विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 2 October 2018

सरसेनापती नेताजी पालकर


🚩छत्रपती शिवरायांचे साथीदार 🚩
🚩अपरिचित मावळे 🚩
सरसेनापती नेताजी पालकर

नेताजी पालकर यांचा इतिहासामध्ये 'प्रतिशिवाजी',दुसरा शिवाजी असा उल्लेख आहे.नेताजी स्वराज्याचे दीर्घ काळ सरसेनापती होते.आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लढाया गाजविल्या.नेताजींचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर हे होय.अफजलखान व छत्रपतींच्या भेटीवेळी नेताजींने मोठा पराक्रम गाजविला होता.प्रतापगडाच्या लढाईच्या वेळी छत्रपतींनी नेताजीस खास कामगिरी सांगितली होती.

सभासद म्हणतो,राजे मातुश्रींचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडास निघाले.नेताजी पालकर सरनोबत यास लष्कर घेऊन वर घाटावरि येणे म्हणोन सांगितले.आणि अफजलखानास जावलीस बोलावितो,सला करून भेटतों,विश्वास लावून जवळ आणितों,तें समयी तुम्ही घाटमाथा येऊन मार्ग धरणें,असे सांगितले.खानाचा वध झाल्यानंतर,राजे गडावरि जातांच एक भांड्याचा आवाज केला.तेच गडाखालील लोक व घाटावरील लोक व लष्कर व कोकणांतून मोरोपंत व मावळे असे चौतर्फी चोहोंकडून चालोन खानाचे गोटावरि आले.मोठें घोरोंदर युध्द जाहाले.रक्ताच्या नद्या चालल्या.रणकंदन जाले.प्रतापगडाच्या या युध्दात नेताजींनी मोठा पराक्रम गाजविला.

पुढे मिर्झा राजेसोबत झालेल्या पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज,मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले होते.पण आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर त्यांना अपयश आले.त्यामुळे विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी राजे विजापुरहून पन्हाळ्यास आले,राजेंनी रात्रीच गडावर छापा घातला.पण किल्लेदार सावध असल्यामुळे मराठ्यांचा पराभव झाला,सुमारे १००० मावळे मारले गेले.

सभासद म्हणतो,मग राजियांनी नेताजी पालकर यास बोलावून आणिला आणि "समयास कैसा पावला नाहींस?"म्हणून शब्द लावून,सरनोबती वरून दूर केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले.महाराज आग्र्याच्या भेटीस गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.

महाराजांनी आग्र्याहून सुटका केल्यानंतर,शिवाजीराजे सुटले आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले.नेताजी पालकर यावेळी मोगलांच्या छावणीत बीड जवळ धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली.दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठविले.आग्र्यास त्यांचा अतोनात छळ करण्यात आला त्यामुळे दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान'असे नामकरण करण्यात आले.औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे जून १६६७ मध्ये नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले.पुढे ९ वर्षे नेताजी काबूल,कंदाहार येथील मोहिमेवर होते.

आग्र्याहून सुटका झाल्यानंतर राजेंनी एकामागोमाग एक किल्ले घेण्याचा सपाटा लावला होता.शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते,अशावेळी त्यास 'प्रतिशिवाजीची'आठवण झाली व त्याने दिलेरखानासोबत नेताजीस महाराष्ट्राच्या मोहिमेसाठी पाठवले.पच्छाताप झालेले नेताजी मे १६७६ मध्ये मोगली छावणीतून पळून रायगडावर आले.शिवाजी महाराजांनी दि.१९ जून १६७६ रोजी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.नेताजी पालकर यांची समाधि तामसा.जि.नांदेड येथे आहे.

नेताजी पालकर यांचा हिंदू धर्मात पुन: प्रवेश

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...