विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 12 July 2019

#पन्हाळगड_ते_विशाळगड

#पन्हाळगड_ते_विशाळगड
सिद्धीचा बळजोर वेढा पन्हाळ्याला पडुन पुरे सव्वाचार महिने झाले होते. पाऊस जोर धरत होता. महाराजांच्या मनात घुसमट चालु होती पन्हाळ्यावरून निसटायची. महाराजांची योजना ठरलेली होती. सारी जय्यत तयारी झाली होती. जीवाला जीव देणारे, बाजीप्रभू, फुलाजीप्रभू, बाजी बांदल, शंभुसिंह जाधवराव सारे सारे होते. गडाखाली उतरण्याची बिनचुक वाट हेरांनी शोधली होती. रात्र चढत होती. पन्हाळ्यावरून धाव घेऊन सर्वाना विशाळगड जवळ करायचा होता. पण वेढ्यातुन बाहेर पडल्यानंतर विशाळगडावर पोहोचेपर्यंत काही वेळ हातात हवा होता. शिवा काशिद महाराजांसमोर उभे होते. महाराजांचीच चेहरेपट्टी! सारंसारं ठरलं होतं. सिद्धीच्या वेढ्यावर शरणागतीची फुंकर पंतांनी केव्हाच घातली होती तरीही सिद्धीची दिशाभूल करणं गरजेचं होतं!
त्याकरताच खुद्द महाराजांच्या वेशात शिवा काशिद सिद्दीच्या वेढ्यात जाणार होते. केव्हढी ही मनाची तयारी? आपणहुन स्वतः राजाच्या वेषात सजून मृत्युच्या दाढेखाली जायचं! कुठुन गोळा केली असतील ही माणसं महाराजांनी? काय किंमत पडली असेल महाराजांना? अहो कसं मोल ठरवावं या माणसांचं? या महाराष्ट्राचा, स्वराज्याचा संसार थाटण्यासाठीच जणु ही जन्माला आली होती. महाराजांच्या मनात नेमके कोणते भाव दाटुन आले असतील शिवा काशीदांंना निरोप देताना? हृदय किती कळवळलं असेल ना? विचार करवत नाही! शिवा काशिदांच्या मनात किंवा चेहऱ्यावर मात्र आनंदच दिसत होता! स्वराज्याची कामगिरी करायचा मान मिळत होता त्यांना! तेही महाराजांच्या वेषात! कोण सोडेल अशी संधी?
महाराजांनी शिवाला मिठी मारली. शेवटची?? महाराजांच्या हृदयसिंहसनावरची कवड्यांची माळ नकळत गुदमरली. निघण्याची सिद्धता झाली होती. सर्वांनी जगदंबेचं दर्शन घेतलं! सर्वजण बाहेर पडले. पालखीचा गोंडा घरून महाराज पालखीत बसले, दुसऱ्या पालखीत शिवा! महाराजांचे गंभीर स्वर उमटले ' जय भवानी ' खुप जोरानं अस्मान कडाडलं..
गडाचा दरवाजा उघडला गेला, मावळ्यांनी पालख्या उचलल्या, ठरल्या मार्गानं पालख्या निघाल्या. बाजीप्रभू आणि मावळे निघाले! प्रत्येक हृदय पुटपुटत होतं.. जगदंब! जगदंब!!
अगदी पुढे अंधार पोखरीत वाटाडे हेर चालले होते, अगदी बिनचुक! सिद्दीच्या वेढ्यावर महाराजांच्या सांगण्यानुसार पंतांनी बिनशर्त शरणागतीची झुल पांघरली होती!
पडणारं प्रत्येक पाऊल पदरात टाकत पालखी आणि मावळे दौडत होते. उजेडाकरता सोबत मशाल वगैरे काहीही नव्हतं! कसं असणार, शत्रूला कळेल ना! महाराजांच्या आणि त्यांच्या जिवलगांच्या हृदयात केव्हढं रणकंदन माजलं असेल? साऱ्यांच्या नजरा चौफेर, सावधपणे फिरत होत्या. कोणी पाहिलं तर? एखाद्या हेराची नजर पडली तर? अंधारात सणाणुन एखादी गोळी आपल्या रोखानी सुटली तर? जगदंब!...जगदंब!!!सारा भरंवसा तुझा!
साऱ्यांना महाराजांना घेऊन, शत्रू सावध व्हायच्या आत विशाळगड गाठायचा होता, पण तो काय जवळ होता का? रात्रीचा काळोख मी म्हणत होता, सोसाट्याचा वारा आणि पाऊस यांच्यात स्पर्धा चालु झाली होती. आकाशात भाऊबंदकी माजलेली होती, वीजा किंचाळत होत्या, पानापानांवरून पाण्याचे थेंब टपकत होते, वाघाच्या आणि इतर जंगली श्वापदांच्या आरोळ्या उठत होत्या, पावला पावलांनी वेढा जवळ येत होता. गडावरून मावळे महाराजांच्या पालखीचा वेध घेत होते. ऐन वेढा लागला. महाराज, बाजीप्रभू, बांदल आणि मावळे साऱ्यांंनीच जगदंबेच नाव घेत वेढ्यात पाऊल टाकलं. मृत्युच्या ऐन ओठावर होते सगळे!
पाऊल ..पाऊल पुढे सरकत वेढा ओलांडला गेला. जिवाच्या आकांतानं सारे पळत होते. वेढा मागे पडत चालला होता. आणि सिद्दीच्या हेरांनी महाराजांना हेरलं, त्यांनी महाराजांना पाहिलं, आणि ते थेट पळत सुटले ते छावणीच्या रोखाने. मावळ्यांना हे ध्यानात आलं, शत्रू सावध झाला होता, पाठलाग हा तर नक्की होणारच होता पण तोपर्यंत जास्तीत जास्त अंतर कापणं याशिवाय पर्याय नव्हता. आणि..आणि सिद्दीच्या छावणीत बातमी येऊन थडकली, तो तर सुन्नच झाला. पण सिद्दीच्या लोकांनी विशाळगडाच्या रोखाने महाराजांचा पाठलाग सुरू केला. पन्हाळगड ते विशाळगड या दरम्यान मांडलेल्या पटावर जौहरच्या छावणीत महाराजांचा एक मोहरा कामी आला होता, शिवा काशीद! इतरांच्या आणि खुद्द महाराजांच्या रोखानं गनीम दौडत होता. महाराजांनी गजापूरची घोडखिंड गाठली..आणि गनिमाच्या आरोळ्या कानावर पडू लागल्या. आता निभाव लागणे मुश्किल! रात्रभर दौड करून सारेच थकून गेलेले होते. पण हटतील ते महाराजांचे मावळे कसले? महाराजांसोबत साऱ्यांच्याच समशेर म्यांनातून उसळल्या. बाजींनी जाणलं की शत्रू ऐन खिंडीत शिकार गाठेल. त्यांनी निम्म्या लोकांनीशी महाराजांना विशाळगडी कूच करण्याची विनंती केली. विचार करा काय घालमेल उडाली असेल महाराजांच्या जिवाची? आपल्या इतक्या सवंगड्यांना असं मृत्यूनं पसरलेल्या जबड्यात सोडून जायचं? बाजींचा हट्ट जोर धरत होता..गनिमाचा कालवा वाढत होता, पावलापावलांनी जवळ येत होता. अखेर महाराजांनी बाजींना आलिंगन दिलं, विशाळगडी पोहोचताच भांडी वाजवण्याची खुणही ठरली आणि महाराज विशाळगडाच्या रोखाने निघाले...
बाजींनी आपल्या उरलेल्या मावळ्यांच्या तुकडीकडं नजर वळवली, वीरश्री फुरफुरत होती, मनगटं शिवशिवत होती, गनिम खिंडीच्याजवळ आला होता. बाजींचा आणि साऱ्यांच्याच मुखातून महाराष्ट्रधर्माचा महामंत्र कडाडला 'हर हर हर हर महादेव'
समोरून येणाऱ्या गनिमांकडे बाजींची समशेर फिरली आणि...जे रणकंदन उसळलं ते सांगताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात...
.
.
आले आले गनीम खिंडित चवताळुनि आले
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनी भाले ||
'दीन दीन’ रणशब्दा ‘हरहर महादेव’ भिडला
भिडला ओष्ठी दंत मस्तकी रंग वक्षि भाला ||
© सात्विक ठकार
#shakkarta #shivayannatak
#shivayan_historical_play #teamshivayan
#शिवायन_ऐतिहासिक_सोहळा #टीम_शिवायन
#satvikthakar #mayurgholap
.
https://www.facebook.com/Shivayannatak/
.
Like, follow & share ,👍

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...