विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 2 October 2018

दत्ताजी शिंदे

दत्ताजी शिंदे
. संक्रातीचा सण असून मराठी फौज सकाळी स्नान करून, तिळगुळ खाऊन तयारीने बसली होती. सकाळी नजरेच्या टप्प्यात यायच्या आत गिलचे चारही घाटांवर ८ मैलांवर आले आणि त्यांनी तोफांच्या सहाय्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. पाठोपाठ बंदुकधारी रोहील्यांचे पायदळ नदीपार करण्यास पुढे येऊ लागले. बुराडी घाटावर जानराव वाबळे याची नेमणूक केलेली होती. मराठी सैनाची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी, भाले असून फार कमी शिपाई बंदुका वापरीत. त्याउलट रोहिले - अफगाण बंदुकधारी असून जोडीला त्यांनी तोफखाना देखील आणला होता. मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला त्यांना समर्थपणे तोंड देता आले नाही. अफगाणी सेनेच्या तोफांनी बुराडी घाटावर जानरावचे शंभर - दीडशे शिपाई मारले गेले.
दत्ताजी बुराडी घाटावर आला. दत्ताजी आल्याने सैन्याला धीर मिळाला व ते शत्रूचा नेटाने मुकाबला करू लागले.आपली तलवार गाजवू लागला परंतु दुदैवाने रोहील्यांच्या गोळीबारात मराठ्यांचा हा रणशूर सेनानी घोड्यावरून खाली आला.दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पाटील, और लढोगेऽऽ?"
आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उदगारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"
कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.
त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.
रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.
सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...