विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 July 2019

” अजिंक्य रामसेज “

” अजिंक्य रामसेज “

|| हिंदवी स्वराज्याच्या शूरवीर मावळ्यांचा विजय आहे ||
” अजिंक्य रामसेज “
[ मराठ्यांची शौर्यगाथा ]
दुर्ग रामसेज , अशी कथा आहे कि , ” वनवासात
प्रभूरामचंद्रांनी , तसेच माता सीता आणि लक्ष्मण ह्यांनी ह्या दुर्गावर आराम केला , म्हणूनच ह्या नाशिक प्रांतातील दुर्गा ला , रामसेज म्हणोन नाम पडले ” . हा दुर्ग गिरीदुर्ग प्रकारातील , १५०० फूट उंच आणि दिंडोरी तालुक्यापासून १४ मैलांवर आहे . सन १६७० , १६७१ , १६७२ , १६७३ मध्ये , नाशिक प्रांतातील सर्वच किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली , मराठ्यांच्या सेनानींनी जिंकले . रामसेज हा दुर्ग ह्याच काळामध्ये स्वराज्यात आला असेल , नोंद सापडत नाही . किल्याला एक चोरवाट होती .
पुढे सन १६८२ मध्ये , संपूर्ण दख्खन काबीज करण्याकरीता औरंगजेब मोठ्या सेनासागरानिशी दक्षिणेत उतरला . दि. २८ फेब्रुवारी १६८२ मध्ये त्याने बुऱ्हाणपूर सोडले , नंतर दि. २२ मार्च १६८२ रोजी औरंगजेब संभाजीनगर ( औरंगाबाद ) मध्ये आला . औरंगजेब रणनीती आखू लागला , त्याने प्रथम आदिलशाह आणि संभाजी यांमध्ये एकी न हॊवो ह्या कारणामुळे शहजादा आजम यास , विजापूरात पाठविले . आता संभाजीराजांचे लक्ष विचलित करण्याकरिता रुहुल्लाखानास नगरला तर नाशिकचा रामसेज जिंकण्याकरिता शहाबुद्दीन खानाला रवाना केले ( रामसेजच प्रथम का , कारण जेव्हा शाहजहान दक्षिणेत जेव्हा मोहिमेसाठी आलेला तेव्हा त्याने पहिला हा किल्ला जिंकून सुरुवात केली होती , आणि मोगलांच्या दृष्टीने हा किल्ला जिंकायला सोपा होता ; म्हणोनच रामसेज ! ) . नाशिक बागलाण प्रांतातील मुल्हेर वगळता अहिवंतगड , साल्हेर , त्रिंबकगड , पट्टागड , रामसेज मराठ्यांच्या ताब्यात होता .
■ रामसेजचा संघर्ष :
औरंगजेबाने शहाबुद्दीनखाना बरोबर , २० हजाराची पठाण व तुर्की हशमांची फौज दिली , तसेच प्रचंड युद्धसाहित्य आणि प्रभावी तोफखाना दिला . खान आपला सरंजाम घेऊन रामसेजच्या दिशेने निघाला . मार्च १६८२ मध्ये , शहाबुद्दीनखानाने दुर्गाला वेढा दिला , खानासोबत मुंहमद खलिल , पीर गुलाम , शुभकर्ण बुंदेला , राव बुंदेला या सारखे शूर सरदार होते .
मराठे हा सारा प्रकार शांतपणे किल्ल्यावरून पाहत होते . त्यावेळी रामसेजचे किल्लेदार हे सूर्याजी जेधे किंवा रंभाजी पवार ह्यांपैकी असावेत , योग्य नोंद सापडत नाही ; परंतु किल्लेदाराच्या पराक्रमामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला होता . सुरुवातीला मराठे काहीही प्रतिकार करत नव्हते , ह्याचा फायदा खानाने घ्यायचा ठरविला , ह्याने निवडक फौज घेऊन किल्ला चढावयास सुरुवात केली , चढत चढत खान फौझेसह मध्यावर आला , आता मराठ्यांनी गोफण वर खाली आणि दगडांचा मारा सुरू केला , मोगल मार खाऊन परत फिरले , तर काही मृत्यूमुखी पडले ; असाच प्रयत्न खानानं पुन्हा केला ; परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही , मराठ्यांचीच सरशी होत होती .
शहाबुद्दीनखानाने मराठ्यांच्या शस्त्रसामुग्रीची माहिती मोगली हेरांकडून काढली , तर त्याला समजले कि , मराठ्यांकडे तोफा नाहीत , खानाने कल्पना लढविली , किल्ल्यासमोर एक मोठा लाकडी बुरूज तयार करायचे ठरविले , आणि महिन्या दीड महिन्यात लाकडी बुरुज तयार झाला , एकावेळी ५०० माणसं तोफांसहित बुरूजावर राहून शत्रूवर मारा करू शकत होते ; आणि दुसऱ्या दिवशी तोफांची सरबत्ती सुरू केली . तोफगोळे किल्ल्याच्या दारापर्यंत पडत होते , मराठे शांतच होते . पण जेव्हा माऱ्यामुळे स्फोट व्हायला लागले , तेव्हा मराठ्यांनी आपल्या लाकडी तोफा बाहेर काढले आणि तोफांची तोंड लाकडी बुरुजांच्या दिशेने मराठ्यांनी केली , आणि दुसऱ्या क्षणी बुरुजांवर तोफगोळे पडू लागले , काही वेळेमध्ये तोफांच्या प्रभावी माऱ्यामुळे बुरूज कोसळला , शहाबुद्दीन खानाचा मोठा डाव फसला .
तोफा नव्हत्या तर मराठ्यांकडे त्या आल्या कुठून , किल्यात कातडं खूप प्रमाणात होतं , मराठ्यांनी लाकडी तोफा बनविल्या , तोफगोळे मोगलांचेच आणि लढा चालू ठेवला , व शहबुद्दीनखानाचा सपाटून पराभव केला . 】
भीमसेन सक्सेना म्हणतो कि , ‘ शहाबुद्दीनखानाने जो लाकडी बुरुज बांधला होता , तो मी स्वतः पाहिला होता , खरोखरच तो प्रेक्षणीय होता ‘ .
रामसेजच्या सर्व खबरा रायगडावर येत होत्या , छत्रपती संभाजी महाराजांनी देखील रामसेज कडे विशेष लक्ष दिले होते . एप्रिल – मे १६८२ मध्ये , रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांनी गणेशगावाजवळ , शहाबुद्दीनखानावर जोरदार हमला केला , मराठयांनी ५०० गनीम कापले , मोगलांची अपरिमित हानी झाली . पुढे औरंगजेबाने त्याला पत्र पाठविले , तू रामसेजचा किल्ला घेण्याबाबत खूप कष्ट घेतलेस , जीवाचीही पर्वा केली नाहीस , सध्या तो खानजहाँन बहादूराच्या अधिकाराखाली दिला आहे , तो बादशाही अंमलाखाली आणील , त्याच्याजवळ तू तोफखाना सोडून तू स्वतः आपल्या जमेतीसह अंतुरच्या ठाणेदार अहमदयानजवळ पोहचावे . ह्यादरम्यान १ हजाराची फौज शंभूराजांनी रामसेजवर पाठविली , तसेच त्र्यंबकगडावरून युद्धसाहित्य मराठ्यांना (रामसेजवरील) मिळतच होते . पुढे दि. २६ सप्टेंबर १६८२ रोजी शहाबुद्दीनखान परतला .
खानजहाँन उर्फ बहादूरखान
कोकलताश , ह्याच्याजवळ आता मोगली फौझेचे नेतृत्व आले . बहादूरखान हा औरंगजेबाचा दूधभाऊ होता , मात्र ‘ पेडगावचा शहाणा ‘ म्हणोन प्रसिद्ध होता . खुद्द छत्रपती शिवरायांनी धर्मवीरगड( बहादुरगड ) लुटूले , बुऱ्हाणपूर सुद्धा ह्याच्याच गलथानपणामुळे छत्रपती संभाजी राजांनी लुटले , तसेच वारंवार आधी ताकीद देऊनही केवळ गाफीलपणामुळे अकबराला कोकणात निसटू दिले , ह्या सर्व कारणांमुळे बहादूरखान रामसेजवर कितपत यश मिळवेल , ह्यावर औरंगजेबास शंका होती .
बहादुरखानाने एक योजना आखली , योजना अशी कि , काळोख्या रात्री एका बाजूने तोफखाना , सैन्य , बाजारबुणगे ह्यांची खूप गडबड उडवून द्यायची , जेणेकरून गडावरील मराठ्यांचे सर्व लक्ष ह्या दिशेने होईल , आणि दुसऱ्या बाजूने योग्य जागा हेरून निवडक २०० शूर आणि पटाईत शिपायांनी मशाली न घेता दोराच्या साहयाने किल्यावर पोचून अचानक मराठ्यांवर हल्ला करणे , आणि किल्ला ताब्यात घेणे . योजना तर फारच उत्तम होती ; परंतु बहादूरखानाचं दुर्दैव एवढंच कि , मराठ्यांचा किल्लेदार हुशार व सावध होता , त्यांस आधीच मोगलांचा कावा समजला होता , त्यामुळे मोगल जेथून वर येणार होते , तेथे किल्लेदाराने मावळ्यांच्या २ तुकड्या पाठविल्या , आणि मावळ्यांनी योग्य हुशारीने गनीम कापून काढला . मराठ्यांची परत एकदा सरशी झाली . नंतर बहादुरखानाने एका मांत्रिकाला सल्ल्याने प्रयत्न केला ; पण तो प्रयत्न सपशेल फसला . सगळ्या गोष्टींचा विचार करून बहादूरखानाला औरंगजेबाने माघारी बोलावले . आणि आता नेतृत्व कासीमखान किरमानी ह्याकडे आले , कासीमखान हा मोठा लढवय्या सरदार ; परंतु त्यालाही काही यश मिळाले नाही .
अनेक पराक्रमी सरदार येऊनसुद्धा रामसेज ” अजिंक्य ” होता , हि खबर शंभराजांपर्यंत धडकली . शंभूराजांनी किल्लेदारास मानाचा पोशाख , रत्नजडित कडे , आणि नगद रक्कम पटवून त्याचा गौरव केला , व त्याची एका प्रमुख किल्ल्यावर बदली केली .पुढे ६ वर्षे किल्ला मराठयांनी लढविला आणि सन १६८७ ला मोगलांनी हा किल्ला फितुरीने ( न जिंकता ) ताब्यात घेतला होता , ह्याबद्दल खाफीखान लिहतो कि , ” १६८७ मध्ये औरंगजेबाचा सरदार नेकमानखान याने जमीनदारास फितुर केले . त्या जमीनदाराने किल्लेदारास वश केले आणि किल्ला ताब्यात घेतला , फितुरीने घात केला ” . मोगलांना लढून किल्ला घेता आला नाही .
” छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्यांचे निर्माण केले , काहींची डागडुजी केली , ह्यात खूप प्रमाणात धन खर्च होत असे , एकदा पेशवे मोरोपंतांनी खुद्द छत्रपती शिवरायांना सवाल केला कि , राजन आपण दुर्गांवर एवढा खर्च का करतो , तेव्हा राजे बोलते झाले , पंत दुर्ग म्हणजे राज्याचे सार , सर्वस्व , आज आपल्याकडे ३६० दुर्ग आहेत यदाकदाचित उद्या आलमगीर बादशाह दख्खन जिंकण्याकरिता उतरेल , तेव्हा आपला एक एक गड आपल्या मावळ्यांनी एक एक वर्ष जरी लढविला , तर सारा दख्खन काबीज करायला बादशहाला ३६० वर्षे लागतील , आणि ते कदापि शक्य नाही . आणि इकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली , मराठ्यांनी किल्ले रामसेज ६ वर्षे लढविला , इशारा साफ होता .
स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूमहाराजांच्या पवित्र चरणी माझा मानाचा मुजरा ….
संदर्भ : –
छत्रपती संभाजी महाराज ( श्री. वा.सी.बेंद्रे ) ,
शिवपुत्र संभाजी ( सौ. कमल गोखले ) ,
जेधे शकावली ,
संभाजी (श्री. विश्वास पाटील ) , ज्वलनज्वलनज्वतेजस संभाजी राजा ( डॉ. सदाशिव शिवदे ) , मराठ्यांचे स्वातंत्र्य समर ( श्री. पुराणिक ) , मराठी बखर , शिवकाल १६३० – १७०७ ( डॉ. वि.गो.खोबरेकर ) , इंग्लिश रेकॉर्डस् , रणवीर संभाजी ( श्री. मनोज पाटील ) , शंभूराजे ( सु. ग. शेवडे ) ,
” अखंड भारताचा विजय आहे ” .
|| जय हिंद ||

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...