विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 21 February 2019

शिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे!

शिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे!

तानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण! लहानपणापासून शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना आपल्याला तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेची ओळख होते आणि त्या नरवीराचे शौर्य आपल्या मनात कायमचे घर करून बसते. त्याच शौर्यगाथेला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी हा छोटासा लेख!
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. आपल्या काही निवडक सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते तानाजी मालुसरे! जून १६६५ रोजी मोघलांसोबत केलेल्या पुरंदर तहानुसार शिवाजी राजांना कोंढाणा किल्ल्यासह इतर २२ किल्ले मोघलांच्या हाती सोपवावे लागले. या तहामुळे मराठ्यांच्या स्वाभिमानाला कोठेतरी ठेच पोचली होती. राजमाता जिजाऊ आईसाहेब देखील या तहामुळे व्याकूळ झाल्या होत्या. जे किल्ले शिवाजी महाराजांनी इतक्या कष्टाने प्राण धोक्यात घालून मिळवले होते, जे किल्ले कित्येक मावळ्यांच्या रक्ताने पावन झाले होते असे स्वराज्याची संपत्ती असणारे किल्ले सहज शत्रूहाती जाऊ देणे त्यांना पटत नव्हते. मुख्य म्हणजे त्यातील कोंढाणा हा किल्ला पुण्याच्या तोंडाला व जेजुरीच्या बारीला असल्याने तेवढ्या प्रांतावर देखरेख राही. शिवाजी महाराजांना देखील जिजाऊ आईसाहेबांच्या मनातील सल कळत होती, परंतु त्यांचा देखिल नाईलाज होता. मोघलांच्या प्रचंड मोठ्या संरक्षण कवचामुळे कोंढाणा परत मिळवणे वाटत होते तितके सोप्पे नव्हते. परंतु मातेच्या हट्टासमोर राजे नमले आणि त्यांनी कोंढाणा परत मिळवण्याचा प्रण केला. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर होते जे कोंढाणा जिंकून आणण्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होते, परंतु या मोहिमेचा विचार करताना महाराजांच्या मनात एकाच वीराचे नाव आले- तानाजी मालुसरे! तानाजी मालुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि महाराजांच्या अतिशय विश्वासातील साथीदार. महाराजांच्या प्रत्येक संकटाच्या काळात तानाजींनी मोलाची साथ दिली होती. सुरुवातीला जेव्हा महाराजांनी किल्ले हाती घेण्याची मोहीम चालवली होती तेव्हा प्रत्येक मोहिमेत तानाजी आघाडीवर होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...