विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 30 March 2019

बाजीराव पेशव्यांनी निजामाला चारली धूळ -


बाजीराव पेशव्यांनी निजामाला चारली धूळ -
इ.स. १७१३मध्ये छत्रपती शाहूने बाळाजी विश्वनाथला पेशवाईची वस्त्रे दिल्यापासून दहा-बारा वर्षांत बाळाजीने मोडकळीस आलेल्या मोगल साम्राज्याचे लचके तोडून मराठा साम्राज्यास जोडण्याचा उद्योग लावलेला होता. याचे पारिपत्य करण्यासाठी मोगल सम्राट मुहम्मद शाह याने ऑक्टोबर इ.स. १७२४मध्ये निझाम-उल-मुल्क यास दख्खनचा वजीर नेमले व त्यास दख्खनेत पाठवले. तोपर्यंत बाळाजीचा मुलगा बाजीराव पहिला पेशवेपदी आला होता.
याच सुमारास मराठा साम्राज्यात दुफळी निर्माण होऊ घातली होती. साताऱ्यास छत्रपती शाहू तर कोल्हापूरास छत्रपती संभाजी यांनी स्वतःला शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे जाहीर केले होते. निझामाने याचा फायदा घेण्याचे ठरवले व कोल्हापूरच्या गादीस आपला पाठिंबा दिला. याउप्पर निझामाने दख्खनातील देशमुखांकरवी सरदेशमुखी व चौथ (महसूली उत्पन्नाचा चौथा भाग) मराठ्यांच्या हवाली करणे बंद करवले. या कारणांस्तव छत्रपती शाहू व बाजीराव पेशव्यांनी निझामास धडा शिकवण्याचे ठरविले.
१७२७च्या शेवटी बाजीराव आपल्या सैन्यासह कर्नाटकातील मोहीमेवर होता. निझामाने महसूल देणे बंद करविल्यावर छत्रपती शाहूस निझामाला धडा शिकवण्याचा व त्यानिमित्ताने मराठा साम्राज्याचा पूर्वेस विस्तार करण्याचा सल्ला बाजीरावाने दिला. छत्रपतींनी बाजीरावास सैन्यासह आपल्याकडे बोलावून घेतले. इकडे कोल्हापूरातील श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती संभाजीला निझामाशी वाटाघाटी करण्याचे सुचवले. पावसाळा संपतासंपता बाजीरावाने सैन्यास कुमक लावून घेतली व औरंगाबादकडे कूच केले. जालन्याजवळ त्याने निझामाच्या सैन्यावर छापा घातला आणि शत्रू सावध होउन लढायला तयार होईपर्यंत मराठा सैन्याने उत्तरेस बुऱ्हाणपुराकडे वाट काढली.
निझामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावाचा पाठलाग सुरू केला. बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाला. बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे लक्षात येउन निझामाच्या सैन्याने त्याचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली. आपल्या राजधानीकडे शत्रू जात असल्याचे पाहून बाजीराव आपसूकच आपल्या जाळ्यात येईल असा निझामाचा डाव होता. निझामाने दक्षिणेकडे सरकत उदापूर, अवसरी, पाबळ, खेड, नारायणगाव जिंकले. त्यानंतर खुद्द पुण्यात घुसून तेथे तळ ठोकला आणि तेथून साताऱ्यावर चाल केली. आतातर त्याने सुपे, पाटस आणि बारामती पर्यंत धडक मारली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला.
असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव किंवा दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निझामाचा हा डाव पूर्ण होत आला होता. बाजीरावाने त्यास भीक न घालता निझामासच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निझामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली. निझामास ही खेळी अनपेक्षित होती. त्याला औरंगाबादचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते. त्याने आता कोल्हापूरच्या छत्रपतींना साताऱ्यावर चाल करण्यास सुचवले. काट्याने काटा काढण्याची ही निझामाची हिकमत नामी होती. छत्रपती संभाजीला आपली सत्ता प्रबळ करणे ही लालूच दाखवून कोल्हापूरला आपले धार्जिणे राज्य करून घेणे निझामाला अपेक्षित होत. परंतु येथेही त्याचा अंदाज चुकला. संभाजी व पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती शाहूवर हल्ला करण्यास नकार दिला. आता बाजीरावाच्या कचाट्यातून औरंगाबाद तरी वाचवावे यासाठी निझाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला. बाजीरावाने औरंगाबादचा रस्ता सोडून निझामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला. औरंगाबादकडे निघालेल्या निझामाच्या सैन्यावर विद्युतवेगी हल्ले चढवत बाजीरावाने त्यास सळो कि पळो करुन सोडले. छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसान होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावाने निझामास नाशिककडे ओढत नेले. असे करता फेब्रुवारी २५, इ.स. १७२८ रोजी पालखेड जवळील निपाणी प्रदेशात निझामाचे सैन्य आणि गोदावरी नदी यांच्यामध्ये ठाण मांडून बाजीरावाने निझामाला कोंडीत धरले. शेवटी फेब्रुवारी २८ रोजी निझामाने मराठ्यांची फळी फोडत गोदावरीपर्यंत पोचण्याचा आपल्या सैन्यास हुकुम दिला. जेरीस आलेल्या निझामी सैन्याने लढण्यास साफ नकार दिला. निझामाने इवाझ खानामार्फत बाजीरावास शरणागतीचा संदेश पाठवला व फारशी खानाखराबी न होता मराठ्यांनी निझामाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...