स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे अज्ञात असलेले धार्मिक धोरण
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे अज्ञात असलेले धार्मिक धोरण आणि कार्य
युवराज शंभुराजे
राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य……’
दिनांक ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपाळभट अग्निहोत्री महाबळेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात लिहिलेले सुंदर समर्पक वाक्य आले आहे ते वाक्य हेच आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या धार्मिक धोरणात छत्रपती शिवाजी महाराज यांचाच ठसा कोरलेला आढळून येतो आहे. युवराज शंभुराजे हे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अदभुत अशा कार्याचा आपण जर यथोचित आढावा घेतला तर आपणाला पदोपदी वरील वाक्याची प्रचिती येते.
छत्रपती संभाजी महाराज यांचे राजकीय धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपले वडील छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य किलेले दिसत आहे.
छत्रपती संभाजी महाराज
संतजनांस राजाश्रय –
१ ) श्री. महादोबा गोसावी हे संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र होत यांस छत्रपती संभाजी महाराज यांनी दिनांक १९ ऑगस्ट १६८० साली वर्षासनाची नेमणूक करून दिली.
२ ) मौजे पाटगावचे शिवकालीन प्रसिध्द मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लाऊन दिली. त्यासाठी दिनांक १३ सप्टेंबर १६८० रोजी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले.
३ ) श्री समर्थ रामदास स्वामी यांना चाफळ जवळील अंगापूरच्या डोहात राममूर्ती मिळाली होती. सामर्थांनी ती राममूर्ती चाफळ येथे स्थापन करून भव्य राममंदिर उभारले . या मंदिराच्या पूजाअर्चा, नैवेद्य आणि देखभाल दुरुस्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी चैत्र शु. शके १५९७ रोजी सनद करून दिली होती. ह्या चाफळच्या यात्रेस येणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा आणि मुस्लिम सैन्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून व यात्रा विनासायास पार पदवी म्हणून दिनांक १८ऑक्टोबर १६८० रोजी आपल्या वासुदेव बालकृष्ण ह्या अधिकाऱ्यांस आज्ञापत्र लिहिले.
४ ) दिनांक ६ नोव्हेंबर १६८० रोजी पुण्याजवळील चिंचवड गावचे श्री मोरया गोसावी यांच्या माणसांस शेतपोतास आणि गुरेढोरे यांच्यासाठी काडीचीही तसविज देऊ नये यासाठी आपल्या अधिकाऱ्यांस ताकीदपत्र लिहिले.
५ ) दिनांक १६ मार्च १६८१ रोजी किल्ले प्रचंडगच्या आणि परिसरातील संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई आणि म्हशीची चराई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे छत्रपती शंभुराजे यांनी पण माफ केली.
६ ) श्री. रामदास स्वामींचे अवतारकार्य पूर्ण झाल्यावर त्यांच्या पश्चात सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज,उत्सव, देवस्थानची व्यवस्था, यात्रा आणि समर्थांच्या निर्वाणस्थळी श्री हनुमानाचे मंदिर उभारणे इत्यादी बाबींकडे जातीने लक्ष दिले. यासंबंधी एका आज्ञा पत्रात छत्रपती संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यांस ‘…श्री चे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?….’ अशा शब्दांत खडसावले आहे.
७ ) पुणे प्रांतात चिंचवड गावच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव अथवा विनाकारण त्रास होतो आहे. अशी तक्रार दरबारी आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना ‘…जो धामधूम करील त्याला स्वामी जिवेच मारतील…’ अशा परखड शब्दांत खडसावून समज दिली.
८ ) महाबळेश्वर जवळील वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील श्री सदानंद गोसावींच्या मठासाठी दरवर्षी नेमून दिलेला खर्चाचा ऐवज पोचता न केल्याचे कळताच
छत्रपती संभाजी महाराज यांनी ‘… धर्मकार्यात खलेलं न करणे…’ अशा कडक शब्दांत ताकीद दिली. ‘….धर्म कार्यात अंतर पडणार नाही …’ असे अभिवचन मठातील आनंदगिरी गोसावी यांना पत्राद्वारे कळविले.
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या प्रमाणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे
सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज आणि मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध तर केलाच प्रसंगी हल्ले सुद्धा केले होते. छत्रपती संभाजी महाराज व हेन्री यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम उपलब्ध आहे.
‘ That the english shall buy none of people belonging to my Dominion, to make them slaves or shristians.’
अंत्रुज परगण्यातील अडकोळण गावचा महत्त्वाचा शिलालेख
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्द मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात चालू झाला होता. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर आकारणी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज आज्ञेने पूर्णपणे बंद करून माफ केला. या संदर्भात फोंडयाजवळ अंत्रुज येथील मौजे हडकोळण या गावात शिलालेख उपलब्ध आहे. याच शिलालेखात छत्रपती संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यांस कर माफ संबंधी आज्ञा करून मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरून ठेवले आहे.
छत्रपती संभाजी महाराज
‘…आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन… पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यास महापातक आहे…’
अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात सक्तीचे धर्मांतर मोडीत काढून कार्य पार पाडले. शिवाय अनेक मंदिराच्या वार्षिक देखभाल दुरुस्ती खर्च आणि पूजाअर्चा खर्चासाठी तरतुदी सुध्दा केल्या होत्या. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यात निधी मंजूर करून तो वेळीच पोहोच होणेकामी संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी सक्त आदेश दिले होते. अशा प्रकारे त्यांनी धार्मिक कार्य आणि स्वराज्य यांचा मेळ घातला होता. याबाबत अनेक मतांतरे आहेत. हा इतिहास ज्ञात असणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment