विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 17 June 2019

माँसाहेब मृत्यू दिन १७ जून इ.स.१६७४🙏

माँसाहेब मृत्यू दिन
१७ जून इ.स.१६७४🙏🙏

 🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या आईसाहेब....

राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे लक्ष आईसाहेबांकडे पूर्ण होते. आईसाहेब म्हणजे तर महाराजांचे सर्वस्व. महाराजांचे दैवत. गडावरची हवा फार थंड. वारा फार. आईसाहेबांची प्रकृती  अतिशय नाजूक झालेली. गड त्यांना मानवेना. म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी, गडाच्या निम्म्या डोंगरात असलेल्या, पाचाड नावाच्या गावी एक उत्तम वाडा बांधला.

तेथे त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था केली. राज्याभिषेकासाठी महाराजांनी आपले हे थोर दैवत अलगद गडावर नेले. लटलटत्या मानेने आणि क्षीण झालेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या बाळाचे सारे कोडकौतुक न्याहाळले. राजा म्हणजे विष्णूचा अवतार. शिवबाला विष्णुरूप प्राप्त झालेले त्यांनी पाहिले. आता आणखी काय हवे होते त्यांना? त्यांना काहीही नको होते, पण महाराजांना त्या हव्या होत्या. राज्याभिषेक उरकल्यावर महाराजांनी (बहुधा मेण्यातून ) आईसाहेबांना गडावरून खाली पाचाडच्या वाड्यात आणले. आईसाहेबांनी राजधानीच्या महाद्वाराचा उंबरठा ओलांडला. रायगडाकडे त्यांची पाठ झाली. आईसाहेबांना ते महाद्वाराचे बुरुज जणू काही विचारीत होते, 'आईसाहेब, आता पुन्हा येणे कधी व्हायचे ?'

आता कैचें येणें जाणे ? आता खुंटले बोलणे ! हेचि तुमची अमुची भेटी, येथूनिया जन्मतुटी ! पान पिकले होते, वाराहि भिऊन जपून वागत होता.
आणि पाचाडच्या वाड्यात आईसाहेबांनी अंथरूण धरले. महाराजांच्या हृदयात केवढी कालवाकालव झाली असेल? अखेरचेच हे अंथरूण ! आईसाहेब निघाल्या ! महाराजांची आई चालली ! सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरविले. त्यावर दहा वर्षे आईसाहेब थांबल्या. पण आता त्यांना कोण थांबविणार ? … आई ! कसले हें विचित्र नाते परमेश्वराने निर्माण केले आहे ! जिच्या प्रेमाला किनारे नाहीत. जिच्या प्रेमाचा ठाव लागत नाही. जगाला आई देणारा परमेश्वर किती किती चांगला असला पाहिजे !
पण तीच आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दय असला पाहिजे !!!

ज्येष्ठ वद्य नवमीचा दिवस उजाडला. बुधवार होता या दिवशी. आईसाहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली. आयुष्याचा हिशेब संपत आला. वर्षे, महिने, आठवडे, दिवस संपले. आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली. दिवस मावळला. रात्र झाली.
मायेच्या माणसांचा गराडा भवती असतांना, सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतांनाही मृत्यूचे पाश पडू लागले. सर्व हतबल झाले होते. कोणाचेही काही चालत नाही इथे.

घोर रात्र दाटली. मध्यरात्र झाली. आईसाहेबांनी डोळे मिटले !
श्वासोच्छ्वास संपला !
चैतन्य निघून गेले !
आईसाहेब गेल्या !
छत्रपतींचे छत्र मिटले गेले !
मराठ्यांचा राजा पोरका झाला ! स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या. महाराज दु:खात बुडाले. आईवेड्या शिवबाची आई गेली. शिवनेरीवर अंगाई गाणारी, लाल महालात लाड करणारी, राजगडावर स्फूर्ती देणारी आणि रायगडावर आशीर्वाद देणारी आई कायमची निघून गेली. आता या क्षणापासून आईची हाक ऐकू येणार नाही ! कोणत्या शब्दात सांगू आईच्या हाकेचे सुख ? ज्यांना आई आहे ना, त्यांनाच, -- नाही, नाही, -- ज्यांना आई नाही ना, त्यांनाच फक्त ते समजू शकेल !
ज्येष्ठ वद्य नवमी, बुधवारी, मध्यरात्री (दि. १७ जून १६७४ ) जिजाबाईसाहेब मृत्यू पावल्या...🙏🙏

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...