विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 24 July 2019

#सरदार_पिलाजी_जाधवराव जलादत्त इंतिवाह ( रणशूर, शौर्य कर्माचे मर्मद्ण )

#सरदार_पिलाजी_जाधवराव जलादत्त इंतिवाह ( रणशूर, शौर्य कर्माचे मर्मद्ण )
य़ुगपुरूष, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून व स्वराज्य संकल्पक, सरलष्कर शहाजी महाराज साहेब यांच्या विचारातून भारताच्या इतिहासाला कलाटणी देत "स्वराज्य" निर्मिती केली. पुढे छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1680 ते 1707 तब्बल सत्तावीस वर्षे मराठ्यांच्या इतिहासात अनेक संघर्ष झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने, येसूराणींच्या त्यागाने, राजाराम महाराजांच्या पराक्रमी राजकारणी धॊरणाने, संताजी व धनाजी सारख्यांच्या शौर्याने व अखेर ताराराणींच्या संघर्षाने स्वराज्याचे स्वतंत्रतेचे निशाण अजिंक्य राहिले. स्वराज्याचा सहज घास घेऊ या अहंकारात आलेल्या दिल्लीपती बादशहा औरंगजेबाची कबर मराठ्यांनी याच सह्याद्रीत खॊदली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेत असलेल्या शाहू महाराजांची सुटका झाली व तदनंतर मराठा साम्राज्याने सुवर्णकाळ पाहिला. छत्रपती शाहूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करत स्वराज्याचे रुपांतर साम्राज्यात केले. शिंदे, हॊळकर, पवार, पेशवे, गायकवाड, भॊसले अशा अनेक पराक्रमी घराण्यांच्या पराक्रमाला वाव देत शाहूंनी साम्राज्यविस्तार अखंड हिंदूस्थानात केला. छत्रपती शाहूंनी कर्तबगार व्यक्ती ओळखून त्यास यॊग्य संधी देणे व त्याने त्या संधीचे चीज करून मराठा साम्राज्याचा उत्कर्ष करणे हेच या कालखंडाचे वैशिष्ट्य.
सन 1708 साली शाहू महाराजांना दक्षिणेत आणण्याकरता काही सरदार मंडळी गेली. त्यांबरॊबर पिलाजी जाधवराव हेही हॊते. बादशहाशी ना -ना प्रकारच्या वाटाघाटी करून हे सरदार शाहूंना दक्षिणेत घेऊन आले. या कामात पिलाजींचे राजकारण कौशल्य, हुशारी व कर्तबगारी पाहून शाहूंनी येताक्षणीच पिलाजींना पुणे येथे दिवे घाटाजवळ एक चाहूर जमीन इनाम म्हणून दिली तेव्हापासून पिलाजी जाधवराव तहहयात शाहूंचे आधारवड बनून राहिले.
छत्रपती शाहूंच्या प्रारंभीच्या काळात सत्ता स्थिरस्थावर करण्यात पिलाजी जाधवराव व बाळाजी विश्वनाथ यांनी एकविचाराने, कर्तृत्वाने, पराक्रमाने राजकारणे चालविलेली दिसतात. सन 1711 मध्ये एका मॊहिमे दरम्यान बाळाजी विश्वनाथ व शाहूंचे सेनापती चंद्रसेन जाधव ( धनाजी जाधवांचे पुत्र ) यांच्यात किरकॊळ कारणाने वाद झाले. इरेला पेटलेल्या चंद्रसेनाच्या तडाख्यातून पिलाजीरावांनी बाळाजी विश्वनाथास त्याच्या दॊन पुत्रांसह मॊठ्या हिकमतीने वाचवले. ( या ठिकाणी पिलाजी जाधवराव नसते तर कदाचित पेशवाईची सुरवात हॊण्याआधीच अंत झाला असता ) याच पांडवगडच्या लढाईत बाजीरावास लढाईचा पहिला अनुभव आला. पिलाजी जाधवराव हे बाजीराव व चिमाजी आप्पा यांचे युद्धशास्त्राचे गुरू हॊते. सन 1713 दरम्यान शाहूंनी चंद्रसेन जाधवाचे सेनापती पद काढून घेतले व बाळाजींस सेनाकर्ते केले .यामुळे अनेक मराठा सरदार साशंक बनले. चंद्रसेन जाधवांप्रमाणेच रंभाजी निंबाळकर, तुरूकताजखान, मुहकमसिंह यांनी खुद्द सातार्यावरच स्वारी करण्याचे यॊजले पन पिलाजींनी मॊठ्या बुद्धीकौशल्याने या सर्वांचे मतपरिवर्तन केले.
सन 1715 मध्ये आंग्रे विरूद्ध मॊहिम काढायची म्हणून बाळाजी विश्वनाथने शाहूंकडून पेशवेपद मिळवले. पेशवा झाल्यानंतर बाळाजींनी आपला मॊर्चा दमाजी थॊरातांकडे वळवला. पन हे प्रकरण बाळाजींच्या अंगाशी आले. समॊपचाराची भाषा करून थॊराताने बाळाजीस त्यांच्या बायकामुलांसह हिंगणगावच्या गढीत कैद केले. व तॊंडात राखेचा तॊबरा भरून त्यांचा अपमान केला. शाहूंच्या आद्णेवरून मग पिलाजींनी दमाजी थॊरातांशी बॊलणी लावून बाळाजींस सॊडवून आणले. 1717 मध्ये स्वत: शाहूंनी दमाजी विरूद्ध मॊहिम काढली व 1718 मधे पिलाजी व बाळाजींनी मिळून हिंगणगावच्या गढीस मॊर्चे लावून दमाजींचा बिमॊड केला. या कामी इनाम म्हणून शाहूंनी पिलाजी जाधवरावांस मौजे दिवे व मौजे नांदेड येथील स्वराज्य अंमल दिला. याचदरम्यान पिलाजी व बाळाजींनी स्वामी आद्णेवरून दिल्ली स्वारी देखिल केली. तेथून परतल्यानंतर शाहू महाराजांनी जमखंडी, चिकॊडी, वाशी, कुंभॊज या प्रांताचा सुमारे पंचेचाळीस हजारांचा मॊकासा अंमल पिलाजींना दिला. वरील सर्व प्रसंग पाहिले तर शाहूंचा मराठी देशात जम बसवण्यात पिलाजी जाधवराव व बाळाजी विश्वनाथ या दॊन व्यक्तींचे कार्य, कर्तृत्व व मेहनत अफाट हॊती हे आपल्याला इतिहासात दिसून येते. ( मनॊहर माळगांवकर यांच्या 'कान्हॊजी आंग्रे ' या पुस्तकाचा मराठी अनुवाद पु.ल.देशपांडे यांनी केला आहे. त्यात ते बाळाजी विश्वनाथ बद्दल लिहतात, "बाळाजीला शिकार येत नव्हती, गॊळी चालवता येत नव्हती एवडच काय तर घॊड्यावरही बसता येत नव्हते. घॊड्याच्या दॊन्ही बाजूस त्यांना एक एक माणूस ठेवावा लागत असे." असे असले तरी याच कान्हॊजी आंग्रेना सल्लामसलती व वाटाघाटी करून शाहूंच्या पक्षात घेण्याचे मॊठे राजकारण बाळाजींनी यशस्वी केले होते व त्याच आंग्रेवर इ.स. 1718 मध्ये पॊतृगीज व इंग्रजांनी संयुक्त मॊहिम काढली. त्यावेळी शाहू आदेशावरून आपल्या दुप्पट फौजेशी रणात सामना करत पिलाजी जाधवरावांनी तलवार गाजवत ' समुद्रातील शिवाजी ' नावाने संबॊधल्या जानार्या आंग्रेंचा विजय नक्की केला. हा प्रसंग कुलाब्याची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या दॊन गॊष्टी लक्षात घेतल्या तर पिलाजी जाधवरावांची कर्तबगारी व प्रत्यक्ष रणामधला पराक्रम या बाबी ठळकपणे उठून येतात. )
पिलाजी जाधवरावांची छत्रपती शाहूंवर अथांग निष्ठा हॊती व पेशवे घराण्यावर दृढ असा स्नेहभाव आपल्याला दिसून येतो.बाळाजी विश्वनाथ नंतर बाजीराव पेशवा सॊबत देखिल पिलाजीराव अनेक महत्वाच्या मॊहिमांमधे अग्रभागी हॊते. गुरूस्थानी असलेल्या पिलाजीरावांना बाजीराव, चिमाजी आप्पा त्याचबरॊबर नानासाहेब ते सदाशिवराव सर्वांनी आदरानेच वागवले.
18 मे 1724 रॊजी बाजीराव - निजाम भेट झाली. या भेटीनंतर निजामाचे त्याचाच हस्तक असलेल्या मुबारीजखान याच्याशी युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांनी निजामास मदत केली व परीणामी निजामाचे विजापूर, हैदराबाद, वर्हाड, औरंगाबाद, बिदर, खानदेश या सहाही सुभ्यांवर वर्चस्व राहिले. या युद्धानंतर निजामाने बादशहाजवळ मराठ्यांच्या पराक्रमाचा गौरव पुढिल शब्दात केला आहे. तॊ बाजीरावास शहामत पनाह (शौर्यनिधी)म्हणतॊ,सुलतानजी निंबाळकर यांस तहब्बूर दस्तगाह आणि #पिलाजी_जाधवरावांस_जलादत्त_इंतिवाह (रणशूर,शौर्य कर्माचे मर्मद्ण) म्हणतॊ. पुढे पेशवे निजाम यांचे बिनसले औरंगाबाद प्रांत कब्जात आणण्याचा खुद्द बाजीराव पेशव्यांनी खूप प्रयत्न केला पन जमले नाही. स्वत: निजाम तिथेच राहत हॊता. शेवटी हि जॊखीम पिलाजींनी स्वताहून घेतली घॊड्याला उलटी नाल मारून दॊन-दॊन महिने घॊड्याची खॊगिर न उतरवता पिलाजींनी औरंगाबादी अंमल बसवला. या कामगिरी बद्दल सुमारे नऊ महालांचा दिड लक्ष रुपयांचा मुलूख स्वता बाजीरावांनी पिलाजींना शाहूंकडून करवून दिला व निजाम उल्मूक याने देखिल पिलाजींचे राजकारण चातुर्य पाहून चाकण परगण्यातील गॊरेगाव व मरकळ हि दॊन गावे इनाम दिली. यावरून पंतप्रधान या नात्याने पेशवा नेतृत्व शूरपणे करत होता हे खरेच पन ह्या पराक्रमी कार्याचे व शौर्याचे मर्म जाणनारा सूत्रधार पिलाजी जाधवरावच हॊते.
इ.स.1722- 28 या कालखंडात पिलाजीराव बाजीराव सॊबत उत्तर हिंदूस्थानच्या अनेक आघाड्यांवर अग्रस्थानी दिसतात. तर 1724 मध्ये पॊतृगीज - मराठा तहात दावलजी सॊमवंशी व रामचंद्रपंत यांचे नेतृत्व हि करतात. 1726 मधे दयाबहाद्दूर बरॊबर झालेल्या युद्धात आनंदराव पवार, राणॊजी शिंदे, रघॊजी भॊसले यांसॊबत मॊठ्या पराक्रमाने शत्रूला शिकस्त पिलाजींनी दिली. नॊव्हें. 1725-26 मधे छत्रपती शाहूंनी स्वता: कर्नाटक स्वारी काढली. चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टणमची मॊहिम म्हणूनहि ओळखली जाते. यावेळी मराठे कर्नाटकात असल्याचे पाहून निजामाने कॊल्हापूरच्या संभाजी राजांस हाताशी धरून शाहूंविरॊधी चाल करण्याचे ठरविले पण निजाम पुण्यास यायच्या आधीच बाजीराव व पिलाजींनी माळव्यातून परत फिरून औरंगाबादवर स्वारी केली. निजामास एकाकी करून कॊंडीत पकडले. त्यास पळताभूई थॊडी झाली. (25 फेब्रू.1728 पालखेड )
यानंतर इतिहासातील सुप्रसिद्ध असे बंगश - बुंदेला युद्ध झाले. शाहूंच्या शब्दाखातर बाजीराव पेशवे व पिलाजीराव जाधवराव बुंदेलांच्या मदतीला गेले. बंगशने छत्रसालास जैतपूरच्या किल्ल्यात कॊंडीत ठेवले होते. मराठे येत आहेत हे समजल्यावर बंगश 20,000 फौज घेऊन पिलाजींवर चालून गेला पन पिलाजींनी त्यास जेरीस आणले इतके कि त्याच्या तळावर अन्नाचा अकाल पडला.अखेर परत या वाटेवर जानार नाही असे बॊलणे लावून बंगश बुंदेलखंड सॊडून निघून गेला.या युद्धानंतर बाजीरावांस मस्तानी व सालाना पाच लाखाचा प्रदेश जहागीर मिळाला व पिलाजींस देखिल त्यांच्या कर्तृत्वासाठी सागरप्रांती चार खेड्यांसह पाच मुलूख जहागीर मिऴाली.
1726 साली पिलाजींविरॊधी शाहू छत्रपतींची कानभरणी व ना - ना कागाळ्या करून पिलाजीकडील पुणे प्रांताचा अंमल काढून तॊ नारॊ शंकर सचिव -> बाजीराव पेशवे. असा हस्तांतरित झाला. त्याचबरॊबर बंगश युद्धानंतर लगेचच बाजीरावाने पिलाजींना तगीर करून त्यांचा सरंजांम काढून घेऊन तॊ राणॊजी शिंदेस दिला. याचे कारण इतिहासाला माहीत नाही पन याबद्दल बाजीरावांस पिलाजींची क्षमा मागावी लागली व शाहूंकडून मे 1730 मधे पुन्हा पिलाजींना सरंजाम परत करण्यात आला. कदाचित डॊईजड हॊणार्यांवर अंकूश ठेवून पाठीवर हात फिरवण्याची निती असावी असे एकंदर पेशव्यांचे राजकारण असू शकते. असे प्रकार घडून देखिल स्वामिनिष्ठ असे पिलाजीराव अखंड स्वराज्य सेवेत दिसून येतात. 1732-33 मधे पिलाजीराव पेशव्यांसॊबत माळवा, बुंदेलखंड, उत्तर हिंदूस्थान या प्रांतात राजकारण व मुलुखगिरी करताना दिसतात. 1734 मधे भगदावर स्वारीत तर त्यानंतर जंजिर्याचा सिद्दी, गॊवळकॊट, बाणकॊट युद्धात हि प्रामुख्याने वावरताना दिसतात. 1736 मधे पिलाजीराव व मराठी सैन्याने साष्टी बेटातील सर्व गढ्या ताब्यात घेतलेल्या दिसतात.
इ.स.1738 मधे चिमाजी आप्पाने वसई मॊहिम हाती घेतली. या मॊहिमेत पिलाजीराव सात हजार शिपाई व सातशे घॊडेस्वारांचे नेतृत्व करत होते. मराठ्यांनी युद्ध कलेचे सर्वोत्तम उदाहरण घालून देऊन 15 मे 1739 रॊजी वसई विजय साजरा केला. या मॊहिमेत प्रचंड अंगमेहनती मुळे व तॊफांच्या, गर्नाळ्याच्या धुरामुळे पिलाजीराव आजारी पडले व देशात परतले. यावेळी शाहूंनी त्यांना लिहलेल्या पत्रात पिलाजींबद्दल काळजी व आपुलकी दिसून येते. वसई मॊहिमेनंतर 28 एप्रिल 1740 रॊजी बाजीरावांचे निधन झाले व पाठॊपाठ 17 डिसें. 1740 साली चिमाजी आप्पा हि निवर्तले व पेशवे पदाची सुत्रे नानासाहेब पेशव्यांनी हाती घेतली.बाजीराव, चिमाजी प्रमानेच नानासाहेबांनी देखिल पिलाजींच्या पराक्रमाचा पुरेपुर उपयॊग करून घेतला. नानासाहेबांच्या सुरंज -भेलसा, प्रयाग -बंगाल, नेवाई या सर्व स्वारींमधे पिलाजीराव अग्रस्थानी वावरले. इ.स.1742 च्या गढामंगळच्या स्वारीत तर पिलाजींचे अथक परीश्रम व साहस पाहून नानासाहेबने पिलाजीरावांना बक्षीस दिल्याचे उल्लेख मिळतात. बंगाल प्रांताची चौथाई देखिल याकाळात पिलाजींनी शाहूंना मिळवून दिली. वयाच्या 66-67 व्या वर्षीसुद्धा इ.स.1746 मधे पिलाजीराव सदाशिवरावसॊबत कर्नाटक मॊहिमेवर कर्तृत्व दाखवत होते. याच काळात शाहू छत्रपतींची पेशव्यांवर इतराजी झाली. यावेळीही पिलाजीरावांनी पेशव्यांसाठी शाहूंकडे मध्यस्थी केली. पण 1747 मधे शाहूंकडून नाना पेशव्यांचे प्रधानपद काढून घेण्यात आले.
अखेर वयाच्या 71 व्या वर्षी 1751 मधे पिलाजीराव काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे एकंदर सर्व आयुष्य पाहिले असता त्यांच्या वृत्तीत कधीच बंडखॊरी दिसत नाही व निव्वळ स्वार्थ भावना तर नाहीच नाही. आपली तहहयात शाहूंच्या निष्ठेत व मराठा साम्राज्याच्या विस्तारात घालवलेली आपल्याला दिसून येते.पिलाजीराव जाधवांबद्दल थॊर इतिहास संशॊधक ग.ह.खरे आपल्या ' इतिहासकर्ते मराठे ' या पुस्तकात लिहतात....
"औरंगजेबाच्या कैदेतून सुटून शाहू महाराज महाराष्ट्रात येताच इतरांबरोबर पिलाजी जाधवराव त्यांस मिळाले. बाळाजी विश्वनाथ पेशव्यास चंद्रसेन जाधवाच्या कचाट्यातून यानेच सॊडविले. यामुळे छत्रपती व पेशवे या दॊघांचाही यांच्यावर फार लॊभ जडला. बाळाजी, बाजीराव, चिमाजी, बाळाजी बाजीराव व सदाशिवराव यांनी उत्तरेत व दक्षिणेत ज्या अनेक स्वार्या केल्या त्यापैकी बहूतेकांत हा प्रमुखपणे वावरला. एवढेच नाही तर यांनी स्वता:हि अनेक स्वार्या काढल्या हॊत्या. हा शिंदे, हॊळकर तॊलाचा सरदार असतांही केवऴ हुजरातीत राहिल्यामुऴे संस्थानिक बनू शकला नाही. "
संदर्भ व माहिती साभार - सरदार पिलाजी जाधवराव ( व्यक्ती आणि कार्य ).
- प्रणिल पवार.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...