*
छत्रपती संभाजी महाराजांचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेले एकमेव सरदार,सेनापती संताजी घोरपडेंचे वडील सरनोबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे समाधीस्थळ*
छत्रपती संभाजी महाराजांचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेले एकमेव सरदार,सेनापती संताजी घोरपडेंचे वडील सरनोबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे समाधीस्थळ*
फोटो व लेख - प्रवीण भोसले
9422619791
मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी आणि वेदनादायक घटना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे मोगलांच्या हाती सापडणे आणि त्यांची औरंगजेबाने केलेली क्रूर हत्या. ही घटना मराठी माणूस कधीच विसरु शकणार नाही.मराठा स्वराज्याच्या काळजावर हा जीवघेणा वार पडला तेव्हा एका स्वराज्यवीराने छत्रपतीना वाचविण्यासाठी अखेरपर्यंत झुंज देऊन रणांगणावर देह ठेवला.हे होते सरनोबत म्हाळोजीबाबा घोरपडे.हे म्हाळोजीबाबा म्हणजे सेनापती घोरपडे घराण्याचे मूळपुरुष आणि अद्वितीय सेनापती संताजी घोरपडे यांचे वडील.
प्रत्यक्ष छत्रपती शंभूराजांचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेले ते एकमेव नामवंत सरदार आहेत. सेनापती संताजी घोरपडे, 'हिंदूराव'बहिर्जी घोरपडे व 'अमीर उलउमरा' मालोजी घोरपडे या इतिहासप्रसिद्ध वीरांच्या या वडिलांचे समाधीस्थळ आहे कारभाटले गावी.
कारभाटले गावच्या ग्रामस्थ मंडळींकडून या समाधीची माहिती २००७ च्या सुरुवातीला माझ्यापर्यंत पोहोचली.समाधी संशोधक या नात्याने घोरपडे मंडळींनी मला कारभाटले गावी समाधी पाहायला येण्याचे निमंत्रण दिले. अर्थात निमंत्रण नसते तरी या समाधीस्थळी मी माथा टेकायला व सविस्तर माहिती घ्यायला जाणारच होतो.ग्रामस्थांना माझ्याकडून या समाधीविषयी माझ्या अभ्यासानुसार जो निष्कर्ष निघेल तो हवा होता.अनेक बाबींचा विचार करुन माझे मत मला मांडायचे होते.सेनापती संताजी घोरपडेंचे थेट तेरावे वंशज ,विद्यमान सेनापती श्रीमंत राणोजीराजे घोरपडे (कापशीकर सरकार) यांच्याशी अगोदर मी याबाबतीत चर्चा केली.आपल्या घराण्याच्या या पराक्रमी मूळपुरुषाची समाधी अस्तित्वात आहे या बातमीने राजेसाहेब अत्यंत आनंदित झाले होते.त्यांनी मला याबाबतीत सविस्तर माहितीसह अभ्यास करून निष्कर्ष काढावा अशी सूचना केली.
२६ मार्च २०१७ रोजी सकाळीच मी व माझे मित्र नाना यादव कारभाटले गावी पोहोचलो.समाधीचे पूजन करून दर्शन घेतले.त्यानंतर कारभाटलेच्या ग्रामस्थांसोबत शेजारच्या काळेसरी मंदिरात बैठक घेतली. ग्रामस्थांकडील या समाधीविषयीची माहिती आणि माझ्याकडील ऐतिहासिक संदर्भ व मराठेकालीन समाधीविषयक माहिती याची देवाणघेवाण झाली.या सर्वातून मी जो निष्कर्ष काढला तोच या लेखातून आज चार वर्षानी तुम्हा सर्व इतिहासप्रेमी शिवस्वराज्याभक्तांसमोर ठेवत आहे.
बऱ्याचशा अपरिचित माहितीचा समावेश असल्याने आणि एखादे समाधीस्थळ निश्चित करण्यासाठी कोणकोणत्या बाबींचा अभ्यास व विचार करावा लागतो हे मांडल्यामुळे हा लेख काहीसा मोठा झाला आहे. म्हणून मी तो पाच भाग करून आपल्यासमोर सविस्तर ठेवत आहे.
*घोरपडे घराण्याचा पूर्वेतिहास*
*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य*
*संगमेश्वरची लढाई*
*कारभाटले येथील समाधीस्थान* आणि
*सद्यस्थिती व जीर्णोध्दार*
*घोरपडे घराण्याचा पूर्वेतिहास*
खरेतर भोसले आणि घोरपडे या एकाच घराण्याच्या दोन शाखा आहेत.उदयपूरच्या सिसोदे घराण्यातील सुजनसिंह राणा हे १३३४ च्या सुमारास महाराष्ट्रात देवगिरी भागात आले.यांचे पराक्रमी पणतू भैरवसिंह उर्फ भोसाजी यांना बहामनी सल्तनतीकडून ८४ गावांसह मुधोळ कर्यात वंशपरंपरेने मिळाली. हे साल होते १३९८. याच भोसाजींवरून या घराण्याला भोसले आडनाव पडले.याच भोसले घराण्यातील भोसाजींचे नातू प्रतापसिंह यांचे दोन पुत्र म्हणजे कर्णसिंह व शुभकृष्णसिंह हे होते.हे दोन्ही बंधू बहामनी सल्तनतीत सरदार होते.
इ.स.१४६९ मध्ये बहामनींचा प्रसिद्ध वजीर महमद गवानने कोकण प्रांतावर कब्जा
करण्यासाठी मोठी मोहिम सुरू केली.कर्णसिंह व त्यांचे पुत्र भीमसिंह सैन्यासह या मोहिमेत सामील होते. विशाळगड हा दुर्गम किल्ला स्थानिक राजा शंकरराय मोरे यांच्याकडून जिंकून घेताना कर्णसिंह व भीमसिंह यांनी विलक्षण पराक्रम गाजवला. हा अवघड किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी घोरपडींच्या कमरेला दोर बांधून त्यांना कड्यावर पाठवले. घोरपडींना कड्यावर ऊंच ठिकाणी पोहोचविण्यासाठी ऊंच काठीच्या टोकावर ठेऊन घोरपडी वर चढविल्या.या पितापुत्रांनी या दोरांवरून आपले सैनिक कड्यावरून किल्ल्यात चढवून किल्ल्याचे दरवाजे आतून उघडविले. लगोलग कर्णसिंह व भीमसिंह यांनी किल्ल्यात शिरून मोरेंच्या सैन्याला कापून काढले व किल्ला जिंकला. पण दुर्दैवाने या लढाईत कर्णसिंह धारातीर्थी पडले. या विलक्षण पराक्रमाची नोंद घेऊन बहामनी सुलतानाने भीमसिंहांना त्यांच्या कुळाच्या शाश्वततेसाठी ८४ गावांसह मुधोळचा प्रदेश ,जो भोसाजींपासूनच या घराण्याकडे होता, तो नवीन सनदा देऊन पुन्हा बहाल केला. शिवाय रायबाग व वाई हा भाग किल्ल्यांसह भीमसिंहांना बक्षीस देण्यात आला. घोरपडींच्या प्रसंगामुळे त्यांना *'राजे घोरपडे बहाद्दर'* असा मानाचा किताब व घोरपडीच्या रंगाचे निशाण देण्यात आले. (महमदशहा बहामनीचे फर्मान दि.२० ऑक्टोबर १४७१). या घटनेने भीमसिंहाचे व त्यांच्या वंशजांचे भोसले हे आडनाव बदलून घोरपडे असे झाले.
मूळ भोसले आडनाव भीमसिंहांचे काका शुभकृष्णसिंह यांच्या घराण्यात चालू राहिले व याच शुभकृष्णसिंहाच्या वंशात छत्रपती श्री शिवरायांचा जन्म झाला.
भीमसिंहांचे वंशज बहामनींच्या पदरी सरदारकी सांभाळत होते. बहामनी सुलतानशाही नष्ट झाल्यावर तिच्यातूनच निर्माण झालेल्या विजापूरच्या आदिलशाहीत घोरपडे सरदार चाकरी बजावत राहिले. शुभकृष्णांची भोसले शाखा नगरच्या निजामशाहीच्या पदरी राहिली.
घोरपडे वीरांच्या लढायांतील अचाट पराक्रमामुळे विजयनगर विरुद्धच्या लढाईत संकटात सापडलेल्या आदिलशाहाचे प्राण वाचले. जीवावर उदार होऊन केलेल्या या धाडसामुळे आदिलशहाने घोरपडेना
दरबारात इतर सरदारांप्रमाणे जमिनीपर्यंत वाकून आदिलशाहाला कुर्निसात करण्याची रीत माफ केली व गौरव करून त्यांना दोन मोरचेलही दिले. हा त्या काळात एक श्रेष्ठ दर्जाचा मान होता.
इ.स. १५६५ मध्ये झालेल्या तालिकोट उर्फ राक्षसतागडीच्या इतिहासप्रसिद्ध लढाईत दक्षिणेतील पाच सुलतानांनी एकत्र होऊन विजयनगरच्या बलाढ्य सैन्याचा समूळ पराभव केला.विजयनगरचे प्रसिद्ध व संपन्न राज्य लुटून, जाळून नष्ट करण्यात आले. याच लढाईत कर्णसिंह घोरपडे (दुसरे) हे धारातीर्थी पडले. त्यांचे पुत्र चोलराज यांना आदिलशहाने सप्तहजारी मनसब व तोरगलपैकी काही गावांची नवीन जहागीर दिली. चोलराज इ.स.१५७८ साली एका लढाईत धारातीर्थी पडले. चोलराज हे घोरपड्यांचे मुळ पुरुष भीमसिंह यांचे खापरपणतू होते. चोलराजांना तीन पुत्र पिलाजी, कानोजी व वल्लभजी होते. हे आदिलशाहीचेच सरदार होते.
पिलाजी घोरपडे मुधोळला स्थायिक झाले.वल्लभजींकडे वाई परगण्यातील विटे प्रांताची देशमुखी आली. पिलाजींच्या मुधोळ शाखेतील चोलराजाचे नातू प्रतापराव उर्फ पद्मोजी यांच्या कारकिर्दीत आदिलशाहाने घोरपडेंच्या वाटणी-संदर्भातील सनद दिली. (इ.स.१६३७). या सनदेनुसार प्रतापरावांना ८४ गावांसह मुधोळ, तोरगळ परगणा तसेच कर्नाटक व व-हाड यातील घोरपडेंच्या
एकूण गावांपैकी अर्धी गावे व सप्तहजारी मनसब दिली, तर वल्लभजींकडे इ.स.१५७० पासून चालू असलेली वाई प्रांतातील विटा-भाळवणी कर्यातीची देशमुखी व विजयनगरपैकी ३० गावे व दोन हजारी मनसबदारी वल्लभजींचे नातू (बहिर्जींचे पुत्र) म्हाळोजीबाबा यांना देण्यात आली.यामुळेच म्हाळोजीबाबा हे सेनापती घोरपडे घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात.
प्रतापराव उर्फ पद्मोजी यांचे पुत्र नावजी. नावजींच्या पाच पुत्रांपैकी बाजीराजे घोरपडे हे आदिलशाहीत मोठे सरदार बनले. छत्रपती शिवरायांविरुद्ध लढताना मुधोळ येथे बाजीराजे घोरपडे मारले गेले (इ.स.१६६४).
*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य*
वल्लभजी घोरपडे हे वाई प्रांतातील विटा परगण्याचे देशमुख असून भाळवणी, न्हावी, वांगी व जांब ही गावे त्यांच्याकडे असून त्या गावांची पाटीलकीही त्यांच्याकडेच होती. यांच्याच काळात भाळवणी हे घोरपडेंच्या या शाखेचे रहिवासाचे मुख्य ठिकाण बनले. आजही भाळवणीमधे घोरपडेंचा जुना वाडा जीर्णावस्थेत आहे. वल्लभजींचे पुत्र बहिर्जी व बहिर्जींचे पुत्र म्हाळोजीबाबा होते. सन १६३७ च्या वाटणीच्या सनदेनुसार वल्लभजींचे नातू म्हाळोजीबाबा ही गावे सांभाळून होते.
विजापूर दरबारात सरदारांचे दोन प्रतिस्पर्धी गट होते. एका गटात शहाजीराजे, रुस्तमेजमान,
रणदुल्लाखान हे होते तर दुसऱ्या गटाचे मुख्य अफजलखान, खवासखान, बाजीराजे घोरपडे हे होते. वल्लभजी शहाजीराजांच्या सैन्यात असून ते ५०० स्वारांचे सरदार होते. मुधोळ शाखा व भाळवणी शाखा यांच्यात अधूनमधून वाटणीसंबंधात तक्रारी होत असत. यात शहाजीराजे वल्लभजींची बाजू घेत असत. एका प्रसंगी शहाजीराजे व बाजीराजे यांच्यात या प्रकरणावरून समझोत्याचा तहदेखील झाला होता.
सन १६५२ मध्ये शहाजीराजाचे थोरले पुत्र संभाजीराजे (छत्रपती शिवरायांचे सख्खे थोरले बंधू)हे पन्हाळ्याची सुभेदारी सांभाळत असताना म्हाळोजीबाबा संभाजीराजांच्या तैनातीत होते. याच काळात निर्माण झालेला घोरपडेंच्या कसबे वांगीच्या पाटीलकीचा वाद संभाजीराजांनी मिटवल्याचे पत्र उपलब्ध आहे.हे पत्र संभाजीराजांनी म्हाळोजीबाबांच्या अर्जाला उत्तर म्हणून लिहिलेले आहे.
१६५५ मध्ये संभाजीराजे अफजलखानाच्या कारस्थानामुळे कर्नाटकातील कनकगिरी येथे झालेल्या लढाईत मृत्यू पावले. त्याच काळात आदिलशाहाने हिंदूवर धार्मिक अत्याचार करण्याचे धोरण अवलंबले होते. या घटनांनंतर म्हाळोजीबाबांनी शहाजीराजांची परवानगी घेऊन आदिलशाहीविरुद्ध लढा देणाऱ्या शिवरायांच्या पदरी आपली सेवा रुजू केली.
आदिलशाही दरबारातील कटकारस्थानांना कंटाळून शहाजीराजांनी कर्नाटकातील बेंगलोर शहरी आपले वास्तव्य कायम केले.या सर्व घटनांचे म्हाळोजीबाबा साक्षीदार होते. छत्रपती शिवरायांच्या पदरी आपल्या कर्तबगारीने व स्वराज्यनिष्ठेने लवकरच म्हाळोजीबाबांना
सरनोबत पद मिळाल्याचा उल्लेख कापशीकर घोरपडेंचा इतिहास या पुस्तकात आहे. पन्हाळा सुभ्याचा पूर्वीचा अनुभव असल्याने त्यांना या भागात नेमण्यात आले.
छत्रपती शिवरायांच्या युगप्रवर्तक कार्यात म्हाळोजीबाबा पूर्णपणे समरसून कार्य करत होते.शिवरायांनी १६६०-६१ च्या कोकण मोहिमेत पालवण, संगमेश्वर, शृंगारपूर काबीज केले. येथील आदिलशाही सरदार सुर्वे व दळवी हे पळून गेले. शृंगारपूर भाग शिर्के यांच्याकडे देण्यात आला. या मोहिमेत शिवरायांनी प्रचितगड जिंकून तिथे आपले मजबूत लष्करी ठाणे बसविले. बहुधा याच सुमारास म्हाळोजीबाबांनी आपल्या भाऊबंदांपैकी वेणेगाव (जि.सातारा) येथील घोरपडेंना स्वराज्यसेवेत रुजू केले. प्रचितगडावरील सैन्यात घोरपडेंचा समावेश झाला. प्रचितगडाच्या पायथ्यापासून जवळच असलेल्या कारभाटले या गावी ही घोरपडे मंडळी स्थायिक झाली.
शिवराज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय मोहिम व त्यानंतर युवराज संभाजीराजांचे अल्पकाळ मोगलांना मिळून परत स्वराज्यात येणे या घटना म्हाळोजीबाबा पहात होते. मोगलांकडून परत आलेल्या युवराज शंभूराजांना शिवरायांनी काही काळ पन्हाळ्यावर राहण्यास सांगितले व त्यांच्या दिमतीला म्हाळोजीबाबांची नेमणूक करण्यात आली.
छत्रपती शिवरायांच्या अनपेक्षित व अकाली झालेल्या मृत्यूनंतर युवराज संभाजीराजे छत्रपती झाले.म्हाळोजीबाबांनी आपली निष्ठा छत्रपती शंभूराजांच्या चरणी वाहिली. यावेळी म्हाळोजीबाबांचे पुत्र संताजी, बहिर्जी व मालोजी हेही स्वराज्यात तलवार गाजवीत होते.
शिवरायांच्या मृत्यूची वार्ता कळताच आनंदित झालेल्या औरंगजेबाने महाराष्ट्रातील मराठ्यांचे राज्य संपविण्यासाठी मोठ्या मोहिमेची तयारी केली. प्रचंड सेनासागर, मुबलक युद्धसामुग्री, करोडोंचा खजिना घेऊन स्वतः औरंगजेब महाराष्ट्रात दाखल झाला. आशियाखंडातील सर्वात मोठे व बलाढ्य असे मोगल साम्राज्य विरुद्ध त्यापेक्षा कैकपटीने लहान असलेले, शिवप्रभू हयात नसलेले, मराठ्यांचे स्वराज्य असा विषम सामना महाराष्ट्रात सुरू झाला. छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय जिद्दीने,चिकाटीने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने प्रचंड धावपळीच्या लढाया मारून मोगलांना सुरुवातीच्या काळात कुठेही यश मिळू दिले नाही. म्हाळोजीबाबांचे पुत्र संताजीराव हे शिवप्रभूंच्या तालमीत तयार झालेले गनिमी काव्याचे वाकबगार सेनानी फिरत्या फौजा घेऊन मोगलांशी लढा देऊ लागले.
कर्नाटकातील कोप्पल भागात मोगलांच्या चिथावणीने उठलेल्या बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या छत्रपती शंभूराजाना संताजीरावांनी ऐनवेळी दहा बारा हजारांची फौज जमवून कुमक केली. सतत तीन महिने लढाया करून संताजीरावानी तुंगभद्रा नदीच्या आसपासचा मुलुख काबीज करून महात्वाची ठाणी सर केली. ही सर्व घटना स्वतः छत्रपती शंभूराजांनी संताजीरावाना दिलेल्या
देशमुखीच्या सनदेत नोंदली गेली आहे. तसेच या सनदेतील पुढील वाक्ये महत्त्वाची आहेत. *'हा उपयोग राज्याचा चांगला केला आणि सर्व सरकारात चाकरी हिमतीने आणि इमानाने केली व आपला प्राणरक्षण करून आमचा रक्षण केला हे समजून तुम्हास राज्यातील चौधाई मुलुख इनाम करून दिला असे... तुमची चाकरी हिमतीची पाहून आम्ही संतोषाने ही देणगी दिली असे.'*(दि.१६ जानेवारी १६८२). या सनदेत म्हटल्याप्रमाणे एका अडचणीच्या आणि संकटाच्या वेळी छत्रपती शंभूराजांचे प्राणच धोक्यात आले असताना संताजीरावानी ते वाचवले. ही अतिशय मोलाची कामगिरी चौथाईची सनद देऊन गौरविण्यात आली.आपल्या पुत्राच्या या कर्तबगारीने म्हाळोजीबाबा निश्चितच सुखावले असणार.त्यांच्या पुढील पिढीच्या स्वामीनिष्ठ पराक्रमाची ही सुरुवातीची पावती होती. पुन्हा एकवार मोगलांशी लढण्यासाठी संताजीराव सन १६८६ मध्ये कनार्टकात मोहिमेवर गेले. या सर्व घडामोडी चालू असताना म्हाळोजीबाबा सरनोबत पदावर राहून पन्हाळा सुभ्याचा लष्करी बंदोबस्त चोख ठेवत होते. पन्हाळा सुभ्यात पन्हाळ्याशिवाय विशाळगड व प्रचितगड हे किल्ले व त्या खालचा भाग समाविष्ट होता. प्रचितगडावर कारभाटले येथील घोरपडे मंडळी सैन्यात होतीच.
छत्रपती शंभूराजांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांच्या प्रखर प्रतिकाराने नाउमेद होऊन औरंगजेबाने आपला मोर्चा विजापूरची आदिलशाही व गोवळकोड्याची कुतुबशाही यांच्याकडे वळविला. प्रचंड सैन्यसामर्थ्य व त्याचबरोबर शत्रूपक्षातील सरदाराना आमिषे दाखवून फोडून आपल्याकडे वळवून घेऊन औरंगजेबाने वेढा घालून या दोन्ही सुलतानशाह्या पूर्ण नष्ट केल्या. या दोन्ही पुरातन शाह्याचा खजिना, युद्धसामग्री व सैन्य कब्जात आल्याने औरंगजेबाचे सामर्थ्य दुपटीने वाढले. या वाढीव सामर्थ्यासह औरगंजेब पुन्हा प्रलयाप्रमाणे मराठ्यांच्या स्वराज्यावर तुटून पडला. आता फक्त मराठेच त्याचे एकमेव शत्रू राहिले होते. इंग्रज व पोर्तुगीज याना दम देऊन औरंगजेबाने संभाजीराजांच्या विरुद्ध उठवले. जंजिऱ्याच्या सिद्दीला आपला मनसबदार करून मराठ्यांवर हल्ले करण्यास बळ दिले. मराठ्यांच्या स्वराज्याची अशी नाकेबंदी करून औरंगजेब नव्या उमेदीने मोहिम चालवू लागला. अशातच स्वराज्याचे पराक्रमी सेनापती हंबीरराव मोहिते वाई येथील लढाईत १६८५ साली धारातीर्थी पडले. यानंतर बहुधा म्हाळोजीबाबांकडे हे पद आले असावे पण अद्याप याला ठाम पुरावा उपलब्ध नाही.
या विलक्षण वादळी स्वरूपाच्या विषम लढाईत औरंगजेबाला अकस्मात त्याला हवी होती ती घटना घडली. छत्रपती संभाजीराजे संगमेश्वर येथे मोगलांच्या हाती सापडून कैद केले गेले.
*संगमेश्वरची लढाई*
औरंगजेबाचे सर्व सरदार अफाट युद्धसामुग्री व बेमुबलक खजिन्यासह मराठ्यांना संपविण्यासाठी मोहिमावर मोहिमा काढू लागले. याचवेळी औरंगजेबाने आपले हुकमी अस्त्र बाहेर काढले ते म्हणजे मराठ्यांमध्ये दुही पेरण्याचे, फितुरीचे आणि आमिषे दाखवून; मनसबदारी देऊन मराठ्यांना आपल्याकडे वळवून घेण्याचे. मोगलाच्या प्रचंड सामर्थ्यासमोर मराठ्यांचे स्वराज्य कितपत टिकाव धरणार या आशंकेने व स्वतःचे वतन सुरक्षित ठेऊन बादशाही मनसब मिळवण्याच्या स्वार्थी इच्छेने काही मराठे सरदार औरंगजेबाच्या दरबारात रुजू झाले. यातच शृंगारपूरचे गणोजीराजे शिर्के हेही १६८८ मध्ये मोगलांना सामील झाले. गणोजीराजे हे शिवरायांचे जावई तसेच त्यांच्या भगिनी येसूबाई या शंभूछत्रपतींच्या पत्नी होत्या. हा शिवरायांच्या जवळच्या नात्यातील मोठा मोहरा औरगजेबाला मिळाला. शृंगारपूर, संगमेश्वर या भागाचा कारभार शिर्के मंडळीच स्वराज्यात असताना पहात असत.पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात शिर्केनी छत्रपती शंभूराजांचे सल्लागार व छंदोगामात्य कवि कलश यांच्यावर हल्ला केला. कविकलश पळून पन्हाळा किल्ल्यावर आश्रयास गेले व त्यांनी ही बातमी छत्रपती शंभूराजांना कळविली. छत्रपती शंभूराजे तातडीने रायगडावरून विशाळगडावर आले. त्याचवेळी मोठी मोगली फौज कोल्हापूरवर चाल करून आली होती. ही बातमी कळताच शंभूराजांनी त्वरेने हालचाली केल्या.
म्हाळोजीबाबाना ससैन्य बरोबर घेऊन शंभूराजांनी संगमेश्वरवर हल्ला केला. शिर्के पळून गेले. या मोहिमेत संताजीराव व त्यांचे दोन्ही बंधू तसेच कविकलश, खंडो बल्लाळ चिटणीस हे सर्वजण होते.
छत्रपती शंभूराजे संगमेश्वराला आल्याचे कळताच अनेकांनी आपल्या तक्रारी निवारण्यासाठी
संगमेश्वरला धाव घेतली. या तक्रारींचा न्यायनिवाडा करण्यात दोन तीन दिवस निघून गेले.
१ फेब्रुवारी रोजी रायगडाकडे निघण्याचे ठरवून शंभूराजांनी आपली हुजुरातीची ४०० ते ५०० सैन्याची तुकडी संगमेश्वरला आपल्यापाशी ठेऊन इतर सैन्य रायगडाकडे रवाना केले. संगमेश्वर येथील देसायांच्या वाड्यात शंभूराजांचा मुक्काम होता.
१ फेब्रुवारीला सकाळपासूनच काही राहिलेली न्यायनिवाड्याची कामे तातडीने उरकत असतानाच शंभूराजाना शेखनिजाम उर्फ मुकर्रबखान हा मोगली सरदार संगमेश्वरवर येऊन धडकल्याची धक्कादायक बातमी कळली. शेखनिजाम थेट कोल्हापूरहून कोणालाही न समजू देता संगमेश्वरवर संभाजीराजांवर चालून आला होता. त्याला या भागातील आडवाटांसह शंभूराजाच्या हालचालींची बातमी अचूकपणे कळविणारे या भागातीलच फितूर या घटनेचे मुख्य सहाय्यकारी ठरले असावेत.
शेख निजामाने ३००० सैन्यासह संगमेश्वर घेरले. फास आवळत तो शंभूराजे व त्यांच्या सोबतचे ४००-५०० मराठा सैन्य यांच्याजवळ पोहोचू लागला. या संकटप्रसंगी
छत्रपती संभाजीराजांनी आपली सैन्यशक्ती मोगलांपेक्षा कमी आहे हे ध्यानात घेऊन मोंगली फौजेशी लढा देत त्यांची फळी फोडून सर्वांनी जमेल तसे रायगडाकडे निसटून जायचा निर्णय घेतला. ३००० मोगल विरुद्ध ४०० मराठे अशी विषम लढाई सुरू झाली. म्हाळोजीबाबा, संताजीराव व त्यांचे बंधू, कविकलश, खंडो बल्लाळ व स्वतः छत्रपती शंभूराजे टोळ्याटोळ्यांनी मोगलाचा वेढा फोडून पार जाण्यासाठी झुंजू लागले. संताजीराव व खंडो बल्लाळांनी मोगलांची फळी फोडून रायगडाकडे दौड सुरू केली. मात्र म्हाळोजीबाबा, कविकलश व छत्रपती शंभूराजे घेरले गेले. या अटीतटीच्या प्रसंगी म्हाळोजीबाबांनी पुढे होऊन लढाईचा भार स्वतःवर घेतला. छातीचा कोट करून आपल्या छत्रपतींचे रक्षण करण्यासाठी म्हाळोजीबाबा त्वेषाने या हजारोंच्या मोगली सैन्याविरूध्द लढू लागले.मोगलांशी प्राणपणाने झुंजत स्वराज्याच्या छत्रपतींना वाचविण्यासाठी लढणारे म्हाळोजीबाबा या लढाईत धारातीर्थी पडले.जखमी कवी कलशांना वाचवण्यासाठी मागे फिरलेल्या छत्रपती शंभूराजांना मोगलांनी
कवी कलशांसह घेरून कैद केले. स्वराज्याचे छत्रपती औरंगजेबाच्या विळख्यात सापडले.पण हा दुर्दैवी प्रकार पाहण्यापूर्वीच म्हाळोजीबाबांचे डोळे मृत्यूने मिटले होते.(१ फेब्रुवारी १६८९).
म्हाळोजीबाबांचा जन्म बहुधा १६२० मध्ये झाला. १६३७ चा आदिलशाही सनदेत त्यांना विटा भागातील गावे दिल्याचा उल्लेख आहे. यानंतर १५ वर्षे ते शहाजीराजांबरोबर होते. सन १६५२ ला शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजेंच्या हाताखाली ते होते. १६५५ पासून १६८० पर्यंत शिवभप्रभूंबरोबर स्वराज्यस्थापनेच्या कार्यात ते सहभागी होते. छत्रपती शंभूराजांना वाचविताना त्यांनी प्राणापर्ण केले तेव्हा ते ६९ वर्षाचे होते. सतत ५२ वर्षे स्वराज्यसेवा बजावून ते धारातीर्थी पडले. सेनापती घोरपडे घराण्याच्या या मूळ पुरुषाचे चरित्र व कर्तबगारी या प्रसंगामुळे त्या घराण्यासह सर्व मराठी जनांना व महाराष्ट्राला ललामभूत ठरलेली आहे.
छ. शंभूराजाना कडेकोट बंदोबस्तात बहादूरगड येथे मोगली छावणीत पाठविण्यात आले. औरंगजेब तेथेच होता.१ फेब्रुवारीपासून ११ मार्चपर्यंत शंभूराजांचे अतोनात हाल करून ११ मार्चला औरंगजेबाने तुळापूर येथे शंभूराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
पुढच्या सतरा वर्षात मोगल मराठ्यांना संपविण्यासाठी धडपडत राहिले पण छत्रपती शंभूराजांच्या क्रूर हत्येने चिडलेल्या व छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली सेनापती संताजी घोरपडेंच्या अचाट पराक्रमाने प्रेरीत झालेल्या, स्वयंस्फूर्तीने लढणाऱ्या मराठ्यांना ते हरवू शकले नाहीत. निराश अवस्थेत अपयशी ठरलेला औरंगजेब इथे महाराष्ट्रातच मातीआड झाला.मोगलांना मराठ्यांच्या दहशतीखाली आणले संताजीं घोरपडेंनी. छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे जात असताना त्यांच्या संरक्षकात होते बहिर्जी व मालोजी घोरपडे.या प्रवासात आलेल्या मोगलांच्या एका छाप्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांना निसटून जाण्यासाठी मदत करताना मालोजी मोगलांच्या हाती सापडले. त्यांना कैदेतच ठार करण्यात आले.बहिर्जी घोरपडेंनी मोगलांविरूध्द अनेक लढाया तर केल्याच शिवाय कर्नाटकात गजेंद्रगडला आपले ठाणे स्थापून पुढील काळातील दक्षिण भारतातील मराठा सत्तेच्या विस्तारात खूप मोठी कामगिरी केली.म्हाळोजीबाबांचे हे तीनही पुत्र मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.
*कारभाटले येथील समाधीस्थाने*
पन्हाळा सुभ्याचा लष्करी बंदोबस्त म्हाळोजीबाबांकडे असल्याने आणि प्रचितगड हा पन्हाळा सुभ्यात असल्याने छत्रपती शंभूराजांच्या संरक्षणासाठी
असलेल्या हुजुरातीच्या फौजेत प्रचितगड व कारभाटले येथील घोरपडे मंडळींचाही समावेश असणे साहजिकच आहे. म्हाळोजीबाबांबरोबरच यातील काही घोरपडे मंडळी संगमेश्वराच्या लढाईत ठार झाली असावीत.पण यांची नावे उपलब्ध नाहीत. संगमेश्वरची ही लढाई झाली तिथून कारभाटले गाव जवळच आहे.
चिपळूण-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण आहे. संगमेश्वर गावातून पूर्वेला गेलेल्या रस्त्यावर १० कि.मी. अंतरावर कारभाटले हे गाव आहे. हाच रस्ता पुढे नायरी गावावरून शृंगारपूरला पोहोचतो. शृंगारपूरहून प्रचितगडावर जायची वाट आहे.
कारभाटले गावाच्या दोन वाड्या आहेत. पहिली घोरपडेवाडी व दुसरी पवारवाडी. रस्त्याच्या दक्षिणेला चढावरती घोरपडेवाडी व उत्तरेला उतरतीवरती पवारवाडी वसलेली आहे. घोरपडेवाडीत ग्रामदैवत काळीसरी देवीचे मंदिर आहे. पवारवाडीत पवारांचे वेगळे ग्रामदैवत काळीसरीचेच मंदिर आहे. घोरपडेवाडीत ४०-४५ घरे आहेत. एक दोन अपवाद वगळता सर्व घरे घोरपडे यांचीच आहेत.लोकसंख्या अंदाजे ३०० असावी.
शिवकाळात प्रचितगड हा या भागातील प्रमुख किल्ला होता. प्रचितगडावरील शिवकालीन
सैन्यात घोरपडेंचा समावेश असून ते शिवकाळातच सातारा जिल्ह्यातील वेणेगाव येथून येऊन घोरपडेवाडीत स्थायिक झाल्याची परंपरागत माहिती मिळते.
म्हाळोजीबाबा शहाजीराजांच्या काळापासूनच पन्हाळा सुभ्याचे माहितगार असल्याने छत्रपती शंभूराजांच्या काळात या भागाच्या लष्करी बंदोबस्ताची जबाबदारी सरनोबत या नात्याने
म्हाळोजीबाबांकडेच होती. तसेच घोरपडेवाडीतील त्यांच्या भाऊबंदांपैकी अनेक घोरपडे त्यांच्या पन्हाळ्यावरील सैन्यात व प्रचितगडावरील शिबंदीत असावेत. कारभाटले गावची पाटीलकी ही सुद्धा पूर्वापार घोरपडेंकडे चालत आलेली आहे.
घोरपडेवाडीतील ग्रामदैवत काळीसरीदेवीच्या कौलारू, जुन्या व प्रशस्त मंदिराच्या आवारातच मंदिराच्या उजव्या बाजूला काहीशा चढावर पाच शिवकालीन समाध्या आहेत. साधारणपणे साडेपाच फूट बाय साडेपाच फूट या मापाच्या व अडीच फूट उंचीच्या या समाध्या आहेत. दगडाचे मोठे पाटे व चौकोनी दगड रचून या समाध्या बांधलेल्या आहेत. समाध्यांवर दिवा लावण्यासाठी दगडी देवळ्या असून यापैकी सर्वात पुढील समाधी ही सरनौबत म्हाळोजीबाबांची समाधी म्हणून ग्रामस्थाना परिचित आहे. या समाधीच्या दगडी देवळीत दगडाचाच छोटा निरांजनासारखा दिवा आहे. इतर समाधीस्थानांपेक्षा ही दगडी देवळी व दिवा वेगळ्या घडणीचा आहे.
देवीचे नवरात्र, जत्रा व गावातील इतर सणांच्या वेळी या समाध्यांना नैवेद्य दाखविला जातो. काळीसरीदेवीच्या मंदिरात स्थापनेच्या वेळच्या मूर्ती असून यापैकी उजवीकडील मूर्ती वरदायिनी मातेची (भवानी), मधील जुगाईदेवीची तर डावीकडील काळीसरी देवीची आहे.
म्हाळोजीबाबांच्या मृत्युपूर्वीपासूनच घोरपड्यांची वस्ती येथे आहे. त्यामुळे समाध्यांचा काळ देवीस्थापनेनंतरचा ठरतो. देवीचे स्थान इथे असल्यामुळेच नित्यपूजेसाठी समाध्या मंदिराशेजारी बांधण्यात आल्या.
घोरपडेवाडीतील ग्रामस्थांच्या पूर्वापार चालत आलेल्या रितींवरून, माहितीवरून व परंपरेने या समाध्या घोरपड्यांच्या असून सर्वात पुढील समाधी ही म्हाळोजीबाबांची समाधी म्हणूनच ओळखली व पूजली जाते. देवी मंदिराशेजारील अगदी महत्त्वाच्या जागेवरूनही याला बळकटी मिळते.
संगमेश्वराच्या लढाईत म्हाळोजीबाबा व इतर सैनिक वीरगती पावल्यानंतर त्यांचे व सैनिकांपैकी घोरपडे घराण्यातील व्यक्तींचे दहन व इतर क्रियाकर्मे ही कारभाटले गावच्या घोरपड्यांनी ते भाऊबंद असल्याने करून त्यांची समाधीस्थाने गावात बांधली असावीत असा निश्चित अंदाज करता येतो.
राहत्या गावी आपल्या पूर्वजांची समाधी बांधण्याची आपल्याकडे पूर्वीपासूनच परंपरा आहे. त्यासाठी ग्रामदैवताच्या शेजारचे स्थान सर्वात योग्य मानले जाते. याशिवाय नद्यांच्या संगमावर,परिसरातील प्राचीन मंदिराशेजारी, अथवा इतर पवित्र ठिकाणीसुद्धा समाध्या बांधल्या जात. समाधी बांधताना त्यात मृत व्यक्तीचा अस्थिकलश ठेवण्याची परंपरा आहे. त्यामुळे म्हाळोजीबाबा व त्यांच्यासमवेत मारले गेलेल्या इतर घोरपडे वीरांचे दहन केल्यानंतर त्यांची समाधीस्थाने घोरपड्यांच्या कारभाटले या संगमेश्वरपासून जवळ असलेल्या गावी असणे हे तर्काला धरूनच आहे. नित्यनैमित्तिक पूजा व इतर सोयींसाठी या समाध्या देवीमंदिराशेजारी बांधण्यात आल्या. इतर चार समाधीस्थानेसुद्धा घोरपड्यांचीच असून अद्याप त्यांची नावनिशीवार माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र या सर्व समाध्या एकाच वेळी बांधण्यात आल्या हे बांधकामावरून सहज समजते.
म्हाळोजीबाबांकडे वांगी, भाळवणी, न्हावी, जांब ही गावे होती. मात्र या गावात तसेच संगमेश्वरमध्ये म्हाळोजीबाबांची कुठेही समाधी नाही. कापशी, गजेंद्रगड, दत्तवाड ही गावे अनुक्रमे सेनापती संताजी, बहिर्जी व मालोजी या तीन बंधूना नंतरच्या काळात मिळाल्याने तेथेसुद्धा म्हाळोजीबाबाची समाधी नाही.
उपलब्ध इतिहासाप्रमाणे देवीमंदिराशेजारी समाधी बांधण्याएवढे मोठे व महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व म्हाळोजीबाबांशिवाय दुसरे कोणतेही नाही. घोरपड्यांच्या संबंधात या भागात संगमेश्वर लढाईसारखी दुसरी कुठलीही महत्त्वाची घटना म्हाळोजीबाबांच्या मृत्युपूर्वी व नंतरसुद्धा घडलेली नाही. त्यामुळे म्हाळोजीबाबांच्या समाधीच्या सत्यतेविषयी खात्री पटते.
शिवपूर्वकाळापासून म्हणजे इ.स.१६०० पासून ते १८१८ मध्ये मराठी साम्राज्य ब्रिटिशांकडून नष्ट केले जाईपर्यंतच्या काळात मराठेशाहीतील शेकडो कर्तबगार, महत्त्वाच्या पदावरील व एखाद्या प्रसंगाने प्रसिद्धी पावलेल्या व्यक्ती मरण पावल्या आहेत. काही लढायांत, काही वृद्ध होऊन तर काही आजारपणाने मृत झाल्या. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरसुद्धा गावोगावी, किल्ल्यांवर, पवित्र ठिकाणी अनेक मराठ्यांची समाधीस्थाने आहेत. लढाईत मृत्यूमुखी पडलेल्या , घराण्याचे मूळ पुरुष असलेल्या तसेच विशेष कर्तबगारी दाखवलेल्या व्यक्तींची समाधीस्थाने आवर्जून बांधली जात. लढाईत रणांगणावर आलेला मृत्यू त्याकाळी व आजही सर्वश्रेष्ठ समजला जातो. अशा व्यक्तींच्या कर्तबगारीचे स्मरण म्हणून, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच परंपरेने चालत आलेली पितृपूजा, कुलाचार, पूजाविधी करण्यासाठी या समाध्या बांधल्या व पूजल्या जात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या व्यक्तींचे चरित्र माहिती होत जाई.
इ.स.१६०० पासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा (इ.स.१७०७)हा काळ महाराष्ट्रासाठी अतिशय धामधुमीचा होता. त्यामुळे या काळातील बहुसंख्य समाध्यांना कागदोपत्री अगदी काटेकोरपणे समाधीची निश्चिती करणारा पुरावा आढळत नाही. तसेच समाधीच्या पूजाअर्चेसाठी कागदोपत्री काही जमीन अथवा इनाम दिले जाण्याच्या घटना अगदी महत्त्वपूर्ण पदावरील, मोठ्या घराण्यातील तुरळक व्यक्तींच्या बाबतीतच आढळतात. त्यामुळे एखाद्या समाधीस्थानांविषयी त्या व्यक्तींच्या घराण्यातील वंशजाच्या परंपरा, वहिवाट, पूर्वापार चालत आलेली माहिती व त्या व्यक्तींच्या मृत्यूच्या प्रसंगाची व ठिकाणाची कागदपत्रातून आढळणारी त्रोटक माहिती यांच्याआधारेच एखाद्या व्यक्तीचे समाधीस्थान निश्चितपणे सांगता येऊ शकते.
अनेक मोठ्या घराण्यांची त्यांची वेगळी समाधीस्थानासाठी ठेवलेली जागा असूनसुद्धा त्या जागेतील समाध्यांपैकी कोणती समाधी कोणाची हे कागदोपत्री पुराव्याअभावी काटेकोरपणे सांगता येत नाही. मुधोळ मधील घोरपडेंच्या समाधीस्थानांची जागा, गजेंद्रगडकर घोरपडेंची एकत्रितअसणारी समाधीस्थाने, तंजावरच्या राजेभोसले घराण्यातील समाधीस्थाने, साताऱ्यातील संगम माहुली येथील छत्रपतींच्या घराण्यातील समाधीस्थाने इथेही हीच परिस्थिती आहे. पण परंपरेने या समाध्या पुजल्या जात असल्याने कोणती समाधी कोणाची हे ठरवण्यास निश्चित आधार मिळतो.अशाच प्रकारे आपल्या इतिहासातील बहुतांश वीरांची समाधीस्थळे निश्चित झालेली आहेत.
याच अनुषंगाने कारभाटले येथील समाधीस्थळे घोरपडेंचीच असून सर्वात पुढील समाधी ही सरनोबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांची आहे असा निष्कर्ष खालील मुद्द्यावरून काढता येतो.
१. कारभाटले येथे
ग्रामदैवताच्या मंदिरशेजारी महत्त्वाच्या जागी समाधीस्थाने आहेत.
२. कारभाटले गाव संगमेश्वरच्या जवळ आहे.हे घोरपडेंचे गाव आहे.
३. घोरपडे घराण्याशी संबंधित इतर गावामध्ये कुठेही म्हाळोजीबाबांची समाधी नाही.
४. समाध्यांच्या बांधकामाचे साहित्य व पद्धत शिवकालीन आहेत.
५. कारभाटले ग्रामस्थ पूर्वापार परंपरागत माहितीआधारे ही समाधी म्हाळोजीबाबांचीच असल्याचे
मानतात व नैमित्तिक पूजा करतात.
६. सेनापती संताजीरावांचे थेट वंशज कापशीकर सेनापती राणोजीराजे घोरपडे सरकार यांचीही या गोष्टीला मान्यता आहे.
७. म्हाळोजीबाबांशिवाय इतर कोणतीही इतिहासप्रसिद्ध व समाधी बांधण्याच्या योग्यतेची व्यक्ती दुसरी कुणीही या भागात त्या काळात झालेली नाही.
८. संगमेश्वरच्या लढाईसारखा अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंग या लढाईशिवाय दुसरा कोणताही त्यापूर्वी व त्यानंतर या भागात घडलेला नाही.
१०. प्रत्यक्ष छत्रपतींना वाचविताना प्राणार्पण केलेल्या वीरांची समाधीस्थाने बांधली जाणे सहज शक्य गोष्ट आहे.
११. म्हाळोजीबाबा हे सेनापती घोरपडे घराण्याचे मूळ पुरुष असल्याने त्यांची समाधी बांधली जाणे आवश्यकच होते.
वरील सर्व मुद्यावरून या पाचही समाध्या घोरपडे वीरांच्याच असून त्यातील सर्वात पुढील समाधी माळोजीबाबांची आहे असा निष्कर्ष काढता येतो.
मी स्वतः मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यासक असून गेल्या ३० वर्षापासून मराठ्यांची समाधीस्थाने हा माझा विशेष अभ्यासाचा विषय आहे. यासाठी मराठ्यांची देशभरातील हजारांहून जास्त समाधीस्थानांचे मी त्या त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलेले आहे व माहिती गोळा केली आहे. या विषयावर 'मराठ्यांची धारातीर्थे' हा मराठ्यांच्या समाधीस्थानांची माहिती छायाचित्रांसह देणारा ग्रंथ मी २००६ साली लिहून प्रकाशित केला.याच ग्रंथाची नवीन,सुधारित व वाढीव आवृत्ती २०१९ मधे प्रकाशित झाली आहे.यात म्हाळोजीबाबा घोरपडेंच्या कारभाटले येथील समाधीचा समावेश आहे.
ऐतिहासिक संदर्भ, परिस्थितीजन्य पुरावे, परंपरागत माहिती, बांधकामाचे जुनेपण व पद्धत यावरून कारभाटले येथील ग्रामदैवत काळीसरी देवीच्या
मंदिराशेजारी घोरपडे वीरांची समाधीस्थळे असून त्यातील सर्वात समोरची समाधी ही सरनौबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांचीच आहे असा माझा निष्कर्ष आहे.
*सद्यपरिस्थिती व जीर्णोद्धार*
कारभाटले गावातील या पाचही समाध्या सध्या अत्यंत दुरावस्थेत आहेत. समाध्यांचे दगड निखळून पडले आहेत. समाध्यांच्या वरच्या बाजूला असलेल्या रस्त्याकडेचे दगड व माती पावसाळ्यात निसटून थेट समाधीस्थानावर येतात. त्यात समाध्या मुजल्या आहेत.अनेक वर्षापासून पडणारा कोकणातील मुसळधार पाऊस, समाध्यांवर वाढणारी झाडे व उगवणारे गवत यांनी समाध्यांचे दगड निखळून आतील भरावाचे रुपांतर मातीत झाले आहे. (सोबत छायाचित्रे जोडली आहेत.)
ही समाधीस्थाने जीर्णोद्धारीत करण्यासाठी रस्त्याकडेच्या बाजूला संरक्षित भिंत उभारणे, चारही बाजूंनी भिंत बांधून ही जागा बंदिस्त करणे,आतील भाग मजबूत करुन दगडी फरशी बसविणे, आतील समाध्या पूर्ववत नीट करणे, त्यावर सुरक्षेसाठी मेघडंबरी अथवा छत्र उभारणे याबरोबरच या वीरांचे माहितीफलक लावणे व जुन्या शैलीने हा सर्व भाग सजविणे इ. कामे अंतर्भूत करावी लागणार आहेत.
गेल्या दोन वर्षापासून कारभाटले येथील ग्रामस्थ व घोरपडे घराण्यातील इतर बाहेरगावच्या व्यक्तींनी या समाधीस्थानांच्या संवर्धनाचे, जीर्णोद्धाराचे प्रयत्न सुरू केले आहेत.याचाच एक भाग म्हणून निरनिराळ्या ठिकाणच्या घोरपडे घराण्यातील व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना एकत्र करून या
समाधीस्थानाबद्दल माहिती प्रसारित केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे गेली तीन वर्षे दि.१ फेब्रुवारी या म्हाळोजीबाबांच्या पुण्यतिथी दिनी विविध क्षेत्रातील, भागातील घोरपडे मंडळी तसेच इतरही मंडळी श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पाडत आहेत. समाधीपूजनाबरोबरच व्याख्याने,शालेय विद्यार्थ्यांना मदत, गुणवंतांचा सत्कार व इतर समाजोपयोगी कार्यक्रम या दिवशी कारभाटले येथे पार पाडले जात आहेत. सन २०१८ मध्ये झालेल्या कार्यक्रमास खुद्द सेनापती राणोजीराजे घोरपडे, कापशीकर सरकार हे संताजीरावांचे सध्याचे थेट वंशज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या सहकार्याने समाधी जीर्णोद्धाराबाबत घोरपडे मंडळी गंभीरपणे प्रयत्न करीत आहेत.
समाधी जीर्णोद्धाराचा आराखडा बनविण्यास मला सांगण्यात आले असून त्यासाठी उपलब्ध असलेली जागा मोजून, समाध्यांच्या स्थानांची मोजमापे घेऊन इंजिनिअर या नात्याने मी
आराखडा तयार केलेला आहे. त्याचबरोबर खर्चाचे अंदाजपत्रक व समाधीस्थळांच्या जीर्णोद्धारानंतर त्यांचे अंतिम स्वरूप कसे असेल याचे डिझाईन व कल्पनाचित्रही मी बनविले आहे.(फोटो पहावेत).
समाधी संशोधक व इंजिनिअर या नात्याने मला हे काम करता आले हे मी माझे भाग्य समजतो.या पवित्र ऐतिहासिक कार्यात कुठल्याही प्रकारे कसलाही मोबदला अथवा फी न घेता उलट हे आपले कर्तव्य आणि या कार्यातील योगदान आहे अशा भावनेने मी या कामात सहभागी झालो आहे.
आजवर महाराष्ट्र शासनाकडून व इतर संस्थांकडून शिवछत्रपतींची रायगडावरील समाधी, सेनापती हंबीरराव मोहिते यांची तळबीड (ता.कराड, जि.सातारा) येथील समाधी, सेनापती प्रतापराव गुजर यांची नेसरी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील समाधी, नरवीर शिवा काशीद यांची पन्हाळ्याशेजारील समाधी, सुभेदार तानाजी मालुसरे यांची उमरठे (ता.पोलादपूर, जि. रायगड)येथील समाधी, पावनखिंड येथील स्मारक, गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांची बाणूरगड (ता.खानापूर, जि. सांगली) येथील समाधी यांच्या जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पर्यटन व सांस्कृतिक विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत इत्यादींच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. या कामासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला आहे.
वरील सर्व समाधीस्थानांची कामे करताना समाधी निश्चितीसाठी ऐतिहासिक संदर्भ, परिस्थितीजन्य पुरावा, परंपरागत माहिती, घराण्यातील वंशजांची मान्यता, बांधकामाचे स्वरूप इत्यादींच्या आधारे सर्व बाबींचा विचार करूनच ही कामे केली गेली आहेत व अशीच इतर अनेक कामे प्रस्तावित आहेत.
मी स्वतः पुरातत्व विभागाच्या बृहत आराखडा समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. पुरातत्त्व खात्याच्या दुर्गसंवर्धन समितीचाही मी सदस्य होतो. त्यामुळे अशा कामांना मान्यता देताना शासनाने
वरीलप्रमाणेच भूमिका घेतलेली आहे याची मला माहिती आहे. म्हणून या सर्व समाधीस्थळांप्रमाणेच म्हाळोजीबाबांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार व संवर्धन करण्यासाठी शासन निश्चितच मदत करू शकते. वर उल्लेखलेली समाधीस्थळ संवर्धनाची शासनाने केलेली कामे याबाबत मार्गदर्शक ठरू शकतील.
आपल्या पराक्रमी व मातृभूमीसाठी लढलेल्या पूर्वजांची समाधीस्थाने ही त्या घराण्यातील व्यक्तींसाठी, त्यांच्या वंशजासाठी परंपरेने कुलाचार, पूजाअर्चा करावयाची व अभिमान बाळगण्याची स्थाने तर आहेतच, पण इतर लोकांसाठी सुद्धा ती महाराष्ट्राच्या या सुपुत्रांची स्मृती जागृत ठेवणारी, प्रेरणा देणारी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यासाठी हक्काची जागा असणारी अशी आहेत. ही आपली ऐतिहासिक वारसास्थळे असून त्यांचा जीर्णोद्धार, संवर्धन व्हावे हीच त्या वीरांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. त्यासाठी प्रत्यक्ष स्मारक नीटपणे जतन करून त्या व्यक्तीच्या चरित्राची, कर्तबगारीची समग्र माहिती देण्याची व्यवस्था करणे हे लोकांबरोबरच शासनाचेसुद्धा एक महत्त्वाचे कार्य आहे. पर्यटनवाढीच्या प्रयत्नात ही समाधीस्थळे पर्यटन नकाशात
समाविष्ट करून त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, पर्यटनाच्या अनुषंगाने या परिसरात रस्ते,विश्रामगृहे, सभागृहे, वाचनालये, स्वच्छतागृहे, राहण्या-जेवण्याच्या सोयी या बाबी होणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे. ही सर्व शासनाच्या अखत्यारीतील कामे आहेत.
समाधी जीर्णोद्धारासाठी आवश्यक कायदेशीर भाग म्हणून कारभाटले ग्रामस्थ व घोरपडे घराण्यातील लोक एकत्र होऊन ट्रस्ट स्थापन करीत आहेत. लोकसहभागाबरोबर शासनानेही आपले योगदान यात दिले तर ही समाधीस्थाने अतिशय व्यवस्थित रितीने लोकांसमोर आणता येतील.
मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या प्रसंगी प्रत्यक्ष छत्रपतींचे रक्षण करण्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या आणि तरीही सर्वसामान्य जनांना अपरिचित राहिलेल्या सरनोबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांची ही दुर्लक्षित शौर्यगाथा त्यांच्या समाधीस्थळासह आज तुमच्यासमोर मांडताना माझ्या मनात समाधानासोबतच हे स्वराज्यवीर आजवर उपेक्षित राहिल्याने काहीशी विषादाचीही भावना आहे.
आपल्या महाराष्ट्राच्या अशा अनेक पराक्रमी पूर्वजांची समाधीस्थळे पुन्हा नीट होऊन सर्वांसमोर येण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न व्हावेत या प्रार्थनेसह सरनोबत म्हाळोजीबाबांच्या पराक्रमी प्राणार्पणास मनोमन वंदन करून लेख समाप्त करतो.
प्रवीण भोसले,सांगली
बी.ई.सिव्हिल, एम.ए. इतिहास
लेखक - मराठ्यांची धारातीर्थे
9422619791
*संदर्भ - १.कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याची कागदपत्रे,२.कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याचा इतिहास,३.करवीर रियासतीची कागदपत्रे,४.करवीर सरदारांच्या कैफियती,५.करवीर रियासत,६.परमानंदांचे शिवभारत,७.सेनापती संताजी घोरपडे-डॉ. जयसिंगराव पवार,९.विविध पत्रसंग्रह,१०.घोरपडे घराण्याचा इतिहास-बा.बा.राजेघोरपडे
* फोटोमधील माहिती ओळी आवर्जून वाचाव्यात.
* माहिती आवडली तर जरूर शेअर करावी.(लेखकाचे नाव न वगळता)
* सर्व छायाचित्रे मी स्वतः काढलेली आहेत.नेटवरुन घेतलेली नाहीत.
* आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.
* शंका,प्रश्न बिनधास्त विचारा.
एक सूचना- फेसबुकवरील माझी मित्रयादी मर्यादा संपल्याने मी नवीन मित्रविनंती स्वीकारू शकत नाही.आपण मला किंवा ' मराठ्यांची धारातीर्थे' या माझ्या पेजला फॉलो करु शकता.
*यापूर्वीचे लेख*
१. प्रतापगडाजवळ नवीन बांधलेला पाटलांचा जुना वाडा.
२.होय ! आम्ही प्रतापगड पुन्हा चुन्यात बांधलाय.
३. गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांच्या समाधीचा जीर्णोद्धार.
४.सेनापती संताजी घोरपडे आणि त्यांच्या कर्तबगार पत्नी द्वारकाबाईसाहेब यांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार.
५. शिवछत्रपतींचे पहिले मंदिर कर्नाटकात.
६.बाजीराव-मस्तानीपुत्र,पानिपतवीर
समशेर बहादूरांच्या समाधीचा शोध.
७. पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?
८. पद्मदुर्ग व खांदेरी किल्ल्यांची त्रिमितीय सफर व इतर लेख.
* मराठ्यांची धारातीर्थे या युट्यूब चैनेलवर स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा - २२ भाग.
No comments:
Post a Comment