विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 28 April 2024

मराठा पराक्रमी स्त्री तुळशीबाई आणि खंडणी कमी करण्यासाठी मोगल अधिकारी बनला गायक.. !!

 




मराठा पराक्रमी स्त्री तुळशीबाई आणि खंडणी कमी करण्यासाठी मोगल अधिकारी बनला गायक.. !!
post By
१७०७ साली मोगल बादशहा औरंगजेब याचा मृत्यू झाला, तेंव्हा मोगलांमध्ये गादीसाठी संघर्ष निर्माण झाला. शहजादा आजम आणि शहजादा मुअज्जम यांच्यात आग्राजवळ युद्ध होऊन त्यात शहजादा आज्जम हा ठार झाला आणि मुअज्जम हा बहादूरशहा या नावाने गादीवर बसला. छत्रपती शाहू महाराज हे मोगलांच्या छावणीतुन निघून आले आणि त्यांनी पुढे मराठा सरदारांची जमवाजमव करून आपली घौडदौड सुरू केली. इकडे उत्तरेकडे जाण्यापूर्वी बहादूरशहाने दक्षिणेच्या सुभ्यांची व्यवस्था लावली होती, औरंगबादवर इतिहासकार खाफीखान याचा मित्र मुहम्मद मुरादखान हा होता पण त्याचा १७१० साली मृत्यू झाला त्यावेळी खानदेशावर मीर अहमदखान हा नायब म्हणून काम करत होता. मराठ्यांनी ही संधी पाहून बुऱ्हाणपूरवर हल्ला चढविला त्याची नोंद मोगलांच्या काही इतिहासात साधनात नोंदवली गेली आहे.
मराठयांनी १७१० साली बुऱ्हाणपूरवर चढवलेल्या हल्ल्याच्या वृत्तांत मोगलांचा इतिहासकार खाफीखान याने विस्तृतपणे नोंदवून ठेवला आहे, लेखनसीमेअभावी खाफीखानाची नोंद थोडक्यात पण संक्षिप्तपणे देत आहे. खाफीखान म्हणतो " तुळशीबाई नावाची एक मराठा स्त्री होती, बुऱ्हाणपूरची चौथाई वसूल करावी आणि बुऱ्हाणपूरपासून सात कोसावर असलेले रणबेर गाव लुटावे म्हणून ती पंधरासोळा हजार स्वारांनीशी चालून आली. बुऱ्हाणपूरची चौथाई आणि सराईत वेढलेल्यांकडून खंडणी असे मिळून मराठ्यांनी मीर अहमदखान याच्याकडे अठरा लाख रुपयांची मागणी केली. तुळशीबाईचे पत्र अजून मीर अहमदखानाच्या हाती पडले नव्हते आणि तिच्या धाडसाची खबर त्याला लागली नव्हती. त्याने विचार केला की काफर सरदारनिशी पुरुषाने माघार घेणे कसे शक्य आहे, हा विचार करून त्याने आठ नऊशे स्वार गोळा केले शिवाय त्यात बुऱ्हाणपूरचे मनसबदार आणि कारभारी सामील झाले. त्याच्यासोबत फौजदार जफरखान होता, मीर अहमदखान याने त्याला आघाडीवर ठेवले आणि नौबती, नगारे वाजवीत तुळशीबाईच्या सैन्याशी लढण्यासाठी बुऱ्हाणपूर मधून निघाले.
मराठ्यांना मीर अहमदखान सैन्य घेऊन येतोय हे कळाले, मराठयांनी बाजारबुगणे लुटण्यासाठी चारपाच हजार स्वार वेगळे काढले आणि चारपाच हजार सैन्य घेऊन मीर अहमदखानवर चालून गेले. मराठयांच्यात आणि मीर अहमदखानच्या सैन्याच्यात झालेल्या चकमकीत मीर अहमदखान व त्याचा नातू जखमी झाला. मराठे बुऱ्हाणपूरास वेढा घालण्यासाठी निघाले ही बातमी कळताच तो मराठ्यांशी लढत लढत बुऱ्हाणपूरकडे रवाना झाला. त्याने जफरखानला मागे ठेवले होते त्याने चांगलेच शौर्य गाजवले पण त्यालाही जबर जखमा झाल्या. या लढाईत मीर अहमदखानाचे अनेक सहकारी मृत्यू पावले तर अनेक लोक कैद झाले. मीर अहमदखान एकटा शौर्याने लढत होता पण तो ही जखमी होऊन घोड्यावरून खाली आला, अर्धमृत स्थितीत तो एका झाडाखाली मृत्यू पावला..
युध्दात कैदी झालेल्या लोकांमध्ये शरफूद्दीन नावाचा सरकारी इमारती वैगरे मालमत्तेच्या खात्याचा अधिकारी होता, त्याला संगीताची जाण होती. त्याला कैद करण्यात आले तेंव्हा त्याने ठरवले की आपण कलावंत म्हणजे गवई आहोत असे दाखवावे. त्याने फारसी, हिंदवी आणि मराठी गाणी म्हणण्यास सुरुवात केली. गवई लोक श्रीमंत आश्रयदात्यांशी जसे खुशामतीने वागतात तसा तो मराठा सरदारांशी वागला. तेंव्हा मराठा सरदार म्हणाले " तू गवयात श्रेष्ठ असलास तरी तू प्रतिष्ठित आणि संपन्न सरदारांपैकी आहे असे आम्हाला कळाले आहे. तू दोन हजार रुपये दिलेस तर तुझी सुटका करू" शेवटी प्रकरण बाराशे रुपयांवर सुटले, शरफुद्दीन याने घरून बाराशे रुपये मागवून मराठ्यांना दिले आणि सुटका करून घेतली...
इतिहासाच्या वेगवेगळ्या साधनात अशा थोड्याश्या वेगळ्या, आश्चर्यकारक नोंदी सहजपणे नोंदवून ठेवलेल्या असतात, वाचन करत असताना नाविन्यपूर्ण माहितीसाठी त्या नोंदी लक्षपूर्वक टिपणे आवश्यक वाटते असो !!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...