मरहट्ट म्हणजे मराठा? कि आजून काही..
चला तर शोध घेऊयात.
महाराष्ट्रातील 'मरहट्ट'
टीप: वेगवेगळ्या लेखकांनी 'मरहट्ट' ह्या शब्दाचे वैयक्तिक स्वरूपात वेगवेगळे अर्थ मांडलेले आहेत. पण आपण पुराव्याचा इतिहास नेमका काय म्हणतो ते पाहू.
(वैयक्तिक विचारधारा हि कल्पनेवर आणि वैचारिक प्रवाहांवर अवलंबून असते. त्यामुळे त्यात बदल संभवतात. इतिहास हा पुराव्यांवर आधारित असतो. वैयक्तिक विचारधारेवर नाही. )
नवव्या शतकातील 'अपभ्रंश' काव्यत्रयीत एक महत्वाचा शब्द आलेला आहे तो शब्द म्हणजे " मरहट्ट वरीहो." म्हणजे मरहट्टात वरिष्ठ.
(साधारण सहाव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत 'अपभ्रंश' हि भाषा उत्तर भारतात प्रमुख भाषा होती. महाभाष्यकार पतंजलि ने ह्या 'अपभ्रंश' भाषेचा उपयोग केलेला आहे. अपभ्रंश' हा संस्कृत शब्द आहे. )
इसवीसन ८०० च्या सुमारास झालेल्या 'कोउहल' नावाच्या कवीने स्त्रीयांचे मनोरंजन करण्याकरिता एक 'लिलावई' नावाचे खंडकाव्य रचले होते.
हे काव्य ह्या 'कोउहल' नावाच्या कवीने आपल्या प्रियतमेच्या सांगण्यावरून 'मरहट्ट देसी-भासा' मध्ये रचलेले होते. 'ह्या काव्यात 'कोउहल' नावाच्या ह्या कवीने 'मरहट्ट' ह्या शब्दाचा उपयोग केलेला आहे.
आता प्रश्न हा की यातील ' मरहट्ट देसी-भासा ' म्हणजे मरहट्ट लोकांची देशी भाषा कि मरहट्ट नावाची देशी भाषा?
सम्राट अशोकाचा नातू 'संपती' याने जैन धर्माच्या प्रसारासाठी आपले गुप्तहेर अंध (आंध्र), दमिल (द्रविड), कुडक्क (कूर्ग), सुरट्ठ ( सौराष्ट्र) इत्यादी ज्या सीमाप्रांतात पाठविले त्यांत 'मरहट्ट' चा निर्देष केलेला आहे.
‘मरहट्ट’ हि संज्ञा समूहवाचक अर्थाने आठव्या शतकातील 'उद्योतनसुरी' नावाच्या राजस्थानी कवीने उपयोजिलेली आहे. त्याच्या 'कुवलय माला' ह्या ग्रंथात एक श्लोक आलेला आहे.
तो श्लोक असा:
"दढ मडह सामलंगे अहिमाने कलहसीले ये
दिन्नले गहिल्ले उल्लविरे तथ मरहट्टे. "
ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे कि हे मरहट्टे अंगाने बळकट, ठेंगण्या उंचीचे, सावळ्या रंगाचे, अंगाने काटक असे, अभिमानी आणि भांडखोर स्वभावाचे, व दिन्नले म्हणजे दिल्हे आणि गहिल्ले म्हणजे घेतले असे शब्द वापरणारे आहेत.
याचा अर्थ तेंव्हा मरहट्ट नावाचा मोठा समूह महाराष्ट्रात राहत असावा ज्याचा पुढे शब्द अपभ्रंश मराठा असा झाला असावा असे संशोधकांचे मत आहे. कारण वरील 'उद्योतनसुरी' कवीच्या श्लोकातील अर्थ हा मराठा समाजाला चांगल्या प्रकारे लागू पडतो. इतर समाजांत वरील लक्षणे स्पष्टपणे दिसून येत नाहीत.
मरहट्टांचा महारट्ठ.
आता हे 'मरहट्ट' राहत असलेला महाराष्ट्र पाहू.
'महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख' ह्या मागील लेखात आपण महाराष्ट्र ह्या शब्दाचा इतिहासात उल्लेख कुठे कुठे आला आहे ते पहिले.
महाभारतात महाराष्ट्र हे नाव येत नाही. महावंश म्हणून जो बौद्धग्रंथ आहे त्यात मात्र महाराष्ट्र असा उल्लेख येतो. ढोबळमानाने आजच्या मध्य हिंदुस्थानास महाराष्ट्र म्हणत असत. येहोळीच्या शिलालेखात वर्णन केल्याप्रमाणे ह्या
महाराष्ट्राचे तीन भाग असून इसवीसन सातव्या शतकात या महाराष्ट्र देशात ९९००० खेडी होती.
पूर्वी विदर्भ देशास महाराष्ट्र असेच म्हणत असत. राजशेखर ह्या कवीच्या बालरामायणात विदर्भ आणि महाराष्ट्र हि दोन्ही नावे ही एकाच प्रदेशासाठी योजिली आहेत हे आपण आपल्या पहिल्या लेखात पहिलेच आहे.
अनर्घराघव ह्या ग्रंथातही "इदमग्रे महाराष्ट्रमंड लैकमंडन कुडीनं नाम नगरम" असा उल्लेख आलेला आहे.
युएनत्संगाच्या (Chinese Buddhist monk Hsuan Tsang) मते महाराष्ट्राचा घेर हा १००० मैल होता. उत्तरेस माळवा, पूर्वेस कोसल आणि आंध्र, दक्षिणेस कोंकण, आणि
पश्चिमेस समुद्र या त्याच्या मर्यादा होत्या. ह्या महाराष्ट्राची राजधानी भडोचपासून १६७ मैल दूर होती.
तथापि अमुकच प्रदेशाचे नाव महाराष्ट्र असे निश्चित नव्हते. मरहट्टांचे राज्य ज्या प्रदेशावर पसरले तो महाराष्ट्र असे म्हणण्याचा प्रघात पडला.
'महाराष्ट्री' असे एका प्राकृत भाषेचे नाव म्हणून इसवीसनाच्या आरंभी माहीत होते. तेंव्हा देशाचेही नाव त्यावेळी प्रचारांत आले असावे.
रट्ठी आणि महारट्ठी अशी नावे अनेक शिलालेखांतून आपल्याला मिळतात.
आता आपण ह्या महाराष्ट्रावर कोण कोणत्या राजसत्तांनी राज्य केले ते पाहू.
प्रथम महाराष्ट्रांत सम्राट अशोकाचा अंमल असावा. त्या नंतर आंध्र राजे राज्य करू लागले. त्यांचीच एक सातवाहन किंवा आंध्रभृत्य म्हणून एक शाखा होती. या सातवाहन किंवा शालिवाहन राजांचे बरेच अवशेष महाराष्ट्रांत शिलालेखाच्या
स्वरूपांत सापडतात. शालिवाहन घराणे सुमारे तीनशे वर्ष अधिकारारूढ होते.
मध्यंतरी (म्हणजे इसवीसनाच्या आरंभीचा काळ) सुमारे पन्नास वर्ष शकांचा अंमल महाराष्ट्रावर होता.
शालिवाहनांच्या काळी महाराष्ट्रात बौद्ध संप्रदाय वेगाने पसरत होता.
शालिवाहनांनंतर अभीर आणि राष्ट्रकूट यांचा उदय झाला. सहाव्या शतकात चालुक्यांनी उत्तरेकडून येऊन महाराष्ट्र जिंकला. (ह्याचे पुरावे आहेत.)
या पूर्व चालुक्यांनी इसवीसन ५५० ते ७५३ पर्यंत आणि नंतर राष्ट्रकूटांनी इसवीसन ७५३ ते ९७३ पर्यंत आणि त्याही नंतर उत्तर चालुक्यांनी इसवीसन ९७३ ते ११८९ पर्यंत ह्या महाराष्ट्रावर राज्य केले.
नंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य केले. अलाउद्दीन खिलजीने यादवांचे राज्य हे सन १३१२ मध्ये जिंकून घेतले.
यादवांच्या आमदनीत मराठी भाषा जोमाने पुढे आली.
यादवांनंतर सण १३४७ पर्यंत दिल्लीच्या सुलतानांचा प्रत्यक्ष
अंमल महाराष्ट्रावर होता.
त्यानंतर बहमनी सत्तेने महाराष्ट्रावर राज्य केले.
पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहमनी सत्तेचे तुकडे पडून बेरीदशाही, इमादशाही, कुतुबशाही, आदिलशाही, आणि
निझामशाही अशी पाच राज्ये तयार झाली.
पुढे मोगलांनी ह्या शाह्या बुडविल्या. आणि मराठ्यांशी मोगलांचे युद्ध सुरु झाले.
मराठ्यांनी मोगलांचे महाराष्ट्रातील वर्चस्व संपवून महाराष्ट्राचे अधिपत्य स्वतःकडे घेतले. आता मराठे महाराष्ट्रावर राज्य करू लागले.
पुढे इंग्रजांनी मराठ्यांच राज्य १८१८मध्ये जिंकून घेतले.
१९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती काम घेतले गेले आणि १ मे १९६० ला आत्ताच्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
तर असा हा मरहट्टांचा महारट्ठ.
लेख समाप्त
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम निरंतर
No comments:
Post a Comment