विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 1 April 2019

श्रीमंत पेशवे माधवराव बल्लाळ*

*🍂🍁
श्रीमंत पेशवे माधवराव बल्लाळ*
पेशवे घराण्याचा एक कोहिनूर हिरा...
मराठी रियासतीस लाभलेला एक अद्वितीय पेशवा...
लयास येत असलेल्या मराठी साम्राज्यास आपल्या अंगातील गुणांनी पुन्हा चारो तरफ पसरवणारा एक तडफदार पेशवा.. ज्यांच्या अंगात बाळाजी विश्वानाथांचा मुत्सद्दीपणा,राऊस्वामींचे शौर्य, धैर्य, नानासाहेबांचे शहाणपण अगदी पदोपदी भासायचे, असे श्री छत्रपती राजाराम महाराज विश्वासनिधीं श्रीमंत पेशवे माधवराव बल्लाळ यांची कालच पुण्यतिथी झाली! पानिपतच्या युद्धानंतर लयास येत चाललेल्या मराठी राज्याच्या जरीपटक्यास शौर्याने पुन्हा कळसास नेऊन ठेवले. वयाच्या १६व्या वर्षी छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना पेशवेपदाची वस्त्रे दिली. श्रीमंत नानासाहेबांचे द्वितीय पुत्र असल्याने आपले थोरले बंधु विश्वासराव पेशवे होणार आणि आपण त्यांचे मुतालिक होणार,असे लहान असल्यापासूनच त्यांच्या मनी होते. ते शरीरयष्टीने उंच, पिळदार शरीर, नाजूक पाणीदार डोळे, उग्र चेहरा, अगदी मृदुभाषी पण कडक शिस्तीचे होते. त्यांच्या वागण्यात कधीच मिजासखोरपणा नव्हता. ते चूक झालेली कबुल करण्यास कधीही घाबरत नसत. राजकारण आणि धडाडी अंगी असल्याने त्यांना ऐश आराम, नेभळटपणा आवडत नसे. कारकिर्दीच्या सुरुवातीचा थोडा काळ त्यांचा जप,स्नानसंध्या अशा कर्मकांडात जरी जास्त गेला तरीही नंतर ते पुर्णपणे क्षात्र धर्माचे अनुयायी झाले.
संपूर्ण हिंदुस्थान मराठी राज्यात सामील करून घेण्याच्या महत्वकांक्षेपाई संपुर्ण आयुष्यभर त्यांनी मोहिमाच केल्या. त्यांना राज्यहिताची प्रचंड तळमळ होती. त्यामुळे काही महिन्यातच त्यांचा दरारा पुणे दरबारासह संपूर्ण हिंदुस्थानातही निर्माण झाला. सत्याची साथ देणारे माधवराव अत्यंत शीघ्रकोपी होते. ' आमची कसूर झाल्यास स्वतःस ब्राह्मण म्हणवणार नाही. पण कोणी फितुर झाल्यास पदाचा, मानाचा मुलाहिजा नं बाळगता त्याचे डोके मेखसुखाली फोडण्यात येईल!' असा सज्जड दम त्यांनी साऱ्यांनाच दिला होता. यामुळे राघोबादादांपासून हैदर, निजामापर्यंत, सखाराम बापू बोकिलांपासून चिंतो विठ्ठलापर्यंत आणि इंग्रजांपासून डच,पोर्तुगीजांपर्यंत सगळेच त्यांना भिऊन होते. कर्तव्य श्रेष्ठ म्हणणाऱ्या माधवरावांचा स्वभाव यामुळे एकांगी वाटे पण त्यांच्या मनात कधीच स्वार्थ नव्हता. यामुळे ते रयतेस प्रिय होते.
वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी त्यांना पोटदुखीच्या राजयक्ष्माची व्याधी जडली. मात्र तरीही जरीपटक्याचा तोल सांभाळण्यासाठी ते ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता सतत मोहिमा करत राहिले. त्यात शत्रु फार असल्याने त्यांना कणखरपणानेच सर्व कामे उरकवी लागत आणि कडक शिस्त ठेवावी लागत. त्यामुळे त्यांच्यावर जबर ताण पडला. संपूर्ण हिंदुस्तानात हिंदवी स्वराज्याचा दरारा त्यांनी उत्पन्न केला.'ज्यांनी पुण्याकडे विलोकिलें, ते संपत्तीला मुकले', अशी अवस्था त्यांनी शत्रूंची करून ठेवली. तापट स्वभावामुळे अत्यंत कठोर शिक्षा विरोधकांना देऊनही, आपलं कुटुंब असल्याप्रमाणे रयतेचीही त्यांनी माणुसकीने जपणुक केली,तिची बडदास्त ठेवली. यामुळे ते रयतेचे लाडके 'स्वामी' झाले. आपल्या केवळ ११ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी खुप मोठी कामगिरी करून दाखवली. कानडे, बिनिवाले, शिंदे यांच्या मदतीने त्यांनी उत्तरेत पुन्हा मराठी राज्याची दहशत निर्माण केली. यामुळे पानिपतचे अपयश धुवून निघाले. ही आनंदवार्ता ऐकुन रुग्णशय्येवर असणाऱ्या थोरल्या माधवरावांना आपलं आयुष्य सार्थक झाल्यासारखं वाटलं. आणि गजाननाच्या चिंतनात, थेऊर मुक्कामी, चिंतामणीच्या साक्षीने त्यांनी आपला देह ठेवला. अत्यंत कर्तृत्ववान पेशव्याच्या अकाली मृत्यूने सारी रयत कष्टी झाली. 'निधनप्रलय' या शाहीर प्रभाकराने केलेल्या काव्यात तो म्हणतो, 'इथून आता प्रारंभ दिसेंदिस अद्भुत प्रलयाला!' खरंच! श्रीमंत थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठी राज्यास उतरती कळाच लागली! असो..
श्रीमंतांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
पानिपताच्या पराभवातून सावरले तु वीरा।
मानाचा बा स्विकारी रे माधवराया मुजरा।।
(श्रीमंतांच्या पुण्यतिथी निमित्त लिहिलेला जुना लेख! आज जयंती निमित्त पुन्हा शेअर करतो आहे.)
- © श्रेयस पाटील
( Smarangatha.blogspot.in )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...