हिरेखानाचे सोनांबे
भाग २
सिन्नरहून सिन्नर-घोटी मार्गावर सात-आठ किलोमीटरवर डाव्या हाताला सोनांबे फाटा लागतो. फाट्यावरून दोन किलोमीटर रस्त्याने आत गेल्यावर झाडांच्या पुंजक्यामध्ये सोनांबे देवनदीच्या किनारी वसले आहे. गावात प्रवेश करताना लहान मोठी मंदिरे, समाधी दर्शन देतात. सकाळी सकाळी पारावर जमलेले ज्येष्ठ मंडळींचा पांढऱ्या शुभ्र पेहराव व कोन काढीत पुढे डोकावणाऱ्या त्यांच्या डोक्यावरील पांढऱ्या गांधी टोप्या इतिहासाबद्दल बोलू लागतात. सोनांबे म्हणजे काय? या माझ्या प्रश्नांनं सर्वच अस्वस्त होतात अन् एक आठवणींचा उसासा टाकत हरविलेल्या गोष्टींना उजाळा देताना जी निराशा, आपलेपणातून निर्माण झालेली उत्सुकता त्यांच्या डोळ्यात उभी राहते. ‘काय दिवस होते’ ही त्या वैशिष्ट्यांची आताची किंमत त्यांना आठवणींचे भावविश्व उलगडताना पाहून अंगावर काटा येतो अन् ते पिवळे धमक आंबे आजही चाखता आले असते तर काय मजा आली असती, असं उगाच वाटून जातं. आंब्याचा सिझनातही आता सोनांबेत आंबा मिळत नाही, ही ज्येष्ठांमधील रूखरूख सर्वकाही सांगते. सोनांबे म्हणजे सोन्यासारख्या पिवळा धमक आंबा पूर्वी गावात पिकायचा. चार माणसांच्या घेराइतकी मोठाली आंब्याची झाडे गावात होती अन् त्यांना येणारे आंबे सोन्यासारखे झाडावर दिसायचे म्हणून गावाला सोनांबे असे नाव पडले, असेही सोनांबेकर सांगतात.
सोनांबेच्या नावाप्रमाणेच सोनांबेचा इतिहासही आहे. मात्र तो आता हरविलेल्या
अवस्थेत आहे. औरंगजेबाने नाशिक परिसरातील किल्ले घेण्यासाठी पाठविलेल्या
एक सरदार सोनांबेतील भैरवनाथाचे मंदिर पाडण्यासाठी गावात आला होता.
त्यावेळी त्या सुलतान नावाच्या सरदाराच्या भावाला सोनांबेत साप चावला.
त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला तीन दिवस भैरवनाथ मंदिरात बसवून ठेवले व
त्याला झालेली विषबाधा दूर झाली. त्या सुलतानाने मंदिराला हात तर लावलाच
नाही उलट मंदिराच्या जीर्णोद्धाराला मदत केली. तेव्हापासून गावातील
भैरवनाथाच्या यात्रेत मंदिरासमोर मंडप टाकण्याचा मान गावातील मुस्लिम
कुटुंबियांना आहे, असे हरिषचंद्र सातपुते, एकनाथ पवार, राजू आंबेकर व
ज्ञानेश्वर बोडके सांगतात. भैरवनाथ मंदिरात साप चावलेल्या व्यक्तीला तीन
दिवस बसवून ठेवल्यास विषबाधा होत नाही, अशी एक समजूतही ग्रामस्थांमध्ये
आहे. गावात देवपूरच्या राणेखानाच्या भावाची म्हणजेच हिरेखानाची मोठी तीन
मजली हवेली देवनदीच्या किनारी आहे.
No comments:
Post a Comment