विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 19 April 2019

वणी- दिंडोरीची लढाई

वणी- दिंडोरीची लढाई

दि. ५ ऑक्टोबरच्या दुपारी महाराजांनी सुरत सोडली. जाताना त्यांनी मुख्य मोगली अधिकारी व प्रमुख व्यापाऱ्यांकडे पत्र पाठवून दरसाल १२ लाख रुपये होन न द्याल तर पुन्हा पुढील वर्षी येऊन शहराचा राहिलेला भाग जाळून टाकीन असा इशारा दिला. सुरतेहून महाराज पेठ-बालगण मार्गे मुल्हेरकडे निघाले. यावेळी मुअज्जम - दिलेरखान वाद मिटला होता. मुअज्जम औरंगाबादला येऊन पोहोचला होता. त्याच्या कानावर सुरत लुटीची बातमी गेली आणी तो धास्तावालाच कारण हि सुरत लुटीची दुसरी वेळ होती. तेव्हा त्याने दाऊदखानला महाराजांचा मोड करण्याची कामगिरी सोपविली त्याच्या सोबत राव भाऊसिंग हाडा हाही आला. औरंगाबादेहून दाऊदखान लगेच महाराजांना रोखण्यासाठी पुढे निघाला.

पण महराजांचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक आणि त्यांच्या असंख्य डोळे असलेले त्यांचे हेर यांनी मोगल पाठीवर आहे हि बातमी मुल्हेरलाच राजेंना आणून दिली. जशा राजेंना पक्क्या बातम्या येत होत्या तशाच त्या दाऊदखानला हि जात होत्याच. मध्यरात्री सुमारे बारा वाजता दाऊदखानला खबर मिळाली की 'कंचन-मंचनचा घाट पार करून महाराज त्वरेने गुल्शनाबाद (नाशिक) च्या वाटेला लागले आहेत. त्यांचे काही सैन्य घाटमाथ्यावर जमलेले असून ते मागाहून येत असलेल्या आपल्या सैन्याची वाट पाहत उभे आहे'

हे वृत्त कळताच दाऊदखान तडक स्वार झाला. तो एवढा उतावीळ झाला होता की, त्याच्यासोबत असलेले स्वार त्याच्या मागोमाग जाऊही शकली नाही हि रात्र कार्तिक शुद्ध त्रयोदशीची होती. रात्र सरताना अंधार झाला त्यामुळे दाउदखानचे सैनिक वाट चुकले. नाइलाजास्तव सुर्योदयापर्यंत थांबावे लागले. दाऊदखानने आपल्याला गाठल्याचे राजेंच्या लक्षात आले. ताबडतोब मराठी सैन्य युद्धार्थ सज्ज झाले.

सूर्योदय झाला मराठी सैन्य घाटमाथा चढू लागले. इख्लासखान मियाना आघाडीवर होता. तो घाटमाथ्यावर पोहोचला आणि समोर पाहतो तो मराठे युद्धाचा पवित्र घेऊन शस्त्रे परजीत उभे असलेले त्याला दिसले. इख्लासने बेधडक मराठ्यांवर चाल केले आणि पहिल्याच तडाख्यात जखमी होऊन तो जमिनीवर कोसळला एवढ्यात दाऊदखान तेथे पोहोचला. त्याने ताबडतोब राय मकरंद खत्री, शेख सफी, मान पुरोहित, संग्रामखान यांना इख्लासच्या मदतीस पाठविले. विलक्षण त्वेषाने हे सरदार मराठ्यांवर तुटून पडले. पण मराठ्यांचा जोर जबरदस्त होता. मोगलांचे अनेक शाही सैनिक मोठे सरदार यात ठार झाले. मराठ्यांचा प्रचंड जोर पाहून त्यांना मागे रेटण्यासाठी अखेर राय मकरंद व भान पुरोहित यांनी तोफा डागायला सुरवात केली. पण मराठे त्यांची तमा बाळगीत नव्हते. तोफांच्या माऱ्यामुळे पन्नास मराठे ठार झाले. पण तोवर मोगलांचे नुकसान हजारोंच्या संख्येत होते.

मीर अब्दुल माबुदची, घाटमाथ्यावरील चढ-उतारांमुळे मुख्य सैन्यापासून ताटातूट झाली त्यामुळे आपल्या पुत्रांसह व थोड्या सैनिकांसह त्याने एका गुहेचा आश्रय घेतला. मराठ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले तेव्हा त्यांनी गुहेवर हल्ला चढविला. मीर अब्दुल, त्याचा एक मुलगा व काही सैनिक जखमी झाले. एका पुत्रास तर मराठ्यांनी यमसदन दाखविले, मीर अब्दुलची शस्त्रे, घोडे, व झेंडा हिसकावून मराठे निघून गेले.

राजा खासा घोड्यावर बैसून, बख्तर घुगी घालून, हाती पेटे चढवून मालमत्ता, घोडे, पाईचे लोक पुढे रवाना करून आपण दहा हाजर स्वारांनिशी सडे सडे राऊत उभे राहिले. वणी-दिंडोरी म्हणवून शहर आहे ते जागा उभे राहून सुभ्याचे लोक आले त्याशी घोरांदार युद्ध केले. प्रतापराव सरनौबत व व्यंकोजी दत्तो व आनंदराव वरकड सरदार पुढे होऊन मोठी कत्तल केलो. आणि मोगल मुरदे पाडिले . दोन प्रहर युद्ध जाले. मराठे यांणी शर्त केली. तीन हजार मोगल मारिले. तीन चार हजार घोडे पाडव केले. दोन वजीर मोगलाई सापडले. असे फत्ते करून आले.

मराठ्यांनी एक हत्ती पाडाव करून आणल्याचे जेधे शकवालीत नोंदलेले आहे.

इतिहासात वणी- दिंडोरीची म्हणून प्रसिद्ध असलेली. पण प्रत्यक्षात कंचन-मंचन घाटमाथ्यावर झालेली हि लढाई शके १५९२, साधारण नाम संवत्सराची कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर १६७० रोजी झाली.
संदर्भ - शककर्ते शिवराय

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...