विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 July 2019

मोरोपंत पिंगळे.(पेशवा /पंतप्रधान)

शिवस्वराज्याचे अष्टप्रधान मंडळ..!!
(गाथा राज्यरक्षकांच्या राजनिष्ठतेची)
भाग -: 1

मोरोपंत पिंगळे.(पेशवा /पंतप्रधान)
दुर्गरचना तज्ञ मोरोपंत-:
मोरोपंत पिंगळे बंगलोरच्या मांडलिक राज्यातून दऱ्याखोऱ्यात होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील साक्षात स्वराज्यात सन 1643 मध्ये दाखल झाले.
त्यांचे वडील त्रंबकजी शहाजी राज्यांच्या दरबारी नोकरीस होते.
शहाजी राज्यांच्या नियोजनामुळे व काहीसे शिवाजीराज्यांच्या बालपणीच्याच बंगरूळला अनुभवलेल्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित होऊन, मोरोपंत आनंदाने पुण्याला आले.
"अंतर कोपी हेतू" हा भवभूतीने टिपलेला प्रेमाच्या राज्यातील न्याय राजकारणातही आयुष्यभर लागू झाला.
शिवाजीराज्यांनी मोरोपंतांना यथोचित स्थान दिले. मोठ्या साहसाने व युक्तीने मिळवलेल्या पुरंदरचा कारभार त्यांच्याकडे सोपविला.
प्रारंभीच्या उभयतांच्या प्रयत्नातील प्राप्त दुर्गराज पुरंदर व वज्रगड सांभाळण्याची जिम्मेदारी पंतांनी चोख पार पाडली.
दुर्गसंरक्षण, दुर्गव्यवस्था व दुर्गरचना यात मोरोपंताना विशेष आवड होती.
पाश्चिमात्य इतिहासकार किंकेड यांच्या मतानुसार राजगडाची तटबंदी भक्कम करण्याची कामगिरीही मोरोपंतांवरच सोपवली होती.
रायगड राजधानी होईपर्यन्त 23 वर्षे राजगड स्वराज्याची राजधानी होती.
किंकेडच्या मतास अनुकूल असे शेडगांवकर बखरीत वर्णन आहे कि शिवाजी राज्यांनी प्रचंडगड( तोरणा) किल्याच्या आग्नेय दिशेस तीन मैलावर असलेल्या मोरबाद डोंगरावर मोरोपंतांच्या देखरेखेखाली हा किल्ला झपाट्याने उभारला, त्यावर तटबंदी केली व राजगड असे नाव ठेवले.
पुरंदर व राजगड या शिवकाळालीत स्वराज्याच्या पहिल्या दोन राजधान्यांतीलही मोरोपंतांची कामगिरी संस्मरणीय आहे.
प्रतापगड हे मोरोपंताच्या दुर्गस्थापत्य ज्ञानाचे दुसरे स्मारक. पारघाटाच्या पायथ्याशी मोऱ्यांनी एका मोक्याच्या डोंगरावर आधीच काही तात्पुरते लढण्यास व दडण्यास उपयोगी आडोसे निर्माण केले होते.
हि जागा चंद्रराव मोऱ्यांना फार शुभकारक झाली होती.
जावळी घेतल्यावर महाराज्यांच्या येथेच कुलदेवता तुळजाभवानीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले, अश्या लाभदायी व मोक्याच्या ठिकाणाचे बांधकाम भक्कम किल्याच्या योजनेसह मोरोपंतांकडे सुपूर्द करण्यात आले.1655 साली मोरोपंतांनी हा मजबूत किल्ला बांधला. या बांधकामावर शिवाजी राजे बेहद खुश झाले.
पारघाट व कोंकण मुठींमध्ये ठेवण्यासाठी या प्रतापगडाचा अनन्यसाधारण उपयोग झाला. त्याला सभोवताली असलेली तटबंदी, बचाव व लढाई या दोन्ही दृष्टीने उपयुक्त आहे.
बुरुज पन्नास फुटापर्यंत उंच आहेत, आतील वाटा फसव्या व अत्यंत अवघड आहेत. याच किल्ल्यातून शिवरायांनी आसमंतात लवकरच गरुडभरारी घेतली, शिवरायांचे दुर्गस्वप्न मोरोपंतांनी साकार केले, कुलस्वामिनी यथाविधी स्थापना येथेच झाली.
रियासतकार सरदेसाई लिहतात, इतःपर मोरोपंत हा शिवाजी राज्यांचा केवळ उजवा हात बनला सन 1683 पर्यंत स्वतः औरंगजेब दाखल होईपर्यंत हा राजगड किल्ला मराठ्यांकडे होता.
ब्रिटिश काळात सातारकरांच्या ताब्यातील या दुर्गाचे महत्व व वास्तपरस्त फार होती. स्वातंत्रकाळात तेथे शिवरायांचा अश्वारूढ पुतळा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी उभारला.
पराक्रमाची धार-:
प्रतापगडाच्या बांधकामानंतर अवघ्या चार वर्षांनी म्हणजे 1659 साली स्वराज्याचा घास घेण्यासाठी विजापूरचा बलाढ्य सरदार अफझलखान स्वराज्याकडे झेपावला, प्रतापगडाच्या प्रांगणात युक्तीयुक्तीने त्याला उभे केले. या सुलतानी संकटात दिनांक 10 नोव्हेंबर 1659 मोरोपंतांचे पायदळ खानाच्या पारघाट येथील बिनीच्या सैन्यावर तुटून पडले व त्यांनी कोयनापार असलेल्या लष्कराची दाणादाण उडवली.त्यांचे मुख्य काम कोयनापारच्या फौजेला गडावर चालून जाऊ न देता मध्येच अडथळा करून तिचा करावयाचा हे होते. हा हल्ला मोरोपंतांनी यशस्वी केला, त्यावेळी महाराज्यांना त्यांच्या तलवारीची धार समजली.
इतिहास पंडित शेजवलकर लिहतात अफझलखानाच्या सैन्याची दाणादाण उडवण्यात मोरोपंतांचा प्रमुख सहभाग होता.
नेताजी पालकर व मोरोपंत पिंगळे या बिनीच्या दोघा लढवय्यांना प्रतापगडाच्या विरुद्धदिशेवर संरक्षणार्थ महाराज्यांनी सैन्यासह सुसज्ज ठेवले होते.
महाराज्यांच्या दूरदृष्टीबरोबरच या दोन झुंजार साथीदारांची झंझावाती साथही प्रतापगडाच्या अभूतपूर्व यशात महत्वाची आहे.
मुजुमदार व पेशवे -:
मोरोपंतांच्या आधी पेशवेपद श्यामराज नीलकंठ रांझेकर यांच्याकडे होते.पण श्यामराज कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घालणाऱ्या सिद्धीवर स्वारी करावयास गेले असता त्यांनाच पराभव पत्करावा लागला, याउलट नंतर पाठविलेल्या मोरोपंतांनी मात्र सिद्धीला पळवून लावले, कुरबुर करणाऱ्या खेमसावंतांचीही त्यांनी खोड मोडली.
अश्या एक ना अनेक उत्तम कामगिरींमुळे त्यांना 1660साली मुजुमदारी व 1669 साली पेशवेपद मिळाले.
शाहिस्तेखान प्रसंगातील सावधानता-:
शाहिस्तेखानच्या मोहिमेच्या वेळीहि मोरोपंत निवडक फौजेसह महाराज्यांच्या मदतीस उभे होते.
प्रा.जदुनाथ सरकार बखरीच्या आधारे लिहतात कि, महाराज्यांनी नेताजी पालकर व मोरोपंत पिंगळे यांच्याबरोबर प्रत्येकी एक एक हजार सैन्य देऊन त्यांस खानाच्या पुण्याच्या प्रचंड छावणीच्या दोन्ही बाजूस एक मैलाच्या अंतरावर राहावयास सांगितले होते.
वस्तुतः मार्च 1663 च्या दरम्यान मोरोपंतांनी कोंकणात जामदार खान विरुद्ध निळोजी सोनदेवांसह लढण्यास पाठविले होते. पण 3 एप्रिल 1663 रोजी शाहिस्तेखान प्रसंग उध्दभवतेवेळी पुनश्च कोंढण्याकडे कूच करण्याचा हुकूम देण्यात आला अशी दप्तरी नोंद सापडते.
शिवरायांच्या आग्राभेटीदरम्यान मांसाहेब जिजाऊंच्या देखरेखेखाली मोरोपंतांनी स्वराज्याचा कारभार मोठ्या हुन्नरीने सांभाळला होता.
साल्हेरचे यश-:
सन 1670 मध्ये मोरोपंतानी त्र्यंबकचा किल्ला हस्तगत केला,त्यावेळी औंढा,पट्टा, रावळा-जावळा हे किल्ले हि मोतोपंतांनी काबीज केले.
प्रतापराव गुजरांची झुंजार व तडफेची साथ त्यांना होती.
असे एकापाठोपाठ किल्ले काबीज करत असताना लवकरच मोघली सरदार महाबतखान, एखलासखान व दिलेरखान यांच्याविरुद्ध साल्हेरीचा इतिहासप्रसिद्ध संग्राम छेडावा लागला.
फर्जंद आनंदराव मकाजी, सरनोबत प्रतापराव गुजर व पेशवे मोरोपंत पिंगळे या त्रयींनी वरील बादशाही त्रिकुटाचा धुव्वा उडविला.
परंतु या रणसंग्रामात सूर्याजी काकडे सारखे नररत्न खर्ची पडले.
"मध्यानीचा भास्कर पाहवेना- तैसा शिवाजी नृप जिंकवेना" असे बखरकरांनी या रणसंग्रामचे वर्णन केले आहे.
रायगडचे सुवर्णक्षण-:
जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1593 ( 6 जून 1674 ) पहाटेच्या सुमारास शिवराज्यभिषेकाचा मुहूर्त होता. राज्यभिषेकासमयी अष्टप्रधान उभे होते , त्यावेळी उजवीकडे पूर्व दिशेला घृतपूर्ण सुवर्ण कलश धरून उभे राहण्याचा मानसन्मान मोरोपंतांना मिळाला.
सुहासिनींनी व कुमारिकांनी ओवाळल्यानंतर पंतप्रधान मोरोपंतांनी सर्वप्रथम श्री.शिवछत्रपतींना राजमस्तकीच्या मुकुटावर आठ सहस्त्र होन हलके हलके ओतून सुवर्णस्नान घातले.
कर्तव्यनिष्ठ मोरोपंत-:
हाती घेतलेल्या कामात प्राण ओतण्याचे पंतांचे ब्रीद होते. ते चौफेर व्यक्तिमत्वाचे पुरुष होते.
न्यायमूर्ती रानडे आपल्या मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथात मोरोपंत पेशव्यांबद्दल लिहतात, उत्तम कारभारी,प्रमुख परामर्शदाता, दुर्गतज्ञ व नामवंत सेनानी म्हणजे मोरोपंत पिंगळे.
सन 1676ला शिवाजी राजे कर्नाटक मोहिमेवर असताना, आपल्या पश्चात मोरोपंतास राज्यांचा कुलमुखत्यार देऊन सचिव अनाजी दत्तो याना सहकार्याने वागण्याची आज्ञा केली.
शिवाजी महाराज्यांनी लिहलेल्या एका पत्रात मोरोपंतांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी होतील असा उल्लेख आहे.
राजश्री मोरोपंत प्रधान यांसी पत्र लिहले असे, ते मनास आणून जे चालले असेल ते चालवतील अंतर पडणार नाही,जाणिजे ( संदर्भ-शिवचरित्र सा.खंड 552).
शिवसुर्यास्ताच्या वर्षीच अंत-:
3 एप्रिल 1680 शिवसूर्य अस्तंगत झाले.
त्यानंतर संभाजी राज्यांच्या विरुद्ध कारस्थानात ते सहभागी झाल्यामुळे मे 1680 ला अटक झाली, पुढे जुलै 1680 ला संभाजीराज्यांनी त्यांची मुक्तता केली.
संभाजी राज्यांनी त्यांना मुक्त करून पेशवाईच्या जागी कायम केले,
अटकेपासून मृत्युपर्यन्त मोरोपंत आजारीच राहिले. शिवप्रभुंच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यानेच म्हणजे ऑक्टोबर 1680 ला मोरोपंत रायगडावरच अंतर्धान पावले.( संदर्भ-: जेधे शकावली ).
मोरोपंत आणखी काही काळ टिकले असते तर.....पण इतिहासात जर-तर ला वाव नसतो हेच खरे.
शंभू राज्यांनी त्यांच्यासाठी आपले कर्तव्य ठीकठाक बजावले पण काळाने ते मोडले. एवढ्या मोठ्या राजाचे पंतप्रधान काळाची चाहूल जाणण्यात शेवटी अपयशी ठरले हे मात्र निःसंशय.
समाप्त .....
विजय स.येडगे.
श्रीमानयोगी सेवा परिवार.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...