विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 July 2019

शिवरायांचा तिसरा डोळा – बहिर्जी_नाईक

शिवरायांचा तिसरा डोळा – बहिर्जी_नाईक

शिवरायांचा तिसरा डोळा

#बहिर्जी_नाईक
 बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या सामर्थ्याचा ‘गुप्त’ आधारस्तंभचं म्हणावे लागतील. स्वराज्य सेनेच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून ते काम सांभाळत असतं. या गुप्तहेर खात्याच्या साहाय्यशिवाय शत्रूप्रदेशामध्ये मोहिमा आखणे जवळ जवळ अशक्य होते.
कारण शत्रू गोटातील हालचाली, तेथील प्रदेशांमधील महत्त्वाची ठाणी, महत्त्वाच्या व्यक्तींची कमकुवत स्थाने आणि युद्ध प्रसंगी रामबाण इलाज ठरेल अशी एखादी गुप्त गोष्ट शोधून काढण्याचे महत्त्वपूर्ण काम गुप्तहेर खाते करत असे.
म्हणजे एक प्रकारे विजयाचा पाया घालण्याचे काम हे गुप्तहेर खाते करायचे आणि पुढे त्यावर कळस चढवण्याचे काम अर्थातच महाराजांच्या शूर शिलेदारांचे असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील गुप्तहेर खात्याचे महत्त्व माहित असल्याने अगणित निधी ते या खात्यावर खर्च करीत असत.
महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये तब्बल ३-४ हजार गुप्तहेरांचा भरणा होता आणि त्यांचे म्होरक्या होते बहिर्जी नाईक. त्यांच्याच माध्यमातून महाराजांनी आज इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेल्या सर्वच मोहीमा यशस्वी करून दाखवल्या.
तर अश्या या नेहमी पडद्याआड असणाऱ्या महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे बहिर्जी नाईक म्हणजे कणा होते.
महाराजांनी जेव्हा रायरेश्वरच्या मंदिरामध्ये स्वराज्य निर्मिर्तीसाठी स्वत:ला वाहून घेण्याची शपथ घेतली तेव्हापासून महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बहिर्जी नाईक यांनी स्वराज्याची सेवा केली.
बहिर्जी नाईक यांना लहानपणापासूनच बहुरूप्याची कला अवगत होती. विविध वेषांतरे करून ते समोरच्याला पुरते अचंबित करून सोडायचे. पुढे पोटापाण्यासाठी त्यांनी एक व्यवसाय म्हणून बहुरूप्याची कला दाखवण्यास सुरुवात केली.
तेव्हाच एका क्षणी महाराजांची आणि बहिर्जींची नजरानजर झाली आणि पहिल्याच नजरेत महाराजांनी हा व्यक्ती खेळ करण्यासाठी नव्हे तर शत्रूच्या गोटात राहून त्यांना खेळवण्यासाठी जन्माला आली आहे हे ताडकन ओळखले आणि बहिर्जीना आपल्या सेनेत सामील करून घेतले.
वासुदेवापासून ते भिकाऱ्यापर्यंत कोणताही वेष म्हणा बहिर्जी कोणाचीही अगदी उत्तम नक्कल करीत. एखाद्या व्यक्तीने त्यांना एका वेशात पाहिले आणि नंतर अगदी काही मिनिटांत दुसऱ्या वेशात पाहिले तर त्याला ते किंचितही ओळखू येत नसत, इतका जबरदस्त वेश ते पालटायचे.
बहिर्जींकडे फक्त वेषांतराचीच कला होती असे नाही तर समोरच्याचा आपल्या शब्दांनी वेध घेऊन त्याच्या नकळत सर्व माहिती काढून घेण्याचे कसब त्यांना पुरते अवगत होते.
अहो चक्क दिल्लीचा बादशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या महालात ते वेषांतर करून फिरत असत. जराशीही शंका आली तरी समोरच्याला शत्रू पक्षाचा माणूस ठरवून देहदंड देणाऱ्या या सुलतानांची भेदक नजर कधीही बहिर्जींचा ठाव घेऊ शकली नाहीत यातच बहिर्जींचे असामान्य कर्तुत्व सामावले होते.
शिवाजी महाराजांनी गुप्तहेर खात्याची सर्व सूत्रे बहिर्जींकडे दिली असल्याने बहिर्जी देखील अतिशय प्राणपणाने ते खाते चालवत असतं. त्या खात्यावर त्यांचा पूर्ण वचक होता.
खोटी माहिती देणाऱ्या आपल्या खात्यातील सहकाऱ्यास कडेलोट दिला जाईल अशी सक्त ताकीद बहिर्जीनी दिली होती. त्यामुळे महाराजांचे गुप्तहेर खाते कार्यक्षमपणे कार्यरत असायचे.
बहिर्जीनी गुप्तहेर खात्याची एक सांकेतिक भाषा विकसित केली होती. ही भाषा केवळ गुप्तहेर खात्यालाच कळे. त्यामुळे गुप्तहेर खात्याची माहिती कधीही बाहेर फुटली जात नसे.
अगदी महत्त्वपूर्ण माहिती द्यायची असल्यास बहिर्जी स्वत:हून महाराजांच्या दरबारात हजर व्हायचे. तेव्हा देखील ते वेषांतर करून येत असल्याने इतरांच्या नजरेस पडायचे नाहीत. असे म्हटले जाते की बहिर्जी नाईक असा कोणी माणूस नाहीच असे काही लोकांना वाटत असे. इतके बेमालूमपणे आणि अज्ञातवासात असल्यासारखे ते वावरायचे.
अनेकांना असे वाटत असेल की बहिर्जी नाईक हे फक्त गुप्तहेराचेच काम करायचे त्यात काय कर्तुत्व? तर अश्यांना सांगावेसे वाटते की – ते लढाई करण्यात देखील वाक्बगार होते. पण तरीही – गुप्तहेराचे काम म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे.
शत्रूच्या गोटात असताना कधी कोणाला संशय येईल आणि कधी कोण नंग्या तलवारीनिशी अंगावर धावून येईल याचा नेम नसायचा. त्यामुळे बहिर्जीनी दांडपट्टा, तलवारबाजी यांसारखी युद्ध तंत्रे आत्मसात करून घेतली होती. त्याच जोरावर ते अटीतटीच्या प्रसंगांमधून एकट्याने शत्रूला धूळ चारत बाहेर पडायचे.
अफझल खानाचा वध ही स्वराज्याच्या इतिहासातील मोठी घटना. त्यात बहिर्जींनी फार मोठी कामगिरी बजावली होती.
अफझल खान महाराष्ट्राच्या भूमीत आल्यापासून बहिर्जी त्याच्यावर नजर ठेवून होते. वेळ पडली तर त्याच्या गोटात घुसून मिळेल ती महत्त्वाची माहिती काढून ते राजांपर्यंत पोचवत होते. अफझल खान हा शिवाजी राजांना संपवण्यास आला आहे हा निरोप पोचवणारे देखील बहिर्जीच!
या निरोपानंतर महाराजांनी खेळी बदलली आणि खानाचा शेवट कसा केला हे वेगळ्याने सांगायची गरज नाही…!
शाहिस्तेखानाची फजिती करण्यामध्ये देखील महत्त्वपूर्व वाटा बहिर्जीचा होता. त्यांनी खानाची प्रत्येक हालचाल महाराजांपर्यत पोचवली आणि लाल महालात शिरकाव करण्याचा मार्ग कळवला.
महाराजांना चकवू पाहणाऱ्या कारतलब खानाचा डाव देखील बहिर्जीनी उधळून लावला. खानाने कोकणात जाण्यासाठी बोरघाटाऐवजी उंबरखिंड निवडली आणि ही माहिती बहिर्जींना कळताक्षणी त्यांनी तातडीने महाराजांना कळवली. माहिती मिळताच महाराजांनी आपले सैन्य उंबरखिंडीमध्ये पेरले आणि पुढे कारतलब खानाच्या २०००० सैन्याचा उंबरखिंडीतच धुव्वा उडवला.
अश्या प्रकारे प्रत्येळ वेळी बहिर्जींच्या अचूक आणि भरवश्याच्या बातम्यांनी महाराजांचे विजय सुकर केले.
विचार करा – त्या काळी कोणतीही साधने नसताना बिनधोक शत्रूच्या छताखाली वावरून गुप्त माहिती मिळवणे किती कठीण असेल पण बहिर्जी आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याने कशाचीही तमा न बाळगता प्रत्येक वेळेस हे कार्य सिद्धीस नेले.
शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून त्यांना इतिहासामध्ये दिली गेलेली उपाधी सर्वच दृष्टींनी सार्थ ठरते.
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये बाणूरगड नावाचा एक किल्ला आहे. कधी भेट दिलीत तर तुम्हाला या महान गुप्तहेराची समाधी तेथे आढळून येईल. तेव्हा न चुकता या समाधी समोर नतमस्तक होऊन त्यांना मुजरा करण्यास विसरू नका
 #जय_जिजाऊ
#जय_शिवराय

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...