवी निष्ठेची यावेळी आम्हाला गरज आहे."

"महाराज, आता आपल्या हाती काहीच राहिले नाही. लल्फुल्लाला सांगू शकत नाही. शिवाय नागोजी माने कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. आपण चिंता करू नये. फक्त दुरुन पाहत रहा."

संताजी घोरपडे हे शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले महाराजांचे शिष्य होते. संभाजी राजेंच्या क्रूर हत्येनंतर संताजींनी औरंगजेबच्या छावणीचे कळस कापून त्याला दाखवून दिले की मराठ्यांचा राजा मारला तरी, तो मराठ्यांचा पराक्रम, शौर्य आणि धाडस मारू शकणार नाही. पण दुर्दैव की, या सेनापती संताजीना खुद्द स्वतः छत्रपती राजाराम महाराजांशी लढाई करावी लागली.

नमोस्तुते!

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

संताजी घोरपडे : भाग - ३८

 संताजी घोरपडे : भाग - ३८

संताजी घोरपडे मोहिमेवर कांजीवरमकडेच होते. कांजीवरमच्या जवळ कैवारकुटी येथे दोन्ही सेना एकमेकांना भिडल्या. धनाजीच्या सेनेत नागोजी मानेचा मुलगा व मेहुणा अमृतराव निंबाळकर होते. यावेळी राजाराम महाराजांनी आपली राखीव फौज बरोबर घेतली होती. संताजी धनाजी एकमेकांना भिडले. संताजींनी अमृतराव निंबाळकरला कैद केले व हत्तीच्या पायी दिले. मग राजाराम महाराज व धनाजी संताजी घोरपडेवर तुटून पडले.

संताजीचे डोके सटकले. धनाजींचे सैन्य चळचळा कापू लागले. राजाराम महाराज कैद झाले. धनाजीचा धीर सुटला. आपण याच्या हाती सापडलो तर हा गय करणार नाही हे ओळखून धनाजीने रणांगणातून फळ काढला. मराठे विरुद्ध मराठे अशी अभूतपूर्व लढाई केवळ महाराजांच्या गैरसमजामुळे झाली की, प्रबळ द्वेष भावनेने धनाजीने घडवून आणली? महाराजांना संताजींच्या कैदेत एक दिवस काढावा लागला. धनाजी व महाराजांचा सपशेल पराभव झाला. तरी देखील संताजी महाराजांसमोर हात जोडून म्हणाले, "मी तुमचा सेवक आहे. तुम्ही धनाजीला माझ्याबरोबरीचा दर्जा देऊ इच्छित होतात. म्हटले होते ना, सेनापतीचा कस रणांगणातच लागतो. जो रणांगण जिंकतो तो सरसेनापती. आपल्या आज्ञेप्रमाणे मी वागेन."

संताजींनी राजाराम महाराजांना कैद केल्यावर, झुल्फिकारखाने त्यांना आपल्या ताब्यात द्यावे, म्हणून बादशहाच्या वतीने भले मोठे बक्षीस देवू केले. खुद्द बादशहाने १२००० उमराव करण्याचे आश्वासन दिले. पण संताजी लोभाला बळी पडले नाही. स्वराज्यावर, मराठ्यावर हे संताजींचे मोठे उपकार आहे. त्यावेळी महाराज मोगलांच्या ताब्यात गेले असते तर, मराठे शाहीचा अंत निश्चित होता. संताजी म्हणजे सूर्याजी पिसाळ नव्हते. ते होते मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा सहस्त्र रश्मी सूर्य!

निदान महाराजांनी आता तरी समजूतदारपणा दाखवून संताजींची समजूत घालून आपल्याकडे वळवायला हवे होते. पण मराठेशाहीच्या दुर्दैवाने तेवढी जाण महाराजांजवळ नव्हती, हे केवढे मोठे दुर्भाग्य? संताजी शिघ्रकोपी होते, तेवढेच उदात्त विचारसरणीचेही होते. त्यांनी महाराजांना कैद्यावस्थेत जिंजीला पाठवायचे ठरवले. निदान ताराऊ तरी काही मार्ग काढतील. त्या एकट्याच महाराजांना सल्ला देऊ शकत होत्या.

जिंजीच्या राजमहालात महाराजांनी जळफळत प्रवेश केला. आम्हाला कैद करण्याचा अधिकार सेनापतीला कोणी दिला? आमच्या बरोबर महाराणी तारा आणि बाळ शिवाजींना पकडून औरंगजेबाच्या स्वाधीन करून स्वतः दख्खनची सुभेदारी मिळवण्याचा त्या गद्दार, विश्वासघातकी, नमकहराम संताजीचा मनसुबा दिसतो.

महाराणी म्हणाल्या, "पण स्वारीचा असा गैरसमज का व्हावा? आम्हाला सर्व वार्ता मिळाल्या आहेत. आपण फक्त धनाजींच्या आग्रहापायी संताजीवर चालून गेलात. एकदा लढाईत उतरल्यावर कुणा एकाची हार होणार आणि दुसऱ्याची जीत होणारच. त्याचा दोष कुणाला का द्यावा?"

"पण राणीसाहेब, आम्हाला, खुद्द छत्रपतींना कैद केलं आहे."

"आपणच तशी पाळी त्यांच्यावर आणली. स्वामी विचार करा. आपल्याला कैद केल्यावर संताजी औरंगजेबच्या छावणीवर आपल्याला नेऊ शकत होते आणि बाकी कबिला न्यायला चार शिपाई सुद्धा पुरे होते. संताजीने स्वार्थापायी किंवा सुडबुध्दीने तसा विचार केला असता तर केवढा अनर्थ ओढवला असता?"

"राणीसाहेब, तुमचे म्हणणे असे आहे का? की, घोरपडेंचे या हिंदवी स्वराज्यावर फार मोठे उपकार झाले म्हणायचे. तर मग संताजीचा सन्मान करावा अशी तुमची इच्छा आहे?"

त्याचे बोलणे चालू असतानाच खंडो बल्लाळ धावत येऊन म्हणाला, "संताजी घोरपडे येत आहे."

संताजींनी दरबारात प्रवेश करताच, ताराबाई म्हणाल्या, "संताजी, हा काय प्रकार आहे? किती वेळ चुकत राहणार आहात? मागल्या वेळी स्वारींनी तुमची समजूत काढण्यासाठी विठ्ठल निळकंठांना पाठवले होते. शंकराजींनी हिताचे बोल सांगितले होते. तुम्हीच सांगा, तुम्हाला कोणी आणि किती प्रसंगी सांभाळावे?"

"मातोश्री, खाजगीत बोलावून आम्हाला खडसावयचे होते. माझी चूक असती तर स्वतः प्रायश्चित्त घेतलं असतं. पण महाराज धनाजी आणि निंबाळकराला घेऊन खुद्द स्वतः जातीने माझ्यावर चालू झाले. महाराज एकटे चालून आले असते तर त्यांच्यासमोर समशेर टाकून शरणागती पत्करली असती." मनातले सर्व संताजी घडा घडा बोलत होते...

त्या म्हणाल्या, "धनाजीरावांना पळवून लावले. कैद झालेल्या अमृतराव निंबाळकरांना हत्तीच्या पायी दिले आणि खुद्द महाराजांना कैद करून इथे आणून सोडले." ताराबाईच्या आवाजात खंत होती.

"मातोश्री, तुम्ही तरी मला समजून घ्या. धनाजीला मोठेपणा तुम्ही लोकांनी दिला. एरवी तो पळपुटा सेनानी मला अद्दल द्यायला निघाला, म्हणून मला त्याला तसाच जबरदस्त तडाखा देणे भाग होते. शत्रूंच्या घोड्यांना देखील हा संताजी पाण्यात दिसतो म्हणतात. आणि हा धनाजी कारण नसताना मला पाण्यात पाहतो. अमृतराव त्या नागोराव मानेचा मेहुणा..तो इतका स्वार्थी, लोभी, विश्वासघातकी आहे की या चार वर्षात तीन वेळा मोगलांना जाऊन मिळाला. आणि परत भीक मागत स्वामींच्या पायाशी केवळ वतनासाठी आला. त्याला सैन्यात ठेवण्याचा महाराजांचा हुकूम आला. कसा ठेवायचा? आम्ही त्याला सैन्यात घेतले असते तर आमच्या शिपाई आमच्यावर विश्वास ठेवतील का? त्याला हत्तीच्या पायी दिले यात आम्ही काहीच गैर केलं नाही."

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : भाग - ३७

 संताजी घोरपडे : भाग - ३७

वास्तविक संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी एकाच वेळी लांबच्या मोहिमा आखून शत्रूचा पाडाव करण्याकरता सीमाल्लोंघन केले होते. संताजी रामदुर्ग, गदक, चित्रदुर्ग, बसवपट्टण अशा मोहिमेत गुंतले असताना धनाजी जाधव जिंजीकडच्या भागात आले. बंदीवशाहून परतलेल्या झुल्फिकारखानाबरोबर एक दोन चकमकी केल्या आणि छत्रपतींसमोर आपल्या पराक्रमाचे गोडवे गायले आणि संताजी दाखवत असलेले शौर्य हे स्वराज्यासाठी नसून स्वतःसाठी वेगळ्या राज्यउभारणीसाठी करत आहेत, असे वरचेवर राजाराम महाराजांच्या गळी उतरवत होते. महाराजांची अगोदरच संताजी घोरपडे वर खप्पा मर्जी होती.

सेनापतीपद देते वेळेस महाराजांचा कल धनाजी जाधवांकडे होता. पण पंतांच्या आग्रहांमुळे सेनापती पद संताजी घोरपडेंना मिळाले. वय आणि अनुभव लक्षात घेता हे पद धनाजीना हवे होते. ते पद संताजींना मिळाल्यापासूनच धनाजींच्या अंतकरणात द्वेषाचा अंकुर फुटला. दोघांच्या अभेद तटबंधीला इथेच तडा गेला. धनाजींच्या मनात तेढ वाढतच गेली. नागोजी माने, माणकोजी पांढऱ्यांना जवळ केले.

तसे पाहिले तर धनाजी व संताजींच्या स्वभावात फार मोठा फरक होता. संताजी कडक शिस्तीचे, स्वराज्याचे कट्टर अभिमान होते, तर धनाजीचा स्वभाव ढीला, चालढकल करणारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या शिस्तीचे काटेकोर पालन संताजी करत होते. त्यामुळे त्यांचे वर्तन न्यायी व कठोर बनले होते. गंभीर गुन्ह्याला त्यांच्याजवळ दयामाया नव्हती. आपपर भाव नव्हता, पक्षपात त्यांना शिवलाही नव्हता. याउलट धनाजीचे होते. त्यामुळे त्यांच्या सैनिकांचे वर्तन स्वैर होते. त्यामुळे धनाजीचे वजन वा प्रभाव कधीच पडला नाही

संताजींचे व्यक्तिमत्वच वेगळे होते. शिवाय ते अति बुद्धिमान व अति पराक्रमी सेनानी होते. म्हणूनच बादशहाच्या एकाहून एक सरस सरदारांना त्यांनी खडे चारले होते. संताजींच्या मोठमोठ्या विजयाच्या बातम्या येऊ लागल्या, तसतसे धनाजी डिवचले जाऊ लागले आणि राजाराम महाराजांना चिथावणी देत राहिले.

ठरल्याप्रमाणे संताजी घोरपडे जिंजीला छत्रपतींच्या दरबारात येऊन दाखल झाले. येताच त्यांनी छत्रपती महाराजांना व महाराणींना मुजरा केला. महाराणी म्हणाल्या, "छत्रपतींच्या मुजऱ्याला यायलाही सेनापतीला वेळ नाही का?"

"आईसाहेब, बाहेर शत्रूंच्या कारवाया इतक्या वाढत आहेत की महाराजांच्या पायाशी मुजरे करत बसण्याची ही वेळ नाही."

संताजीच्या या ठसकेबाज उत्तराने धनाजी दचकले. संताजीच्या मानाने त्यांचा पराक्रम थोडा कमीच पडत होता. मोहिमा सोडून ते जिंजीतच स्थिरावल्यामुळे संताजींचे तिखट बोलणे त्यांच्या वर्मी लागले. ते तडक दरबारातून निघून गेले.

त्यानंतर महाराजांची आणि संताजींची शाब्दिक चकमक उडली. ताराऊंनी हस्तक्षेप केल्याने महाराजांना चेव आला. संतापाने त्यांचा चेहरा लाल झाला. हाक मारली, "खंडो बल्लाळ.."

"संपूर्ण महाराष्ट्रासहित दक्षिणेपर्यंत रात्रंदिवस संचार करणाऱ्या संताजीला वाट दाखवण्याची गरज नाही. मी माझ्या पायाने जातो."

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडक शिस्तीत तयार झालेले संताजींचे मन कुठल्याही प्रकारची तडजोड, नरमाई किंवा शितलता मानायला तयार नव्हते. पंतांचं मन आपल्याविषयी कलुषित होऊ नये म्हणून, त्यांनी महाराजांशी झालेल्या वादाची कबूली देऊन ताबडतोब लखोटा पाठवला. त्याचबरोबर महाराज आपल्याविषयी कसा पक्षपात करतात हे सुद्धा प्रकर्षाने नमूद केले. एवढे होऊनही महाराजांशी सेवकाच्या नात्याने एकनिष्ठ राहू. आमची निष्ठा छत्रपतीच्या गादीशी आहे. महाराजांचे मनात आमचे विषय दुजा भाव का निर्माण झाला? आम्ही जिंजी पासून दूर प्रांतात लढत होतो. तिथेच आम्हाला कळले की, महाराजांची आमच्यावर गैरमर्जी झाली आणि तिकडेच दूर राहावे व धनाजींनी जवळ राहावे अशी त्यांची इच्छा दिसली. आमचे स्वराज्यासाठी श्रम कमी पडले असे नाही. फक्त राज्यात बखेडा माजू नये यासाठी आम्ही महाराजांचे बोलणे ऐकून घेतो.

राजाराम महाराजांनी झुल्फीकारखान, असद खान यांना ससैन्य बंदिवशाला जाण्याची वाट मोकळी करून दिली, याचा संताजींना संताप आला. ह्याच कारणाने घडलेल्या वादातून त्यांचे सेनापतीपद काढून धनाजीला दिले. पुन्हा महिन्याभराने संताजींना सेनापतीपद दिले. त्यामुळे धनाजी जाधवांचा संताजीवर द्वेष अधिकच बळावला. त्यांच्या मनात द्वेषाची मुळे खोलवर रुजली. मध्यंतरी संताजी धनाजीचे खटके उडले. पण प्रल्हाद निराजीने मध्यस्थी करून वादावर पडदा पडला असला तरी दोघांची भांडणे विकोपाला गेली होती.

संताजी घोरपडे निघून जाताच महाराजांचा पारा चढला. याला धडा शिकवायचा. त्यांनी प्रण केला. धनाजीने खतपाणी घातले. शत्रूचा बिमोड करायचे सोडून स्वकीयांच्या नाशासाठी खुद्द छत्रपती जिंजी सोडून कांजीवरम कडे निघाले....

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : भाग - ३६

 संताजी घोरपडे : भाग - ३६

पावसाळा संपताच, दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व मुत्सद्दी, सेनानी अमात्य रामचंद्र पंतांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी लढायला सज्ज झाले. मोगलांना मराठी ठेचू शकतात, ही भावना मराठ्यांमध्ये रुजली. संतांजी, धनाजींनी आपापल्या मोहिमांची योजना आखून रामचंद्र पंतांच्या आज्ञेनुसार सीमोल्लंघन केले.

जिंजी ते मद्रास पर्यंतचा कर्नाटकचा अफाट भूप्रदेश संताजींच्या अखत्यारीत होता. धनाजीनेही आपली मोहीम याच भागात करण्याचे ठरवले. ठिकठिकाणी मोगलांचा समाचार घेत, त्यांची ठाणी, चौका उडवून देत, प्रत्येकाकडून चौथाईच्या खंडण्या वसूल करत, हे उभय सेनानी महाराजांच्या दर्शनाला जिंजीत जाण्यास निघाले. त्याआधी संताजीने उत्तर कर्नाटकातील बेळगावच्या पूर्वेस अदमासे २० कोसावर असलेल्या रामदुर्ग किल्ल्याला वेढा दिला.

संताजीने रामदुर्गला वेडा दिल्याचे कळताच, बादशहाने तातडीने विजापूरचा सुभेदार नसूल्ला खानला रामदुर्गच्या किल्लेदाराच्या मदतीस पाठवले, आणि हिम्मतखानलाही. पण हे दोघेही पोहोचण्याआधीच संताजीने रामदुर्गाचा वेढा उठवून दक्षिण दिशेने गदगकडे कूच केले. संताजीच्या गनिमी काव्याने मोगलांची पुरती दमछाक होत होती. जिथे तिथे नामुष्की पदरी पडत होती. बादशहाच्या कित्येक नामांकित सरदारांनी देखील हाय खाल्ली होती. इकडे छावणीत बादशहा दिवसेंदिवस अस्वस्थ होऊ लागला.

बादशहाला संताजीच्या पडावाबरोबरच जिंजीचा पाडाव करायचा होता. छत्रपती राजाराम महाराजांचा पाडाव झाला तर, मराठ्यांमध्ये दुहीची आग पेटवून महाराष्ट्र उध्वस्त करता आला असता. ते तर साधले नाहीच, उलट कर्नाटकात मराठ्यांची शक्ती वाढली. औरंगजेबच्या डोळ्यात संताजी सलत होते. तुळापूर छावणीचे सुवर्ण कलश संताजीने नेल्यापासून मोगलांच्या निःपाताची शपथ घेतलेले संताजी त्याचे लक्ष बनले होते. प्राप्त परिस्थितीत संताजीला संपवणारा एकच हिम्मतखान हा सेनानी होता. या अगोदर हिम्मतखान आणि संताजी मध्ये अनेक वेळा झटापटी झाल्या. पण संताजी योग्य वेळी रणांगणातून पसार होत असल्यामुळे संताजीवर मात करण्याचे फसवे समाधान मोगरांना मिळत होते.

हिंमतखानला पाठीवर घेऊन संताजींची घोडदौड चालूच होती. संताजीने गदगहून चित्रदुर्गाला वेढा दिला आणि चित्रदुर्ग हस्तगत केला. तोच हिम्मतखानच्या हालचालीचा सुगावा लागला. संताजींनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. दोन्ही तुकड्यांनी दोन निरनिराळ्या दिशांनी हिम्मतखानवर चाल केली. दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झाले. लढाईचा जोर पाहून संताजीची राखीव बंकरदाज सेना हिंमतखानवर तुटून पडली. एका बंदुकीच्या गोळीने हिंमतखानचा बळी घेतला. त्याचे हत्ती, घोडे आणि साहित्य संताजींच्या हाती सापडले. मोगल जमादार अविबाकी हा निसटण्याच्या बेतात असताना मराठ्यांच्या हाती लागला. त्याचा मुलगाही लढाईत कामी आला. मोगल सैन्यांत सेनापतीच नसल्यामुळे, सैन्याने माघार घेऊन जीव वाचून सर्व तिथेच टाकून पळून गेले.

तिन्ही त्रिकाळ संताजीच्या मागे असलेला हिंमतखान गतप्राण झाल्यामुळे, मोगलांविरुद्धची अर्धी लढाई जिंकल्याचे समाधान संताजींना लाभले.

आपले आध्यात्मिक गुरु मेरू स्वामींचे मनोमन चिंतन केले. अत्यंत कठीण समयी स्वामींनी संताजींवर कृपादृष्टी केली होती. जणू त्यांचा प्रसाद म्हणून की काय न मागता संताजींना पुनश्च सेनापती पद प्राप्त झाले होते. म्हणूनच संताजी घोरपडेंची जेवढी निष्ठा छत्रपतींच्या गादीशी होती, तेवढीच मेरु स्वामींशी होती.

हिम्मतखान पडल्याची बातमी व त्याच्या सैन्याला बसवपट्टणच्या किल्ल्यात अडकवून ठेवल्याची बातमी बादशहाला मिळाली. त्याच दरम्यान हमीउद्दीनने अनोदीच्या किल्ल्यात अवजड सामान ठेवून तो स्वतः बसवपट्टणकडे निघाला. संताजींना कळताच आपल्या फौजेंनिशी हमीउद्दीनच्या समाचारास निघाले. बसवपट्टनपासून सात कोसावर दोन्ही सैन्यांमध्ये लढाई जुंपली. प्रसंग पाहून हमीउद्दीनने माघार घेतली, पण मराठे आपल्या तळावर निघाले असता, त्यांच्यावर पिछाडीने हल्ला केला .

पाठलाग होत असल्याचे सेनापतीच्या ध्यानी आले होते. संताजींनी गनिमी काव्याचा उपयोग करून आपल्या सेनेच्या तुकड्या करून त्यांना अशा ठिकाणी ठेवले होते की, त्या चक्रातून मोगल सैन्याला बाहेर पडणे अवघड झाले. संताजीकडून मोगल सरदारांना एकसारखा पराभव पत्करावा लागत होता. पण हमीउद्दीन मात्र आपण सतत विजय होत असल्याचे बातमीपत्र बादशहाला पाठवत होता.

पण त्याचे खोटेपणा लवकरच उघडकीस आले. हमीउद्दीन खानला संताजीकडून जबरदस्त पराभव पत्करावा लागला. बसवपट्टणचा विजय म्हणजे संताजी घोरपडे यांच्या गनिमी काव्याचा आदर्श नमुना होता.

छत्रपती संभाजी राजेंच्या हत्येनंतर हिंदवी स्वराज्याच्या आणीबाणीच्या काळात संताजी घोरपडे यांनी अतुल पराक्रम गाजवून मोगलांच्या मगर मिठीतून मराठेशाहीला वाचवले होते. मी मी म्हणणाऱ्या बलाढ्य मोगल सरदारांना नामोहरण केले होते. मोघलांच्या अद्यावत तोफखाना, दारूगोळ्या पुढे संताजीने आपल्या तलवारीची जबरदस्त दहशत निर्माण केली होती. बसवपट्टणला मोगलांचा जबरदस्त पराभव करून आपल्या पराक्रमावर कळस चढवला. या लढाईत एकूण ७५ लाखाची लूट जिंजीला स्वराज्य हितासाठी जमा केली.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : भाग - ३५

 संताजी घोरपडे : भाग - ३५

स्वराज्याचा खजिना भरण्यासाठी संताजीने सुरतवर स्वारी करण्याचा बेत केला. संताजीच्या या संभाव्य स्वारीची वार्ता सूरत शहरात धडकताच सर्व शहरात घबराट निर्माण झाली. प्रत्येक जण आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडू लागला.

अचानक संताजीने सुरत स्वारीचा बेत बदलला आणि सुरत ऐवजी नंदुरबार शहरावर हल्ला चढवला.. संताजीने प्रथम शहराला वेढा दिला आणि नंदुरबारच्या फौजदाराकडे चौथाईची मागणी केली. फौजदाराने मागणी धुडकावून लावली व शहराचा कडेकोट बंदोबस्त केला. सलाबुदला येऊन मराठ्यांवर हल्ला चढवला. पण मराठ्यांपुढून लवकरच त्याला परतावे लागले. मराठ्यांनी नंदुरबारच्या परिसरात धुमाकुळ घालायला सुरुवात केली. पण नंदुरबार मध्ये जास्त वेळ वेढा देऊन बसणे शहाणपणाचे होणार नाही, म्हणून मोगली हल्ले सुरू होण्यापूर्वीच संताजीनी साताराकडे कूच केले. सुरत नंदुरबार लुटता आले नाही तरी, तेवढ्याच तोलामोलाच्या चीज वस्तू घेऊन संताजी आले होते. मोघलांच्या घोड्यांनाच नव्हे तर, खुद्द बादशहाला संताजी जळी स्थळी दिसू लागले. हा आदमी आहे की भूत? एका मुलखात दंगा केला म्हणून फौज पाठवावी तर, दुसऱ्या मुलाखात जाऊन ठाणे मारतो. बादशहाचा थयथयाट होत होता. शिवाचा गनिमी कावा हा वापरतो. हे परवदिगार! या बदमाश संताला तू जहन्नुममध्ये कधी नेणार? त्याला अद्दल घडविणारा एकही माणूस आमच्या फौजेत नसावा? अफसोस! अफसोस है! जोपर्यंत हा बदमाश संता आम्हाला शरण येत नाही वा मारला जात नाही, तोवर आम्ही डोक्यावर टोपी घालणार नाही. असे म्हणून बादशहाने डोक्यावरची टोपी रागाने भिरकवून दिली.

संताजीचे युध्दकौशल्य बादशहाच्या डोळ्यात कुसळासारखे सलत होते. संताजीला जिवंत अथवा मृत पकडून देणाऱ्यास औरंगजेबाने मोठमोठी वंशपरंपरागत वतनं, पाच हजारी मनसब, ५० हजार होनच्यावर बक्षीस जाहीर केले. संताजीच्या पारिपत्यासाठी दोन बलाढ्य सेनानीच्या तुकड्या व हिम्मत खानला जादा कुमक पाठवली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या डावपेचाचा आदर्श समोर ठेवून संताजी मोगलांशी चौफेर युद्ध करत होते. बादशहाने आपल्या पारिपत्यासाठी भले मोठे बक्षीस लावून तीन महान सेनानी पाठवल्याची खबर लागताच, संताजीने मुत्सद्दिगिरीचा वापर करून, दक्षिण हिंदूस्थानातील औरंगजेबच्या सर्व मांडलीक हिंदू राजांचे सहकार्य घेण्याचे ठरवले.

पैकी बिदनूरच्या राणीचे सहकार्य आधी मिळालेच होते. शिवाय तिचे कर्नाटकी बंकरदाज सैन्य त्यांच्या सेनेत सामील झाले होते. संताजींचे रणांगणावरील कर्तुत्व अचाट होते. झुल्फिकारखान सारख्या महान मोगल सेनानीवर उपासमारीची पाळी आणली होती. तीच पाळी आसदखानवर आणली होती. मोगलांचा पराभवावर पराभव होत असल्यामुळे मोगलांच्या हिंदू मांडलीक राजांचा संताजींबद्दल विश्वास निर्माण झाला होता.

खानदेश स्वारीवरून परतल्यावर संताजींनी आपला संचार सातारा भागापर्यंतच मर्यादित ठेवला होता. आपल्या फौजेची वाताहात न होता, शत्रू कोंडीत कसा सापडेल यावर त्यांचा अधिक भर होता. परळी भागात आल्यावर समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यस्थळाला भेट द्यावी या उद्देशाने परळीला छावणी टाकली.

संपूर्ण मराठेशाही दुहीने पोखरली जात असताना घोरपडे बंधू स्वराज्यासाठी स्वतंत्रपणे एकदिलाने लढत होते. पण छत्रपतींच्या वारसांना ही एक जुट सांभाळता आली नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. संताजी परळीत असल्याचे कळल्यावर त्याचे धाकटे बंधू बहिर्जी दक्षिणेतून त्यांना भेटायला आले. त्याच सुमारास संताजींनी बहिर्जीच्या दोन मुलांची, मुरारराव व सिंधोजीरावांची लग्ने स्वामींच्या पूण्यस्थळी लावून दिली.

संताजी केवळ रणांगणच गाजवत होते, असे नाही तर, घरचेही कर्तव्य चोख बजावत होते.

मोगल,पावसाळ्यात अनेक अडचणी येत असल्यामुळे सहसा युद्ध टाळत असत. आणि संताजींनी नेमकी हीच संधी साधून, मुसळधार पावसात खटावच्या ठाण्याला वेढा दिला. रामचंद्र नावाचा एक मराठा खटावचा ठाणेदार म्हणून मोगलांच्या चाकरीत होता. त्याने ठाणे टिकवून धरले व जिद्दीने लढण्यात सज्ज झाला. बादशहाने त्याच्या मदतीसाठी खानखाजाखान व हमीउद्दीन खानास रवाना केले. संताजी व दोन्ही खानात घनासाम युद्ध सुरू झाले. मोगल एकीकडे लढत होते आणि दुसरीकडे जाळपोळ करीत होते. सैन्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने संताजीने किल्ल्याचा आसरा घेतला.

संताजींची माघार तात्पुरती होती. चंदनवंदनाच्या लढाईची खबर धनाजींच्या कानी गेली. ते होते तेवढ्या सैन्यानिशी संताजीच्या मदतीला धावून आले. मराठे आणि मोगल सैन्य जिकरीने लढू लागले. पुन्हा मोगलांनी जाळपोळीचे तंत्र अवलंबिले. लुटीला उत आला. पावसाळ्यात सुद्धा संताजींनी शत्रूला मोकळीक न देता संधी मिळेल तिथे हल्ल्या चढवून त्यांची झोप उडवली होती.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : भाग - ३४

 संताजी घोरपडे : भाग - ३४

अति जलद हालचाली करून संताजींनी मोगल ठाणेदार, सरदारांना त्रस्त करून सोडले होते. संताजींचे मोगलांना सतावून सोडणारे हल्ले जरी एकीकडे चालले होते तरी, त्यांच्या मनातून छत्रपती राजारामवरील राग गेला नव्हता. त्यांनी जिंजी पासून दूर राहूनही स्वराज्य रक्षणचे प्रयत्न जारीने सुरूच ठेवले होते. खुद्द छत्रपतींशी त्यांचे बिनसले असले तरी ते कर्तव्यापासून कधीच परावृत्त झाले नव्हते. त्यांची ही राजनिष्ठा अद्वितीय, उच्च कोटीची होती. सेनापती संताजींचे जीवन म्हणजे अपरंपार स्वराज्यनिष्ठा. स्वराज्य हित दक्षता उच्च कोटीची, सैनिकी शिस्त यांचा सुरेख त्रिगुणीत संगम होता.

हिंमतखानने हार मानली नव्हती. त्याने संताजीचा पाठलाग सुरूच ठेवला. नळदुर्ग जवळ दोनदा झटापटी झाल्या. अखेर संताजीने त्याला हुलकावणी देऊन आपल्या मुख्य केंद्राकडे परतत असताना, रायपूरचा टापू लुटला. संताजींच्या बातम्या बादशहाला पोहोचतच होत्या. मुत्सद्यांशी चर्चा करून उपाययोजनावर विचार करत होता.

त्यावेळी संताजी फौजेसह दुहेरी इलाख्यात होते. तो प्रांत कासिमखानच्या अखत्यारीत होता. औरंगजेबाने ज्यादा कुमक पाठवून संताजीचा पडाव करण्याची आज्ञा दिली. बादशाही गोटातील कासिम खानच्या हालचालीची वित्तम्बित बातमी आपल्या हेरांकडून संताजींना समजत असल्यामुळे, त्या प्रकारची योजना करून ते मोगल सैन्यांना भिडले. आपल्या योजनाबद्ध युद्धनीतीचा वापर करून कासिम खानला व रहुल्लाखानला जेरीस आणले. सतत तीन दिवस त्यांनी मोगल सैन्यांना अन्नाचा दाणा मिळू दिला नाही. चौथ्या दिवशी कसेबसे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर काही सैनिकांना व जनावरांना अन्न व गवत मिळाले.

किल्ल्याबाहेर चकमकी सुरू असताना किल्ल्याची दारे बंद होते. त्यामुळे रसद खुंटली. मग हेतू पुरस्पर मोगलांनी मराठा सैनिकांत आवई उठवली की, हिम्मतखान कासिमखानच्या मदतीला भली मोठी फौज घेऊन येत आहे. पण संताजीवर काही परिणाम झाला नाही. उलट त्यांनी आपल्या फौजेची रचना बदलली. कासिम खानच्या बिकट अवस्थेचा वृत्तांत बादशहाला दररोज मिळत होता. एकट्या कासिमकडून आपले ईस्पित साध्य होणार नाही, म्हणून त्याने आपल्या भरवशाचे दोन सरदार तातडीने कासिम खानच्या मदतीला पाठवले. कासिमखानने खानजादा खानचे जंगी स्वागत केले. ह्या सर्व बातम्या संताजींना पोहोचतच होत्या. त्याच्यासाठी मेजवानीचा बेत केला. संताजीने आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या करून तीन दिशांना रवाना केल्या. त्यांची योजना होती मेजवानीच्या जागेवर हल्ला चढवायचा. अनपेक्षित हल्ल्याने दोन्ही खान गडबडून गेले. काशीद खान पळून गेला. कासिमखान गायब झाल्यावर रहुल्ला खान व सफशिक खानने कसातरी किल्ल्यात प्रवेश मिळवून जीव वाचवला. उपासमारीला कंटाळून काही सैनिक गढीच्या भिंतीवरून उड्या मारून मराठ्यांच्या आश्रयाला आले.

काही दिवसांनी किल्ल्यावर रोगराई पसरली. सर्वत्र घाण साचली होती.त्यातच अन्न पाण्याची टंचाई. त्यामुळे सैनिक अगदी मेटाकुटीला आले. त्यातच कासिम खान मरण पावला. काहींचे म्हणणे त्याने स्वतः विष घेतले. ते काही असले तरी दुहेरीचा पराभव आणि संताजी घोरपडेचा त्याने घेतलेला धसका त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले होते.

रहुल्लाखान खान, खाजखानाखान व इतर मोगल सरदार संताजीला शरण आले. शेवटी दोन लाख होनवर तडजोड झाली. अंगावरील वस्त्रानिशी मोगल सरदार बाहेर पडले. बाकीच्या लोकांना जीवदान देऊन त्यांना सोडण्यात आले. दुहेरीच्या किल्ल्यावर भगवा फडकला. २८ लाख होनच्या किमतीच्या वस्तू. संपत्ती, जडजवाहीर मराठ्यांच्या हाती पडले.

दुहेरीच्या पराभवाच्या बातमीने बादशहा अगदी प्रक्षुब्ध झाला. संताजीचा बिमोड करण्याची प्रतिज्ञा केली. बादशहाने आपल्याला नेस्तनाबूत करण्याचे ठरवल्याची बातमी संताजीला समजली असल्याने कापशीला असलेल्या कुटुंबाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली. नारोला तशा सूचना दिल्या.

कापशीत काही दिवस मुक्काम करून संताजी कर्नाटकात आले. फौजेची जुळवाजुळ करून औरंगाबादच्या दिशेने कूच केले. वाटेत आडवी येणारी मोगलांची ठाणे उध्वस्त करून, लुट घेऊन मराठ्यांच्या फौजेने औरंगाबाद गाठले. तापी नदीवरील संपन्न समृद्ध असलेले नगर मोगलांचे प्रमुख ठाणे होते. बऱ्हाणपूरवर संताजीचा डोळा होताच. संताजींनी बऱ्हाणपूर घेतले व बऱ्हाणपूरच्या सुभेदाराकडे चौथाईची मागणी केली. पण बादशहाने मागणी फेटाळून लावली. संताजीपुढे त्याचा टिकाव लागला नाही. सुभेदाराला कैद करण्यात आले. बऱ्हाणपूर संताजीच्या ताब्यात आले.

भरपूर संपत्ती, जडजवाहीर यांची मराठ्यांनी मनसोक्त लूट केले. बातमी समजताच बादशहाचा संताप शिगेला पोहोचला. त्याने संताजींचे परिपत्य करण्यासाठी तात्काळ गाजीउद्दीनखान सरदारला धाडले. पण तो तिथे पोहोचेपर्यंत मराठे पसार झाले होते.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : भाग - ३३

 संताजी घोरपडे : भाग - ३३

धनाजी जाधवांना मिळालेले सेनापतीपद परत करायला ते तयार झाले तसे विठ्ठल निळकंठांनी संताजीला साताराला बोलावले. संताजी धनाजी समोरासमोर आले. त्यांच्यात आता प्रेम, आदर नव्हता. होता फक्त द्वेष आणि सूड. प्रसंग बाका होता. मुत्सद्दीत मुरलेले विठ्ठल निळकंठ व परशुराम त्र्यंबक यांनी बोलण्याच्या ओघात अशी काही कलाटणी दिली की, संताजी जागच्याजागी गोठले. म्हणाले, "माझ्या निष्ठा फक्त छत्रपतींच्या गादीशी आहेत.''

"संताजी, झालं गेलं विसरून जा. जिंजी दरबारात जे घडले त्याबद्दल महाराजांनाही दुःख आहे. हिंमत खान सतत तुमच्या पाठीला गळू लागल्यासारखा चिकटला म्हणून त्यांनाही चिंता आहे. महाराजांनी तुमचं सेनापतीपद तुम्हाला बहाल केलं आहे."

'पण ज्यांच्याकडे आहे, त्यांची अनुमती.....?"

आतापर्यंत चूप बसलेले धनाजी म्हणाले, "छत्रपतींच्या आदेशाने स्वखुशीने द्यायला तयार आहे. पण शाश्वती काय तुमच्या छत्रपतीच्या गादीशी असलेल्या निष्ठेची!"

निळकंठ पुढे म्हणाले, "मी छत्रपतींचा आदेश घेऊन इथवर आलो ते फक्त सेनापती ₹पद बहाल करायला नव्हे तर, इथून पुढे संताजी धनाजी एका झाडाच्या दोन फांद्या आहेत यावर शंका नको, एवढी तुमच्यात एकी येऊ द्यात. यासाठी तुम्ही दोघेही आपापले पूर्वग्रह बाजूला सारायला हवेत."

परशुराम त्रिंबक म्हणाले, 'मोगलांचा पूर्ण बिमोड होऊन स्वराज्याचे सुराज्य होईपर्यंत तुमच्या दोघात बिलकुल बिघाड होता कामा नये. या मोडकळीस आलेल्या मराठेशाहीचे तुम्ही दोघे आधारस्तंभ आहात. भगव्या निशाणाची जाण ठेवा. अहंकाराला मुठमाती द्या. सध्याच्या मराठेशाहीच्या पडत्या काळात तुमच्या दोघात एकजूट राहिली तर पुढील पिढ्या तुम्हाला दुवा देतील.'

संताजींच्या डोळ्यात कधी नव्हे ते अश्रू चमकले. म्हणाले, "छत्रपतींच्या गादीशी निष्ठा वाहिलेला हा संताजी घोरपडे तुम्हाला वचन देतो की, मराठेशाही अखंड राहावी, यासाठी शत्रूशीच काय पण दगा फटका करणाऱ्या स्वकीयांचीही मी गैर करणार नाही."

परशुराम त्रिंबकच्या आदेशावरून संताजींनी आपल्या फौजेत धनाजींना सामील करून घेतले. विठ्ठल निळकंठांना साताऱ्याची आपली मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद झाला. हिम्मत खानला खडे चारण्यासाठी संताजी धनाजी आपापल्या घोड्यावर स्वार झाले.

काही काळ संताजी धनाजी या जोडगोळीने मोगलांची ठाणे उध्वस्त करून आपला धाक जमवला. नंतर दोघांनी विचार विनिमय केला की, दोघे एकत्र राहिलो आणि मोगलांनी हल्ला केला तर त्यांचे जवळ असलेल्या अद्ययावत तोफखान्याला आपण पुरे पडणार नाही. सारासार विचार करून संताजी धनाजींनी आपापल्या फौजा विभागून घेतल्या आणि पुन्हा स्वतंत्रपणे मोगलांवर त्यांचे छापे सुरू झाले.

संताजींची घोडदौड इतकी वेगवान होती की, अक्कलकोट, ऐनपुर, परळी, नरगुंद, सावळगाव, महादेवाचा डोंगर एवढा परिसर केवळ दीड महिन्यात पिंजून काढला. यावरून त्यांच्या वायुगतीच्या घोडदौडीची कल्पना येते.

कर्नाटकाकडे निघालेला बादशहा आपल्या छावणीत ह्या बातम्या ऐकून बेचैन होत होता. प्रत्येक मोगली ठाण्यावरून बातम्या येत होत्या... छावणीत अन्नधान्याचा तुटवडा आहे. संताजी घोरपडे रसद मारतो. वगैरे वगैरे....

संताजी घोरपडेंनी आपल्या लढाईचे तंत्र बदलले. मोगल छावणीवर अचानक हल्ले चढवणे, त्यांची रसद मारणे, अधिकारी कैदीत टाकणे, त्यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करून, कफल्लक करून सोडून देणे अशी पद्धत सुरू केली.

यादगार बेगमने कुमक पाठवण्यासाठी बादशहाकडे कैफियत धाडली. यादगार बेगमला कुमक मिळाली खरी पण, मराठ्यांनी त्यांची दैना उडवली. जानखानचा मुलगा महंमद मुबारक किल्लेदार होता. संताजींनी त्यालाच पकडून ताब्यात घेतले. मोगलांचे शिपाई, सरदार ,ठाणेदार यांनी संताजींची एवढी धास्ती घेतली की, प्रत्यक्षात संताजींनी लढाई केली नसली तरी मोगल दरबारात खोट्या बातम्या पोहोचू लागल्या. धारवाडचा किल्लेदार महमद इस्माईल बेगने खबर पाठवली की, खुदापूरला असलेल्या मराठ्यांच्या छावणीवर हल्ला केला. मराठ्यांचा पराभव झाला. त्यात ३६ मराठे सैनिकांसह संताजी ठार झाले.

औरंगजेबला कळेना की विश्वास कसा आणि कुणावर ठेवायचा? खरेच संताजी जिवंत आहे की धारवाडच्या धारणीवर आडवा झाला....?

इकडे संताजी घोरपडेंच्या पाठलागावर असलेल्या हिम्मत खानच्या तोंडाला फेस आला. मग त्याने आपला मोर्चा अमात्य रामचंद्र पंताकडे वळवला. पंतच संताजींचे गुरु. प्रथम त्यांचाच बिमोड करावा या उद्देशाने हिंमत खानने भालवणी वरून सैन्याची तुकडी मागून घेतली. एकंदरीत परिस्थिती पाहून रामचंद्रपंत वरुड गडाकडे निघाले. याच दरम्यान संताजी घोरपडे सुद्धा गरुड गडावर होते.

दोघांची भेट अनेक घडामोडीनंतर होत होती. गरुडगडावर त्यांची आणि संताजीची अनेक महत्त्वाची खलबते झाली. दोघांनी मिळून गडावरून काही मोहिमा देखील केल्या. हिंमत खानला रोखण्यासाठी संताजींनी आपल्या सैन्याचे विभाजन केले आणि महिमान गडाला वेढा दिला. उद्देश एवढाच की खान चालून आला तर वेढा उठवून मागून हल्ला करायचा. खान महिमानगडाकडे गेला तर पंतासहित खानावर चालून जायचे.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : भाग - ३२

 संताजी घोरपडे : भाग - ३२

रामचंद्र पंतांनी संताजींना महिमानगडकडे जाण्याची व शंकराजींची भेट घेण्याची सूचना केली. पंतांच्या सूचनेनुसार संताजी महिमानगडाकडे निघाले. जाता जाता आपल्या फौजांना कर्नाटकाऐवजी महाराष्ट्रात परत फिरण्याचे आदेश धाडले. संताजी जिंजीत असताना पंत आणि संताजी दरम्यान अनेक गैरसमज पसरले होते. त्यात किती सत्य आहे हे पण त्यांना जाणून घ्यायचे होते.

संताजी शंकराजी नारायणांना भेटायला आले त्यावेळी शंकराजी व धनाजी महिमागड व वरुडगडाच्या स्वारीचे बेत रचत होते. संताजी आल्यावर थोडे औचारीक बोलणे झाल्यावर, शंकराजींनी त्यांना उपदेशपर काही बोध दिला व स्वराज्यासाठी आपली एकजूट किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले.

त्याच दरम्यान महिमान गडाच्या किल्लेदाराने बादशहास कळवले की, संताजी, धनाजीची फौज मेहमानगड, वरूडगडाला वेढा घालण्यास आली आहे. किल्ल्यांचे सर्व रस्ते अडवून धरले आहेत, तरी त्वरेने कुमक पाठवावी. बादशहाने बक्षी उल्मुल्क मुखालीस खानाची नेमणूक करून त्वरेने कुमक रवाना केली.

याच सुमारास सातारा सीमावर्ती प्रदेशातील अकलूजला मोगल सरदार हिम्मत खानची छावणी होती. मराठ्यांचा जोर वाढलेला पाहून त्याने बादशहाकडे ज्यादा लष्कर तुकड्यांची मागणी केल्यावर बादशहाने ताबडतोब तुकड्या रवाना केल्या.

संताजी, धनाजीच्या फौजा एकत्र झाल्याने मराठ्यांची ताकद वाढली. शंकराजी नारायणांनी हिंमतखान महिमानगड, अकलुज वर एकाच वेळी हल्ला केला. तिन्ही ठिकाणी मोगलांचा पडाव झाला. हिंमत खान कसाबसा जीव वाचवून निसटला. पराभवाच्या बातम्यांनी औरंगजेबची झोप उडाली. त्याच्या डोक्यात संताजीराव खुपत होते. संताजीला मृत किंवा जिवंत पकडून देणाऱ्यास मोठे बक्षीस जाहीर केले.

बादशहाच्या आदेशानुसार सुभेदार हिम्मतखान सातत्याने संताजीच्या पाठलागावर होता. त्याने विक्रम हळ्ळीला संताजींची फौज अडवली. लढाईची धुमश्चचक्री सुरू झाली. जवळ जवळ ३०० मराठे शिपाई गारद झाल्याचे पाहून, आणखी शिपायांना न गमावता, हिंमतखानला झुकांडी देऊन संताजी सैन्यासह विक्रमहळ्ळी वरून निसटले. मोगलांच्या दुर्दैवाने तिन्ही खानात भांडणे सुरू झाली. हमीउद्दीनखान व खाजाखान गुलबर्गाकडे निघून गेले. हिंमतखानने मात्र संताजींचा पाठलाग सुरूच ठेवला. संताजीच्या सोबतीला ४००० फौजेनिशी सरदार अमृतराव निंबाळकर होते.

हिंमतखानला चुकवण्याबाबत संताजी व सरदारांबरोबर बराच वेळ खलबत्ते चालू होती. पण ठोस निर्णय होत नव्हता. पुन्हा रात्री मसलत बसली. महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. संताजींनी अमृतराव निंबाळकर यांना वर्‍हाडकडे पाठवले. उरलेले सैन्य घेऊन संताजी नारोसहित कर्नाटकातील मालखेडला पोहोचले. बादशहाचे हेर खाते इतके जबरदस्त होते की, संताजीच्या मोहिमेची खबर त्याला पोहोचली.

बादशहाने हमीदऊद्दीनखान व खाजाखानला अमृतरावचा पाठलाग करण्याचा हुकूम दिला आणि लष्करखान नावाचा नवीन सरदार संताजींना अटकाव करण्यास धाडला. हिंम्मतखान तर होताच. तो सतत पाळतीवर राहून संताजींना पकडू पाहत होता. हिम्मतखानला हुलकावणी देऊन संताजी पुन्हा मालखेड जवळ येऊन अकलूजच्या गढीत तळ ठोकला. हिंमतखानने गढीला वेढा दिला.

संताजी पुरता आपल्या खोड्यात अडकला, असे वाटून भालखेडच्या जमीनदारांकडून खंडणी वसूल करण्यात मशगूल झालेला पाहून, संताजी कधी निसटले त्याला कळलेही नाही. ते तडक गोवळकोंडाला भिडले. तिथे धुमाकुळ माजवून दिला. तोच जिंजीकडे तोफा व रसद घेऊन जात असलेल्या छत्रसाल राठोडची तोफा सहित रसद लुटली. ही लुटालूट चालू असतानाच राठोडला आणखी कुमक मिळाली. संताजीने सरळ महादेवाच्या डोंगराकडे प्रयाण केले.

धनाजी देखील सातारा भागातच होते. मराठेशाहीला दुहीचा शाप भोवला. दोघांमध्ये तणाव वाढतच होता. त्याची झळ राजसिंहासनापर्यत पोहोचायला वेळ लागला नाही. सध्या तरी घोरपडे जाधवातील वितुष्ट स्वराज्यासाठी घातक होते. छत्रपतींसह सर्वजण अस्वस्थ होते. संताजी घोरपडेंचा रुसवा काढून त्यांची समजूत घालण्यासाठी व धनाजी संताजींची दिल जमाई करण्यासाठी महाराजांनी आपला खास दूत विठ्ठल निळकंठास महाराष्ट्रात पाठवले. परशुराम त्रिंबकही त्यांचे बरोबर होते.

संताजी म्हणजे धगधगीत अंगार होते. प्रत्यक्ष छत्रपतींनाही बोल लावलेला तो सेनानी होता. त्यांना आवरणे महाकठीण होते. त्यांची मान फक्त एकाच ठिकाणी झुकत होती ते म्हणजे छत्रपतींचे सिंहासन. परशुराम त्रिंबक व निळकंठ यांच्यात मंत्रणा झाली. धनाजीला बोलावणे धाडले. धनाजीचा बोलावता धनी नागोजी माने सध्या तरी कुठे परांगदा होता.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : भाग - ३१

 संताजी घोरपडे : भाग - ३१

संताजीराव कापशीला येताच आपल्या दोन पत्नी, मोठा पुत्र राणोजी व नवजात बालकात रमून गेले.

दुपारी सदरेवर गावकरी भेटायला आले. संताजीराव सर्वांची आस्थेने चौकशी करत होते. न्यायनिवाडा करत होते. तेवढ्यात नारो संताजींच्या भेटीला आला.

"तात, एक नामी खबर घेऊन आलो. मोगलांचा सरदार छत्रसाल राठोड बराच मोठा फौजफाटा आणि नऊ जंगी तोफा घेऊन जिंजीकडे निघाला आहे. मी सर्व तुकड्या एकत्र करून मोक्याच्या जागी दबा धरून बसवून आलो."

संताजींनी विना विलंब मोहिमेवर जायची तयारी केली. वाटेतच त्यांना मानकोजी पांढरे मोगलांना मिळाल्याचे कळले. ती खबर राजाराम महाराजांना कळविण्याची व्यवस्था केली. संताजींचा तळ जिथे पडला होता, तिथे नवीन सैन्याची भर पडली होती. त्यातच एक आनंदाची खबर मिळाली. संभाजी राजेंच्या वधानंतर हनुमंतराव निंबाळकर हा मराठ्यांचा सरदार मोगलांना मिळाला होता, तो आता स्वराज्यात येऊन मोगलांविरुद्ध लढू लागला. त्याची आणि संताजींची वाटेत अचानक गाठ पडली. आधी संताजींनी त्यांची चांगली कान उघडणी केली नंतर नरमाईने म्हणाले, "हिम्मतखान माझ्या पाठीवर आहे. तुम्ही निघा. आम्ही हिंमत खानचा समाचार घेतो."

संताजींनी हिम्मतखानच्या हालचालीवर आपले लक्ष केंद्रित केले. खान बलाढ्य शत्रू असून जय्यत तयारीनिशी असल्याची खबर होती. त्याच्याशी समोरासमोर सामना करून आपल्या फौजेचे नुकसान करून घेण्यापेक्षा गनिमी काव्याने त्याची शिकस्त करावी असा डाव आखत असतानाच दुसरा एक मोगल सरदार नजीब खान बहादूर मराठी प्रांतावर हल्ल्याच्या तयारीने जात असल्याची पक्की खबर आली. त्याला कल्पनाही नव्हती की संताजीसारखा शत्रू आपल्या जवळपास आहे.

नजीब खान बहाद्दूरवर संताजींनी अचानक हल्ला चढवून त्याच्या सैन्याला चारी बाजूने घेतले. नजीब खानसमोर शरणागती खेरीज पर्याय नव्हता. सर्व मोगल सरदारांना माहीत होते की, संताजीशी सामना म्हणजे एक तर मरण किंवा शरण. नजीबखानने मरण्यापेक्षा शरण पत्करले.

माणगावच्या परिसरात हिंमत खान असल्याची कुणकुण लागल्यामुळे संताजींनी आपला मोर्चा माणगाव कडे वळवला. गनिमी काव्याचे मुख्य तंत्र म्हणजे, शत्रूला अचानक चहू बाजूने घेरुन कह्यात घेणे! खान न भूतों न भविष्यती अशा संकटात सापडला. संताजींच्या धाकाने, हिम्मत खानची हिम्मत खचत असतानाच, खानाच्या सुदैवाने हमीउद्दीनखान व खाजाखान हे दोन मोगल सरदार हिंमत खानच्या मदतीला धावून आले. पुन्हा नव्या जोमाने हिम्मत खान लढण्यास सज्ज झाला. मोगल वरचढ होत असलेले पाहताच संताजींनी पवित्रा बदलला. पुढच्या सगळ्या योजना बारगळल्या.

मोगल सैन्य संताजी घोरपडेंच्या मागावर निघाले. काही अंतर गेल्यावर संताजीने आपल्या सैन्याची विभागणी केली. आणि योग्य सूचना देऊन, नारोच्या नेतृत्वात रवाना केले व स्वतः विशाळगडाकडे रामचंद्र पंतांच्या भेटीस निघाले.

रामचंद्र पंत, संताजीच्या चुकीचे माप त्यांच्या पदरी घालीत म्हणाले, "संताजीराव, तुमचे शौर्य आणि शिस्त पाहून महाराजांना गळ घालून सेनापतीपद तुम्हाला मिळवून दिले आणि तुम्ही खुद्द महाराजांनाच हुकूम बजावायला निघालात."

"मी काय गैर वागलो, तेवढं मला निदर्शनास आणून द्यावे."

"संताजीराव, तुमचं शौर्य ,कर्तृत्व, निष्ठा याबद्दल आम्हाला तीळमात्र शंका नाही. तुमच्या तलवारीच्या शौर्याइतकीच मुत्सद्यांच्या बुद्धीचीही राज्यकर्त्यांना कदर करावी लागते. आणि नेमके हेच तुम्ही विसरलात.

महाराजांनी झुल्फीकारखानाला बंदवशला सुखरूप जाऊ दिल्याचा तुम्हाला राग आला. पण त्यावेळी खानाला दगा फटका झाला असता तर, मोगलांच्या छावणीत असलेल्या महाराणी येसूबाई व शाहू राजेंना धोका झाल्याशिवाय राहिला नसता. त्यांच्या सुरक्षिततेचा विचार महाराजांनी केला त्यात त्यांचे काय चुकले?"

"पण माझे सेनापतीपद...?"

"अलिखित स्वरूपात तुमच्याकडेच आहे. रागाच्या भरात महाराज बोलून गेले असतील इतकच. त्यानंतर तुम्ही महाराजांना प्रत्यक्ष भेटून पुढच्या मोहिमेचा सल्ला घ्यायला हवा होता.

तुम्ही त्रिचनापल्लीला वेढा दिला. शेवट कसा झाला? हीच मोहीम महाराजांना विश्वासात घेऊन केली असती तर, महाराजांच्या मनातील कटूताही गेली असती आणि आपली एकजूट शाबूत राहून आपल्यातली दुही शत्रूला दिसली नसती. एवढेच नव्हे तर, त्रिचनापल्लीच्या स्वारीवर खुद्द महाराजांना तुमच्या सोबत यायचे होते."

"काय सांगता?"

"खरं तेच.. महाराजांना तुमचा रुसवा घालायचा होता. त्यासाठीच त्यांनी ही योजना आखली होती. पण... तरीसुद्धा माझ्याकडे आलेल्या महाराजांच्या प्रत्येक पत्रातून तुमचा उल्लेख सरसेनापती असाच केला आहे."

"पंत आता मी काय करावे?"

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...