विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 28 April 2024

#अटकेपार #२०_एप्रिल

 

२० एप्रिल १७५८ ची सकाळ लाहोर शहरात जरा तणावपुर्णच उगवली होती. आदल्या दिवशीच म्हणजे १९ तारखेला अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुरशहा आपला गाशा गुंडाळुन लाहोरमधुन पळुन गेला होता.
आपल्या मागावर २०००० मराठे आहेत हे कळल्यावर दुसरे तो करु तरी काय शकणार होता.जमेल तितक्या चीजवस्तु बरोबर घेऊन , छावणीतील बाकीच्या गोष्टींना आग लावुन तैमुर रावी नदी ओलांडुन पलिकडे गेला.
शहरात एकच धांदल उडाली होती. चोर, लुटमाऱ्यांना तर आयती संधीच मिळाली होती.
आणि अशातच २० एप्रिलला सकाळी ९ च्या सुमारास ५०० भीमथडी घोडी लाहोरच्या दिल्ली गेटवर येऊन धडकली.
त्या घोडेस्वारांच्या निव्वळ आगमनापुढेच लाहोर शरण आलं.
दुसऱ्याच दिवशी मराठा सरदार मानाजी पायगुडे दहा हजार मराठी सैन्यासह लाहोरात प्रवेशले आणि त्यानंतर सुरु झाला अफगाण शहजादा तैमुरशहाचा पाठलाग.
मराठ्यांच्या भीतीने आपल्या बापाकडे म्हणजे अहमदशहा अब्दालीकडे पळुन चाललेल्या तैमुरशहाला मराठ्यांनी क्षणाचीही उसंत दिली नाही. रावी ओलांडुन चिनाब नदीपर्यंत मराठ्यांनी तैमुरचा पाठलाग केला.
चिनाब नदीला पाणी जास्त असल्याने मराठ्यांना ती वेळेत ओलांडता आली नाही आणि केवळ नशीब बलवत्तर म्हणुन तैमुर निसटला.
इकडे लाहोरच्या शालिमार बागेत गुलाबपाण्याची कारंजी आणि लखलखती रोषणाई करुन मोहिमेचे सेनापती रघुनाथराव पेशवे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
मोठा विजयोत्सव झाला पण मराठ्यांचा अश्वमेध इथेच थांबला नाही.
चिनाब ओलांडुन सिंधु नदीपर्यंत मराठी घोडी पुढच्या काही दिवसात दौडत गेली आणि सिंधुच्या काठावर असलेल्या अटक गावावर मराठी निशाण फडकलं.
‘अहत् तंजावर ते तहत् पेशावर आम्हाला श्रींचं राज्य करायचंय...’ ही तर शिवछत्रपतींची मनीषा होती..
अटकेपार झेंडा रोवुन ते स्वप्न साकार झालं..
मराठ्यांचं हे स्वप्न फार काळ टिकलं नाही. कारण पुढच्या ३ वर्षातच परत फिरुन आलेल्या अब्दालीने पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव केला.
पण ज्या प्रतिकुल परिस्थितीत, बिकट भुप्रदेशात, उत्तरेतल्या थंडीत, अफगाण-पठाणांच्या मुलखात, सप्तसिंधुच्या दऱ्याखोऱ्यात आपली हजारो मराठी घोडी सिंधुपर्यंत दौडत गेली त्याला इतिहासात तोड नाही.
#अटकेपार या एका शब्दाने हजारो अनाम वीरांना इतिहासात ध्रुवपद बहाल केलं हे मात्र नक्की..
-सारंग मांडके

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...